अंगाई - गाई गाई
ऐसी अक्षरे वर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न, त्यामुळे सुरवातीलाच एक विनंती, काही चुकले असल्यास जरुर निदर्शनास आणा पण त्या बरोबर उत्तेजना-पर सुचनाहि द्या :) (इथले साहित्य खूप दर्जेदार असते त्यामुळे जरा काचरतच हा धागा टाकतोय!)
परवा आई तिच्या नातवाला (माझ्या छोकर्याला) झोपवत होती आणि त्याला झोपवताना ती "गाई गाई गाई गाई, बाळाला आमच्या झोपी येई" एवढंच म्हणत होती, अर्थात ३ महिन्याच्या मुलाला ते पुरेसं होतं पण मग मी असंच मनात पुढे तयार करत गेलो, यमक जुळवत गेलो आणि ही अंगाई तयार झाली. आता ही अंगाई चांगली की वाईट ह्या पेक्षा मला आनंद असा की माझ्या मुलासाठी मी 'स्पेशल' अंगाई बनवली हा आहे :) आणि घरातही सध्या हीच अंगाई गायली जातेय :)
गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा होई
अंधाराची काळी शाई
गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा काही
तारे लुकलुक करून पाही
गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा येई
ढगातील चांदोमामा पायी
गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा ताई
बाळाचा हळूच पापा घेई
गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा गाई
आजी गोड गोड अंगाई
गाई गाई गाई गाई
बाळ आमचे झोपी जाई
झोपी जाई जेव्हा आई
बाळाला मऊ कुशीत घेई
-घनु
(मी प्रत्येक कडव्याला "identation" आणि प्रत्येक कडव्यानंतर काही "स्पेस" पण दिल्या होत्या पण मला त्या "पुर्वदृश्य" मधे दिसत नव्हत्या. काही मदत मिळेल का ह्यावर? मी FF-14 'ब्राउसर' वापरतोय)
रेकॉर्ड
सदर अंगाई मी ज्या चालीत म्हटली त्या चालीत माझ्या आवाजात (!!) इथे रेकॉर्ड करून चढवली आहे.
वैधानिक इशारावजा सुचना: माझा आवाज आपापल्या जबाबदारीवर ऐकावा.
@घनु: आपली वेगळी परवानगी न घेता तसे गृहित धरून थेट रेकॉर्ड केले आहे. तुमचा आक्षेप असल्यास ते इस्निप्सवरून उडवायची विनंती करता येईल
अवांतरः थेट इथेच एम्बेड करता येते का कोणाला?
स्वागत, छान
सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत!
फारच छान अंगाई आहे..
चालीवर उत्तम बसते आहे.. छान नाद आहे! मी लावलेली सगळ्यात सोपी चाल वेळ झाल्यास रेकॉर्ड करून टाकतो इथे.
शब्दबंबाळ किंवा गायकी दाखवण्यासाठी लिहिण्यात आलेल्या चित्रपटातील अंगाईगीतांपेक्षा अशी सहज जमून आलेली अंगाई मलाही आवडते
मलादेखील काही महिन्यांपूर्वी अंगाई अशीच स्फुरली होती. ती इथे वाचता येईल
बाकी, क्रोममध्ये तरी स्पेसिंग बरोबर दिसतेय.