तुम्ही किती व्यवस्थित आहात?

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा!!! फारच खुसखुशीत.
पेन तर सापडतच नाही. नेहमी कॉम्प्युटर उघडून नोटपॅड वर टाइप करावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय बोलावे देवा....
तीर्थवाला कोणी भेटला तर ठेवा माझ्यासाठी.पेन आणि किल्ली या गोष्टी वेळेवर न सापडण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत.किल्ली कित्येक वेळा मी गाडीलाच विसरून येतो ,ती ३,४ वेळा प्यांट बरोबर वाशिंग मशीन मध्येपण गेली आहे.घरातील सर्व पेन चालू करायला महिन्यातून एकदा रिफील्स आणतो आणि चालुझालेली पेन ४ दिवसात गायब होतात.फोन नंबर वर्तमानपत्रावर लिहायची सवय लागली आहे त्यामुळे आख्खी रद्दी धुंडाळावी लागते जर का काही हुकले तर .टी व्ही चे रिमोट मात्र मला सापडतात वेळेवर, ते बीन बॅग वर टाकून जातो मी, पायजम्या बरोबर तिथेच असतात. जातील कुठे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'व्यवस्थित'पणाची एक नाही, दोन नाही, थेट दहा उदाहरणं तुम्हाला सापडली (पर्याय म्हणून द्यायला) म्हणजे जगात इतके 'व्यवस्थित' लोक आहेत तर!! कसं व्हायचं त्यांचं? शिवाय त्यांना भरपूर वेळ मिळत असेल मोकळा, त्याचं काय करतात ते?

जाता जाता: ते तुम्हाला 'आता न सापडणारं' सर्वेक्षण 'व्यवस्थित' लोकांनी केलं होतं, की इतर लोकांनी? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यवस्थितपणाचा अर्क असलेले लोक माझ्या पहाण्यात आहेत.
एक गृहस्थ, रोज आंघोळीहून आल्यावर, फडक्याने बाथरुम कोरडी करुन ठेवत, मागच्याला त्रास होऊ नये म्हणून. घरी वर्तमानपत्रांची रद्दी इतकी व्यवस्थित ठेवलेली असे की पेपर वाचला आहे की तसाच गठ्ठ्यात ठेवला आहे असा प्रश्न पडे.
दुसरे एक गृहस्थ, दाराची बेल वाजल्यावर दहा सेकंदाच्या आत दरवाजा उघडत, त्यावेळी हातात गादी जरी असेल तरी त्याच्यासकट धावत जात, कारण बाहेरच्याचा खोळंबा होऊ नये म्हणून!
तिसरे एक गृहस्थ, गांवाहून आल्यावर, बूट तर जाग्यावर ठेवतच, पण आल्यापासून पंधरा मिनिटांत बॅग रिकामी करुन ती जाग्यावर जात असे.

माझेही दहापैकी दहा 'अ' आल्यामुळे तीर्थ विकायला ठेवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा मी आता विरक्त झालोय. मधुन मधुन व्यवस्थितपणाचा किडा वळवळत असतो. बायको पेन व टोपण यांची नेहमी फारकत करते. एक मोजा व दुसरा मोजा याची फारकत करते तेव्हा डोक फिरायच पण विरक्तिमुळे हे आता प्रमाण फारच कमी झालयं.
हल्ली तर मला मळकुट्या काढायचा पण कंटाळा येउ लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हा छुपा मारेकरी रोग अनेकांना जडलेला असतो खरा! अधूनमधून त्यावर कोणीतरी काहीतरी दोन पिंका टाकतात आणि गप्प बसतात. त्यामुळे या रोगाची तीव्रता खरा विदा जमा केल्याशिवाय समजत नाही. फारएण्डसारख्या समाजाची काळजी असणार्‍या लोकांनी यावर काही ठोस लिखाण केल्याशिवाय या रोगाचं उच्चाटन होण्याची स्वप्न पहाणंही अशक्य. अर्थातच, हा रोग मला झालेला नसल्यामुळे व्यवस्थितपणे या रोगाचा सामाजिक स्तरावर मुकाबला करणं मला शक्य नाही, परंतु व्यक्तिगत पातळीवर माझ्याकडून मी नेहेमीच प्रयत्न करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओसीडी?

त्यात 'छुपे' ते काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारिच.
दिवाळीचा दिवस चांगला खुशीत चाल्लाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कपडे वाॅशिंग मशिनमधे टाकून विसरणे. शेजारी वैतागवाडी चेहऱ्याने दारं टकटकवतातच - ओ तुमचे कपडे काढा. रात्रभर राहील्याने कपड्यांना दमट वास लागतोच मग परत पहिल्यापासून धुवावे लागतात.
.
कणीक नीट तिंबुन थोडा वेळ तरी झाकून ठेऊन मग मउसूत पोळ्या करायच्या नाहीत तर भूक अनावर होईपर्यंत थांबुन मग पीठ कसेबसे मळुन लगेचच पोळ्या करायच्या. मग त्या जाड्याभरड्या होतात व कुटुंबियांच्या अपेक्षा अतिशय सुमार म्हणजे प्रमाणात रहातात. व जर कर्मधर्मसंयोगाने पोळीला पदर वगैरे सुटुन जर पोळी चांगली झालीच तर सणासुदीसारखे वाटते - हा फायदाच आहे.
.
वरण/डाळ शिजायच्या आधीच पुन्हापुन्हा कुकर उघडायचा म्हणजे ती डाळ या जन्मात तरी शिजत नाही आपोआप लोकांच्या अपेक्षांवर चेक रहातो.
.
उठल्यावर पांघरुणाची घडी कशाला करायची, परत रात्री झोपायचच आहे ना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील लेखाने व त्यावरील प्रतिक्रियांनी खेद वाटला.
व्यवस्थितपणा हा एक महत्वाचा अर्जित करावा असा गुण आहे.
असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शर्टाची बटनं न काढता, टीशर्टासारखे घालणारे किती लोक आहेत इथे?

आधी ओळखीचा, नंतर बॉस आणि आता मित्र असलेल्या एक नोकरीसाठी माझा इंटरव्ह्यू घेणार होता. मी नटूनथटून, व्यवस्थित शर्ट घालून गेले होते. त्याला वेळ नव्हता म्हणून दुसऱ्या दिवशी मुलाखत प्रकरणं करायची ठरवलं. तेव्हाची नोकरी आणि नवी नोकरी एकाच इमारतीत होत्या; त्यामुळे फार फरक पडणार नव्हता. पण मी त्याला उलट उत्तर पाठवलं, "उद्या मुलाखत असायला काहीच हरकत नाही, पण मी उद्या नटूनथटून येणार नाहीये. मला बऱ्या कपड्यांत बघायचं असेल तर आज बघून घे, उद्या पायथनबद्दल बोलू."

मला वाटलं, दुसऱ्या दिवशी भेटू तेव्हा तो काही कॉमेंट करेल... फार तर. तर नाही. तो खरंच माझ्या डेस्कपाशी येऊन म्हणाला, "हं, बघू बरं तुझे बरे कपडे ... तुझ्याकडे बटन-डाऊन शर्ट असेल असं मला वाटलं नव्हतं."

ह्या कॉमेंटवर विनोद म्हणून मी स्वतःसाठी एक बटन-डाऊन शर्ट शिवला. भारतीय, ब्लॉक प्रिंट कापडाचा. हे दोन्ही शर्ट मी टीशर्टासारखेच काढते-घालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्ययकारी परीक्षा !
सध्या ५०० ते १००० मध्ये आहे, पण वरती जाण्याची खुमखुमी आहे !
(आवरोमॅनिया ची संशयित पेशंट ) स्नेहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती प्रश्न ?

नीट नेटके आणि व्यवस्थित राहणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटतो.
मी पण (कधी कधी) तसच असायचा प्रयत्न करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||