खजिना (६/८)

~~~मंदार~~~

आता आमच्याकडे सखुच्या मागे जाण्यावाचून पर्याय नव्हता. मी साळवी लपले होते त्या झाडामागे गेलो तर तिथे ते नव्हतेच. आम्ही काही मिनिटं तिथे थांबलो पण अधिक वेळ थांबणे शक्य नव्हते. मी पटकन बॅगेतून कागद काढला आणि त्यावर आम्ही जातोय त्या दिशेने खूण केली आणि तो तिथेच एका दगडाखाली ठेवला. मानकामे तर हिप्नोटाईज झाल्यासारखे सखुच्या मागे चालू लागले होते. मी त्यांना गाठलेच.
"मानकामे सर! "
"श्श्श्श!! इतके दिवस ही बया माझ्या घरात रोज येत होती. कधी तागास तूर लागू दिला नाही! " मानकामे दबक्या आवाजात पण मिश्किल सुरात बोलले. मी नुसताच क्षीण हसलो
सखु पुढे जात होती, तसतसे आम्ही दोघेही बेचैन होत होतो. ती तर जराही मागे वळून बघत नव्हती. माझ्या डोक्यात तिच्या डोक्यावर चमकणार्‍या स्वस्तिकच येत होते. मी न राहवून मानकामेंना म्हणालो, "काहीतरी गडबड आहे. मुख्य द्वारावर तिबेटी चित्र, इथे डोक्यावर स्वस्तिक, सूचनांची लिपी तर ब्राह्मी, आपण आलोय बहामनी किल्ल्यात. काही कळायला मार्ग नाही. आता तर संध्याकाळ व्यायला आली आहे. "
"मलाही समजेनासे झाले आहे. ", मानकामे उत्तरले, "मी येताना जो मोबाईल आणला होता, तो काल चालू केला नाही कारण इथे चार्जर नाही; पण आज म्हटले गरज आहे, तेव्हा चालू करावाच. मात्र इथे कोणतेही नेटवर्क नसल्याचे मला मोबाइलवर दिसले. किल्ल्याच्या बाहेर चांगली रेंज होती. इथे काय आहे? बाकी, परवा रात्री आत शिरताना, आत झाडी असतील, जंगल माजले असेल, वटवाघळे, विंचू वगैरे प्राण्यांचे साम्राज्य असेल अशी काहीशी कल्पना होती. इथे आल्यापासून तर मला एखाद्या साहसकथेचा भाग असल्यासारखे वाटू लागलेय"
आम्ही दबक्या आवाजात बोलायला सुरवात केली होती पण आतापर्यंत आवाज बराच नेहमीसारखा येऊ लागला होता. आम्ही सखु पासून सतत १५-२० फुटांचे अंतर राखून होतो. १०-१५ मिनिटे चाललो असू. समोर पुन्हा एक भिंत, त्याला असलेली कमान दिसत होती. सखु थांबली आणि आम्ही अधिक जवळ गेल्यावर पाहतच राहिलो.

समोर बौद्ध मॉनेस्ट्रीज मध्ये असतात तशी पुण्ययंत्रांची रांग होती. ती यंत्र तुम्ही जितकी फिरवाल तितके तुम्हाला पुण्य मिळेल अशी सर्वसाधारण मान्यता आहे. मात्र सखु त्यांच्यापुढे उभी राहिली आणि एकेक करून तिने प्रत्येक यंत्र फिरवू लागली. सगळ्या २०-२५ यंत्रांना तिने फिरवले. जणू काही हवी ती अक्षरे समोर आणत होती, आणि शेवटचे यंत्र फिरवताच बहुदा पासकोड पूर्ण झाला. त्या पुण्ययंत्रांना योग्य त्या स्थितीत आणल्यावर त्या दिंडी दरवाज्यासारख्या मोठ्या कमानीमागून एक पुल वर आला.
"म्हणजे इथेही दलदल होती तर! बाकी, हे चक्रांचे इतके मोठे कोडे तर आपल्याला सात जन्मात सुटले नसते" मानकामे पुटपुटले.
ब्रिज वर आला तरी बराच वेळ झाला सखु आत जात नव्हती. म्हणून मग आम्ही एका मोठ्या झाडावर चढून बसलो. इथून आम्हाला सखु आणि दरवाजा नीट दिसत होता. संध्याकाळ झाली, अंधार पडला. सखु तिथेच एखाद्या मूर्तीसारखी उभी होती. आता तिच्या शरीरातूनच हिरवा फ्लोरोसेन्ट रंगाचा मंद प्रकाश एकाच तीव्रतेने फेकला जात होता. आणि अचानक त्या दारामागे प्रकाश पडू लागला.

~~~मानकामे~~~

झाडावर बसल्यावर मला खरंतर डुलकी येऊ लागली होती. कालपासून मानसिक ताण खूप होताच आज तर सकाळपासून एकापेक्षा एक विचित्र घटना घडत होत्या. माझं डोकं तर त्यांची संगती लावून थकून गेलं होतं. त्यात एका जागी शांतपणे बसल्यावर डुलकी लागू लागली. माणसाचा मेंदू कसा गमतीदार असतो नाही? इतका महत्त्वाचा प्रसंग, पण आपली झोप तो वसूल करतोच करतो. अचानक मला मंदारने हाकारले, " सर! "
मी तो अधिक काही बोलायच्या आधी समोर कमानीकडे पाहिले. तर चक्क त्याच्यामागून प्रकाश येऊ लागला होता. प्रकाश काही क्षण अतिशय प्रखर झाला. अगदी काहीच क्षण आणि मग पुन्हा अंधाराने आपली जागा घेतली. अचानक आलेल्या प्रकाशामुळे, इतका अंधार डोळ्यांसमोर दाटला की समोर सखु आहे की नाही हे ही कळेना. आम्ही तसेच बसून होतो. काय करावे ते कळेना; आणि मग डोळ्यांना जरा दिसू लागल्यावर जे जाणवले ते समजाच्या पलीकडे होते.
त्या कमानीपलीकडे एक मोठे यंत्र उभे होते. त्याची रचना साधारणतः एखाद्या मोठ्या बलूनसारखी होती. मी डोळे विस्फारून बघतच राहिलो.
मंदार अचानक एक्साइट होऊन जवळजवळ ओरडलाच "अरे हे तर त्रिपुरा विमान आहे! "
मला काहीच कळेना "म्हणजे काय? आणि हळू बोल."
"सर! भारतीय इतिहास आपल्याला जितका ज्ञात आहे तितकाच काही भागाबद्दल बरेच गूढ आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय उपखंडातील म्हणा किंवा सिंधू संस्कृतीतील वायुवहन."
मला काही समजत नव्हतं पण हे सगळं अत्यंत रोचक होतं. आम्ही समोर बघायला लागलो. बराच वेळ झाला समोरच्या त्या यंत्रात काहीच हालचाल नव्हती. आता आम्हाला सखी दिसूही लागली होती. ती तशीच उभी होती. आमचा एक डोळा त्या परिस्थितीवर ठेवून मी मंदारला मध्येच न रोखता ऐकू लागलो.
मंदार सांगत होता, "तुम्ही सुब्बराय शास्त्री किंवा जॉयसर नावाच्या व्यक्तींबद्दल ऐकले आहे का? "
"नाही. ही दोन्ही नावे मला परिचित नाहीत.", मी लगेच उत्तरलो
"ओके. सांगतो. सुब्बराय शास्त्री नावाच्या व्यक्तीला काही संस्कृत पद्य रचना मिळाल्या. अधिक संशोधन केले असता त्या अनेक शतकांपूर्वी महर्षी 'भारद्वाज' यांनी लिहिलेल्या रचना होता. आणि त्या "विमान उड्डयन" या विषयाशी संबंधीत रचना होत्या. त्यानंतर ३५ वर्षांनी जी. आर. जॉयसर नावाच्या व्यक्तीने त्याचा पाठपुरावा करून त्याचे इंग्रजीत (आणि पुढे हिंदीतही) भाषांतर करून प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिले आहे 'वैमानिक शास्त्र'. यात वर्णन केलेली विमाने ही विविध पातळ्यांवर तर उडू शकतातच, शिवाय ती आवाजाच्या वेगापेक्षा अधिक उडू शकतात. शिवाय त्यांची रचना अशी असते, की ती रडारमध्येच असे नाही, तर कोणत्याही तरंगांवर आधारित प्रणालीमध्ये डिटेक्ट होणार नाहीत. त्रिपुरा विमान, शकुण विमान इत्यादी त्या विमानांची नावे मला आठवतात. त्यातही त्रिपुरा विमानाचे नकाशे समोर दिसतोय त्या बलूनच्या आकाराचे आठवताहेत. अर्थातच या श्लोकांना भारतात अनेकांनी हसण्यावारी नेले होते. तुम्ही 'शिवकर तळपदे' हे नाव ऐकले असेल कदाचित. राइट बंधूंच्या आधी ८ वर्षांपूर्वी या व्यक्तीने 'उडते यंत्र' बनवले होतेच. ते माझ्या आठवणीप्रमाणे मानवविरहित होते. त्याला त्यांनी 'मरुत्सखा' नावही दिले होते. शिवकर तळपदे हे स्वतः संस्कृत जाणकार होतेच, शिवाय त्यांनी या सुब्बराय शास्त्रींकडून महर्षी भारद्वाजांचे वैमानिक शास्त्र समजून घेतले होते. त्यांनी या यंत्राचे यशस्वी उड्डाणही करून दाखवले होते. मात्र या तळपदेंना पुढे म्हणावे तितका लोकाश्रय मिळाला नाही. मात्र जॉयसर यांनी सुब्बरायांच्या मृत्यूपूर्वी ते श्लोक मिळवून त्याचे भाषांतर इण्टरनॅशनल सेंटर फॉर संस्कृत स्टडीज करून करून घेतले. मी आज जे डोळ्यांसमोर पाहतो आहे, ते पाहिले नसते तर नक्कीच याला एक 'मिथ' म्हणून सोडून दिले असते. "
"अरे बापरे! म्हणजे हे खरे होते की काय? "
"बाकी माहीत नाही, पण मी समोर जे बघतोय ते जर 'त्रिपुरा विमान' असेल, तर न जाणो 'वैमानिक शास्त्र' खरेही असेल! खरंतर एकूणच भारतीय इतिहासाबद्दल इतके उलट सुलट दावे ऐकू येतात की त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार ठरवावं अश्या मताचा मी होतो. हो! आता होतोच म्हणावं लागेल. बाकी हे नुसत्या विमानशास्त्रापर्यंत सीमित नाही तर एकूणच सिंधू संस्कृती ही प्रचंड प्रगत होती असे अनेक जण दावे करतात. रामायणातील पुष्पक विमान प्रसिद्ध आहेच शिवाय रामायणातच ऐन समरांगणातही उडत्या हल्ल्यांचा उल्लेख आहे. जरी ही काव्ये धरली तरी या केवळ कवी कल्पना होत्या का तत्कालीन तथ्ये होती? "
"म्हणजे? "
"म्हणजे समजा तुम्ही आज एक काल्पनिक कथा लिहिलीत आणि त्यात कोणत्याही तारेशिवाय पृथ्वीवर कुठेही बोलता येऊ शकेल अश्या यंत्राचा उल्लेख करून असे 'मोबाईल' नावाचे यंत्र त्या कथेतील पात्र वापरते असे लिहिलेत. पुढे कालांतराने काही कारणाने या ज्ञानाचा काही कारणाने विनाश झाला मात्र ही कथा अमर झाली, तर हजारो वर्षांनंतर ही कथा काल्पनिक असली, मानली, तरी मोबाईल ही तुमची कल्पना आहे की आताच्या काळातील प्रत्यक्षातील वस्तू हे ठरवणे कठीण जावे. "
"अरे पण.. " मी अधिक काही बोलणार इतक्यात समोरच्या त्या यंत्राचे दरवाजे उघडले गेले आणि आतून काही व्यक्ती बाहेर आल्या. त्यातील एक सखुच्या दिशेने गेली आणि तिचा हात पकडून तिला यंत्रात घेऊन गेली. त्याआधी दुसर्‍या व्यक्तीने तिच्या हातातील काठी घेतली आणि सोबतच्या एका यंत्रात घातली. त्या यंत्रातून एक कागद बाहेर आला. तो बघून दोन माणसे थेट आम्ही ज्या झाडावर लपलो होतो त्या दिशेने येऊ लागली. आम्ही अधिक वरच्या फांद्यांवर सरकायचे ठरवले.
ते आम्ही लपलो होतो, त्या झाडाच्या फांदीखाली येऊन उभे राहिले. आणि त्यांनी त्यांच्या जवळील 'मोबाईल' सारख्या दिसणार्‍या यंत्राचे बटण दाबले आणि काय आश्चर्य आम्ही ज्या फांदीवर बसलो होतो ते झाड रंग बदलू लागले व निळ्या रंगात चमकू लागलेच, शिवाय ती फांदी अधिक तीव्रतेने चमकू लागली.
त्या व्यक्ती आमच्याकडे बघून अस्खलित मराठीत म्हणाल्या "श्रीयुत मंदार आणि प्रोफेसर मानकामे, या ठिकाणी आपले स्वागत असो. तुम्ही खाली उतरलात तर वार्तालाप करणे सोपे जाईल. आशा आहे तुम्ही सहकार्य कराल."

आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. आणि इथे उगाच बळाचा प्रयोग करणे शहाणपणाचे नाही हे दोघांच्याही डोळ्यात लख्ख दिसले. आम्ही खाली उतरलो.

~~~मंदार~~~

खरंतर मला उतरावे की नाही हे समजत नव्हते. पण समोरच्या व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या इतके प्रगत होत्या की त्यांना आमची नावेसुद्धा माहिती झाली होती. आम्ही काहीही न बोलता खाली उतरल्यावर त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्यापैकी एक जण जाडगेलासा, डोक्यावर टक्कल पडलेला, बुटकासा होता तर दुसरा घार्‍या डोळ्यांचा, गोरा, मध्यम बांध्याचा होता. दोघांनीही वैमानिक घालतात तसला पोशाख घातला होता. फक्त डोक्यावर शिरस्त्राण नव्हते. त्रिपुरा विमानाकडे बोट दाखवत त्यांच्यापैकी जाडगेला होता तो म्हणाला, "या दिशेने.. "
आम्हाला काहीतरी बोलणे भाग होते. मी काही प्रस्तावना करणार इतक्यात मानकामे सरांनी पहिला प्रश्न विचारला होता, "आपण कोण आहात? " त्या व्यक्तीने फक्त आमच्याकडे बघून स्मित केले आणि आम्हाला विमानाच्या दिशेने नेले. "हे बघा आम्हाला तुम्ही कुठे नेताय हे तरी सांगा". तरीही समोरून कोणतेही उत्तर येत नव्हते.

आम्ही त्या कमानीपर्यंत पोचलो. कमानीवर पुन्हा काही तिबेटी संस्कृतीत आढळणार्‍या शैलीतील चित्रे दिसलीच. आम्ही त्या पुलावरून पलीकडे गेलो तर समोर ते भले मोठे विमान उघडे होते. त्याचा दरवाजा उघडा होता. आम्ही तिथे पोचताच त्या विमानाच्या दारात एक मनुष्याकृती दिसू लागली. माझे दाराच्या बाजूला लक्ष गेले. तिथे स्पष्ट देवनागरीमध्ये लिहिले होते 'मरुत्सखा'!

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

च्यायला! ही तर आणखीनच गंमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१.

मालमसाला उत्तम वापरलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहे हा भागपण. आता साळवी कुठे गायब झाले... मस्त लिहीताय. पुढे काय होइल याचा अजीबात अंदाज येत नाहीय.
अवांतर:अगदी सिन्सिअरली ५ दिवसात एक भाग टाकताय म्हणजे तुम्ही नक्किच षड्रिपुंपैकी एक नाही Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विट्रेस्टिँग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आता कल्पना करणे सोडून दिले आहे, फक्त उत्कंठा आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सातव्या आणि आठव्या भागाच्या अपेक्षा खुपच वाढ्ल्या आहेत...
मजा येतेय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0