ग्रीन स्मूदी

लहानपणी खोकला होऊ नये म्हणून मी प्रयत्नाची शिकस्त करीत असे. कारण जरा नुसता संशय आला सर्दी पडशाचा तरी आई लगेच "अहो, येतांना आढूळशाचा पाला घेऊन या, विद्या जरा खोकते आहे." असे वडिलांना फर्मान सोडायची. यावर काही बोलण्याची सोय नसल्यामुळे मी गप्प बसून दुख्खी अंतकरणाने रात्रीच्या त्या क्षणाची वाट पाही. बहुतेक लोकांना(सुदैवी) आढूळसा माहिती नसेल. कदाचित हा फक्त विदर्भातील खेड्यावरचा सर्दी-खोकल्यावर असलेला रामबाण उपाय असेल. गर्द शेवाळी रंगाचा हा कडूजहर रस खोकला तर सोडाच पण जगातल्या सर्व जंतूंचा नाश करू शकेल अशी मला खात्री होती. आता वळून बघतांना वाटते आई तो रस कशात मिसळून का देत नव्हती? त्यावेळी अननस, सफरचंद असे चविष्ट रस उपलब्ध नव्हते, पण निदान मधात तरी मिसळायचा!

सध्या अमेरिकेत ग्रीन स्मूदीचे फॅड उर्फ जबरदस्त खूळ निघाले आहे. वर्षानुवर्षे फक्त मांस व बटाटे खाऊन धिप्पाड झालेल्या ह्या समाजाला चव व आरोग्याची जाणीव करून देणारा हा उतारा असावा.
अचानक त्यांच्या अतिस्थूलता आणि आरोग्यास हानीकारक आहार सवयींचा साक्षात्कार जनतेला झाला आणि निर्ढावलेली शरीरे क्षणार्धात दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यापाराचे पेव फुटले. एखादी कल्पना त्वरित उचलून त्याची विचारप्रक्रिया नुसतीच सुरु करुनच नव्हे तर अफाट वेगाने जाहिरात करून प्रसार करणे ही अमेरिकेची खासियत. वर्षानुवर्षे मन मानेल ते खाऊन आता सारी आतडी, धमन्या स्वच्छ करून देण्याची आश्वासने देणारी पत्रके, जाहिराती फडफडू लागल्यात. लोकांच्या असुरक्षित, हळव्या, विकारक्षभ मनोवृतीच्या मर्मावर त्यांनी बरोबर बोट ठेवले आहे. शिवाय धनवानांना गोड फलनिष्पत्तीचे प्रलोभन दाखवून मालाची जाहिरात करण्याचे तंत्र ही त्यांनी तंतोतंत ओळखले आहे. अर्थात अगदी सूक्ष्म अक्षरात "निष्पत्तीची ग्वाही आम्ही घेत नाही" हे छापायला ते विसरत नाहीत. आणि चिंताग्रस्त ग्राहकही सोयीस्करपणे ते दुर्लक्षित करतात. अशाच एका चाणाक्ष उत्पादकाने हे अत्युत्तम बहुगुणी मिश्रणयंत्र बनवण्याची शक्कल लढवली. खरे तर तीस चाळीस डॉलरला सुंदर कामचलाऊ मिक्सर मिळत असतांना असे महागाचे, पाचशे डॉलरचे यंत्र विकायला किती विक्रयकला लागेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आणि त्यानुसार, बरोबर त्या किमतीच्या आवाक्यात बसणाऱ्या गटातील लोकांना लक्ष्य करून भुरळ घालायला अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या शोधल्या गेल्या.

ह्याचा परिणाम म्हणून टीव्हीवर, ठिकठिकाणी मोठाल्या दुकानात, ह्या अतिशय सुंदर, उत्कृष्ट दर्जाच्या, पण अवास्तव, अतोनात महाग मिक्सरची प्रात्यक्षिके सुरु असतात. अशाच एका प्रात्यक्षिकाच्या घोळक्यात एकदा मीही सामील झाले. विविध रंगबिरंगी फळे, भाज्या, अनेक सुऱ्या आणि मोठ्या भांड्यात बर्फ असे चहु बाजूनी मांडून एक अत्यंत उत्साही तरुण आपल्या सादरीकरणासाठी सज्ज होता. सोललेले पूर्ण संत्र, लिंबू, सफरचंद शिताफीने झराझर त्याने जारमध्ये टाकले. सोबत किती अश्वशक्ति,(Horse Power) वेग (speed of rotations),बोथट ब्लेड असलेले हे यंत्र कसे इमल्सीकरण(emulsify) करून कडक फळांनासुद्धा एकजीव (homogenous)करून टाकतात हे मशीन एव्हढ्याच वेगाने सांगत होता. अर्थात तरुण मंडळी मंत्रमुग्ध होऊन गेलेली. आधीच ज्यांनी ते विकत घेतले आहे असे भक्त कौतुकानी मान हलवत संमती देत होते. माझ्यासारखे लोक ह्या विस्तृत ज्ञानाच्या भडीमाराने गोंधळून गेलेले, बावरलेले. प्लेक्सिग्लास ने बनवलेला हा मजबूत जार तुम्हाला कधीही दगा देणार नाही. त्याने ठासून सांगितले. एव्हाना माझा चेहरा पूर्णतया बावळट झालेला. शेजारचा माणूस माझ्या बचावाला आला. “म्हणजे विमानाच्या खिडक्या बनवायला जे मटेरियल वापरतात ते, बुलेटप्रूफ असतेना, ते!” मी आभाराचे स्मितहास्य केले.

"त्या मिक्सरशी खेळत असतेस तू, जेव्हा बघावं तेंव्हा" असे तावातावाने बोलत बंदूक घेऊन थडाडथड जारला गोळ्या मारणारा नवरा आणि तरीही न फुटलेल्या जारकडे बघत "तू नाही माझ्या मिक्सिपासून दूर करू शकत मला !" हातातला ग्रीन स्मूदीचा पेला विजयाने उंचावत हसणारी बायको असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर तरळले. वास्तविक "खाली फरशीवर पडला तरी त्याला तडा जात नाही" असे साधे स्पष्टीकरण तो देऊ शकला असता. परन्तु तंत्रशास्त्रविषयक तपशील सांगण्याच्या पराकोटीच्या टोकाला जाणे हा अमेरिकन स्वभाव असावा. ते असो..

"आता तुम्ही विचार करत असाल, ह्या पद्धतीने मिक्सर वापरल्यावर किती लवकर झिजून जातील आणि कितीदा बदलावी लागतील ही पाती! पण खरी गंमत हीच कि ती तुम्हाला कधीच बदलावी लागणार नाही"...त्याची टकळी सुरूच! " कारण धारदार करण्याऐवजी आम्ही ती पाती बोथटच केलीत!" आणि माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला. इथेच चुकते आहे माझे! साऱ्या संवेदना, वेदना बोथटवून टाकल्या तर मग आपल्या धारदार भावनांनी, जीभेनी, नजरेनी कुणाला दुखवायचा प्रश्नच येणार नाही. अन मग "आता तू थोडं बदलायला पाहिजे स्वतःला" असे कुणाचे शहाणपणही ऐकावे लागणार नाही. माझा ह्या मिक्सर बनवणाऱ्या लोकांविषयी आदर एकदम वाढला. आयुष्याच्या साऱ्या कटकटीचे मूळच किती सहजपणे त्यांनी उपडून टाकले.

एव्हाना कधी कच्च्या तर सोडाच पण शिजवूनही बघितल्या नाही अशा केल, स्विस चार्ड, पार्सली, ब्रॉंकली, सेलरी भाज्यांच्यामध्ये तो वेढलेला होता. "कुठलेही फळ, केळ, आंबा, पपई, पेअर,अननस, कलिंगड, स्ट्रोबेरी, कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही एकत्र करा आणि वाला! चविष्ट आरोग्यदायी पेय तयार! ही केल,( अनेक व्हीट्यामिनयुक्त, औषधी गणल्या जाणारी पण सर्वांची नावडती हिरवी पालेभाजी) कधी खातील तुमची मुले?” सफरचंद, संत्र, अख्खे लिंबू ह्या फळांसोबत मुठभर केल, सेलरी, काकडी अन दोन पेले बर्फ टाकून त्याने ढर्र मशीन सुरु केले. अक्षरशः एक मिनिटाच्या आत, वर्णनाप्रमाणे सुंदर ताज्या हिरव्या रंगाचे रसायन तयार. छोट्या छोट्या कपांनमध्ये भरेपर्यंत लोकांचे आह-उउह सुरु झालेले. "लोकहो खरे सांगा, तुमच्या मुलांना पत्ता तरी लागेल का की ते पालेभाज्या खाताहेत!!"

पालकाच्या भाजीचा सबंध डबा घटाघट गिळंकृत करून शक्तिवान होणाऱ्या पापायाची (Popeye) कार्टून बघूनही मुलांना हिरव्या भाज्या अप्रियच राहिल्यात. पालेभाजी नाही खाल्ली तर डेजर्ट मिळणार नाही ह्या धमकीचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. उलट आसपास घोटाळंणाऱ्या कुत्र्यांची मात्र चंगळ असते, भाज्या आणि त्याबरोबरचे मासंही मटकवायला. शेजारच्या मुलांच्या ह्या युक्त्या बघून आमचीही मुले कुत्रा हवा असा तगादा लावीत. पण आम्ही बधलो नाही. अर्थातच विक्रेत्याचा ह्या प्रश्नामुळे सर्व हताश झालेल्या आयांचे डोळे लुकलुकले. खरंच एवढे साधे आहे मुलांना पालेभाज्या खाऊ घालणे?

खरच आंबटगोड मधुर रसांच्यामध्ये त्या पालेभाज्याची चव गडप झाली होती. हे स्वादिष्ट पेय तुमच्या स्वादकलिकाची (taste buds) फसवणूक करायला अजिबात कमी पडत नाही. मधुमेह, रक्तदाबाचे विकार प्रतिबंधन तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून तर वजन कमी करण्यापर्यंतचे अनेक गुण ह्या पेयाला चिकटवले आहेत. अहमिहीकेने त्याचा प्रसार आणि ग्वाही देणारे लहान थोर,अनेक प्रतिनिधी आहेत. प्रशंसात्मक पुस्तके, प्रसिद्ध लोकप्रिय तारक- तारिका, असंख्य पाककृती, ब्लॉग्स, काही शंका कुशंका, प्रश्न असतील तर पाठबळ देणारे इंटर्नेटवर असलेले समूह सारे तुम्हाला ह्या लाटेमध्ये ढकलायला उत्सुक आहेत. हरितक्रांतीचे कैवारी, सोनखतावर पिकवलेल्या भाजी-पाल्यांवाले आपली टिमकी पुढे करून ह्या रसाला पुष्टी द्यायला हजर. सध्या अमेरिकेत रासायनिक खते,फवारे न घालता सोनखतावर पिकवलेल्या भाज्या- फळे, गाईचे ताजे दूध,शेतावर मोकळ्या वाढलेल्या कोंबड्यां खाव्यात असा प्रसार, प्रचार जोरात सुरु आहे. मनात म्हटले, जिथे आपण सुरुवात केली तिथेच विश्वप्रदक्षिणा घालून परत आलोत! पालेभाज्या, फळे ह्यांचे सत्व, महत्व आणि उपयुक्तता निर्विवाद असल्यामुळे ते कोणाला पटवण्याचा प्रश्नच नव्हता. आता उरले आहे ते फक्त गळी उतरवणे!

गरमागरम विविध सूप तयार करण्याचे एक वेगळेच बटन. येऊ घातलेल्या कडाक्याच्या हिवाळ्याच्या विचाराने हे वैशिष्ट्य अधिकच आकर्षक वाटले. सरळ मायक्रोवेव मधून भाज्या काढून मिक्सरमध्ये टाकून बाहेर आलेले गरम, वाफाळलेले सूप बघून भल्याभल्यांचा विरोध थंडावला. सूप करण्याची लांबलचक, रटाळ प्रक्रिया लहान झालेली बघून आधीच पन्नास टक्के कललेले मत पूर्णच आहारी गेले.
“थंड डेजर्ट करण्याला ही शेवटची तिसरी निवड. दोन पेले बर्फ, हवी ती फळे आणि साखर. बस.. तुमचे आरोग्यवर्धक अप्रतिम डेझर्ट तयार. आणि हो, आता आयस्क्रीममध्येही तुम्ही बिनधास्तपणे पालक घालू शकता हं”!. आपले समारोपाचे प्रशस्तीपत्रक देऊन त्याने सूचकपणे गर्दीचा आढावा घेतला. आईने श्रीखंडात किंवा घट्ट बासुंदीत कालवून दिलेल्या आढूळश्याचे स्वप्न मी रंगवले आणि तो जुना आघात थोडा बोथटला.

हे अगदी मान्य कि या वेगवान जीवन पद्धतीमध्ये स्वयंपाक, निवांतपण ह्याला वाव नाही. लक्षावधी कामांच्या सर्कसीत उदरभरण हे कार्यही बसवायचे आहे. मिळेल तो सोपा मार्ग अर्थातच मनमोहकच वाटतो. तरीही मनात आले हा कशाचा अंतर्यामिक अट्टाहास आहे का, जो अशा यांत्रिक उपकरणांमधून अनाहूतपणे व्यक्त होतो. कडू, नावडत्या, अप्रिय गोष्टींशी सामना करण्याची ही आगळी तऱ्हा आहे की वास्तव नाकारण्याचा हा फोल प्रयत्न आहे? विपुलतेमुळे निरसता आलेल्या आयुष्यातली पोकळी काहीतरी नाविन्यांनी भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे का? आत्मसंतुष्ट असल्याच्या देखाव्यामागे विफलता लपवण्याचा हा करुण प्रयास आहे का? सरमिसळ कशाला करायची साऱ्यांची? जे गोड आहे ते गोड म्हणूनच आवडीने चाखायचे आणि कडू ते पचवायचे. कधी कधी कडवी चवसुद्धा भावते, हवीशी वाटते, आवश्यकही असते. वेदना, दुःख, आतून पेटलेला वणवा कधी कुठे वरवरच्या प्रयत्नांनी शमतो? कायम दुर्लक्ष करून गैर वापरलेल्या आतड्यांना अशी कलाटणी का देता येते? आणि नेहमीच त्वरीत केलेली दुरुस्ती, डागडुजी, सरमिसळ आयुष्यभरासाठी का पुरते? जे ज्याचे गुणधर्म, वैशिष्ट आहे ते राखून आदर करायलाच पाहिजे. मग ती केल असो की आढूळसा.

अनेकदा कुणाची पर्वा न करता स्वतःचे लाड करण्यातही मजा असते. लहानपणी बाजारात हातगाडीवरचा लाल गोड द्रव घातलेला बर्फाचा गोळा खातांना झालेला ब्रह्मानंद अजून आठवतो. मग आयस्क्रीमच्या अक्षरशः शेकडो पसंती असतांना नेमका पालेभाजीचा हिरवा रस मिसळून छोट्या म्याथुला त्या आनंदाला मुकवण्याचा अधिकार आहे का मला?

अपराधीपणे मी हे कबूल करते की मीही त्या विक्रीयकलेची शिकार बनले. हा त्या प्रात्यक्षिकाचा प्रभाव की अभावितपणे माझ्या नकळत मीही ह्या व्यवस्थेचा भाग बनत चाललेली आहे??

field_vote: 
3.42857
Your rating: None Average: 3.4 (7 votes)

प्रतिक्रिया

तंबाकू, चहा आदी वस्तूसुद्धा अकेकाळी या युरोपियन/अमेरिकनांसाठी "अनेक रोगांवरचा एकच अक्सिर इलाज" होत्या याची आठवण झाली Wink
शेवटी विकणार्‍याची करवंदही खपतात हेच खरं!

लेख वाचताना मजा आली.. पात्याप्रमाणे संवेदना बोथट करणे, ग्रीन स्मूदीचा पेला विजयाने उंचावत हसणारी बायको, विकारक्षभ मनोवृती वगैरे शब्दयोजना, वाक्ये खुमासदार आहेत.. और भी आने दो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाचं नाव वाचून भलतीच अपेक्षा होती. पण लेख मात्र टेस्टी निघाला.

वास्तविक "खाली फरशीवर पडला तरी त्याला तडा जात नाही" असे साधे स्पष्टीकरण तो देऊ शकला असता. परन्तु तंत्रशास्त्रविषयक तपशील सांगण्याच्या पराकोटीच्या टोकाला जाणे हा अमेरिकन स्वभाव असावा. ते असो..

हे वाक्य अगदी पटलं. अनेक लोकांकडून अमेरिका आणि इंग्लंडची तुलना ऐकलेली होती, प्रत्येकाचं अमेरिकेबद्दल हेच म्हणणं होतं. तेच पुन्हा वेगळ्या शब्दांत वाचून हसू "फुटलं".

तुमच्या घराचा ताबाही मुलांनी घेतलेला आहे. कुत्रा आणायचा त्यांचा हट्ट पुरवला नाहीत ना, आता मिक्सर घ्यावाच लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्त.. हसूही आले आणि शेवट वाचून विचारही केला.

विनोदाची पेरणी उत्तम!

विशेषतः

"त्या मिक्सरशी खेळत असतेस तू, जेव्हा बघावं तेंव्हा" असे तावातावाने बोलत बंदूक घेऊन थडाडथड जारला गोळ्या मारणारा नवरा आणि तरीही न फुटलेल्या जारकडे बघत "तू नाही माझ्या मिक्सिपासून दूर करू शकत मला !" हातातला ग्रीन स्मूदीचा पेला विजयाने उंचावत हसणारी बायको असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर तरळले.

हे वाचून ते दॄष्य माझ्या डोळ्यासमोर पण तरळले आणि फुटले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बहोत खूब...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0