"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो" - कुमार केतकर

ऐसी अक्षरेः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माध्यमांचा स्फोट झालेला आहे. यामुळे संपूर्ण माध्यमांचं विश्व, त्याचा नकाशा सतत बदलता राहिलेला आहे. या बदलत्या चित्राचा एकंदरीत परिणाम काय झाला आहे?

कुमार केतकरः अर्थव्यवस्थेच्या खुल्या होत जाण्याच्या प्रक्रियेचा, या संदर्भातला एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे बातमीचं वस्तूकरण झालेलं आहे. मी असं गमतीने म्हणतो, की एका अर्थानं साबण किंवा शांपूपेक्षाही, "बातम्या" ही वस्तू प्रसंगी अधिक ग्राहकानुरूप बनताना दिसते. त्यामुळे त्यात जे वाचकांना हवं असतं तेच देण्याकडे कल दिसतो. आणि याचं प्रत्यंतर बातमी सादर करण्याच्या पद्धतीतच नव्हे, तर कुठल्या वर्गाला कुठली बातमी मिळताना दिसते या बाबतही येतं. बातमीच्या महत्त्वासाठी ती व्हिज्युअल स्वरूपात मांडण्याची पद्धतही वाढलेली आहे. मीडियात बातमी प्रसिद्ध करायची म्हटली, तर 'त्याबरोबर व्हिज्युअल देता येईल का?' असा पहिला प्रश्न असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी परवाच न्यूयॉर्क शहरामध्ये सॅंन्डीनं घातलेला धुमाकूळ प्रत्यक्ष बघायला गेलो होतो. शहराच्या अनेक भागांचा विध्वंस झालेला होता. पाण्याने सगळीकडे वाताहत झाली होती. थोडक्यात सांगायचं झालं, तर दुसऱ्या महायुद्धात शहरं उध्वस्त व्हायची तसंच, फक्त बॉंम्बिंग झालं नव्हतं इतकंच. त्या सगळ्यांची चित्रं देता आली. मात्र लोअर मॅनहॅटनमध्ये २६ लाख लोकांकडे अनेक दिवस वीज नव्हती, याची बातमी म्हणावी तितकी झाली नाही. चायनाटाऊन आणि लोअर मॅनहॅटनमधल्या दारुण स्थितीची कल्पना बाकी जगाला तर सोडा, अपर मॅनहॅटनमधल्या लोकांनाही नव्हती. लोअर मॅनहॅटनची स्थिती दुसऱ्या महायुद्धातल्या ब्लॅकआऊटसारखी - फक्त बॉम्बवर्षाव वगळता. पण हे कुठेही टीव्हीच्या बातम्यांत नव्हतं. कारण इतर विध्वंसाची चित्रं देता येतात. उध्वस्त होणार्‍या गगनचुंबी इमारती, महापूर, वादळात उलथलेली जहाजं यांच्या चिरस्मरणीय प्रतिमा पकडल्या जातात. पण २६ लाख न्यूयॉर्कर्स ज्यात अडकले त्या अंधाराचं व्हिज्युअल काय देणार? त्यामुळे बातम्यांच्या महत्त्वापेक्षा ती चित्रमय स्वरूपात देता येते की नाही हे महत्त्वाचं ठरतं. "An interesting story has no meaning if it has no visual" असा जणू अलिखित नियम बनला आहे. या आणि अशा गोष्टींमुळे "बातमी ही बाजारात विक्रीला आणायची गोष्ट आणि पत्रकार म्हणजे जणू त्याचे दुकानदार" असं वाटण्याजोगी परिस्थिती मला वाटते.
थोडं अधिक अवांतर बोलायचं तर मी याची तुलना मराठी/हिंदी सिरियल्समधलं मानवी भावभावना आणि नातेसंबंध यांचं जे पैशाला पासरी चित्रण केलेलं आढळतं त्याच्याशी करतो. सिरियल्समधे भावभावनांचं वस्तुरूपीकरण, तसं या माहितीच्या महापुरात चाललेलं बातम्यांचं बाजारीकरण.

ऐसी अक्षरेः म्हणजे एकंदरीत 'थिल्लरीकरण' झालं असं मध्ये म्हटलं गेलं, तसं काहीसं म्हणायचं आहे का तुम्हाला?

कुमार केतकरः अजिबात नाही. तसं म्हणणं पूर्णपणे एकांगी ठरेल. मात्र सुमारे पंचेचाळीस वर्षं पत्रकारितेमध्ये असल्यापासून ते आजच्या आयपॅड आणि इतर माहितीच्या संसाधनांच्या जमान्यातला प्रवास अनुभवणारा एक निरीक्षक या नात्यानं मला म्हणावसं वाटतं की गंभीर अभ्यासकांना ज्ञानाच्या कोनाकोपऱ्यातल्या संशोधित, अभ्यासपूर्ण अशा स्रोतांशी संपर्क साधणं आणि संवाद प्रस्थापित करणं हे आता शक्य झालंय, सोपं बनलंय. आणि एकंदर मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यात याचं मला प्रचंड महत्त्व वाटतं. पूर्वी लोक निव्वळ आपापल्या ओळखीच्या वर्तुळातच जी काय ती माहितीची देवाणघेवाण करत. पण आता जगाच्या कोनाकोपऱ्यातले समानधर्मी लोक एकमेकांशी संपर्क साधतात. त्यामुळे एकीकडे फेसबुकादि माध्यमांचा तद्दन फालतू कारणांकरता चाललेला उपयोग आणि दुसरीकडे ही अशी ज्ञानाची देवाणघेवाण या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून आहेत. याला सरसकट थिल्लरीकरण म्हणणं म्हणजे इंटरनेटची संपूर्ण शक्ती नाकारणं आहे. इंटरनेटमुळे प्रत्येकाला हवं ते लिहिता येतं. हवं तेव्हा लिहिता येतं. त्यामुळे खालच्या प्रतीचं, व्हल्गर म्हणता येईल असं लिखाण किंवा कंटेंट वाढला यात शंकाच नाही. पण ते केवळ एक अंग झालं. नुसतं अलीकडच्या काळात आलेल्या इस्लाम विरोधातल्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करणं चुकीचं ठरेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे एकंदरीत ज्ञानाची सहज उपलब्धता प्रचंड वाढली. माहितीनं खऱ्या अर्थानं देशांच्या सीमा ओलांडल्या. इतके दिवस लोक ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणत असत. ते केवळ वस्तू/पैसा यांच्या प्रवाहाचं, कॅपिटॅलिझमचं ग्लोबलायझेशन होतं. इंटरनेटमुळे जे झालं आहे ते खऱ्या अर्थानं विचारांचं, बुद्धीचं, माहितीचं ग्लोबलायझेशन झालेलं आहे.

ऐसी अक्षरेः गेल्या चाळीसेक वर्षांत हा बदल वेगाने होताना दिसतो आहे. याचा काही आढावा घेता येईल का?

कुमार केतकरः खरंतर चाळीस नाही, गेल्या वीसेक वर्षांतच जास्त मोठे बदल झालेले दिसतात. भारतातलं सोडा, अगदी १९९० साली लंडन टाइम्सने संगणकीकरणाला विरोध केला होता. १९९५ साली महाराष्ट्र टाइम्सचे कर्मचारी संगणकीकरणाच्या विरोधात संपावर गेले. १९८८ साली फॅक्स करणंही कठीण होतं. म्हणजे नवीन मीडियातली क्रांती ही गेल्या वीस वर्षांतली - सोव्हिएट युनियनच्या पडझडीच्या आसपासच झालेली.

ऐसी अक्षरेः तुमच्या आसपासच्या लोकांचा इंटरनेटकडे, किंवा नवीन तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय दिसतो?
कुमार केतकरः एका शब्दात सांगायचं झालं तर उपयुक्ततावाद. आपल्याला जे उपयोगी आहे तेवढंच स्वीकारताना दिसतात. १९६० साली मार्शल मक्लुहननं 'अंडरस्टॅंडिंग मीडिया' नावाचं पुस्तक लिहिलं होतं. इतक्या जुन्या काळी, जेव्हा कॉंप्युटर म्हणजे काय हेही कोणाला माहीत नव्हतं तेव्हा त्यानं आत्ताच्या परिस्थितीविषयी लिहिलं होतं.

ऐसी अक्षरेः माध्यमांच्या स्वरूपातले बदल कसे व कुठे दिसून येतात? त्याचे दूरगामी परिणाम काय?
कुमार केतकरः जगभर सगळीकडे पुस्तकांची दुकानं बंद होताना दिसत आहेत. न्यूजवीकसारख्या मॅगेझिनची छापील आवृत्ती बंद झाली. अजून ऑनलाइन आवृत्ती आहेच. ही पुढे होणाऱ्या बदलांची नांदी आहे. पण पुस्तकांची दुकानं बंद झाली म्हणून पुस्तकं वाचणं कमी झालेलं नाही. पुस्तकांची विक्री ऑनलाइन म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणा, वाढतेच आहे. लेखन, वाचन, ज्ञान, माहिती आणि करमणूक या गोष्टी कायम रहातील. त्या कुठच्या स्वरूपात सादर होतील हे माध्यम बदलेल इतकंच. कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो. आता इतकी शतकं गेली तरी शेक्स्पिअर का टिकला? एकेकाळी त्याचं लेखन कागदावर होतं, आता इ-बुकमध्ये आहे.

ऐसी अक्षरेः प्रस्थापित माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी काही सांगता येईल का?
कुमार केतकरः प्रस्थापित माध्यम म्हणजे काय? त्या त्या वेळी ज्या माध्यमांतून सर्वात चांगल्या पद्धतीनं माहिती देता येते ते. एके काळी ते केवळ लोककथा, लोकसंगीत, पारावरच्या गप्पा वगैरे असायचं. नंतर छपाईचा शोध लागल्यावर वर्तमानपत्रं आणि पुस्तकांना तो मान मिळाला. त्यानंतर रेडियो, नंतर टीव्ही आणि आता इंटरनेट. प्रस्थापित म्हणजे नक्की कुठचं याची व्याख्या बदलत जाते. मी स्वतः लहानपणी पाटी वापरलेली आहे. कागदावर लिहिण्यासाठी बोरू वापरलेला आहे. बोरूनं वळणदार मोडी काढायला शिकलो आहे. माझ्याच डोळ्यांसमोर पाटीपासून ते आयपॅडपर्यंत प्रवास झालेला आहे. भारतात तरी प्रिंट मीडिया पुढची काही दशकं निश्चितच टिकून राहील. त्यानंतरचं सांगता येत नाही.

ऐसी अक्षरेः माणसांमाणसांमधल्या परस्परसंबंधांवर काय परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं?

कुमार केतकरः बऱ्याच लोकांची माणसांमाणसांतले संबंध बिघडल्याची तक्रार असते. माझी तशी नाही. 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीतले परस्परसंबंध काय वाखाणण्यासारखे होते का? किंवा गाडगीळांच्या कथा घ्या, त्यातले केविलवाणे, कोते परस्परसंबंध कितपत चांगले होते? मर्ढेकरांनी वर्णन केलेलं यांत्रिक आयुष्याचं चित्रातलं आयुष्य तरी किती चांगलं आहे? मार्क्स म्हणाला होता की सद्यस्थिती वाईट असल्यामुळे लोक निराशावादी आहेत. ते आत्ताही लागू आहे. मुद्दा असा की कितीही मागच्या काळात गेलं तरी तिथे चांगलंही होतं तसंच वाईटही होतं. नवीन माध्यमांमुळेही तसंच झालं आहे. ज्यूलियन असांजच्या विकिलीक्स यांनी तंत्रज्ञानाचा केलेला वापर आणि अलीकडे वादग्रस्त ठरलेली मुस्लिम धर्मावरची भडक स्वरूपाची डीव्हीडी या एकाच मोठ्या स्पेक्ट्रमच्या दोन विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या प्रवृत्ती आहेत. एकजण राज्यसंस्थेतल्या किडलेपणाला प्रकाशात आणतो आणि दुसरा धार्मिक भावना चिघळवतो.
एकंदरीत परिस्थितीबदल मात्र निराशावादी नाही. बदलांमुळे दोन पावलं पुढे, दोन पावलं मागे जायला होतं. ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू आहे.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पहिले दोन प्रश्न आणि त्यांची उत्तरं आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातलं सोडा, अगदी १९९० साली लंडन टाइम्सने संगणकीकरणाला विरोध केला होता. १९९५ साली महाराष्ट्र टाइम्सचे कर्मचारी संगणकीकरणाच्या विरोधात संपावर गेले.

या लेखात काल हे वाक्य वाचले आणि गब्बर यांची सध्याची सही आठवली होती - राजीव गांधींचा संगणक म्हंजे बेरोजगारीला आमंत्रण _____ लालकृष्ण अडवाणी (१९८५ च्या आसपास). आता बोला !!!
.
Smile
.
ही मुलाखत आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यामुळे त्यात जे वाचकांना हवं असतं तेच देण्याकडे कल दिसतो. आणि याचं प्रत्यंतर बातमी सादर करण्याच्या पद्धतीतच नव्हे, तर कुठल्या वर्गाला कुठली बातमी मिळताना दिसते या बाबतही येतं.

एकदम सहमत.

उदा. इथे पहा.

A first set of Gentzkow’s papers studies political bias in the news media. In “What Drives Media Slant? Evidence from U.S. Daily Newspapers” (Econometrica, 2010), Gentzkow and co-author Jesse Shapiro use textual analysis of a large set of newspaper articles to classify content as more Republican or more Democrat (“media slant”). This is done using statistical analysis of phrases that differentially show up in Republican versus Democrat Senators’ speeches in the Senate. These constructed measures of media slant match well with conventional wisdom and with other, more ad-hoc and subjective newspaper political classification. Gentzkow and Shapiro then use these measures to estimate demand for newspapers, and to model the newspaper owner’s choice of media slant. They find that most of a newspaper’s media slant can be explained by the preferences of its readers rather than by the tastes of its owner. The second part of the paper tries to sort out whether the bias of individual papers is driven by “demand” – i.e. the political biases of their target audience – or “supply”, i.e. the idiosyncratic preferences of the owners. They find that it is mostly demand.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0