स्वातंत्र्य म्हणजे ....

काही काही व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याचा मोह अनावर होतो तो त्यांच्याविषयीच्या ऐकीव माहितीतून, बातम्यांतून. आणि जर का त्यांचं आत्मचरित्र हाती आलं तर मग अगदी थेटच डोकावता येतं त्यांच्या आयुष्यात!आठेक वर्षांपूर्वी जेव्हा मी नव्याने वाचू लागले, तेव्हा प्रोतिमा बेदीविषयी, तिच्या ‘टाईमपास’विषयी खूप उत्सुकता वाटत होती. तिचं व्यक्तिमत्त्वच मुळी ‘वादळी’! हे पुस्तक वाचल्यानंतर कुतूहल शमलं. प्रोतिमा नावाचं वादळ नेमकं कसं घडलं-बिघडलं ते सविस्तर समजलं. आणि आजवर तिच्याविषयी वाटणार्‍या अचंब्याची जागा घेतली अनुकंपेनं! तिचं पुस्तक वाचेपर्यंत अतिशय सुरक्षित कोषात जगणार्‍या मला ते वाचल्यानंतर हादरायलाच झालं. स्वत: प्रोतिमाने खूप अभिमानाने सांगितलंय -- ‘आपल्या समाजानं बनवलेला प्रत्येक नियम मी मोडला. मी कसलीच बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावसं वाटलं ते ते मी केलं. अगदी सपाटून केलं. कोण काय म्हणेल ह्याला मी काडीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, माझं लैंगिक जीवन, माझी बुध्दिमत्ता -- सारं काही मी दिमाखात मिरवलं. आणि हे सारं मी निलाजरेपणे केलंय. मी खूप जणांवर ओतून प्रेम केलं, आणि माझ्यावरही काहींनी केलं’

वडील हरियाणी व आई बंगाली असणार्‍या ह्या मुलीनं जे असुरक्षित बालपण भोगलं त्याचाच परिपाक असलेलं, तिच्या उमलत्या वयातील अनुभवांतून बनलेल्या तिच्या आयुष्याचं हे सार. जे ती प्रत्यक्ष जगली होती तेही तसं जगावेगळंच! पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच म्हणून आणि शिवाय कुरूप म्हणूनही कुटुंबियांकडून तिच्या वाट्याला लहानपणीच हेटाळणी आली, ज्यामुळे तिच्या अंगात एक प्रकारची बेदरकार वृत्ती तयार झाली असणार, तिच्यात कोडगेपणा आला असणार. अजाणत्या वयात, नवव्या-दहाव्या वर्षी, आतेभावाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार होत राहिले. पण त्याविषयी कोणाकडूनही तिला सहानुभूती मिळाली नाही.

तिच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मनाविरूध्द प्रेमविवाह केला. तिची आई अतिशय सुंदर होती. वडिलांनी आपल्या उद्योग-व्यवसाय वृध्दिसाठी केलेला आईच्या सौंदर्याचा स्वार्थी वापर लहान वयातच तिला बघावा लागला. या सा‍र्‍याचा परिणाम होऊन बहुधा प्रोतिमा बंडखोर बनली. वडिलांनी घातलेल्या बंधनांना तिने अजिबात जुमानलं नाही. हे सारं वाचून वाटलं, बालपणीचा काळ सुखाचा नसला की माणसाची अशी आणि इतकी वाताहत होते? तिने ओडीसी नृत्यशैली आवडल्यानंतर त्यासाठी केलेलं सर्व-समर्पण व स्वत:च्या छंदीपणाला घातलेला आवर, नृत्याच्या वेळी असणारा तिचा समर्पित भाव, नृत्यग्राम वसवण्यासाठी तिने केलेली प्रामाणिक धडपड, प्रसंगी आपल्या गुरूंशी, केलुचरण महापात्रा, यांच्याशी पत्करावं लागलेलं वैर हे सगळं वाचल्यानंतर खरी प्रोतिमा कोणती हे समजायला जरा अवघड गेलं.

त्यानंतर काही दिवसांनी वाचलेल्या ‘एक झाड आणि दोन पक्षी’ ह्या पुस्तकात विल डुरांट ह्या विदेशी लेखकाचा एक परिच्छेद त्यात दिलाय. त्यातील काही भाग असा... ‘सामान्य माणसाला स्वातंत्र्य नकोच असते. त्याला मुभा हवी असते. कुणाची गुलामगिरी पत्करायची याचा निर्णय करण्यापुरतीच! स्वातंत्र्य म्हणजे अस्थिरता, असुरक्षितता आणि जीव वाचवण्यासाठी सदैव जागरूकता. त्याचे ओझे सामान्य माणसांना पेलवत नाही.’

प्रोतिमा बेदी आठवली. तिचं वाचलेलं आयुष्य आठवलं आणि स्वातंत्र्याचा हा अर्थ लक्षात आला. जाणवलं, ती खरोखरीच असामान्य होती. तिचे अनेक पुरूषांशी अति-जवळकीचे संबंध, फक्त स्वत:साठी जगत असल्याने तिच्या मुलांना आलेलं एकटेपण (तिच्या मुलाने आत्महत्या केली), तिच्या जगण्यातील तिने स्वखुशीने पत्करलेली अस्थिरता-असुरक्षितता हे सारं सामान्यांना न पेलणारं हेच खरं!

व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला म्हणून पर्यायी शब्दकोश बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत.

प्रोतिमा बेदीच्या निलाजरपणे वागण्याला, स्वातंत्र्याच्या कोणत्या पर्यायी शब्दात बसवायचं? आत्मनिर्भरता? स्वयंपूर्णता? स्वैरता? काही समजेना. तो विषय मनात तसाच अर्धवट राहिला. इरावती कर्वेंच्या ‘गंगाजल’ पुस्तकातील ‘व्यक्तिस्वातंत्र्यता आणि बंधमुक्तता’ हा लेख जेव्हा वाचनात आला तेव्हा प्रोतिमाची आठवण झाली. इरावतीबाईंनी लिहिलंय, ‘व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य ऐकावयाला किंवा उच्चरावयाला जितके गोड आणि सोपे तितकेच आचरणात उतरावयाला दुष्कर आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता व सार्वत्रिक बंधमुक्तता खासच नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने वासनांच्या अमर्याद परिपोषाशिवाय ज्यात कसलाही दुसरा उद्देश नाही, अशा तर्‍हेच्या निर्मितीला मोकळीक देणे कधीही रास्त ठरणार नाही.’ हे वाचल्यावर वाटलं, प्रोतिमाच्या स्वातंत्र्याला स्वैरता हा पर्याय चपखल बसतो का? कारण तिचं नृत्यावरील प्रेम वगळता तिचं जे जगणं होतं ते वासनांच्या अमर्याद परिपोषाचंच होतं ना! कोवळ्या वयातील ‘त्या’ अनुभवांनी तिच्यातील ‘त्या’ गोष्टीविषयीची उत्सुकता, कुतूहल, भिती, संयम पार नाहीसा झाला असावा की त्यामुळे तिचं वागणं अनिर्बंधच झालं. स्वत:च्या वडिलांना आणि त्यांनी घातलेल्या निर्बंधांना तिच्या लेखी काडीचीही किंमत उरली नाही. कशी उरावी म्हणा!

सर्वस्वी आपल्या मनाप्रमाणे वागणं म्हणजेच स्वातंत्र्य का? व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? पुन्हा एकदा विचारांचा पिंगा सुरू झाला. न राहवून शेवटी ‘महर्षी ते गौरी’ हे मंगला आठलेकरांचं पुस्तक बाहेर काढलं. त्याच्या पहिल्या वाचनातून महर्षी कर्वे, त्यांचा मुलगा रघुनाथ कर्वे आणि त्यांची नात गौरी देशपांडे ह्या तीन पिढ्यांची ओळख झाली होती. तरीही स्वातंत्र्याविषयी पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी हेच पुस्तक आठवलं. का बरं? त्याच्या ब्लर्बवर एक वाक्य आहे... ’
‘समाजानं घालून दिलेल्या रूढ परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं! स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे.’

महर्षी कर्वे, रघुनाथ कर्वे आणि गौरी देशपांडे ह्या एकाच घरातील तिघांची मानसिक जडण-घडण, त्यांची विचारसरणी, त्याचा त्यांनी समाजासाठी केलेला उपयोग सविस्तर वाचल्यानंतर त्यांचं वेगळेपण नेमकं काय आहे हे ध्यानात आलं. नकळतच पुन्हा एकदा मनात लपलेली प्रोतिमा बेदी अलगद वर आली. शिक्षणाने सुसंस्कारित(!) कर्वे घराण्यातील व्यकी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा त्यांनी केलेला वापर व प्रोतिमासारखी (तिच्या दुर्दैवाने घडलेली) कुसंस्कारित(!) व्यक्ती आणि तिच्या स्वातंत्र्याचा तिने केलेला वापर. जमिन-अस्मानाचा फरक! आता हे वाचून कुणाला वाटेल की ज्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत अशा माणसांना असं एका ठिकाणी आणण्याचा मूर्खपणा कशासाठी? त्याचं कारण व्यक्तीस्वातंत्र्य, विचार-स्वातंत्र्य आणि स्त्री-स्वातंत्र्य अशा स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पना ‘महर्षी ते गौरी’ वाचून सोदाहरण स्पष्ट झाल्या.

जसं की, महर्षी कर्व्यांनी स्त्री-शिक्षण, विधवांचं शिक्षण ह्याला प्राधान्य दिलं. का? त्यांच्या मते, ‘शिक्षण मिळालं की आपोआपच प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बनते. तशीच स्त्रीही शिक्षणानं स्वावलंबी बनेल आणि आर्थिक स्वावलंबन ज्याला लाभतं त्याच्यावर इतरांना फारसा अन्याय करता येत नाही. शिवाय निर्णयाचं स्वातंत्र्यही त्याला हळूहळू मिळू लागतं. स्वत:च्या भविष्याचा विचार करता येतो.’ ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी केलेली स्त्री-शिक्षण योजना!

र. धों कर्वे ह्यांनी संततिनियमनाचं प्रचारकार्य हे जीवनाचं एकमेव ध्येत मानलं. ह्याच कामासाठी जगायचं आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवायचं. ते समागम स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. ‘माणसाला खाण्यापिण्याचं जसं स्वातंत्र्य असतं आणि ते घेताना त्याला जशी इतरांची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा इतरांच्या आक्षेपांचं अथवा वाळीत टाकलं जाण्याचं भय नसतं, त्याचप्रमाणे समागमस्वातंत्र्य हाही माणसाचा हक्क आहे. आणि त्यासाठीचे नैतिक नियम स्त्री-पुरूष दोघांनाही सारखेच असणं गरजेचं आहे. म्हणून दोघांनाही बंधमुक्त होऊ द्या.’

गौरी देशपांडे, लोकप्रिय लेखिका. सुशिक्षित स्त्रीनं मनानं स्वतंत्र कसं बनायचं ह्याचे जणू धडेच आपल्या कथा-कादंबर्‍यांतून त्यांनी दिले. ह्या पुस्तकात त्यांची सविस्तर मुलाखत आहे. त्या म्हणतात, ‘स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती हा एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. ती काही पाकक्रिया नाही. प्रत्येक बाईनं इथं स्वत:बद्दल विचार केला पाहिजे. मुक्ती म्हणजे, काय करायचं आणि काय करायचं नाही, हे स्वत:च्या बाबतीत ठरवण्याची मुभा स्वत:ला असणं.’

कविता महाजन त्यांच्या एका लेखात लिहितात, ‘निव्वळ जिवंत राहण्याचं, आपल्या मनातल्या स्व-प्रतिमेनुसार जगण्याच्या आणि जे लिहावंव वाटतं ते प्रामाणिकपणानं लिहिण्याच्या स्वातंत्र्यासाठी मी किंमत मोजली, त्या स्वातंत्र्याने मला काय दिलं आणि किती, काय नष्ट केलं याचा हिशेब मला अजून लागत नव्हता.’ स्वातंत्र्याची किंमत ... हा एक नवीन कंगोरा सामोरा आला.

स्वातंत्र्य म्हणजे .... अनेक कंगोरे अनेक पैलू!
[list]
[*]स्त्रीच्या असण्याचा वापर किती तर्‍हांनी होत असतो हे ह्यातून अधोरेखित झाले . वडिलांनी आईच्या सौंदर्याचा केलेला, भावाने बहिणीच्या शरीराचा, तिने स्वत:च्या सुखासाठी....
[*]कर्वे घरातल्या व्यक्तींनी एकंदरीत स्त्री म्हणून तिचे उन्नयन व्हावे म्हणून केलेला विचार अन कार्य..
[*]स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, आपले आपण पत्करलेले उत्तरदायित्व, त्यासाठी किंमत मोजणे हेही ह्यातून अधोरेखित होते... जे स्त्री-पुरूष सर्वांना सारखेच लागू आहेत
[/list]

‘आपले जगणे आपल्या पध्दतीने पुढे नेणे’ अशी आयुष्ये एकत्रित वाचण्याने मला काय दिलं असा विचार करताना जाणवतं, जो तो आपापल्या परिने जगत असतो, त्याचे मूल्यमापन करणारे आपण कोण? कुणी कुणाला चांगले-वाईट म्हणण्यात अर्थ नाही -- हेच खरे!

‘टाईमपास’, ‘महर्षी ते गौरी’ यांसारख्या पुस्तकांच्या वाचनाने स्वतंत्र विचार-आचारांनी जगण्याची दृष्टी देणारी नवी नजर लाभली. मीही नकळत विचार-प्रवृत्त बनले. गौरी देशपांडेंच्याच भाषेत सांगायचं तर ‘विचार करणं हा प्रगल्भतेकडे जाणारा रस्ता आहे.’
आणि
माझ्या मते, ह्या रस्त्यावरील ‘टाईमपास’, ‘महर्षी ते गौरी’ अशी पुस्तके मैलाचे दगड आहेत.

चित्रा राजेन्द्र जोशी.
(मूळ लेख : वाचू आनंदे - वाचकघर -१३.०९.२००६)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गौरी देशपांडेंनी लिहिलेलं 'एकेक पान गळावया' वाचल होतं (त्यांच्या इतर पुस्तकांपैकी हे पहिलं पुस्तक मी वाचल होतं) तेंव्हा ही तुम्ही म्हणता तसाच पांढरपेशा मनाला थोडा धक्का बसला होता पण ते ही प्रकटन आवडले होते. त्यांनी लिहिलेला कथा संग्रह असे जरी स्वरूप असेल तरी त्यांच्या मनाची स्वभावाचे बरेच आरसे ह्या पुस्तकात दिसतात असे गौरी देशपांडेंचे एकूण आयुष्य पाहून (म्हणजे त्यांचाविषयी उपलब्ध बरेचसे साहित्य/लघु लेख वगैरे वाचून) मला वाटते.

आपण दिलेला प्रोतिमा बेदीच्या पुस्तकाचा परिचय आवडला. नक्की पुस्तक वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वैर स्वगत अतिशय आवडलं

सामान्य माणसाला स्वातंत्र्य नकोच असते. त्याला मुभा हवी असते. कुणाची गुलामगिरी पत्करायची याचा निर्णय करण्यापुरतीच! स्वातंत्र्य म्हणजे अस्थिरता, असुरक्षितता आणि जीव वाचवण्यासाठी सदैव जागरूकता. त्याचे ओझे सामान्य माणसांना पेलवत नाही

अत्यंत रोचक विचार आहे. असा विचार इतक्या स्पष्टपणे समोर आला नव्हता.

या छान लेखाबद्दल आभार.. सविस्तर प्रतिक्रीया वेळ मिळताच देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सामान्य माणसाला स्वातंत्र्य नकोच असते. त्याला मुभा हवी असते. कुणाची गुलामगिरी पत्करायची याचा निर्णय करण्यापुरतीच! स्वातंत्र्य म्हणजे अस्थिरता, असुरक्षितता आणि जीव वाचवण्यासाठी सदैव जागरूकता. त्याचे ओझे सामान्य माणसांना पेलवत नाही

--अत्यंत रोचक विचार आहे. असा विचार इतक्या स्पष्टपणे समोर आला नव्हता.

सहमत..

मी पण असा काहीतरी विचार करते, पण शब्दात पकडता येत नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सुमारे दहा वर्षांपुर्वी वाचलं होतं, तेव्हा मला पण सुरूवातीला धक्के बसले. नंतर तिच्या स्वैर्/स्वतंत्र (काहीही म्हणा) वागण्याचे आणि आहे ते निर्भिड्पणे बोलून दाखवण्याच्या, मान्य मरण्याच्या वॄत्तीचे आकर्षण आणि कौतुक वाटलं.

मध्ये बरीच वर्षे गेली, तपशील विसरले पण पुस्तक लक्षात राहिलं. मध्यंतरी क्रॉसवर्डचे कुपन त्याची तारीख उलटायच्या आत वापरायचे म्हणुन तिथे गेले, पुस्तके चाळत होते, तर टाईमपास (मराठी अनुवाद - चांगला जमलाय एकूण!) दिसलं, ताबडतोब घेऊन पण टाकलं.

वेळ मिळाल्यवर परत वाचून पण काढलं, पण या वेळी मागच्या वेळेस सारखं आकर्षण, कौतुक वगैरे काहीच वाटलं नाही( हार रे दैवा, हल्ली असं का होतय? पुर्वी खूप आवडलेली म्हणून विकत घेते आणि परत आता वाचल्यावर ती पुस्तकं तेवढी काही खास नाहीत्/नव्हती असं निष्कर्ष का निघतो?)

उलट ती खूप गोंधळलेली, स्वतःच मधून मधून परस्पर विरोधी विधाने करणारी वगैरे वाटली. इतके मुक्त जीवन जगायचे असताना तिने खरेतर संसार, मूल या फंदात पडायलाच नको होते, मुलांची विनाकरण फरफट झाली.(तिचा मुलगा सिद्धार्थ पुढे स्किझोफ्रेनिक असल्याचे निदान झाले, त्याला ती सर्वस्वी जरी नसली तरी बर्‍यापैकी जबाबदार होती, अगदी लहान वयात त्याला वाटलेली पराकोटीची असुरक्षितता आणि एकटेपणा ह्या गोष्टी नक्कीच स्किझोफ्रेनियाला कारणीभूत झाल्या असे वाटते)

विकत घेतलंय आणि घरात आहे खरं, पण माझं मूल संस्कारक्षम वयात असताना त्या/तिच्या हातात निदान ते पडू नये ही काळजी घ्यावी असे वाटते. निदान थोडी समज आल्यावरच असे काही लेखन त्यांच्या हातात पडू द्यावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

संपुर्ण स्वातंत्र्य ही अजुनतरी एक युटॊपिअन कल्पना आहे. तसंच,'OUR FREEDOM IS OUR EXISTENCE' असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळेच आपलं संपुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य काय आहे? किती आहे? कसं आहे? याची उत्तरं आपल्याकडे नाहीत, कारण आपण सतत आपल्या अस्तित्वाबद्दल confuse असतो. सामाजिक चौकटीच्या साच्यात घालुन आपलं अस्तित्व आपण आकारात आणु पहातो,त्याला मर्यादित करु पहातो आणि मग स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा मर्यादित होत जातात, त्यांनाही भिंती येत जातात. मग ते स्वातंत्र्यही उरत नाही. प्रत्यक्षात मानवी अस्तित्व अमर्याद आहे. त्याला बंधनं नाहीत, भिंती नाहीत, आकार नाही. त्यामुळे संपुर्ण स्वातंत्र्याच्या संकल्पनेलाही भिंती नाहीत, ते आकारहीन आहे. ते कुठेही आणि कसंही फोफावत जाणारं आहे. मानवी अस्तित्व म्हणजे आपला स्वभाव,जडणघडण आणि निर्मिती, यांच्या तुन जन्म घेणारं सर्व काही.
तुम्ही आपल्या लेखात ज्या मान्यवरांची मतं दिलि आहेत, त्यापैकी प्रत्येकजण स्वातंत्र्य, 'समाज' या भुमिकेतुन पहातो आहे. 'सामान्य' या शब्दाचा येथे झालेला वापर हा तुलनात्मक आहे. हा एकावेळी अनेक प्रवृत्तींच्या तुलनेतुन येणारा आहे. मी जी व्याख्या करतोय ती सर्वस्वी एकाच माणसाच्या नजरेतलं त्याचं स्वत:चं अमर्याद अस्तित्व अशी आहे. त्यामूळे, एखाद्या मध्यपुर्वेत रहाणारया स्त्रीची 'आपली बुरख्यातुन सुटका व्हावी' ही अंतिम स्वातंत्र्याची कल्पना असु शकेल ती आपल्याला सामान्यही वाटु शकेल परंतु तिला नाही. महत्वाचे म्हणजे बुरखा उतरवण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसरी इच्छा नवीन निर्माण होईल. म्हणजेच प्रत्येकाची असामान्यत्वाची व्याख्या बहुधा वेगळी आणि सतत बदलत रहाणारी असते.
प्रोतिमाच्या वागणुकीला मला पर्यायी शब्द शोधणे म्हणजे त्या एकुण गोष्टीला मर्यादा आणण्यासारखे वाटते. इरावति कर्वेंचं हे वाक्य सुद्धा मला समाजाच्या भुमिकेतुन व्यापक विचार केल्यासारखं वाटतं. यात काही वावगं नाहीये पण यातुन पुन्हा प्रोतिमाच्या स्वातंत्र्याच्या वैयक्तिक मनस्वी भुमिकेला समजावुन घेता येणार नाही. इतके खरे की आपण शरिर स्वातंत्र्याला आपलेपणाने पहात नाही. तो आपल्या प्रचलित संस्कृतीचा भाग नसल्याने तसे होत असेल. आपली संस्कृती ब्रम्हचर्य सांगते. त्यामुळे चार्वाक हासुद्धा आपल्याच संस्कृतीचा भाग असला, आपण तो विचारात घेत नाही. 'शरिर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे' ही संकल्पना, तसेच पुर्नजन्माची संकल्पना यामुळे आपण शरिराकडे तितकेसे महत्व देत नाही आणि आपल्या अस्तित्वाच्या जवळ जवळ अर्ध्या शक्यता आपण मिटवुन टाकतो. touch,senses,passion,sex,orgasm,torment, torture,drugs,swing,trans या अशा कित्येक गोष्टींशी आपण कायम अनभिद्न्य रहातो. स्वातंत्र्य समजुन घेण्यापेक्षा, निश्चितच जास्त अनुभवण्यात आहे. प्रोतिमा जे जगली, ते आपण समजुन घेऊ शकतो, त्याचि स्वप्नं आपण पाहु शकतो पण आपण तसं जगत नाही. तिच्या अमर्यादपणात स्वत:च्या आणि स्वत:पलिकडे निगडित असलेल्या गोष्टी 'स्व'शी संबंध घेऊन येतात.याच भुमिकेत आपल्या अतिशय जवळच्या व्यक्ती,नाती हे आपल्याव्यतिरिक्तच्या दुय्यम गोष्टी बनतात.(everybody is pretty alone, others can understand our feelings and needs but can never feel the actual way we feel and vice verse. this is pretty important to keep our existence untouched only saved for us and us only to deal with.) कर्वेंच्या तिन्ही पिढ्यांनी इतरांना स्वातंत्र्य मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आणि यातच त्यांची वैयक्तीक स्वातंत्र्याची संकल्पना निगडित ठेवली असावी किंवा ती यापेक्षा वेगळीही असेल. स्वातंत्र्याच्या अमर्याद असण्यामागची हीच तर गंमत आहे. infinity ला आपण चांगलं-वाईट,लहान-मोठं वा योग्य-अयोग्य म्हणु शकत नाही. मग यात touch,senses,passion,sex,sadism,masochism,hedonism,atheism,प्रेम त्याग, समर्पण,क्षमा,शुन्यत्व इ. सगळ्या गोष्टींना समान पातळीवर ठेवणे इष्ट होईल. शेवटी हा एका सरळरेषेत होणारा प्रवास नसुन, ते एका आकारहिन एंटीटीचे कुठल्याही दिशेने,कुठल्याही प्रतलात, कसेही आणि कितीही होणारे expansion आहे.
चित्राताई, माझा हा दृष्टिकोन योग्य अयोग्याची वकिली करत नाहीये.मला इथे कोणत्याही प्रचलित संकल्पना जोडाव्याशाच वाटत नाहीयेत. अगम्य,एकेकट्याने, रुचेल तसा वास्तव-अवास्तव ,स्वप्नाळू प्रवास हीच माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre