सांगावेसे वाटले म्हणून.....

खूप लहानपणी आम्हाला एक कविता होती. सारखा सारखा वाहून वाऱ्याचे पाय दुखत कसे नाहीत? सारखी सारखी वाहून नदी थकत कशी नाही? सारखी सारखी कामं करून आई दमत कशी नाही? अशी काहीशी ही कविता होती. ती आम्हांला सगळ्यांना खूप आवडायची. पण ही कविता शिकवताना, बाई आम्हाला म्हणाल्या, “सारखं सारखं बोलून तुमचं तोंड दुखत कसं नाही?” आणि हे ऐकताना आम्हाला सगळ्यांना एकदम खुद्कन हसूच फुटलं. आम्ही सगळ्या मुली खूप बडबड्या होतो. त्यात मी नेहमी आघाडीवर. माझा छंद काय? असं विचारल्यावर मी कधीकधी ’गप्पा मारणे’ असं उत्तर आजही देते. माझ्या मते, प्रत्येक माणसाला माझ्याइतकं तीव्रतेने नसेल कदाचित, दुसऱ्याशी बोलावंसं वाटतच असतं. पण नीट विचार केला, तर असं वाटतं की हे बोलणं म्हणजे नुसतीच बडबड नव्हे. नुसते स्वगत नव्हे आणि एखाद्याला ’पिळणे’ तर नव्हेच नव्हे. हे बोलणं म्हणजे जिवाभावाच्या सुहृदांना काहीतरी सांगणं असतं. काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकणं असतं. सुखदुःखं वाटून घेणं असतं. पुलंनी वटवट या नाटकामधे,
’अमुच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची’

ही केशवसुतांची ओळ उद्धृत करून म्हटलंय, की जीवनाचा सारा गोडवा या गोड वटवटीतच सामावलेला आहे.

मानवी समाजाचं निरीक्षण केलं, तर ही गोष्ट किती खरी आहे हे जाणवतं. वक्ते का बोलतात? कीर्तनकार कीर्तन करताना कथा रंगवून घोळवून का सांगतात? गायक का गातात? लेखक, कवी का लिहितात?; तर आपल्या मनातलं काही इतरांना सांगण्यासाठी. जरी त्यामधे अन्यायाला वाचा फोडण्यापासून ते चार घटकांची करमणूक करणे इथपर्यंत सगळे उद्देश अंतर्भूत असले तरीही; या सगळ्याच्या मुळाशी जी एक प्रेरणा आपल्याही नकळत असते, ती म्हणजे कुणालातरी आपलं मनोगत सांगणं. आणि जेव्हा लेखन ’सांगावेसे वाटले म्हणून...’ इतक्या निर्मळ उद्देशाने केलेलं असतं, तेव्हा ते केवळ पुस्तक रहात नाही. ती होते प्रसन्न मैफल. गप्पांची मैफल. मोकळेपणाने, कसलंही दडपण न घेता आणि ऐकणाऱ्याला न घेऊ देता, गुजगोष्टी सांगण्याची, मन मोकळं करण्याची एक अतिशय रंजक अशी सोय.

शांताबाईंच्या ’सांगावेसे वाटले म्हणून’ या पुस्तकात याचा प्रत्यय जागोजागी येतो. मेहता प्रकाशनाने छापलेल्या या छोटेखानी पुस्तकात शांताबाईंच्या ललितलेखांचा संग्रह आहे. एकूण २९ लेख यात आहेत. या सगळ्या लेखांमागचं सूत्र हेच आहे. आपल्या मनातलं गूज सांगावंसं वाटलं म्हणून हे सगळे लेख लिहिलेले आहेत. आणि एखाद्या जवळच्या मित्राशी गप्पा माराव्या इतका निर्व्याज मनमोकळेपणा हे या लेखांचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. आनंद वाटून घेतल्याने द्बिगुणित होतो म्हणतात. तसाच आनंद वाटून घेणारे हे लेखन म्हणजे आनंदाचा सतत झुळझुळ वाहणारा एक झराच आहे. शिवाय हे ललित लेखन शांताबाईंसारख्या शारदेच्या उपासिनीने केलेलं असल्यामुळे ते अतिशय नेमकं आणि थेट मनाला भिडणारं झालं आहे, कारण त्यांच्या अनुभवांशी आपण चटकन तादात्म्य पावतो. प्रत्येक माणूस इतरांपेक्षा वेगळा असतो हे जरी खरं असलं, तरी प्रत्येक माणूस कुठेतरी सारखाही असतो. या सारखेपणामुळे शांताबाईंच्या लेखनात आपण आपले विचार, आपले अनुभव जास्त तरलपणे, जास्त थेटपणे अनुभवत असतो. थोरांची अभिव्यक्ती व्यक्तिगत असूनही अतिशय व्यापक असं रूप धारण करते तेव्हा त्या साहित्यगंगेत मनमुराद अवगाहन केल्याचा आनंद आपल्या गांजलेल्या मनाला मिळत असतो. नकळत आपल्या वेदना कमी झालेल्या जाणवतात. आयुष्यातल्या अनेक तापांमुळे वैतागलेल्या मनाने हे पुस्तक वाचायला घ्यावे आणि काही मिनिटातच सारा अस्वस्थपणा, तगमग, त्रास, चिडचिड, वैताग सारे विसरून आपण या लेखातल्या निर्मळ आनंदाशी तद्रूप होऊन जावे हा अनुभव मी स्वतः अनेकवेळा घेतला आहे. एके काळी तर, हे पुस्तक आपण भराभर वाचून संपवून टाकू या भीतीने मी रोज एकच पान वाचण्याचे रेशनिंगही स्वतःवर लादले होते. अपूर्णतेच्या गोडीपेक्षाही, हे पुस्तक संपल्यावर इतक्या जिव्हाळ्याचं असं काय वाचायला मिळणार याची भ्रांत त्याच्या पाठीमागे होती; आणि आजही काही अंशी ती टिकून आहे.

काही लेखकांच्या पुस्तकांवर माझं इतर पुस्तकांपेक्षा जरा जास्तच प्रेम आहे; आणि ही पुस्तके वाचताना, त्या लेखकाची / लेखिकेची एक आकृती माझ्या मनःचक्षूंपुढे उभी राहते. सगळ्यांच्याच राहत असणार. कधीकधी लेखकाचं प्रत्यक्ष दर्शन या प्रतिमेशी तंतोतंत जुळत नाही, तेव्हा जराशी चुटपुट लागते. माणसाचा चेहरा नेहमीच त्याच्या अंतरंगाचा आरसा असत नाही हे खरं आहे. पण माणसाचे डोळे बरेचदा त्याच्या मनाचं प्रतिबिंब अतिशय नेमकेपणाने दाखवतात. जेव्हा एखाद्या माणसाची आपल्या मनातली प्रतिमा आणि त्या माणसाच्या डोळ्यातलं हे प्रतिबिंब एकमेकांशी जुळतं तेव्हा रेझोनन्समुळे तंबोऱ्याची षड्जाची तार वाजवल्यावर तिच्या शेजारची तार आपोआप झंकारून उठावी, तसं काहीसं मला होत असतं. भा. रा. भागवत आणि किशोर कादंबरीकार सुधाकर प्रभू या दोन साहित्यिकांना प्रत्यक्षात भेटायचं भाग्य मला लाभलं. भागवत आजोबांचे डोळे त्यांच्या लेखनासारखेच खट्याळ आणि बोलके होते. सुधाकर प्रभूंचे डोळे शांत होते. संयमी माणसासारखे. पुलं माझे आराध्यदैवत असले तरी त्यांना ’प्रतेक्ष’ पाहण्याचं भाग्य कधीच लाभलं नाही. पण पुलंच्या मुद्रेवर भरून राहणारा अतिशय खोडकर भाव आणि त्यांच्या डोळ्यांमधे असणारी ती थोडीशी व्रात्य, थोडीशी समोरच्याची ’कशी गंमत केली’ अशी चमक त्यांच्या फोटोमधूनही जाणवते. पी जी वुडहाउसचा फोटो विकीपीडियावर पाहिल्यावर मला सगळ्यात आधी जर काही जाणवलं असेल तर त्याचे डोळे. अशाच एका निर्मळ पण खोडकर आनंदाने चमकणारे त्याचे डोळे आणि त्या डोळ्यांमधली ती तेजस्वी चमक. आजही वुडहाउस म्हटलं की मला त्याचे ते तेजस्वी आणि आनंदाने लुकलुकणारे डोळेच आठवतात फक्त. शांताबाईंचे डोळे मात्र, त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय शांत वाटतात. अनुभवाने आलेलं एक पोक्तपण आणि तरीही निष्कपट सुसंस्कृत मनाचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात तेवताना दिसतं आणि त्यांच्याकडे बघतच रहावंसं वाटतं.

शांताबाईंचं हे सुसंस्कृतपण त्यांना देवानेच दिलं असावं. कारण त्यांच्या लेखनात ते अगदी सहजपणाने जाणवतं. तसा सुसंस्कृतपणा हा प्रसिद्ध लेखनाचा एक आवश्यक गुण आहे. तो सभ्यपणापेक्षा वेगळा असतो. सभ्यपणा हा ज्या समाजात आपण वावरतो, त्याचे शिष्टाचार एकदा अंगी बाणवले की बऱ्याच अंशी जमून जातो; पण सुसंस्कृतपणाला सभ्यपणापेक्षाही व्यापक असा एक रंग आहे. या रंगाबरोबरच शांताबाईंच्या सगळ्या व्यक्तिमत्त्वातच एक सौम्य आणि घरंदाज अशी मर्यादशीलता भरून राहिलेली आहे. रघुवंशामधे कालिदासाने दिलीप राजाचं वर्णन करताना तो
’वेलां समुद्र इव न व्यतियुः’

म्हणजे कितीही मोठी भरती आली तरी समुद्र जशी आपली मर्यादा ओलांडत नाही तसा होता, असं म्हटलंय. असंच काहीसं मला शांताबाईंबद्दल विचार करताना वाटतं. ज्या काळात शांताबाई तरुण होत्या, त्या काळात स्त्रिया शिकू लागल्या असल्या तरी त्या शिक्षणाचा अधिकार अजून प्रस्थापित व्हायचा होता. उलट मुलींना शिक्षण मिळतं आहे याबद्दल थोडी कृतज्ञतेचीच, थोडी उपकृत झाल्याची किंवा थोडीशी ’हे आपलं भाग्यच आहे’ अशी भावना त्याकाळच्या स्त्रियांच्या मनात असावी. लहान वयात कर्तृत्ववान वडिलांचं छत्र गमावलेल्या शांताबाईंच्या मनात शिक्षणाबद्दलच्या या भावनेबरोबरच एक सोशिक समजूतदारपणाची, परिस्थितीमुळे आपल्या मानीपणाला मुरड घालावी लागल्याची भावना असावी. अर्थात यापैकी कुठल्याही गोष्टीचा तरंगही त्यांनी आपल्या लिखाणावर उमटू दिला नाही हे खरं. पण तो आपला आब राखून वगण्याचा, टोकाला न जाताही आपल्याला पटतील त्याच गोष्टी करण्याचा आणि थोडासा जननिंदेची पर्वा करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या या आणि इतर पुस्तकांमधल्या लेखनातून कळेल न कळेलसा जाणवतो. एकूणातच ’मधुराधिपतेरखिलं मधुरम्’ असं म्हणतात, तसंच शांताबाईंचं सगळंच शांत, स्निग्ध आणि स्थिर वाटतं. अस्वस्थ, चळवळा किंवा अहंमन्य असा एकही शब्द त्यांच्या लेखनातून उमटत नाही. मला हे सगळं फार अपूर्वाईचं वाटतं. नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन जन्माला आलेली आणि उठता बसता पापड मोडणारी मी अतिशय उतावळी आहे. अशा शांत व्यक्तिमत्त्वांपुढे मला नेहमीच नतमस्तक व्हावंसं वाटतं.

शांताबाईंच्या जन्मजात सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वातलं हे मार्दव त्यांच्या कवितांमधून तर ठायी ठायी प्रकट होतंच होतं. अतिशय तरल असा त्यांचा काव्याविष्कार मनोरम असतोच; पण त्यांच्या गद्य लेखनातही एक प्रकारचा सौम्यपणा आहे, प्रसन्नपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या समाजाबद्दल एक जिवंत कुतूहल त्यांच्या सगळ्या लेखनामधे भरून राहिलेलं आहे. हे कुतूहल म्हणजे भोचकपणा नव्हे. दुसऱ्यांच्या भानगडींमधे नाक खुपसण्याचा आगाऊपणाही नव्हे. एखाद्या लहान मुलाला आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल जे उत्सुकतामिश्रित कुतूहल वाटत असतं, जी अपूर्वाई वाटत असते तेच कुतूहल शांताबाईंच्या लेखनातही जाणवतं. या सगळ्याला त्यांच्या अनुभवाचीही जोड मिळालेली आहे. लेखनातल्या उल्लेखांवरून हे लेखन त्यांच्या निवृत्तीच्या काळात केलेलं आहे. हे पुस्तक १९९३ - ९४ च्या सुमाराला पहिल्यांदा प्रकाशित झालं. त्यावरून त्याच काळात मागे कधीतरी हे लेखन केलेलं आहे हे नक्की. कदाचित त्यामुळेच एका सुजाण वार्धक्याचा एक तृप्त आविष्कार त्यात आहे.

शांताबाईंच्या वाचनाचा आवाका अतिशय मोठा. आणि संस्कृत-मराठी साहित्याचा व्यासंगही सखोल. शिवाय वेळोवेळी पाहिलेले अनेक उत्तम चित्रपटही त्यांना नेमके आठवतात. यावरून आठवलं, ’पश्चिमरंग’ नावाच्या एका पुस्तकामधे बाईंनी त्यांच्या अनेक वर्षे स्मरणात राहिलेल्या काही इंग्रजी चित्रपटांच्या कथा सांगितलेल्या आहेत. त्यांच्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीमुळे ते पुस्तक वाचकाला अगदी खिळवून ठेवते. या सर्व गोष्टी अनुभवताना, त्यांच्याबद्दल केलेलं सखोल चिंतन आणि अंगात मुरलेली रसग्राही आस्वादकाची वृत्ती यांच्यामुळे बाईंच्या चिंतनाचा परीघ अतिशय विस्तृत झाला आहे. आणि अगदी लहानपणी पाळलेल्या बोक्यापासून , शाळेतल्या सहलीपासून ते पार सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या निवांतपणे केलेल्या पुस्तकवाचनापर्यंत अनेक लहानमोठ्या गोष्टीतून आपल्याला त्यांचं हे चिंतनशील मन जाणवत राहतं. या चिंतनाचे काही अमूल्य थेंब आपल्यालाही मिळतात. हातचं काहीही न राखता कमालीच्या सहजतेने त्या त्यांचं अनुभवविश्व आपल्यासमोर खुलं करतात आणि त्या विश्वातल्या अनेक रंजक गोष्टींचा खजिना पाहून मला दर वेळी थक्क व्हायला होतं. हे पुस्तक मला भेट देणाऱ्या मित्राच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मैत्रिणीसारख्या आजीशी किंवा आजीच्या मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखंच वाटत राहतं पुस्तक वाचताना.

या पुस्तकातले अनेक लेख पुन्हा पुन्हा वाचावेत असेच आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर ’जेथे जातो तेथे’, ’पोरकी पुस्तके’, ’मानवी प्राणांचे मोल’, ’फसवी दारे’, ’हेमाला मुलगी झाली’, अशी काही नावे घेता येतील. मला यात सगळ्यात जास्त आवडलेला लेख म्हणजे ’ आही चुकी’. कधी समाजापेक्षा वेगळं वागणाऱ्या तर कधी इतर माणसांपेक्षा कमकुवत तर कधी काहीतरी व्यंग असलेल्या माणसांच्या बाबतीत समाज जो ’आता आलाच आहे नशिबी तर नेऊ ओढत’ असा भाव घेऊन वागतो, त्या भावाचं जे दर्शन त्या घडवतात ते अतिशय मार्मिक आणि डोळे उघडायला लावणारं आहे. साध्या साध्या गोष्टी, आजूबाजूला घडणारे साधेच प्रसंग, पण त्यांची सांगड घालून बाई जो कॅलिडोस्कोप आपल्या समोर उभा करतात तो केवळ बघतच रहावा असा असतो. आणि आही चुकी हा त्या कॅलिडोस्कोपमधला एरवी दुर्लक्षिलेला, बेरंगपणामुळे टाळला गेलेला पण तितकाच खरा आणि काहीसा अपरिहार्यपणे जाणवणारा आविष्कार आहे. आही चुकी पहिल्यांदा वाचल्यावर माझ्या अंगावर सरसरून आलेला काटा अजून आठवतो आहे मला. तसेच मानवी प्राणांचे मोल वाचताना अंगावर उभे राहिलेले रोमांचही कधी न विसरता येण्याजोगेच आहेत.

’क्लिफ्टन वेब’ या अमेरिकन विनोदी अभिनेत्याने स्वतःबद्दल काढलेले ’wherever I go, I go too and spoil all the fun’ हे उद्गार घेऊन सुरू झालेला ’जेथे जातो तेथे’ हा लेखही असाच पटून जातो. वास्तविक तुकोबांनी विठ्ठलाला म्हटले होते, की मी जिथे जातो तिथे तू माझ्या सोबतीला असतोसच. पण या लेखात मात्र, जिथे जाऊ तिथे आपली सुख दुःख , काळज्या, विषाद बरोबर घेऊन जाण्याच्या आणि त्यामुळे पुड्यातला प्रसंग पूर्णपणे पाहूच न शकणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या सवयीवर त्यांनी अगदी मार्मिकपणे बोट ठेवले आहे. सामान्य माणसे त्यांच्या या ’इनर्शिया’ मुळे आयुष्यातल्या साध्यासुध्या आनंदांनाही कशी पारखी होत असतात हे वाचताना, 'अरे ही तर आपलीच गोष्ट आहे!', असं म्हणून टाळी वाजवावीशी वाटायला लागते; आणि स्वतःचीच ही नवी ओळख लक्षात आल्यावर एकीकडे स्वतःचं हसूही येत असतं.

’पोरकी पुस्तके’ हाही एक असाच अस्वस्थ करून जाणारा लेख आहे. आधी आपल्यासारख्या वाचनवेड्यांसाठी पुस्तके ही मर्मबंधातली ठेव असते. आणि एखाद्या पुस्तकाच्या वाईट स्थितीबद्दल वाचलं तरी मनावर ओरखडा उमटतो. शांताबाईंनी यात दुर्दैवाचे दशावतार पाहिलेल्या आणि काळाच्या सर्वशक्तिमान पंजात सापडून नष्टप्राय झालेल्या काही पुस्तकांबद्दल लिहिले आहे. आपण जिवंत असताना आपला पुस्तकसंग्रह अपण अगदी जिवाभावाने जपत असतो. पण अशा पुस्तकांचा मालक अनंताच्या यात्रेला निघून गेल्यानंतर पुस्तकांची आबाळ होते. किडे, वाळवी आणि मग जुन्या बाजारात विक्री असे भोग त्यांच्या नशिबी येतात. या भोगांची कथा शांताबाई यात सांगतात. जुन्या बाजारात विकत घेतलेल्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर असलेल्या सह्या, देणाऱ्याची / घेणाऱ्याची नावे, या देवघेवीला निमित्त्त ठरलेले प्रसंग यांचीही एक किनार या लेखाला आहे. तरीपण हा लेख अस्वस्थ करून जातो. खूप वाईट वाटते. काही महिन्यांपूर्वी माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यांनाही अशी पुस्तके जमवायचा छंद होता. परवा त्यांची काही जुनी पुस्तके घर आवरताना अचानक सापडली. पुस्तकांच्या पहिल्याच पानावर त्यांच्या हस्ताक्षरातले त्यांचे नाव वाचले आणि मला या लेखाची आठवण झाली एकदम. पोरक्या पुस्तकांबद्दलचा हा लेख आता मला जास्तच जिव्हाळ्याचा वाटतो.

'सांगावेसे वाटले म्हणून' या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाबद्दलच असं कायकाय लिहिता येईल. अर्थात पदार्थाची चव, सुराची आस आणि एखाद्या दृश्याची परिणामकारकता यांच्याबद्दल वर्णन करून कितीही सांगितलं तरी त्याचा फार उपयोग होत नाही. तहानलेल्या माणसाला पाण्याचं वर्णन ऐकवून त्याची तहान भागते थोडीच! मॅट्रिक्स चित्रपटात म्हटल्याप्रमाणे ’there is a difference between knowing the path and walking the path’ त्यामुळे, हे पुस्तक प्रत्यक्ष स्वतःच वाचून त्याचा आस्वाद घेणे हेच सगळ्यात उत्तम आहे असे मला वाटते. या पुस्तकातला प्रत्येक लेख नवा आहे. एका नव्या, संपूर्ण नवीन विचाराला चालना देणारा आहे. प्रत्येक लेखाचं स्वतंत्र वैशिष्ठ्य आहे. वाचणाऱ्याच्या मनात कुठल्या लेखाने कुठले तरंग उमटतील हे वाचकावर अवलंबून असलं तरी एकदातरी हे पुस्तक वाचावंच असं निश्चित आहे. संस्कृत नाटककार भवभूति म्हणाला होता की मला जे कोणालातरी सांगावंसं वाटतं आहे ते मी लिहिलं आहे. कुठेतरी कधी तरी असा वाचक जन्माला येईल, ज्याला माझं सांगणं समजेल. इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला भवभूति काय, केशवसुत काय किंवा शांताबाई काय, या लोकांनी आपल्यासाठी केवढं काही सांगून ठेवलं आहे. ते वाचणं आपल्या हातात आहे.

या पुस्तकाने मला अमाप आनंद दिला. खूपसं सत्त्व दिलं. हा परिचय वाचून इतर कोणाला आनंद मिळाला, तर ते या टंकलेखनचं फलित असं मी समजते.
अधिक काय लिहिणे?
राजते लेखनावधिः॥

--अदिति
१९.१०.१०
आश्विन शु. १२ शके १९३२
(पूर्वप्रकाशित)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. तुम्हाला मनापासून आवडलेल्या पुस्तकाविषयी खूप मनापासून लिहिलेला वाटला. ललित लेखन वाचताना लेखकाची शैली, त्याचा दृष्टीकोन, त्याच्या अनुभवांतलं आणि ते विषद करण्यातलं वैविध्य याच बरोबर त्या लेखकाच्या अनुभवाशी आपलं तादात्म्य पावणंही तितकंच महत्वाचं असतं असं मला वाटतं. म्हणूनच काही पुस्तके आणि लेखक आपल्याला अधिक आवडतात, यावर तुम्ही नेमकं बोट ठेवलं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा एखाद्या माणसाची आपल्या मनातली प्रतिमा आणि त्या माणसाच्या डोळ्यातलं हे प्रतिबिंब एकमेकांशी जुळतं तेव्हा रेझोनन्समुळे तंबोऱ्याची षड्जाची तार वाजवल्यावर तिच्या शेजारची तार आपोआप झंकारून उठावी, तसं काहीसं मला होत असतं.

तुम्ही Entanglement या Quantum Physics मधील संकल्पनेची आठवण करुन दिली.

’वेलां समुद्र इव न व्यतियुः’

आपूर्यमाणं अचलप्रतिष्ठं समुद्रमापं प्रविशन्ति यद्वत... स्थितप्रज्ञाची लक्षणे हो...

भा.रा. भागवत आपले पण Childhood Hero.. तुम्हाला प्रतेक्ष भेटले म्हंजी तुमचं भाग्य लई थोर म्हणायचं की!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समानधर्मी आनन्दतीलच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख अतिशय आवडला. aphorism नावाचा प्रकार असतो. शांताबाईंच्या लिखाणाकडे पहाताना त्या प्रकाराचं नाव सतत डोळ्यासमोर येत होतं.

शांताबाईंनी ललितलेख/लघु निबंध/स्फुटलेखन हा प्रकार फारच छान लिहिलेला आहे. त्यांच्या या लिखाणाला वाहिलेला हा ट्रिब्युट सुद्धा चपखल वाटला. सुरेख लिखाणाबद्दल अदिती यांचे अभिनंदन.

अवांतर : अदिती यांना आणि शांता शेळके यांचे कुणी इतर फॅन्स असतील त्यांना प्रश्न : शांताबाईंचा वसंत पवारांवरचा - किंवा वसंत पवार यांचा मार्मिक उल्लेख असलेला - लेख कुठल्या पुस्तकात आहे ? लेखातला प्रसंग : मद्यप्राशन करून बाईंच्या घरी आलेले आणि तरीही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा न सोडलेले पवार. "और वोही किनारा हो गया" असे शब्द असलेला शेर पवार बाईंना सांगतात. शब्दांत पकडता न येणारी विषण्णता त्यांच्यातून व्यक्त होते.असा काहीसा प्रसंग आहे. हा लेख मी वीसेक वर्षांपूर्वी वाचला आणि आता मला तो मिळत नाही. कुणाला माहिती असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझ्याकडे तो लेख आहे. पुस्तकाचं नांव आत्ता आठवत नाही, पण नंतर कळवतो...
कलोआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अगदी कालच ते पुस्तक चाळण्याचा प्रसंग आला, आणि नेमका वोही किनारा हो गया वाला शेर वाचला. सध्या टेबलावरच आहे ते पुस्तक. योग्य मोबदला मिळाल्यास पुस्तक धाडण्यात येईल. Wink

बाकी मूळ लेख अप्रतिम झालेला आहे. एखाद्या पुस्तकाची ओळख कशी करून द्यावी याचा आदर्श नमुना. पुस्तकातून लेखिकेचं काय चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहातं, ते आपल्याला कसं आणि का भिडतं - या वाचनानुभवाच्या मुळाशी जाणाऱ्या मुद्द्यांचं वर्णन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाचं नाव 'वडीलधारी माणसे'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख पूर्वी एकदा (आनि नंतर परत परत )वाचला होता. आज परत वाचला. अतिशय आव्डीचा लेख आहे. एक हा आणि नंदन यांचा पुनर्वाचनाय हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख अगदी मनापासून एकरुप होउन लिहिला आहे.
मला एक जण भेटला होता. तो शांता शेळके आणि बहिणाबाई चौधरी यांच्यात गल्लत करत होता असे लक्षात आले. "अशिक्षित असून काय सुंदर कविता केल्यात हो!" असे म्हणत होता. मी त्याचा गैरसमज दूर केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

"...हा परिचय वाचून इतर कोणाला आनंद मिळाला, तर ते या टंकलेखनचं फलित असं मी समजते...."

~ नक्कीच. हा धागा वाचणार्‍या प्रत्येक सदस्याला वाचनाचा किती आनंद झाला आहे हे त्यांच्या प्रतिसादातील भाषेवरून समजतेच. फार थोडे असे साहित्यिक असतील की ज्यांचे नाव उच्चारताच रसिकाच्या मनी 'मंगल' च येते. शांताबाई शेळके अशा काही भाग्यवंतापैकी ज्येष्ठ नाव. बाईंच्यातील सर्वात मोठा गुण कुठला असेल तर त्यांची अमोघ स्मरणशक्ती. कोल्हापूरातील "करवीर नगर वाचन मंदिर' इथे मी बाईंचे 'वि.स.खांडेकर व्याख्यानमाले'त भाषण ऐकले होते. कुठेही कसलेही टीपण समोर नसतानाही आचार्य अत्रे यांच्याकडील उमेदवारीच्या वर्षापासून ते नागपूरचे हिस्लॉप कॉलेज ते पुणे हे कायमच्या वास्तव्याचे ठिकाण होईतो झालेला नोकरी आणि लिखाणाचा प्रवास सांगताना त्या सांगत असलेल्या तारीखवार माहितीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. स्मरणशक्ती आणि मराठी (आणि संस्कृतही) भाषेवरील त्यांची हुकूमत या दोन गुणवैशिष्ट्यांनी त्यानी आपली साहित्य कारकिर्द भरभरून टाकली. [मला वाटते मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने त्या एम.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.]

अजूनही काही पुस्तकांत रुपांतर होऊ शकेल इतके लिखाण त्यानी आपल्या पश्चात मागे ठेवले आहे. त्या सार्‍या अप्रकाशित साहित्यासाठी ट्रस्टी म्हणून डॉ.अरुणा ढेरे काम पाहतात. त्या जरूर शांताबाईंच्या उर्वरित साहित्याला प्रकाशात आणतील....आणि तसे आणले गेले तर ती मराठी भाषेच्या वृद्धीसाठी एक अनमोल देणगी ठरेल यात शंका नाही.

[अवांतर : अतिशय यशस्वी धंदेवाईक दृष्टी ठेवणारे म्हणून मेहता प्रकाशन गृहाकडे पाहिले जाते. मेहताच्या टीमनेच शांताबाईना कित्येक पुस्तकांसाठी लिहिते केले होते....'सांगावेसे वाटले म्हणून...' हे पुस्तक त्याच प्रयत्नाचे एक फलीत होय. काही प्रकाशक असे आवर्जून कार्य करीत असतील तर ते अभिनंदनीय कार्य म्हणावे लागेल, असे अदिति यांच्या पुस्तक परिचयाच्या धाटणीवरून नक्की म्हणता येते.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
<< खूपसं सत्त्व दिलं.>> हे मात्र कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनापासून केलेले हे लिखाण खूप आवडले. पुस्तकांविषयी वाचायला पुस्तके वाचण्याइतकेच आवडते. शांताबाई शेळके हे नावही विशेष आवडीचे. एकूण बासुंदीत केशर.
शांताबाईंच्या स्मरणशक्तीबद्दल श्री. अशोक पाटील यांनी केलेले भाष्य नेमके आहे. शांताबाईंना अक्षरशः शेकडो कविता मुखोद्गत होत्या. सुनीता देशपांडे एखादा संदर्भ अडला की शांताबाईंकडे जात, यातच मला वाटते सगळे आले. शांताबाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा असताना (माझ्या समजुतीत गल्लत होत नसेल तर) त्यांनी पुढ्यात एकही कागद न घेता दीर्घ आणि मुद्देसूद भाषण केले होते. एकूण खानदानी व्यक्तिमत्व. हा लेखही तसाच गुणी वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेख अप्रतिम सुन्दर आहे. संवेदनाक्षम,मार्मिक विश्लेषण,भाषेचा सहज ओघ आणि समृद्धता ह्यामुळे हे समीक्षण लेखांबरोबर शांताबाईचेही व्यक्तिमत्व उलगडतो. 'सांगावेसे वाटले म्हणून' अजून वाचले नाही. नक्कीच वाचीन. लेख बहुदा वाचण्यात आले असतील."पोरकी पुस्तके"मधली व्यथा भिडणारी आहे.आतापर्यंत विचार केला नव्हता पण मृत्युपत्रात मराठी पुस्तकाचीही तरतूद करीन.:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान झालाय लेख. वाचक म्हणून लिहिणा-याशी तुमचं नातं तयार होतं ते लेखात दिसतं. आतनं लिहिलय. तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या अनुभवावर नेता पण वाचणा-यालासुध्दा तुमच्या लेखनात शिरु देता.

शांता शेळकेंचं लेखन वाचून मला बरेच दिवस झाले. मला त्या काळातल्या लिहिणार-यां शांताबाईसारख्यांबद्दल बुट्टीभर आदर वाटतो कारण तेंच्यासारख्या जगण्यातल्या प्रसन्नपणावर तेवढ्याच प्रसन्नपणे लिहितात. भाषेतलं मार्दव आनंद देणारेच असते. वाचकांनी आकळावे आणि त्याचा आनंद घ्यावा यासाठी लिहितात. आपण सांगितलेल्या लेखांची नांवे वाचली तरी हे ध्यानात यावं. आताच्या सिनिसिझमच्या काळात ‘कमी ओळखीचे’, ‘रोमॅंटीक’ वाटावे असेच हे साहित्य.

तुम्ही या पुस्तकाबद्दल जसा आनंद घेतलात तसा आनंद मीही सध्या ‘झिम्मा’ या विजया मेहता यांच्या आत्मचरित्राचा घेतोय.

जाता जाता, एक विचारायचय. ‘शारदेच्या उपासिनीने’ या मधे ‘उपासिना’ हे मराठीत वापरले जाते? मी घरातल्या शब्दकोशात (अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, सं. द. ह. अग्निहोत्री, व्हिनस प्रकाशन) बघितलं. उपासक, हे, पुरुषलिंगी नाम आहे. त्याचे स्त्रीलिंगी रुप. उपासिक व्हायला पाहिजे काय?

हे असच विचारलं. हा मुद्दा उपस्थित केला तरी तुमच्या लेखाचे सांगितलेपण तसुभरही कमी होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय अदिती यांच्या या लेखाची भुरळ पडूनच, भारतवारीत "सांगावेसे वाटले म्हणून" नावाचा शांता शेळके यांचा ललीतसंग्रह विकत घेतला आहे. फारच आवडला. विशेषतः मोनालिसा वाली गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

परीक्षण खूप म्हणजे खूपच आवडलं. आवडत्या लेखिकेच्या, आवडत्या पुस्तकाचं परीक्षण म्हटल्यावर उत्सुकता होती, आणि अपेक्षाही खूप होत्या. त्या अपेक्षांना पुरून उरलंय, म्हणण्यापेक्षा, माझ्या अपेक्षाच किती फुटकळ होत्या ते जाणवलं, इतकं हे अपेक्षेबाहेर म्हणजे एकदम बाहेर आवडलंय. Smile "आही चुकी" , "जेथे जातो तेथे" आणि "हळवी दुखरी जागा" हे माझेही अतिशय आवडते आहेत.
"हे पुस्तक संपल्यावर इतक्या जिव्हाळ्याचं असं काय वाचायला मिळणार याची भ्रांत त्याच्या पाठीमागे होती" - अगदी पटलंय, आणि "गप्पांच्या मैफलीची" सहजता, हे ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हळवी दुखरी जागा त्या चीनीमातीच्या कपांची गोष्ट .... उफ्फ अप्रतिम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हे पुस्तक वाचलं आहे. त्यावरचा हा अदितीचा लेख म्हणजे, 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' या काव्यपंक्तीची आठवण करुन देणारा आहे. पुस्तक वाचलं, आनंदाने डोळे पाणावले (हल्ली म्हातारपणी होतं असं), तरी इतक्या सुंदर शब्दांत त्याची ओळख करुन देणं, हे नाही जमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाचायचंय हे पुस्तक आता. अदितीशी कधी प्रत्यक्ष भेटले नाही, पण फोनवरून एकदोनदा बोलणं झालं होतं त्याची आठवण झाली. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

खुप सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0