कांदा संस्थान मराठी साहित्य परिषदेचा जंगी आयपीओ

कांदा संस्थान मराठी साहित्य परिषदेचा (कांसंमसाप) आयपीओ जाहीर होणार, असा बोलवा गेले काही दिवस वेगवेगळ्या वर्तुळांत होत होता. त्याला भक्कम दुजोरा आज मिळाला. आमच्या वार्ताहराने या व्यवहाराशी संबंधित असलेल्या कांसंमसापच्या उच्चाधिकाऱ्याची मुलाखत घेतली. ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने त्या अधिकाऱ्याचे नाव वा पद जाहीर करणे शक्य नाही.

प्रः कांसंमसापचा आयपीओ होणार हे निश्चित आहे तर...

उः हो. सर्व पेपरवर्क पूर्ण झालेली असून सेबीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. येत्या आठवड्याभरातच आयपीओ जाहीर केला जाईल. कॉस्मोसॉप या नावाची कंपनी असेल. (Sansthaan Of Kanda Parishad Of Sahitya Of Marathi)

प्रः साहित्य परिषदेचे शेअर्स विकून तिची पब्लिक कंपनी करण्यामागची भूमिका तुम्ही सांगू शकाल का?

उः गेली अनेक वर्षं हा विचार परिषदेत चालू आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या थोडं आधी तर हा विचार नेहमीच जोर धरतो. आता पूर्वीचे स्वस्ताईचे दिवस राहिलेले नाहीत. दर वेळी संमेलनासाठी ४० - ५० लाख रुपये खर्च होतात. एवढे पैसे सरकारकडून आणायचे किंवा कोण्या धनिकांकडून मागायचे हे त्रासदायक होतं. बरं ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे त्यांचे मिंधे नसण्याची पण लोकांची अपेक्षा असायची. अजूनही असते. त्यापेक्षा जनताजनार्दनाकडे खुल्या बाजाराच्या तत्त्वावर पैसे मागितले तर त्यात सगळ्यांचाच फायदा आहे. तसंही गेल्या दोनतीन दशकात सर्वच जग समाजवाद, साम्यवाद सोडून खुल्या बाजाराकडे धावलेलं आहे. खुद्द चीनसारख्या साम्यवादी देशाने हे तत्त्व स्वीकारलं. भारताला त्यानंतर दहा वर्षांनी का होईना पण जाग आली. आता बाजारीकरणाचा आणि ग्लोबलायझेशनचा फायदा मराठी साहित्यालादेखील होईल.

प्रः पण एक लक्षात येत नाही की हे शेअर्स नक्की घेईल कोण?

उः कोण घेणार म्हणजे? अहो सगळे जण घेतील. मराठी भाषा गेले सातशे का नऊशे वर्षं अस्तित्वात आहे. त्यात ती अभिजात भाषा म्हणून जाहीर झाली की तिली हजार ते पंधराशे वर्षांच्या इतिहासाचं प्रमाणपत्र मिळेल. दहा कोटी लोक बोलतात ही भाषा. बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार जगातली अकरावी आहे. अशी भाषा पुढची शेकडो वर्षं टिकून राहील ही खात्रीच आहे. त्यामुळे ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा रिटायरमेंट फंड्सच्या पोर्टफोलियोमध्ये आमचे शेअर्स असणं अतिशय फायदेशीर आहे. बरं, मराठी अस्मिता कायम अधूनमधून उचंबळून येत असतात - त्यामुळे ज्यांना डे ट्रेडिंग करून चटकन पैसा कमावण्याची इच्छा आहे तेही या शेअरकडे नजर ठेवून रहातील.

प्रः पण मला एक लक्षात येत नाही, की हे शेअर्स कोणी का घ्यावेत?

उः म्हणजे? मराठी भाषेचा एक हिस्सा तुम्हाला आपल्या मालकीचा करून घेता आला तर कोणाला करावासा वाटणार नाही?

प्रः हे जरा समजावून सांगाल का?

उः तुम्हाला अजून लक्षात आलेलं दिसत नाही. अहो, मराठी भाषा आणि भाषिक हेच एका अर्थाने आमचं भांडवल आहे. मराठी मनावर अधिकार, अप्रत्यक्षपणे का होईना, मिळाला तर तो किती व्हॅल्यूबल आहे याची तुम्हाला कल्पना आलेली दिसत नाही. अहो, गेल्या तीनचार दशकांत मराठी लोकांची संख्या दुप्पट झालेली आहे. आणि नुसती दुप्पट नाही, तर त्यांचं सरासरी उत्पन्न चौपट झालेलं आहे. म्हणजे अंडरलायिंग ऍसेट्सची किंमत आठपट झाली आहे. आमच्या फोरकास्टप्रमाणे हा वाढीचा दर पुढची पाच दशकं तरी टिकून रहाणार आहे. करा हिशोब रिटर्न्सचा.

प्रः तसं नाही, तुमच्या या नवीन पब्लिक कंपनीचं नक्की कार्य काय असेल? उत्पादन काय असेल?

उः मराठी साहित्य हा मराठी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. लेखन वाचनाचा वारसा ज्ञानेश्वरांपासून आहे. समर्थांनीही सांगितलं की दिसामाजी काहीतरी ते लिहावे. तर या लिखाणाच्या माध्यमातून मराठी मनं जोडली जातात. या साहित्यावर व ते लिहिणाऱ्या साहित्यिकांवर परिषदेचा मोठा हक्क आहे. तो हक्क वापरून परिषद मराठी मनांमनांमध्ये पूल बांधणार - बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्स्फर तत्त्वावर. या पुलांवरून 'प्रवास' करण्यासाठी अर्थातच जो टोल द्यावा लागेल त्यातून परिषदेचा प्रचंड फायदा होणार आहेच. पण पंचवीस वर्षं टोल गोळा केल्यानंतर हे पूल तसेच रहातील, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी लागणारी अत्यावश्यक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटही आपोआप होईल. म्हणजे मराठी मनं साहित्यातून जोडली जाण्याने मराठी संस्कृतीचा फायदा होईल, साहित्याची भरभराट होईल, त्यातून परिषद आणि साहित्य संमेलनंही फायद्याच्या तत्त्वावर चालवता येतील - म्हणजे सरकारचे पैसे वाचतील. शिवाय गुंतवणुकदारांचा फायदा होईलच. एव्हरीबडी विन्स!

प्रः मनामनाचे पूल म्हणजे नक्की काय?

उः हे समजून घेण्यासाठी आपण आयपीएलचं उदाहरण घेऊ. आयपीएल सुरू होण्याआधी आपल्याकडे काय होतं - क्रिकेटवेडे काही लोक होते. भारताच्या टीमला ते सपोर्ट करायचे. पण त्यांच्यातल्या या बांधिलकीचा कोणालाच फायदा नव्हता. प्रत्येक जण आपापली मॅच बघायचा आणि भारताच्या टीमला शिव्या देऊन झोपायला जायचा. आयपीएलने हे चित्रच बदललं. वेगवेगळ्या टीम्स करून ही माझी टीम, ही आपली टीम, ही आपल्या शहराची टीम अशी भावना त्यांनी निर्माण केली. एका टीमच्या झेंड्याखाली, त्या टीमच्या रंगांच्या टीशर्टच्या आतून त्यांची मनं जोडली गेली. आपलं शहर एक ही भावना आली. मग ती एकता दाखवण्यासाठी त्या टीमचं मर्चंडाइज घेणं, त्या टीमच्या मॅच बघायला जाणं, हे होतं. त्यातून आसपासच्या पबना चालना मिळून एकंदरीत शहराच्याच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. जे लोक घरी बसून मॅच बघतात तेही मॅच ज्यांच्या मध्ये मध्ये दाखवली जाते त्या जाहिराती बघतात. एरवी घेणार नाहीत त्या गोष्टी त्यांना घ्याव्याशा वाटतात, व त्या ते घेतात. त्यानेही एकंदरीत अर्थव्यवस्थेला चालना मिळते. जाहिरातींच्या पैशांद्वारे त्या वस्तूंच्या खरेदीतला काही पैसा बीसीसीआयला मिळतो. तो ते क्रिकेटच्या वृद्धीसाठी वापरतात. एकेकाळी क्रिकेट खेळणाऱ्या लाखो लोकांपैकी जेमतेम वीसेक खेळाडूंना क्रिकेटमधून पोट भरेल इतकं उत्पन्न मिळायचं. आता ते हजारो लोकांना उत्पन्न मिळतं. कारण क्रिकेटचा खेळ कस्टमर फोकस्ड झाला आहे - आयपीएलद्वारे. एक्झॅक्टली हेच आम्ही करणार आहोत - फक्त क्रिकेटच्या जागी मराठी साहित्य! बीसीसीआयच्या जागी कांसंमसाप!

प्रः पण हे नक्की कसं घडवून आणणार? क्रिकेटच्या बाबतीत स्पर्धा घेणं सोपं आहे. पण साहित्य आणि लेखनाच्या स्पर्धा कशा घ्यायच्या?

उः तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. किंबहुना या विषयावर एकमत होत नसल्यामुळे या आयपीओची कल्पना मागे रेंगाळली होती. पण आता घरोघरी टीव्ही पोचला आहे. इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. या नवीन माध्यमांच्या विस्तारामुळे निव्वळ कागदावर पांढऱ्यावर काळं रहाणारे शब्द रंगीबेरंगी होतील. हालचाल करतील. नाचतील. गातील. जिवंत होतील. त्यामुळे त्या शब्दांना एक दृक्श्राव्य अनुभव मिळेल. ही दृक्श्राव्यता हे साहित्याच्या स्पर्धांचं आकर्षण ठरणार आहे. क्रिकेटमध्ये खेळ आकर्षक करण्यासाठी पांढरे कपडे जाऊन रंगीत कपडे आले, स्टेजवर नाचणाऱ्या गोऱ्या बायका आल्या, सिक्सर्स सहज मारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या बॅट्स आल्या, बोलर्सवर अधिक बंधनं आली. असे सगळे तांत्रिक बदल साहित्याच्या माध्यमात व्हायला हवेत. पण आयपीएलने मुख्य बदल केला तो विस्तारात. पाच पाच दिवस चालणाऱ्या टेस्ट मॅचेस बघायला वेळ असलेलं डेमोग्राफिक फार छोटं आहे. एकेकाळी तेवढ्याच लोकांकडे पैसे असायचे त्यामुळे काही फरक पडत नव्हता. आता ती परिस्थिती उरलेली नाही. वन डे मॅचेसही खूप लांब व्हायला लागल्या, कारण त्या दिवसभर चालतात. मल्टिटास्किंगच्या या काळात दोन तासात संपणारा आणि निकाली होणारा सामना हवा. तीच परिस्थिती साहित्यातही आहे. कादंबऱ्या कोण वाचणार? त्यामुळे त्या बादच. कथाही पंचवीस तीस पानांच्या असतात. त्या देखील बाद. आता फक्त तासाभरात लिहिता येईल असं काही परिच्छेदांचं लिखाण बाकी राहील. फार तर दोनतीन पानांचं. अहो कविताही आख्खी वाचायला वेळ नसतो लोकांना. त्यामुळेच चारोळ्या आल्या. तेव्हा अशाच लेखनाच्या स्पर्धा घ्यायच्या. यातून मिळणाऱ्या पैशातूनच भावी साहित्यिक-खेळाडू हुडकणं, त्यांच्यासाठी ट्रेनिंग कॅंप्स घेणं, गावोगावच्या पायाभूत सुविधा सुधारणं हे केलं जाईल.

प्रः स्पर्धा आणि टीम्सविषयी तुम्ही अधिक सांगू शकाल का? नक्की फॉर्मॅट काय असेल?

उः महाराष्ट्रात किमान आठ तरी टीम्सनी आम्ही सुरूवात करू. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ... या तर आहेतच. इतर नावं कुठची घ्यायची ते अजून ठरलेलं नाही. या टीम्सचा रीतसर लिलाव होईल. प्रत्येक टीममध्ये एकावेळी खेळायला दहा साहित्यिक किंवा साहित्य-खेळाडू उतरवता येतील. यातले तीन त्याच प्रांतातले असावेत अशी सध्या अट आहे. ती नंतर शिथिलही होईल कदाचित. खेळाचं स्वरूप असं की पहिल्या अर्ध्या तासात प्रत्येक साहित्यिक लेखन करणार. त्यानंतर तीन तीन मिनिटं प्रत्येकी अभिवाचनाला दिली जातील. एक चर्चाविषय असेल त्यावरही एक एक मिनिट प्रत्येकाला बोलायला मिळेल. दरम्यान त्यातल्या दोन दोन साहित्यकृतींचं संगीतासहित नाट्यीकरण आणि सादरीकरणाची तयारी टीमने करायची. या सादरीकरणाला पाच पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल. साधारणपणे अडीच तासांत ही स्पर्धा संपेल. या खेळाचं प्रत्येक अंग चित्रित होईल. रिऍलिटी शोप्रमाणे लाइव्ह दाखवलं जाईल - अर्थातच जाहिरातींच्या अधूनमधून. आमच्या वेबसाइट्सवर प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक अक्षर लिहिलं जाताना दिसेल. म्हणजे दर्शकांना त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये सामावून घेतलं जाईल. समालोचन करायला आमचे पट्टीचे समीक्षक असतीलच.... आणि निकाल महागुरू लेखकरावांचं मत आणि दर्शकांकडून येणारे एसेमेस यावर ठरेल.

प्रः साहित्याचं स्वरूपच बदलण्याचा हा विचार आवडला. एकंदरीत प्रयोग कितपत यशस्वी होईल याची कल्पना आहे का?

उः अहो, ही कल्पना आम्ही उगाचच मांडत नाहीहोत. वेगवेगळ्या टीव्ही नेटवर्क्सना अगोदरच ऍप्रोच होऊनच हे पाऊल टाकत आहोत. नेटवर्क्सकडून पहिल्या वर्षीच्या राइट्ससाठी पन्नास कोटींच्या तोंडी ऑफर्स आलेल्या आहेत. प्रत्यक्ष लिलाव होईल तेव्हा बोली शंभर ते दिडशे कोटीला फिटेल याची खात्री आहे. प्रकाशन संस्था या एपिसोड्सच्या भाषांतरांसाठीच पंचवीस कोटी द्यायला तयार आहेत. आयपीओमधून किमान आठ हजार कोटी मिळतील अशी आशा आहे. चायनीज आणि अरब इन्व्हेस्टर्स आत्ताच आमच्या मागे लागले आहेत. वीस टक्के शेअर घेण्यासाठी त्यांनी सव्वा ते दीड हजार कोटी देऊ केलेले आहेत. आहात कुठे? जग बदलतं आहे. मराठी साहित्याचा चेहरामोहराही त्याबरोबर बदलला पाहिजे. तेच तेच लेखन करण्याची कूपमंडुकी वृत्ती सोडून आता ग्लोबल व्हायला पाहिजे आहे. वसुधैवकुटुंबकम असं कोणीतरी म्हटलेलं आहेच. हे ग्लोबल व्हिलेज आहे. इथे आपणच पाटिलकी सुरू केली पाहिजे. या प्रवाहात हातपाय मारून पोहलो नाही तर बुडून जाऊ. जय महाराष्ट्र! जय मराठी!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

ठ्ठो!!!!
कांसंमसाप चा विजय असो! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राजेशबुवा, लेख आवडला रे. ह्यांना ही लेख आवडला.बर्‍याच दिवसांनी मनसोक्त हसले.
असाच लिहिता रहा.
(वाचक) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न विचारणारा बातमीदार हा अगदी एबीपी माझा किंवा झी मराठी किंवा आयबीएन लोकमत किंवा गेलाबाजार साम किंवा मीमराठी (संपले मराठी चॅनल) वगैरेचाच बातमीदार (अर्र... चुकलं, पत्रकार म्हटलं पाहिजे) दिसतो. निखळ पोरकटपणा त्यात व्यक्त झाला आहे. उत्तरकर्ता मात्र आयपीओला जाण्याइतका 'पोचलेला' नाही. त्याच्यात 'कार्पोरेट होंचो'पणा आणखी ओतता आला असता. त्याच्या उत्तरांतील विस्कळीत मांडणी पाहता हा आयपीओ फसणार, रिटर्न्स नाहीत. पण असे अनेक वृत्तांत येत असतात, तसाच हा वृत्तांत झाला आहे. मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आयपीओ फसणार, रिटर्न्स नाहीत.

साक्षात मराठी भाषेची, मराठी मनांची आणि मराठी अस्मितेची विक्री केली तर ती कवडीमोल ठरणार असं तुम्ही म्हणत आहात हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये. असा अपमान केल्याबद्दल तुमचा जाहीर धिक्कार केला पाहिजे.

उत्तरकर्ता मात्र आयपीओला जाण्याइतका 'पोचलेला' नाही. त्याच्यात 'कार्पोरेट होंचो'पणा आणखी ओतता आला असता.

हे पटलं. कल्पना मांडताना व्यक्तिरेखेकडे दुर्लक्ष झालं थोडं. मात्र बचावासाठी दोन मुद्दे आहेत -
१. कांदा संस्थानच्या मराठी परिषदेतली कुठलीही व्यक्ती होऊन होऊन कितपत कॉर्पोरेट हॉंचो होऊ शकेल? बेडकाने कितीही अंग फुगवलं तरी साध्या एअर मॅट्रेसइतकं मोठं होता येईल का? मग आकाशात तरंगणाऱ्या, लोकांना वाहून नेणाऱ्या महाकाय बलूनइतकं मोठं होण्याची कल्पना तरी का करावी?
२. हा वृत्तांत त्याच पत्रकार म्हणवणाऱ्या बातमीदाराने लिहिला आहे. खुलासा संपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कल्पना. फेसबुक आयपीओच्या तोंडात मारणारा आयपीओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेअर्स विकत घ्यावे लागणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सेटींग लावली पाहिजे. मराठी भाषा अभिजात व्हायच्या आत शेअर्स विकत घेते आणि अभिजातता जाहीर झाली की विकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देशीवादी inc. चे संचालक : भालचंद्र नेमाडे.
विंग्रजीधार्जिणे प्रा. लि. चे अध्यक्ष : किरण नगरकर
शय्यागृहराजकारण एंटरप्राईजच्या अध्यक्षा : मेघना पेठे.
दिवंगत साहित्यिक पुनर्वसन समितीचे अग्रणी : पु ल देशपांडे.
सर्क्युलेटींग लायब्ररीच्या सम्राज्ञी : शुभांगी भडभडे (याच शैलजा राजे, सुमती क्षेत्रमाडे इत्यादि नावांनीही ओळखल्या जातात.)
भूतपूर्व दलितचळवळ आणि आता दलितगारठा समितीचे अध्यक्ष : नामदेव ढसाळ
मराठी फेसबुक किंग : सतीश तांबे.
भूतपूर्व नव्वदोत्तरी चळवळ आणि आता नव्वदोत्तरी सामसूमीचे अध्यक्ष : वर्जेश सोळंकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आता अशा डायरेक्टर बोर्डानंतर कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची जबाबदारी तुम्हीच घ्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यासाठी ठसठसता समाज बीभत्स लिमिटेडच्या कविता महाजन यांना नॉमिनेट केले जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं होतं की कॉस्मोसॉप ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आयपीओ डिक्लेअर करून कॉस्मोसॉपने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. (कसा? त्याचा कॉस्मोसॉपच्या निनावी उच्चाधिकार्‍यांनी विचार करावा.) त्यापेक्षा डिबेंचर्स काढले असते तर हिरव्या देशांतून बराच गल्ला गोळा झाला असता.
कॉस्मोसॉपने आयपीओ काढणे म्हणजे टीम अण्णाने राजकारणात उतरण्यासारखे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे टीम हा शब्द्प्रयोग टाळून कंपू हे ओरीजीनल नाव द्यावे. अन बाहेरुन भाड्यानी आणलेल्या चीअर लीडर्स ची काहीही गरज नाही " महान साहित्यीकांचे " चेले जास्त चांगले मनोरंजन करतात ह्याचा अनुभव सर्वांना आहेच.
अन शेअर्स बद्दल बोलु नका सध्या कडकी सुरु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0