संपादकीय

नमस्कार,

ऐसी अक्षरेचा हा पहिला दिवाळी अंक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या वर्षी दिवाळीत ऐसी अक्षरेला एक वर्ष पूर्ण होत असल्यानं या प्रसंगाचं विशेषत्व आम्हाला जाणवतं आहे.

दिवाळी अंकाच्या निमित्तानं संकेतस्थळाच्या गुणी सदस्यांनी नव्या उत्साहानं लिखाण केलं, चित्रं काढली आणि अन्य संपादकीय कामातही मदत केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे आडकित्तांनी पाठवलेल्या स्केचेसमुळे अनेक लेख जिवंत झाले. सर्वसाक्षींच्या छायाचित्रामुळे अंक उजळून निघाला. संपादक मंडळातल्या सदस्यांनी जे योगदान दिलं त्याचा प्रत्येकाने काय काय केलं याची यादी करण्याची गरज नाही, कारण हे टीमवर्क होतं. मात्र अदितीनं एकहाती तांत्रिक बाजू सांभाळली आणि अंक उभा केला याचा विशेष उल्लेख करणं आवश्यक वाटतं. या सगळ्यांच्या उत्साहाचं आणि उपक्रमशीलतेचं प्रतिबिंब प्रस्तुत अंकात पडलं असेल अशी आम्हाला आशा आहे.

एका वर्षाच्या या कालावधीमधे या साईटचा जो छोटा प्रवास घडला तो आम्हाला आनंदाचा वाटतो. आमच्या सर्व सदस्यांनाही हा आनंद मिळाला असेल असं आम्हाला वाटतं. मराठी संकेतस्थळांचं जग हे गेल्या अनेक वर्षांपासून समृद्ध होत गेलेलं आहे. नवनवे लोक आपले निरनिराळे अनुभव गाठीला लावून आलेले आहेत. दहा-अकरा कोटी लोक जी भाषा बोलतात त्या लोकांच्या देवाणघेवाणीकरता अशा अनेक वेबसाईट्स अस्तित्त्वात येणार हे निश्चित. या मांदियाळीत ऐसीक्षरेनेही किंचित् भर घातली याचा आवर्जून उल्लेख करतो.

एका वर्षाच्या कालावधीची फूटपट्टी तशी लहान, परंतु या लहानशा कालावधीत या रोपट्यानं जोम धरला आहे असं सांगावंसं वाटतं. मराठी मनाला जिव्हाळ्याच्या वाटतील अशा अनेकविध विषयांबरोबरच, दृक् कला, छायाचित्रण या क्षेत्रांमधे ऐसीअक्षरे या स्थळावर येऊन सभासदांनी केलेलं काम हे निश्चितच पुढचं पाऊल वाटेल. एखाद्या वर्षात एखादं नवं घर सजत जातं, नवजात अर्भकाच्या चेहऱ्यावरची फीचर्स हळूहळू आकाराला येतात - तद्वतच ऐसीअक्षरेला आपला चेहरा, आपला आवाज मिळण्याची प्रक्रिया घडली आहे. हा चेहरा एकाच सभासदाचा किंवा एखाद्या लिखाणामुळे किंवा लिखाणाच्या प्रकारानं निश्चित होणं शक्यच नाही. तो एका वर्षात जमा झालेल्या आणि वृद्धिंगत होत असलेल्या समष्टीचा आहे. वैचारिकदृष्ट्या उदार विचारसरणी, वैचारिक देवाणघेवाणीकरता - आणि मुख्य म्हणजे मतभेदांकरता - खुलं वातावरण, सेन्सॉरच्या चाबकापेक्षा लोकमताच्या कौलाची साक्ष देणारी श्रेणीव्यवस्थेची लोकशाही पद्धती असा हा चेहरा आहे. सभासदांच्या प्रतिसादाच्या दर्पणात पडलेलं त्याचं प्रतिबिंब समाधान देणारं आहे.

यंदाच्या दिवाळी अंकात आम्ही "डिजिटल माध्यमं आणि पारंपरिक माध्यमं" यांच्यातले ताणेबाणे, नातेसंबंध आणि त्यांचं स्वरूप असा विषय घेतला होता. या निमित्तानं आम्ही कुमार केतकर, योगेश्वर नवरे आणि अपर्णा वेलणकर यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. राजेश घासकडवी यांनी यात पुढाकार घेतला होता. हे सदर तुम्हाला विचारप्रवर्तक वाटेल असं आम्हाला वाटतं.

दिवाळी अंक सादर करताना नेहमीप्रमाणेच तुमच्या अभिप्रायांबद्दल आम्हाला उत्सुकता आहे. अगदी मोकळ्या मनानं आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही नम्र विनंती.

-- ऐसी अक्षरे व्यवस्थापन.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप आवडला. विशेषतः चित्रए, रंगसंगती अन मांडणी मन वेधून गेली.
लेखनही त्याला साजेसे सरस आहे. पहिला अंक मानानेसुद्धा पहिला ठरावा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच छान आहे अंक!
अतिशय आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0