खजिना (५/८)

~~~मानकामे~~~

"आता काय?" हा प्रश्न माझ्या आणि साळवी दोघांच्याही मनात होता. मंदार तर नुसताच त्या पुलाकडे बघत बसला होता. अचानक त्याला काय झाले काय माहीत. तो पुढे सरसावला. यावेळी मी किंवा साळवीने त्याला रोखले नाही. त्याने फातिमाचे प्रेत मांडीवर घेतले. काही वेळ तो तसाच बसला होता. मग त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकले. बॅगेतून कोणते तरी कागद काढून त्यावरची अक्षरे मनातच वाचली आणि फातिमाला पुन्हा दलदलीत ढकलून दिले. आम्ही बघतच राहिलो. तो दोन मिनिटे तसाच बसून होता. मग मागे वळला आणि आम्हाला म्हणाला, "तिला या मोहिमेत असणार्‍या जोखमीची कल्पना होती. तिचे काही बरे वाईट झाले तर मर्तिकाचा नमाज पढला जावा अशी तिची इच्छा होती. ती पूर्ण करू शकलो हेच मोठे आहे. असो. चला!" त्याचे आणि आमचेही डोळे भरून आले होते. कोणी काही न बोलता तो पूल पार केला.

पलीकडे गेल्यावर मात्र प्रत्येकाच्या डोळ्यावर फक्त चकित झाल्याचे भाव होते. समोर एक सुंदरशी कमान होती. कमानीच्या खांबावर एक हत्ती, माकड, ससा, आणि पक्षी एकमेकांच्या डोक्यावर उभे आहेत आणि पक्ष्याने तोंडात सफरचंद धरले आहे असल्याचे चित्र होते. मला हे चित्र कसले ते माहीत होते. मी म्हटले, "अरे हा तर शुभ संकेत आहे. तिबेटी बुद्ध संस्कृतीमध्ये हे चार प्राणी जागोजागी काढलेले आढळतात"
"म्हणजे?" अपेक्षेप्रमाणे साळवीला याबद्दल माहिती नव्हती, मात्र मंदारला होती असे दिसले. तोच सांगू लागला. "ही बुद्धाने सांगितलेली कथा आहे. आता नीटशी आठवत नाही पण हे चार प्राणी एकमेकांची मदत करत 'फळा' पर्यंत पोचलेले असतात शिवाय एकमेकांबरोबर आनंदात राहतात अशी काहिशी कथा आहे. एकूणच आनंदात राहावे असा संदेश तर दिलाच आहे शिवाय हत्ती हे आपल्या शरीराचे, माकडे हे आपल्यातील चंचलतेचे, ससा हे भावनांचे तर पक्षी आत्म्याचे प्रतीक आहे. या चार गोष्टींचा योग्य वापर केल्यावर आनंद प्राप्त होतो असे ते सांगणे आहे."
"ओह! असंय होय!" साळवीच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य जराही कमी झाले नव्हते.
मी काही बोलणार, इतक्यात माझ्या मनातलाच प्रश्न मंदारने विचारला, "हे चित्र आता फक्त भूतानमध्ये व्यापक प्रमाणात दिसते. मात्र एका बहामनी राजाने बांधलेल्या किल्ल्यात हे चित्र कसे? बरं असेल कुणाकडून काढून घेतलेलं म्हणावं तर या इतक्या जीर्ण किल्ल्यातले हे चित्र इतके फ्रेश कसे? रंगाच्या ताजेपणावरून आणि चक्क 'ऑईल पेन्ट' ने काढलेले हे चित्र काढून फारतर ५-१० वर्षे झाली असतील असे मी ठामपणे सांगु शकतो."
"दरवर्षी बळी म्हणून एका व्यक्तीला आत सोडले जाते हे तू विसरलास वाटते" साळवीने विचारले.
"नाही विसरलो नाही. अगदी एखादी व्यक्ती काहीतरी करून आपल्यासारखी इथपर्यंत पोचली असेलही, तरी या आडगावातल्या ग्रामस्थाला दूर तिबेटमधील चित्रकला माहिती असणे, त्याने 'बळी' म्हणून दिले असता सोबत रंगाचे सामान आणणे, आणि नेमके हेच चित्र रंगवणे वगैरे शक्यता फारच दुरापास्त नाही वाटंत?"
यावर साळवी काही बोलला नाही. कमानीच्या पलीकडे चक्क दगडांनी बांधलेला रस्ता दिसत होता. मात्र, आता प्रत्येक पाऊल टाकताना सावधगिरी बाळगणे गरजेचे होते.

~~~साळवी~~~

"मंदार, मानकामे, आता आपल्याला अगदी काळजी घेत पुढे जावे लागेलसे वाटतेय. इथे जर इतक्या हल्ली बांधकाम झाले असेल तर आत कोणीतरी असणे शक्य आहेच. शिवाय त्या दलदलीसारखे किंवा झाडांतील बाणासारखे सापळे नसतील याची काय शाश्वती?" मी मनात जे आले ते लगेच बोलून दाखवले. मंदार आणि मानकामे दोघांनाही ते पटल्यासारखे वाटले. मंदार, मी आणि मानकामेनी न सांगता कमानीच्या वेगवेगळ्या भागाची बारीक तपासणी करायला सुरवात केली, दोन्ही खांबांवरचे ते चित्र सोडल्यास, वेलबुट्ट्या सोडल्यास काहीही नव्हते. आतमध्ये शिरायला काही हरकत दिसत नव्हती.
मंदार म्हणाला "मला ठीक वाटतंय. कोणीतरी आत शिरायलाच हवं."
मी म्हणालो, "थांब!" आणि एक लांब काठी आत फिरवली आणि मग आत टाकली. काहीही झाले नाही तेव्हा म्हटलं आत शिरायला हरकत नाही. आम्ही तिघांनी एकत्रच शिरायचे ठरवले. आत पाय टाकला तोच पायाखालचा दगड थोडासा आत गेल्यासारखा वाटला आणि मागून काहीतरी आवाज आला. आम्ही घाबरून मागे पाहिले तर तो वर आलेला पूल पुन्हा दलदलीत जाऊ लागला होता.

आम्ही तो पूल पूर्ण आत जाईपर्यंत बघत राहिलो. मंदारच्या डोळ्यात व्याकूळ भाव दाटले होते. तिथे उगाच थांबून त्यांना भावुक करण्यात अर्थ नव्हता. मी म्हणालो "चला, जायचं पुढे?" कोणीच काही बोललं नाही. आत गेलो तर दुतर्फा बर्‍यात आतपर्यंत -कधीतरी एका रांगेत लावली आहेत असं वाटायला लावणारी- झाडं होती. वेगवेगळ्या प्रकारची, काही परिचित तर काही कधीही न पाहिलेली. अन् मला पुन्हा एकदा जाणवली ती म्हणजे भयाण शांतता. इतकी झाडे असूनही एकही पक्षी नाही की प्राणी दिसत नाही. कोळ्यांची जाळी नाहीत की सापांची बिळं नाहीत. या झाडांमधून ही दगडी पायवाट खोल कुठेतरी जात होती. आमची परतीची वाट तर बंद झालीच होती आता फक्त पुढे जाणे इतकेच शिल्लक होते.

अतिशय सावधानतेने पुढे जात होतो. पाचेक मिनिटे चाललो असू तर एका ठिकाणी दोन रस्ते फुटलेले होते. म्हणजे मुख्य रस्ता डावीकडे वळत होता तर दुसरी एक 'चरण्याची वाटावी' अशी धूसर वाट झाडांमध्ये गेली होती. आम्हाला कळेना आता काय करावे.
"माझ्यामते आपण मुख्य रस्त्यावरूनच जाणे योग्य आहे." मंदार ठामपणे म्हणाला
"कसे काय? मुख्य रस्त्याने जाण्याचे असे कोणते फायदे आहेत?", मानकामेंनी विचारले. त्यांचा विचार मला त्यांच्या डोळ्यातच दिसत होता.
मंदार म्हणाला, "फायदा असा सांगता येणार नाही पण मुख्य रस्त्यावर काही अंतरावरचे दिसते आहेच, शिवाय रस्ता अधिक रुंद आहे. एखादे संकट यायचेच असेल तर निदान आधी अंदाज येऊन त्यापासून वाचायची तरी शक्यता आहे."
मानकामेंना हे पटलेले दिसले तरी त्यांचा युक्तिवादही बिनतोड वाटला. ते म्हणाले, "मुख्य रस्त्यावरून बहुतेक जण जातील असा विचार करूनच तो बांधला आहे. अर्थात तिथे असणारे धोके नक्कीच अधिक असणार. दुसरे असे की या पायवाटेवरून कोणीतरी नियमित येते जाते हे नक्की, कारण त्याशिवाय ती इतकी मळलेली असणार नाही."
मी म्हणालो, "माझ्यामते आपण इथेच थांबूया. मला आता संभ्रम तर पडलाच आहे शिवाय थोडी भितीही वाटू लागली आहे. या इतक्या मोठ्या किल्लेवजा रचनेत आपण तिघेच अडकलेले आहोत. आपल्यापैकी एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहेत. मी एका हल्ल्यातून वाचलो आहेच. अजून एक चूक आपल्याला अधिक धोक्यात लोटू शकतेच. आपल्याला अजून एकही चूक करणे परवडणारे नाही."

~~~ मंदार~~~

बराच वेळ झाला कोणीच काही बोलेना. म्हणून शेवटी मी सांगितले, "हे बघा, हा मी मुख्य रस्त्यावरून चाललो आहे. कोणाला मागे यायचे असेल तर या. मी याच रस्त्यावर पुढील ५ मिनिटे चालून थांबेन."
मी बॅग उचलली आणि निघालो तर मागे साळवी आणि मानकामे दोघेही निघाले. आम्ही चार पावले टाकतोय ना तोच त्या पायवाटेच्या दिशेने कोणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू आला
"कोणीतरी येतेय बहुतेक." मी म्हणालो. माझ्या अंगातून एक सूक्ष्म भिती तरंगून गेली.
"आता काय करायचे?" मानकामेंनी विचारले
"माझ्यामते लपणे योग्य आहे." साळवी म्हणाले आणि कोणीही काही बोलायच्या आत बाजूच्या शिरीष वृक्षाच्या जाड बुंध्यामागे लपलेदेखील.
माझा आणि मानकामेंचा निर्णय होईना.
मानकामेंनी त्यांचा एक हात कमरेच्या जंबियावर ठेवला. मी कोणतेही शस्त्र आणले नव्हते त्याची उणीव पहिल्यांदाच जाणवली. पावलांचा आवाज मोठा मोठा होत होता. आम्ही पळून मागे जावे का लपावे का तसेच समोर उभे राहावे हे ठरवू शकत नव्हतो. मानकामेंनी जंबिया बाहेर काढला. मी त्यांच्या बाजुलाच उभा होतो. एकीकडे आता होईल ते स्वीकारायला सज्जही होतो आणि घाबरतही होतो. किंबहुना त्या भितीतही आता काय होते याची उत्सुकातही होती. बहुदा म्हणूनच आम्ही तिथे थिजलो होतो.

तर, आता समोरच्या झाडीत मनुष्याकृती दिसायला लागली होती. त्या आकृतीच्या हाती काठी होती. आम्ही तिथेच बघू लागलो. ती व्यक्ती झाडांमधून बाहेर आली आणि अचानक मानकामे ओरडले, "सखु तू?!!"
"सखु? म्हणजे मी आल्यावर जिने दार उघडले होती ती! होय होय तीच ही!"
समोरून येणार्‍या त्या बाईंकडे बघून मलाच कळेना की काय चाललंय ते. ही सखु इथे कशी आली? त्या वाटेवरून कोणता दुसरा रस्ता आहे की काय? बरं ती इथे का आली असेल? किल्ल्याच्या आत हिचाच वावर होता की काय? हे सारे तिचीच निर्मिती आहे का? म्हणजे मग हा खजिना तिने आधीच लंपास केला असेल काय? अनेक प्रश्न अगदी क्षणात एकाच वेळी उसळ्या मारू लागले. ती अधिक जवळ आली तेव्हा जाणवलं की तिचे आमच्याकडे लक्षच नाहीये. किंबहुना तिचे कोणाकडेच लक्ष नव्हते. तिची नजर शून्यात स्थिरावलेली होती.
ती अगदी समोर आली. तिच्या चेहर्‍यावर कोणत्याही भावाचा अभाव होता. तिच्या हातात आम्ही काठी समजलो होतो तो एक काहीश्या प्रकाशमान असा दंड होता. केस, साडीचा पदर मोकळे सोडलेले होते आणि मुख्य म्हणजे कपाळावर हलक्या हिरव्या-फ्लोरोसेन्ट प्रकाशाचे एक 'स्वस्तिक' चमकत होते.

ती, सखु अर्थात सरस्वती लिमये, आमच्या समोरून आमच्या पुढे निघून गेली आणि आम्ही तिच्या मागे जावे की न जावे असा विचार करून तिच्याकडे बघत उभे होतो.

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अरे देवाऽ सखु कुठुन आली किल्ल्यामधे?
लै भारी लिवताय. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
असेच म्हणते

रंगत वाढतेय आता कथेतली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

काय गं सखू काय गं सखू, बोला दाजिबा Wink

सखू लैच खत्रा है राव, प्रकरण जब्राट आहे एकूणात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बालपणीच्या 'झुंजार'कथांची आठवण झाली. आम्ही त्या धडधडत्या हृदयाने वाचत असू.
इतक्या वर्षांनी पुन्हा तो अनुभव आला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास चाललंय, लवकर लवकर टाकत चला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आणखीनच नवीन. पुढचा भाग कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयला...हे भारी होत चाललय....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0