कांदा संस्थानात उत्स्फूर्त मेणबत्ती मार्च

दि. २१ नोव्हें, कांदा तलाव, कांदा संस्थान

कुख्यात अतिरेकी अजमल आमीर कसाब याला दिलेल्या फाशीच्या निमित्ताने कांदा तलावाच्या चौपाटीवर विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय कमी नोटीसवर कांदा संस्थानातल्या सर्व सज्ञान स्त्री-पुरूषांनी उपस्थिती लावण्याची ही पहिलीच वेळ असावी. शिवाय अठरा वर्षाखालचे काही टीनेजर्सही चौपाटीवर जमलेले दिसले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय जमलेल्या या गर्दीला लवकरच मेणबत्ती मार्चचं स्वरूप आलं.

सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी या हल्ल्यात प्राण गमावून जनतेचं रक्षण करणारे श्री. तुकाराम ओंबाळे यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय त्या हल्ल्यात जीव गमावणार्‍या करकरे, साळस्कर आणि इतर सर्व पोलिस अधिकार्‍यांना आणि बळी गेलेल्या इतर सर्व सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. सामान्य भाषणांमधे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमांनंतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्याचा अथवा सत्ताधार्‍यांकडून सरकारची तळी उचलण्याचे प्रकार होतात. सुरूवातीच्या भाषणांत विरोधकांनी, विलंबाने का होईना पण न्याय्य मार्गाने कसाबला शिक्षा सुनावली आणि तिची अंमलबजावणी केली, याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. सत्ताधारी ग्रामसेवकांची या प्रकारामुळे चुळबूळ सुरू झाली. ती दिसताच नागरिकांमधेही अस्वस्थता पसरली.

विरोधकांनंतर सत्ताधारी ग्रामसेवकांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनीही आधी श्रद्धांजली वाहिली. "आता मला अधिक बोलवत नाही" असं म्हणून डोळे पुसत ते आपल्या जागेकडे वळले. त्यानंतर सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून संस्थान-ग्रामपंचायतीतील शासकीय अधिकारी श्री. वैद्य भाषणास उभे राहिले. त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सर्व पोलिस अधिकारी, सामान्य नागरिक यांना श्रद्धांजली वाहून त्यांनी मुख्य भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या भाषणाचा हा गोषवारा:

"हुतात्मा ओंबाळेंच्या आत्म्याला खरोखर आज मुक्ती लाभेल. इतरही शूर पोलिस आणि सामान्य नागरिकांना आज शांतता लाभेल.

मॉर्निंग वॉकच्या ग्रूपमधे एका मित्राने "Closure" अशी मिताक्षरी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही आम्हां सर्व सामान्यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. पण लोकहो, हे इथेच खरोखर थांबतं का? नाही. ही तर सुरूवात आहे. आत्तापर्यंत २६/११ चे हत्याकांड, कसाबची केस हा गेली चार वर्ष आपल्या आयुष्यातला एक मुख्य भाग होता. आपला एकही दिवस या विषयाबद्दल बोलल्याशिवाय जात नसे. चंद्रपूरमधला नक्षलवाद असो किंवा मुंबईमधला ट्रॅफिक जॅम, कसाबला बिर्याणी खिलवण्यात पैसे घालवल्यामुळे योग्य ठिकाणी पैसा खर्च होत नाही अशी सबब देऊन आपण आपल्या सरकारचा बचाव करू शकत होतो. आता यापुढे आपण कसाबच्या बिर्याणीबद्दल बोलू शकत नाही. सरकारकडे आता असं कोणतंही कारण उरलेलं नाही. आता आपल्या देशाचा विकास निश्चित आहे.

कसाबला आत्ताच फाशी का दिलं याचाही विचार व्हावा. जनमानसात आत्ता बेचैनी आहे. मराठी माणसाच्या मराठी अस्मितेवर फुंकर घालणारे बाळासाहेब कधीपासून कसाबला टांगायला सांगत होते. मग हे काम बाळासाहेब असतानाच का केलं नाही? त्यांचं अजूनही अस्थिविसर्जनही झालं असेल नसेल, आणि तेव्हाच त्याला फाशी दिली. असं करून सरकारला नक्की काय सुचवायचं आहे? मराठी लोकांचा असा पाणउतारा सदैव केंद्रातून होतो. लोकहो, अशा लोकांचा आपण धिक्कारच केला पाहिजे."

एवढा वेळ बोलल्यानंतर श्री. वैद्य यांना खोकल्याची उबळ आल्यामुळे त्यांना बाजूला व्हावं लागलं. त्यांच्याजागी संस्थानच्या प्राथमिक शाळेचे हेडमास्तर श्री. देशपांडे उभे राहिले.

"मी आपला फार वेळ घेणार नाही. वैद्यांशी मी पूर्णतः सहमत आहे. शिवाय कसाबला फाशी दिलं तेव्हा खरोखरच जिवंत होता का? डेंग्यूने तो आधीच मेला नाही कशावरून? अलिकडच्या काळातच यश चोप्रा यांच्या निधनामुळे डेंग्यू किती जीवघेणा ठरू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. तुरुंगात काय वैद्यकीय सुविधा मिळतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच. माहित नसेल तरी हरकत नाही. अरे, कोट्यधीशाला जे मिळतं ते तुरूंगात कुठून मिळणार? यशजी जगले नाहीत तर कसाब त्यातून सुटणार आहे का? मी तर म्हणतो तो जगतोच कसा डेंग्यू झाला तरीही! अरे, बिर्याण्या हादडून कोणी डेंग्यूला तोंड देण्याएवढा ताकदवान होतो का? आणि त्यातून कसाबसारखा क्रूरकर्मा! अरे, त्याच्या पापांमुळे तो खरंतर रौरव नरकातच पडायला हवा. पण त्याच्या फाशीचं घोंगडं या लोकांनी असं भिजत ठेवलं नसतं तर डेंग्यूच्या डासांच्या आधीच त्याला यमसदनास धाडल्याचं पुण्य सरकारला मिळालं असतं. नाही! अरे, आमच्या सरकारला त्या डेंग्यूच्या डासाची काळजी पण आमच्या भावनांची नाही. सबब काय म्हणे तर परदेशी नागरिक असला तरीही व्यवस्थित न्यायनिवाडा करून मगच आम्ही त्याला फासावर चढवला."

हेडमास्तर देशपांडेंनंतर दैनिक कांदा टाईम्सचे संपादक श्री. खरे भाषणासाठी उभे राहिले.

"माझ्या आधीच्या वक्त्यांनी सामान्यांच्या भावना अतिशय संयतपणे मांडलेल्या आहे, पण मी इतरही काही गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. लोकहो, आमच्याही काही भावना वगैरे आहेत का नाहीत? अशी अचानक फासावर चढवल्याची बातमी कशी काय देतात! काही पूर्वकल्पना वगैरे देण्याचे संकेत आहेत का नाहीत? मोठेमोठे नेतेही अपघातात मरतात तेव्हा सरळ जाहीर करत नाहीत, आधी अपघातांची बातमी देतात नंतर मृत्युची. आणि कसाबच्या केसकडे सगळ्या देशाचं आणि बहुदा समस्त विश्वाचं लक्ष लागून राहिलेलं असताना सरळ फासावर चढवतात यात काळंबेरं निश्चितच आहे. गिधाडाची नजर असणार्‍या आपल्या मिडीयाला याचा इव्हेंट करणं सोडाच, साधी बातमीही आधी माहित असू नये? फाशीची तारीख आधी जाहीर केली नाही, काही काऊंटडाऊन नाही काही नाही आणि सरळ फाशी देणं हे जनतेच्या भावनांशी खेळणं आहे. अहो, अमेरिका बघा किती प्रगत देश आहे. त्यांचे ते ट्विन टावर्स पाडले गेले तर त्याचे व्हीडीओही जगभर दिसले. आम्ही इथे कांद्यात बसून बघितले. मग आधीच ठरवून, पूर्ण तयारी करून फाशी दिली म्हणतात तर त्याचा व्हीडीओ कसा दिसत नाही? प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो, त्या कसाबच्याही खिशात असेल आणि एक साधा व्हीडीओ बनवून वितरित करू नये? सामान्य माणसाचा विश्वास कसा बसणार? यात नक्कीच काही पाणी मुरत आहे.

या लोकांचा काही भरवसा नाही. भलत्याच कोणाला कशावरून फासावर चढवलं नाही? इतके दिवस बातम्या येत होत्या की कसाबला केलेल्या कृत्याच्या पश्चात्ताप अजिबातच नव्हता. उलट तो तर कुत्सितपणे बोलत होता. मग अचानक त्याला भीती वाटली, "पुन्हा असं करणार नाही" असं म्हणाला याला काय अर्थ आहे? चिलट मारावं एवढ्या सहजतेने एवढ्या लोकांना मारणार्‍या कसाबला आता कसली मरणाची भीती वाटत्ये? हा सगळा सरकारचा डाव असल्याचा संशय येतो आहे. फाशी देतानाचा व्हीडीओ असतात, त्यात त्याचा चेहेरा झाकलेला नसता तर निदान आपल्याला खात्री करून घेता आली असती हा तोच मनुष्य आहे याची!

पण आपण एवढ्यात धीर सोडण्यात अर्थ नाही. आज ना उद्या कोणीतरी सरकारची झाडाझडती घेईलच. माहितीच्या अधिकारात आपण ही सगळी माहिती मिळवली पाहिजे. कसाबच्या फाशीची पूर्ण माहिती आज ना उद्या बाहेर येईलच. अजूनही या लोकांनी त्या अफजल गुरूला लटकवलेला नाही. निदान त्याच्या वेळेस तरी सरकार शहाणं होईल याची मला खात्री आहे. माहितीचा अधिकार अतिशय ताकदवान आहे. आपण सर्वांनी त्याचा वापर केलाच पाहिजे. त्याच्या बिर्याण्यांचा हिशोब सरकारला महागात पडलाच पाहिजे. ... "

संपादकांना अजूनही बोलण्याची इच्छा होती. पण मागच्या बाजूने तरूणांची गडबड सुरू झाली. कोणीतरी मेणबत्त्या पेटवून मेणबत्ती मोर्चा सुरू केला. मेणबत्त्या हातात घेऊन चालण्याचं लोण फार चटकन संपूर्ण गर्दीत पसरलं आणि लोकांनी स्टेजवरच्या वक्त्यांकडे साफ दुर्लक्ष केलं. काही तरूणांनी आपण होऊन पुढाकार घेऊन लोकांच्या मेणबत्त्या जमा करून जमिनीवर RIP Tukaram Ombale अशी अक्षरंही लिहीली. त्यावर इतर तरूणांनी आपल्या हातातल्या मेणबत्त्या उंचावल्या. सभेचा संपूर्ण ताबा शेवटी तरूणांकडे गेला. एकंदर चित्र कोणी दोन-चार वाक्य बोलतो आणि इतर तरूण आपल्या हातातल्या मेणबत्त्या उंचावतात असं दृष्य होतं. गदारोळात काही वाक्य कानावर आली ती अशी होती:
"थँक यू प्रॉणॉबदा. पण चार वर्षांपूर्वीच का आला नाहीत?"
"साहेबांना आजचा दिवस दिसला नाहीच."
"साडेएकोणतीस कोटींच्या बिर्याण्या खाल्ल्या! तेव्हाच का नाही त्या ***ला सीएसटीबाहेर लटकवला पब्लिकसमोर?"

तरूणांच्या या प्रकाराचा पुटपुटत निषेध करत वयस्कर लोक चौपाटीवरून बाहेर पडताना दिसले. मेणबत्त्या जळून संपल्या तेव्हा रात्री उशीरापर्यंत हा मेणबत्ती मार्च सुरू होता.

प्रचंड गर्दी होऊनही सभा आणि मेणबत्ती मोर्चा शांततेत पार पडला तरीही जमलेल्या गर्दीतल्या लोकांकडे अचानक एवढ्या मेणबत्त्या कुठून आल्या, यात कुणाचा काही दगाफटका करण्याचा इरादा होता का याचा पोलिसतपास सुरू आहे. या संदर्भात अज्ञात इसमाविरोधात कांदा पोलिस स्टेशनात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

याच सुरात बाळ ठाकरेंच्या अंत्यसंस्कारादिवशीचंही वर्णन हवं आहे. कडकडीत बंद वगैरे ठीकाय. पण त्या दिवशी रस्त्यावर रंगलेल्या क्रिकेट मॅचेस; चोरून मागल्या गल्लीनं विकलेलं दूध; मेडिकल स्टोर्सच्या निमित्तानं नाक्यानाक्यावर रंगलेल्या चर्चा; एकदम पेव फुटून, भयानक प्रमाणलेखनासह शहरभर लागलेली 'बाळासाहेब....' असा हृदयद्रावक टाहो फोडणारी होर्डिंग्स, दिवसभर अग्निहोत्रासारखी चाललेली न्यूज चॅनल्स नि स्थानिक केबलवाल्यानं बळंच बंद पाडलेली इतर मनोरंजक चॅनल्स; 'उद्धवचा थोरला का ग हा?'टाईपच्या हृद्य चर्चा; रिकाम्या रस्त्यांवर खुर्च्या टाकून निवांत आडवारलेले पोलीस; अधून मधून दिसणारा एखादाच चुकार आकाश कंदील; रस्त्यावरच्या एका मुलाच्या हातातल्या ब्रेडच्या पुड्याकडे लागलेलं इतरांचं लक्ष्य नि 'कुठनं पैदा केलास भाऊ?' हा अनुच्चारित प्रश्न; नि कहर म्हणजे काल महाराष्ट्रभर एकदम रवाना झालेले बाळासाहेबांच्या अस्थींचे अनेक कलश, त्यांच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा नि झालेला ट्र्यॉफिक जाम.

(अटकबिटक झाली मला, तर वकील बघून ठेवायला हवा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(अटकबिटक झाली मला, तर वकील बघून ठेवायला हवा!)

हे शक्य नाही. तितकं मूल्य (मूल्य म्हणजे काय, याविषयी इच्छुकांनी नितीन थत्ते यांच्याशी संपर्क साधावा) नाही त्यात हे सगळ्यांना कळतं.
अटक करून घ्यायची आहे का? आधी धर्म मान्य कर, मग तो बदल... त्यानंतर असं काही पुन्हा लिही. मग तुला थोडं मूल्य प्राप्त होईल. मग मला कळव. मी एक दोन तक्रारकर्ते पाहून ठेवतो. ते तक्रार करतील. गुन्हा नोंदवला जाईल. मग कुठं तरी तुला अटक होईल. त्यानंतर, तू मूळची कोण हे माहिती असल्याने, इथं भरपूर चर्चा होईल, पण प्रत्यक्षात तुला वकील पहावाच लागेल. कोर्टात बहुदा तुला एकटीला (कुटुंबीय असतील, काही मोजके जिवश्च-कंठश्च असतील - वेल, ही अशी एक वेळ असते की जेव्हा आपल्याला उगाचच कळत असतं: दोस्त, दोस्त ना रहा... किंवा अपने पराये...) जावं लागेल. तुला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी झालीच नाही, तर तुझा पोपट होईल. झाली तर तुला जामीन द्यावा लागेल. सुटल्यानंतर तुला बुरखा घालून चॅनेलांवर प्रतिक्रिया द्याव्या लागतील. तू लिहिणारी वगैरे असल्याने चार वर्तमानपत्रात तुला लिहिता येईल - 'अटकेच्या सावटाखाली...' अशी शीर्षके देऊन. इंटरनेटवरही लिहू शकशील. हे सारं तुझ्यात मूळ धाडस असल्यानं होईल. एरवी, तुझ्या मुलाखतीही मीताक्षरी वगैरे असतील (घ्या... मेघना भुस्कुटे या नावाचा परिणाम... त्रोटक शब्दाऐवजी मीताक्षरी शब्द आला इथं.) मग इंटरनेटवर आज 'मेघना भुस्कुटे' असा सर्च केल्यावर जे काही येतं, त्यात आणखी भर पडलेली असेल. काही दिवस जातील. टेंपो कमी होत जाईल... एव्हाना केस मागे घेण्याविषयी कोणालाही रस राहिलेला नसेल. मग चार लोक जमवून आर्रार्राबांकडं जाऊन त्यांच्या विशेषाधिकारात केस मागं घ्यायला लावली जाईल. तेव्हा आर्रार्राबांऐवजी अजित्दादा किंवा कोण असेल तर ते थोडं नाजूक काम होईल. केस मागे घेतली तर त्याची एक सिंगल कॉलम बातमी येईल. मग सारे कसे शांत, शांत असेल. केस मागे घेतली गेली नाही तर, चार्जशीट होईल. तारखा पडू लागतील...
आणि तुला कळेल की अर्रे... सगळे लोक 'मेघना भुस्कुटे आगे बढो' म्हणत होते.
हुश्श... लिहिलं बुवा, थोडंसं... Wink
आता तुझी ही इच्छा इथंच निर्वाण पावणार. मला खूप वाईट वाटतंय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झालं? अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारी एक भावी कार्यकर्ती गमावलेली आहे महाराष्ट्रानं. हे घोर पातक तुमच्या माथी आहे आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कार्यकर्त्याची वाटचाल आधी अशाच खाचखळग्यांच्या मार्गावर होत असते. तेव्हा, 'मेघना भुस्कुटे आगे बढो... हम तुम्हारे पिछे है!'
'लढ बाप्पू' म्हटलं की कित्ती कित्ती बरं वाटतं, तुला सांगू! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेल बै, माझ्या महत्त्वाकांक्षेचा गळा घोटलात, आता मला कशाला ठाऊक असेल?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मित्र : "आजच्या पेपरमधलं एक विनोदी वाक्य - चौकाचौकांत लावलेल्या "फ्लेक्‍स'मुळे शोकाकुल वातावरण अधिक गहिरे होत होते."
मी : "गणपतीमधे गल्ल्यागल्ल्यांमधून लावलेल्या प्रचंड डेसिबेल्सच्या गाण्यांमुळे वातावरण मंगलमय होते तसंच का ?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0