छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

१ जानेवारी :
आत्ता रात्रीचे बारा वाजताहेत. सकाळपासून कालच्या पार्टीचा हॅंगओवर. म्हणजे उलट्या, मळमळ तर आहेच त्यात जुलाबही...रजाच पडली. रात्री डॉक्टरकडे जावं लागलं... नवीन कुठलीतरी स्ट्रॉन्ग औषधं दिली.. वर चारचौघांत " पिणं कमी करा" हा सल्ला. आता औषधं घेतल्यावर जुलाब बंद झालेत तर आता अंगावर रॅश आल्यासारखी वाटतेय... आणि लिहिताना खाज येतेय सर्व त्वचेवरती... म्हणजे ऍलर्जी नक्की कोणत्या गोळीची हेही आता कळणार नाही.. *** चा फोनही लागत नाहीये आता.. आता बसा खाजवत.. असा हा वर्षाचा पहिला दिवस... वै ता ग....

५ जानेवारी :
ही स्वप्नं म्हणजे एक त्रास असतो. झोपेतून जागं झाल्यावरती अजिबात आठवत नाहीत. आज पहाटे गंमत झाली..राष्ट्रपती झाल्याचे स्वप्न पडले. चक्क बरेचसे आठवतही होते. चांगली गोष्ट म्हणजे राष्ट्रपती झालो. पंतप्रधानाला किंवा मंत्र्याला फ़ार कामं अस्तात. नाना भानगडी निस्तरायच्या असतात. राष्ट्रपतीची मज्जा असते. हारतुरे आणि मानसन्मान स्वीकारायचे, भाषणबाजी आणि परदेशदौरे करायचे..काही जबाबदार्‍या नाहीत,कोणाला उत्तरं द्यायची नाहीत, पत्रकारपरिषदांमध्ये अवघड प्रश्न नाहीत..पाच वर्षं नुसती मज्जा .. तर आम्ही राष्ट्रपतीभवनात असतानाच त्या स्वप्नातल्या राष्ट्रपतीभवनाचे लाईट गेले. ( मग मी सवयीने फ़्यूज चेक केला, बिल भरलंय का ते पाहिलं, आजूबाजूच्यांचेही गेले आहेत का ते पाहिलं, बोर्डाच्या ऑफ़िसाला फोन केला, तो एंगेज होता, मग पुन्हा पुन्हा फोन केला, मधल्या काळात वायरिंगमध्ये फ़ॉल्ट आहे का चेक करायला इलेक्ट्रिशियनला बोलावलं , तोपर्यंत पहाट झाली आणि उजाडायच्या वेळी लाईट आले)... आमचं स्वप्न सुद्धा हे असं अस्तं..चिडचिड होणार नाही तर काय...

१० जानेवारी :
ऑफ़िसातला एक मनुष्य आहे.. नवीन आलाय . पण सदा हसतमुख. बॉसने झापला, हसतो. सर्दी ताप असताना कामावर येतो आणि तरी हसतो.गेल्या महिन्यात पाकीट मारलं गेलं, हसतो. या माणसाच्या टाळक्यावर परिणाम तर नाहीये न झालेला, हे मी विचारलं एकादोघांना.तेही हसले. आता यात हसण्यासारखं काय आहे? उगीचच हसणारे लोक येडचाप असतात..

१८ जानेवारी :
सारखं भावव्याकूळ होऊन येडचाप कविता पाडणारे दोन बावळट भेटले आज. त्यांनी जाम पकवलं. मग त्यांची एक एक कविता झाली की मी त्यांना नोकरी नीट करा, कुटुंबीयांची काळजी घ्या, भावनांनी पोट भरत नाही असलं सांगायचो.. मग तो कोणा युरोपियन कवीच्या अनुवादित कविता म्हणायला लागला... मग एक कविता सम्पली की तोच तो कवी गरीबीत कसा मेला, मरताना तो भ्रमिष्ट झाला होता, आपल्या अवस्थेला तोच कसा जबाबदार आहे; हे मी सांगितलं... मग त्यातला एक पेटला, म्हणाला, " माझ्या आदर्शाबद्दल असं बोलू नका. याचा त्यांच्या कलेशी काहीही संबंध नाही , ही त्यांची वैयक्तिक बाब आहे " ... म्हणालो," का? का नाही बोलायचं? पैसे खाल्ल्यामुळे त्याची नोकरी गेली , मग तो फ़्रान्समध्ये पळून गेला, पुढे त्याला सिफिलिस झाला मग तो वेडा झाला. आणि मेला . खरं ते खरं.. मी बोलणार.." .. दोघे जाम चिडले ... पण माझा नाईलाज होता..

२० जानेवारी
: हिच्या माहेरच्या गावचे अध्यात्मिक अधिकारी बुवा आहेत... त्यांचं एक संस्थान आहे, गुरुवारी लाइनी लावून लोक दर्शन घेतात त्यांचं.. त्यांना एकूण फ़ार मान. त्यांच्या एका प्रवचनाला गेलो. ( जावं लागलं.. "भेटलात तर पायावर डोकं ठेवा, तुमचे नेहमीचे आचरट प्रश्न विचारू नका" असा घरचा सल्ला होता ). नेमकी नको असताना दुसर्‍या लायनीत जागा मिळाली. इतक्या पुढे बसल्यावर झोपताही येइना. प्रचंड झोप येत होती. मग झोप घालवण्यासाठी डोक्यात विचारचक्र चालू केलं. हे दिसतात तितके सज्जन असतील का?रोज दाढी नीट केली तर यांचं अध्यात्मिक तेज कमी होईल का? इन्कम ट्याक्स किती भरत असतील? पैशे कसे खात असतील? बायांच्या भानगडी असतील का? यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करायचं म्हटलं तर क्यामेरा कुठे लपवता येइल? कोणतं चॅनल ही बातमी दाखवेल? एकूणच मानवप्राणी स्खलनशील आहे या विषयावर जालावर लेख लिहावा का? मनाला येइल ते लिहिलं तर लेख संपादित होईल का? झोपच उडाली. वेळही बरा गेला....

३१ जानेवारी :
टीम अण्णाचा ( पुन्हा) सरकारला इशारा... क्रांती करणार म्हणे..यांच्या नानाची टांग... मी तेव्हाच म्हटलं होतं, या मूर्खांच्या नादाला लागू नका... पण आमचे कोण ऐकणार? गेलं वर्षभर बडबडतोय पण आम्हीच भ्रष्ट... फ़ाल्तु गोष्टींतून भारावणारी आजची तरूण पिढी... कोणीही लोकशाहीला शिव्या द्यायला लागलं की मला जाम वैताग येतो. त्या बालगंधर्व चौकात बसलेले येडपट लोक पाहिले की कीव येते मला.

१० फ़ेब्रुवारी :
एवरेस्ट मोहिमेसाठी मदत मागायला आज ऑफ़िसात दोन लोक आले. "ही तुमची वैयक्तिक हौस आहे त्याला मी का द्यायची मदत?" असा मोठ्ठ्याने वाद घातला त्यांच्याशी. शब्दाने शब्द वाढला. " तुम्हाला हिमालयात महिना दोन महिने ट्रिप करायचीय तर मी कशाला द्यायचे पैशे? मला अंटार्क्टिका खंडावरती हेलिकॉप्टर चालवायला शिकायचंय आणि पॅराशूत दुरुस्तीचे क्लास काढायचेत तर मी मागतो का तुम्हाला पैशे? तुमची हौस करायला लोकाचे पैसे वापरू नका. " असं बराच वेळ चाललं.. चिंतलवाराने बाजूला नेला त्यांना.

१७ फ़ेब्रुवारी :
आज शाळा सिनेमा पाहिला.. तिची फ़ार आठवण झाली. कुठे कशी असेल कोणास ठाऊक ?.. चिठ्ठी मी लिहिली नव्हती यावर पम्या आणि देव्याचा कधीच विश्वास बसला नाही. तिच्याशी शेवटचं नीट बोलायचंच राहून गेलं..या वेळी तिचा वाढदिवस होऊन गेल्यावर चार दिवसांनी आठवलं, हे बरंय.. नाहीतर त्या दिवशी उगीचच हुरहूर वगैरे लागते. या वैतागातून कायमची मुक्ती कधी ?

५ मार्च :
आज जवळच्याच एका मॉल्मध्ये जाऊन आलो. सिनेमा आणि शॉपिंग वगैरे... च्यायला या पोरांच्या ...पोरं जाम कुरकुर करतात. सदा चेहरा वाकडाच. लहान असताना खाऊ आणा, कपडे , खेळणी नवीन काहीही आणा, यांना काहीही आवडणारच नाही... सदान्कदा रड चालूच. आता जरा मोठी झालीय्त म्हणावं तरी तेच.. हाच सिनेमा हवा, त्याच मल्टिप्लेक्सला हवा, अस्से पॉपकॉर्न नकोत , असलाच कोला हवा आणि अश्शाच सीटा नकोत. सारखी कूरकूर. ही म्हणते तुमच्यावर गेलीय्त दोन्ही पोरं.आता माझं काय चुकलं यात? काहीही.. आता मी कधीतरी कूरकूर करतो का ?सगळं जीवन आनंदाने सहन तर करतोय. पण सांगतो कोणाला? अजिबात भांडलो नाही. हा असला तोंड दाबून बुक्क्यांचा मार हा एक भीषण वैताग असतो.

२० मार्च....
आज इलेक्शनची तारीख जाहीर झाली. मतदान हा लोकशाहीतला सर्वांत आवश्यक पण वे**वा प्रकार आहे, असं ऑफ़िसातला चिंतलवार म्हणतो. आमच्या ऑफ़िसाला यावेळी पूर्ण सुट्टी दिलेली नाही, हा सर्वांत भीषण प्रकार असणार आहे. म्हणजे आदल्या दिवशीच लॉन्ग ट्रिपला जाता येणार नाही. हा साला अन्याय आहे.

२५ एप्रिल :
आम्चा एक शाळेतला एनाराय मित्र भेटला आज. देशाटनाने येणारे चातुर्य कसे महत्त्वाचे आहे असे फ़ार ऐकावे लागले..इन्डिया इतकं कसं बदललं वगैरे ऐकून कान पकले. . विशेषत: नुकतेच पर्यटन करून आलेला एनाराय लग्नाचे फोटो दाखवणार्‍यांइतकाच धोकादायक.... आता बायकोला पण कशी नोकरी लागली, आता दोघे कसे मजबूत कमावतात, दर वर्षी आल्प्समध्ये स्कीइन्ग करायला जातो वगैरे बडबड ऐकून घेतली... शाळेच्या परीक्षेत मी पेपर दाखवायचो, म्हणून पास तरी झाला हा... काय एकेकाचं नशीब असतं, वैताग असतो एकेक.. मी पण मग तुझ्या घरात मोलकरणी किती? ( आमच्याकडे तीन आहेत .. )तुझी कार कोण धुतं?( पाच डॉलरमध्ये आमच्या सोसायटीत महिनाभर कार पुसतो एक मुल्गा)... बेबीसिटिंगला किती खर्च येतो? तव्यावरची गरम पोळी रोज खायला मिळते का? इतपत प्रश्न विचारून वचपा काढला. एकूण हे गावाबाहेर लाकडी घरात राहून , केरफ़रशी, धुणं भांडी स्वत:ची स्वत: करणारे आणि फ़्रीजमधलं गार अन्न पुन्हा पुन्हा गरम करणारे एन आर आय लोक म्हणजे एक त्रास अस्तो.

१० मे :
काल चाळीस वर्षं वय पूर्ण झालं...आणि मिशीचे केस सुद्धा पांढरे होताहेत असं जाणवलं. ( चाळीस वर्षांचे लोक म्हणजे म्हातारे, असं माझंच सुप्रसिद्ध वचन आठवलं.. लहानपणची स्वत:ची मूर्ख स्टेटमेन्ट्स आठवणं म्हणजे एक त्रास आहे) आज बर्‍याच दिवसांनी वजनकाट्यावर उभा राहिलो. ८२ किलो दिसतंय वजन. वीस वर्षांपूर्वी कॉलेजाबाहेर पडलो तेव्हा सत्तावन्न होतं. तेव्हा हॅन्गरला टीशर्ट अडकवल्यासारखं शरीर दिसायचं ... फ़ेसबुकावर कोणीतरी जुन्या फोटोंमध्ये मला ट्याग केला, गहिवरलो. ते पाप्याचं पितर बघवेना. घाईघाईनं ट्याग काढला. या फ़ेसबुकाच्या नानाची टांग..

२३ मे :
आज एक पत्र आलं. शाळेतल्या कोणा मित्रांचं. शाळा सोडून पंचवीस वर्षं झाल्याबद्दल एक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे पुढच्या महिन्यात. या दोघातिघांनी शाळेत शोधाशोध करून सर्वांचे पत्ते शोधून काढले वगैरे वगैरे... रिकामपणाचे उद्योग नुसते. अर्थात यातल्या एकाच्या बापानं आयुष्यभर सावकारी केली. भरपूर माया गोळा केलीय म्हणे. याला काय फ़रक पडतोय? पत्रातली भाषा इतकी लाडीक ( पुनर्मीलन सोहळा आणि काय काय) आणि भीषण शुद्धलेखन... का बोंबलायला जायचं मी असल्या कार्यक्रमाला ?

२९ मे :
डॉक्टर लोक एकूणच जादा शहाणे. सत्यमेवजयतेनंतर एकूणच शेपटावर पाय पडल्यासारखे चिडचिड करायला लागले. ते फ़ारच मजेदार. तर आज तो समोरचा नवीन डॉक्टर भेटला तर त्याला त्यावरून उचकवला तर काही बोलायला तयार नाही. भलताच नेमस्त माणूस... आमीर खान चांगला आहे म्हणायला लागला. काही मजा येइना, मग नेहमीची ट्रिक वापरली. ऍलोपॅथीवाल्यासमोर निसर्गोपचार, होम्योपॅथीवाल्यांचे कौतुक करायचे आणि रेकी, निसर्गोपवारवगैरे लोकांपुढे मॉडर्न मेडिसिनचे. या ट्रिकनंतर अपोझिट साईडचे लोक जाम उखडतात ग्यारंटी... पण हा ढिम्म. " तुमची मतं इन्ट्रेष्टिंग आहेत" इतकंच म्हणाला. काय वैताग आहे. धड चिडताही येत नाही काहींना..

१६ जून
: आज नवी छत्री हरवली. सकाळी नळाला पाणीच आलं नव्हतं.खाली पंपाची मोटर जळाली म्हणे. मग सोसायटीची इमर्जन्सी मीटिंग भरली संध्याकाळी. मला खरंतर सोसायटीच्या चेअरमनच्या नावाने जाम ठणाणा करायचा होता की हे लोक नेहमी महाग वस्तू आणतात, आणि यांना प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन लुटतात पण जो जास्त बोंब मारतो त्याच्या गळ्यात जास्त कामं पडतात हे मला महित होतं . ( एकदा असंच मीटिंगमध्ये सांगायला गेलो तर ते गवंड्याचं काम माझ्यावरच पडलं .. एक रजा गेली फ़ुकट) . सोसायटीची कामं गळ्यात घेणं हा किती वैताग असतो हे काय मला ठाऊक नाही? मनात नसतानाही निमूटपणे बसून राहिलो. फ़ार चिडचिड झाली.. कामं गळ्यात न पडण्यासाठी हा वैताग सहन केला.

२१ जून :
आज नक्कीच ठरवलं होतं की पहाटे जॉगिंगला बाहेर पडायचंच. ( जिमवाले लुटतात साले.. ) जुने शूज घालून ( नवे शूज घेणार होतो पण आधीच या जून महिन्यांत पोरांच्या शाळेचा प्रचंड खर्च झालाय. दर वर्षी नवीन दप्तर,, नवे शूज, नवा टिफ़िनबॉक्स कशाला लागतो यांना ?. ) घराचा दरवाजा उघडला तर पावसाला सुरुवात... प्रचंड पाऊस... साली काही ठरवायची सोय नाही..घरातच जॉगिंग करावं म्हटलं तर आवाज फ़ार होतो म्हणे... खालच्या मजल्यावरचे बोंब मारतात... मग घरात येऊन फ़्रीजमधला चॊकलेट केक खाऊन परत झोपलो.. गोड खाल्लं की माझं फ़्रस्ट्रेशन जातं.. मी परत झोपताना बघून बायकोने काहीतरी कॉमेन्ट मारली.. अजिबात त्रास करून घेतला नाही... अजून दीड तास झोपलो...

२८ जून
: समोरच्या बिल्डिंगमधला पृथक ( हो, हे नाव आहे..आजकाल अस्लीच आचरट नावं दिसतात) कॉलेजात नाटकात काम करतोय. आपण थोर अभिनय करतो असं त्याला वाटतं... या असल्या फ़ुग्याला टाचणी लावावीशी फ़ार वाटतं. सांगत होता की एक कोणतरी डॉक्टर नाटक बसवायला येतात, ते याचं फ़ार कौतुक करत होते, वगैरे बगैरे... त्याला इतकंच म्हणालो, " बीजे मेडिकलमधल्या सगळ्या नाटकवाल्या डॉक्टरांना वाटतं की आपण लागू, आगाशे आणि पटेल आहोत. तर असल्या येड्यांचं फ़ार मनावर घेऊ नकोस. अभ्यास कर.. तुझ्या बापाला आनंद होईल".. आता पृथक पुन्हा यायचा नाही... उत्तम झालं.. एक पीडा टळली.

३० जून
शाळेच्या रीयुनिअनला जावं लागलं. काय होतं की मी ठरवलेलं होतं की जायचं नाहीच. पण पम्याचा फोन आला की तू यायलाच पायजे, आपण एकत्र जाऊ... तो त्याची मर्सिडिज घेऊन दारात हजर झाला. ( मग प्रवासभर त्याच्या मर्सिडिजचं कौतुक ऐकत बसलो. मर्सिडिज घेणं कसं त्याचं स्वप्न होतं, त्याचा गांडूळखताचा बिझनेस कसा जोरात आहे कोणत्या शेयरवर तो कसे पैसे लावतो वगैरे अवांतर वैताग माहिती मिळाली).. मी बरोबर पंचवीस वर्षांनी गेलो शाळेत.नॉस्टॅल्जियाचं अजीर्ण झालं आज... बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच. शाळा अगदीच छोटीशी वाटली.केस विरळ झालेले, पोटं सुटलेले अनेक मित्र दिसले ...दृश्य एकंदर विचित्र आणि भयंकर होतं... काही मुली आलेल्या होत्या, त्यांच्यापेक्षाही कुरूप नवर्‍यांना घेऊन. माझा कॉम्प्लेक्स पुष्कळ कमी झाला... सगळी पोरं आचरटासारखी हसत, टाळ्या देत जोक सांगत फ़िरत होती. वाट्टेल तिथे फ़ोटो काढत होती. मग घंटा देऊन शाळा भरवली , प्रार्थना झाली... आमचे त्या वेळचे हेडमास्तर आलेले होते त्यांच्या मुलाबरोबर. ( अत्यंत शिस्तप्रिय आणि वाट्टेल तशी शिक्षा करणारा फ़टकळ तोंडाचा माणूस.) पण भाषणांत मुलं काय काय कौतुक करत होती त्यांचं. शाळा अशी , तशी असं कौतुक करणारं सगळे बरंच काय काय बोलले. देव्या खोटारडा तर सर्व मास्तरांचं इतकं कौतुक करत होता की हे सगळं मला कसं लक्षात आलं नाही , हे वाटून वैताग आला.. चालायचंच. आपली शाळा इतकी चांगली होती की काय, असं वाटून गंमतही वाटली..

ती दिसेल असं वाटत होतं पण आली नव्हती, ते बरं झालं.. दोन तीन वर्षांपूर्वी तिचं नाव एकदम आठवेनाच, तेव्हा बरं वाटलं होतं तसंच बरं वाटलं... या वैतागातनं कायमचा सुटलो की काय... असो..... तिनं तेव्हा मला एक चिठी लिहिली होती ती हेडमास्तरांच्या हातात पडली आणि त्यांनी ती वाचून फ़ाडून टाकली होती आणि मला पुष्कळ फ़टकावलं होतं. फ़टकावल्याचं विशेष काही नाही पण चिठ्ठी निदान मला तरी दाखवायची...अस्ली ती वैताग शिस्त... त्या चिठीत काय लिहिलेलं होतं अजून कल्पना नाही... रिझल्टच्या दिवशी तिची वाट पाहत ज्या कट्ट्यापाशी उभा होतो , तिथे उभा राहून आलो आज थोडा वेळ. तेव्हा तर आली नाहीच आणि भेटलीही नाही पुन्हा कधी...एकदम कल्पना आली डोक्यात की थेट हेडमास्तरांनाच विचारावं जाऊन त्या चिठ्ठीबद्दल. आपल्या डोक्याचा भुंगा तरी कमी होईल अशी एक आशा. त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या मुलानं सांगितलं , त्यांना अल्झायमर झाला आहे. काहीच आठवत नाही, ते हेडमास्तर होते हेही ते विसरलेत. .. अशी सगळी गंमत.. एकंदर वैतागातनं सुटका नाही हेच खरं...

.

field_vote: 
4.375
Your rating: None Average: 4.4 (8 votes)

प्रतिक्रिया

वेगवेगळ्या रोगांची लक्षणं वाचताना आपल्यालाही यातले अर्ध्याधिक रोग झालेले आहेत का काय असं वाटतं ना, तसं झालं. अशा प्रकारचे वेगवेगळे वैताग मलाही अधूनमधून येतात.

परवा एक जण चॅटवर भेटला. पोराच्या वाढदिवसाचं आमंत्रण देत होता. बरं झालं त्या दिवशी आम्ही फिरायला जाण्याचं बुकिंग आधीच केलं आहे. तर नंतर घर विकत घे म्हणून गळ्यात पडत होता. हा सॉफ्टवेअरवाला इस्टेट एजंट कधीपासून झाला साला? गेल्या पंधरा वर्षात समोरासमोर भेटलेला नाही, आता ढांगेवर रहातो म्हणून काय मला फायनान्सचे सल्ले देणारे काय? वर काय, तर त्याच्या बायकोला बागकामाची हौस आहे म्हणून गुलाबांचे फोटो दाखवत होता. काय खायच्येत का गुलाब? एवढी जागा आहे तर टोमॅटो लाव, गवार लाव, स्ट्रॉबेर्‍या लाव, पण नाही! भेंडी गुलाबाचे पकाऊ फोटो टाकले माझ्यासमोर. मी नुकताच नवा कॅमेरा घेतलाय एवढंही समजू नये साल्याला?

ऍलोपॅथीवाल्यासमोर निसर्गोपचार, होम्योपॅथीवाल्यांचे कौतुक करायचे आणि रेकी, निसर्गोपवारवगैरे लोकांपुढे मॉडर्न मेडिसिनचे.

असे प्रकार पोटजातींच्या भांडणांत केलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख मस्तच, मास्तर. डायरीतल्या काही नोंदी वाचून काही आंतरजालीय लेख-चर्चा आठवल्या Smile
शेवटचा परिच्छेदही भन्नाट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लिहायचं ठरवून आलो तर हा हजर. वैताग साला...
हा वैतागसम्राट पुणे - २९ मध्ये जाता न आलेला पुणे - ३० मधला आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२५ एप्रिलला काढलेला वचपा जबरी !
वैतागाची भट्टी मस्त जमली आहे. अश्या चढत्या वैतागाने जाणार्‍या लेखनाचा शेवट कसा होणार याची उत्सुकता होती. अपेक्षाभङ्ग अजिबात झाला नाही हे आवर्जून साङ्गावेसे वाटते.

२७ जूनच्या डॉक्टर लोकाञ्च्यावरून खुपत असलेला एक वेगळा वैताग इथे मोकळा करतो..

"च्या मारी हे डॉक्टरलोक आपापला व्यवसाय सोडून कलाबिला प्रान्तात स्थिरस्थावर झाले तरी नांवाआधी डॉ. लावायचे सोडत नाहीत लेकाचे... एकदा डॉक्टरी सोडल्यावर काय सम्बन्ध उरतो या दोन गोष्टीञ्चा ? डॉ. पदवीचे भेण्डोळे हाती आले की मानवी जाणीव-बिणीव, संवेदनशिलता, इ. गोष्टीन्त लुडबूड करायला याञ्च्याच व्यवसायात मोकळीक कशी काय मिळते कळत नाही. बरं काय कलेच्या चकल्या, जिलब्या पाडायच्या त्या पाडा; पण मग त्या पदवीच्या भेण्डोळ्याची करा की सुरळी आणि घाला की चुलीत ! पण नाही..
तो मणिरत्नम् बघा. इतका इञ्जीनियर झालेला माणूस.. मद्रास टॉकीज काढून एका मागोमाग एक धांसू कामगिरी करत गेला पण 'इं. मणिरत्नम्' असे कधी कुठे वाचलयं काय कुणी ? ह्या डॉ. लोकान्ना कलाप्रान्तात डॉ. म्हणून चमकायचे असते आणि डॉक्टर जमातीत कलाकार म्हणून.. आता खरूज, नायटा, हगवण झालेली चार पोरे गोळा करून उद्या त्या कुळकर्ण्याञ्च्या सलीलकडे जाऊन एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावाच म्हणतो..."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलील ला माझ्याकरवी एक प्रश्न
"कवितेतच शेवट करायचा होता तर डॉक्टरकीचा वैतागाचं प्रयोजन कशासाठी?"

जमल्यास विचारा..
बाकी तो सलील पण स्वतःच एक वैतागै..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
सध्यातर अश्या कलाकार डॉक्टरांचं पीक अमाप आलेलं दिसतय. यांची इस्पितळं सांभाळतात हॉस्पिटल मॅनेजमेंटवाले आणि हे फिरतात कलेचा जागोजागी रतीब घालत.
आपला ग्रुप जमवून परस्परांना "अहो रुपम.. " करताना अगदी थकत नाहीत हे लोकं. अश्या वेळी एखाद्या खरोखरच्या चांगल्या कलाकारालाही खिजगणतीत घेत नाहीत. नुकत्याच अश्याच एका खाजगी मैफिलीला जायचा यो(भो)ग आलेला. असं वाटत होतं की यांना विचारावं यातले चार शब्द तरी पेशंटशी बोलताना उधळलेत तर तुमची कला काय आटेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तुरे लय भारी ! एकेक येंट्री म्हणजे हास्याचा आयटम बॉम्ब Smile आमची पण एक (लवंगीमाळ छाप ) एंट्री रुजू करा :

ऑगस्ट १६ :
सक्काळीसक्काळी उठून साईट उघडली तर ह्या, ह्या भडकमकर मास्तराचा लेख. यांच्या लेखावर उड्या पडणार, हास्याचे धबधबे वहाणार. सगळी साली वशिल्याची तट्टं. अरे भडकमकर मास्तर नाही, जणू कुणी जालिंदरबाबा जलालाबादी झाला यांच्या भजनी लागायला. अरे कोण तू? शाळेत पोरं हाकायची सोडून सायटीवर कसला येतोस ? आणि या आमच्या लोकांचंही पहा ना... नवा कुणी आला तर गेले लगेच याच्यामागे. अरे आम्ही च्यायला इथे बूड घासतो आहे इतका वेळ तर कार्टी एकदा आम्हाला बरी श्रेणी देतील तर शपथ आहे. सदासर्वदा मेलं "निरर्थक" आणि "खोडसाळ". आणा , आणा अजून या भडक्याला. पूजा करा लेको याची. हा भडक्या परत दिसला ना, तर दात तोडून पाठवेन म्हणावं चिंचवडच्या एखाद्या डेंटीष्टाकडे ! नावाचा मुसु नाही मी. सांगून ठेवतोय. अरे, अरे ...नका रे , नका माझ्या या प्रतिसादाला दाबू खाली.. कार्टी खाल्या घरचे वासे मोजताएत. भडकमकर , वाचवा बॉ आम्हाला... निदान तुम्ही तरी "मार्मिक" म्हणा... .अगाई गं... प्रतिबंधित होतोय आता मी.. मेलो मेलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कॉन्फरन्स कॉलमध्ये फाजील, चोरट्या आवाजात कोणी "हाय-हेलो" केलं ना की असा वैताग येतो ना विशेषतः काही बायका मंद, सांद्र, हस्की, कृत्रिम आवाजात जे पाल्हाळ लावतात ना अक्षरक्षः एक कानाखाली शिलगवावीशी वाटते. अरे *%%%&&&()&%^ बोला ना मोकळेपणाने , खणखणीत आवाजात, इथे काय "टेलिफोन सेक्स" चालला आहे का च्यायला!!! आपलं टाळकच सरकतं!!!! नाही खरच.

दुसरे काही क्यू ए मॅनेजर्स यांची डिफेक्ट कॉलमध्ये जी दारुण अवस्था होते ...... आम्ही त्याला ढुंगणाखाली आग (फायर अंडर अ‍ॅर्स) म्हणतो.....आपल्या टीमला सपोर्ट करता न येणे......... येस येस वी विल मर्ज द डिफेक्ट्स यापल्याड तोंडातून शब्द निघत नाही हे एक वैतागवाडी!!! टीम भांडतीये आणि हे मख्खोबा सपोर्ट करायचं सोडून शेपूट आत घालून .... जाऊं द्या अशी एकेक वैतागवाडी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो!
मजा आली! (लोकांना आलेला वैताग वाचुन मजाच येते का? - का येते? ;))

बाकी, भाग १ आहे का? कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुमारे तीन वर्षांपूर्वी लिहिलेला भाग १ आहे..
तुमच्या खव मध्ये त्याचा दुवा देत आहे,,,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैतागसम्राटाच्या डायऱ्या वाचताना कधीकधी आपण त्याला हसतो. कधी त्याच्या बाजूने विचार करतो. आणि चपापून, अरे आपण काय करतोय हे असं स्वतःशीच म्हणतो. आपल्या दृष्टीकोनाला आपल्या मनाविरुद्ध तळ्यात-मळ्यात करायला लावणं हे या लेखनाचं शक्तिस्थान आहे.

हा लेख उत्तमच झाला आहे. मला पहिला अधिक आवडला. यातला शेवटचा परिच्छेद थोडा मोठा झाला आहे असं वाटलं. त्यातला हृद्य भाग थोडक्यात आला असता तर हे कॅरिकेचर आहे की हा जित्ताजागता माणूस आहे याबाबतीतलं तळ्यात-मळ्यात शिल्लक राहिलं असतं.

आता एक आपल्या मनाला जाणवलेली गोष्ट प्रांजळपणे सांगितली तर सगळे साले संस्थळावरचे लोक माझ्यावर 'छिद्रान्वेषी', 'छिद्रान्वेषी' म्हणून बोंबलणार. च्यायला ते एकवेळ परवडलं, पण कोणतरी नूतन अंगाने वगैरे लेखाचा विचार करकरून करकरून लेखापेक्षा मोठ्ठा प्रतिसाद तळटीपा, कंसांसकट टाकून माझं कसं चुकलं हे सांगणार. वैतागच आहे साधा प्रतिसाद देणं म्हणजेसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा मी उत्तम लेखक आहेच. पण हल्ली काहीही लिहायचे म्हणजे कंटाळा येतो. काय लिहीणार? सगळे काही तेच ते आणि तेच ते! पण यंदा मारून मुटकून डायरी लिहायला घेतली होती. असेच काहीबाही लिहीले होते. ही डायरी-बियरी लिहीण्याचा फारच वैताग असतो बुवा. बहुदा रद्दीच्या गट्ठ्यात गेली असावी. जुलै महिन्यातच बायकोने न-बघता सहा रुपये किलो दराने रद्दी विकली.(बरंच झालं म्हणा. १.नाहीतरी कोण लेकाचा खरडत बसणार होता? २.बायकोने ती वाचली असती तर.... )नक्कीच या भडक मकराला ती पेशवे पार्कापाशी भेळेच्या गाडीवर मिळाली असणार.(भेळवाले पुड्या बांधायला डायरीचे कागद जास्त करून वापरतात असे माझे बारकाईचे निरीक्षण आहे. तसे माझे निरीक्षणही अफाट आहे आणि अनेक तपांच्या चिंतन-मननाने बनलेली माझी मते तर वादातीतच आहेत. पण साला, हे कोणी लक्षातच घेत नाही.)
तर ते असो. मुख्य मुद्दा असा की माझे नाव मी त्या डायरीत २७ जानेवारी, ३१ मार्च आणि २८ सप्टेंबरच्या पानावर शिवाय डायरीच्या जाडीच्या तिन्ही बाजूंना लिहीलेले होते हे माझ्या चांगले लक्षात आहे. (फक्त मूर्ख माणसे आपले नाव 'Name :' या शब्दापुढच्या रिकाम्या जागेत किंवा पहिल्या पानावर वरच्या कोपर्‍यात लिहीतात.) या मास्तराने त्याला सापडलेल्या डायरीतील ही तीन पाने आणि डायरीच्या जाडीच्या तीन बाजू स्क्यॅन करून त्या इमेज ताबडतोब येथे चढवाव्यात (इमेजचे विड्थ आणि हाईट ट्यॅग्ज डिलीट करून- माझ्याकडे फक्त आयई९ ब्रावजर आहे!) आणि ती डायरी माझी नाही हे सिद्ध करावे.
अन्यथा हा लेखक वाङ्मयचोर आहे असे मी सर्व संकेतस्थळांवर जाहीरपणे लिहीन आणि माझ्या खासगी बाबी चव्हाट्यावर आणल्याबद्दल सदरहू लेखक आणि हे संस्थळ यांच्याविरुद्ध 'ब्रीच ऑफ ट्रस्ट'ची तक्रार करीन. (मग बसा बोंबलत! आधी सांगितले नाही म्हणून तक्रार नको.)
जर ती डायरी माझीच आहे हे मान्य असेल तर हा लेख ताबडतोब येथून उडवण्यात यावा आणि भडकमकर मास्तर या आयडीवर कायमची बंदी घालण्यात यावी.तसेच या आयडीचा आयपी अ‍ॅड्रेसही संकेतस्थळ चालकांनी जाहीर करावा.

हां, आता जर ती माझी डायरी नाही हे सिद्ध झालेच तर "Great men think alike".

विसु. : हा प्रतिसाद कोणीही हलकाच घेऊ नये.
ता.क.: माझी २००९ सालची डायरीही अशीच (बायकोने) रद्दीत घातली होती. तिच्या कोणत्या पानांवर माझी नावे लिहीली आहेत ते आठवत नाही. २००९ सालची एखादी डायरी कोणालाही रद्दीत मिळाल्यास त्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसंबरची सर्व पाने तपासून त्यावर माझे नाव नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडक मकर ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा वैतागही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

भाग -२ आवडला. पण भा-१ जास्त आवडला होता.

आमचाही एक वैतागः

च्यायला, आजचा दिवसच वाईट! सक्काळी कधी नव्हे ती, घाईची लागली तर, पायजम्याची निरगांठ बसली! अंघोळीच्या वेळेस शांपूची बाटली उघडताना नख उलटं झालं. हे शाम्पूवाले पण दाबायचं झाकण करण्याऐवजी उचकटायचं का करतात कुणास ठाऊक! आम्ही काय झाकण बघून शांपू आणतो? जाहिरातीला भुलून तर आणतो. ब्रेकफास्टला काय म्हणून विचारलं तर तांदुळाची उकड समोर आली. त्याच्यातल्या साल्या, पालीसारख्या लपलेल्या त्या टम्म मिरच्या काढताना वैताग आला. सोसायटी बाहेर गाडी काढताना गेटपासूनच ट्रॅफिक जॅम लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तरांना दाद म्हणून वर काढत आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मिसिंग मास्तर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख, आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है. मस्तच, वैतागवाडीची सफर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख! २५ एप्रिलचा वैताग जबरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0