मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग ३.

संपादकः इतर भागः भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
----
बाजीरावास बिठूरला पेन्शनवर पाठविल्यावर पूर्वीच्या पेशवाईचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे कमिशनर म्हणून काम पाहू लागले. पेशवे कारभारात प्रतिवर्षी काही रक्कम ब्राह्मण पंडितांमध्ये ’दक्षिणा’ वाटण्यासाठी राखून ठेवली जात असे. ही रक्कम एकदम बंद झाली तर ह्या वर्गाचा इंग्रज कारभारावर रोष होईल आणि तो रोष अन्य वर्गांमध्येहि पसरू शकेल असे वाटल्यावरून इंग्रज कारभारातहि दक्षिणा वाटप चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी ’दक्षिणा फंड’ ह्या शीर्षकाखाली प्रतिवर्षी काही रक्कम बाजूस काढण्याचे ठरविण्यात आले, मात्र पूर्ण रक्कम ब्राह्मणांना व्यक्तिगत दक्षिणा म्हणून देण्याऐवजी तिचा काही भाग अधिक चिरस्थायी प्रकारच्या शिक्षणावर खर्च करण्याचे ठरले. एल्फिन्स्टन ह्यांच्या आदेशनुसार आणि कलेक्टर चॅप्लिन ह्यांच्या मार्गदर्शनाने १८२१ मध्ये पुण्यात ’पूना कॉलेज’ ह्या नावाची एक पाठशाळा उघडण्यात आली. पाठशाळेत प्रवेश केवळ ब्राह्मणांना दिला जात असे आणि जुन्या पद्धतीचेच संस्कृतमधील शास्त्रे, व्याकरण, काव्य असे शिक्षण तेथे दिले जाई. तीत प्रारंभाला न्याय, धर्मशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, अलंकार, वैद्यक, वेदान्त, यजुर्वेद, ऋग्वेद असे विषय आठ शास्त्री शिकवत असत. राघवाचार्य नावाचे न्यायशास्त्राचे पंडित पाठशाळेचे प्रमुख होते.

१६ वर्षांनंतर १८३७ साली पूना कॉलेजमध्ये दोन महत्त्वाचे बदल झाले. जुन्या अभ्यासक्रमापैकी काही भाग पूर्णत: बंद करण्यात आले आणि त्यांच्या जागी मातृभाषा मराठी, तसेच इंग्रजी ह्यांचे शिक्षण सुरू करण्यात आले. प्रवेशावरील निर्बंध उठवून ते समाजाच्या सर्व वर्गांना खुले करण्यात आले. हे कॉलेज पुण्यातील विश्रामबाग वाडयामध्ये भरत असे.

ह्या वेळेआधी कॅंडी मोल्सवर्थ ह्यांचे साहाय्यक म्हणून महिना रु १२० ह्या वेतनावर काम करीत होते. सैन्यात राहिले असता त्यांना जे वेतन मिळाले असते त्यापेक्षा हे कितीतरी कमी होते तरीपण कोशाचे आवडीचे काम करावयास मिळावे म्हणून हे कमी वेतन ते स्वेच्छेने घेत होते. १८३७ मध्ये मोल्सवर्थ तब्येतीच्या कारणाने इंग्लंडला परतल्यावर कॅंडी ह्यांना सैन्याकडून शिक्षण विभागाकडे वर्ग करून घेण्यात आले आणि नव्याने रचना झालेल्या पूना कॉलेजचे सुपरिंटेंडंट म्हणून नेमण्यात आले. त्याचप्रमाणे आणि प्रांतात ठिकठिकाणी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मराठी शाळांच्या सुपरिंटेंडंटची जबाबदारीहि त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ह्या नवीन कामासाठी त्यांना अधिकचे रु.११३ असे वेतन सुरू करण्यात आले.

थोडे अवान्तर. कॅंडींच्या हाताखाली ह्या नव्या इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेऊन आपले आयुष्य यशस्वी करणार्‍या व्यक्तींपैकी एक म्हणजे माझे एक खापरपणजोबा महादेवशास्त्री कोल्हटकर. पूना कॉलेजात इंग्रजी शिक्षण घेऊन ते शाळाखात्यात शिरले आणि डेप्युटी इन्स्पेक्टर ह्या नेटिव लोकांच्या दृष्टीने उच्च अशा स्थानापर्यंत चढले. त्यांच्या काळात ते एक लेखक, ’वक्ता दशसहस्रेषु’ अशा प्रकारचे वक्ते आणि विद्वान गृहस्थ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना इंग्रजी शिक्षणाची गोडी मेजर कॅंडी ह्यांनीच लावली असे अच्युत बळवंत कोल्हटकरांनी नमूद केले आहे. "महादेव, तूं असा अंगावर शालजोडी घेऊन फिरलास तर लोक तुला विद्वान् म्हणतील, परंतु तुझ्या गुणांचे खरे चीज व्हावयाचें नाहीं. यासाठी तूं इंग्रजी शीक व आधुनिक विद्यांत पारंगत होऊन जगाच्या समोर ये." महादेवशास्त्र्यांना हा उपदेश तंतोतंत पटला व प्रौढ वयात इंग्रजी शिकण्याला सुरुवात करून ते झपाटयाने पुढे सरसावले. त्यावेळी महादेवशास्त्र्यांचे नाव माहीत नाही असा एकहि सुशिक्षित मनुष्य नव्हता, व अजूनहि त्यांची आठवण काढून गहिंवरून जाणारे लोक वृद्ध पिढीत आढळतात. ( प.वा. रा.ब. वामनराव कोल्हटकर मृत्युलेख, लेखक अच्युत बळवंत कोल्हटकर, मासिक मनोरंजन १९१८.)

संस्कृतचे महत्त्व कमी करण्याच्या ह्या धोरणाला शास्त्रिवर्गाकडून प्रथम विरोध झाला आणि कॅंडींच्या मार्गात काही अडथळे आणण्याचेहि प्रकार झाले. परिणामत: तीन शास्त्र्यांना कॉलेजातून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. (पुण्यातील एक विद्वान् ज्योतिषी यज्ञेश्वर तथा बाबा जोशी रोडे हे ज्योतिष शिकवीत असत. पुराणमताचे ते अतिअभिमानी असल्याने त्यांना सेवेतून मोकळे करण्यात आले. शं.बा.दीक्षितकृत भारतीय ज्योति:शास्त्राचा इतिहास’ ह्या पुस्तकातहि ह्या बाबीचा उल्लेख आहे.) प्रथमतः कॉलेजातील विद्यार्थ्यांना मराठीच्या अभ्यासात काही रुचि नसे आणि त्या विषयाकडे उपेक्षेने पाहण्याची त्यांची सवय असे. त्यांना मिळणारे स्टायपेंड मराठी विषयात चांगले गुण मिळण्याशी बांधून विद्यार्थ्यांची ही सवय कॅंडींनी मोडून काढली. १८३७ साली कमी केलेले विषय म्हणजे जुने वैद्यकशास्त्र आणि जुने ज्योतिष. ह्या विषयांच्या जागी पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे नवे विषय त्या विषयांसाठी मराठीमध्ये पुस्तके लिहवून घेऊन सुरू करण्यात आले. (एक मनोरंजक तपशील - नवे वैद्यकशास्त्र शिकविण्यासाठी भाऊ डॉक्टर ह्या नावाने ओळखले जाणार्‍या एका गृहस्थांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी पेशवाई काळात ब्रिटिश रेसिडेन्सीमधील डॉक्टरांच्या हाताखाली काम करून हे ज्ञान मिळवले होते. भाऊ डॉक्टर काही वर्षांनी वारले. त्यांच्या जागी बाळशास्त्री माटे ह्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी आधुनिक वैद्यकाचे ज्ञान पुण्यातील सिविल सर्जनच्या हाताखाली काम करून मिळविले होते.) खगोलशास्त्रामध्ये जुने फलज्योतिष काढून टाकून सूर्यसिद्धांतासारखे सिद्धान्त आणि कोपर्निकन ग्रहमंडल ह्यांच्या ज्ञानावर भर देण्यात आला. पाठपुस्तके आणि अन्य पुस्तके छापण्यासाठी एक लिथोग्राफ छापखाना सुरू करण्यात आला.

इंग्रजी भाषा शिकविण्याचा प्रारंभ झाला असला तरी ती भाषा शिक्षणाचे सार्वत्रिक माध्यम करता येणार नाही, त्यासाठी मराठी भाषाच योग्य माध्यम आहे आणि त्यासाठी मराठी लिहिण्याची शैली, शब्दसंग्रह इत्यादि सुधारून मराठी भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे असे आपले मत कॅंडी वारंवार मांडतांना दिसतात. रोमन विजेत्यांचे लॅटिन आणि नॉर्मन विजेत्यांचे फ्रेंच ह्या दोन्ही भाषा इंग्लंडात मूळ धरू शकल्या नाहीत असे उदाहरणहि आपल्या मताच्या आधारासाठी ते देतात. वर उल्लेखलेले बदल १८४० सालापर्यंत घडवून आणण्यात आले. कालान्तराने १८५५ साली प्रकृतीच्या कारणासाठी कॅंडी १५ महिन्यांच्या रजेवर इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी आपल्या कार्याचा आढावा सरकारकडे लिहून पाठवला होता त्यातून बदलांचे हे वर्णन घेतले आहे. शिक्षणाचा विस्तार ब्राह्मण वर्गापलीकडे करण्याच्या प्रयत्नांनाहि थोडेफार यश मिळाले होते. १८५० सालच्या अहवालात कॉलेजात ’ब्राह्मण, प्रभु, सुतार, मराठा, भिल्ल’ समाजातील विद्यार्थी असल्याचा उल्लेख सापडतो.

मोल्सवर्थ इंग्लंडला १८३७ मध्ये परतले तेव्हा सरकारने मंजूर केलेले इंग्रजी-मराठी कोशाचे काम अपुरेच राहिले होते. कॅंडींनी ते अंगावर घेऊन पूर्ण करावे असे सरकारने सुचविल्यावरून त्यांनी तो कोश पुरा करून १८४७ मध्ये प्रसिद्ध केला. मराठी शाळांच्या देखरेखीसाठी त्यांना जो दूरदूरचा प्रवास करावा लागे तो घोडे, पालखी अशा साधनांनीच होत असे आणि चांगल्या हवेचे वर्षाचे पाचसहा महिने ते ह्या कामाला देत असत. कोशाची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यावर सरकारने मराठी शाळांच्या देखरेखीच्या कामातून मोकळे केले.

शाळांसाठी पाठयपुस्तके तयार करण्याचे काम कॅंडींच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्याने त्यात भाषा कशी वापरावी ह्याबाबत त्यांचा शब्द अखेरचा असे. विरामचिह्नांचा वापर, ह्रस्व-दीर्घाचे नियम, वाक्यरचना अशा बाबतीत त्यांनी घालून दिलेल्या चाली आजतागायत वापरात आहेत. ह्या संदर्भात विनायक कोंडदेव ओक ह्यांनी ’बालबोध’ मासिकाच्या एका अंकात लिहिलेल्या कॅंडींवरच्या एका निबंधातील काही भाग मला पाहण्यास मिळाला तो येथे उतरवत आहे. (अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक भाग १ लेखक गं.दे.खानोलकर पृ. १२५.) (शुद्धलेखन मुळाप्रमाणे.)

"मेजर कॅंडी ह्यांस १८५५(?)त मुंबई सरकारच्या विद्याखात्याचे मराठी भाषांतरकार नेमिलें. या खात्यात असतां सरकारी हुकुमानुसार त्यांनीं क्रमिक पुस्तकें तयार केलीं. या कामी त्यांस परशुराम तात्या गोडबोले वगैरेंचे साह्य झालें. ह्य कामाचीं सगळीं सूत्रें मेजर कॅंडी साहेबांनीं आपल्या हातांत ठेविलीं होतीं. इंग्रजी भाषेंतील अनेक प्रकारची क्रमिक पुस्तके त्यांनीं जमविलीं होतीं.त्यांतील धडयांची निवड कॅंडीसाहेबांनीं करवयाची व त्यांचीं मराठी भाषांतरें गोडबोले आदि मंडळींनीं करावयाचीं. तीं साद्यंत ह्यांनीं तपासावयाचीं; त्यांतल्या भाषापद्धतीविषयीं आणि परिज्ञानाविषयीं शंकासमाधाने व्हावयाचीं आणि मग तीं छापावयाचीं, असा क्रम असे. ह्या पुस्तकांतील कवितांच्या धडयांचे सगळें काम परशुरामपंततात्या गोडबोले यांजकडे सोंपविलें होतें. मंडळीच्या सांगण्यात असें येत असे कीं, ही मराठी क्रमिक पुस्तकें इंग्रजीतल्या क्रमिक पुस्तकांच्या नमुन्यावर तयार व्हावीं, अशी त्या साहेबाची फार इच्छा असे. त्याने कधीं एकहि वाक्य चालढकलीवर नेलें नाहीं. शब्दशुद्धीवर आणि अर्थस्पष्टतेवर त्याचा फार कटाक्ष असे. आज तीस-चाळीस वर्षें जी मराठी शब्दलेखनपद्धति सर्वत्र प्रचारात आहे, ती सगळी मेजर कॅंडी ह्यांच्या क्रमिक पुस्तकांतील आहे. ती त्यांनी कोठून नवीन आणलेली नाही. त्यांच्या आधीं बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर ह्यांनी ’हिंदुस्तानचा इतिहास’ वगैरे जीं पुस्तकें लिहून प्रसिद्ध केलींहोतीं, त्यातलीच ती आहे. तरी, तिजविषयी असा एक आक्षेप होता कीं, भोंवतालची बहुतेक मंडळी कोंकणस्थ असल्याकारणानें, कॅंडीसाहेबांस त्यांच्या भाषेची गोडी लागून, त्यांची पद्धति लेखनांत आली. तींतलें र्‍ह्स्वदीर्घत्व आणि अनुनासिकत्व देशस्थ वगैरे मंडळीस फार अडवितें. म्हणून, तें अजिबात काढून टाकण्याचा प्रयत्न, सांप्रतची मॅकमिलनचीं नवीं क्रमिक पुस्तकें रचण्याच्या आधीं, कांहीं मंडळींनी केला होता. तो साधला असता तर ’आणि’ ह्याच्या जागी ’आणी’ झालें असतें, आणि ’परंतु’ चें ’परंतू’ असें झालें असतें. आणखी असे दुसरे पुष्कळ फेरफार झाले असते. पर्ंतु, तेव्हां मुंबईच्या महाराष्ट्र मंडळीनें सर भालचंद्र भाटवडेकर ह्यांच्या अग्रगण्यत्वानें आणि रेव्ह. डॉ. मॅकिकन ह्यांच्या साह्यानें तें प्रकरण अगदीं मुख्य सरकारपर्यंत नेऊन, आणि अदलाबदलीने विनाकारण किती त्रास झाला असता हे दाखवून, त्यांच्या अनुज्ञेनें मेजर कॅंडी ह्यांचीच लेखनपद्धति कायम राखिली."

"पूर्वीं मराठी ग्रंथकारांस उत्तेजन देण्याकरितां शाळा-खात्याकडे बरीच रक्कम काढून ठेवलेली असे. तींतून ग्रंथांचे हक्क विकत घेऊन ते छापीत असत. किंवाग्रंथकारांपासून कांहीं प्रती विकत घेऊन त्यांना आश्रय देत असत. शिवाय अशाच कामाकरिता दक्षिणा प्रैझ म्हणून एक कमिटी असे. तिच्या स्वाधीन बरेच पैसे असत. आणि ह्या दोन्ही संस्थांकडे आश्रयार्थ आलेले ग्र्ंथ कॅंडीसाहेबांकडे जात असत. कां कीं, ते शाळा-खात्याचे ट्रान्स्लेटर होते आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते. हे ग्रंथ ते किती आस्थेने पाहात असत ह्याची माहिती ज्यांचे ग्रंथ त्यांनी तपासून नीट केलेले आहेत, त्यांसच आहे. इतरांस त्याची कल्पना यावयाची नाही. ते अनुस्वार-विसर्गापर्यंत बारीक पाहात असत. तरी त्यामध्ये त्यांचें एक मोठें धोरण हें असें कीं, कोणत्याहि लेखकाची हिम्मत खचूं द्यावयाची नाही. चुक्या दाखवायच्या, ग्रंथ शुद्ध करावयाचा आणि त्या रीतीनें तो सुधारण्यास ग्रंथकारांस सुचवायचें. तें इतकें जपून करावयाचें कीं, पुस्तक ’वाईट’ असें कधीं सहसा म्हणावयाचें नाहीं. तितकाच प्रसंग आला तर ’चांगलें नाहीं’ म्हणावयाचें. दुखवावयाचें नाहीं. हातपाय मोडावयाचे नाहीत. कां कीं, आपण इंग्लिश लोक जसे इतर अनेक विषय हिंदुस्तानच्या प्रजाजनांस शिकवीत आहों, तसे भाषेचें ग्रंथलेखन हेंहि त्यांस शिकवावयाचें आपलें काम आहे, अशी त्यांची बुद्धि नेहमी असे, तिचा फार उपयोग झाला आहे. मराठीत चांगले ग्रंथकार तयार करण्याकडे त्यांचा ओढा त्यांच्या अभिप्रायांत उघड दिसून येत असे. यायोगे पुष्कळ मराठी लेखकांस पुष्कळ लाभ झाले आहेत. कॅंडीसाहेब मराठी ट्रान्स्लेटरच्या जागेवर असतां, सरकारच्या आश्रयानें जितके मराठी ग्र्ंथ छापून झाले आहेत, तितके ग्रंथ तेवढया अवकाशात पूर्वीं प्रसिद्ध झाले नव्हते, आनी तसे पुढें प्रसिद्ध होण्याची आशा दिसत नाहीं."

"कॅंडीसाहेबांस इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा मार्मिकपणें कळत असत, हें जाणून सरकारने त्यांजकडून ’इंडियन पीनल कोड’, ’सिव्हिल प्रोसीजर कोड’ व ’क्रिमिनल प्रोसीजर कोड’ यांचे मराठी भाषान्तर करविलें. त्यांत त्यांना कितीएक शब्द अगदी नवे करावे लागले आहेत."

अशाच अर्थाचे उद्गार प्रा. कल्याण काळे ह्यांनी काढलेले आहेत. ते म्हणतात: "या ग्रंथोत्तेजक मंडळ्यांकडे जी पुस्तके येत त्यांची भाषा सुधारण्याचे काम मेजर कॅंडी करीत. त्यांनी शास्त्रीमंडळींच्या भाषेतील कोकणी लकबी काढून टकल्या. वृथा संस्कृतप्रचुरता वा फारसीमयता नसावी. बोलीतले प्रयोग सहसा योजू नयेत. पर्यायी लेखनरूपे शक्यतो टाळावीत आणि लेखनपद्धतीत एकरूपता असावी याविषयी ते दक्ष असत. ’त्याच्याने दोन ओळी भाषांतर करता यावयाचे नाही’ हे वाक्य सदोष असून ’त्याच्याने दोन ओळी भाषांतर करवणार नाही’ किंवा ’त्याला दोन ओळी भाषांतर करता यावयाचे नाही’ ही वाक्ये शुद्ध होत अशा प्रकारच्या व्याकरणनिष्ठ दुरुस्त्या ते सुचवत असत. विनायक कोंडदेव ओक, परशुराम तात्या गोडबोले यासारख्या खंद्या लेखकांच्यासुद्धा भाषेतील ते चुका काढत असत. याचा परिणाम असा झाला की १८५० साला पूर्वीच्या मराठी लेखनात जो अस्ताव्यस्तपणा होता तो नाहीसा होऊन लेखनभाषेला एक शिस्त आली. त्यामुळे भाषेचे प्रमाणीकरण झाले. मेजर कॅंडी यांनी नवीन भाषा शोधून काढली नाही किंवा निर्माण केली नाही; तर फक्त आहे त्याच भाषेला शिस्त लावली. पाठयपुस्तकांमार्फत या भाषेचा सर्व मराठी मुलुखात प्रसार झाला. (कल्याण काळे- पुणेरी भाषा, शहर पुणे - एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा खंड २, सं. अरुण टिकेकर.)

त्यांच्या अशा कार्यामुळे आणि ख्यातीमुळे इंग्रज अधिकारी वर्गात मराठीसंबंधीच्या सर्व प्रश्नात अखेरचा शब्द म्हणजे मेजर कॅंडी अशी धारणा निर्माण झाली होती.

(१८५४-५५ मध्ये झालेली पूना कॉलेजची तपासणी आणि त्यातून निर्माण झालेला वाद, परिणामी मेजर कॅंडींनी कॉलेज सोडणे, त्यांचे उर्वरित आयुष्यातील कार्य, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मला उपलब्ध झालेली माहिती हे ह्यापुढील भाग ४ मध्ये.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (6 votes)

प्रतिक्रिया

हाही लेख फार आवडला.
थोड्या प्रमाणात असाच प्रयत्न करू पाहणार्‍या मंडळाने काही नियम लावले तर त्याविरुद्ध इतका कांगावा का होतो कळत नाही. कँडींच्या नियमांविरुद्ध बंडखोरीची उदाहरणे आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडेश! परशुरामतात्या गोडबोल्यांचा उल्लेख इथे आलेला पाहून मस्त वाटले. कँडीचे कार्य किती मूलगामी आहे याची यावरून कल्पना येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संग्राह्य लेखमालिकेतील अजुन एक परिपूर्ण लेख.. आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणखी एक अत्यंत वाचनीय लेख. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालिकेमधील सर्व लेख एकसलग वाचल्यामुळे अतिशय मजा आली. मोल्सवर्थ, कँडी यांच्या काळाचा तुकडा समग्रपणे अनुभवायला मिळाल्यासारखे वाटले. उत्तम लेखमालिका.

एक नम्र विनंती : लेखमालिकेच्या अंती तुम्ही जे संदर्भ वापरले त्यांची यादी द्याल तर फार आनंद होईल.

वाचकांना कदाचित रोचक वाटतील म्हणून या विषयाशी संबंधित सापडलेल्या ऑनलाईन नोंदींची एक छोटी यादी इथे देतो :

बाबा पदमनजी यांबद्दल : http://marathivishwakosh.in/khandas/khand11/index.php?option=com_content...
मेजर कँडी : http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=articl...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मराठी विश्वकोशाच्या लिंकबद्दल धन्यवाद,

येथे प्रथमच मी थॉमस कँडी आणि बाबा पदमनजी ह्यांची चित्रे पाहिली. ह्यांचा सोर्स काय असावा?

माझ्या लेखनाला आधारभूत असलेले साहित्य कोठे आहे अशी चौकशी अन्य काही जणांनीहि केली आहे. मी जेथे राहतो तेथे मराठी छापील पुस्तके फार क्वचित मिळतात. तसाहि मी कोठल्याच विद्यापीठाशी इ. संबंधित नसल्याने तसेहि मला काही मिळत नाही. माझे बहुतेक सर्व आधार इंटरनेटवर शोधलेले असतात. आतापर्यंत जे जे वाचले आणि ध्यानात राहिले त्याच्या आधारे मी असे शोध घेतो आणि मिळालेले समोर मांडतो.

ह्या लेखमालेतील साहित्याचे इंटरनेट आधार शेवटच्या लेखात येतील. तो बहुधा शेवटचाच लेख असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुत धन्यवाद Smile अंतिम लेखाच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या या आधीच्या लेर्खनाला साजेशी अशी लेखमाला.माहितीपूर्ण आणि ओघवती. तात्या गोडबोलेंचा उल्लेख वाचून 'नवनीत' आठवणारच. त्यातल्या सुरुवातीच्या प्रस्तावना आणि वाचकवंदनेच्या श्लोकाचे दोन चरण अजूनही लक्षात आहेत. "काव्यामृताचा 'नवनीत' भेला | हा गोड लागो तुमच्या जिभेला||" पुढील लेखाच्या प्रतीक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१००००००००००००००००.

नवनीताच्या सुरुवातीसची

हे वेचे बहुयत्नें मेळविलें परशुरामतात्याने |
ज्याने त्याने अवलोकावे पावावी शीघ्र रसिकता त्याने ||

ही आर्याही खासच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय चांगली माहिती, धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0