….ब्रह्मराक्षस

संध्याकाळी जेंव्हा केंब्रीज स्टेशनला मी रेल्वेगाडीत बसले तेंव्हा खूप खुशीत होते. दिवस अतिशय छान गेला होता. सकाळी गाडीतून उतरले तेंव्हा गिरीश स्टेशनवर घ्यायला आला होताच. त्याच्या घरी जाता जाता वाटेत स्टीफन हॉकिंगचे ऑफीस, हेनरी कॅवनडीशची लैब असं करत करत आम्ही घरी पोहोचलो. घरी सुमाने आणखी मोठा स्वागतसमारंभ आखला होता. पोटभर गप्पा आणि खाणे झाल्यावर पुन्हा आम्ही बाहेर पडलो. किंग्स कॉलेज, क्वीन्स कॉलेज, कॅम नदीवर पंटींग करणारे विद्यार्थी करत करत एका ऐतिहासिक कॅफेमध्ये थांबून छान कॉफी प्यायलो. सर्वच अनुभव अविस्मरणीय होते. वर कडी म्हणजे सुमाने अगदी माहेरवाशीणीचा आहेर केल्यासारखा डबा बांधून दिला होता. संध्याकाळी गाडीत बसले तर कितीतरी वेळ अजून सबंध दिवासाची लज्जत्त जिभेवर रेंगाळत होती.
सरलेल्या दिवसाच्या आठवणीत मी इतकी गुंग होते की अगदी अंधार पडेपर्यंत लक्षातच आले नाही की ट्रेन फारच हळू चालली आहे. मान्चेस्तरला पोहोचायला मला मध्ये पीटरबऱौला गाडी बदलायची होती. पीटरबऱौला दोन गाड्यांमध्ये २०/२५ मिनिटांचा अवधी होता. कुठल्याही सामान्य परिस्थितीत गाडी बदलायला तेवढा वेळ पुरेसा होता. पण एव्हानाच गाडी १५ मिनिटे उशिराने धावत होती. आणि अजूनही ती रखडतच चालली होती. पीटरबऱौला पोहोचायला खरेतर अजून तब्बल १ तास होता. गाडीचे लक्षण आतातरी असे दिसत नव्हते की आत्तापर्यंत रखडलेली पंधरा मिनिटे ती या पुढे भरून काढेल. जरा काळजी वाटू लागली. अंधार पडला होता आणि इंग्लंडमध्ये बारा महिने अंधार पडल्यावर थंडी वाजते. स्टेशनवर थंडीत गाडीची वाट पहात बसणे ही कल्पना फारशी रम्य नव्हती. किंबहुना नकोशी होती! शेवटी कशीबशी रखडत गाडी जेंव्हा पिटरबऱौला पोहोचली तेंव्हा चांगली अर्धा तास उशिरा पोचली होती. अर्थातच माझी जोड गाडी तोवर निघून गेली होती.

पीटरबऱौ हे इंग्लंडमधील एक प्रातिनिधिक छोटंसं स्टेशन. दोन फलाट, एक तिकीट खिडकी आणि निर्मनुष्य स्तब्ध शांतता. सुदैवाने तिकीट खिडकीत एक माणूस होता. आधीची गाडी उशिरा आली त्यामुळे पुढची जोडणारी गाडी चुकली, वगैरे सगळी कहाणी मी त्या माणसाला सांगितली. पुढची गाडी साधारण पावणेदोन तासांनी आहे, अशी माहिती त्याने वेळापत्रकात पाहून मला पुरवली. आत्ता फलाटावर जाऊन बसण्याला काही पर्याय नाही असे दिसत होते. निमूटपणे मी फलाटाकडे मोर्चा वळवला. फलाटही अगदी इंग्लंड मधील प्रातिनिधिक फलाट होता. संपूर्ण निर्मनुष्य! एक बाक बघून विसावले. मनात खरेतर भिती वाटत होती. भारतीयांना निर्मनुष्यतेची भितीच वाटते. कारण इतक्या गर्दीत रहायची सवय झालेली असते की आजूबाजूला माणसे नाहीत ही कल्पना कशीतरी वाटते. पण आत्ता इलाज नव्हता!

पर्समधून ipod काढला आणि कानाला लावला. हे करते न करते तोच फलाटावर एक थोराड काळा आला. तोही अगदी ठाशीव बांधणीचा काळा - म्हणजे राकट, गळकी फाटकी जीन, साधारण पंचविशीतला, कनिष्ट मध्यम वर्गातला असावा असा दिसणारा. आत्ता मात्र मला जाम भीती वाटली. काय करावं ते कळेना! मी आणि तो, सोडून फलाटावर कोणीही नाही या जाणीवेने मी चांगलीच घाबरले होते. कानाला जे यंत्र लावलेलं होतं, त्यात काय वाजते आहे याकडे आता अजिबात लक्ष जात नव्हते. एकदा वाटले तिकीट खिडकीपाशी असलेल्या माणसाजवळ जाउन बसावे. पण मग परत वाटले, त्याच्यावर भरवसा टाकायला त्याच्या शीलाची माझ्याकडे कुठली पावती होती? जाऊ दे, इथेच बसावे म्हणून तशीच बसून राहिले. सतत आपण ऐकण्यात मग्न आहोत, असा आभास निर्माण करणं महत्वाचं होतं.

तेवढ्यात समोरच्या फलाटावर काही तरुण मुला-मुलींचा घोळका आला. त्यांचा दंगा सुरु झाला. मी निश्वास सोडला. बरोबर त्यांच्या समोरच्या बाकावर जाउन बसले. आणि मग मात्र दोन गाणी नीट रसास्वाद घेऊन ऐकली. पण ते क्षणिकच होतं असं म्हणायचं. कारण दोन गाणी संपेपर्यंत त्यांची गाडी आली. तो सगळा घोळका गाडीत बसला आणि गाडी लगेच सुटली. पुन्हा फलाटावर मी आणि तो उरलो!

आणि मी पुन्हा मुळपदावर! जीव मुठीत धरून, चेहऱ्यावर मात्र धीटपणाचा आव! मनात हिशेब करत होते की आपल्याजवळच्या मौल्यवान वस्तूंची एकूण किंमत किती भरेल? रोख पैसे किती आहेत? समजा त्या काळ्याने जर काही शस्त्र दाखवले तर आपल्याला काय डावपेच करता येतील? वेळ फार धीम्या गतीने रांगत होता. वैरीदेखील चिंतणार नाही ते सारं मन चिंतत होतं. आज आपण मान्चेस्तरला पोचतो की नाही; इथपर्यंत विचारांची मजल गेली. पुढची गाडी रद्द झाली तर काय करायचं? अंधार मी म्हणत होता. पीटरबऱौची काहीही माहिती नव्हती. तिथून बस पकडता येईल का, हे माहीत नव्हते. तिकीट खिडकीवरच्या माणसाला विचारावे तर याची खात्री वाटत नव्हती की तो व्यवस्थित काही माहिती देईल की नाही. पूर्वी एकदा इंग्लिश तुसडेपणाचा अनुभव घेऊन झाला होता, ते अजून स्मरणात होतेच!

एव्हाना दिवसभराची सर्व नशा उतरली होती. पाय संपूर्ण जमिनीवर अवतीर्ण झाले होते. सरणारा एक एक क्षण जणू पायांना जमिनीकडे खेचत होता. हा तास दीडतास कसा काढायचा याचा वेगवेगळा विचार सतत चालू होता. मधेच एकदा बाकावरून उठून फलाटावर एक फेरफटका मारून आले. पण सतत असा भास होत होता की त्याचे डोळे माझा पाठलाग करत आहेत. नजर उचलून हे सत्य आहे का, ते बघण्याची हिम्मत होत नव्हती. मला कोणी ‘दिल चाहता है’ मधला आमीर खान इथे वाचवायला येणार नव्हता. मलाच स्वतःचे रक्षण करणे भाग होते आणि ते बुद्धी चातुर्याने करणे गरजेचे होते. कारण शारीरिक स्तरावर मी आणि फलाटावरचा दुसरा, आम्ही जराही तुल्यबळ नव्हतो. आकार मानाने मी त्याच्या अर्धी होते.

पुढचा एक तास हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तास होता.त्यातला क्षण अन क्षण मी मोजला. विपश्यनेच्या शिक्षणाचा इथे बराच उपयोग झाला. श्वास धीम्या गतीने घेणे-सोडणे आणि त्याकडे निरखून पाहणे, असा खेळ सतत केला. अर्थात तेंव्हा तो खेळ नव्हता. शांत राहण्यासाठी माहीत असणारे सर्व मार्ग अवलंबणे गरजेचे होते. आणि त्याचा मी आटोकाट प्रयास करत होते. नक्की तो काय करतो आहे हे पाहण्याची उत्सुकता होती, पण मान वर करून बघण्याची हिम्मत होत नव्हती. तो स्टेशनवर आला तेंव्हा त्याच्या हातात काही नव्हते आणि हे मी नमूद केले होते. विचारांची साखळी अचानक मोडली. उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसले की तो शेजारच्याच बाकावर बसला आहे. पण नक्की काय करतो आहे ते कळत नव्हते. आत्ता काय बरे करावे? तो काय करतो आहे ते समजून घेण्यासाठी नजर त्या दिशेने वळवणे गरजेचे होते. त्यासाठी काहीतरी बहाणा करायला पाहिजे. पर्स बाकावर उजवीकडे ठेवली आणि त्यातून काहीतरी काढल्या सारखे दाखवण्यासाठी पर्सच्या आत पाहून हात घातला. या उद्योगात चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहून घेतले. तो खाली वहीत पाहून काहीतरी लिहित असावा असे वाटले. अरेच्या, म्हणजे हा काहीतरी उद्योगात दंग आहे की! निदान आपल्याकडे नजर लावून बसलेला नाही याने दिलासा वाटला.हुश्श! एक मजल तरी मारली. आत्ता काय...पुन्हा मागील पानावरून पुढे - श्वासोश्वासाकडे लक्ष देणे आणि कानाला जे काही वाजते आहे त्यात दंग असण्याचा भास निर्माण करणे. आत्ता खरेतर या नाटकाचा कंटाळा आला होता. पण भीती पुरती गेली नव्हती. आणि गाफील राहून चालणार नव्हते.

पुन्हा फलाटावर एक फेरफटका मारला. त्यात एकूण साधारण १०/१२ मिनिटे गेली असावीत. आणि बाकावर जाउन बसले. आता जराशी जास्त हिम्मत करून उजव्या डोळ्याच्या कोपरातून त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही वहीत काहीतरी लिहित असावा असे वाटले. नक्की काय करतो आहे ते दिसत नव्हते. पण पेन्सील अथवा पेनने काहीतरी करत असावा इतके दिसले. आणि ते करण्यात मग्न होता, हे ही नमूद केले. त्याच्या बद्दलची भीती थोडीशी शमली होती. कारण इतक्या वेळात तो फारच सभ्य आणि शांत वागला होता. कुठल्याही प्रकारचा चांगला अथवा वाईट अनुभव आला नव्हता. माझ्यासाठी हाच एक मोठा दिलासा होता. करता करता ट्रेनच्या वेळेला पंधरा मिनिटे उरली. मग ट्रेन पकडायला एक एक करत काही मंडळी येऊ लागली. इंग्लंडमधील प्रत्येक स्टेशनवर थंडी पासून संरक्षण करायला फलाटावर एक खोली असते. इतका वेळ त्या बंदिस्त खोलीत जाउन बसायची देखील भीती वाटत होती. पण आता ईतर लोक यायला लागल्या वर त्यांच्या सोबत मी पण त्या खोलीत जाउन बसले. थंडी वाजत होतीच. तो काळा मात्र अजून त्याच बाकावर बसलेला होता. आत्ता मी खोलीतून त्याच्याकडे पाहण्याचे धाडस करू शकत होते. आणि सोबत थोडी माणसं होती याचे कदाचित उसने बळ आले होते. एव्हाना गाणी ऐकण्याचा मूड पूर्णपणे गेला होता. कानाचा ipod काढून पर्समध्ये ठेऊन दिला. आणि मीही इतरांसोबत ट्रेनची वात पहात बसले. लवकरच ट्रेन आली. आम्ही सगळेजण ट्रेनमध्ये चढलो. त्या काळ्याकडे मी नजर ठेऊन होते. तो अगदी सहजपणे बाजूच्या डब्यात जाउन बसला. कदाचित त्याला माझ्या मनाच्या घालमेलीची जराही जाणीव नव्हती. त्याचे ते सहज वर्तन पाहून पुन्हा माझ्या डोक्यात विचारांची साखळी सुरु झाली.

वास्तविक गेल्या तास/ दीड तासात घडले असे काहीच नव्हते. माझी भीती, माझी मानसिक स्थिती संपूर्णपणे काल्पनिक होती. माझ्या बेचैनीत तो माणूस काळा असण्याचा एक मोठा भाग होता. पण चटकन विचार आला, हेच जर तो गोरा असता तर मी फलाटावरचा तो वेळ जास्त सहज वागले असते का? किंवा काळी स्त्री असती तर? आपल्या मनातल्या सावल्या आपल्या भीतीच्या कल्पना निर्माण तर करत नसतील? आपल्या भीतीच्या कल्पना ठाशीव असतात, ऐकीव असतात की अनुभवातून निर्मित असतात? अनेक अनुभव खरेतर आपले नसतातच, ते शेजारपाजारचे असतात, ती कल्पनेतील आलेखने असतात. परंतु त्या भीतीपोटी आपण कितीतरी गोष्टी करण्याचे धाडस गमावून बसतो. भीतीच्या आधीन होऊन सदसद विवेक कसा गमावतो, आज घडलेली घटना याचे एक उत्तम उदाहरण होते...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

छान लिहीलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीतीचं वर्णन आवडलं. शेवटचा परिच्छेद उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिले आठ नौ परिच्छेद वाचून "कसले पूर्वग्रहदूषित आहात" असे म्हणणार होतो. तेच करेक्टली शेवटच्या परिच्छेदात पाहून गंमत वाटली.(अर्थात घालमेलही झालेली समजू शकतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चांगलं लिहिलंय
आपलंच वागणं त्रयस्थासारखं समजून घेऊ पहाणारा शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

बाकी, ऐसी अक्षरेवर स्वागत. येत रहा लिहित रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमच्या प्रामाणिक कथनाचे कौतुक वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख.

माझाही एक अनुभव आठवला... काही वर्षांपूर्वी चार आठवड्यांकरिता एका प्रॉजेक्टवर काम करण्यासाठी मी अमेरिकेत आलो होतो. किराणामालाची दुकाने वगैरे हॉटेलच्या जवळपास एक ते दीड मैलाच्या परिघात होती, फॉल सीजन होता व ऑफिसपर्यंत जायला बसची चांगली सोय होती त्यामुळे गाडी वगैरे घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. फास्टफूड वगैरे खायचा कंटाळा आल्यावर एका वीकेंडला घरी चिकन वगैरे बनवूया म्हणून सामान आणण्यासाठी मैलभर लांब असलेल्या एका मोठ्या ग्रोसरी दुकानात साधारण चारसाडेचारला चालत गेलो. अमेरिकेतील तीन ग्यालनचे दुधाचे क्यान आणि तीन ते पाच पौडाच्या कांद्याच्या पिशव्या वगैरेंमुळे बरीच अवजड खरेदी झाली. शिवाय पाचसाडेपाचपर्यंत अंधारल्यासारखेही झाले. आता हॉटेलपर्यंत चालत जाता येणे शक्य नाही म्हणून कॅब कंपनीला फोन करुन कॅब मागवली व तिची वाट पाहत दुकानाबाहेर ट्रॉलीजवळ उभा होतो. तर एक कृष्णवर्णीय बाई माझ्याजवळ आली. ती माझ्या दोन ते अडीचपट असावी. तिने मला कसली वाट पाहतोय असे विचारल्यावर मी तिला कॅब वगैरे प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर तिने 'चल मी तुला सोडते. कॅबवाल्याला जे पैसे देशील ते मला दे' असे म्हणून माझ्या सामानाच्या पिशव्या तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये नेऊनही टाकल्या. गाडीशेजारी बहुदा तिचा एक मित्रही उभा होता. हा सर्व प्रकार पाहून माझी पुरतीच गाळण उडाली. सुदैवाने त्या ग्रोसरी दुकानाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने ही चर्चा काचेच्या आतून पाहिली व बाहेर येऊन माझे सामान मिळवून दिले. Smile

हाच अनुभव माझ्या एका मित्राला महिन्याभरानंतर आला. अर्थात तोपर्यंत मी त्याला ही गोष्ट सांगितली नव्हती. पण तो पठ्ठ्या त्या बाईबरोबर हॉटेलपर्यंत तिच्या गाडीतून आला व नंतर आम्हाला कॅबपेक्षा हे कसे स्वस्तात पडले हे सांगू लागला हे पाहून गंमत वाटली. कहर म्हणजे त्या बाईच्या मित्राने जेव्हा कॅब वगैरे हवी असेल तेव्हा बोलाव असे सांगून त्याला मोबाईल नंबरही देऊन ठेवला होता. व त्या सुविधेचा वापरही माझ्या मित्राने केला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतरांचे अनुभव , त्या व्यक्तीचे कपडे , वर्ण आणि आकारमान या पूर्वग्रहांमुळे भीती निर्माण होते.
तुम्ही धैर्याने सामना केलात . अभिनंदन .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीतीच्या आधीन होऊन सदसद विवेक कसा गमावतो, आज घडलेली घटना याचे एक उत्तम उदाहरण होते...

सदसदविवेकबुद्धी गमावली असे मला वाटत नाही.

fear is one of the crucial evolutionary mechanisms for individual survival. (विकि). उलट ती न वाटली तर काहीतरी चुकतय.

ललीत म्हणून लेख (इवलीशी भावना) छान फुलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशाच भीतीचा सामना करण्यासाठी मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेत आहे. पण तरीही शिकवलेले सेल्फ डिफेन्स टेक्निक योग्य वेळी आठवेल की नाही, याची भीती वाटतेच :). सारखा सराव करून मसल मेमरी डेव्हलप होते म्हणे, पण सरावासाठी रोज नवा बकरा कोण बरे शोधावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर : कदाचित हे लिखाण प्रस्तुत लिखाणच्या विषयाशी मिळतंजुळतं वाटू शकेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.