... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी
खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे.
"आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...",
"मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...",
किंवा
"हसायलाच लागल्या नं ग चकल्या! मग सऽऽगळं बाजूला ठेवून पर्रत आधण ओतलं भाजणीवर. पहाटेचे चार वाजले चकल्या हो व्हायला. पण मी हार मानली नै..."मधली हौतात्म्याची हौस मला काही केल्या कळतच नसे. हापिसातून येऊन, स्वैपाक उरकून वर हे घाणे घालायचे. त्यात हमखास यशाची हमी क्वचित. ’चकल्या पोटात मऊ राहतायत की काय’ नि तत्सम धास्ती प्रत्येकीच्या पोटात. बरं, पदार्थ तरी एकमार्गी होण्यातले आहेत? भाजण्या भाजा (”चंगली मंद आचेवर खमंग भाज बाई!"), "कणकेवर घालू नकोस रे, चिकट होईल पीठ" असल्या बजावण्या देऊन त्या दळून आणा, पोहे भाजा किंवा तळा, बेसन भाजा, पाक करा, पिठं भिजवा, फोडण्या करा, मसाले करा, खोबरं, खसखस, डाळं, काजू, शेंगदाणे, बेदाणे... नाना तर्हा. इतका सगळा कुटाणा करून पदार्थ नीट होण्याची ग्यारण्टी नाही ती नाही. फेकून मारण्याजोगे लाडू, खुळखुळे झालेल्या करंज्या, हसर्या चकल्या... असं कुणाचंही काहीही होऊ शकतंच.
त्यामुळे स्वैपाकाची माफक हौस असूनही मी फराळावर बाहेरून प्रेम करणं पसंत केलेलं. हवेत मस्त चुरचुरीत थंडी असते. उत्साही कारट्यांच्या केपांच्या पिस्तुलांचे आवाज असतात. कुणीतरी भाजत असलेल्या बेसनाचा खमंग दरवळ असतो. आपण दिवाळी अंक वगैरे घेऊन पहुडावं (पोज: हिंदी सिनेमातल्या हिरविणी पालथ्या पडून, मागे लाडीकपणे हवेत तंगड्या उडवत लोळतात, ती. मान्य आहे, आपण तितके नाजूक दिसू शकत नाही. पण विश्वास ठेवा, कैच्याकै आरामशीर वाटतं). आतून चिवड्याच्या (किंवा जे काही चांगलं जमलं असेल / बाजारातून आणलं असेल ते) बश्या भरभरून आणाव्यात नि ’हल्ली दिवाळी अंकांना काही दर्जाच राहिला नै बॉ’ असली आनंदी कुरकुर करत फस्त कराव्यात, असलं आमचं एकतर्फी प्रेमप्रकरण.
यंदा मला काय हुक्की आली (प्लीज नोट: दुर्बुद्धी सुचली, असा शब्दप्रयोग केलेला नाहीय), आपणपण फराळ करून बघू, म्हणून मी स्वैपाकघराकडे मोर्चा वळवला. तिथल्या पदाधिकार्यांच्या भिवया उंचावर गेल्या. पण प्रवेश मिळाला. ’दर कृतीमागे निदान पाचेक तरी सल्ले’ सहन करायची तयारी ठेवावी लागणार होती. पण माझी इच्छा प्रामाणिक नि तीव्र असल्यानं तेही मान्य केलं. ’बिघडण्याची शक्यताच नाही’ अशी खातरी ऊर्फ ख्याती असलेल्या शेवेला हात घातला नि पहिल्याच घासाला खडा लागला.
"बेसन चाळून घे."
हे असले पालथे धंदे मला जाम बोअर होतात. थेट कशात काय ते घाला, भिजवा, तळा नि मोकळे व्हा ना. चाळा म्हणे. (मागे उत्साहानं मेंदीच्या क्लासला म्हणून एका गुजरातणीकडे गेले होते. चित्रकलेच्या कृपेनं डिझाईनचा काही वांधा नव्हता. ते नक्षीचे पॅटर्न्स शिकेपर्यंत आमचे संबंध गुण्यागोविंदाचे राहिले. पण कोन बनवायला शिकण्याशी गाडं येऊन ठेपलं नि ठेपलंच. ज्या मेंदीचा कोन बनवायचा, ती मेंदी भिजवायच्या आधी म्हणे सात वेळा मलमलीच्या फडक्यातून गाळून घ्यायची. फडक्यातून? सात वेळा? इतका रिक्काम** धंदा बघून संतापानं माझ्या तोंडाला फेस यायचा तेवढा शिल्लक होता. पुढे आमच्यात जे काही संभाषण झालं ते सांगण्यात काही अर्थ नाही. पुढे ’श्रीमती’ नामक कंपनीनं उत्तम रंगणार्या नि न अडकणार्या मेंदीचे कोन बाजारात आणून हा प्रश्न कायमचा निकालात काढला. असो.)
तर बेसन चाळलं. गुठळी होऊ न देता भिजवलं. साधारणपणे थालीपिठाच्या भाजणीहून थोऽडं सैल आणि भज्यांच्या पिठाहून बरंच घट्ट असं ते असावं. (काही जातीचीच दुष्ट, मांसाहारी फुलं असतात पहा - त्यांचे परागकण इतके चिकट असतात, की मधाच्या मोहानं तिथे गेलेला भुंगा वा फुलपाखरू त्यावर जाऊन बसलं की त्या परागकणांतून त्याला काही केल्या बाहेर येता येत नाही. जितके हातपाय हलवेल, तितकं ते अजूनच फसत जातं नि अखेर फुलाच्या भक्ष्यस्थानी पडतं. त्या फुलपाखराला तेव्हा नेमकं कसं वाटतं ते जाणून घ्यायचं असेल, तर शेवेचं पीठ भिजवण्याचा एक्सरसाईज करून पाहण्यासारखा आहे. तर पुन्हा, असो.)
मग सोबत एक कुंड्या पाण्यानं भरून घेतला. (शेव करताना किमान तेरा हजार वेळा तरी पिठानं बरबटलेले हात धुऊन घ्यावे लागतात. आपण स्वतःलाच लेडी मॅकबेथ वाटायला लागतो. शिवाय हात पुसायला घेतलेला नॅपकीन हरवतो नि गाऊन दोन्ही बाजूंनी ओलाचिंब + बेसनचिंब होतो.) एक छानसा चमचा घेतला. चमचा पाण्यात बुडवून मग त्या चमच्यानं भिजवलेलं बेसन घेतलं नि सोर्यात भरलं. (चमचा पाण्यात बुडवून घेतल्यामुळे चमच्याला बेसन चिकटत नाही, अशी आकाशवाणी होती. पण तसं काहीही होत नाही. शेवेकरता भिजवलेलं बेसन गोंद म्हणून वापरायला हरकत नाही इतकं चिकट असतं नि ते जगात शक्य त्या सगळ्या ठिकाणी चिकटतं.) तापत टाकलेल्या तेलाच्या तापमानाचा अंदाज घेऊन (बेसनाचा थेंब तेलात टाकल्या टाकल्या उत्साहानं फसफसत वर आला की, तेल तापलं म्हणावं.), भरला सोर्या हाती घेऊन मी तेलात शेव पाडायला सज्ज झाले. तेव्हा पहिला साक्षात्कार झाला की, तळणाचे पदार्थ करायला माझी उंची कमी पडतेय. मग सोर्या बाजूला ठेवून आधी पायाखाली पाटाची प्रतिष्ठापना केली. तोवर तेलातून वाफ यायला लागली होती. म्हणून ग्यास बारीक करून तेल पुनश्च पूर्वीच्या तापमानाला आल्यावर मी सोर्या दाबला. काहीच होईना. दातओठ खाऊन दाबला. जिवाच्या आकांतानं दाबला. तेव्हा कुठे शेवेचं डोकं बाहेर येताना दिसायला लागलं. (शटप! आय नो.)
"पीठ सैल करायला हवंय." आकाशवाणी. माझा तिळपापड. पुनश्च पीठ-फुलपाखरू-पीठ-हात धुणे सव्यापसव्य. बॅक टू ’सोर्या भरून सज्ज’ स्टेप.
एकाच वेळी सोर्या योग्य त्या प्रमाणात दाबणे, तापल्या तेलात शेव पाडवताना एकाच ठिकाणी पिठाचे गोळे होऊ न देता - हात गोल गोल फिरवत कढईभर शेवेचं चाक तयार करणे आणि उडू शकणार्या तेलापासून + वाफेपासून स्वतःचा हात वाचवणे - ये अपने आप में एक साधना का विषय है.
काहीही आक्षिडण घडू न देता मी हे जमवलं नि धन्य होऊन स्वतःवर खूश होत उभी राहिले, तोच आकाशवाणी, "अग, अग! उलट की. करपली बघ!" च्यामारी! म्हणजे श्वास टाकायचीही सोय नाही म्हणा की.
तर त्या चाकातून बुडबुडे येणं कमी झालं की ते चाक अलगद उलटायचं. ग्यास कमी करायचा. नि शेव जराही लालसर होऊ न देता एका नियत क्षणी ते चाक झार्यानं उचलायचं. दुसरा कालथा किंवा चिमटा दुसर्या हाती घ्यायचा नि ते चाक तळणीच्या वर धरून त्यातलं तेल निथळवून टाकायचं. मग शेजारी जुनं वर्तमानपत्र घालून सज्ज ठेवलेल्या परातीत ते अलगद ठेवायचं. मग सोर्या पुन्हा भरायचा. हात धुऊन तळणीकडे. साधारणपणे साडेचौथ्या चाकापासून शेव कढईत पाडल्यापाडल्या सोर्याकडे धावून त्यात बेसन भरणं नि पुन्हा शेव जळायच्या आत तळणीकडे जाणं जमू शकतं. ते जमेस्तोवर तेल अनेकवार धुरावून आपला प्राण काढतं.
हे तंत्र जमेस्तोवर माझ्या शेवेची पहिली तीन चाकं इस्टमनकलर होऊन बसली होती. पण तितकी किंमत माफक समजावी. अखेर शेव जमली, हे खरं!
मग धीर चेपून मी चकलीला हात घातला. त्या प्रांतात म्हणे नशिबाचा वाटा फारच मोठा असतो. त्यामुळे भाजणीवर आधण ओतून ती मळण्यापर्यंतच्या पायर्या माझ्या सहभागाविना पार पडल्या. चकली तळण्याच्या तंत्रातही मोठ्या प्रमाणावर संयमाची आवश्यकता असल्यामुळे (बरोब्बर! मंद आचेवर.) मला तिथे प्रवेश नव्हता. ("च्च् च्च्! नको ग! तुला नाही जमणार. तुला सगळी घाई असते. पोटातून कच्च्या काढशील नि एक घाणा काढून ’हुड! फार वेळ लागतो बॉ’ म्हणून चालती होशील. मग ते कुणी निस्तरायचं? हो बाजूला.") चकल्या पाडून देण्यावर सौदा तुटला. शेवेच्या अनुभवामुळे मी आत्मविश्वासानं सोर्या हाती घेतला.
राईट! दाबला. नथिंग. जोर काढून दाबला. प्राणपणानं दाबला. दातओठ खाऊन दाबला. सोर्यावर ऑलमोस्ट उभी राहिले मी. पण चकली पडेना.
"पीठ सैल करायला हवंय," माझा माफक सूड काढण्याचा प्रयत्न + अनुभवातून आलेला आकाशवाणीला सल्ला देण्याचा आत्मविश्वास.
"अहं, घट्ट असतं पीठ चकलीचं. काढ जोर. नसलं जमत तर दे इकडे." आकाशवाणी.
स्वाभिमान दुखावला जाऊन मी तळवलकरांकडे वर्षानुवर्षं वाहिलेल्या पैशांना शपथ घातली. अखेर चकली पडायला लागली. पण सोर्यावर विशिष्ट दाब, खाली पडणार्या पिठाची गोलाकार चकली व्हावी म्हणून एका सूक्ष्म कोनात हात गोऽल फिरवणे, चकली बरोब्बर अडीच वेढ्याची करून थांबणे (बाहेर येणारं पीठ एकदा बाहेर यायला लागलं, की इतक्या उत्साहात असतं की ते अचूक क्षणी थांबवणं हा एक विजयाचा क्षण असतो) नि हे सगळं करताना मधलं भोक शक्य तेवढं छोटं ठेवण्यासाठी एका हाताचा वापर करून चकली घट्टमुट्ट बांध्याची राखणे... सोपं नाही. ब्रह्मांड आठवतं. करून पाहा हवं तर.
मग त्या हसू नयेत म्हणून प्रार्थना करणे नि पेशन्सचा डाव लावून त्या मंऽऽऽऽऽद आचेवर तळणे. (हे करताना कंटाळा येऊ नये म्हणून ’काय बै लोकांकडच्या चकल्या... नुसत्या काळ्याकुट्ट / तेलकट्ट / कडक्क... खाववतं कसं कुणास ठाऊक बै!’ असा एक ढेकर देणारा, आत्मसंतुष्ट कार्यक्रम असतो. आपल्याच चकल्या बिघडल्या, तर काय करतात त्याची चुणूक मात्र सुदैवानं मिळाली नाही.) हे सगळं करून फायनली चकल्या आटोपतात तेव्हा माणूस अर्धमेला झालेला असतो.
मी मात्र मागलं आवरून, ओटा + भांडी घासून, फराळ भरून ठेवला. वरून तळणीचं तेल फुकट जाऊ नये नि पुन्हा पुन्हा तापवावंही लागू नये म्हणून त्यात हातासरशी फोडणी करून ठेवली, तेव्हा मला एकदम टीव्हीवर स्वैपाकाच्या फडतूस टिप्स द्यायला जाणार्या साटोपचंद्रिकांसारखं भलतंच आत्मविश्वासपूर्ण वाटायला लागलं. झाली एवढी अनुभवाची + आत्मविश्वासाची कमाई पुरे झाली अशी खूणगाठ बांधली नि मी नव्याच मायेनं दिवाळी अंकांकडे वळले (इथे 'लोळले' असं वाचावं).
फारच स्फुरण चढलं कधी, तर लाडवाच्या पाकाला आव्हान देऊन पाहणारेय मी, नाही असं नाही. पण एरवी आपलं मत महिला गृह उद्योगाला नक्की.
प्रतिक्रिया
मस्स्स्स्स्तं कुरकुरीत लेख !
मस्स्स्स्स्तं कुरकुरीत लेख ! जागोजागी फटाफ्फट फटाके उडत आहेत..
माझी आई चकल्या तळत असताना त्या पाडून तयार ठेवणे हा लहानपणी अनेक वर्ष आवडता उद्योग होता. त्यामुळे आई हे सारे करत असताना मी जवळून अनुभवले आहे. पुनर्प्रत्ययाबद्दल धन्यवाद.
आई अतिशय खुसखुशीत चकल्या करीत असे. काही वर्षाम्पूर्वी काय बिनसले माहीत नाही पण तिच्या सगळ्या चकल्या विरघळल्या.. तेंव्हापासून तिला जी एक भीती बसली त्यामुळे तिने चकल्या करणे थाम्बवले. आता मावशीच्या चकल्यांवर सगळी भिस्त आहे
'साटोपचन्द्रिका' शब्द खूपच आवडला. प्रथमच ऐकला. खूप खूप धन्यवाद.
सहमत
लेख भन्नाट. ज्यांनी चकल्या केल्या आहेत त्यांना तर वाचताना गहिवरुन येईल. पण प्रत्यक्षांत मात्र तुम्ही उत्कृष्ट चकल्या करत असणार याची लेखातल्या बारकाव्यांवरुन खात्री झाली. 'साटोपचंद्रिका, हसर्या चकल्या, इस्टमनकलर शेव,' हे अगदी नवीन आणि ओरिजिनल वाटले.
एक केमिस्ट म्हणून चकल्या करण्याच्या कृतीमधे 'रिसर्च' ला बराच वाव आहे असे वाटले. तेलाचे तापमान हे थर्मामीटरनेच मोजले पाहिजे असे माझे मत आहे. पण ते घरच्यांना पटणे अशक्य !
खुसखुशीत लेख.
माझी एक हसरी करंजी आठवली.

मजा आली वाचताना. स्वयंपाकघर
मजा आली वाचताना.
स्वयंपाकघर हे एक वेगळे क्षेत्र आहे कौशल्याचे हे फार आधीपासून पटलेले आहे
त्यामुळे 'महिला गृह उद्योगांना' सक्रय (म्हणजे त्यांच्या क्रयात सहभागी होऊन) प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे!
***
अब्द शब्द
_/\_
महान आहेस! साटोपचंद्रिका, इस्टमन कलर इ. तर कहरच.
गविंच्या ह्या लेखाची आठवण झाली चकल्यांवरून.
मेघना, भयंकर आवडला हा लेख. "
मेघना, भयंकर आवडला हा लेख. " आपण तितके नाजूक दिसू शकत नाही", इस्टमनकलर काय, सगळाच म्याडनेस आहे.
काही-ना-काही नवीन, विशेष खाद्यप्रकार शिजवताना माझीही अशीच फजिती झालेली आहे, सूचना कानावर आलेल्या आहेत त्यामुळे तर अगदीच आवडलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय गं!
कसला भन्नाट लेख लिहिलायस! शुक्रवारची सकाळ छान झाली.
बाकी रिक्काम** ही शिवी शिकवल्याबद्दल आभार, मनातल्या मनात द्यायला छान आहे.
आणि हे 'हसरी चकली' काय प्रकरण आहे ते सांग बाई एकदा.
राधिका
भारी!!!
दिवाळीची स्पेशल आताषबाजी!
__/\__
सत्राशे सहासष्ट वेळा मॅडसारखा वाचावा आणि हसत सुटावे असा लेख.
बर्याच दिवसांनी वाक्या-वाक्यावर फुटलो!
नेहमीप्रमाणे शि.सा.न.
आणि हो! ह्याप्पी दिवाळी!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+ १
तंतोतंत!
आमच्या घरच्या चकलीसारखाच (हो, फार कौतुक करून घेतलेली आहेत आजी-आईनं) प्रचंड खुसखुशीत लेख भयंकर आवल्डा! सगळेच पंचेस सुपरहिट आहेत! ह्याप्पी दिवाळी!
मस्त
मस्त!
_/\_
धमाल विनोदी लेख. साटोपचंद्रिकांच्या तुपकट भाषेला फाट्यावर मारून, जीत रिक्काम** आणि च्यामारी हे शब्द, रव्याच्या लाडवावर चिकटवलेल्या बेदाण्याप्रमाणे खुलून दिसतील अशी भाषा वापरल्याने तर बहारच आली.
दिवाळीचा फराळ खाण्यापेक्षा इतरांपेक्षा चांगला करणं हे अनेक बायकांना इतिकर्तव्य वाटतं. एखादी कंपनी आपल्या कॉंपिटिटरचं प्रॉडक्ट तपासून बघताना जितकं कौशल्य वापरेल तितकं खर्ची करून इतरांच्या लाडवांचा कडकपणा किंवा कमी-अधिक भाजलेपणा, चिवड्याच्या पोह्यांची जाडी व त्यामुळे येणारा चिवटपणा वा विशविशीतपणा, चकल्यांना मध्यभागी पडलेल्या भोकाची कन्सिस्टन्सी तपासली जाते. मग या कॉंपिटिशनमध्ये स्वतःला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात विजयी जाहीर करता आलं, की बास्स...
हाहाहा. धम्माल लेख पाडल्याय.
हाहाहा. धम्माल लेख पाडल्याय. १० /१०
मस्त!
मस्त!
लेडी मॅकबेथ
हा!हा!हा! स्वयंपाकघरातली लेडी मॅकबेथ डोळ्यासमोर उभी राहिली.
एकदम धमाल लेख! मजा आली -
एकदम धमाल लेख! मजा आली
- (चकल्या आवडणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
अप्रतिम
केवळ उच्च लेख आहे. एकदम पटेश आणि आवडेश.
सविता
मस्त लेख!
एकदम खुसखुशीत चकलीसारखा लेख! अगदी आमच्या घरातला प्रसंग आहे असं वाटलं. मात्र लहानपणापासून आई फराळ बनवत असतांना तिच्या मागेपुढे केल्यामुळे थोडी मोठी झाल्यावर चकल्या पाडणे, करंज्या भरणे, अनारसे करणे, लाडू वळणे, इ. इ. कामं मार्गदर्शनाखाली बरी जमत होती. आता तर अथपासून इतिपर्यंत स्वतःला करावं लागणार आहे. लेख वाचून थोडी नॉस्टॅल्जीक झाले.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
एकदम भारी.
लयभारी संज्ञाप्रवाही लेख आहे येकदम ! नाट्यछटाकार दिवाकर असते तर तृप्त झाले असते ! माझ्या सर्व आयामावशाबहिणीना पाठवतो आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'आकाशवाणी' आवडली
'आकाशवाणी' हे संबोधन फारच भिडलं. छान लेख.
हाहाहा सॉलीड!!! खूप हसले.
हाहाहा सॉलीड!!! खूप हसले.
हा हा हा हा
दिवाळीच्या दिवसातले आमच्या घरातले तणावपूर्ण स्वयंपाकघर आठवले. आईच्या चकल्या एकदा बिघडल्या होत्या, त्या वर्षी तिने दिवाळीत फराळाच्या कोणत्याचा पदार्थाला तोंड लावले नाही. आम्हाला काय खायला असले की काहीही आणि कसेही चालते.
मस्त!
पुन्हा-पुन्हा वाचावासा वाटणारा खमंग, खुसखुशीत लेख. अशाच एका 'आकाशवाणीच्या' पोटी आमचा जन्म झालेला असल्याने अगदी पोटातून हसू आलं. घरी असताना, दिवाळी जवळ आली की अगदी भयंकर टेन्शन यायचं कारण आईला एकटीला सगळं करणं झेपायचं तर नाही पण तिला मदत करायला जायचं म्हणजे अगदी अफजलखानाला भेटायला जाण्यासारखं असायचं. तळायला लागणारया पेशन्सवरून तर आमच्या कित्तेक दिवाळ्यांतल्या कटू आठवणी जाग्या झाल्या!
थ्यांकू आणि ह्याप्पी
थ्यांकू आणि ह्याप्पी दिवाळी!
मलापण लिहायला जाम धमाल आली.
बादवे, हसर्या चकल्या म्हणजे तळणीत अक्षरश: विरघळणार्या चकल्या.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सुरेख लेख
मस्त लेख. खूप आवडला. फराळाच्या पदार्थांपेक्षा जास्तच.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
मस्त लेख आहे. खमंग भाषा,
मस्त लेख आहे. खमंग भाषा, खुसखुशीत शैली, बदाम, काजु, बेदाण्यासारखा विनोदाचा सढळ वापर आणि घरच्या दिवाळीची आठवण करुन देणारी वातावरण निर्मिती!
एकही शब्द अधिक - उणा करु नये, असा लेख. परफेक्ट!
माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/
मस्त लेख!
फराळाचा कार्यक्रम वर्षातुन दोनदा घरी होतोच होतो. दिवाळी आणि गौरी-गणपतीसाठी! त्यामुळे लेख जराऽ जास्तच रिलेट झाला..
शेव करणं खुऽऽप सोऽप्पं प्रकरण आहे. अस बघताना वाटायचं. करायला गेल्यावर चटके कसे बसतात. ते करणाऱ्यालाच माहीत.(हे केलंय मी!)
थोडक्यात लेख प्रचंड आवडला!
हे जीवन सुंदर आहे..