कविता आणि स्तोत्रांची आवड

कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.

खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्‍याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते.

रामरक्षा हे स्तोत्र (कविता) बुधकौशिक ऋषींना स्वतः शंकरांनी स्वप्नामध्ये सांगीतले आणि बुधकौशिक ऋषींनी ते आठवेल तसे प्रातःकाळी लिहून काढले असा उल्लेख या स्तोत्रांत आहे. मी लहानपणापासून कितीदा तरी रामरक्षा ऐकली, पठण केली. परंतु खूप उशीरा मला या स्तोत्रांतील काही संदर्भ लागले. जसे - जिव्हां विद्यानिधी: पातु, कण्ठं भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातु या काही ओळी. माझ्या जिव्हेचे रक्षण विद्येचा ठेवा (निधी) करो यामध्ये विद्या आणि जिव्हा हा संबंध भेदक आहे. राम-भरत भेटीमध्ये रामचंद्रांनी , भरतास कडकडून मीठी मारली आणि असा हे भरतास वंदनीय श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो हा गळाभेटीचा आणि कंठाचा अन्वय किती मनोहर आहे. माझ्या स्कंधाचे रक्षण दिव्य आयुधे (खांद्यावर धनुष्य) धारण केलेले प्रभू रामचंद्र करोत. - या प्रत्येक अवयव आणि नामाच्या जोडीमधील अन्वय (संबंध) माझ्या लक्षात आला. करौ = सीतापती: (सीतेचे पाणिग्रहण केलेले राम), शृती = विश्वामित्रप्रियः वगैरे.

तीच गोष्ट विष्णूशोडषनाम स्तोत्राची - भोजने च जनार्दनं (सर्व जनांचे पालन करणारा), विवाहे तु प्रजापतीम (प्रजेचा नाथ), युद्धे चक्रधरं देवं या ओळीत पहा युद्धात रक्षण करण्यासाठी पद्महस्त वगैरे नावाने आठवण न काढता सुदर्शन चक्रधारी रुपाची आठवण काढली आहे. प्रवासे च त्रिविक्रमम (तीन पावलांत पृथ्वी व्यापणारा), संकटे मधुसूदनम (मधु राक्षसाचा वध करणारा), कानने नारसिंहं च म्हणजे वनामध्ये रक्षण करण्यास साक्षात नरसिंह रूप आठविले आहे, पावके जलशायिनम म्हणजे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी क्षीरसागरामध्ये शयन करणार्‍या रुपाचे चिंतन आहे. प्रत्यक नामाचा अन्वय नंतरच्या चिंतन केलेल्या विशेषणास किती भेदक चपखल लागतो आहे. हे जेव्हा लक्षात आले , तेव्हा मला एक अननुभूत आनंद मिळाला.

तीसरे उदाहरण "हनुमान चालीसा"चे. बरेच दिवस म्हणत असे आणि एके दिवशी एका ओळीचा अर्थ लागला. "कुमती निवार सुमती के संगी" - आहाहा. सुमती म्हणजे शुभ बुद्धी असलेले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे कळले आणि मला अवर्णनिय आनंद झाला.

एका लक्ष्मीस्तोत्रात , देवीचा उल्लेख श्रीपतीप्रिया आहे. सहज वाचतेवेळी किंवा अन्य कामात असताना स्फुरले अरे याचे २ अर्थ होऊ शकतात श्री जी पतीची प्रिय (लाडकी) आहे किंवा ती जिला श्रीपती (विष्णू) प्रिय आहेत. आणि अवर्णनिय वाटले.

एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे. लहानपणी स्तोत्रांचे बोट धरुन बाळपावले टाकलेली आहेत. खूपदा मनात येते मुलीला ही गोडी लावता येत नाही कारण ती इंग्रजी माध्यमातून शिकते, मीदेखील दूर असते आणि मन खंतावते. असो त्या आडरानात नको शिरायला. आपल्याला कधी कोणत्या कवितेच्या ओळीचा अर्थ असा स्फुरला असेल, गवसला असेल, तर तो आनंद या धाग्यावर जरुर शेअर करा.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

मला एकदा पहाटे ४ वाजता गच्चीत झोपलो असताना केदार रागातली काही सौंदर्यस्थळे उमगली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेत असताना कंपल्सरी
1)प्रणम्य शिरसा देवम् गौरीपुत्र विनायकम्
2) मनाचे श्लोक
3) रामरक्षा
4) अथर्वशीर्ष
म्हणावे लागायचे
त्यातला त्यात पहिला प्रकार जरा बरा वाटायचा
पटकन संपायचा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.
खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्‍याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते.

हे विशेष आवडले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोकंपट्टी करुन पाठ केलेल्या पसायदानचा अर्थ समजल्यावर असेच काहिसे वाटले होते त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता, स्तोत्रं हा माझा प्रांत नाही. पण cognates चे अर्थ समजून मला साधारण अशा पद्धतीचा आनंद होतो. भौतिकशास्त्रातले काही नियम असे अचानक समजले होते, कधी न टाळता येणार्‍या instrumentation बाबत असेच साक्षात्कार झालेले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.