चावडीवरच्या गप्पा – साहित्य संमेलने आणि सरकार

“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली.

“ऑ?”, नारुतात्या.

“अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता.

"अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!", इति नारुतात्या.

“अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.

“कुठली मराठी म्हणायची ही? बहुजनांची की पुण्या-मुंबैतली?”, इती कट्ट्याचे बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आवराsss 'काका मला वाचवा' ह्याऐवजी 'ह्या काकांना वाचवा', असे म्हणायची वेळ आली आहे, अहो भुजबळकाका प्रत्येकवेळी असा उपरोध बरा नव्हें ”, घारुअण्णा वैतागून.

“तुमचे हे साहित्य संमेलन सर्वसमावेशक असते काय? बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करते काय? साहित्य हा समाजमनाचा आरसा असायला हवा, तसे ते असते काय? उगा सरकारला दोष देऊ नका”, भुजबळाकाका आवेशात.

“नाहीतर काय, म्हणे सरकारने साहित्य संमेलनाचा सगळा खर्च उचलावा, अरे सरकारला दुसरे काही काम नाही का?”, शामराव बारामतीकर, सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या साहेबांच्या पक्षाशी निष्टा राखत.

“आम्ही टॅक्स काय ह्यासाठी भरतो?”, नारुतात्या.

“नाहीतर काय?”, शामराव बारामतीकर.

“अहो ह्या सरकारने, राजकारण्यांनी सगळा टॅक्सरुपी पैसा भ्रष्टाचार करून आपल्या घशात घातलेला चालतो तुम्हाला, पण जरा काही समाजोपयोगी काम करायचे म्हटले की त्रागा सुरु”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“हे बघा उगा आरोप करू नका. सगळे राजकारणी आणि पक्ष तसे नसतात.”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“तर तर, उजेडच पाडला आहे ना तुमच्या साहेबांनी. जिथे जिथे चरायला कुरण आहे तिथे तिथे साहेब हजर! पण समाजासाठी, साहित्यासाठी काही करायचे म्हटले की लगेच जातीचे राजकारण करायला तयार, त्यासाठी आहेतच हे आपले बहुनजकैवारी, भुजबळकाका”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका, अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा कोठे गेले होते हे तुमचे समाजाभिमुख साहित्यिक? भ्रष्टाचार होतो आहे तर त्या विरोधात किती साहित्यिक आंदोलन करायला रस्त्यावर उतरले, समाजासाठी?”, भुजबळकाका.

“खरंय घारुअण्णा! साहित्यिक, साहित्य संमेलनं आणि समाज ह्यांची गल्लत करत आहात तुम्ही”, सोकाजीनाना.

“काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो हे लोकशाहीतले सरकार आहे, ते काही अकबर बादशहाचा दरबार नाही, साहित्यिक पदरी बाळगायला!”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“हे काय आता नविनच”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“ही साहित्य संमेलने कोट्यावधी मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करतात असे समजले तर त्यांचा अध्यक्ष ठरवते कोण? त्यासाठी मराठी समाज, जनता जबाबदार नको? तीन-चारशे लोकं ह्या संमेलनाचा अध्यक्ष ठरवणार. त्यातही त्यांचे रुसवे फुगवे, कंपुबाजी. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा असेल वाद तिथेही सुटलेले नाहीत. बरें, झाला अध्यक्ष आणि झाले संमेलन त्याने साध्य काय होते? ह्या साहित्यिकांना साहित्याची सेवा करताना मेवा मिळायलाच हवा, लोकशाही आहे ना शेवटी इथे. पण ह्या साहित्यिकांनी कधी वाचनालये दत्तक घेतल्याचे किंवा त्यांना अनुदान दिल्याचे, पुस्तके दिल्याचे, एकरकमी मदत केल्याचे ऐकले आहे का कोणी? उगा प्रत्येकवेळी आपला हात सरकारपुढे करून आपलीच किंमत अशी कमी करून घेण्यात काही अर्थ नाही. तशीही मराठी जिवंत रहायला ह्यांच्या संमेलनांची गरज आहे, असेही नाही. मराठी भाषेत जर मुळात दम असेल तर ती शतकानुशतके टिकून राहिलच!”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, कधी उभ्या आयुष्यात तुम्ही कोणते साहित्य वाचले आहे काय? तुमचा 'संध्यानंद' सोडून. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांची कशी जिरली ह्या आनंदात भुजबळकाकांनी लगेच चहा मागवला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"तशीही मराठी जिवंत रहायला ह्यांच्या संमेलनांची गरज आहे, असेही नाही. मराठी भाषेत जर मुळात दम असेल तर ती शतकानुशतके टिकून राहिलच!” म्हंजे मराठी भाषकांना जर तिची सतत गरज भासत रहिली तर ती टिकेल अदरवाईज इट विल बी डेड ऑर इग्नोर्ड असं आपण (अथवा मी म्हणा हव तर) म्हणू शकतो का? हे तर्कशुद्ध वाटतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....