दोन दशकं- पहिल्या नशाची.

योग जुळून यावेत, तसे काही सिनेमाही जुळून येतात. मनाच्या कोपर्यात घर करून बसणारे हे सिनेमे आपण आपल्या वाढत्या वयासोबत हृदयात जपून ठेवत असतो. बऱ्याचदा ह्या सिनेमांनी ओलांडलेला काळाचा टप्पा आपलयाला आपल्या वाढत्या वयाची जाणीव करून देत असतो. नव्वदीच्या दशकात भारतीय सिनेमाला पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारं गाणं म्हणजे “पहला नशा, पहला खुमार”. आजही बॉलीवूडच्या कल्ट सिनेमात मानाचं स्थान पटकावून बसलेल्या ‘जो जीता वोही सिकंदर’ ह्या सिनेमाने तरुण पिढीला ह्या ‘लव अँथम’ सोबत बरंच काही दिलं. २०१२ मध्ये ह्या सिनेमाला प्रदर्शित होऊन दोन दशकं होतील, हे सांगूनही खरं वाटणार नाही. ‘बोल बच्चन’ सारखा ‘बोल”पट देखील शंभर करोडचा गल्ला जमवत असताना ‘जो जीता..’ ला वीस वर्ष उलटून जाणं काही जणांना बिनमहत्त्वाचं वाटेलही. पण वाढत्या वयात ज्याने ‘जो जीता..’ पाहिला असेल, त्याच्या स्मृतीतून तो जाणं निव्वळ अशक्य.
मुळात ‘जो जीता ..’ ची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हाच ह्या सिनेमा विषयी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. एक तर ‘ कयामत सें कयामत तक’ च्या अभूतपूर्व यशानंतर आमीरखान , दिग्दर्शक मन्सूर खान आणि निर्माते नासिर हुसैन हे ह्या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांसमोर येत होते. नासिर हुसैन यांचा मुलगा मन्सूर आणि पुतण्या आमीर ह्यांनी तोपर्यंत आपलं नाणं खणखणीत असल्याचं शाबित केलंच होतं. तब्बल तीन वर्ष ह्या नां त्या कारणाने चित्रपट लांबणीवर पडत गेला. हळूहळू चित्रपटाची चर्चाही लांबणीवर पडत गेली. १९९२ मध्ये जेव्हा चित्रपट झळकला, तेव्हा तरुणाईने भारलेल्या ह्या सिनेमाला समीक्षकांनी उचलून धरलं. ‘कयामत ..’ ची किमया पुन्हा घडणार , असं वाटलं. पण घडलं भलतंच. तरुणाईच्या ज्या प्रेक्षकवर्गाला हा सिनेमा आवडू शकत होता, नेमकी तीच तरुणाई त्यावेळी हिंदी सिनेमापासून दूर झाली होती. व्हिडियो केसेट्स च्या युगामुळे मध्यम वर्ग आपल्या दिवाणखाण्यात सिनेमा पाहाणं पसंद करू लागला होता. थिएटर्स ची अवकळा पहाता तिथे फक्त पिटातला प्रेक्षकच गर्दी करू शकत होता. त्या प्रेक्षकाला रूढ अर्थाने ढिशुम ढिशुम करून न्याय मिळवणारा फ़ँटसी नायक ह्या चित्रपटातून मिळणार नव्हता. १९९२ ह्या वर्षात सर्वाधिक गल्ला जमवणार्या चित्रपटांच्या यादीत प्रेक्षकाना हातरुमाल पिळून रडायला लावणारा ‘बेटा’, भडक व शिळ्या काढीला उत् आणणारा ‘दिवाना’, मसाला एंटरटेनमेंट चे वाईटात वाईट उदाहरण म्हणून दाखवता येईल असा “तहलका’, बादल्या बादल्या भरून रक्त सांडणारा ‘जिगर’ , अशा सिनेमांची नावे आहेत. साधारण ह्या नावांवरूनच बॉलीवूड च्या दर्जाला लागलेली कसर लक्षात येउ शकेल.प्रेक्षकांचा पाठिंबा अशा स्वरूपाच्या चित्रपटाना असताना काळाच्या पुढे असणारा ‘जो जीता..’ प्रेक्षकांनी उचलून धरला असता, तरच नवल ठरलं असतं. देशाच्या उत्तर भागातल्या एका प्रेक्षकाने ‘जो जीता..’ पाहिल्यावर ‘ एक सायकल रेस जिंकण्यासाठी अख्खा सिनेमा काढायची काय जरूर होती?’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
सवंग लोकप्रियतेत मागे पडला असला तरी ‘जो जीता’ चा लक्ष्य प्रेक्षकवर्ग मात्र कधीच ह्या चित्रपटाला विसरू शकला नाही. कल्ट सिनेमांचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याचं महातम्य हे नेहमीच उशीरा कळत असतं. पण अशा कल्ट सिनेमांनी त्या काळाला, चित्रपटांच्या प्रवासाला आणि आपल्या लक्ष्य प्रेक्षकवर्गाला खूप महत्त्वाचं असं काही देऊन ठेवलेलं असतं. ‘ जो जीता..’ ने दिलेल्या योगदानांचंही अगदी असंच आहे.
‘जो जीता..’ च्या आधी आमीर खानने प्रमुख भूमिकेत केलेल्या सिनेमांची यादी पहाणं मजेदार ठरेल. ‘कयामत सें..’ च्या चोकलेट बॉय भूमिकेत पदार्पण केल्यानंतर आमीर ने राख, लव लव लव, अवल नंबर, तुम मेरे हो, दिल, दिवाना मुझसा नही, जवानी जिंदाबाद, अफसाना प्यार का, दिल है के मानता नही, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग ह्या नावाचे सिनेमे केले होते. ह्यात चाललेले सिनेमे फक्त दिल व दिल है के मानता नही. बाकीच्या सिनेमांची नावे देखील आज काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. दिल च्या भडक कॉमेडी व मेलोड्रामा मध्ये आमीर ने सरावल्यासारखं काम केलं खरं; पण अभिनेता म्हणून त्याचा कस पहाणारी अशी भूमिका त्याच्या वाट्याला येताच नव्हती. ह्याला अपवाद फक्त राख व दिल है के मानता नाही ह्या दोन सिनेमांचा. “दिल है के ..” मधला रघु जेटली ही व्यक्तिरेखा चोकलेट बॉय ची नव्हती. साधारण तिशी मधला, थोडा चालू, स्वयम केंदित, प्रेमळ पण मिस्कील अशा वेगवेगळ्या छटांचा रघु जेटली आमिरने मन लावून रंगवला. बाकी सर्व चित्रपटात आमीर फक्त ‘कयामत ..’ च्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या नादात पाट्या टाकत होता. पण जो जीता ..अभिनेता म्हणून आमीरच्या संक्रमणाची नांदी ठरला. “आमीर खान” असण्याऐवजी व्यक्तिरेखा बनण्यावर त्याने भर द्यायला सुरवात केली, त्यामुळे सुजाण प्रेक्षकांच्या गळ्यातला तो ताईत बनला. व्यक्तिरेखेत मिसळून, त्यानुसार स्वत: ला सादर करण्याचे आमीरचे तंत्र “जो जीता ..” पासून प्रत्यक्षात आले. आज ह्या गुणी अभिनेत्याचे यश जोखताना ‘जो जीता..” च्या व्यक्तिरेखेचा त्याच्या नट म्हणून झालेल्या प्रवासावरचा परिणाम दुर्लक्षून चालणार नाही.
“संजय लाल” ही व्यक्तिरेखा खर्या अर्थाने आमीरच्या करियर मधली मैलाचा दगड आहे. घरातला छोटा मुलगा, शिस्तीची नावड, मोठ्या सद्गुणी, हुशार आणि सर्वगुणसंपन्न भावा सोबत सततच्या तुलनेने बंडखोरीकडे झुकणारा, आपलं काम काढून घ्यायला खोटं बोलणं आणि लोकांचा वापर करून घेणं फारसा चुकीचं न मानणारा. बेफिकीर व बेपर्वा असला तरी पटकन पेटून उठ्णारा, आणि इर्ष्येने आपलं लक्ष्य साध्य करून दाखवणारा “संजय- संजू” आमिरने मोठ्या सहजतेने रंगवलाय. मुळात ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणार्या विद्यार्त्यांवर आधारलेली ही फिल्म. त्या वयातली असुरक्षितता, कुतूहल, मैत्री आणि दुश्मनी, ‘आहे रे ‘वर्गाविषयी असणारी असूया हे विविध कंगोरे ह्या व्यक्तिरेखेला आहेत. मुळात मन्सूरने अतिशय हुशारीने चित्रपटभर त्याला गुळगुळीत नायक न बनवता त्याच्यात मानवी वाटणारे सर्व दुर्गुण टाकले आहेत. भावाच्या स्वत:च लिहिलेल्या प्रेमपत्रातून त्याच्याचकडून पैसे उकळणं असो की वडिलांच्या दिलेल्या पैशातून गर्लफ्रेंड ला हार घेऊन देणं असो, आदर्श वागताना तो कधीच दिसत नाही. स्वत;च्या बदल्याकरता दोन टोळक्यात भांडण लावून देऊन,वडिलांनी मोठ्या मेहनतीने बनवलेल्या हॉटेलची नासधूस करून घेताना त्याला काहीच चुकीचं वाटत नाही. स्वत;च्या भावाचा जीवघेणा अपघात आपल्या चुकीमुळे घडला, हे कळेपर्यंत त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास हा आजवर हिंदी सिनेमात पाहिल्या गेलेल्या कुठल्याही नाय्कापेक्षा वेगळा आहे. तो स्खलनशील आहे, आणि म्हणूनच नव्वदी नंतरच्या प्रेक्षकांना तो आपला वाटू शकला. नव्वदी आधी त्याग आणि कर्तव्य मूर्ती असणार्या नायकानाच पहाण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना मात्र तो एक सांस्कृतिक धक्का होता. अशी व्यक्तिरेखा मुळात कागदावर लिहून काढणं एखाद्या कसबी लेखकाचंच काम. हे शिवधनुष्य मन्सूरने यशस्वीरीतीने पेललं.
मन्सूर हा मुळात नसीर हुसैन ह्यांचा अभ्यासात हुशार, नॉन फिल्मी असा मुलगा. चित्रपटांची आवड असणारा, चक्क आय आय टी मध्ये इंजिनियरिंग ची पदवी घेत असणारा तरुण. काय बिनसलं, ठाऊक नाही, पण आय आय टी अर्धवट सोडून महाशय घरी परतले. आयुष्यभर हिट चित्रपट देणारे नासिर हुसैन “जमाने कॉ दिखाना है” , “जबरदस्त” आणि “मंझिल मंझिल “ च्या अपयशाने खचून गेलेले. आपला काल संपलाय, हे समजलेल्या हुसैन यांनी आपल्या हुशार पुतण्याकडे पुढच्या चित्रपटाची कमान सोपवली. ‘कयामत सें..” हा एक प्रकारचा जुगार होता. नवी हीरोईन, लहानग्या भूमिकांचा अनुभव असणारा पुतण्या असणारा आमीर हिरो, नवथर संगीतकार-गायक असा सगळा मामला. पण मन्सूरने नवा काळ ओळखून प्रेम कहाणीला नव्या स्वरुपात पेश केलं, आणि सर्वांची वाहवा मिळवली. संगीतकार आनंद मिलिंद ह्यांना नव्याने संधी देत त्याने कर्णमधुर संगीताचा नवा ताजा नजराणा प्रस्तुत केला. “कयामत सें..” मध्ये देखील दिग्दर्शक आणि पटकथाकार मन्सूर च्या हुशारीच्या खुणा जागोजाग दिसल्या. पण त्याच्या लेखक- पटकथाकार व दिग्दर्शनाच्या भूमिकेतलं सर्वोच्च शिखर म्हणजे “जो जीता..”
“जो जीता ..” चं कथानक पूर्णतः भारतीय वाटावं, असं आहे. पण मुळात “जो जीता ..” हा हॉलीवूडच्या १९७९ साली आलेल्या “ ब्रेकिंग अवे” ह्या सिनेमावर आधारलेला होता. तरीही ह्या चित्रपटाचा पूर्ण अमेरिकन प्रभाव काढून कुठल्याही भारतीय हिल स्टेशन वर हा सिनेमा घडू शकेल, इतकी परिचित अवकाश मन्सूरने त्याला प्राप्त करून दिला. “ब्रेकिंग अवे” हा सिनेमा १९८० च्या ऑस्कर सोहोळ्यात गाजला होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनाचे नामाकन ह्या चित्रपटाला होते. चित्रपटासाठी पटकथालेखनाचा ऑस्कर पुरस्कारही ह्या चित्रपटाला मिळाला. “ ब्रेकिंग अवे” चं कथानकही मोठं मजेशीर आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातल्या एका शहरातील नायकाची ही कथा आहे. नायकाचे पिता ह्या शहरातल्या खाणीत काम करून पुढे आलेले. नायक व त्याची चौकडी आपलं शालेय शिक्षण संपवून चकाट्या पिटत आहेत. शहरात नव्याने स्थापन झालेल्या युनिवर्सिटीत शिकायला येणारे तरुण हा त्यांच्या मत्सराचा विषय. चुनखडकाच्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यात उड्या मारून वेळ घालवणारे हे टोळके, त्याच चुनखडकाने बनवलेल्या युनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यांना उपहासाने “कटर्स” म्हणून संबोधले जाते. खाण कामगारांची मुलं असल्याने शिक्षण व चांगल्या आयुष्याची संधी नाकारली गेलेली मुलं युनिव्हर्सिटीत असणार्या परक्या मुलांविषयी जी असूया बाळगतात, त्या असुयेच्या धाग्याला मन्सूरने पकडले, व हिल स्टेशनवर मोठ मोठ्या पब्लिक स्कूल मध्ये शिकणारी बडयांची मुलं व प्रत्यक्ष तिथे रहाणाऱ्या स्थानिक मुलांच्या सुप्त संघर्ष त्याने आपल्या कथेत रोवला. “ब्रेकिंग अवे” सिनेमातला नायक “संजय लाल” ह्या व्यक्तिरेखेच्या मानाने बराच सरळ, भलताच पापभिरू आहे. युनिवर्सिटीत जाणारी एक मुलगी आवडल्यावर, तिला आपण “कटर” आहोत हे कळू नये, म्हणून तो तिला आपण इटालियन आहोत असं खोटंच सांगतो, हा धागा मन्सूरने तसाच्या तसा “ जो जीता..” मध्ये वापरला आहे. परंतु, संजय लाल च्या भोवती असणारे त्याचा भाऊ, त्याची प्रेयसी, वडील ह्या सर्व व्यक्तिरेखांचा जो विकास मन्सूरने केला आहे, तो सर्वस्वी त्याचा आहे. चित्रपटाच्या शेवटी असलेली उत्कंठावर्धक रेस ही दोन्ही चित्रपटात असली, तरी मन्सूरने ती रेस जास्त प्रभावीपणे चित्रित केली आहे. क्लायमॅक्स च्या दृश्यात जेव्हा आमीर आणि दीपक तिजोरी एकमेकांजवळ येतात, तेव्हा संपूर्ण चित्रपट गृह आमीरने जिंकावं म्हणून त्याला चीयर अप करत असे. भारतीय सिनेमात खेळाचं इतकं चांगलं चित्रण त्याआधी कुणी केलं नव्हतं. लगान चा क्लायमॅक्स देखील बर्यापैकी जो जीता च्या अखेरच्या दृश्याशी साधर्म्य ठेवणारा आहे.
“जो जीता..” च्या लेखनात मन्सूरला एकाहून एक सुरेख व्यक्तिरेखा लिहिण्याची संधी मिळाली. वेळप्रसंगी एक दोन संवादच बोलणाऱ्या, पण लक्षात रहाणाऱ्या व्यक्तिरेखा ह्या सिनेमात आहेत. पण त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं महत्त्व अनन्य साधारण आहे. उदाहरण म्हणून चित्रपटात असरानी आहे, पण त्याचा “असरानी” पणा दिसत नाही. कुलभूषण खरबंदा ह्यांच्याकडून त्याने पित्याची भूमिका मोठ्या कसबीने करून घेतली आहे. विशेषकरून काही भावनामय प्रसंगातही मेलोड्रामा न होऊन देता संयमितपणे अभिनय करून घेणं त्याला जमलं आहे. दीपक तिजोरी, मामिक ( सध्या हा काय करतो कुणास ठाऊक!) आणि चक्क पूजा बेदी (!!!) ह्यांच्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ठ अभिनय त्याने ह्या चित्रपटात करून घेतला आहे. मुळात व्यक्तिरेखा पाहून अभिनेत्याला निवडण्याचं त्याचं कसब त्याला कारणीभूत आहे. आयेशा झुल्काने ह्या चित्रपटानंतर केलेले चित्रपट पाहून तिने एकाच चित्रपटानंतर चित्रपट सन्यास का घेतला नाही असं म्हणण्याची पाळी आणली. ह्या चित्रपटात मात्र गर्ल नेक्स्ट डोर ची भूमिका ती अक्षरशः जगली आहे. गॅरेज वाल्याची मुलगी शोभेल अशाच कपड्यात ती चित्रपटभर वावरली आहे. ह्या सगळ्यांच्या अभिनयाला आणि मसूरच्या लेखनाला सहायभूत ठरले आहेत ते ह्या चित्रपटाचे संवाद. मजेची गोष्ट अशी की विशी च्या आतल्या तरुणांची कथा सांगणाऱ्या ह्या चित्रपटाचे संवादलेखन केले होते चक्क साठीच्या पलीकडे असणार्या नासिर हुसैन ह्यांनी. चित्रपटभर केवळ तरुणाईची बोल भाषा त्यांनी कशी लिहिली, हे एक न उमजणारं कोडं आहे. पण शेवटी वय केसांच्या रंगावर आणि वाढत्या सुरकुत्यांवर ठरत असतं, तर ऐन ७३ व्या वर्षी मजरूह सुलतानपुरी ‘पहला नशा, पहला खुमार’ अशा सोप्या पण कोवळ्या प्रेमाला संपूर्णपणे व्यक्त करणार्या शब्दातलं अजरामर गीत रचू शकले नसते.
“जो जीता..” च्या विषयी बोलावं, आणि त्याच्या संगीताचा उल्लेख न करावा , हे शक्य नाही. “कयामत सें..” च्या यशानंतर आनंद मिलिंद ह्यांच्या मर्यादा ( बहुधा त्यांनी स्वत:हूनच) त्यांच्या पुढच्या कामातून दाखवून दिल्या होत्या. म्हणूनच असेल कदाचित, पण मन्सूरने जतीन –ललित ह्या नव्या सुरेल जोडगोळीला “जो जीता..” मध्ये संधी दिली. जतीन –ललित ह्याआधी यारा- दिल्दाराच्या संगीतामुळे थोडेफार प्रसिद्ध झाले होते. संगीत चाललं असलं, तरी पिक्चर पार झोपलं होतं. ह्या सिनेमात मात्र त्यांनी जीव तोडून आपलं सर्वोत्कृष्ठ दिलं. “यहां के हम सिकंदर” असो की “पहला नशा”..तरुणांच्या जाणीवांना संपूर्ण आविष्कृत करणारं संगीत त्यांनी दिलंच, सोबत वयाला न शोभणारं , धीरगंभीर “रुठ के हमसे कभी “देखील दिलं. मजरूह ह्यांनी आपल्या बोजड उर्दूचा मारा न करता तरुणांच्या तोंडात रुळणार्या शब्दांचा वापर करत त्याचं बंडखोरीचं तत्वज्ञान शब्दातून उमटवलं. “यहां के हम सिकंदर’ मधनं बाहेर येणारा भूमिपुत्र असल्याचा अभिमान असो की “जवान हो यारो, ये तुमको हुवा क्या “अधला दुर्दम्य आशावाद, दोहोनाही मजरूह यांच्या शब्दांनी प्राण दिले. नासिर हुसैन च्या चित्रपटात असणारी गाण्यांची मेलडी हा त्यांच्या चित्रपटांचा एक हाय पोइंट मानला जात असे. ( हम किसीसे कम नही, यादोकी बारात, जमाने कॉ दिखाना है मधली एकामागून एका येणारी गाणी आठवा). त्याचा यशस्वी फॉर्म्युला मन्सूरने कोलेज फेस्टिवल्स मध्ये रंगणार्या इंटर कोलेजीएट कोम्पीटीशन च्या स्वरुपात वापरला. नवतेचा अंगीकार करताना परंपरेला पुढे नेत नेत विशी मधले संगीतकार आणि सत्तरीतला गीतकार ह्यांनी नव्वदी मधला सर्वात सुरेल साउंड ट्रॅक जन्माला घातला. “जो जीता..” चं संगीत चित्रपट तितकासा न चालूनही आजही विकलं जातं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे ते चित्रपट पहाताना ठिगळं लावल्यासारखं येत नाही.
जो जीताच्या टीमचा ‘तारुण्य” हा स्थायीभाव होता. नंतर इंडस्ट्रीत नावारूपाला आलेले कित्येकजण “जो जीता ..” मध्ये कॅमिओ करताना सापडतात. चित्रपटाचे संगीतकार जतीन व ललित, आमिरचा लहान भाऊ फैसल, आमीरच्या छोट्या असतानाच्या भूमिकेत इम्रान खान, “अरे यारो” गाण्यात मागे समूह नर्तीका म्हणून नाचणारी मारिया गोरेट्टी, क्रीडा समालोचन करणारा अमोल गुप्ते..आणि असे बरेचजण !.. मामिकच्या भूमिकेसाठी आधी अक्षय कुमार चा तर दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी आपल्या मिलिंद सोमणचा विचार झाला होता असं म्हणतात. आयेशा झुल्काच्या भूमिकेतही आधी गिरिजा नावाची दाक्षिणात्य अभिनेत्री काम करणार होती. “जवा हो यारो..” ह्या संपूर्ण गाण्यात ती नाचली देखील आहे. तिने चित्रपट सोडला..पण मन्सूरने ते गाणं मात्र तसंच ठेवलं.. चित्रीकरणाच्या दरम्यान दुसऱ्याच चित्रीकरणाला जाऊन बसलेली नृत्य दिग्दर्शिका सरोज खान येत नाही, हे मन्सूरने पाहिलं, आणि सरळ आपल्या नृत्य कुशल अशा सहायक दिग्दर्शिकेला नृत्य दिग्दर्शन करण्यासाठी पाचारण केलं. पुढे ह्या सहायक दिग्दर्शिकेने, म्हणजेच फराह खान ने हिंदी सिनेमाला पहला नशा सारखं सर्वोत्कृष्ठ चित्रित केलेलं गीत दिलं. पहिल्या प्रेमाची स्वप्नमय अनुभूती देण्यासाठी संपूर्ण गाण्यात स्लो मोशन चा वापर करण्यात आला. ह्याआधी “जोगी ओ जोगी” ह्या मेहमुद अभिनित हिंदी गाण्यातही स्लो मोशनचा वापर केला गेला होता..पण तो संपूर्ण गाण्यात नसून , तुकड्या तुकड्यात होता..आणि अर्थात, प्रसंग, गीत, संगीत आणि एकूण परिणाम ह्या दृष्टीने पहला नशा शंभर पटीने उजवं होतं.
अर्थात, ‘जो जीता..’ मध्ये दोष नव्हतेच, असं म्हणता येत नाही. तोकड्या कपड्यातली मुलगी “हिरो” ला शोभत नाही. त्याला आपली घरंदाज, अंगभर कपडे घालणारी सोज्वळ नायिकाच मिळणार ह्या बॉलीवूड धारणेला तोडण्याची हिमत चित्रपट दाखवू शकला नाही. पूजा बेदी च्या व्यक्तिचित्रणात हा दोष लोकानुनयासाठी करावा लागला होता. संजय लाल आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ऐन शर्यतीत ढिशुम ढिशुम स्टाईल ने मारतो, हे ही थोडं चित्रपटाच्या सुरात रसभंग करणारच ठरलं.
असं असूनही, “जो जीता..” मध्ये भावना होत्या, नाटय होतं, उत्तम संगीत, देखणी लोकेशन्स, सुरेख गीत, त्याचं तितकाच सुरेख चित्रण होतं..पण चित्रपट चालला नही. आमीरच्या अभिनयाचं सर्वानी कौतुक केलं होतं. आपल्यालाच फिल्मफेयर मिळणार म्हणून मोठ्या उत्साहाने आमीर सोहोळ्याला पोचला होता. त्याने चक्क जुही चावला सोबत फिल्मफेयर ला “लाइव” पर्फोर्मंस पण दिला. कार्यक्रमाच्या कळसाला डिम्पल ने विजेत्याच्या नावाची नोंद असणारं पाकीट न उघडताच अनिल कपूर चं नाव सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून जाहीर केलं. सिनेमा होता “बेटा”. अनिल ने हा पुरस्कार विकत घेतलाय हे सूचित करायला डिम्पल चं हे कृत्य पुरेसं होतं. सर्वोत्कृष्ट सिनेमा वगळता ह्या सिनेमाला एकही फिल्मफेयर मिळालं नाही. अगदी संगीताचंही नाही. ते गेलं महामहीम नदीम श्रवण ह्यांना ‘दिवाना’ सिनेमासाठी. पहला नशा आपल्या आवाजाने अजरामर करणार्या उदित नारायणला देखील पुरस्कार मिळाला नाही. तो मिळाला रेकॉर्डतोड गायक श्री कुमार शानू ह्यांना ..’सोचेंगे तुम्हे प्यार..” ह्या गाण्यासाठी. ह्यावर वेगळ्या टिप्पणी ची आवश्यकता नसावी. साक्षात स्वरसाम्राद्नी दिदिना जेव्हा उदितचं पारीतोशिक हुकल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी स्वत:हून उदितला फोन लावला नि त्याचं सांत्वन केलं. त्याने त्याचं दुख हलकं झालं असावं.
त्यानंतर, आमीर कधीच फिल्म्फेयर मध्ये दिसला नाही. लाईव्ह पर्फोर्मंस करणं तर सोडूनच द्या. फिल्म्फेयरची किमतही सामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून साफ उतरली. आमीर स्वत:च्या भूमिकेकडे जास्त लक्ष देऊ लागला. अपयश पचवून त्याने भरारी मारलीच.. दुःख एवढंच वाटतं, की मन्सूर मात्र ह्या अपयशातून बाहेर पडला नाही. ह्यानंतरही त्याने “अकेले हम, अकेले तुम” आणि “जोश” सारखे दोन सिनेमे केले. पण त्याचा “स्पार्क” दिसला नाही. मध्यंतरी त्याने नर्मदा आंदोलनात भाग घेतल्याच्या बातम्या होत्या. सध्या तो काय करतो, कुणास ठाऊक.
“जो जीता..”च्या पोस्टरवर दोन्ही गुढघे उंचावून उडी मारणार्या आमीरची छबी होती. त्याला कॉपी कर्ण्याच्या नादात कित्येक कोलेज्कुमारांनी आपले गुढघे फोडून घेतले होते. मन्सूरचा गुढघा अजूनही रक्तबंबाळ आहे...
- अमोल कडू( kadooamol@yahoo.com)

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

छान लेख. आमच्या टीनएज काळाची आठवण करून देणारा... या चित्रपटातील आयेशा झुल्का फार आवडली होती.

गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी!!!! अंमळ हळवा झालो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय निर्मळ स्मरणरञ्जन आणि चित्रपटामागील घटनाञ्चा माहितीपूर्ण मागोवा ! खूप आभार.
'ऐसी अक्षरे' वर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रेकॉर्डतोड गायक" हे विशेषण फारच आवडलं. फराह खानची सुरूवात अशी झाली हे माहित नव्हतं; तिचं नृत्यदिग्दर्शन आवडतं. ('लक बाय चान्स' या चित्रपटातलं लक्ष्मी हे कोंकोणाच्या मैत्रीणीचं पात्र फराह खानवर आधारित आहे का?)

'जो जिता' मी फारच उशीरा बघितला. त्यामुळे तसं या चित्रपटातलं फारसं काही आवडलं नाही; खूप काही खटकलं असंही नाही. त्यातल्यात्यात सदैव टप्पूगिरी करणारा नायक आवडावा तर तो नेहेमी मेहेनत करणार्‍याला हरवतो हे खटकत रहातंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी वर स्वागत!
'जो जीता'च्या निमित्ताने तत्कालिन चित्रजगतात स्वैर फेरफटका मारणारा लेख आवडला!
अजून असेच लेखन येऊ देत

बाकी मला वाटायचं आमीर रंगीला नंतर फिल्मफेयरमध्ये दिसला नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त आहे लेख. अजून येऊ द्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गिरिजा म्हटल्यावर आत्ता माझी ट्युब पेटली !
ही मुलगी सर्वप्रथम मणिरत्नमच्या 'गीतांजली' (१९८९) या तेलगू चित्रपटात आली. हा चित्रपट खूप गाजला. त्याची 'याद रखेगी दुनियाँ' ही भयाण नक्कलही हिन्दीत येऊन गेली. (हा हिन्दी चित्रपट 'रुख्सार'चाही पहिला चित्रपट बहुतेक. ही रुख्सार तीच जी रामूच्या 'सरकार' मध्ये के.के. मेननच्या बायकोच्या भुमिकेत आहे.)
तर ही गिरिजाची भूमिका अतिशय सुन्दर आहे. भुमिकेतला खोडकरपणा, चञ्चलता यात ती चपखल बसते. तिचे टप्पोरे काळेभोर डोळे तर काय... हाय !
हा, हा आणि हा प्रसङ्ग पाहा. संवादानुवादाची गरजच नाही. केवळ मणिसाहेबाञ्च्या दिग्दर्शनातून आणि इलैयाराजाञ्च्या पार्श्वसङ्गितातून सगळे साहजिक उलगडत जाते.

अशी गुणी अभिनेत्री या 'गीताञ्जली' नन्तर एक-दोन चित्रपट करून ती गायबच झाली. ती इथे 'जो जिता..' मध्ये आली आहे, हे माहितीच नव्हते !! (माझा हा फारसा आवडता चित्रपट नव्हे.). आत्ता तुमच्या लेखामुळे पुन्हा 'जवाँ हो यारों' हे गाणे बघितले आणि खरोखरीच ती दिसली. त्याबद्दल धन्यवाद !
आयेशाने काम चाङ्गले केले आहे यात वादच नाही. पण गिरिजेने तेच काम कसे केले असते हे आता कधीच कळणार नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जो जीता...' प्रदर्शित झाला आणि मी पाहिला तेव्हा तो चित्रपट कळण्याचं माझं वय मुळीच नव्हतं. त्यातल्या त्यात ती सायकलची स्पर्धाच तेवढी बर्‍यापैकी आठवते. काही प्रसंग सोडता, लेखात उल्लेखलेले बरेचसे प्रसंग आठवतही नाहीत. पण या लेखामुळे आता हा चित्रपट परत अथपासून इतिपर्यंत पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

आमीर खान ~ ज्याचा जन्मच मुळी एका अशा घरात [नासिर हुसेन] झाला आहे की, त्या घरातील कण न कण हिंदी चित्रपटसृष्टीच्या घडामोडीशीच निगडीत आहे..... तिथेच त्याला अभिनयाचे बाळकडू मिळाले, चित्रपटांच्या अनेक तांत्रिक बाबी त्याने समजूनउमजून घेतल्या, उमेदवारी करतानाही त्याला पक्के माहीत होते की आपल्याला इथे पाय रोवण्यासाठी 'झगडा' नामक चेटकिणीशी कधीच दोन हात करावे लागणार नाहीत, कारण घराणेच निर्मितीशी संबंधित, त्यामुळे सेटवर पहिल्या दिवशीची 'एंट्री' अगदी एसी कारमधूनच....चित्रपट उद्योगधंद्याचे नीतिनियम आणि ज्ञानाच्या विविध शाखा जिथे हात जोडून उभ्या आहेत..... अशा आमीर खानला त्या अत्यंत बाजारी तसेच कुचकामी 'फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड' ची पूर्वपिठिका माहित नसेल असे अजिबात संभवत नाही.

मुंबईच्या त्याच्या शालेय कॉलेजजीवनात आपल्या मित्रांसमवेत कॅन्टीन जिमखाना गप्पा मारत असताना अशा अ‍ॅवॉर्ड सेरेमनीजला 'नासिर हुसेन' वलयामुळे आपल्याला षण्मुखानंद हॉलमध्ये हजेरी लावणे किती सोपे जात असे याचे दिलखुलास वर्णन त्याने साजीद खानबरोबरीच्या गप्पामध्ये आमीरने केले होते....म्हणजे मग समवयस्क मित्रांना माहीत नसेल इतका फिल्मफेअरचा इतिहास त्याला मुखोदगत असणार हेही आलेच. 'मुघले आझम' साठी 'मधुबाला' ला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार न देता तो बीना रॉयला "घुंघट' साठी देणे, त्याच चित्रपटाच्या संगीतासाठी नौशादला डावलून ते शंकर-जयकिशन जोडीला देणे......पुढे तर याच एस.जे. यानी 'पाकिझा' सारख्या सर्वांगसुंदर संगीताने नटलेल्या चित्रपटाला मागे टाकून आपल्या "बेईमान" नामक एका रद्दीसम चित्रपटाच्या संगीतासाठी फिल्मफेअर मिळविणे.....त्याचा संताप येऊन प्राण या अभिनेत्याने 'पाकिझा' ची बाजू घेऊन स्वतःला मिळालेला पुरस्कार तिथे स्टेजवर जाऊन न स्वीकारणे....त्यामागील कारणही स्पष्टपणे सांगणे. या सार्‍या हुसेन घराण्याच्या डायनिंग टेबल गप्पांचा अविभाज्य घटक बनल्या असणारच....मग ज्याला इतके ज्ञान आहे त्याने आपल्या चित्रपटाला डावलून अनिल कपूरने ते 'बेटा' साठी मिळविले म्हणून कसलाही त्रागा करण्याचे कारण नाही...... 'जो जिता वो सिकंदर....' हे जसे त्या चित्रपटाचे ब्रह्मवाक्य होते, तद्वतच बाय हूक ऑर बाय क्रूक ते पारितोषिक आपल्याला मिळावे म्हणून अनिल कपूर याने प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वी झाला याचा अर्थ तो स्वतःला 'सिकंदर' समजणारच. पराभूताने त्याबद्दल आक्रस्ताळेपणा करून 'मी इथून पुढे फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस स्वीकारणार नाही....' असे जाहीर करणे बालीशपणाचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0