सभ्यतेच्या मुखवट्यावरील ओरखडे- एक चावट संध्याकाळ

'एक चावट संध्याकाळ' हा दीर्घांक बर्‍याच कारणांनी सध्या चर्चेत आहे. आजच्याच 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'सार्वजनिक असभ्यपणा कोणाचा?' हे या दीर्घांकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार अशोक पाटोळे यांचे या प्रयोगाचे समर्थन करणारे (आणि या प्रयोगावर टीका करणार्‍या आणि सेन्सॉर बोर्डाचा सदस्य असलेल्या जयंत पवार यांच्या या प्रयोगावरील टीकेचा समाचार घेणारे) स्फुट आहे. त्यावर प्रतिवाद करणारे जयंत पवार यांचेही एक पत्र आहे. 'मान खाली घालायला लावणारे नाटक', 'असहनीय (? पण 'महाराष्ट्र टाईम्स' असल्यामुळे क्षम्य!) प्रकार' अशा शीर्षकांची पत्रेही आजच्याच 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये आहेत. 'मला दहा मिनिटांच्या वर नाट्यगृहात बसणे आणि रंगमंचावर जे चालले आहे ते सहन करणे अशक्य झाले' असे एक पत्रलेखक म्हणतात. एकूण एक वादग्रस्त प्रकार. या निमित्ताने पहिली आठवण झाली ती 'सखाराम बाईंडर', 'गिधाडे' या नाटकांची. त्यांच्या वेळीही असाच गदारोळ झाला होता आणि नाट्यप्रयोग बंद पाडण्यापासून ते तेंडुलकरांना धक्काबुक्की करण्यापर्यंत प्रकार झाले होते हे आठवले. अर्थात हे साम्य येथेच संपते. तेंडुलकरांच्या नाटकांशी या दीर्घांकाची तुलना करण्याचा वगैरे माझा बिलकुल हेतू नाही.
नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यादिवशी मी तिकीट काढले होते. 'स्त्रियांसाठी बाल्कनी राखीव' हे या प्रयोगाच्या निमित्ताने पहिल्यांदा बघायला मिळाले अर्थात एकूण गर्दी बर्‍यापैकी असली तरी स्त्रियांची संख्या मोजकीच होती. त्यातही नाटक सुरु झाल्यावर पहिल्या काही मिनिटांत निघून जाणार्‍यांमध्ये काही स्त्रिया होत्या. हे सगळेच जरा नवीन होते. अर्थात नवीने-वेगळे म्हणजे चांगले असे अगदी नाही, आणि नसावे.
चावट संध्याकाळचे कथानक अजिबात महत्त्वाचे नाही. एकापाठोपाठ एक चावट-अश्लील विनोद, शिव्या आणि शेवटी हे सगळे म्हणजे समाजाची गरज आहे अशी एक खरे तर कारण नसलेली तात्विक डूब असे काहीसे या दीर्घांकाचे वर्णन करता येईल. यातला माझ्या दृष्टीने दुर्दैवाचा भाग म्हणजे सगळे- एकूणेक विनोद मी पूर्वी ऐकलेले होते. त्यामुळे मला खदखदून हसू वगैरे काही आले नाही. नाट्यगृहात बाकी हशांच्या उकळ्या फुटत होत्या. पण या नाटकाचा विषय आणि त्यातली भाषा ही बाकी खडबडून जागे व्हावे अशी आहे. एकतर विनोद म्हणजे गडकरी-जोशी-पुल या शुद्ध तुपात तळलेला साजूक किंवा (काही प्रमाणात) अत्रे, दादा कोंडके यांच्यासारखा पातळी घसरलेला अशी एक सामान्य समजूत असते. त्या न्यायाने या दीर्घांकातला विनोद म्हणजे कमरेचे काढून डोक्याला गुंडाळणाराच नव्हे तर समोरच्याच्याही कमरेचे काढून त्याला रंगमंचावरच भोगणारा या जातकुळीचा आहे. हे सगळे रंगमंचावर बघताना सेन्सॉर बोर्डाने हे सगळे कसे संमत केले असाही एक प्रश्न मनात उभा राहातो. 'आईझवाड्या', च्यूत्या', 'मादरचोद' अशा शिव्या, 'गांड' या शब्दासंदर्भात असलेल्या सगळ्या वाक्प्रचारांबाबत चर्चा, स्तनाच्या आकारापासून ते 'चॅस्टिटी बेल्ट' पर्यंत विविध विषयांवरचे चावट नव्हे तर रुढार्थाने चक्क अश्लील -पार्टी किंवा एक सुमार शब्द वापरायचा तर 'नॉन-व्हेज' विनोद असले सगळे मराठी रंगमंचावर येऊ देताना सेन्सॉर बोर्डाच्या कानावरले केस कसे जळाले नाहीत याचे नवल वाटते - किमान मला तरी वाटले. पण जयंत पवार यांच्या पत्रानुसार सेन्सॉर बोर्डाला सादर केलेल्या संहितेत नसलेला जवळजवळ दुप्पट भाग पाटोळे आणि केळकर रंगमंचावर सादर करतात. (असे असले तर मात्र हा गंभीर प्रकार आहे.) पण सुरवातीच्या काही मिनिटांत उठून जाणारे काही प्रेक्षक सोडले तर बाकी मात्र एकूणेक प्रेक्षक या सगळ्याचा मनमुराद आस्वाद घेत होते. यात नाट्यगृहातल्या, मोजक्याच का होईना पण असलेल्या, स्त्रियाही आल्या. प्रेक्षकांच्या डोक्यांना समांतर नजर फिरवली की -जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमाला दिसते तशी- पांढर्‍या केसांची आणि टकलांची गर्दीच दिसत होती. हेही लक्षणीय वाटले.
मराठी रंगभूमीला एका वेगळ्या दिशेने थोडेसे पुढे नेणारा हा प्रयोग आहे असे मला वाटले. पुन्हा एकदा, दिशा वेगळी आहे, इतकेच. बरोबर की चुकीची असा काही निष्कर्ष काढणे आततायीपणाचे ठरेल. एकतर लैंगिकता-'सेक्स' याबाबत भारतीय समाजात प्रचंड कॉम्प्लेक्स- गंड- आहे. त्यातून भारतातील लोकसंख्येचा एक मोठा भाग निकोप लैंगिक सुखाला वंचित असलेला- सेक्शुअली फ्रस्टेटेड- असा आहे. त्यामुळे कोणत्याही वयाची 'मुले-मुले' एकत्र जमली की ( आणि दोनतीन पेग पोटात गेले की) अपरिहार्यपणाने गप्पांची गाडी 'सेक्स' वर घसरते. लैंगिक विनोद हे सदाबहार आहेत. फक्त त्यांची बॅटन ही वयोमानानुसार वयस्कर लोकांकडून तरुणांकडे फिरत राहाते इतकेच. जे चार भिंतीआड चालते, तेच लोकांसमोर आणले आहे, अशी या दीर्घांकाच्या लेखकाची भूमिका आहे. जर खरोखर तसे असेल तर अशोक पाटोळेंचे अभिनंदन केले पाहिजे. पण ते तसे नसावे अशी शंका यायलाही जागा आहे. या प्रयोगाचे स्वरुप दोघांनी सादर केलेल्या 'स्टँड-अप कॉमेडी' सारखे आहे. त्यामुळे मध्यंतरी 'हिट अ‍ॅन्ड हॉट' नाटकांच्या लाटेत जसे वेश्याव्यवसायासारख्या विषयांचा आधार घेऊन असंख्य सुमार नाटके काही काळ गल्ला भरुन गेली तसे काहीसे पाटोळेंनी केले नाही, असे आजतरी छातीठोकपणे सांगता येणार नाही.
पण जे काही रंगमंचावर बघीतले आणि ऐकले त्याने यापूर्वीच वयात आलेले मराठी नाटक आता 'सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह' झाल्यासारखे मला वाटले. 'शिवी ही अहिंसेला पोषक गोष्ट आहे' हे मला तरी पटले. 'चार शिव्यांचे तिखट घातल्याशिवाय आपल्या वाक्याला हवा तो अर्थच येणार नाही' असे मानणार्‍या रावसाहेबांचे आणि या नाटकाचे गोत्र एकच आहे, असे मला वाटले.
प्रयोग संपल्यावर बाहेर पडलो. रस्त्यावर रविवारची गर्दी होती. 'आयचा भोसडा या ट्रॅफिकच्या...' असे मनात आले. एरवी असे काही मनात आले की गिल्टी -कानकोड्यासारखे वाटते- आज वाटले नाही.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

असले सगळे मराठी रंगमंचावर येऊ देताना सेन्सॉर बोर्डाच्या कानावरले केस कसे जळाले नाहीत याचे नवल वाटते - किमान मला तरी वाटले. पण जयंत पवार यांच्या पत्रानुसार सेन्सॉर बोर्डाला सादर केलेल्या संहितेत नसलेला जवळजवळ दुप्पट भाग पाटोळे आणि केळकर रंगमंचावर सादर करतात. (असे असले तर मात्र हा गंभीर प्रकार आहे.)

नाटक पाहिलं नसल्यामुळे हा प्रतिसाद थोडा अवांतरच अाहे.

माझ्या समजुतीप्रमाणे नाटकांसाठी असलेल्या 'सेन्सॉर बोर्डा'ला महाराष्ट्रात 'परिनिरीक्षण मंडळ' म्हणतात. भारतातल्या इतर राज्यांमध्ये काय तरतुदी अाहेत, किंवा उदाहरणार्थ एखाद्या मराठी नाटकाचा प्रयोग बेळगावात किंवा बडोद्यात करायचा झाला तर कुणाची परवानगी लागते याची मला काही कल्पना नाही; तेव्हा कुणाकडे याबद्दल निश्चित माहिती असल्यास वाचायला अावडेल.

माझं मत (थोडक्यात) असं की सेन्सॉर बोर्ड अशी काही सरकारी यंत्रणा असूच नये. अाता एखादा कायदा एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल तर तो पाळण्याचं (किंवा त्यात पळवाटा न शोधण्याचं) बंधन तिच्यावर किती अाहे हा त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असणारा अाणि एकूण फार गुंतागुंतीचा प्रश्न अाहे. (यावर बरीच चर्चा करायला वाव अाहे, पण ते सवडीनुसार….)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माझं मत (थोडक्यात) असं की सेन्सॉर बोर्ड अशी काही सरकारी यंत्रणा असूच नये.

या मताला किंचित विरोध आहे.

नाटक, सिनेमा, मालिकांमधे काय दाखवायचं आहे ते लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांनी दाखवावं. ती कलाकृती सर्व वयाच्या किंवा कोणत्या वयाच्या प्रेक्षकांसाठी योग्य आहे हे नियामक मंडळाने ठरवावे. भयंकर हिंसा, लैंगिक दृष्य अशा गोष्टींपासून लहान मुलांना दूर ठेवावं असं मला वाटतं. (हे असं खरोखर केल्यास अनेक हिंदी-मराठी मालिकाही 'फक्त प्रौढांसाठी'च होतील का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अश्लिल-लैगिक विनोद असतात -> ते मेंदूवरचा ताबा नसताना (म्हणजे विचार-अनुभव परिपक्व होण्याच्या वयाआधी)किंवा गेल्यावर (म्हणजे अंमली (द्रव)पदार्थांच्या वगैरे (प्राशना)सेवनानंतर) चारचौघात सांगायचे-ऐकायचे असतात -> इतर वेळेला गुपचूप वाचायचे असतात (खुशवंतसिंगांची रेल्वे-स्टेशनवर मिळणारी पुस्तके) इथेपर्यंत समाजात त्यांचे स्थान होते. आता ते विनोद उघडपणे,पूर्णपणे शुद्धीवर असताना, रंगमंचावरून सांगितले जातात आणि उघडपणे,पूर्णपणे शुद्धीवर असताना, परिपक्व वयात आस्वादले जातात हे काही पचले नाही.

मला वाटते की वकूब नसल्याने उत्तम दर्जाचा विनोद सुचत नाही म्हणून आणि सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासामुळे लेखकाने हे नाटक लिहिले असावे. वादग्रस्त विषयाचे खमंगीकरण करून त्याचा आर्थिक फायदा मिळवण्याचा हा या नाटकाच्या निर्मात्यांचा प्रयत्न वाटतो. (अन्यथा, रावांसारखे गृहस्थ या नाटकाकडे कशाला फिरकले असते?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म भारतातले बरेचसे लोक सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड आहेत हे मान्य...
शिव्या म्हणजे शाब्दिक हिँसा. शारिरीक हिँसेपेक्षा कमी हिँसक...
कुठे होतं नाटक म पा च्या की खाजगी सभागृहात?
बाल्कनी स्त्रियांसाठी राखीव झाली हे छान.
बाकी अदितीच्या धाग्यात दिलेल्या मटाच्या लिँक मधे अनामिक म्हणतायत त्याप्रमाणे 'स्त्रि समोर आली की पुरुष कसा विचार करतात, बाहेरच्या जगात (किँवा घरातही) त्यांच्यासोबत वावरताना काय सावधगीरी बाळगायची, कसली अपेक्षा ठेवायची वा ठेवायची नाही' हे या नाटकातुन कळते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीर्घांक काही पाहिला नाही. पण सनसनाटी निर्माण करण्यात निर्माते यशस्वी झालेले दिसतात. टीव्ही वर्तमान पत्रात चर्चा घडवून आणणे, पुरुषांची मक्तेदारी करुन स्त्रियांना समानतेच्या कल्पनेतून डिवचणे असे प्रकार दिसतात.
अंकाची डीव्हीडी अजून झालेली दिसत नाही. तीही खपेल चांगली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान. जे वर्णन केलंय ते वाचल्यावर हे सर्व ऐकण्यासाठी तिकीट काढून थिएटरात जाण्याची निदान पुरुषमंडळींना काय गरज? असा प्रश्न पडला.
पुरुषांना दिवसभर म्हणजे उदा. हरएक चहाच्या टपरीवर, हपीसात, टॉयलेटमधे, सिग्रेट अड्ड्यावर, पार्ट्यांमधे वगैरे बाय डिफॉल्ट ऐकायला मिळणार्‍या गोष्टी स्टेजवर पाहण्यात काय नावीन्य?

इनफॅक्ट हे नाटक फक्त स्त्रीवृंदासाठी ठेवलं तर निदान त्यांना काहीतरी (प्रिझ्युमेबली) वेगळं तरी ऐकायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अस्सेच काहिसे लिहायला आलो होतो.
एकूण या परिक्षणायावरून तरी या प्रयोगात "नाटक" असल्याचे वाटले नाही. नक्की काय बघण्या/ऐकण्यासाठी पैसे मोजावेत हे कळलं नाही.

या वेगळ्या वाटेचा परिचय करून दिल्याबद्दल (आणि पैसे वाचवल्याबद्दल) रावसाहेबांचे आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जन्मगावात हे असले विनोद आणि शिव्या ऐकण्यात (प्रसंगी देण्यातही) निम्मं आयुष्य गेलं आहे. पोरं-बाप्येच काय, काही प्रतिभावान आणि नवनवोन्मेषशालिनी बायांनाही अत्यंत कल्पक आणि कलात्मक शिव्या देताना ऐकलेले आहे.

नाटक पाहणार नव्हतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीच वादग्रस्त झालेला / केलेला नाटकाचा विषय असल्याने असल्या निर्मात्यांच्या खेळीला बळी न पडायचे ठरवले आहे.. अजिबत थिएटरात पाहणार नाही...

अवांतर : एका मित्राने हौसेने मराठी अश्लील विनोदांची एक एम्पीथ्री फाईल ऐकवली होती . कोणत्यातरी खाजगी मैफलीतले कथाकथन टाईप रेकॉर्डिंग होते .. काही हुशार विनोद सोडले तर पाच दहा मिन्टांत कंटाळा आला... अश्लील जोक तोंडीलावण्याप्रमाणे हवेत, मिर्चीचा ठेचाच पूर्ण जेवण म्हणून जेवायला मला आवडेल का? किंवा का आवडावा, असा प्रश्न पडतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेन्सॉर बोर्डाने 'फक्त प्रौढासाठी" असा शेरा दिल्यानंतरही मोठ्या मानभावीपणाने अशोक पाटोळे आणि को. ने 'फक्त पुरुष प्रौढासाठी' असे मुद्दाम जाहीर करून एकप्रकारे प्रेक्षकांतील मॉर्बिड क्युरिऑसिटी चाळविली आणि त्यात मिडियाने आवश्यक ती बोलबच्चन भर घातल्यावर मग 'धंद्या'साठी मसाला तयार झालाच. ज्यानी प्रयोग पाहिला त्यानी तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून डोक्यावर घेतल्याचे कुठेच चित्र आढळलेले नाही. कमरेखालील विनोद नाहीत, पण संवादात पोतंभर लिंगाडे अवयव आणून जर पाटोळे क्रांती आणू पाहात असतील तर त्या क्रांतीचा कुणी पाठपुरावा करेल यावर विश्वास बसणे कठीण जाईल.

दर दहापंधरा वर्षांनी असे काही सो-कॉल्ड आगळेवेगळे प्रयोग करण्याची खुमखूमी रंगकर्मीना येत असतेच आणि सादरीकरणावर ओरड झालीच तर वासूनाका टपरीवर दुसर्‍याच्या पैशाने चहा पिणारे नसलेल्या बाह्या सरसावून 'लेखकाची गळचेपी' वर कॉलम खरडण्यास मोकळे असतातच. लोकही 'आहे दोनचार दिवसाची चर्चा...' म्हणून एकवार नाट्यगृहावर हजेरी लावतात, शिव्या हाणतात आणि परत दुसर्‍या दिवसापासून दैनंदिन भाजीपोळीच्या तयारीत लागतात.

सत्तरच्या दशकात अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर यानी महेश एलकुंचवार यांचे 'वासनाकांड' रंगभूमीवर आणले होते. या नाटकात भाऊ-बहीण यांचे शरीरसंबंध दाखविण्यात आले असून ती एक सामाजिक बाजू दाखविणारी अजोड अशी कलाकृती आहे अशी पद्धतशीर जाहिरात [अर्थात मुंबई पुणे बेल्टमध्ये] करण्यात आली. नाटकावर ज्या रितीने टीकेचे मोहोळ उठणे आवश्यक होते, तसे उठलेही...विरलेही. लोकांना लेखक वा दिग्दर्शक काय त्यातून सुचवू इच्छितो याच्याशी काडीचेही घेणेदेणे नव्हते, त्याना उत्सुकता होती ती 'भाऊ-बहीण' म्हटली जाणारी पात्रे स्टेजवर 'तो' परफॉर्मन्स करतात का ? पालेकरांनी मुंबईच्या थंड प्रतिसादानंतर उर्वरीत महाराष्ट्रात 'वासनाकांड' चे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. इचलकरंजी इथे तर गर्दी करणार्‍या [कशासाठी ते उघडच होते] मायबाप प्रेक्षकांना 'अजून ते दृश्य का येत नाही...?" याच प्रश्नाने सतावले, व शेवटी तर त्यानी दंगलच केली आणि प्रयोग बंद पाडला. [सई परांजपे यानी तर चक्क स्मिता पाटील आणि ओम पुरी याना घेऊन 'वासनाकांड' चा प्रयोग केला होता.]

अशी ही मराठी नाट्यरसिकाची समज. त्यामुळे 'चावट संध्याकाळ....' कितीही शाब्दिक चावट असली तरी ती अल्पजीवीच ठरेल.

या निमित्ताने १९६९-७० मध्ये इंग्लिश रंगभूमीवर आलेल्या 'ओ कलकत्ता' नाटकाची [संगीतीका] आणि त्यातील पात्रांचे [स्त्री-पुरुष दोन्ही] स्टेजवर पूर्णपणे नग्नतेने वावरूनच नाटक करणे हे आठवले....इंग्लंडमध्येही अशा सादरीकरणावर प्रचंड धुरळा उडाला होता.... विशेष म्हणजे आज अगदी २०१२ मध्येही ओ कलकत्ताचे प्रयोग होत आहेतच. भारतातही नाटकातील 'कलकत्ता' नामामुळे बर्‍यापैकी गरमागरम चर्चा झाली होती, पण आपल्या 'कलकत्या'चा आणि नाटकाच्या शीर्षकाचा काडीमात्रही संबंध नाही हे नंतर समजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रांती करण्याच्या नावाखाली उगाच सनसनाटी निर्माण करण्याचा प्रकार वाटतो.
अशाच एका प्रयोगाची शिरिष कणेकरांनी केलेला http://www.lokprabha.com/20091204/metkut.htm.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असे प्रयोग फक्त क्रांतीचा आव आणून सनसनाटी निर्माण करण्याचा उद्देश. काही वर्षांपूर्वी योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाट्यप्रयोगाचं शिरीष कणेकरांनि केलेलं पोस्ट्मॉर्टम.
http://www.lokprabha.com/20091204/metkut.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचनामा वाचायला मजा आली..
कणेकरांचे आक्षेप फारसे पटले नाहित, मात्र 'तो' प्रयोगही तितपतच असल्याने (ऐकीव माहिती) त्यावरील टिकेला विरोध नाहीच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्रुषिकेश शी सहमत. (माफ करा मला मोबाईल वरुन नाव नीट लिहीता येत नाहीय)
कणेकरांचे आक्षेप पटले नाहीत...
बाकी मला त्या नाटकाचं फक्त नाव माहीती होतं/आहे. त्यामुळे नो कमेँटस्...
पाटील यांनी ज्या नाटकाबद्दल सांगीतलय, तशी एक रिअल लाईफ केस ऐकली आहे, मध्यप्रदेश मधली. मधे मधे (बहुतेक जर्मनीत) अडल्ट्स मधलं कसेंट असलेलं इन्सेस्ट लीगल कराव अशी निदर्शन झालेली... तिबेट मधे अशीच काही संस्कृती/प्रथा आहे का?? महाराष्ट्रात पण मामा, आत्तेभाउ, दुरचे नातलग अशी लग्न होतातच की. आणि सध्या उत्तरेत एक गोत्रातील लग्नांमुळे होणार्या ऑनर किलीगच काय...
फारच अवांतर झालं का Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...महाराष्ट्रात पण मामा, आत्तेभाउ, दुरचे नातलग अशी लग्न होतातच की...."

खरंय. पण एलकुंचवारांनी ती दोन्ही पात्रे सख्ख्या नात्याची दाखविली होती, त्यामुळेच गहजब झाला होता. मामेभाऊ वा आतेभाऊ दाखविला असता तर कुणी विचारलेच नसते. कर्नाटकात तर थेट मामाला भाची देण्याची प्रथा आजही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म...
वासनाकांड या नाटकाबद्दल मला काहीच माहीत नाही/नव्हती. त्यामुळे तुमचा पहीला प्रतिसाद (विषय, पद्धतशीर जाहिरात, टिकेचे मोहोर उठणे-विरणे, लोकांची उत्सुकता कशात होती, इचलकरंजीत गर्दी-दंगल करणारे याबद्दलचे अनुभव/आठवणी इ) रोचक वाटला.
आणि मग रिअल लाईफ मधल्या अशा काही केसेस आठवल्या (मध्यप्रदेशातल्या सख्या भाउ बहीणीच लग्न, जर्मनीतली निदर्शन इ).
पण तो काही या धाग्याचा विषय नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेपरात या नाटकाबद्दल,आधीपासूनच बरेच वाचल्याने, प्रतिकूल मत झाले होते. आता रावांचे परीक्षण वाचल्यावर तर असे नाटक बघणारच नाही. चावट विनोद हे लहानपणापासूनच ऐकले. एका वयांत त्याचे जास्त आकर्षणही होते. पण असे विनोद जाहीररीत्या करणे ही विकृतीच वाटते. शिव्या ऐकायला मला कधीच आवडल्या नाहीत. कारण मनांत असेच यायचे की, समजा, दोघांचे भांडण चालू आहे त्यांत, त्यांनी शिव्यांद्वारे दुसर्‍याच्या आयाबहिणींना खेचण्याचे कारणच काय ? कित्येकदा मी हे ही बघितले आहे की जो मारामारीत हार खातो तो प्रथम शिव्या देऊ लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पण असे विनोद जाहीररीत्या करणे ही विकृतीच वाटते...."

~ अगदी अगदी. अत्यंत तिरस्करणीय अशी ही बाब होऊ शकते. सामाजिक वर्तनाच्या कित्येक गोष्टी कुठेही लिखित स्वरूपात नसतात, त्या गृहित धरल्या जातात. दोन मित्रांचे लिंगपिसाटू संभाषण हे त्या दोघांपुरतेच टु किल द फ्री टाईम अशा संकल्पनातील असणे एकवेळ मान्य करू, पण म्हणून त्याला शनिवारवाड्यासमोरील सभेचे रूप देऊन ती घाण चर्चेला घेणे ही नाटककाराची विकृती होऊ शकते.

उगाच माधव मनोहरांनी 'अवध्य' ला 'वयात आलेले नाटक...' म्हटले म्हणजे ते नाटक काही अजोड कलाकृती होऊ शकत नसते. होतात त्यामुळे ज्यादाचे आठदहा प्रयोग आणि जाते मरून. 'चावट संध्याकाळ....' देखील त्याच पंगतीतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी', 'अवध्य' किंवा 'वासनाकांड' ही नाटकं गंभीर प्रकृतीची आहेत. त्यांच्या दर्जाविषयी मतभेद किंवा चर्चा होऊ शकतील, पण त्यांना 'हिट अँड हॉट' किंवा या पाटोळ्यांच्या थिल्लर नाटकाच्या पंक्तीत बसवणं योग्य वाटत नाही. अर्थात, गंभीर नाटकाचा प्रयोगदेखील अत्यंत हीन पातळीचा केला जाऊ शकतो. सध्या पुण्यात 'अवध्य'चे काही प्रयोग होत आहेत. त्यांची जाहिरात ही 'हिट अँड हॉट' नाटकासारखीच केली जाते आहे. खानोलकरांना हे अभिप्रेत होतं किंवा पसंत पडलं असतं असं वाटत नाही.

अवांतराला प्रतिसाद :

>>उदाहरणार्थ एखाद्या मराठी नाटकाचा प्रयोग बेळगावात किंवा बडोद्यात करायचा झाला तर कुणाची परवानगी लागते याची मला काही कल्पना नाही; तेव्हा कुणाकडे याबद्दल निश्चित माहिती असल्यास वाचायला अावडेल. <<

नाटकांचं परिनिरिक्षण हा महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार होणारा प्रकार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात कोणत्याही भाषेतल्या नाटकाला मंचित करण्याआधी करावा लागतो. असा प्रयोग महाराष्ट्राबाहेर करायचा झाला तर त्या राज्यातला कायदा लागू होईल. माझ्या माहितीप्रमाणे असा कायदा (प्रयोगाआधी संहिता परिनिरिक्षणासाठी देणं) महाराष्ट्राबाहेर फारसा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"त्यांना 'हिट अँड हॉट' किंवा या पाटोळ्यांच्या थिल्लर नाटकाच्या पंक्तीत बसवणं योग्य वाटत नाही......"

~ नाही, चिंजं...इतका बालिशपणा कुणीही नाट्यरसिक वा प्रेमी करणार नाही. मी ज्यावेळी "वासनाकांड" चा उल्लेख केला त्यावेळी माझ्या नजरेसमोर सरला येवलेकर अभिनित 'जंगली कबुतर' बिलकुल नव्हते, जे हिट अँड हॉटच्या कक्षेतील होते. अवध्य, वासनाकांड, गार्बो, गिधाडे, काचेचा चंद्र ही जरूर गंभीर प्रवृत्तीची, संहितेची नाटके होती. पण म्हणून सेन्सॉर बोर्डाने ती जशीच्यातशी कधीच मंजूर केल्याचा दाखला नाही. तेंडुलकरांच्या 'गिधाडे' मध्ये तर सेन्सॉर बोर्डाने तब्बल दीडशे आक्षेपार्ह शब्द गाळायला सांगितले होते [त्यांच्या व्याख्येत रूढार्थाने शिव्या मानल्या जाणार्‍या 'भ' ची बाराखडीच होती नाटकात]....ही घटना १९७० ची. मग त्या काळातील प्रेक्षक तशा शिव्यानी बरबटलेला प्रयोग बघायला जात होता तर तोही एका विशिष्ट 'एन्जॉयमेन्ट' साठीच. 'मला त्या शिव्या द्यायच्या आहेत, पण माझ्या पांढर्‍या सदर्‍याआड त्या देता येत नाहीत, म्हणून मी ५० चे तिकिट काढून गिधाडे बघून घेतो...' अशी प्रवृत्ती.

तीच गोष्ट 'काचेचा चंद्र' ची. नाटक अजिबात चालत नव्हते. मोहन तोंडवळकरांनी तर प्रयोग बंद करण्याचाच निर्णय घेतला. पण कमल शेडगेंच्या कल्पक जाहिरातीमुळे [विशेषतः 'सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलेले नाटक...' हा जाहिरातीतील मजकूर तसेच नाटकाचा नायक दारूने धुंद झालेल्या भावनाबाईना एखाद्या पोत्यासारखे खांद्यावर टाकून चालला आहे असा फोटो त्या जाहिरातीसोबत छापला जाऊ लागला.....] प्रेक्षकांतील 'सेक्शुअ‍ॅलिटी' ची भावना चाळविली गेली आणि जवळपास बंद पडलेले ते नाटक धो-धो शेकडो प्रयोग चालू लागले.

त्यामुळे प्रेक्षकाला कसली आली आहे नाटकातील गंभीरतेची गंभीरता ? त्याला फक्त 'मी जे करू शकत नाही, ते सखाराम बाईंडर करतो आहे ना...मग झाले.'

"चावट संध्याकाळ....." देखील अशाच प्रेक्षकांची भूक नवीन काहीतरी ताटात येईपर्यंत भागवू शकेल, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयोग पाहिलेला नाही पण लेखातून चांगली कल्पना आली आहे असं वाटतंय.

गॉसिप करणे, चावट विनोद करणे, अश्लील बोलणे इत्यादि इत्यादि प्रकार पुरातन कालापासून अस्तित्त्वात आहेतच पण सार्वजनिक अवकाशांत त्यांना स्थान नव्हते. प्रस्तुत प्रयोगासारख्या गोष्टींमुळे "कुठले टॅबूज् मोडावेत, शिष्टसंमत वर्तनाच्या बाह्य करण्यायोग्य कुठल्या गोष्टी आहेत , कलेच्या प्रांतातल्या कुठल्या कृती निव्वळ धक्का देण्याकरता, कंडशमन करण्याकरता असतात आणि कुठल्यांच्या मागे काही उद्दिष्ट असतं" या आणि अशा विचारांची उजळणी झाली. चर्चाविषयातलं नाटक हे कुठल्याही कलात्मक किंवा कलाबाह्य स्वरूपाच्या श्रेयस कारणीमीमांसेत बसवता येत नाही या निष्कर्षाला आलो.

अशा स्वरूपाच्या गोष्टी कलेच्या विमर्शातल्या काही नाजूक, जटिल अशा मुद्द्यांना पुढे आणतात. स्त्रियांचं शोषण दाखवण्याच्या मिषाने सॉफ्ट-पोर्नॉग्राफी सार्वजनिक कक्षेत आणली जाते. मानवी विकृतींवर प्रकाश टाकण्याच्या हेतूच्या पडद्यातून हिंसेचा बाजार मांडला जातो. शेवटी काय, तर प्रत्येक प्रांताप्रमाणे कलेमधेही Serious contenders and pretenders हे असणारच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेंडुलकरांनाही आहे आणि पाटोळ्यांनाही आहेच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे शेवटी कशाकरता वापरले जाते ते पहाणे महत्त्वाचे रहाते. एखादा लेखक/कलाकार प्रचंड सामाजिक दबाव आणि दडपशाहीला सामोरं जात त्याला म्हणायचं तेच म्हणतो. पाटोळ्यांसारखे लोक त्याच कारणाचा आधार घेऊन स्वतःचं हे असलं काहीतरी विकायला बाजारात आणतात. जाहिरात कुणीही करावी. निवड करण्याचे काम आपले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

यातला माझ्या दृष्टीने दुर्दैवाचा भाग म्हणजे सगळे- एकूणेक विनोद मी पूर्वी ऐकलेले होते. त्यामुळे मला खदखदून हसू वगैरे काही आले नाही.

संपूर्ण लेखातलं मी हे सर्वात मार्मिक वाक्य समजतो. समाजमनात जे आधीच वैयक्तिकरीत्या स्थिरस्थावर झालेलं आहे त्याचं संकलन करून जाहीर सादरीकरण करण्याने नक्की कुठचं घोडं मारलं जातं हे समजत नाही. कदाचित लेखकाचा अभ्यास दांडगा असेल हे मान्य केलं तरीही हा मुद्दा फारसा बदलत नाही Smile एकंदरीतच अशा गोष्टींनी जगबुडी झाली वगैरे न म्हणता तिच्याकडे सर्व समाजात असलेल्या आणि अधूनमधून उफाळून येणाऱ्या पौगंडी विनोदबुद्धीचा कंड खाजवण्याची गरज म्हणून बघावं आणि सोडून द्यावं या विचाराचा मी आहे. यात रामदासांप्रमाणे 'टवाळा आवडे विनोद' अशी निंदा करायची नसून, आपल्या प्रत्येकात असा टवाळ लपलेला असतो आणि त्याचा आंबट शौक पुरवण्यासाठी पाडलेल्या चिंचा इतकंच म्हणायचं आहे. अशा चिंचा पाडणाऱ्यांनी नैतिक भूमिका घ्यावी आणि त्यांना आपण ती द्यावी हे दुर्दैव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चावटपणाचे मानसशास्त्र - डॉ. राजेंद्र बर्वे

विनोदाला माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. पण तोच विनोद चावटपणाकडे, त्यातही अश्लीलपणाकडे झुकला की तो कमालीचा क्रूर होतो. दुसऱ्याचं अवमूल्यन करतो. दुसऱ्या कुणाचंही अवमूल्यन करायचा कुणालाही काय अधिकार आहे?

एखादी गोष्ट दडवून ठेवायला सुरुवात झाली की, तिच्याबद्दलचं कुतूहल वाढतं हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्याकडची खजुराहोची शिल्पं, इतरही प्राचीन साहित्य बघितलं तर लैंगिकता ही दडपून ठेवण्याची गोष्ट कधीच नव्हती. अगदी शिल्परूपाने व्यक्त व्हावी इतकी लैंगिकता ही खुली, कलात्मक बाब होती. त्या सगळ्या व्यवहारांमध्ये, त्यासंदर्भातल्या चर्चेमध्ये मोकळेपणा होता. एक निरोगी आविष्कार होता. त्यात कुठेही अश्लीलतेला, चावटपणाला थारा नव्हता. लैंगिकतेला जीवनाचं एक रूप म्हणून स्वीकार केला गेला होता.
आपल्यावर झालेल्या आक्रमणांमधून नंतर वेगवेगळ्या गोष्टींमधले राजकीय, सामाजिक दबाव वाढत गेले. सर्व प्रकारच्या अविष्कारांचं दमन होत गेलं. दमन झाल्यावर ते उफाळून येतं तसं ते सगळं उफाळून येत चावटपणाकडे झुकलं. मोकळ्या खुल्या वातावरणाऐवजी चावटपणाकडे, चटोरपणाकडे कल वाढत गेला.
जी गोष्ट सहज, पटकन मिळत नाही तिच्याबद्दल कुतूहल असतं, उत्कंठा असते. त्यामुळे अतिरंजकता, अनपेक्षितपणा आणि उत्कंठा हे तीन घटक विनोदाचा गाभा म्हणता येईल असे आहेत. हीच गोष्ट चावट विनोदांच्या बाबतीत पण म्हणता येईल. सगळ्या चावट विनोदात अनपेक्षितपणे काहीतरी घडणं हा एक समान धागा असतो. पुरुषाला वाटणाऱ्या मर्दानगीचं त्यात वस्त्रहरण असतं. स्त्री ही लैंगिक बाबतीत अनभिज्ञ असते याचा पर्दाफाश असतो. हे सगळ्या चावट विनोदांमध्ये सापडेल. लैंगिकतेमधला साचेबद्धपणा विनोदामधून मोडून काढला जातो, पण त्याचं जेव्हा अवमूल्यन होतं तेव्हा ते अश्लीलतेकडे झुकतं. त्यातली सूचकता संपते. स्त्री-पुरुषांची अवयवांची वर्णनं, त्यावरून घाणेरडय़ा कॉमेंटस् येतात तेव्हा ते अश्लील होतं. त्यामुळे खेळकर विनोद सुंदर, बुद्धिमान तर अश्लील विनोद घाणेरडा ठरतो. चावटपणात एक सूचकता असते. एक प्रकारची गंमत असते. त्यात बुद्धिमत्ता असते. अश्लील विनोदांमध्ये अशी सूचकता, बुद्धिमत्ता नसते. उलट ते बटबटीत असतात. चांगल्या विनोदात हसत खेळत घेतलेल्या फिरक्या असतात. अशा विनोदांमधून जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन घडतं.
अश्लील विनोदांमध्ये अशा हसत-खेळत फिरक्या घेत केलेला निखळपणा नसतो. मुळात अशा विनोदांना इंग्रजीत नॉनव्हेज जोक म्हणतात. त्यातच सगळं आलं. नॉनव्हेज म्हणजेच शिकार, कुणावर तरी केलेली कुरघोडी, आक्रमकता आणि त्याचा घेतलेला आस्वाद हे सगळं आहे. नॉनव्हेज जोक असं म्हणून अशी छुपी आक्रमकता दाखवायची असते.

चावट विनोद शब्दांच्या कोटय़ा करत येतो त्यात गंमत असते. त्यात द्वयर्थ येतो तेव्हा त्याचं अवमूल्यन होतं. दादा कोंडकेच्या सिनेमांमधल्या द्वयार्थातून आपल्याला ते दिसतं. त्यांच्या एका सिनेमात बिनबाह्यंचा ब्लाऊज घालणाऱ्या एका स्त्रीला विचारलेला प्रश्न आहे की, तुला शिंप्याने हात नाही का लावला? जे आहे ते तुम्ही कसं सांगता हेही महत्त्वाचं असतं. पीटर रॉजर केनेडीची स्टँडअप कॉमेडी प्रसिद्ध आहे. या शोसाठी भारतीय, चिनी, जपानी, मलेशियन असे सर्व प्रकारचे लोक येतात. त्यांच्या देशानुसार असलेल्या स्वभाववैशिष्टय़ांना उद्देशून त्यात विनोद सांगितले जातात. लोक ते ऐकतात, एन्जॉय करतात. पण मध्येच एखादा अत्यंत अश्लील म्हणता येईल असा विनोद सांगितला जातो. पण तो अंगावर येत नाही. कारण तो अशा अनेक विनोदांमधला एक म्हणून येत असतो.
चावट विनोदांमध्ये लैंगिक व्यवहारांवर कुरघोडी असते. आपण एक उदाहरण घेऊ. कोणताही सुबुद्ध बरा माणूस पाच मिनिटांत पोर्न फिल्म बघायला कंटाळतो. कारण त्यात तोचतोपणा असतो. माणसाला जगण्यातली गंमत शोधायची असते. अनुभवायची असते. ती त्याला उत्कंठावर्धक वाटत असते. तसंच अश्लील विनोदांचं आहे. माणसाला हवी असलेली उत्कंठावर्धक गंमत त्याला अश्लील विनोदांमधून मिळत नाही तर ती चावट विनोदांमधून मिळते.

तरीही एक गोष्ट आहेच की चावट विनोद ऐकणं, ते एन्जॉय करणं याकडे लोकांचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. याचं कारण असं की गेल्या पाच दहा वर्षांत लोकांचा कामाचा भार वाढला आहे. त्यातून ताणतणाव वाढले आहेत. आयुष्यातला तोचतोपणा वाढला आहे. त्यामुळे कंटाळा वाढतो. बीपीओसारख्या ठिकाणी कामाचं जे स्वरूप असतं त्यामुळे कंटाळा वाढतो, ताण वाढतो. त्यावरचा उतारा म्हणून चावटपणाकडचा कल वाढला असं होऊ शकतं.

समाजात एक प्रकारचा निकोपपणा असावा अशी आपली इच्छा असते. पण त्याऐवजी येतं काय तर अतिरंजितपणा. ‘एक चावट संध्याकाळ’सारख्या नाटकातून तो स्पष्ट होतो. हे नाटक मी बघितलेलं नाही. पण त्याबद्दल जे ऐकलं आहे, त्यावरून असं नाटक का असावं, असे विनोद रंगभूमीवर का सांगावेत हाच मुळात प्रश्न आहे. कारण हे काही लोकांचं लैंगिक शिक्षण नाही. त्यात काही वास्तव नाही की त्याला काही मूल्यं नाहीत. त्यातून वास्तवाचं भान येतं असंही काही नाही.

पण असे विनोद, अशी नाटकं समाजाचं कॅथर्सिस करतात असं मात्र म्हणता येणार नाही. कारण कॅथर्सिसची गरज कुणाला असते तर ज्या माणसांना अभिव्यक्तीला वाव मिळत नाही त्यांना. कॅथर्सिसमधून वेगळ्या जाणिवा बाहेर पडतात. त्या तशा बाहेर येत असतील तरच ते कॅथर्सिसही महत्त्वाचं असतं. कॅथर्सिसमधून माणूस आपल्या मनातली भीती मोकळी करत असतो. पण ‘एक चावट संध्याकाळ’सारखी नाटकं ही कॅथर्सिस आहे असं म्हणता येणार नाही तर ती नुसती ओकारी आहे.

कोणत्याही विनोदातून जाणीव निर्माण झाली, आपण समृद्ध झालो तर तो विनोद प्रभावी म्हणता येईल. विनोदात क्रूरपणा असतो. आपण तो हलक्याफुलक्या पद्धतीने घेतो. त्यातून विरंगुळा शोधतो. जीवनातल्या विसंगतीला हसतो. ती विसंगती सहन करायला शिकतो. पण अश्लील विनोद हे कमालीचे क्रूर असतात. त्यातून चुकीचे पायंडे तयार होतात आणि तेच ते विनोद पुन्हा पुन्हा केले की ते खरे वाटायला लागतात. हे सगळ्यात भीतिदायक आहे.

चावट, अश्लील विनोद ही एक लाइफस्टाइल आहे. तिला आपण पाठिंबा देतो का, हे लक्षात घ्यायला हवं. ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक फक्त प्रौढ पुरुषांसाठी आहे अशी त्याची जाहिरात केली गेली. त्यात स्त्रियांनी न ऐकण्यासारखे विनोद आहेत असंही संबंधितांचं म्हणणं आहे, पण मुळात हे असं काहीतरी असणं हेच जाम भीतिदायक आहे. स्त्रियांचं यात अवमूल्यन आहे, असं तुम्हीच सांगता. मग तुम्ही मुळात ते करता.. आणि तुम्ही ते खुलेआम जाहिरात करून करत असाल आणि तुम्हाला ते बरोबर आहे असं वाटत असेल तर मग तुमच्या दृष्टीने चुकीच्या, करू नयेत अशा गोष्टी तर कोणत्या आहेत? दुसऱ्या माणसाचं अवमूल्यन करणं हे कधीही चुकीचंच आहे.

‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक फक्त प्रौढ पुरुषांसाठी आहे अशी त्याची जाहिरात केली गेली. त्यात स्त्रियांनी न ऐकण्यासारखे विनोद आहेत असंही संबंधितांचं म्हणणं आहे, पण मुळात हे असं काहीतरी असणं हेच जाम भीतिदायक आहे.

दुसरं म्हणजे, प्रौढांसाठीची नाटकं असं म्हणताना तुम्हाला माहीत असतं का आत्ताच्या पिढीच्या हाताशी इंटरनेट आहे आणि ती या सगळ्यात अगदी ग्रॅॅज्युएट आहेत. माझ्याकडे आलेल्या एका क्लाएंटच्या चौथीतल्या मुलाने त्याच्या वयाच्या मुलीला विचारलं, विल यू हॅव सेक्स वुईथ मी.. त्याला बिचाऱ्याला आपण काय विचारतो आहोत त्याचा अर्थ काहीच माहीत नव्हता. पण त्याच्यापर्यंत हे सगळं आदळतं आहे आणि तुम्ही प्रौढांसाठी चावट विनोद असणारं नाटक लिहिता तेव्हा खरोखरच दया येते. हसायला येतं. एक तर असे विनोद लैंगिक चोरटेपणा, चावटपणा, कर्कशा, जाड असणाऱ्या स्त्रिया, बायकोला घाबरणारा नवरा, दारू, धुम्रपान यांच्याशीच संबंधित असतात. मराठी सिनेमे, टीव्ही सीरियल्स, अगदी ते फू बाई फूसारखा कार्यक्रम बघितला तरी हेच सगळं दिसतं. आजची तरुण पिढी या सगळ्याच्या पार पलीकडे गेलेली आहे. तिच्यापासून तुटलेले लोकच हे असं काहीतरी लिहितात.

खरं तर पाश्चात्त्य समाजात विनोदाचा मानसशास्त्राच्या अंगाने खूप अभ्यास झाला आहे. विनोद करताना, ऐकताना मेंदूतल्या बदलांचं स्कॅनिंग करून असं लक्षात आलं आहे की, उजव्या मेंदूचं काम चांगलं असेल तर व्यक्ती विनोदाला प्रतिसाद देते. विनोद करते. तिची वृत्ती विनोदी असते. विनोद तुम्हाला सगळ्या गोष्टींकडे सर्वसमावेशक दृष्टीतून बघण्याची क्षमता देत असतो. तुम्हाला निरोगी ठेवत असतो. पण ते सगळं चावटपणाकडे आणि त्याहीपेक्षा अश्लीलतेकडे झुकलं की किळसवाणं होतं हे लक्षात घ्यायला हवं.

याचाच आणखी एक पैलू म्हणजे स्त्रियांना विनोदबुद्धी नसते असं सर्रास मानलं जातं. पण स्त्रियांवर क्रूर विनोद करून तुम्ही त्यांचं सतत अवमूल्यन करणार आणि त्या विनोदांना त्या प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांना विनोद कळत नाही असं म्हणणार? तुम्ही केलेल्या त्यांच्या या प्रकारच्या पिळवणुकीला त्यांनी का म्हणून हसायचं? एक गोष्ट लक्षात घ्या की शोषित समाज कधीही हसत नाही. तो गातो. त्यामुळेच आपलं जीवन मांडणारी स्त्रियांची गाणी खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत. तशी पुरुषांची गाणी नाहीत. त्यांचे विनोद जास्त आहेत. म्हणूनच इथून पुढे तरी त्यांनी ते जबाबदारीने, स्त्रियांचं अवमूल्यन होऊ न देता करायला हवेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आणि अभ्यासू लेख आहे डॉ.राजेन्द्र बर्वे यांचा....तो इथे दिल्याबद्दल [एरव्ही पाहाण्यात आला नसता] श्री. मंदार जोशी यांचे आभार . लिंकच्या साहाय्याने मग 'लोकप्रभा' अंकच पाहिला, तेव्हा तिथे 'चावटपणाची उलटतपासणी' हा आणखीन् एक उदबोधक लेख मिळाला...तोही सविस्तर असून सर्वांनी वाचावा असाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच अंकातला, त्याच संकल्पनेवरचा अश्लीलतेच्या नावानं.. हा रवी आमले यांचा लेखही वाचनीय आहे. विशेषतः आजच्या तोडफोडीच्या प्रतिक्रियांच्या संदर्भात 'अश्लीलते'चा इतिहास वाचनीय आहे.

डॉ. बर्वेंच्या लेखामुळे चिंतातुर जंतू यांनी लिहीलेला लेख विंदांकडून काय घ्यावे आणि त्यासंदर्भात झालेली चर्चा आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.