लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

म्हणजे काय आहे की -
या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणीमात्राचे समिक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समिक्षण त्यात आले असावे.)
याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणीमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही. समिक्षा म्हणजे कशी 'ब्यॅलन्स्ड' असली पायजे ह्ये काय आपल्याला जमत नाही.

मागे एकदा 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ'नामक कादंबरीबद्दल प्रेमाचे असेच भरते आले होते आणि आपणही एक समिक्षा लिहावी किंवा गेलाबाजार एखादे रसग्रहण तरी लिहावे अशी प्रबळ इच्छा झाली होती.(अवांतरः 'इच्छा' या शब्दातला च 'चमचा' च असा थेट उच्चारून पहा - मजा येते/मझा येतो - माझी आजी तसा उच्चार करत असे.) पण तसे होऊ शकले नाही.म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही. त्याला अनेक कारणे होती. आणि मग आता बर्‍याच दिवसांनी जेहत्ते कालाचे ठायीं समस्त जगात कोणी फक्त तीन लोकांनी लिहिलेली हिंदूची समिक्षणेच तेवढी कशी योग्य आहेत (पैकी एक डॉ. सदानंद मोरे आहेत हे आठवते, बाकीचे दोन कोण ते कुणाला लक्षात असल्यास कृपया कळवावे) आणि बाकीची कशी बकवास आहेत हे समजल्याने आपण एक बकवास समिक्षण लिहिले नाही याबद्दल हायसे वाटले.

असे बरेचसे भरतेस्वरूप (किंवा भरीत किंवा भारीतस्वरूप) अनुभव गाठीशी असल्याने आणि तसेच आंतरजालावर चित्रपटक्षेत्रातील ज्ञानी मनुष्यें असल्याने 'लाईफ ऑफ पाय' (किंवा पायचे आयुष्य) नामक इंग्रजी चित्रपटाबद्दल त्या ज्ञानी मनुष्यांपैकी कोणीतरी भलेबुरे दोन शब्द लिहील असे मनापासून इच्छित (च - चमच्यातला) होतो. पण हाय रे दैवा! इतके दिवस वाट पाहूनही त्यावर कोणीच काही लिहिले नाही. तेव्हा हे कार्य करणे आपल्याच नशिबी लिहून ठेवले आहे असे जाणवून हे शिवधनुष्य पेलण्याचा एक शबल प्रयत्न मी करू पहात आहे.

'सोनी म्यॅक्स' या टीव्ही च्यॅनलवर ऑस्कर नॉमिनेशन्सवर एक टॉक शो सुरू होता. त्यात बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि प्रतिथयश दिग्दर्शक श्री. करण जोहर यांनी फारच महत्त्वाचे विधान केले. ते म्हटले - "लाईफ ऑफ पाय ही मूळ कादंबरी मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचली होती. पण तिच्यात चित्रपट बनवण्याचा काही जर्म मला दिसला नाही. ती काही खास कादंबरी वाटली नाही मला. 'आंग ली'ने कसा काय बुवा या कादंबरीवर चित्रपट बनवला? थ्री-डी गिमिक्स वापरून काहीतरी केले आहे झाले. पण मला तरी तो काही ऑस्कर नॉमिनेशनवाला चित्रपट वाटला नाही." - - अशापैकी महनीय व्यक्तींनी हे मत व्यक्त केल्यावर हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे असे मला वाटले आणि माझा अंदाज चुकला नाही.

समिक्षणाच्या सुरुवातीला किंवा नमनाला विहीरभर तेल घालून (जसे मी येथे केले आहे)झाल्यावर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रघात आहे. आणि त्याबरोबरच एक धोक्याची सूचना (-यापुढचा प्यारेग्राफ चित्रपटाची कथा फोडतो, तेव्हा ज्यांना तो पहायचा आहे त्यांनी हा प्यॅरा वाचू नये इ.) लिहायचा प्रघात आहे. या प्रघाताला अनुसरून कथा आणि धोक्याची सूचनाही लिहायला घेणार होतो. पण त्याची काहीही गरज नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि ज्यांना तो समजला आहे त्यांनी हे संपूर्ण समिक्षण वाचण्याची गरजच नाही. त्यांनी इथूनच कन्नी काटली तरी चालेल. किंवा आता इथेपर्यंत वाचलेच आहे तर पुढेही वाचा, बापडेहो.

तसे म्हटल्यास या चित्रपटाची कथा सांगितली काय किंवा न-सांगितली काय? त्याने काहीच फरक पडत नाही. (ऑं? खरेच.) (म्हणजे हाच तर त्या चित्रपटाचा वरच्या आवरणातला संदेश आहे.)थोडे आत गेले तर चित्रपट 'ईश्वर आहे की नाही?' या अनादि-अनंत प्रश्नाचे काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.(मंडळी सरसावून बसली असावीत.)

चित्रपटाची बाह्यकथा (म्हणजे यान मार्टेल या लेखकाने लिहिलेल्या मूळ कादंबरीची कथा)म्हणजे एक सरळसोट निवेदन आहे. [After studying philosophy at Trent University in Peterborough, Ontario, Martel spent 13 months in India visiting mosques, churches, temples and zoos, and spent two years reading religious texts and castaway stories. - विकी] भारतात इतर जगाच्या तुलनेने कमी खर्चात बराच काळ राहता येते म्हणून एक गरीब फ्रेंच लेखक कादंबरी लिहीण्यासाठी पाँडिचेरीत रहात असता एका भारतीय व्यक्तीच्या संपर्कात येतो. (पण त्याची ती मूळ कादंबरी पूर्ण होत नाही.) ती भारतीय व्यक्ती त्याला आपल्या 'पाय पटेल'(पिसिन मोलिटर पटेल) नामक भाच्याच्या आयुष्यात घडलेल्या विचित्र कथेबद्दल सांगते. ही कथा एखाद्या कादंबरीचा विषय बनू शकते असेही सुचवते.तेव्हा तो फ्रेंच लेखक पाय पटेलला भेटायला कॅनडात जातो आणि ती कहाणी ऐकतो. त्याचे हे सर्व निवेदन म्हणजेच 'लाईफ ऑफ पाय' कादंबरी.

या पाय पटेलने फ्रेंच लेखकाला सांगितलेली कहाणी मात्र अशी सरळ नाही. ती 'अकटस्य विकटो' आहे. म्हणजे ती तशीच असणे पाय पटेलला अपेक्षित आहे. त्याला कदाचित कापुसकोंड्याचीही गोष्ट अपेक्षित असेल असे कोणी म्हणेल. पण तसे नाही. कारण सुरुवात आणि शेवट हे दोन बिंदू निश्चित असणे त्याला अपेक्षित आहे. त्यांमध्ये जे काही घडते ते अकटस्य विकटो असू शकेल किंवा अत्यंत तर्कशुद्ध (तर्कदुष्ट म्हणा हवे तर)असेल - त्याने काय फरक पडतो असा पायचा सवाल आहे. (आणि पर्यायाने लेखकाचाही.) चित्रपटभर एक अतर्क्य कहाणी सांगणारा, अ‍ॅब्सेंट माईंडेड वाटणारा पाय पटेल शेवटच्या काही मिनिटांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून वाचकाला/प्रेक्षकाला गारद करतो.(आणि इर्रफानखानने या प्रॅक्टिकल पण ईश्वराला मानणार्‍या पायला अत्यंत ताकदीने उभे केले आहे.)

चित्रपट हा एक भूलभुलैया आहे. विचार करायला लावतो. 'पाय' या नावाबद्दलच खूप घोळ घातला आहे लेखकाने. त्याचा अर्थ सांगायला बरीच रिळे (किंवा डीव्हीडीवरचे बरेच सेक्टर्स म्हणा)खर्ची पडली. मुळात फ्रेंच स्विमंग पूलचे नाव - पिसिंग (म्हणजे मुतर्‍या) पटेल हे त्याच्या नावाचे विडंबन आणि ते नाव पुसावे म्हणून पाय पटेलने केलेले प्रयत्न हेही स्वप्नवत वाटतात. पण मला काय जाणवले ते सांगतो. 'पाय' ही संख्या संमोहक आहे. (भल्याभल्यांना भुरळ घालते.)'लाईफ ऑफ पाय इज नेव्हर रिपीटिंग अँड नेव्हर एंडिंग' (- हे माझे इंटरप्रिटेशन.)

काळातील दोन बिंदूमध्ये एक अतिरंजित वाटणारी कथा घडू शकते किंवा एक तर्कशुद्ध वाटणारी कथा घडू शकते. एका कथेत माणसाळत जाणारा वाघ, तरंगणारी बेटे, मनुष्यभक्षी वनस्पती असू शकतात तर दुसरीत नरभक्षण करून स्वतःला जगवणारी माणसे असू शकतात. आयुष्याचेही असेच आहे. आयुष्य सरळसोट असू शकते किंवा अनेक चित्रविचित्र घटनांनी भरलेले असू शकते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये जे काही घडू शकते ते सर्व म्हणजे आयुष्य. पण ज्या कथेत वाघ आहे, बेटे आहेत ती कथा रंजक वाटते. तद्वत ज्या आयुष्यात ईश्वर आहे ते आयुष्य रंजक आहे असे आपले मत पाय पटेलच्या तोंडून लेखक व्यक्त करतो.

व्यामिश्रता हेच या चित्रपटाच्या कथेचे वैशिष्टय. आरंभ,गणिते,तर्क,शक्यता,उपमा,कार्यकारणाभाव,शेवट अशा सर्वच पैलूंवर विचारतरंग निर्माण करणारे हे कथानक आहे. इतक्या ताकदीच्या कथानकावर चित्रपट निर्माण करणे धाडसाचे होते. योग्य हाताळणीखेरीज हा चित्रपट फसला असता.

या चित्रपटाचे नेमके यश कोणते? तर मूळ कथेला दिग्दर्शकाने प्रेक्षकांपर्यंत सरळ पोचवले. जसेच्या तसे. पायच्या कथेतला अकटस्य-विकटोपणा अंगावर यावा ही कथेची गरज होती.त्यातली काही दृष्ये जवळजवळ अ‍ॅनिमेशनपटातली वाटतात. (आंग लीच्या जागी मी असतो तर कदाचित निवेदनाचा भाग टू-डी आणि पायच्या कहाणीचा भाग थ्री-डी केला असता. हॉ, हॉ, हॉ - म्हणायला माझे काय जाते? पण कदाचित तुम्हालाही ते पटेल. पिक्चर पहा.)

दबंग२ जिथे लागला होता त्याच्या शेजारच्याच स्क्रीनवर हा पाहिला. हाही विचित्र योगायोग असावा. (जास्त खोलात विचार केला तर दबंग२ पेक्षा सरळसोट कहाणी आणि अकटस्य विकटो सादरीकरण कोणते असेल? दबंग२ आणि लाईफ ऑफ पाय हे चित्रपटसृष्टीचे दोन धृव आहेत.)

कदाचित इतकेच नसेलही. इतर कोणा प्रेक्षकाला 'लाईफ ऑफ पाय'मधून आणखी काही जाणवेल.एखाद्या शेरामधले शब्द स्पष्ट पण त्याचा अर्थ संदिग्ध पाहिजे.त्याचा अर्थ बहुपदरी पाहिजे. ज्याचा जसा अनुभव तसा त्याला तो भिडला पाहिजे.तरच तो शेर श्रेष्ठ! (नाही का,चित्तरंजन?)या चित्रपटाबाबतही असेच म्हणता येईल. किंवा 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीबाबतही असे म्हणता येईल.

लाईफ ऑफ पाय आणि हिंदूमध्ये मला एक समान स्वर ऐकू आला. तो एक स्वर ऐकण्यासाठी ऐकणार्‍याचा कान 'हिंदू' असला पाहिजे. लाईफ ऑफ पाय कादंबरीच्या लेखकाचा कान दोन वर्षे तेरा महिन्यांत हिंदू झाला.अँग ली ला हा चित्रपट बनवावासा वाटला म्हणजे त्याला तो स्वर ऐकू आला.

शेवटी एक वाद निर्माण करणारे विधान - 'कान हिंदू असतील तर आपोआपच शांतीमंत्र ऐकू येईल'.

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

उत्तम परीक्षण.
चित्रपटाची कथा अत्यंत सुंदर आहे यात शंका नाही.

कदाचित इतकेच नसेलही. इतर कोणा प्रेक्षकाला 'लाईफ ऑफ पाय'मधून आणखी काही जाणवेल

अगदी. मला माणसाची, नागवे सत्य सहन न करता आल्याने देवाला (आणि त्या अनुषंगाने येणार्‍या रंजकतेला) जन्म देणारी, दुर्बळता जाणवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखकाने अशा मतमतांतरांची चांगलीच दखल घेतलेली आहे. पाय पटेल त्याच्या पौगंडावस्थेत अल्बर्ट कमूच्या 'द स्ट्रेंजर'('ले'ट्रेंजर')चे वाचन करताना दाखवलाय. (दुसरे पुस्तक बहुतेक फ्योदोर दोस्तेयवस्कीचे असावे). तेव्हा कथेच्या अनुषंगाने अस्तिकवाद ते निरीश्वरवादच नव्हे तर निरर्थकवादापर्यंत विचार करता येतो. चित्रपटात आयुष्याचा अर्थ, ईश्वराचे त्यातले स्थान असा विषय हाताळणे हे फारच दुरापास्त आहे.

"या कादंबरीत/चित्रपटात निरीश्वरवादी, अज्ञेयवादी आणि ईश्वरवादी (अथेईस्ट, अगॉनिस्ट आणि थेईस्ट) या सर्वांचीच सोय लागली आहे." असे मी इतरत्र प्रतिसादात म्हटले आहे.
यामुळे ज्याला जसे हवे तसे त्याने घ्यावे. हेच भक्ती-कर्म-ज्ञान-न्याय-सांख्य-नास्तिक-बौद्ध असे कसेही भारतीय तत्त्वज्ञान नव्हे का? - किंवा- चित्रपटात पिसीनचा बाप म्हणतो तसे -'बिलीव्हींग इन एवरीथिंग इज इक्विवलन्ट टू बिलीव्हिंग इन नथिंग!' Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतंत!
हेच जाणवलं मला...
(या पार्श्वभूमीवर ते कामूचं पुस्तक आजूनच उठून दिसतं (स्माईल) )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य
या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ,
साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ.

-‘हिंदू’चा उपोद्घात.

बस्स. हाच तो समान स्वर! बाकी काय बोलायचं?

ताजा कलम :
माझ्याच डिंग्या मारत नाही पण-
लॉस अँजेलिस टाईम्स मध्ये आलेली ही समीक्षा माझा वरचा लेख वाचूनच लिहिलेली आहे असे म्हणायला माझे काय जाते? हॉ हॉ हॉ

"the deeper meaning of the mathematical symbol pi lies not merely in its representing the ratio of the diameter of a circle to its circumference but in its being an irrational number whose decimal configuration is nonrepetitive and never-ending""

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हणतात जखमेवर मीठ. Wink

काहि घरगुती कारणाने हा चित्रपट थेट्रात पाहु शकलेलो नाहि. ३D असल्याने घरी काय पहायचा म्हणून पाहिलेला नाहि..
आता २D बघावा असा विचार करतो आहे. कथेचा चुकुनही अंदाज येऊ नये म्हणून वरचा परिचय वाचलेला नाहि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा चित्रपट पाहिल्यावर, 'आंग ली' हा एक महान दिग्दर्शक का आहे ते कळले. चित्रपट सरळ गोष्ट म्हणून बघितला तरी पकड घेतो. त्यानंतर त्या दोन्ही कथांमधली कुठली खरी असेल याच्या विचारात पाडतो. चित्रपट पाहून आल्यावर त्यावर प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडणे,हेच या चित्रपटाचे महान यश आहे.
जीवनाचे तत्वज्ञान हे नुसता विचार वा वाचन करुन समजावून घेण्यापेक्षा, असे अंगावर येणारे जिवंत अनुभव पाहून जास्त समजते.
प्रत्येक चित्रपटप्रेमीने हा सिनेमा बघितला पाहिजे आणि तो सुद्धा ३ डी मधे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला राव 3डी दिसत नाही,काय समजत नाही काय करावे,...डोळ्याचा नंबर पण व्यवस्थित आहे ,
एक प्रतल वेगळे दिसले आणि बाकी सगळे औट ऑफ फोकस असल्या सारखे दिसत होते, तरीही सिनेमा झकास आवडला...
२डी -,३डी झेपेल तसा, पण नक्की बघावा हे खरं.!!!!!

सुरुवातीचे गाणं सुरु झाल्यावर कन्नड पिक्चर मध्ये आलोय का चुकून असेच वाटत होते,पण ते गाणे इतके सुरेख होते की गाणे संपल्यावर आपल्या स्क्रीनकडे जाऊ असा विचार केला , त्याच गाण्यासाठी ऑस्कर मिळाले असे कळतंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता चित्रपट पाहिलाच पाहिजे का? बहुदा नाही. सार कळले, सारे कळले. आता राहिला तो केवळ तपशील - रंग, रूप, आकार, यांची दृष्यमानता आणि त्यांचे दृष्यभान, माणसे-माणसे, माणसे-पारिसरिक यांचे नातेव्यवहार, त्यांची अनन्य आणि एकवटतेने होणारी अनुभूती, तिच्याशी जोडले जाणारे पाहणाऱ्याचे (अतिरिक्त) नाते वगैरे. तर, आता चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे नाही.
सुरवात आणि शेवट - असणे किंवा नसणे, काळाचे दोन बिंदू, जन्म आणि मृत्यू हे दोन बिंदू वगैरे अस्सल विसुनाना! त्यातल्या व्यामिश्र जगण्याचा एक वेगळा आविष्कार अशी ही कथा दिसते. अकटस्य विकटोपणा असलेली... बहुदा पहावा लागेल हा चित्रपट. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशयच होय पाहायला पाहिजे. चित्रपट कळो-न कळो; समुद्रातली, बेटांवरची जी दृश्ये साकारली आहेत ती केवळ याचि डोळा त्रिमितीत पाहण्यासाठी जावेच जावे....
गीतेत विश्वरूपदर्शन आहे. ते वाचायला दिले आणि कृष्णाने प्रत्यक्ष येऊन 'एक डेमो देतो' म्हटले तर तुम्ही 'ते वाचून समजले आहे हो, आता काय पाहायचे त्यात ?' म्हणणार का ?;)
चित्रपटातील एखाद्या दृश्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या अनुषङ्गाने एखादी गोष्ट चमकूनही जाईल, जी विसूनानान्ना गवसलेली नाही. (विसुनाना आणि श्रावण मोडक या दोन भिन्न व्यक्ती आहेत असे गृहीत धरून Wink Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालक, मी प्रतिसादाच्या दुसऱ्या परिच्छेदात म्हटलं की, पहावा लागेल हा चित्रपट! Wink
विसुनाना आणि मी भिन्नच आहोत बरं... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. जेकिल आणि मि. हाईड नाही ना? Wink

एवढं वाचल्यानंतर चित्रपट बघितलाच पाहिजे; अजून आमच्या शहरात चित्रपटगृहांमधे आहे असंही दिसतंय.

सुरूवातीचे करण जोहर, हिंदू आणि काय-न-काय! पिक्चर बघताना आता माझा गोंधळ होण्याचीच शक्यता जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समिक्षा आवडली.
ननिँ चा प्रतिसाद खूप आवडला.
आंतरजालावरील चित्रपटक्षेत्रातील ज्ञानी मनुष्यांचे प्रतिसाद वाचायला आवडतील.
बाकी (करण जोहरप्रमाणेच) पुस्तक ५ वर्षाँपुर्वी वाचलेले आणि न आवडलेले, त्यामुळे चित्रपट पाहीला नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसूनाना, पहिल्या परिच्छेदाशी अतिशय सहमत आहे. मनापासून आवडलेल्या गोष्टीकडे फार वस्तुनिष्ठपणे पाहून त्यातल्या तृटीवगैरे शोधणं आपल्यालाही जमत नाही. (म्हणजे त्या नसतात वगैरे असं नाही पण त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि गेलं तरी त्याकडे कानाडोळा करावासा वाटतो.) सिनेमा विषयातल्या आवडीनिवडी फार वैयक्तिक असतात असा अनुभव आहे, त्यामुळे दुसर्याने लिहिलेल्या परिक्षणावरून आपलेही त्याबाबतीत तेच मत होईल असे नाही पण तुम्ही ज्यापद्धतीने लिहिले आहे ते वाचून तो मलाही आवडेल असे वाटते.
आणि हो, 'हिंदू' बद्दलही लिहाच. मी आताच 'हिंदू' वाचायला घेतली आहे (असते आमचे वरातीमागून घोडे..!) आणि आत्तापर्यंत वाचलेल्या शंभरेक पानांतच बरेच अनुकूल मत झाले आहे पण त्याबरोबरच थोडे विसंवादी सूरही जाणवले.. तुम्हाला आणि इतरांना काय वाटले हे जाणून घ्यायला नक्की आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक वाचले आहे, चित्रपट बघायची इच्छा आहे. म्हणून परीक्षण भुरभुरत वाचले. तेवढ्यातही आवडले. चित्रपट बघितल्यानंतर पुन्हा परीक्षण वाचेन, म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमनाला विहीरभर तेल घालून लिहिलेली समीक्षा आवडली.

"लाईफ ऑफ पाय ही मूळ कादंबरी मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचली होती. पण तिच्यात चित्रपट बनवण्याचा काही जर्म मला दिसला नाही.

हे मलाही तंतोतंत लागू होतं. म्हणूनच मी त्यावर पिक्चर काढला नाही Wink गंभीरपणे - संपूर्ण सिनेमाभर फक्त कंटाळवाणा समुद्र आणि एकच व्यक्ती यामुळे सिनेमा कंटाळवाणा झाला असेल असा माझा अंदाज होता. मात्र अनेकांनी यावर अतिशय भरभरून स्तुती केलेली आहे तेव्हा तो थेटरांतून निघून जाण्याआधी बघायलाच हवा.

- यापुढे लिहिलेलं आहे तो भाग काहीसा गौप्यस्फोट करणारा ठरू शकेल तेव्हा सिनेमा बघण्याची इच्छा असलेल्यांनी वाचू नये म्हणून पांढऱ्या अक्षरांत आहे. -

पुस्तक वाचताना त्या माध्यमाच्या मर्यादांमुळे सुरूवातीला रंगवलेलं चित्र खरंच वाटतं. वाघ, झेब्रा, माकडीण... खरोखरच होडीत ते पडले आहेत असं वाटतं. शेवटच्या काही पानांत ते प्राणी म्हणजे माणसांचे प्रतिनिधी आहेत हे कळतं. हा साक्षात्कार होतो आणि लक्कन चित्र पालटतं. पण वाघ हा कोणी माणूस नाही. तो त्या पायच्या आंतर्मनात असलेल्या पौरुषाचं किंवा आक्रमकतेचं प्रतीक आहे. पौगंडावस्थेतून बाहेर पडत असताना या वाघाला कह्यात आणणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. मग या प्रवासातल्या इतर घटनांचाही या प्रतिकात्मक पातळीवर अर्थ लावण्याचा प्रयत्न करता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच चित्रपट पाहिला.. आज परिक्षण वाचले... दोन्ही अत्यंत आवडले.
परिक्षणात कथा अजिबातच न फोडण्याचे चातुर्य आहे Smile

बाकी पेस्तनकाकांचे 'आपण जे सफर करतो ते गॉड' हे मत चित्रपट बघताना पुन्हापुन्हा आठवत होते.
आयुष्यात मृत्यूची शाश्वतताच नव्हे तर त्या शाश्वत मृत्यूची प्रसंगी किती गरज आहे हे या चित्रपटाइतके प्रभावीपणे अन्यत्र मांडलेले वाचनात/पहाण्यात आलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला चित्रपट ओक्के वाटला. देवाचा किंवा दैवीशक्तीच्या शोधाचा संबंध 'पाय'च्या प्रवासाशी लावणं हे ऐकायला छान वाटलं तरी चित्रपट बघताना वाटलं नाही. टीव्हीवरचे जोरदार प्रोमो बघून जास्ती अपेक्षेने गेलो होतो म्हणूनही असेल कदाचित...
बघायचा असेल तर ३-डीमधे बघावा हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाना लेख आवडला.. हिंदूच्या सुरूवातीस आलेल्या कवितेत मी देखील अनेक दिवस गुरफटलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला भलतेच आवडलेले परीक्षण.
वेळ मिळाल्यास चित्रपट आनी परिक्षणाबद्दल अधिक पिंका टाकाव्या म्हणतोय.
चित्रपट रिलिज झाल्याच्या पहिल्या दोन्-तीन दिवसात पाहण्याचा योग आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Yann Martelच्या पुस्तकातील जाणवणारा पीळ माझ्या मते चित्रपटात दिसून आला नाही..अंमळ कंटाळवाणा वाटला..
आणखी एक खटकलेली गोष्टः

At times (some scenes of boat/open sea) cinematography sucked..honestly, imho home videos are shot better! (saw it in 2D.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच पाहिला. इथे (बोलोन्यात) या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला/मिळतोय...चित्रपट इंग्लिश मध्ये होता (इटालियन सबटायटल्स होती) तरी चित्रपट गृह जवळजवळ भरलेलं (किमान ७०-८० माणसं असावीत) होतं. नाहितर इंग्लिशमध्ये दाखवल्या जाणार्या चित्रपटांना १०-१५ च्या वर प्रेक्षकसंख्या मी पाहिली नव्हती !
मला चित्रपट कंटाळवाणा वाटला...पण ३डी मध्ये पहाण्याचा अनुभव (माझा पहिलाच) सुंदर वाटला. बराचसा वेळ ग्राफिक्स पहातोय असं वाटलं पण त्यात मजा येत होती. गोष्ट काही फार रोचक वाटली नाही. कथा, अर्थ वगैरेच्या दृष्टीनी माझं एकूण सगळ हुकलं...पण ३डी पहाण्याची मजा अनुभवली, त्यात पैसे वसूल झाले म्हणीन.
अवांतरः यात दाखवलेली पाँडीचेरी (जी काही एक दोन रम्य दृश्य दाखवली आहेत ती) अगदी फसवी आहे...खूप अपेक्षा बाळगून मी ७-८ वर्षांपूर्वी तिथे गेले होते...पण सगळ्या इतर भारतीय गावांसारखीच बकाल (बस स्टँड, बाजार वगैरे ठिकाणी) आहे. कोणे एके काळी पाँडीचेरी सिनेमात दाखवली आहे तशी कदाचित असेलही...पण आता नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट आवडला नाही का कळला नाही ????, अनेकांना कळला नाही म्हणून आवडला नसावा

माझ्या एका मैत्रिणीने पुस्तक वाचलेले आणि चित्रपटही पाहिलेला, तिच्याशी गप्पा मारताना कळले कि चित्रपट छानच आहे, पुस्तकही छान आहे, तो जी दुसरी गोष्ट सांगतो तिच्याशी तिचे काही देणे घेणे नव्हते, ती सरळ सरळ इग्नोर केलेली, आणि हिंदुत्वाचे तत्वज्ञान वगैरे असे काही नसून हा चित्रपट एका सत्यकथेवर बनवला आहे असेही तिने मला सांगितले, मी तिला चित्रपट( त्याच्या मागचे तत्वज्ञान) समजावून सांगायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली तू फक्त चित्रपट पाहिलायेस मी तर पुस्तक सुद्धा वाचलंय आणि त्यात असे काही नाही म्हणून तीच बरोबर आहे ……. म्हणून जे मला कळले ते माझ्या पुरते मर्यादित ठेऊन मी शांत राहिलो, वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला ती आठवली

देवाचे माणसाच्या आयुष्यातील महत्व, आणि तो नसेल तर आयुष्य कसे बोरिंग होईल हे लेखकाने एका फ्यांटिसी कथा (ज्यात जादू आहे, काल्पनिक बेट, बंगालचा वाघ आणि इतरही बरेचसे इंटर्रेस्टिंग प्रसंग) आणि एका सरळ जसे घडले तश्या (न्यूज पहिल्या सारख्या ) कथेतून समजाऊन सांगितले आहे

तो पूर्ण चित्रपट त्याच्या सोबत घडलेली रंजक कथा सांगत सांगत आपल्याला एका फ्यांटिसी जगात घेऊन जातो, त्यात तो आणि एक वाघ एकाच बोटीत कसे अडकले, त्यांनी कशी समुद्राची सफर केली, ते कसे एका विचित्र बेटावर पोहचले, तो कसा यातून वाचला, हे आईक्ताना आपण त्यावर विश्वास ठेऊ लागतो. त्याची वाघासोबतची हि कथा आपल्याला खरी वाटुलागते, हा वर गेलेला ग्राफ अचानक खाली येतो जेव्हा तो न्यूज रिपोर्ट साठी असे काहीच घडले नव्हते, हा एक सामान्य अपघात होता त्यातून तो एकटा वाचला असे सांगतो …… नंतर तो विचारतो कि तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचाय, सगळेच त्याच्या वाघ असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात कारण कोणालाही त्या फ्यांटिसी मधून बाहेर यायचे नाहीये, देवा बाबतीतही असेच झाले आहे, कोणालाही त्याच्या फ्यांटिसीतून बाहेर यायचे नाहीये, तसे झाले तर आपल्याला देवधर्म, त्या अनुषंगाने आलेली संस्कृती त्यातले फेस्टिवल्स हे सोडून एक निरस आणि बोर आयुष्य जगावे लागेल, आपली देवधर्माची नाळ तुटली तर आपण अधांतरीत बेसलेस आयुष्य जगू अशी भीतीपोटी आपण या फ्यांटिसीला अजूनच कवटाळतो, लेखक आपल्याला त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडतो, आणि अर्थातच देवावरही विश्वास का ठेवायचा किंवा लोक का ठेवतात हे आपल्याला कळते

इथे तो देव आहे का नाही, हे विश्व कोणी निर्माण केले, किंवा हिंदू संस्कृतीच ग्रेट आहे का नाही अश्या वादात न पडता आपल्याला एक 'बिलिव्हर' करून सोडतो……. मग तुम्ही तुमच्या देवाचा शोध घ्यायला मोकळे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहित्य क्षितिजावरचा उगवता तारा

बिलिव्हर करुन सोडतो..

छे: उलट मला तर बिलीव्हर्स आर वीक असा अर्थ लागला. ते हिंदुत्वाचं वगैरे ठीक आहे पण त्या रंजकतेबरोबर भयानक दुष्परिणाम होणारी मनोवृत्तीसुद्धा जोपासली जाते. म्हणजे कसं, एकदा बिलीव्ह करायला लागलं की एकाला वाघ आणि दुसर्‍याला झेब्रा समजायला सोपं जातं आणि मग वाघाने झेब्र्याला मारलं किंवा अगदी लेकुरवाळ्या माकडिणीवर अत्याचार केले तरी मग त्याचं फारसं काही वाटून घ्यायची गरज उरत नाही उलट तो वाघाचा सहजधर्मच आहे असे समर्थनही करता येऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया चित्रपट नीट पाहावा समजून घ्यावा आणि मग प्रतिक्रिया द्यावी

या चित्रपटात वाघ कुठल्याही झेब्र्याला मारत नाही
किंवा माकडीणीवर अत्याचार करत नाही,

उलट असे करणाऱ्या हाईनालाच तो मारतो, यावरून कुठलीही (सो कौल्ड) भयानक दुष्परिणाम होणारी मनोवृत्ती जोपासली जात नाही, उलट एक पोझीटीव आत्मविश्वास वाटतो, कुठली तरी एक नैसर्गिक शक्ती आहे जी आपल्या बाजूने आहे व वेळ आल्यावर ती आपल्याला नक्की मदत करेल हा 'विश्वास' वाढतो, सिनेमाच्या भाषेत बोलायचे झाले तर इथेच 'कहानीमे ट्वीस्ट येतो'

आणि हो 'बिलिव्हर्स आर विक' या तुमच्या मताशी मी सहमत नाही, आय बिलिव्ह इन सायन्स आणि एक दिवस सगळं ठीक होईल हा पोझीटीव 'विश्वास' मनात ठेऊन प्रयत्न करणाऱ्यावर हे जग चालते आहे असे मला वाटते. काही लोक हिच उर्जा देवावर विश्वास ठेऊन मिळवतात म्हणून ते विक आहेत असा अर्थ होत नाही.

दारूच्या एका ग्लासमध्ये डॉक्टर एक गांडूळ टाकतो तर तो गांडूळ मारतो, यावर तो डॉक्टर दारुड्याला विचारतो यातून तू काय शिकलास ???.....दारुडा म्हणतो दारू औषधी असते ती प्यायल्याने पोटातील जंत मारतात

तात्पर्य:- 'बिलिव्हर्स आर विक' हा तुम्हाला लागलेला अर्थ हा तुमच्या पुरता अगदी बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहित्य क्षितिजावरचा उगवता तारा

धन्यवाद! तरस मारते हे विसरायला झालं होतं बरेच दिवस झाले चित्रपट पाहून. पण त्याने काही फरक पडत नाही.
मारणार्‍याला तरस म्हटल्याने आणि मेलेल्यांना झेब्रा व माकड म्हटल्याने सत्य बदलत नाही; पण सुसह्य मात्र होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0