भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.

भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.

ह्या विषयावर एक धागा मी ’उपक्रम’मध्ये लिहिला होता. त्या धाग्यावरील प्रतिसादांमधून भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे अशी काही चर्चा झाली होती आणि चाळिसगावाजवळचे पाटण हेच ते गाव असले पाहिजे असे मी तेथे लिहिले होते. ही सर्व चर्चा मूळ लेख आणि त्यावरील प्रतिसाद अशा विस्कळित स्वरूपात आहे. ह्या विषयाशी प्रत्यक्ष संबंध नसलेले अन्य काही विषयहि ओघाओघाने त्या चर्चेत आलेले आहेत. त्या सर्व लेखनाची मुख्य विषयाला धरून पुनर्मांडणी करून, तसेच काही नवी माहिती भरीस घालून येथे त्याची संस्करण केलेली आवृत्ति पुढे मांडीत आहे.

सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न मी केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते. माना वाकडया करून पाहिल्यास दरीच्या कडेवरून जवळच खाली आम्हास लेणीहि दिसत होती पण दरीत उतरायचे असेल तर प्रथमच पंधरावीस फूट उघडया खडकावरून खाली उतरणे भाग होते. कोरडया दिवसात तेहि अवघड गेले नसते पण खडक ओला आणि शेवाळलेला होता, आम्ही दोघे आणि आमची गाडी ह्याशिवाय आसपास दोनतीन किमी अंतरात कोणी माणूस नव्हता. पाय घसरून अपघात झाला असता तर आडनिडया जागी अडकलो असतो म्हणून ’य: पलायते स जीवति’ हे वचन स्मरून आम्ही लेण्यापर्यंत जाण्याचे टाळले आणि निराशेने माघारी फिरलो.

आमच्या त्या दिवशीच्या योजनेत अजूनहि एक बघण्याची जागा होती आणि तिच्याबद्दल हे पुढील वर्णन आहे. ती जागा म्हणजे ’पाटण’ नावाचे एक कुग्राम. आतापर्यंत कोठे न उल्लेखिले गेलेले असे काही पुरावे मला सापडले आहेत ज्यावरून असे म्हणता येते की पाटण हेच गाव भास्कराचार्यांचे जन्मस्थान आणि राहण्याचे गाव असावे. हे सर्व पुरावे पुढे योग्य जागी दाखविले आहेत.

आल्या रस्त्याने तसेच पुढे चाळिसगावकडे निघाले की एक बर्‍यापैकी मोठा घाट लागतो. घाटाचे जुने वा चालू नाव मला आता स्मरत नाही पण कोठेकोठे त्याला कन्नड ह्या जवळच्याच गावावरून ’कन्नड घाट’ असे म्हटले आहे. ह्याच घाटाला ’ऊट्रम घाट’ असेहि म्हणतात हे मी ऐकले होते आणि हा ’ऊट्रम’ (Outram) कोण अशीहि शंका मला तेव्हा आली होती. ह्या विकीपीडियामधील लेखात दिलेला ज. जेम्स ऊट्रम तो असू शकेल असे तेव्हा मला वाटले होते कारण त्याचा खानदेशातील भिल्लांशी संबंध आला होता. पण पुढे मी जे संदर्भ दाखविणार आहे त्यावरून मला आणखी एका कमी प्रसिद्ध अशा ऊट्रमची माहिती मिळाली आणि आता माझे असे मत बनले आहे की हा घाट ह्या कमी प्रसिद्ध ऊट्रमचे नाव बाळगीत आहे. (थोडे अवान्तर - ज. जेम्स ऊट्रम हा लखनौच्या वाजिद अली शाहच्या दरबारात ब्रिटिश रेसिडेंट म्हणून होता आणि अवधचे राज्य खालसा करण्यात त्याचा मोठा वाटा होता. सत्यजित राय ह्यांच्या ’शतरंज के खिलाडी’ ह्या चित्रपटात ह्या ऊट्रमची उत्कृष्ट भूमिका रिचर्ड अ‍ॅटेन्बरा ह्यांनी केलेली आठवते.)

ह्या बर्‍यापैकी मोठया घाटाने सुमारे हजार फूट खाली उतरून चाळिसगावकडे जाऊ लागले म्हणजे चाळिसगावच्या थोडे अलीकडे डाव्या हाताला फुटलेला एक रस्ता दिसतो. तो रस्ता ’पाटण’ नावाच्या गावाकडे जातो. ह्या गावात एक भवानीदेवीचे मंदिर आहे आणि तिला पाटणदेवी म्हणतात. (२०.३२३९° उ ७४.९८०६° पू)

पाटण आज एक खेडेवजा गाव आहे पण एकेकाळी ते जास्ती मोठे आणि भरभराटीचे असावे ह्याचा पुरावा म्हणजे गावात अनेक जागी दिसणारी जुनी भग्न मंदिरे आणि उद्ध्वस्त मूर्ति. पाटण हा ’पत्तन’ चा अपभ्रंश. ह्यावरूनहि असा तर्क करता येतो की आजचे हे कुग्राम एकेकाळी ’पत्तन’ पातळीचे मोठे गाव वा शहर असावे. पाटणदेवीच्या मंदिराचीहि बरीच पडझड झाली आहे तरीहि मंदिर वापरात आहे. पितळखोर्‍यापासून येथे चारचाकीने यायला आम्हास बराच वळसा पडला होता पण पितळखोर्‍याच्या दरीतील नाला दरीतून बाहेर पडल्यानंतर ह्या देवळाशेजारूनच जातो आणि दरीतून पायी उतरायचे ठरविल्यास लेण्यांपासून मंदिराचे अंतर फार नाही हेहि लक्षात येते. देवळाच्या आसपास भरपूर झाडी आणि ’गौताळा संरक्षित वन’ असून मागेच सातमाळ्याची डोंगरांची रांग उभी आहे, जी खालील चित्रांमध्ये दिसत आहे.

मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो कारण ह्या जागी प्रसिद्ध गणिती द्वितीय भास्कराचार्य ह्यांचा नातू चंगदेव ह्याने चालविलेली पाठशाळा होती आणि भास्कराचार्याचा सिद्धान्तशिरोमणि हा ग्रंथ आणि भास्कराचार्याच्या काही पूर्वजांचे ग्रंथ ह्यांचे अध्ययन तेथे केले जात असे हे ह्या देवळातच सापडलेल्या एका शिलालेखावरून समजते. हा शिलालेख आणि मठाची जागा असलेले देऊळ पाहण्याची आमची इच्छा होती.

देऊळ पुष्कळसे भग्नावस्थेत आणि तरीहि वापरात होते. देवळाच्या अवशेषांपैकी अनेक भग्न मूर्ति, कलाकुसर कोरलेले अनेक दगड असे एका बाजूस रचून ठेवलेले होते. पुजार्‍याने दिलेल्या माहितीनुसार चंगदेवाचा शिलालेखहि त्यांमध्येच होता पण सुरक्षिततेच्या कारणाने पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी मोठया शिळांच्या त्या राशीमध्ये त्याला सर्वात खाली आणि तोंड उलटे करून असे ठेवले होते. त्या कारणाने आम्हांस तो पाहायला मिळाला नाही ह्यामुळे हळहळ वाटली. शिलालेखाला एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखी सुरक्षित जागा मिळेपर्यंत तो आहे तेथे आणि तसाच टिकून राहो ही इच्छा!

ह्या शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी:

शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:।
यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७.
तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः।
प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८.
तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः।
श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९.
तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता-
कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः।
यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि-
च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०.
लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती।
क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१.
सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः।
जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२.
तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:।
श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३.
भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः।
तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४.

ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम - (भोजराजाश्रय - विद्यापति) भास्कर - गोविंद - प्रभाकर - मनोरथ - (कवीश्वर) महेश्वर - भास्कर (लीलावती इ.) - (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर - (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० - १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती.

लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे.
श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च।
भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य?? ॥२५॥
(सोइदेव, हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी.)

ह्यापुढील देणग्यांशी संबंधित मराठी भागाचा पुढील छाप मला वि.ल.भावेकृत आणि शं.गो.तुळपुळेसंपादित ’महाराष्ट्र सारस्वत’ ह्या ग्रंथामध्ये मिळाला. औत्सुक्यापोटी तो पुढे दाखवीत आहे. लेखाच्या थोडयाफार निरनिराळ्या वाचनांपैकी वि.ल.भावे ह्यांचे वाचन आणि अर्थ ह्यांवर आधारित अर्थ त्यापुढे देत आहे. येथे आणखी एक लक्षणीय गोष्ट आहे ती अशी. अन्य सर्व लेख प्रतिष्ठादर्शक असा संस्कृत भाषेत असला तरी प्रत्यक्ष दानाचे वर्णन सर्वसामान्यांनाहि कळावे म्हणून मराठी भाषेत दिलेले आहे.

स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौ
र्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन (सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाय दानं दत्तं तद्यथा॥)
इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला
होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेया
पासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राह
कापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तुलदाइ
या बैला सिद्धवै॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहका
पासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहि
लेया घाणे आदाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे
वाहति तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते म
ढीचेन मापे मवावे मापाउ मढा अर्द्ध ॥ अर्द्ध
मापहारी ॥ रूपाचे सूंक । तथा भूमि॥ चतुराघाट विशुद्ध

(शब्दार्थ: केणे - द्रव्य, उघटणे - विक्रीसाठी मांडणे, असिआउ - शासकीय हिस्सा, उत्पन्न, राउल - देऊळ, विकता - विकणारा, ब्रह्मोत्तर - ब्राह्मणाचा वाटा, वीसोवा - विसावा भाग, आसु - एक प्रकारचे सोन्याचे नाणे, गिद वा गिधवे - एक माप. वाहणे - चालू असणे, मवणे - मोजणे, मापउ/मापाउ - मोजलेले, मापहारी - माप करणारा, सूंक - कर.)

चालू मराठीत अर्थ: ह्या पाटणात जे द्रव्य उत्पन्न होईल त्यावरील राजाने घ्यावयाचा जो कर तो मठास दिला. माल विकणार्‍यांपासून जे ब्रह्मोत्तर घ्यायचे ते ब्राह्मणांनी मठास दिले. गिर्‍हाइकांपासून दर आसूमागे दामाचा विसावा भाग नगराने मठास दिला. पाण्याचे बैल तयार ठेवावे. (बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ - ह्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ कळत नाही.) पहिल्या घाण्याच्या तेलापैकी एक लोटी मठाला दिली. नंतर जितके घाणे होतील त्यांमधून एक एक पळी तेल (मठाला दिले.) जे मोजावयाचे ते मठाच्या मापाने मोजावे. मोजलेल्यापैकी अर्धे मठाचे आणि अर्धे मोजणार्‍याचे. जमिनीवरील कर आणि जमीन...

भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे ह्या लेखनाच्या विषयावर आता विचार करू. त्याविषयी भास्कराचार्य स्वत: सिद्धान्तशिरोमणि - गोलाध्याय येथे जे लिहितात त्यावरून असे दिसते की त्यांचा पिता महेश्वर हा ’विज्जडविड’ नावाच्या पुरामध्ये राहात होता. ह्यावरून तेच पुर भास्कराचार्यांचे गाव असावे असे म्हणता येईल.

आसीत्सह्यकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने
नानासज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रो द्विज:।
श्रौतस्मार्तविचारसारचतुरो नि:शेषविद्यानिधि:
साधूनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणि:॥
तज्जस्तच्चरणारविन्दयुगलप्राप्तप्रसाद: सुधी-
र्मुग्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम्।
एतद्व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां
सिद्धान्तग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर:॥

सारांशाने अर्थ: सह्य पर्वतापाशी वसलेल्या ’विज्जडविड’ नावाच्या गावी शाण्डिल्य गोत्रातील महेश्वर दैवज्ञ राहात होता. त्याचा पुत्र भास्कर ह्याने सिद्धान्ताचे ग्रथन केले. आत्ताचे पाटण म्हणजेच भास्कराचार्यांनी उल्लेखिलेले विज्जडविड असे ठरविण्यासाठी लागणारे उलटसुलट पुरावे पुढीलप्रमाणे.

हे ’विज्जडविड’ नावाचे गाव कोठले ह्याविषयी आज कोणीच काही निश्चितीने सांगू शकत नाही. बीडपासून बिदर, बिजापूर, बुलढाणा येथपर्यंत तर्क करण्यात आले आहेत पण ती गावे ’सह्यकुलाचलाश्रित’ अशी सह्य पर्वतानिकटची नाहीत ही त्यांच्याबाबत मोठीच अडचण आहे विजापूर आणि बीड ह्यांचा तर्क केवळ उच्चारसादृश्यावरच आधारित दिसतो. ह्याउलट चंगदेवाच्या शिलालेखातील उल्लेखानुसार भास्कराचार्यांचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला जैत्रपालाने ’ह्या नगरातून’ (पुरादतः) बोलावून नेऊन आपला मुख्य पंडित बनविले असे लक्ष्मीधराचा पुत्र चंगदेव शिलालेखात म्हणतो. ह्याचा अर्थ भास्कराचार्यपुत्र लक्ष्मीधर पाटणातच राहात होता आणि त्याचा पुत्र, भास्कराचार्यांचा पौत्र चंगदेव हा तर निश्चितच तेथे राहात होता. हे गाव ’सह्यकुलाचलाश्रित’हि आहे ह्यात शंका नाही. वरचे चित्र तेच दर्शवीत आहे.

भास्कराचार्यांचे अन्य वंशीयहि पाटणच्या आसपास राहात होते ह्याला उत्तम पुरावा आहे. चाळिसगावच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ नावाचे गाव आहे आणि तेथील सारजा देवीमंदिरात शके ११४४ चा एक शिलालेख कोरलेला आहे. डॉ. कीलहॉर्न-संपादित हा शिलालेख Epigraphia Indica Vol. 3 येथे पान ११० येथे उपलब्ध आहे. शिलालेख अनंतदेव नावाच्या व्यक्तीने कोरविला असून हा अनंतदेव सिंघणाच्या पदरी मुख्य दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी म्हणून होता. लेखात अनंतदेवाने आपली जी कुलपरंपरा दिली आहे ती शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर - श्रीपति - गणपति - अनंतदेव अशी आहे. वर दिलेल्या चंगदेवाच्या वंशपरंपरेमध्येहि शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर आहेत आणि तेथून भास्कर - लक्ष्मीधर - चंगदेव अशी परंपरा आहे. ह्यावरून हे उघड आहे की अनंतदेव आणि चंगदेव ह्यांची घराणी चुलत घराणी आहेत आणि भास्कर हा अनंतदेवाचा चुलत आजा दिसतो.

ह्यावरून असे म्हणता येते की विज्जडविड अथवा विज्जडविडपत्तन ह्या गावी भास्कराचार्यांचा जन्म आणि निवास झाला. कालौघात विज्जडविडपत्तन ह्या लांबलचक नावातून विज्जडविड गळून पडले आणि पूर्ण विस्मृतीत गेले आणि गावाचे नाव केवळ पत्तन आणि कालौघात पाटण असे ओळखले जाऊ लागले. हे गाव एकेकाळी मोठे असावे असे वर म्हटलेच आहे कारण कुग्रामाला कोणी पाटण असे नाव देणे अशक्य वाटते. भास्कराचार्यांचे वास्तव्य आजच्या पाटणमध्येच होते आणि त्याचे विज्जलविड हे नाव मात्र कालौघात लुप्त झाले आहे असा तर्क सहजशक्य वाटतो.

ह्या तर्काला आधार देणारे असे नवीन पण आतापर्यंत अनुल्लेखित असे काही पुरावे आता पाहू. एरवी विस्मृतप्राय झालेले हे पुरावे आपणास आज गूगलकृपेने उपलब्ध होत आहेत.

आपल्याला हे ठाऊकच आहे की जुन्या काळातील लेणी तत्कालीन व्यापारी दळणवळणाच्या मार्गांना लागून कोरली जात. आजचे पितळखोरे लेणे मात्र कोठेतरी कोपर्‍यात पडल्यासारखे वाटते कारण ते औरंगाबादहून चाळिसगावाकडे आणि तसेच उत्तरेकडे जाण्याच्या रस्त्यापासून बरेच आत जवळजवळ निर्मनुष्य भागात आहे. मला अशी शंका आली की ते लेणे नेहमीच असे दुर्लक्षित भागामध्ये नसणार, एकेकाळी तेहि मुख्य रहदारीच्या मार्गावर असणार.

ह्या दिशेने शोध घेण्यास लागलो तेव्हा प्रथम Itinerary and directory for Western India: being a collection of routes...अशा लांबलचक नावाच्या आणि कॅ. जॉन क्लून्सलिखित (१२वी नेटिव इन्फ़न्ट्री) ह्या १८२६ साली कलकत्त्यात छापलेल्या पुस्तकाकडे वळलो. हे पुस्तक books.google.com येथे उपलब्ध आहे. पुस्तकाच्या काळात सर्व प्रवास पायी वा घोडा, पालखी असा होत असे आणि ह्या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागातील महत्त्वाच्या स्थळांमध्ये एका जागेहून दुसर्‍या जागी जातांना वाटेत कोणती गावे, नद्या, घाट इ. लागतात, त्यांची अंतरे किती अशा प्रकारची माहिती दिली आहे. (अशा पुस्तकांना Vade Mecum असे लॅटिन नाव आहे.) त्यांपैकी मार्ग क्र. ५५ (रोमन आकडयात LV) आणि ५६ (LVI) हे अनुक्रमे From DHOOLIA by Mehoonbarra and Gowtulla Ghat to AURAGABAD आणि From DHOOLIA to AURANGABAD, via Mehoonbarra and Untoor असे दोन मार्ग आहेत, ज्यांमध्ये Gowtulla Ghat (म्हणजे गौताला घाट) ह्याचा उल्लेख आहे. मार्ग क्र. ५५ वर जी अनेक स्थाने दाखविली आहेत त्यांपैकी गिरणेच्या उत्तरकाठावरचे मेहुणबारे २०.५६९० उ. ७४.९४४८ पू. (Mehunbarra), हिवरखेडा २०.२९२४ उ. ७५.१३४० पू. (Hewurkherah) आणि हिवरखेडयाच्या लगेच दक्षिणेस असलेले कन्नड गाव मी wikimapia.org येथे पाहू शकलो. मेहुणबारे आणि हिवरखेडा ह्यांच्यामध्ये गौताळा घाट आहे असा उल्लेख आहे आणि तो घाट गाडयांना अशक्य आणि उंटांना अवघड असल्याचे वर्णिले आहे. ह्याचा अर्थ असा की क्लून्सच्या वेळी उत्तरेकडून औरंगाबादकडे येण्याचा एक मार्ग गौताळा घाटातून वर येत होता पण तो अवघड होता.

गौताळा घाटाविषयी अजून काही माहिती Historical and descriptive sketch of His Highness the Nizam's ...: Volume 1 ह्या पुस्तकात पान ३८४ वर अशा शब्दात उपलब्ध आहे:
"The Ghats between His Highness's territory and the British Province of Khandesh are pierced with numerous passes, all of which are more or less used as trade routes. The principle are the Ajanta Pass already mentioned, the Gaotala or Amba Ghat above Kanad, a very old trade route; at the foot of the ghat are the ruins of the ancient city of Patna. The road over this ghat was once so good that it was practicable for carts. It was reconstructed by the Emperor Aurangzeb during his Deccan campaign and was subsequently repaired by Outram when he was Bhil Agent."
ह्या वर्णनात स्पष्ट पाटणचा उल्लेख गौताळा घाटाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन शहर असा केला आहे. औरंगजेबाच्या काळापर्यंत तो घाट वापरात होता हेहि कळते. क्लून्सच्या वेळी मात्र तो खराब झालेला होता.

ह्या घाटाला पुन: चांगले दिवस आलेले दिसतात ते ऊट्रम नावाचा ब्रिटिश अधिकारी ’भिल्ल एजंट’ म्हणून कन्नड गावात नेमला गेला तेव्हा. अजिंठयाच्या आसपासचा सर्व भाग भिल्लांच्या टोळ्यांनी व्यापलेला होता आणि हे भिल्ल ब्रिटिश आणि निझाम दोघांचीहि डोकेदुखी होते. आजहि अजिंठयाच्या आसपासच्या बर्‍याच छोटया गावांना ’तांडा’ असे उपपद आहे हे ह्या भिल्ल दिवसांचीच आठवण देतात. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कन्नड गावात ’भिल्ल एजन्सी’ स्थापन करून एक ब्रिटिश अधिकारी भिल्ल एजंट म्हणून ठेवला गेला होता आणि त्याच्या हाताखाली काही सैनिक भिल्लांच्या बंदोबस्तासाठी दिले होते. असा एक अधिकारी ऊट्रम ह्याने ह्या घाटाची दुरुस्ती करून घेतली होती असा उल्लेख मिळतो. (ह्या घटना १८३०-४० च्या सुमाराच्या आहेत. एजन्सी १८४०त बंद करण्यात आली.) एजन्सीच्या माहितीसाठी पहा The castes and tribes of H.E.H. the Nizam's dominions: Volume 1 पान ६९.

आतापर्यंत चर्चिलेला गौताळा घाट म्हणजे आजच्या दिवसातला औरंगाबाद-चाळिसगाव ह्यांना जोडणारा आणि मोटरवाहतूक करणारा तथाकथित कन्नड-घाट नव्हे. मी ह्याच घाटाने खाली उतरलो होतो असे वर लिहिले आहे. उपरिनिर्दिष्ट ऊट्रमच्या नावावरून ह्या घाटाला ’ऊट्रम घाट’ असे नाव होते. हा नवा गाडीरस्ता १८७० साली तयार करण्यात आला. (पहा: ’The Outram Ghat, 10 miles north of Kanhar, was provided in 1870 with a complete cart road.' Maharashtra State gazetteers, Volume 4 p. 580. 'Outram Ghat' असा शोध घेतल्यास snippet view मध्ये हे पान दिसते.

ह्या सर्व विवेचनाचा इत्यर्थ असा की भास्कराचार्यांचे ’विज्जडविड’ गाव कोणते असा प्रश्न पडल्यावर साहजिकच बीड सर्वांच्या पुढे येते, काहींना सांगोवांगीवरून विजापूर आणि बुलढाणाहि सुचतात पण सर्वात चांगला दावा असलेले आणि आज सांदीकोपर्‍यात पडलेले पाटण खेडे मात्र कोणालाच सुचत नाही. आता मला दिसते की ते एकेकाळी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले गाव होते आणि ते प्राचीन नगर आहे ही स्मृतीहि १९व्या शतकापर्यंत कोठेकोठे जागी होती. म्हणून मला असे वाटते की हे गाव मूळचे ’विज्जलविडपत्तन’ असे असून कालौघात ’विज्जलविड’ गळून पडून त्याचे साधे पाटण झाले असावे आणि भास्कराचार्यांचे वस्तीचे गाव तेच असावे.

भास्कराचार्य हे महाराष्ट्रीय आणि मराठी बोलणारे होते हे ओघानेच आले.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (6 votes)

लेख आधीही वाचला होता. जितक्या वेळेस वाचला तितक्या वेळेस आवडला हेवेसांनल. Smile

एक वाइल्ड शंका: भास्कराचार्यांचे नातू अन १४०० वर्षवाले हे दोन्ही चांगदेव एकच की वेगळे याबद्दल काही अनुमान करण्यास कितपत प्रमाणे उपलब्ध आहेत? हा लेख पाहिल्यावर मी पहिल्यांदा तसेच कल्पिले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीपूर्ण लेख. यापूर्वीही 'उपक्रम'वर वाचला होता. असे आणखी लेख वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपक्रमावर वाचला होताच. आता अधिकच्या माहितीने अधिक बांधीव झाला आहे.
बाकी भर घालायची किंवा खंडन करायची कुवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधीचा लेख आणि प्रतिसादही वाचले होते. भास्कराचार्यांसंदर्भात असणार्‍या दंतकथा ऐकण्यावाचण्यापेक्षा हे लिखाण अधिक आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रस्तुत लेखकाने इतरही इतिहास संशोधकांशी याबाबत चर्चा केली आहे काय?
या संशोधनाला तज्ञांची सहमती मिळून हा अधिकृत इतिहास म्हणून मान्यता पावेल अशी आशा बाळगतो.

***
एक अवांतर नोंद : देवगिरीचा राजा सिंघण यादव याने शिलाहारांवर स्वारी करून कोल्हापुर खालसा केले होते. शिलाहार-भोजराजा दुसरा याला प्रणालका (पन्हाळा) किल्ल्यावर अटकेत ठेवले होते. त्या सिंघणाचा शिलालेख खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात पहायला मिळतो. त्यातही अशाच प्रकारच्या दानधर्माचा उल्लेख आहे. शके ११३६/सन १२१३(-वि.वि. मिराशी , शिलाहार काळातले शिलालेख - भारतीय पुरालेखांचा संग्रह भाग ६)
(माझ्याकडील एका लहानशा छापील पुस्तिकेत या शिलालेखाचे वाचन आहे.)

एक अतिअवांतर नोंद : कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या ठिकाणी पिकणार्‍या तांदळाच्या जातीला 'जिरगा' (जिरेसाळ - मऊ भात) असे नाव आहे. ते तसे का असावे असा प्रश्न पडला होता. तर - आजर्‍याचेच ऐतिहासिक मूळ नाव अजिरगे (किंवा अजिरगा) असे सापडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसळपाववर जयंत कुलकर्णी यांनी खिद्रापूरच्या देवळावर एक लेखमाला लिहिली आहे तिच्या पहिल्या भागात या शिलालेखाचे वाचन पाहता येईल.

http://www.misalpav.com/node/24553

अवांतरः त्या शिलालेखात मिरजेचा "मिरिंजदेश" म्हणून उल्लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुव्याबद्दल आभार. हाच तो शिलालेख : कुडलदामवाड = आजचे कुरुंदवाड , कुडलकृष्णावेणी नदी = आजची कृष्णा, भेणसी नदी = आजची पंचगंगा, कुवेणी नदी = आजची दूधगंगा इ.इ.
(पुन्हा अवांतर : कोल्हापुरचे महालक्ष्मीचे देऊळ हे शिलाहार काळातच बांधले गेले असावे कारण त्याचे व खिद्रापुरच्या कोपेश्वर देवळाचे शिल्पसौंदर्य(आणि विशेषतः छपराची रचना) हे अगदीच सारखे आहे हे पाहिलेले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर इ.स. १००० पेक्षाही जुने असावे. इ.स. ६२४ साली ते तत्कालीन चालुक्य सुभेदार कर्णदेव याने बांधले असे कालनिर्णय कॅलेंडरच्या मागच्या बाजूस माहिती असते त्यात वाचलेले आहे. इतके जुने समजा नसले बरेच जुने असावे. शिल्परचनाही सारखी आहेच.

बाकी, जिरेसाळ नावाची व्युत्पत्ती नव्याने कळाली, धन्यवाद. घरी हा शब्द नेहमी कानावर पडायचा परंतु व्युत्पत्ती आजच कळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@ विसुनाना.

होय, काही दिवसांपूर्वी ह्याच लिखाणाचा सारांश मी Mathematics in India ह्या पुस्तकाच्या लेखिका Kim Plofker ह्यांना ई-मेलने कळविला होता. माझा तर्क योग्य दिसतो असे त्यांचे मत त्यांनी मला कळविले आहे आणि अशीहि सूचना केली आहे की मी हा मजकूर लेखाच्या स्वरूपात Ganita Bharati अथवा the Indian Journal of History of Science अशा एखाद्या नियतकालिकाकडे पाठवावा, जेणेकरून तो तेथे प्रसिद्ध झाल्यास त्यांना ही माहिती त्यांच्या लिखाणात अंतर्भूत करता येईल.

हे काम मी लवकरच करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका महत्त्वाच्या इतिहास-संशोधनास हात घालून ते पूर्णत्त्वाला नेल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी या 'काळा जिरगा' शब्दाशी परिचित आहे पण त्याचा उगम अजिरगेशी असावा हे माहिती नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे ह्या काळ्या भाताला 'जिरेसाळ', असे जिरयासारख्या बारीक दाण्याचा तांदूळ असे नाव आहे असे वाटत होते. बांगला देशात / बंगालात 'कालोजिरो' नावाचा जो तांदूळ मिळतो तो हुबेहूब 'जिरग्यासारखा दिसतो आणि चव, गंधही त्याच सारखा असतो त्यावरून व काळा जिरगाशी त्याच्या असलेल्या साधर्म्यवरून मी हे अनुमान बांधले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा.वि. मिराशीलिखित 'शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख' ह्या पुस्तकात महालक्ष्मी, खिद्रापूर अशा देवळांबद्दल आणि शिलाहारांच्या कोरीव लेखांबद्दल माहिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटण (पत्तन) नावाचे महत्त्व काय आहे? (मौर्यांच्या राजधानीचे नाव म्हणून की अजून काही?)

भास्कराचार्यांनी लिहलेल्या ग्रंथांबद्दल काही माहिती या शिलालेखांत आहे का? (सिद्धान्ताचे ग्रथन केले हे वाक्य वाचले, पण ग्रंथामधील मजकूराबद्दल काही माहिती आहे का?) उपक्रमावरील लेख/चर्चा अजून वाचली नाही, तिथे हे प्रश्न अगोदर चर्चिले गेले आहेत का ते माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पुर, गाव, शहर, ह्या सामान्यनामांप्रमाणेच पत्तन हेहि सामान्यनाम आहे आणि त्यांच्यासारखाच तोहि नगरदर्शक शब्द गावाच्या नावाला चिकटतो जसे की नागपूर, खामगाव, बुलंदशहर, मच्छलीपट्टण. कालान्तराने एखाद्या नावातील मूळ गळून पडून नुसते पत्तन - पाटण इतकेच उरते. जगन्नाथपुरीमधील 'जगन्नाथ' गळून आज आपण त्या गावास नुसतेच 'पुरी' म्हणू लागतो तसेच.

शिलालेखांमधून फार विस्तृत माहिती अपेक्षित नसतेच. चंगदेवाच्या शिलालेखात भास्कराचार्यांच्या ग्रंथांबद्दल जी त्रोटक माहिती आहे ती वर दाखविल्याप्रमाणे ह्या शब्दांत आहे:
....
श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३.
भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः।
तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४.

(सारांशाने अर्थ - चंगदेव भास्करप्रणीत शास्त्राच्या प्रसारासाठी हा मठ चालवीत आहे. ह्यामध्ये भास्करविरचित सिद्धान्तशिरोमणि आणि अन्य ग्रंथ, तसेच त्यांच्या वंशातील अन्य व्यक्तींनी रचलेल्या ग्रंथांवर नियमितरूपाने निरूपण केले जाईल.)

ह्यावरून असे दिसते की भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणि ह्याशिवाय अन्यहि ग्रंथ रचले असावेत. मात्र अशा कोठल्याच अन्य ग्रंथाचे नाव नंतरच्या काळात कोठेच उल्लेखिलेले दिसत नाही. अशीहि शक्यता आहे की सिद्धान्तशिरोमणि ह्या ग्रंथाचे लीलावती (अंकगणित). बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय (हे दोन खगोलगणितावर) असे जे चार भाग आहेत तेच येथे संदर्भात आहेत. भास्कराचार्यांच्या वंशातील अन्य कोण काही ग्रंथरचना केली असल्यास ती कालौघात विस्मृत झाली असावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण आणि रोचक आहे.शाळेतली दोन वर्ष चाळीसगावमध्ये राहिल्यामुळे एकदम कन्नड घाट, पाटण वगैरें शब्दांनी आठवणी जाग्या केल्या. पाटणचे फक्त नाव ऐकलेले आठवते...त्याबद्द्ल ही सगळी नवीनच माहिती मिळाली. भास्कराचार्यांचे कधीकाळी वास्तव्य होते त्याच्या खूपच जवळ आपण राहिलो (अज्ञानात का असेना) यानी (उगाचच) सुखावल्यासारखं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचा आशय आणि मांडणी अप्रतिम!! फक्त राहून राहून एक गोष्ट कालपासून त्रास देत्येय. लिहू की नको असा प्रश्न पडत होता पण एकदाचं लिहून टाकतोच.:

विज्जलवीड हे गाव पाटण आहे असे म्हणायला आपण दिलेली भौगोलिक करणे पटणारी आहेत. पण विज्जलवीड या गावापुढे 'पत्तन' हे उपपद लावलेले काहीसे पटले नाही. असे 'पत्तन' उपपद लावून आलेला उल्लेख अन्यत्र कुठे येत नाही, असे दिसतेय. तो तसा मिळाला तर या सिद्धांताला अर्थातच पुष्टी मिळेल. पण 'पाटण' हे आपण सांगितलेल्या पद्धतीने अपभ्रष्ट होत तयार झाले असेल तर सर्वसामान्यपणे गावाचा उल्लेख विज्जलवीडपत्तन असा प्रचारात असायला हवा असं वाटतं. गावांच्या अपभ्रष्ट नावांकडे व त्या नोमेन्क्लेचरकडे पाहता संगमनगर: संगमनेर, अमलनगर: अंमळनेर, लवपूर: लवऊर-लवौर-लहौर, इंद्रपूर: इन्दौर अशा नावांकडे पाहता ती ती सफिक्सेस त्या नावांच्या उच्चारण/उल्लेख होताना वापरली जात असल्याचे दिसते. प्रभासपट्टण:प्रभासपाटण या महाभारतात उल्लेख आलेल्या शहराचा उल्लेख इथे अधिक सयुक्तिक होईल. तसा विज्जलवीडपत्तन असा उल्लेख ठळकपणे कुणी केलेला दिसत नाही. इतर पुरावे त्यामानाने बळकट असले तरीही हे वैशिष्ट्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे हा मुद्दा इथे विचारात घ्यायला हवा अस वाटत.

बिदरचा उल्लेख: वैदूरानगरी किंवा विद्यानगरी असा होत असल्याचे दिसते. या शहराचा विज्जलवीड असा उल्लेख कुठे जुन्या इतिहासात वाचण्यात आला नाही. विजापूरचेही नामोल्लेख असे इतिहासात दिसत नहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

अवांतर...

<संगमनगर: संगमनेर, अमलनगर: अंमळनेर>

मला वाटते की संगमनगर पासून संगमनेर, अमलनगर पासून अंमळनेर अशा व्युत्पत्ति नसून सह्याद्रीच्या पूर्व उतारावर १२ नेरे आणि १२ मावळे आहेत अशी २४ खोरी आहेत ही कल्पना आहे. हे मी कोठेतरी वाचले होते पण कोठे ते आठवत नाही. दाते-कर्वे शब्दकोशात पुढील यादी मात्र मिळाली:

जुन्नर ते चाकण पर्यंत १२ नेरे - १ शिवनेरी, २ जुन्नर, ३ भिमनेर, ४ घोडनेर, ५ भिननेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळ नेर आणि पुण्यापासून शिरवळपर्यंत १२ मावळे :- १ अंदर मावळ, २ नाणे मावळ, ३ पवन मावळ, ४ घोटण मावळ, ५ पौड मावळ, ६ मोसे मावळ, ७ मुठे मावळ, ८ गुंजण मावळ, ९ वेळवंड मावळ, १० भोर खोरे, ११ शिवथर खोरे, १२ हिरडस मावळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह..येस! संगमनेरचा तसा उल्लेख अनवधानाने झाला. अमळनेरच्या व्युत्पत्तीबद्दल एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

माहितीने खच्चून भरलेला सुंदर लेख.
असाच एक लेख चंद्रशेखर ह्यांनी उपक्रमावर लिहिला होता, बनवासी गावाबद्दल, की अजिंठा की अजून काही ते आता नक्की आथवत नाहिये.
बीड आणि भास्कराचार्यः-
खरे खोटे माहित नाही पण आजही बीदमध्ये एक वाडा दाखवतात भास्कराचार्यांचा वाडा म्हणून. माझ्या चुअल्त्यांचे दीड दशक पूर्वीपर्यंत वास्तव्य तिथेच होते.
त्या काळापासून तो ह्यांच्याकडे कसा काय हस्तांतरित झाला ठाउक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गोलाध्याय वगैरे ग्र्म्थ संस्कृतमध्ये आहेत.
वरील राजाज्ञा/शिलालेख ह्या प्राक्रुत मराठीत दिसतात.
बोलायची भाषाही मराठीच. मग संस्कृतमध्ये लिहिण्याचा उद्देश काय? उगीच स्वतःचा ऑडियन्स कमी का करुन घ्यायचा?
कोणती भाषा कोणत्या उद्देशासाथी वापरायची हे कधी अणि कसे ठरले असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्हर्नाक्युलरायझेशन नामक प्रकार झाला तेव्हापासून साहित्यातही संस्कृतादि भाषा सोडून देशभाषा वापरणे सुरू झाले. त्याच्या आधी काही देवाधर्माचं, साहित्याचं इ. असेल तर संस्कृत आणि व्यवहाराचं असेल तर प्राकृत हाच फॉर्म्युला रूढ होता. हा फॉर्म्युला लै प्राचीन आहे. संस्कृत वापरली ती ग्लोबल सर्कलसाठी अन मराठी वापरली ती रोजच्या व्यवहारासाठी.

कुठली भाषा कशासाठी वापरायची हे त्या त्या वेळच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीनुसार ठरते. संस्कृत भाषा रोजच्या व्यवहारात आणण्याचे श्रेय गुजरातेतल्या शक क्षत्रप राजांना दिले जाते. ते भारतात उपरे होते, आणि त्यांना त्याची जाणीव होती. भारताच्या सांस्कृतिक समीकरणात आपले स्थान बळकट करायचे, काही वेगळेपण दाखवायचे तर असे करणे अवश्यमेव होते. रुद्रदामन नामक राजाने गिरनार पर्वताजवळच्या तळ्याची दुरुस्ती केल्याचा शिलालेख इ.स. १५० साली खोदवला तो संस्कृतमधला पहिला मोठा शिलालेख मानला जातो. त्याने काहीएक विचार करूनच ते सुरू केलं होतं.

तीच गोष्ट जैन-बौद्धांची. सुरुवातीला प्राकृतवरच फोकस असलेल्या, ईव्हन अँटी-संस्कृत असलेल्या या धर्मात पुढे ब्राह्मणांचा मोठ्या संख्येने शिरकाव झाल्यावर आपसूकच फोकस संस्कृतवर गेला. नुस्ती संख्या वाढली हे कारण पुरेसे वाटत नै. यूपी-बिहार सोडून उर्वरित भारतात पसरायचे तर ग्लोबल आड्यन्सचीच भाषा बोलली पाहिजे म्हणून त्यांनी संस्कृतचा स्वीकार केला.

त्यामुळे शिलालेख संस्कृतात अन व्यावहारिक भाग मराठीत का या प्रश्नाचे उत्तर असे की शिलालेख हा भाग ग्लोबल ब्राह्मणी नेटवर्कसाठी होता अन व्यावहारिक भाग लोकल आड्यन्ससाठी. जसे नेटवर्क तशी भाषा.

व्हर्नाक्युलरायझेशन मध्ये प्रादेशिक सत्तांचा उदय हेही एक महत्त्वाचे कारण सांगितले जाते. एक सांस्कृतिक डिप्लोमसीचा भाग म्हणून या प्रादेशिक सत्तांनी देशभाषांतील वाङ्मयाला उत्तेजन देणे सुरू केले, परिणामी देशभाषांतील साहित्याला प्रतिष्ठा मिळाली इ.इ. मग साहित्याच्या प्रांतातले संस्कृतचे महत्त्व हळू हळू कमी होत गेले-यद्यपि पॅन इंडियन ब्राह्मणी नेटवर्कमध्ये प्रतिष्ठा टिकून असल्याने अनेक साहित्यिक पैदाही झाले. मग शेवटीशेवटी संस्कृतमध्ये निव्वळ शास्त्रीय ग्रंथ लिहिणेच उरले. कदाचित शास्त्रग्रंथही देशभाषांत लिहिणे सुरू झाले असते पण तोपर्यंत इंग्रज आले आणि सगळे चित्र बदलले. हा प्रवास लॅटिनच्या प्रवासाशी साधर्म्य दाखवणारा आहे.

वरील बहुतेक विवेचन या पुस्तकातून घेतले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं