‘रण-दुर्ग’ : मिलिंद बोकील

‘रण-दुर्ग’
(मिलिंद बोकील - मौज प्रकाशन- १ जानेवारी २०११ - रु.१६०/- पृष्ठे:१७२)

स्वत:चा शोध घेण्यास सुरुवात झाली की माणसाला मध्येच थांबता येतं का? की शोधाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरुच राहते? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवास येणारा ‘मी’, बदलत गेलेला ‘मी’, विखुरलेला ‘मी’... ह्यातला नक्की कोणता ‘मी’ खरा?
‘स्वत:तील बदल समजून घेत जगलं तर असा शोध घेणं शक्य होतं’ हा विश्वास देणार्‍या, मिलिंद बोकील ह्यांच्या ‘रण-दुर्ग’ ह्या लघुकादंबर्‍यांतील नायिका, ‘रण’ची नमिता आणि ‘दुर्ग’ची सुचेता! अवचितपणे उभ्या ठाकलेल्या अवघड क्षणांपासून सुटका करून घेण्याची केविलवाणी धडपड न करता, आल्या प्रसंगांना मोठ्या धीराने सामोर्‍या जाणार्‍या अशा ह्या दोघी! व्यक्तिस्वातंत्र्याच्या, विचारस्वातंत्र्याच्या आणि निर्णयस्वातंत्र्याच्या आड आपलं स्त्रीत्व येऊ न देणार्‍या! हे करता-करता स्वत:ला समजून घेत जगणार्‍या... संकटांना घाबरुन नव्हे तर त्यांना सजगतेने सामोरं जाण्यातून ‘मी’पण आकळतं, त्यातूनच विखुरलेला ‘मी’ गोळा होत रहातो... हे समजून घेणार्‍या!

‘रण’ मधील घटस्फोटित नमिताला, ती नोकरी करत असलेल्या एनजीओची प्रतिनिधी ह्या नात्याने भूकंपग्रस्त भागात अचानक जावे लागण्याची वेळ येते. ‘काय करावे? जावे की न जावे?’ अशा कामाचा पूर्वानुभव नाही आणि शाळकरी मुलाला एकटीच्या हिंमतीवर वाढवत जगताना होणारी तारांबळ ह्यामुळे ती भांबावून जाते. नोकरदार असल्याने नकार देणे कठीण आणि एकुलत्या एका मुलाला घरी सांभाळायला कुणी नाही अशा पेचात ती अडकलेली असते. परंतु, मुलालादेखील आपल्या बरोबर घेऊन जावे लागण्याचा एकमेव पर्याय तिच्यापुढे उरतो.
नाईलाजास्तव प्राप्त परिस्थितीला सामोरी जाण्यास ती सज्ज होते. त्या भागात पोचून कामाला सुरूवात करेपर्यंत ‘जगण्यातील प्रत्येक क्षण निर्णायक असल्याचे मान्य करून स्वत:ला सतत सजग ठेवणं भाग पडतं’ हे सत्य तिला उमगतं.

‘दुर्ग’ची सुचेता! तिला शाळकरी वयात आई-वडिलांच्या विभक्तपणाला सामोरं जावं लागतं. आईचा तडफदार स्वभाव आणि वडिलांचा प्रेमळ-समजूतदार तरीही कणाहीन स्वभाव ह्यांची त्या वयातच तिला ओळख पटत जाते. प्रेमळ आत्याच्या मदतीने, वडिलांसह धाकट्या भावाची जबाबदारी स्वीकारून ती ‘संसाराला’ लागते. यथावकाश शिक्षण-नोकरी असे टप्पे पार करत, ‘लग्न’ ह्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोचते. ह्या सर्व प्रवासात समविचारी मित्र-मैत्रीणी तिला भेटतात. तिच्या जगण्या-वाढण्याला त्यांची मदत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळाने अशाच एका मित्राच्या मदतीने, प्राचीन किल्ल्यावर पदभ्रमण करण्याच्या निमित्ताने बर्‍याच दिवसांनी ती घराबाहेर पडते. आजूबाजूला पसरलेला भव्य निसर्ग-खेडी, प्रकाश-काळोख-टिपूर चांदण्याने भरलेले नभांगण... हे सारं तिच्या मनात अलगदपणे उतरत रहातं. मन मोकळं होत जातं.

‘रण’च्या नमिताचा भूकंप झालेल्या भागात थेटपणे कामाला सुरूवात करेपर्यंतचा प्रवास, तिथे घटस्फोट घेतल्यानंतर नवर्‍याची झालेली अचानक भेट, बरोबर नेलेल्या लेकाला सांभाळण्यात त्याच्या मदतीने मिळालेला दिलासा, त्याने तिला पुन्हा एकत्र येण्यासाठी केलेली विनंती, ह्या प्रत्येक प्रसंगी तिच्या मनाची होत राहिलेली चल-बिचल....
त्याचप्रमाणे ‘दुर्ग’च्या सुचेताचा गड चढण्याचा प्रवास, दचकवणार्‍या आठवणींनी वाटेत अडखळणं, लखलखीत-टक्क उन्हाळी वातावरणात मनातील दमटपणा नाहीसा होऊन मन स्वच्छ-कोरडं होणं, मित्राने तिच्यासमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव आणि तिचा अंतिम निर्णय...
दोघींनाही स्वत:तील बदल टिपायला, आपल्या एकंदर जगण्याविषयी पुरेसे आकलन व्हायला प्रवासातील अडचणी-घटना सहाय्यकारी ठरतात.

स्त्रीला मनासारखं जगता येण्याची, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत काय असते? एकटेपणा? वैवाहिक जीवनाला नकार? दुर्दैवाने ह्याचं उत्तर ‘होय’ असं आहे. तथाकथित वैवाहिक नाती, कुटंबव्यवस्थेतील त्यांची उतरंड, कामांची-जबाबदार्‍यांची काटेकोर विभागणी व्यक्तीच्या विकासाला पोषक ठरतातच असे नाही, तर बर्‍याचदा त्यांचा काच जाणवतो. अशावेळी आपल्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर ‘एकटं’ राहण्याला पर्याय उरत नाही. ह्यातून तिची सुटका होते. शिवाय जगणं जास्त अवघड झालं तरीही सुसह्य बनतं.

मिलिंद बोकील, कलाकृतीच्या माध्यमातून वास्तव जीवनाला भिडणारा लेखक, खासकरून स्त्रीच्या जगण्यातील पेच नेमकेपणाने उलगडत नेणारं त्यांचं लेखन!
त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील स्त्रिया स्वतंत्र विचारांच्या असतात. स्वत:शी, सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीशी संघर्ष करत त्या जगतात. ‘आपल्याला पुरुषांची शारीरिक-मानसिक-भावनिक गरज आहे’ हे त्या नाकारत नाहीत. परंतु केवळ तेवढ्यासाठी त्या त्यांच्यावर विसंबूनही रहात नाहीत. ‘आपल्याला साथ द्यायला पुरुष नाही’ म्हणून खंतावत नाहीत किंवा त्यांच्यासाठी अडूनही रहात नाहीत. ‘पुरुषांसह किंवा पुरुषांशिवाय’, स्वत:च्या निर्णयशक्तीवर विश्वास ठेवून खंबीरपणे त्या जगतात. प्रसंगी पुरुषांनाच त्यांचा आधार घ्यावा लागतो. त्याही त्यांना सांभाळून घेतात, उघडं पाडत नाहीत.

‘रण’ची नमिता भूकंपाने पडझड झालेल्या अन रखरखत्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर तर ‘दुर्ग’ची सुचेता भव्य किल्ला-नभांगणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या जगण्याची दिशा ठरवतात.

खिन्न काळ्या अन तजेलदार पिवळ्या रंगांनी नटलेलं चंद्रमोहन कुलकर्णींचं मुखपृष्ठ! किल्ल्यावरील कातळाची खोली, तिथला थंडावा देणारा काळोख, रणच्या उन्हाचा तापलेपणा अन ह्या अशा भिन्न वातावरणांत दोन्ही नायिकांना उलगडत जाणारे जगण्यातील पेच....
स्वत:त सकारात्मक बदल घडवण्यासाठी निवांत जागी, एकांतात बसून केलेले मनन-चिंतन नव्हे तर स्वत:ला कृतीशील ठेवत, आपल्या वागण्याकडे तटस्थतेने निरखणे पुरेसे असते असा विश्वास देतात.

--- चित्रा राजेन्द्र जोशी
२६.०७.२०११

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

रसग्रहण / परीक्षण अतिशय आवडले. 'रण-दुर्ग' संग्रही आहेच. बोकिलांच्या इतर पुस्तकांप्रमाणेही (अपवाद कदाचित 'झेन गार्डन') हेही पुस्तक वारंवार वाचत असतो.
'स्त्रीला नेमके काय हवे असते?' हा कडबाचघळ प्रश्न सनातन असला तरी त्याचे समाधानकारक उत्तर कोणी मायकालाल देऊ शकला आहे असे वाटत नाही. अर्थात असे उत्तर एखाद्या पुरुषाने द्यावे अशी अपेक्षा न करणे किंवा तसे गृहीत न धरणे हेच स्त्रीला हवे असते की काय कुणास ठाऊक! पण आंतरजालावर कैक वेळा फिरलेल्या एका विरोपातील गोष्टीनुसार स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्त्रीला हवे असते. शशी गोडबोलेच्या म्हणण्यानुसार स्त्रीला थोडीशी 'इज्जत' हवी असते. काय माहीत, एखादी स्त्रीच याबाबत अधिक समर्पक लिहू शकेल.
बोकिलांच्या लेखनात येणारी निसर्गाची वर्णने, त्यांच्या पात्रांची बोलणी, वागणी मला लोभस वाटतात. मूळ कथानकाबरोबर, मूळ कथानकाच्या पार्श्वभूमीवर चालत राहाणारा हा 'कॅनव्हास' घडवणे हे लेखकाचे मोठे यश असते. त्याने मूळ कलाकृतीला एक घाट येतो. आशा बगेंच्या काही कथांमध्ये हे दिसते. गुलजार यांच्या काही पटकथा-संवादांमध्येही. हे 'सेकंड फिडल' ऐकणे ही मोठी मजा आहे. 'मैं पिया तेरी, तू माने या ना माने' मधली बासरी ऐकण्यासारखी.
रसग्रहण / परीक्षण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अवांतर वाटेल पण यानिमित्ताने काही शंका लिहून टाकतो.

स्त्रीला काय पाहिजे असते हा प्रश्न अवघड आहे वगैरे वगैरे लै वेळा लिहून चघळून झाले आहे. तुलनेने "पुरुषाला काय हवे असते" या प्रश्नाबद्दल कोणी फारसे बोलताना दिसत नाही. म्हणजे नीड्स ऑफ मॅन बद्दल लिहिलेले आहे कैक लोकांनी, पण अ‍ॅज-इज विवेचन पाहिजे, शुड-बी नकोय, त्यामुळे बरेच तत्वज्ञ इथे गैरलागू होतात. अ‍ॅज-इज पद्धतीने पाहिले तर पुरुषांच्या गरजा या ओव्हरसिम्प्लिफाईड स्वरूपात सांगितल्या जातात असे आजपर्यंतचे निरीक्षण आहे. तर असे का आणि मुळात हे कितपत खरे आहे? हा एक प्रश्न. आणि स्त्रियांचे ईप्सित हा इतका हॉट टॉपिक का ठरावा (पुरुषांच्या ईप्सिताच्या प्रश्नाच्या तुलनेत) ? हा दुसरा प्रश्न. फ्रॉईडने या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले नसल्याची कबुली दिलेली आहे आणि ती प्रसिद्ध आहे. पण त्यामुळे हा प्रश्न खराच इतका अवघड ठरतो का? की आजपर्यंतच्या थिअरीज या पुरुष हेच डिफॉल्ट कॅरॅक्टर नजरेसमोर ठेवून मांडलेल्या असल्याने स्त्रीकडे पाहण्याचा चष्मा चुकीचा आहे? समजा पुरुषप्रधान समाजात स्त्रीच्या ईप्सिताचा प्रश्न अगदी गुंतागुंतीचा आहे असे मानले तर मातृसत्ताक समाजाचे काय? तिथल्या पुरुषांच्या ईप्सिताचा प्रश्न तितकाच गुंतागुंतीचा का नाही होणार?

समाजनिरपेक्ष दृष्टीने पाहता या एकाच प्रश्नाचा इतका उदोउदो करण्याचे काही कारण दिसत नाही. त्यामुळे स्त्रीचे ईप्सित हा प्रश्न समाजव्यवस्थेशीच निगडित आहे, किंबहुना त्या व्यवस्थेचाच तो नतीजा आहे असे म्हटले तर बरोबर की चूक? (मला बरोबर वाटते, पण मी चुकतही असेन-काय माहिती).

या प्रश्नांवर काही चर्चा व्हावी अशी विनंतीवजा इच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुस्तकाबद्दल आता दुसर्‍यांदा चांग्लं ऐकतो आहे.. वाचायला हवं ही खुणगाठ अधिक पक्की झाली!
परिचय छान उतरला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तक जवळ नाही, पण मिळवून वाचायला निश्चितच आवडेल.

'स्त्रीला नेमके काय हवे असते?' हा कडबाचघळ प्रश्न सनातन असला तरी त्याचे समाधानकारक उत्तर कोणी मायकालाल देऊ शकला आहे असे वाटत नाही.

सगळ्या स्त्रिया सारख्याच असतात किंवा सर्व स्त्रियांना एकचएक गोष्ट हवी असते अशा प्रकारचं गृहितक मला मान्य नाही. त्यामुळे या प्रश्नाला कोणीही मायकालाल उत्तर देऊ शकेल असं वाटत नाही. मायकीलालीही नाही. फारतर "मला काय हवंय" याचं उत्तर देता येईल, (पण ते उत्तरही फार सोपं नाही असं वाटतं).
बॅटमॅनच्या प्रश्नाबद्दलही हेच म्हणता येईल, प्रत्येक पुरूष हा एकाच साच्यातून काढलेला नसून स्वतंत्र व्यक्ती असल्यामुळे त्याहीबाबतीत हेच. स्त्रियांच्या बाबतीत हा प्रश्न थोडा अधिक महत्त्वाचा ठरतो कारण गेल्या अनेक हजार वर्षांमधे स्त्रीला माणूस म्हणूनही वागवण्याची प्रथा उरलेली नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.