खजिना (२/८)

~~~प्रा. मानकामे~~~

आता पुढे जाऊन पुढच्या प्लॅनची रूपरेषा या सगळ्यांना समजावली पाहिजे असा विचार करत मी घरी परतत होतो. वस्तीवर मी एकटाच नाही तर माझे दोन मित्र आणि एक मुलगीही जाणार असल्याचं त्यांना सांगितल्यावर त्यांचे चेहरे इतके पांढरे पडल्याचे मी कधीही पाहिले नव्हते. त्यांनी फातिमाला नेण्यास विरोध केला खरा पण मी तो फारसा टिकू दिला नाही. मला आता काळजी आहे ती प्रत्यक्ष आत निभाव कसा लागेल याची. गावकर्‍यांनी एकदा का त्या वस्तीचा दरवाजा बाहेरून बंद केला की पुढील होळीपर्यंत तो पुन्हा उघडणार नाही हे नक्की. आपला हेतू साध्य होण्यासाठी इतका वेळ लागणार नाही. त्या नकाशात सोन्याच्या गोदामांवर नीट खुणा केलेल्या आढळताहेत. त्या नकाशाचा विचार येताच मी चरकलो. फातिमा कितीही हुशार आणि चुणचुणीत असली तरी मी तिच्यासोबत आधी काम काय चर्चाही केलेली नव्हती. मंदारची प्रेयसी हे कारण तिला इतक्या मोठ्या मोहिमेवर नेण्यासाठी खरंतर पुरेसं नव्हतं पण तिनेच 'नकाशा' आणल्यावर मंदारने "ती नाही तर मीही नाही" वगैरे भूमिका घेतल्यावर, याबद्दलची माहिती असणारे दोघे 'बाहेर' असणे मला परवडण्यासारखे नव्हते.

गावकर्‍यांशी बोलून घरी पोचलो तर मंदार आणि फातिमा बाहेर गेले होते. बाहेर बागेत खाट टाकून लोडाला टेकून साळवी पाइप ओढत बसला होता.
"या लीडर!" त्याने मला हाक घातली
"लीडर? मी? असो त्यात नको शिरायला." इतकं बोलून मी त्याच्या पायाशीच बूट उतरवत बसलो असताना त्याने प्रश्न केला
"या इतक्या जुन्या किल्ल्यात , किंवा गावकरी म्हणतात तसे वस्तीत, खरोखर जर इतके सोने असेल तर इतक्या वर्षात याचा अंदाज कोणालाच आला नाही? त्या फातिमाचा काका जर हा दस्तऐवज शोधू शकतो तर तो स्वतः या किल्ल्यात का गेला नाही? आपल्याला का पाठवतोय?"
खरंतर हे प्रश्न मलाही पडले होते पण मी स्वतःकडेच दुर्लक्ष करून मोहिमेवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले होते. या साळवीने हे प्रश्न पुन्हा वर आणले. पण माझे मन कोणत्याही कारणाने सुरवातीलाच निगेटिव्ह विचार करायला तयार नव्हते.
"नक्की माहीत नाही रे, पण त्यांचंही वय झालं आहे असं फातिमा म्हणत होती. आत आपल्याला किती दिवस खाणं मिळेल, पुरेल याची खात्री नाही अशावेळी त्यांनी विचार केला असेलच की."
"ह्म्म" साळवीला उत्तर पटल्यासारखे वाटले नाही पण त्याने पुढे काही विचारले नाही.
काही काळ शांततेत गेल्यावर साळवीने अचानक विचारले
"आता इतक्या वर्षांनंतर त्या खुणा केलेल्या जागीच सोनं असेल कशावरून? तुला काय वाटतं ते सोनं अजूनही आत असेल?"
"आत असेल की नाही याबद्दल अंदाज करणे कठीण आहे. पण मला प्रामाणिकपणे वाटत की ते आत असेल, काही कारण नाही एक इन्ट्युशन म्हण हवं तर. बाकी तो नकाशा, त्या खुणा यावर आता काय बोलणार? नक्की आत काय आहे हे सांगणंच मुश्कील आहे. आत एक गोड्या पाण्याचं तळ आहे असे नकाशात दाखवले आहे. काहिशे वर्षात त्याचं काय झालं असेल कुणास ठाऊक. इतक्या वर्षात आत बरेच रान माजले असेल. नकाशात दाखवलेले रस्ते, हौद, वास्तू आता कशा असतील? असतील का? इत्यादी प्रश्न आहेतच. फारच थोडी माहिती आणि बरेचसे प्रश्न घेऊन आपण आत चाललो आहोत."
"खरंय. मी जर ठरवलं की मला आत यायचं नाहीये तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?" स्वतः एक मानसशास्त्रात पदवीधर असून साळवीच्या या प्रश्नाने मी पुरता गोंधळलो. त्याला आधी नीट कल्पना दिली नव्हती हे खरे तरी तो इतक्या टोकाचे असे काही विचारेल असे मला कधीही वाटले नव्हते. खरंतर त्याच्या इतका धाडसी आणि प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्यक्तीची मला गरज होतीच त्याहून अधिक एक मित्र म्हणून मला तो सोबत हवा होता. मी प्रामाणिक उत्तर दिले
"मला अतिशय दु:ख होईल. मला तू एक जवळचा मित्र म्हणून सोबत हवा आहेस, केवळ तुझ्यातील कौशल्यांमुळे नव्हे"
साळवी खुलला, म्हणाला "मला वाटलंच होतं, पण मन खात होतं. मधे काही वर्षे भेट नाही, नात्यातील ओलावा कमी तर नाही झाला ना कळायला मार्ग नव्हता"

समोरून मंदार, फातिमा येताना दिसले. दोघांनी बरीच खरेदी केली होती. मला न सुचलेल्या काही छोट्या गोष्टी आणल्या होत्या. ज्यात उल्लेख करण्यासारखे म्हणजे भरपूर 'डास प्रतिबंधक क्रीम' आणले होते. आम्ही पुन्हा सगळ्या सामानाची यादी तपासली. शिल्लक गोष्टीवर खुणा केल्या उद्याचा एकच दिवस हातात होता. परवापासून गावकर्‍यांचे विधी सुरू होतील आणि तेरवा त्या किल्ल्यात प्रवेश! असो. सकाळी खंडोबाच्या डोंगरावरून सर्वेक्षण करायचे आहे तेव्हा वेळीच झोपायला हवं असा विचार करून सगळ्यांची झोपायची सोय नीट आहे ना याची खात्री केली आणि झोपायला गेलो.

~~~फातिमा~~~

आज सकाळी उठल्यावर, तयार होऊन खोलीबाहेर आले तो साळवी, मंदार तयार होऊन बसले होते. एरवी मंदार दहा-दहा वाजेपर्यंत लोळत पडलेला असतो आज मात्र उत्साहात दिसत होता. मानकाम्यांचा पत्ता नव्हता. मी मंदार आणि साळवींच्या समोरच्या खुर्चीवर बसले. मी सुरवातीला काहीच बोलले नाही. काल रात्रीचा प्रसंग सगळ्यांना सांगावा की नाही या विचारात होते. त्या रात्री दोन-अडीचच्या च्या सुमारास मी पाणी प्यायला उठले होते. पाण्याचा तांब्या खिडकीजवळ होता, उकडत असल्याने खिडकी उघडी होती. समोर तटबंदीची भिंत दिसत होती. जरा रोखून बघितले तर तटबंदीच्या मागून धूर येतो आहे असे वाटले. मी चकीत झाले रोखून बघत होते पण तो खरंच धूर आहे की माझा भास हे कळायला मार्ग नव्हता. मी दुर्बीण आणायला बॅग उघडायला गेले. बॅगेचे कुलूप काढून त्यातून दुर्बीण शोधायला दोनेक मिनिटे गेली असावीत, पण परत आल्यावर धूर दिसत नव्हता. दूरवर कोल्ह्याची कुई तेवढी ऐकू येत होती.

माझाच भास असावा असे समजून मी त्या विषयावर आता न बोलायचे ठरवले. मी, मंदार आणि मेजर साळवी चहा संपवत होतो इतक्यात मानकामेही आले. त्यांचा चहा होताच "चला निघायचं. रेडी?" असं त्यांनी म्हटल्यावर फारसं काही न बोलता सगळे उत्साहात निघाले. खंडोबाची टेकडी फारशी दूर नव्हती. वर गेल्यावर एकूणच वस्तीच्या तटबंदीच्या आकाराकडे आम्ही लक्ष वळवले. आम्हाला जाणवले की तटबंदीचा आकार आणि आमच्याकडे उपलब्ध नकाशाचा आकार एकसारखा आहे. आता हाच तो किल्ला अशी आम्हाला खात्री पटली. फक्त आत जायचं आणि सोनं मिळवायचं इतकंच काय ते शिल्लक राहिलं होतं असं वाटू लागलं. आत काय असेल याची कल्पना नव्हती पण आमच्या अंदाजाइतके सोने तिथे गाडलेले असले तर त्याचे मूल्य भारताच्या पंचवार्षिक योजने इतके असावे. आमचे डोळे लकाकले. आम्ही परत यायला निघालो.

टेकडीवरून उतरत असताना समोरून एक म्हातारा सामोरा आला. अजागळ, धोतर फाटलेले, केस विस्कटलेले, खांद्यावर घोंगडं, अनवाणी, दुर्गंधियुक्त अशा त्या म्हाताऱ्याकडे पाहूनच मी शहारले. मी त्याच्याकडे बघतेय हे बघून त्याने विचारले "तुमीच का वस्तीवर जानार हाय?"
"हो. का?" मी विचारलं
"ताई, नका जाऊ"
"का नको? आम्ही मानकाम्यांना एकटं जाऊ देणार नाही"
"कोणीच जाऊ नका.. आलात तसे पळून जा! तिथे आत वस्तीवर अजूनही कोनीतरी राहतंय"
इतक्यात मागून मानकामे आहे
"अगं याच्याशी काय बोलत बसलीयेस हा विठू, जरा सटकलेला आहे" आम्ही दोघेही हसलो आणि बोलणं तिथेच सोडून निघालो.
"नगा ऐकू म्हातार्‍याचं, त्ये धरतील तेव्हा समजेल.. नका जाऊ वस्तीवर सांगतुय त्ये ऐका"

दुसर्‍या दिवशी उशीरा जाग आली, आज रात्री जागच आली नाही. संध्याकाळ कसल्याशा विधी करण्यात गेली. अख्खा गाव जमला होता. हे वेडे आपणहून वस्तीवर चाललेत असे भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते. त्या दिवशी त्या विधींचा इतका कंटाळा आला होता की कधी एकदा आत जाते असं झालं होतं. मंदारचे किती जुने स्वप्न होते की पुरातत्त्व क्षेत्रात काहीतरी भरीव कार्य करायचे. त्या ऐतिहासिक क्षणी मी त्याच्याबरोबर असेन याचा मला किती आनंद झाला म्हणून सांगू

~~~मंदार~~~

शेवटी एकदाची ती रात्र आली ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. ढोल, फटाक्यांच्या कल्लोळात वस्तीचे दरवाजे उघडण्यात आले. अख्खा गाव पुलाच्या अलीकडे आम्हाला सोडायला आला होता. ढोल, फटाके त्या वस्तीवरची भुतं दडून राहावी म्हणून होते. गावकरी आमच्याकडे विस्फारून बघत असताना मानकामे पुढे झाले, सरपंचांचा निरोप घेतला आणि सर्वप्रथम दरवाज्यात शिरले. त्यामागोमाग साळवी, मग फातिमा आणि शेवटी मी! मी आत जाताच दरवाजा बाहेरून बंद करून घेण्यात आला.

आता ढोलाचे, फटाक्यांचे आवाज थांबले होते. दार बंद झाल्यावर डोळ्यांपुढे फक्त अंधार दाटून आला होता. पौर्णिमा असूनही फार दूरचे काही दिसत नव्हते. जरा डोळे स्थिरावल्यावर जाणवले की समोर घनदाट झाडे आहेत. समोरच्या एका दगडावर मानवाकृती दिसली. मी घाबरून टॉर्च मारला तर ते मानकामे होते. सगळे हास्य कल्लोळात बुडालो.
सगळ्यांनी आजची रात्र जराही पुढे न जाता तिथेच काढायची ठरवली. आम्ही तंबू ठोकत असताना सारखे आमच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असे मला वाटत होते. मी ते बोलून दाखवले तर फातिमालाही तसा भास होत होता. आम्ही झाडांमध्ये झोत मारूनही पाहिला पण काहीच दिसले नाही.

तंबू बांधल्यावर आम्ही लगेच झोपून गेलो. उद्याचा दिवस आम्हाला कोणत्या दुनियेत घेऊन जाणार होता त्याची उत्सुकता होती

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

खूप छान लिहीताय. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन नंबरचा भाग पण एक नंबर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

आणि प्रतिक्रियाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाग लवकर येऊदेत, उत्सुकता आहे.
('खजिना'कथांची फॅन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच...
वाचकान्साठी तर ही मेजनीच आहे...

येउ दे पटापट...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले चार पाच दिवस आंतरजालापासून दूर होतो. आता टंकायला घेतोच.

बाकी सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!