पक्षी अभ्यास केंद्राला भेटः इटलीतला एक अनुभव

पक्षी निरीक्षण हा काही वर्षांपासून मला जडलेला छंद. इटली मधल्या 'बोलोन्या' या मिलान किंवा रोमच्या मानाने अप्रसिद्ध अशा शहरात सध्या मी राहाते. एकटीच राहात आहे, त्यामुळे छंद जोपासायला भरपूर वेळ मिळतो. बऱ्याच वेळा वाटायचं, इथल्या स्थानिक पक्षी निरीक्षकाशी संवाद साधता आला असता तर!

सुदैवाने लवकरच तशी संधी चालून आली. ज्या प्रोफेसरकडे मी काम करते त्यांच्यासोबत कधीकधी थोडं अवांतर बोलणं होत असे. इथे आल्यावर इंशुरन्स, वर्क परमीट यासाठी सरकारी कचेऱ्यांतल्या रांगांमध्ये उभं असताना त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्यांनाही पक्षी निरीक्षणाची आवड, थोडी का होईना, असल्याचं कळलं. असंच एकदा त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या मुलांना घेऊन एका पक्षी अभ्यास केंद्रावर दर वर्षी जातात. पुढे विचारलं की या वर्षीची भेट दोन आठवड्यात आहे, तुला यायचं आहे? मी काय, लगेच एका पायावर जायला तयार झाले. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम ठरला. मी माझी इटालियन शिकण्याची गती वाढवली. स्थानिक पक्ष्यांची इटालियन आणि इंग्रजी नावं जमवून ती पाठ करण्याचा प्रयत्न केला. हो, ही तयारी आवश्यकच होती. प्रोफेसर इंग्रजी बोलत असले तरी त्या केंद्रावर कोणी बोलणारं भेटेल ही अपेक्षा करणं किती मूर्खपणाचं ठरेल हे आता मला अनुभवाने माहित झालं होतं.

दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्या केंद्रावर पोहोचायचं ठरलं होतं. ते केंद्र 'मेडिचीना' या बोलोन्या जवळच्याच गावात होतं. मी बसने मेडिचीनाला पोहोचले. प्रोफेसर त्यांच्या दोन मुलांना घेऊन मला बरोबर न्यायला बसथांब्यावर आलेलेच होते. त्यांच्या गाडीतून दहाच मिनिटात आम्ही 'ओआसी देल क्वाद्रोने'ला आलो. हेच ते पक्षी अभ्यास केंद्र. एका तरूणीने आमचं स्वागत केलं. नाव-गाव विचारण्याची औपचारिकता झाली. मग ऑफिसातून तिने काही कागद आणून प्रत्येकी एक असे वाटले. त्यावर वीस पक्ष्यांची नावं होती आणि शेजारी एक आकडा होता...१०, २०,५० वगैरे. एकूण खेळ असा होता: या केंद्रात ते आज आम्हाला पाच पकडलेले पक्षी दाखवणार होते. ते कोणते असतील त्याचा अंदाज करून पाच नावांसमोर खूण करायची होती. खूण केलेल्यातले जे पक्षी दाखवले जातील त्याचे गुण (तो नावासमोरचा आकडा) एकत्र करून ज्याला सगळ्यात जास्त गुण मिळतील त्याला एक भेट मिळणार होती. मी प्रोफेसरना विचारून नावावरून कोणता पक्षी असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना इंग्रजी नावं आणि मला इटालियन नावं येत नसल्यामुळे हा प्रयत्न सोडून दिला आणि मी पाच 'मटके' लगावले आणि कागद परत दिला. तिने सगळ्यांचे कागद जमल्यावर एका, जरा लांब दिसत असलेल्या झोपडीकडे जायला सांगितले.

तिथे गेल्यावर त्या झोपडीवजा तंबूत बसलेल्या दोघांनी आमचं स्वागत केलं. परत नाव-गाव वगैरे विचापूस झाली. त्यांच्या समोरच खुर्च्यांवर आम्ही बसलो. मध्ये असलेल्या टेबलावर बर्याच लहान वस्तू, पट्या, पकडी वगैरे, विखुरलेल्या होत्या. त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली, अर्थात इटालियन मध्ये. थोडं काही कळलं ते असं. हा 'ओआसी' (म्हणजे संरक्षित क्षेत्र) १९८५ साली तिथली जैवविविधता जोपासण्यासाठी निर्माण करण्यात आला. याच्या काही भागात शेती केली जाते आणि काही भागात दलदल आणि उथळ पाणवठे आहेत. या दलदलीच्या भागात मुख्यतः बरेचसे प्राणी, पक्षी राहतात. निरीक्षणासाठी छोट्या झोपडया जागोजागी बांधल्या आहेत. २००३ सालापासून इथे पर्यावरण शिक्षणाचे उपक्रम राबवले जात आहेत. सामान्य जनता आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थी इथे भेट देतात.

चित्र क्र १: चंचीतून बाहेर काढलेला पहिला पक्षी (या पक्ष्याचं नाव कोणाला माहित असल्यास मला जरूर कळवावं)

'स्प्रिंग' आणि 'ऑटम' मध्ये पक्षी पकडून त्यांचा अभ्यास केला जातो. त्यातल्या काही दिवशी सामान्य जनतेला येऊन हे काम पाहता येतं. त्यातल्याच एका दिवशी आम्ही तिथे होतो. ही प्रस्तावना झाल्यावर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेला, मुख्य, पक्षी पहाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मागेच बांबूला काही चंच्या लटकवलेल्या होत्या. अधून मधून होणाऱ्या फडफडीमुळे त्यात पक्षी असणार हे सरळ होतं. एका चंचीत हात घालून त्यातून अलगद एक पक्षी त्यांनी बाहेर काढला (चित्र १). शेपटी, पंख, चोच, पाय, नखं, डोळे इत्यादी भागांची माहिती दिली. पंखांच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला असलेल्या पिसांना 'प्रायमरीज' म्हणतात. मग त्यातल्या तिसऱ्या पिसाची लांबी पट्टीवर मोजून नोंद घेतली गेली. मग त्यांनी सांगितले की हा पक्षी आफ्रिकेतून स्थलांतर करून आला आहे आणि आता त्याच्या तिकडे परत जाण्याची वेळ होत आली आहे.

चित्र क्र. २: वजन करताना. पक्षी मेर्लो (युरेशियन ब्लॅकबर्ड) चित्र क्र. ३: कापीनेरा (काळी टोपीवाला)

दुसरा पक्षी काढला तो थोडा मोठा होता. तो मी लगेच ओळखला - मेर्लो (ब्कॅकबर्ड) ! इतर मोजमापांप्रमाणेच पक्ष्याच्या वजनाचीही नोंद घ्यायची होती. पक्ष्याचं वजन करण्याचा 'विधी' मोठा मजेशीर होता (आपल्यासाठी, पक्ष्यासाठी नसावाच बहुतेक!). एक छोटा पेला होता ज्यात एक फडकं घातलं होतं. त्यांनी ह्या पक्ष्याचं डोकं या फडक्यात सरकवलं आणि काय आश्चर्य? तो पक्षी एकदम स्थिर झाला. हा पेला वजन काट्यावर होता. लगेचच वजनाची नोंद घेतली गेली (चित्र २). या नंतर आणखीन, दोन - कापीनेरा (चित्र ३) आणि पेत्तिरोस्सो (चित्र ४) हे पक्षी दाखवण्यात आले. पेत्तिरोस्सो या पक्ष्याच्या पायात एक रिंग होती- वळंच. ते दाखवत त्यांनी अशी माहिती दिली की पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी ही वळी घालण्यात येतात. वळ्यांवर अभ्यासकेंद्राची आणि वळं घालण्याच्या वेळेची माहिती संक्षिप्त रूपात असते. याच सारख्या जगभरात विखुरलेल्या अभ्यास केंद्रांवर पक्षी पकडून त्यांची मोजमापं आणि नोंदी घेतल्या जातात. मग ही सगळी माहिती एकत्र केल्यावर एखादा पक्षी कुठे नोंदला गेला आहे यावरून त्याचा प्रवास आणि त्यासोबत झालेली त्याची वाढ संशोधकांना कळते (वळं घालण्याबाबत आणि स्थलांतराबद्दल थोड्या अधिक माहितीसाठी परिशिष्ट पहा). पक्षी कित्येक हजार किलोमीटर प्रवास करतात- अनेक देश, सागर, महासगर पार करतात. पहिल्यांदाच ही महिती ऐकत नसले तरी नेहमीच या गोष्टीचं अप्रूप वाटतं.

चित्र क्र ४: पेत्तिरोसो (युरोपियन रॉबिन) आणि पट्ट्या, वळी इत्यादी साहित्य

मग काही प्रश्नोत्तरे झाली आणि आम्हाला 'ओसासित' चक्कर मारायला घेऊन गेले. पक्षी पकडण्यासाठी बांबूंच्या मधे पातळ जाळी लावलेली होती. उभ्या दिशेनी ती सैलसर बांधली होती आणि त्यामुळे खाली एक झोळी तयार झाली होती. पक्षी उड्ताना जाळ्याला आपटून त्या झोळीत पडतो. हे होताना पक्ष्याला कोणतीही शारीरिक इजा होत नाही. निरीक्षकांचं सतत जाळ्यांकडे लक्षं असतं त्यामुळे पक्षी फार काळ यात अडकून राहात नाहीत. ही माहिती मिळवत असतानाच आमच्या समोर एक पक्षी जाळ्यात 'अलगद' अडकला ! त्याला चंचीत घेतला आणि सगळे परत झोपडीत आलो. तिथे स्वागताला होती ती तरूणी आलेली होती. तेव्हा सगळ्यांनाच सुरुवातीच्या खेळाची आठवण झाली. गुण मोजण्यात आले. प्रोफेसरच्या एका मुलाने सगळ्यात जास्त गुण मिळवले. त्याला बागकाम करण्याच्या उपकरणांचा एक संच भेट म्हणून देण्यात आला.

त्यांचे आभार मानले. "आता स्प्रिंग मध्ये याल तेव्हा हे पक्षी जगाची सफर करून इथे परत आलेले भेटतील- ते बघायला नक्की या", असं ते म्हणाले. त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मग मेडिचीनाच्या बसथांब्यावर मला प्रोफेसरने सोडलं. बस मधे बसून बोलोन्याला यायचा प्रवास सुरु झाला. मनात येत होतं, कुठे हे मुक्त पक्षी- जे जगात कुठेही हिंडू फिरू शकतात आणि कुठे आपण- व्हिसा आणि वर्क परमिटसाठी खेटे घालतोय ! एक गाणं नकळतच गुणगुणायला सुरूवात केली... "पंछी, नदियां, पवन के झोंकें, कोई सरहद ना इन्हें रोके...".

---------------------------------------

पक्ष्यांचं स्थलांतर आणि वळं अडकवण्याची प्रक्रिया:

पक्षी उडून जगाच्या पाठीवर कुठेही जायला मुक्त असले तरीही त्यांना जगण्याच्या लढ्यात यशस्वी होण्याकरता पोषक वातावरणातच रहावं लागतं. पक्ष्यांच्या भौगोलिक प्रवासानुसार दोन मुख्य गट करू शकतो. पहिला गट एकाच मर्यादित क्षेत्रात सर्व ऋतूंमध्ये रहाणाऱ्या पक्ष्यांचा आणि दुसरा ऋतूनुसार स्थलांतर करणारा. चिमण्या, कावळे, मैना हे पूर्ण वर्षभर आपल्या पाहाण्यात येतात. ते पहिल्या गटात मोडतात. अनेक प्रकारचे फ्लायकॅचर्स आणि पाणपक्षी वगैरे दुसऱ्या गटात येतात - हे रोज सहजी आपल्या पाहाण्यात नसले तर नवल काहीच नाही.

पक्ष्यांचं स्थलांतर हा संशोधनाचा विषय आहे. स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांचा माग काढावा लागतो. पक्षी छोटे आणि हलके असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपकरणं जोडून अभ्यास करणं महाकठीण (हे केलं जातं, पण मोठया प्रमाणावर नाही). रेडिओ कॉलर लावून वाघाचा अभ्यास शक्य आहे पण पक्ष्यांचा कसा करणार? या मर्यादांमुळे विकसित झालेली पद्धत म्हणजे : बर्ड रिंगिंग किंवा वळी अडकवणे. ही वळी म्हणजे धातूची कडीच (अगदी हलकी) असतात. पकडीनी ती पक्ष्याच्या पायाभोवती बसवली जातात.

जगभरात अनेक ठिकाणी असलेल्या अभ्यास केंद्रांमधे पक्षी जाळ्यात पकडले जातात आणि त्यांच्या नोंदी घेतल्या जातात. नोंदी घेतल्यावर त्यांच्या पायात वळं अडकवण्यात येतं आणि मग त्यांना मुक्त केलं जातं. पक्ष्यांच्या नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पद्धतींनी घेतल्या जातात. ज्यांना याबद्दल कुतूहल आहे त्यांच्यासाठी या नोंद वहीचं पान इथे दाखवत आहे (डावीकडचा फोटो). या नोंदींमधली 'ब्रूड्पॅच'ची माहिती पक्ष्याची वीण यशस्वीरित्या होते आहे की नाही हे समजण्यास महत्त्वाची ठरते. स्थलांतर करणारे पक्षी त्यांच्यासोबत जंतू घेऊन येऊ शकतात. रोग पसरवण्यात पक्ष्यांच्या स्थलांतराचाही सहभाग असू शकतो. हे सर्वं कळण्यासाठी वळी अडकवण्याचा आणि नियमित नोंदी घेण्याचा फायदा होतो.

भारतात 'बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' तर्फे स्थलांतर करणारया पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. त्यांचं या अभ्यासाचं मुख्य केंद्र तमिळनाडू मधे 'पॉईंट कालिमेर' या जागी आहे. त्यांच्या पक्षी शास्त्राच्या प्राथमिक अभ्यासक्रमात 'पॉईंट कालिमेर'ला आठ दिवसांचा अभ्यास वर्ग घेण्यात येतो.

पक्षी निरीक्षण हा छंद पर्यावरणासंबधित झडणाऱ्या चर्चांमुळे किंवा अन्य काही कारणांनी अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हौशी निरीक्षकांनी केलेल्या नोंदी संशोधकांना उपयोगी पडू शकतात. त्यासाठीच 'सिटिझन सायन्स' सारखे उपक्रम बंगलोरच्या 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस' तर्फे चालवण्यात येत आहेत. या अंतर्गत 'मायग्रंट वॉच' हा एक उपक्रम आहे. स्थलांतरीत पक्ष्यांच्या हौशी निरिक्षकांनी केलेल्या नोंदी साठवण्यासाठी असलेली ही एक जागा. यातल्या 'पाईड कक्कू' या पक्ष्याचं स्थलांतर मॉन्सूनच्या आगमनाबद्दल काही सांगू शकेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

-----

तळटिपा:
१. पहिल्या गटातले काही पक्षी सुद्धा 'लोकल' स्थलांतर करतात.
२. आधीच पयात वळं असेल तर त्या वळ्याची नोंद घेऊन ते काढून टाकलं जातं आणि नवीन वळं अडकवण्यात येतं.
३. पक्षी जेव्हा अंडी उबवतात तेव्हा त्यांच्या पोटावर रक्तवाहिन्यांचं एक जाळं तयार होतं. त्यालाच 'ब्रूडपॅच' म्हणतात. ब्रूडपॅच कोणत्या अवस्थेत आहे यावरून तो पक्षी अंडी उबवत आहे की तो काळ होवून गेला हे कळतं.

संदर्भ:
ओळख पक्षीशास्त्राची - उमेश करंबेळकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनुभव आणि त्याची मांडणी आवडली.

पुण्यात झालेल्या पक्षीगणनेत एकदा भाग घेतला होता (२०१० मध्ये) त्याची आठवण आली. पण तेव्हा पक्षी पाहिले ते सगळे अंतरावरुन, आणि बरेचसे दुर्बिणीतून!

भारतात अशी 'पक्षी अभ्यास केंद्रं' कुठं आहेत (पॉईंट कालिमेर' सह आणखी काही केंद्रं असावीत) याचा शोध घेतला पाहिजे.

एक माहिती हवी होती आणखी - ही विविध 'पक्षी अभ्यास केंद्रं' एकमेकांच्या संपर्कात असतात का? त्यांच्यात माहिती आदानप्रदानाची काही पद्धत विकसित झालेली आहे का? म्हणजे एका पक्षाचं आधीचं वळं काढलं तर त्याची माहिती मला मिळेल -पण आधीचं वळं ज्यांनी चढवलं त्यांना या पक्षाचा प्रवास कळण्याची काही सोय आहे का? किंवा मी ज्याला आत्ता वळं चढवलं, त्याची पुढची माहिती मला मिळण्याची कितपत शक्यता असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही विचारलेली माहिती माझ्याकडे नाही. पण ती काढायचा प्रयत्न करेन. अशी जगभरातली माहिती आंतरजालावर नियमीत चढवली जात असेल तर पाहायला हवं. तशी काही सोय पक्षी अभ्यासकांनी केलेली असण्याची शक्यता वाटते.
तसंच भारतातल्या इतर केंद्रांबद्द्लही मला माहित नाही. (संदर्भात दिलेल्या पुस्तकात ही माहिती कदाचित असेलही, आत्ता ते जवळ नाही).
कोणी वाचकांमधले जाणकार असतील तर त्यांनी जरूर द्यावी माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय मौलिक माहिती दिली आहे. शेवटी दिलेल्या केंद्राचे दुवेही उपयुक्त आहेत.
अनेक आभार!

अतिवास यांनी विचारलेले प्रश्नही नेमके आहेत. त्यासंबंधी माहिती मिळाल्यास इथे जरूर द्यावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोकप्रभा मध्ये मायग्रंट वॉच बद्द्ल 'सुहास जोशी' याम्चा लेख आला आहे. ज्यांना रूची आहे त्यांनी हा लेख जरूर वाचावा:
http://lokprabha.loksatta.com/71628/Lokprabha/07-12-2012#dual/12/1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0