"मी बोलत नाही..." लेखकाला २०१२ चे नोबेल प्राईझ

पाच-सहा वर्षापूर्वी [ज्यावेळी चीनमध्ये बिजिंग ऑलिम्पिक्सचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती] याहू-क्वेशन्सअन्सर्स प्लॅटफॉर्मवर माझी एका चिनी शिक्षकाशी ओळख झाली, वाढलीही आणि त्या ओळखीचे रुपांतर मग ई-मेलिंगमधून दोन्ही देशाच्या सांस्कृतिक-साहित्य-क्रीडा यासारख्या विषयावरील घडामोडीवर आम्ही सविस्तर पत्रे लिहिण्यात झाले [राजकारण विषय आम्ही वर्ज्य मानला होता]. सदरमजकूर शिक्षक हे चीनच्या शॉनडॉन्ग Shandong - प्रांतातील एका हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवित...आजही आहेत. बिजिंग ऑलिम्पिकच्या तयारीविषयी मेल्समधून चर्चा होणे स्वाभाविकच होते, पण एकदा त्यानी 'झ्यांग यिमाऊ' या मनोरंजन क्षेत्रातील एका व्यक्तीचा उल्लेख करून सांगितले की ऑलिम्पिक ओपनिंग आणि क्लोसिंग सेरेमनीच्या सार्‍या तयारीची जबाबदारी या व्यक्तीकडे दिली असून या शिक्षकाच्या शाळेतील ६ विद्यार्थी-विद्यार्थिनी कोरससाठी निवडल्या गेल्या आहेत. झ्यांग यिमाऊ हे नाव माझ्या काहीसे परिचयाचे वाटले म्हणून मी त्याना यिमाऊविषयी जादाची माहिती विचारली तर असे समजले की चायनीज चित्रपटसृष्टीतील ते एक फार मोठे आदराचे नाव आहे. त्यांच्या Red Sorghum या चित्रपटाला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळाले होते. त्या खुलाशावरून पटकन लक्षात आला हा गाजलेला चित्रपट, जो मला पाहता आला होता. या कादंबरीच्या कथानकाविषयी शिक्षकमित्रासमवेत चर्चा झडली... विशेषतः नायिकेचा पती 'महारोगी' असणे...फसवून लग्न करून दिलेले असते. आपल्याकडील पेंढार्‍यांसारखे काही लुटारू या नायिकेचे रेड वाईनच्या शेताची लूट्मार करतात आणि जाताजाता तिच्यावर बलात्कारही करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी तिने 'माझा पती महारोगी आहे' असे सांगितल्यावर त्या लुटारूंने तिथून पळ काढणे....आदी बाबी वाचल्यावर वाटू लागले की हे शक्य आहे असे वर्णन मराठी साहित्यात ? - Sorghum म्हणजे एक प्रकारची चायनिज वाईन....आणि हा चित्रपट ज्या कादंबरीकाराच्या कृतीवर बेतला होता त्यांचे नावही ध्यानात आले - "मो यान" [चिनी अर्थ...."मी बोलत नाही"].

आज या 'मी बोलत नाही' लेखकामुळे सार्‍या चीनमध्ये आनंदाची लहर पसरली गेली आहे....दुपारी स्वीडिश अ‍ॅकॅडेमीने २०१२ सालातील साहित्याचे प्रतिष्ठेचे असे 'नोबेल प्राईझ' मो यान या ५७ वर्षीय चिनी लेखकाला जाहीर केले आहे. गेली कित्येक वर्षे जास्तीतजास्त युरोपिअन लेखकांनी नोबेल जिंकण्याची परंपरा निर्माण केली होती, ती आज आशिया खंडातील एका अशा लेखकाने खंडीत केली आहे की ज्याच्या लिखाणाचे मूळ वा धाटणी आपल्याकडील व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा लेखकांच्या साहित्यकृतीमध्ये आपणास सापडते. लोककथा, मातीचा आणि तिथे राबणार्‍या शेतकरी कुटुंबांचा इतिहास तसेच जगण्याचा त्यांचा झगडा ह्या घटकांना आपल्या मनी ठेऊनच आपल्या साहित्याची निर्मिती करणार्‍या चीनच्या या भूमिपुत्राला मिळालेला हा सर्वोच्च सन्मान म्हणजे 'लोककथे' चे महत्व विशद करण्याचीच अभिनंदनीय घटना होय. [आपल्याकडील राजस्थानचे विजयदान देठा यांचे नावही गेल्या वर्षाच्या अपेक्षित विजेत्यांच्या यादीत होते, ते हुकले., तरी देठा यांचे साहित्यही हे 'लोककथा' माध्यमाशी जवळीक धरते....अमोल पालेकर यांचा 'पहेली' चित्रपट श्री.देठा यांच्याच लोककथेवर आधारित होता.]

विशेष म्हणजे नोबेल अ‍ॅकॅडमीने पुरस्कार जाहीर करण्याच्या अगोदर मो यान यांची ते स्वीकारण्याची इच्छा आहे का ? अशी पृच्छाही केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते, त्याला हर्षभराने मो यानी रुकार दिला...इतकेच नव्हे तर मी काहीसा धास्तावलोही आहे...' असेही ते विनयाने म्हणाले. चीनच्या साहित्य विश्वात खर्‍या अर्थाने मो यान हे प्रथम नोबेल विजेते ठरतात. जरी तांत्रिकदृष्ट्या गेव झियान्गजीन या जन्माने चिनी असलेल्या लेखकाला सन २००० चे नोबेल प्राईझ मिळाले असले तरी चीन सरकारने तत्पूर्वीच त्याची देशातून हकालपट्टी केली असल्याने गेव यानी फ्रेन्च नागरिकत्व पत्करून त्या देशाचे प्रतिनिधी म्हणूनच त्यानी नोबेल स्वीकारले होते. चीन सरकारने त्यांचे ते पारितोषिक आपल्या देशाच्या नावासोबत लावण्याचेही नाकारले आणि चिनी खंबीरपणाच्या प्रथेनुसार थेट स्वीडिश अ‍ॅकॅडमीलादेखील त्यांच्या प्राईझ दप्तरात 'चिनी लेखकाला नोबेल' असा उल्लेख करू नये असे कळविले होते. पण आज जाहीर झालेल्या मो यान यांच्याबाबतीत तसे काही घडण्याची बिलकुल शक्यता नाही, इतके ते लहानापासून मोठ्यापर्यंत लोकप्रिय असे लेखक आहेत.

या निमित्ताने थोडेसे 'मो यान' यांच्याविषयीही :

जन्म १९५५ चा, शान्डॉन्ग प्रांतातील एका शेतकरी कुटुंबात [माझ्या शिक्षक मित्राच्या वास्तव्याचा हा भाग, त्यालाही आज खूप आनंद झाला असणार याची खात्री आहे...आमच्या पत्रात मो यान हे नाव दोन वेळा चर्चेत होतेच]. मूळ नाव ग्वान मोये. मात्र लेखनकार्यासाठी मोये यानी 'मो यान' असे नाव घेतले. चिनी भाषेमध्ये या नावाचा अर्थ होतो ~ "बोलत नाही". त्याला कारण असे की, हा लेखक चारचौघात चर्चेच्यावेळी काहीप्रसंगी 'जादा' बोलत असे आणि त्यामुळे गटात त्याच्याविषयी कटू मत तयार होई. ही बाब आपल्या लेखनछंदाला बाधा आणणारी शाबीत होईल या भीतीपोटी मग मोये यानी 'मी बोलत नाही' हे टोपण नाव घेतले...आणि आपली पहिली कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. चिनी सैन्यातही यानी उमेदवारी केली असून ग्रामीण आणि शेतकरी चीन रंगविणार्‍या त्यांच्या लघुकथांना चीनमध्ये हळूहळू लोकप्रियता लाभू लागल्यावर त्यानी कादंबरीलेखनाचे मनावर घेतले आणि त्यांच्या Red Sorghum ह्या चिनी शेतकरी कुटुंबाच्या झगड्यावर आधारित कादंबरीने चिनी साहित्यक्षेत्रात लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. याच कादंबरीवरील बेतलेल्या आणि वर उल्लेख केलेल्या चित्रपटानेही मो यान हे नाव युरोप आणि आशिया खंडातील साहित्यक्षेत्रात पोचले.

मो यांच्या अन्य साहित्यकृतींचेही सर्वत्र स्वागत झाले असून समीक्षक त्यांच्या लेखनशैलीला वास्तववादी चिनी जादू अशा योग्य शब्दात नेहमी गौरवितात.

मो यान यांचे अभिनंदन करताना मला आपल्या मराठी साहित्यातील अशाच विषयावर जातिवंत लिखाण करणारे व्यंकटेश माडगूळकर प्राधान्याने आठवतात आणि खंत वाटत राहते की जसे मो यांच्या साहित्याला इंग्रजीत आणण्यासाठी जसे समर्थ भाषांतरकार लाभले तद्वतच आमच्याकडील ग्रामीण लेखकांच्या साहित्याला लाभले असते तर या भाषेलाही 'नोबेल प्राईझ'चा मान जरूर मिळाला असता.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

अशोक काका एकदम सुंदर लेख आणि माहिती.
नोबेल योग्य हातांत यावेळी आले असे म्हणता येईल. Smile

लेखाचा शेवट तर अप्रतिमच.

खंत वाटत राहते की जसे मो यांच्या साहित्याला इंग्रजीत आणण्यासाठी जसे समर्थ भाषांतरकार लाभले तद्वतच आमच्याकडील ग्रामीण लेखकांच्या साहित्याला लाभले असते तर या भाषेलाही 'नोबेल प्राईझ'चा मान जरूर मिळाला असता.

दुर्दैवाने कटू असले तरी ते सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मो यान यांचे हार्दिक अभिनंदन!
त्यांच्याबद्दल काहिच माहिती नव्हती. या धाग्यामुळे बरीच नवी माहिती मिळाली.

"मो यान" यांचे लेखन कोणी मराठीत आणले आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>Sorghum म्हणजे एक प्रकारची चायनिज वाईन

माझ्या माहितीनुसार ज्वारी ज्या प्रजातीत आहे ती प्रजात सोरघम म्हणून ओळखली जाते. चित्रपटात दिसणारं पीकही ज्वारीसारखं होतं असं अंधुक आठवतंय. त्यापासून दारू बनवली जाते हे खरंच आहे.

मो यांच्या निवडीबद्दल एक टीकेचा सूरदेखील आहे तो इथे लक्षात घ्यायला हवा. मो यान हे चिनी सरकारविरोधात बोलायला कचरतात आणि सरकारचं लांगूलचालन करतात असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातंय. उदाहरणार्थ, जेव्हा चिनी सरकारनं तुरुंगात टाकलेल्या लिऊ झियाबो यांना शांततेचं नोबेल मिळालं होतं तेव्हा त्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं; किंवा चिनी सरकारला विरोध करणारे लेखक २००९च्या फ्रँकफुर्ट ग्रंथ जत्रेत होते म्हणून त्यांनी तिथे जाणं टाळलं. 'कलेनं साम्यवादाची सेवा कशी करावी' याचा धडा देणारं माओचं भाषण १०० चिनी लेखकांनी आपल्या हस्ताक्षरांत लिहून काढण्याचा एक सोहळा नुकताच पार पडला. त्यातही मो यांनी भाग घेतला होता. सरकारवर टीका केल्यामुळे छळ होत असलेला कलाकार ऐ वैवै यानं मो यांच्याविषयी म्हटलं आहे की कम्युनिस्ट पार्टी सांगेल तसे ते वागतात आणि बुद्धिवाद्यांनी आपलं स्वातंत्र्य जपावं या भावनेविषयी त्यांना आदर नाही. गाओ किंवा लिऊ यांना नोबेल देताना नोबेल समितीनं जे धाडस दाखवलं होतं ते या निवडीत नाही, असा हा एकंदर सूर दिसतो.

या पार्श्वभूमीवर 'मी बोलत नाही' हे नाव बोलकं वाटतं.

प्रतिसाद अद्ययावतः आताच वाचलेल्या वृत्तानुसार मो यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याचं समजल्या नंतर त्यांनी 'लिऊ यांना लवकरात लवकर मुक्तता मिळावी' असं वक्तव्य केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'टेकिंग साईड्स'बद्दल लिहा ना थोडं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थॅन्क्स चिं.जं....

तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे फार गरजेचे आहे...कदाचित हे उत्तर दीर्घही होऊ शकेल....तरीपण.

रशिया आणि चीन या देशातील राज्यव्यवस्था जशी आहे तशी तिथल्या जनतेने अगदी जशीच्यातशी स्वीकारली आहे असे म्हणणे जरी जड जाणार असले तरी तिथे तुम्हाआम्हाला वा लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असलेले अमेरिका आणि काही युरोपिअन्स देशांना त्या राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल वा विरोधात अगदी अधिकारवाणीने बोलता येणार नाही हे तर उघडच आहे. 'तियानन्मेन चौक' उठाव जगभर गाजला असला तरी त्याला खुद्द चीनमध्येच पुढे व्यापकता आली नाही हे त्या चळवळीचे म्हटले तर अपयश होय. लिऊ झियाबो हे तियानन्मेन प्रसंगी जरी चीनमध्ये नसले तरी हा वृत्तांत ऐकल्यावर/वाचल्यावर ते तातडीने बिजिंगला परतले आणि चळवळीचे नेतृत्व हाती घेतले आणि पाच प्रमुख नेत्यामध्ये त्याना चिनी युवक ओळखू लागला ही सत्य घटना होय. सत्तेवर जे सरकार आहे त्यांची [त्यांच्या दृष्टीकोणातून] ही जबाबदारी निश्चितच की 'उठाव' नाहीसा करणे...मग त्याला परकीय लोक 'चिरडून टाकणे' असेही म्हणू शकतात. ज्या चळवळीने चीनची नाचक्की [ती नाचक्की होतीच होती] जगभर झाली....ती चळवळ जरी शमली असली म्हणून तेथील सरकारने त्या चळवळीमागे असलेल्या "इंटुकां"ना माफ केले [वा करावे] असे म्हणता येणार नव्हते हे तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट. त्याचीच परिणती लिऊ यांच्या तुरुंगवासात झाली....आणि तशातच नॉर्वे नोबेल अ‍ॅकेडेमीने त्याना 'शांतता पुरस्कार' दिल्यावर चीनमध्ये प्रक्षोभ होणार हे गृहित धरणे क्रमप्राप्त होय.

इथे त्याच नव्हे तर जगभरातील साहित्यिकांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित झाला आणि लिऊ यांच्या सुटकेसाठी सह्यांची निवेदनांची मोहिम सुरू झाली जिचा तुम्ही उल्लेख केलेला आहेच. प्रश्न असा की ज्या परदेशस्थ लेखकांनी [त्यात रश्दी अर्थातच होते] त्या वा तत्सम पत्रकांवर सह्या केल्या त्यांचे चीन सरकार काय वाकडे करू शकणार होते ? मो यान सारखे स्वदेशी लेखक तशा पत्रकावर सह्या करण्यापासून दूर राहिले आणि सरकारविरोधात गेले नाहीत याचा अर्थ ते 'नेभळट' होतात या विधानाला फारसा अर्थ नाही. मो याना लिऊ यांची भूमिका पसंद नव्हती असाही त्या नकाराचा अर्थ होऊ शकतो....किंवा 'मी बरा आणि माझे लेखनकाम बरे' असा नेमस्त विचारही जर मो यानी केला असेल तर त्याना क्रांतिविरोधकांच्या पंगतीत बसविणे योग्य नाही. 'फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन'ची आपण एकीकडे भलावण करायची आणि दुसरीकडे 'मी माझ्याच मतानुसार वर्तन करीन...' असे म्हणणार्‍या लेखकाचा तो हक्क सोयिस्कररित्या आपण नजरेआड करायचा असे त्यांच्या नकाराकडे पाहिले गेले आहे, असे मला वाटते.

सन २००९ च्या फ्रॅन्कफर्ट ग्रंथ जत्रेच्या संदर्भात तुम्ही लिहिले आहे...."चिनी सरकारला विरोध करणारे लेखक २००९च्या फ्रँकफुर्ट ग्रंथ जत्रेत होते म्हणून त्यांनी तिथे जाणं टाळलं...", या वाक्यावरून त्रयस्थाचा असा समज होण्याची शक्यता आहे की मो यान हे फ्रॅन्कफर्टला गेलेच नाहीत. प्रत्यक्षात ते तिथे जरूर गेले होते, प्रदर्शनाच्या अनेकविध कार्यक्रमात त्यानी अगत्यपूर्वक भागही घेतला होता. त्यावेळी त्यांच्या 'सरकारकडे झुकल्या जात असलेल्या कलाबाबत' त्याना छेडले असता त्यानी दिलेले उत्तर हे त्यांच्या शांत आणि नेमस्त स्वभावाचे द्योतकच मानावे लागेल. ते फ्रँकफर्ट इथेच म्हणाले होते...."Some may want to shout on the street, but we should tolerate those who hide in their rooms and use literature to voice their opinions.". आपल्याकडील आणीबाणी
कालखंडात दुर्गा भागवत यानी सरकार विरोधाचा झेंडा बुलंदपणे फडकाविला होता, त्यामुळे त्यांच्या नावाभोवती निश्चित्तच एक वलय निर्माण झाले होते, पण म्हणून त्या स्थितीला विरोध वा सहमती काहीच व्यक्त न करणारी जी काही लेखक मंडळी होती त्यांना सरकारचे पित्ते म्हणण्यात काय हशील ? शांता शेळके वा इंदिरा संत यांच्यासारख्यांनी 'मी आणि माझी साहित्यसेवा इतपत मर्यादेतच मी राहू इच्छिते...' असे लेखिका म्हणत असतील तर तोही त्याना घटनेने दिलेला अधिकारच आहे.

शांत स्वभावाच्या या ग्रामीण भागातील लेखकाचे नाव ज्यावेळी नोबेल पुरस्काराच्या यादीत चर्चेला आले त्याच वेळी भेटायला येणार्‍या पत्रकार मंडळींना मो यान यानी स्पष्टच सांगून टाकले होते की, "कृपया मला या विषयावर बोलायला लावू नका. कारण मी जे काही बोलेन त्यातील प्रत्येक वाक्यावर हरेक प्रकारे टीका होऊ शकते, जे मला नकोय...". मला वाटते चीन सरकारला त्यांची हीच भूमिका योग्य वाटत असल्याने काल पारितोषिक जाहीर झाल्या क्षणीच 'पीपल्स डेली' या राष्ट्रीय वर्तमानपत्राने त्यांचा यथोचित गौरव करताना 'नॅशनल सिलेब्रेशन' अशी घटना आहे असे तर म्हटलेच आहे, पण पुढे "....a comfort, a certification and also an affirmation — but even more so, it is a new starting point." असे जे भाष्य केले आहे ते त्या देशातील बदलाचे वारे समजले जावे.

बाकी चर्चा काहीही असो...साहित्यच नव्हे तर अन्य गटातील पारितोषिकाबाबत उलटसुलट चर्चा या घडतातच...विशेषतः 'शांतता' च्या बाबतीत तर अनेकदा भुवया वक्र होतात. तरीही व्यक्तीशः मला शेजारी का होईना त्यातील 'साहित्या'चे पारितोषिक इकडे आल्याचे समाधान आहे. या निमित्ताने या खंडात मातीशी इमान राखून लेखन करीत असलेल्या ह्या 'चिनी माडगूळकरा' चे वाचन तरी इकडचा रसिक करील.....[अशी किमान आशा बाळगतो....]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२००५ सालच्या 'बिग ब्रेस्ट्स अ‍ॅंड वाइड हिप्स' या कादंबरीच्या परीक्षणात हे सापडलं -

If Mo Yan wants to remake the rigid mould of Chinese Communist Party-sponsored history with any meaningful degree of literary sophistication, he needs to use a sharper instrument than Big Breasts and Wide Hips. And if he thinks he is paying women a compliment by portraying them as significant for their multiform breasts rather than for their ability to think, reason, or even survive in twentieth-century China, it is a compliment they probably ought to think twice before accepting.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशोकराव,
तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'मो यान' यांची ओळख खूप आवडली. मी त्यांचे एकही पुस्तक अजून वाचले नाही याची खंत वाटत आहे. आता नक्कीच वाचीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

>>सन २००९ च्या फ्रॅन्कफर्ट ग्रंथ जत्रेच्या संदर्भात तुम्ही लिहिले आहे...."चिनी सरकारला विरोध करणारे लेखक २००९च्या फ्रँकफुर्ट ग्रंथ जत्रेत होते म्हणून त्यांनी तिथे जाणं टाळलं...", या वाक्यावरून त्रयस्थाचा असा समज होण्याची शक्यता आहे की मो यान हे फ्रॅन्कफर्टला गेलेच नाहीत. प्रत्यक्षात ते तिथे जरूर गेले होते, प्रदर्शनाच्या अनेकविध कार्यक्रमात त्यानी अगत्यपूर्वक भागही घेतला होता. त्यावेळी त्यांच्या 'सरकारकडे झुकल्या जात असलेल्या कलाबाबत' त्याना छेडले असता त्यानी दिलेले उत्तर हे त्यांच्या शांत आणि नेमस्त स्वभावाचे द्योतकच मानावे लागेल.

मान्य. माझा स्रोत : http://entertainment.time.com/2012/10/11/chinese-novelist-mo-yan-receive...
त्यात एका ब्लॉगवरचं उद्धृत दिलं होतं -

“He withdrew from the 2009 Frankfurt Book Fair to protest the attendance of dissidents Dai Qing and Bei Ling. He’s a vice-chairman of the Chinese Writers’ Association. When asked for his thoughts on the 11-year sentence given to Nobel laureate Liu Xiaobo, Mo said he wasn’t familiar with the situation and wished not to discuss it.”

अधिक माहिती इथे मिळते:
http://www.scmp.com/comment/blogs/article/1056266/appal-nobel-literature...
http://www.zonaeuropa.com/20090915_1.htm

त्यानुसार असं दिसतं की 'हे सरकारविरोधी लेखक जत्रेत आले तर आम्ही तिथे नसू' अशी आडमुठी भूमिका चिनी प्रतिनिधींनी फ्रँकफुर्ट इथे घेतली. चिनी लेखक संघाचे व्हाइस-चेअरमन या नात्यानं मो या प्रतिनिधींत होते. शेवटी संयोजकांनी माफी मागितली आणि प्रकरण निवळलं. म्हणजे पाश्चात्य देशांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या भूमिकेनुसार बोलावलेल्या चिनी सरकारविरोधी लेखकांना तिथे बोलावल्याबद्दल माफी मागण्याची नामुष्की संयोजकांवर आली ती या 'अधिकृत' चिनी लेखकांच्या आडमुठ्या भूमिकेपायी. चिनी लेखकांच्या नेमस्त भूमिकेचं हे प्रतीक वाटत नाही.

लिऊ यांच्याविषयीची भूमिका - आता गंमत अशी आहे की नोबेल मिळेपर्यंत मो यांना कधीही याविषयी ठाम भूमिका घ्यावीशी वाटली नाही, पण त्यामुळे आपल्यावर टीका होते आहे हे लक्षात येताच आता त्यांनी सोयीस्कर (म्हणजे लिऊ यांची सुटका व्हावी अशी) भूमिका घेतली आहे. कधी काय बोलावं आणि बोलू नये यांविषयी इतके सुळसुळीत असल्यावर त्यांच्यावर टीका होणं साहजिक वाटतं.

असो. त्यांच्या निवडीबद्दल फक्त गोड गोड लिहिलं गेलं तर त्याबद्दल जो टीकेचा सूर आहे तो वाचकांच्या लक्षात येणार नाही आणि चर्चा एकांगी होईल असं वाटलं म्हणून हे लिहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||