झाकली मूठ..

मूठ. लॅपटॉपच्या टेबलावर दणक्यात आपटलेली मूठ. जगात सार्‍या चळवळी अशा मुठितुन प्रगटल्यात हा आपला आजचा भलताच कडक विचार. आणि आजकाल आपण भारीच क्रांतिकारक वगैरे झालो आहोत. देशाबाहेर पडेपर्येन्त आपण कधीही समाज बदलण्याचा प्रयत्न, सामाजिक अन्यायाला वाचा वगैरे फोडण्याचा प्रयत्न, आंदोलनात भाग घेऊन, हिरीरीने वगैरे कधीच केला नाही. आपले जीवन हेच काय ते सुधारता येते असे म्हणून गप्प बसलो. शेतकर्याचे प्रश्न 'आज ८.३४ ची लोकल हुकणार बहुतेक' या धाकधुकीत नेहमी हरवत. शनिवारी रात्री ओवरटाइम करताना दीन दुबळ्यान्च्या सामाजिक उद्धाराचा गजर रात्री-बेरात्रिही कधी झाला नाही. स्वार्थीच जीणे जगलो. मग आज आपण या सगळ्याच त्रागा का करून घेतो? इतका तावातावाने का बोलतो/लिहितो? जाणिवा काय तेव्हा नव्हत्या? जेव्हा आपल्या समाजाची आई-बहीण गावागावातून नागवली जात होती तेव्हा आपण तर रुपया आणि युरोचे दर मोजण्यात गुंग होतो. जेव्हा हत्याकाण्डे करणारे ठीकठिकाणी एकावर एक प्रेते रचत होते तेव्हा आपण प्रेसेन्टेशन उद्या सकाळीच हवे या बॉसच्या आदेशामुळे कुर्निसात करून मान मोडत ओफीसात बसलो होतो. हा नुसता पोकळ अभिनिवेष आहे? की क्षितिज विस्तारून आलेले नवे शहाणपण? कोणत्या हक्काने आपण आज समाजाला शिव्या देतो? काही हजार किमीवरुन सामाजिक क्रांतीची भाषा करतो? इथे राहून, देव आहे की नाही? यावर वर्षा दोन वर्षात एकदाही देऊळ न पाहिलेला मी, जमलेल्या मंडळीत उत्तम संवाद साधतो. मी कसा सुधारलो आहे या आणि अशा वल्गना मी का करू धजतो? आपल्या देशात समाजाने कसे गुन्हे करून ठेवले आहेत, सामाजिक विकृतीवर कसा जालीम उपाय केला पाहिजे असले सगळे बोलत असताना इथले गोरे आपल्याला काळाच ठरवतात हे मुकाट्यान सहन करतो. त्यांनी केलेला अपमान त्यांच्या आवडत्या पेयात भिजवून आवडीने चघळत राहतो. लहानश्या घरात अत्यंत माफक स्वतंत्रपणे राहतो. आईच्या हातच किंवा घरच मिळत नाही ते दु:ख 'स्वत: कसा जाम मस्त स्वैपाक करू शकतो' याची महती गोर्या मित्रमंडळीत सांगत पास्ता आणि वाइनमधे आवन्ढा गिळुन बरोबर रिचवतो. रामाला उगाच महत्त्व देऊन ठेवलय, कोण कुठला राजा होता कधी काळी देव जाणे, अशी आणि अनेक मते गप्पांत गाजवणारा मी दिवाली सेलिब्रेशन करायला इंडियन मिळतात का ते शोधत हिन्डतो. धर्म वगैरे बकवास म्हणत खास नाताळची खास खरेदी मात्र न चुकता करतो आणि सगळ्या कलीग्सना मनापासून मेरी क्रिस्मस करतोच करतो. व्हिसाच्या इण्टर्व्हुत मात्र "हे एवढे झाले की फ्यामिली टाईस मुळे मी कसा भारतात परत जाणार" हे "पुढले कोन्ट्रेक्ट आजच एकस्टेंड करावे" हा विचार मनात घोळवत बिनदिक्कत सांगतो. योनिशुचिता कशी झूट आहे हे आपल्या गर्ल्फ्रेन्डच्या आधीच्या बॉयफ्रेंडसची संख्या आपल्या आधीच्या गर्लफ्रेण्ड्सच्या संख्येने मनातल्या मनात भागत् हिरीरीने मांडतो. त्यात वर हल्ली फेस्बुकने फुकट "मतनोंदणी आणि सल्ला शिबीर" सुरू केल्याप्रमाणे तिथे आपले अमूल्य विचार कोणी न विचारता पाजळतो, लाइकने सुखावतो, गटबाजी करतो, आणि छापील आवाज तेवढे घुमवतो. दोन वेळा इंडियन, एकदा थाय, दोनदा मेक्सिकन फूड खाऊन आणि शनिवार रात्र पब मधे गाजवून रविवारी जेवणानन्तर सामाजिक उत्कर्ष महाजाळातून करण्याकरता मी भयंकर उत्सुक असतो. महिन्याचे वेजेस नीट इनवेस्ट करून मग फावल्या वेळात साम्यवाद कसा सोइचा होईल, जीणे कसले बुर्झ्वा झालेय इत्यादी मौलिक विचार प्रसवत राहतो. यात पुढ्च्या महिन्यात इंडियातून येणार्‍या मित्राकडून मसाले आणण्याबद्दल ई मेल न विसरता लिहितो. तिकडल्या महागाईवर कडाडुन छापत असता इथे मुकाट्यान काल दहा सेंट कमी असणार दूध आज जास्त पैसे देऊन सूपर मार्केटहून आपण स्वत: वाहून आणतो. घरी वाण्याच्या इथे सामान आणणारा दहा वर्षाचा पोरगा आपल्याला कधी खटकला होता का? इथे आपली आपण इस्तरी मारुन घेत असता घरचा इस्त्रीवाला भैया मात्र न चुकता आठवतो. मराठीसम्राट अमराठी म्हणून त्याला चोपत असता एक वेळ आपण स्वत: घरी इस्तरी मारली होती खरी, मग पुढच्या आठवड्यात परत बोचके घेऊन त्याच्याच दुकानात आपण 'सब साले भेन्चोद' या विषयावर राष्ट्रभाषेत सार्वजनिक सुसंवाद केला होता तेही आठवत. आणि आज पुन्हा 'बाळासाहेबांच्या निधनानंतर तरी मराठी माणूस कसा एक झालाच पाहिजे आणि ही सगळी नॉन-मराठी थेरे कशी बंद करून टाकली पाहिजेत' हे आपण उफाळुन येऊन सांगतो आणि पुन्हा आपल्या इथल्या तमिळ मित्राशी "श्रीलंका इस नाट कॅरेक्ट" कसे यावर त्याचा वडा आपण बनवलेल्या सांबारात बुडवून खाता खाता सुसंवाद साधतो. एकदा देशाच्या, तिथल्या व्यवस्थेच्या बाहेर पडल्यावर आपले कष्टकरी पांढरपेशे जीवन आपण अधिक पैशासाठी आणि निरन्कुश राहणीसाठी भोसडवुन बसलो आहोत हे मनाशी पक्के ठाऊक असले तरी अण्णा आंदोलन करतात त्यांना इथून पाठिंबा द्यायला आपण मोर्चा पण नेला होता सिटी सेंटर मधे. काही लोक अत्यंत उत्सुकतेने काळी पोरे काम्धंदा सोडून का उभी राहिली बोर्ड हातात घेऊन असे म्हणून पाहु लागलेली. पण एक-दहा मिनिटात आपला मोर्चा पांगला आणि तासभरात उत्साह पण. कॉफी हाउस मधे करप्शन वर गप्पा मात्र बर्‍या रंगल्या. गोर्या वेटर ला टीप टाकायचा उत्साह भारी असतोच की. म्हातारपणापर्येन्त ज्या आई बापाने आपल्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या त्यांना टुरिस्ट व्हिसावर युरोप हिन्डवुन आपण पुन्हा पाणी टंचाईने त्रस्त गावाला पाठवणी नुकतीच केली आहे. तिथे बाबा नक्कीच उन्हाळ्यात ४० डिग्रीच्या कोरड्या हवेत आपला फॉरेनचा स्वेटर घालून बसणार नाहीत कारण तिथे ११ तास लोडशेडिन्ग असल्याने ए सी चालत नाही. आईने आपण दिलेला फुड प्रोसेसर त्यामुळे कधी खोक्यातून काढलाच नाहीए. पण एकदा पालकांच ऋण व्याजासकट कुरियर केल्यावर आपण काही ते परत जाउन पाहिलेल नाही. या विरोधाभासात जगण्याला काहीही अर्थ नाही. उद्या इथे लाथ बसली तर मायभूमीच गाठावी लागणार आहे, तिथल्या 'अविकसित' समाजात आपले नाक तेवढे वर ठेऊन इथे गोरयांच्या गुलामीत कमावलेली पुंजी सोडून बिसलरि पीत राहावे लागणार आहे. तेव्हा देखील ए सी मधे बसून सिगार चे झुरके घेत टर्न ओव्हर कसा वाढवू आणि कमिशन कसे काढू हीच अंतिम चिंता राहणार आहे. पिचलेल्या कामगार वर्गाचे कल्याण करण्यापेक्षा 'कल्याण'मधे एक फ्लॅट इनवेस्टमेंट म्हणून घ्यावा का हेच पाहणार आहे. मुले इकडे झाली तर त्यांच्या संस्कारांचे आणि पालनाचे काय? हा प्रश्न मुंबईत दररोज किती बलात्कार झाले? आणि बेस्टची भाडेवाढ दरमहा का होते यापेक्षा नक्कीच महत्त्वाचे. मी माझ्या मुलांना आजी आजोबा दाखवले नाहीत, कारण "ते फारच यु नो रिलिजेअस आहेत, अशाने मूल रिलिजन सेंट्रिक होऊ शकते ना." हा भविष्यकाळ सुद्धा काही फार दूर नाही.एकूणच ग्लोबलायझेशनमुळे हलक्या झालेल्या डोक्याबरोबर हातात छपाई आणि प्रसाराचे यंत्र येऊन पडले आहे आणि सामाजिक दबावाच्या बाहेर सुरक्षित राहून आयती कॉलर ताठ तेवढी झाली आहे. खरच, इथे खोक्यावर बसून जाम जोरदार छापण्यात आपण काय साधतोय? कधीही न दाखवलेल्या सुधारकपणाला उत्तेजन देऊन मनाची समजूत पटवून देतोय का? की आपण काहीच न केल्याची आणि न करू शकत असल्याची खंत आतून आपल्या अपराधी मनाला डीनेयल मधे नेतेय? की इथल्या थंड हवेत सुखी पुष्ट अळिप्रमाणे वाढत असलेल्या आपल्या शरीराला मानसिक बूस्ट देतोय या सगळ्यातून? दोन घटका मनोरंजन करून पुन्हा जागतिक पातळीवरली बौद्धिक कामगाराची आपली जागा आपण भरून पावणार आहोत आणि उद्याच्या सुरक्षित साचेबंद आयुष्यात फ्री टाइम मधे नवी क्रांती छापणार आहोत. या माल्टि नेशनल कंपनीत या पोजिशनच्या वर फक्त गोरेच असतात हे मत आपण या कानातुन त्या कानाबाहेर कधीच सोडून दिले आहे. कारण कितीही मार्क्सच्या गप्पा मारल्या तरी आपला सिगार एस्टीबलिशमेंटचाच धूर काढणार आहे, आणि दूरवरच्या मायभूमीत त्याच्याच रक्ताच्या चिखलात मेलेला शेतकरी हा आपल्या कॉफी पॉज मधे एका इंट्रेस्टिंग पोस्टचा रिफ्रेशिंग विषय याउप्पर काहीही असणार नाहीए. ही आपली उगाच उगारलेली मूठ आहे. झाकली मूठ. काही यूरोची.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम लेख. स्वतःचं कल्याण यापुढे आपण पाहू शकत नाही हेच खरं आहे. का कोण जाणे पण मला परदेशी नोकरी करणे हा प्रकार थोडा demeaning आणि unsafe पण वाटतो. जगाच्या रितीकडे पाहता माझी भिती अस्थायी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

का कोण जाणे पण मला परदेशी नोकरी करणे हा प्रकार थोडा demeaning आणि unsafe पण वाटतो.

ज्याचे त्याचे मत म्हणून पाहिलं तरी परदेशी नोकरी करणे हे डिमीनिंग का बरे वाटावे? अनसेफ इ. वाटणे एकवेळ समजू शकतो-मग तसे वाटणे वास्तवाला धरून असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला नोकरी करणे हाच प्रकार डीमीनिंग वाटतो. भेंडी आपल्या सारख्या क्वालिफाईड माणसाला घरबसल्या काही न करता पैसा मिळाला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां हे बाकी खरंय. पूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपलीपण सहमती नोंदवून घ्या भो.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. आपण ज्या देशात गेलो आहोत त्यातल्या तिथल्या लोकांचे हक्क आणि आपले हक्क यात आपले हक्क दुय्यम नागरिक आहोत म्हणून कमी असणे.
२. समजा मी भारतात स्वतः कपडे धूत नाही आणि तिथे जास्त कमावूनही मला धुवावे लागतात तर ते मी एक प्रकारचे कमीपण येणे समजतो. 'स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागणे कमीपणा आहे' या मानसिकतेचा मी आहे. म्हणजे जितकी भारतात स्वस्तातली कामं मी इतरांना लावू शकतो ती मला परदेशात स्वतः करावी लागतात याला मला कमीपणा मानावेसे वाटते.
३. अधिकाधिक भारतीय NRI २-२ वर्षांनी इकडे (भारतात) येतात. साधारणतः असा समज आहे कि जास्त चांगल्या आर्थिक उत्पन्नासाठी लोक तिथे गेलेले असतात. मग ते जास्तीत जास्त बाबतीत compromise करताना का आढळतात? दिल्लीत प्रशस्त ४ bhk घरात राहणारा माझा मित्र दुबईत जाउन १ bhk घरात राहतो.
४. मी युएस, युरोपमधे कधी गेलो नाही. पण तेथल्या बर्‍याच लोकांची इथे interaction झाली आहे. ३०% लोक मला आवडले नाहित. समोरच्याला त्याच्या 'कमीपणाची' जाणिव subtly करून देणे, ऊघड करून देणे यांत त्यांचा हात धरू शकणार नाही. उदा. एका ब्रिटिश ऑफिसरने गाडी थांबवून थांबवून दिल्लीतल्या भिकार्‍यांचे (फक्त) फोटो काढले, माझ्यासमोर, आणि मी त्याला मला हे आवडत नाहिय हे स्पष्ट सांगीतले तरी.
५. गावातून शहरात गेलेल्या लोकांना त्यांचा गावठीपणाचा tag, स्वतःच्या मनातून, इतरांच्या मनातून, झटकायला वेळ लागतो. अशा वेळी ते एका न्यूनगंडात राहतात. माझा स्वतःचा हा अनुभव आहे. 'अविकसित राष्ट्रातून आलेला' हा tag जायला किती वेळ जातो मला माहित नाही, पण एका विशिष्ट संवेदनांच्या लोकांना पूर्ण आयुष्य लागत असावे.
६ स्वतःच्या उत्कर्षासाठी कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय देखिल मला स्वार्थी आणि एका वेगळ्या अर्थाने कमीपणा आणणारा वाटतो.
७. प्रवेश/ विसा नविनीकरणाबद्दल देश्/अधिकारी कसे वागवतात. लोक हे व्यक्तिश: घेत नाहीत पण मला हे 'खेळवणे' आवडत नाही.
क्षमता/अक्षमता , नफा/तोटा, recognition, इ याबरोबरच मानसिकता देखिल परदेशी जायचं की नाही हे ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरते असं काहिसं मला म्हणायचं आहे. पण हळूहळू तिचं महत्त्व कमी होत चाललं आहे हेही खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद रोचक आहे. मला व्यक्तिशः असे अनुभव नाहीत, पण असे अनुभव येऊ शकतात याची जाणीव आहे. आणि तरीही देशांतर्गत साधर्म्य आठवलं.

१. शिवसेना आणि आता मनसे अमराठी लोकांना मुंबईत अशा प्रकारची वागणूक देते. हे तर कायद्यालाही अमान्य आहे.
(इथे एक प्रसंग सांगितल्याशिवाय रहावत नाही. युकेमधे तीन वर्ष होते तेव्हा स्थानिक निवडणूकांमधे मतदान करण्याचा हक्क होता. युरोपीय युनियनचे आणि कॉमनवेल्थ देशांचे नागरिक तिथे स्थानिक निवडणुकांमधे मतदान करू शकतात. मी विद्यापीठाच्या घरात रहायचे. तिथला एक चिनी विद्यार्थी वगळता बाकी सगळे मतदान करण्यासाठी लायक होते, कार्ड आलेली होती. पण दोन स्थानिक ब्रिटीश वगळता कोणीही मतदान करायला गेलं नाही. अन्यथा जागरूक नागरिक समजता येतील अशा दोन मित्रांना कारण विचारलं. त्यांचं मत, "स्थानिक राजकारणाबद्दल मला काही माहिती नाही. मत कोणाला द्यावं याचा निर्णय करता येणार नाही. म्हणून मतदान करणार नाही.")

२. परप्रांतातून आलेले कष्टकरी लोक घरी बहुदा त्यांच्या घरच्या स्त्रियांकडून ही स्वस्तातली कामं करवून घेत असतील; पण एकटे मुंबईत येतात तेव्हा हे स्वतःच करावं लागतं.
३. आपापल्या गावी ऐसपैस घरं असणारे लोक मुंबईत एकेका खोलीत ८-१० अशा प्रकारे रहातात. कोकणातून मुंबईत आलेल्या लोकांचे अनुभवही असेच असतील. अन्य महाराष्ट्रातून पुण्यात आलेले असेच.
.
.
६. देशांतर्गत स्थलांतर हा अस्मितेचा प्रश्नही बनवला गेलेला आहे.
७. उच्चशिक्षित, सुजाण, चांगले नागरिक असणार्‍या अमराठी लोकांना, ते फक्त मराठी नाहीत म्हणून पुण्यातल्या मराठी लो़कांनी वाईट दर्जाची वागणूक दिल्याचंही पाहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला सांगायचंय ते काय आहे त्याचे आणखी दोन मुद्दे:
अ. घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून दुसर्‍यांकडे राहावे लागणे आणि स्वतःच्या देशात संधी, इ नाहीत म्हणून परदेशात राहावे लागणे यात मला एक साधर्म्य जाणवते. पहिल्या केस मधे लाचारपणा जास्त आहे पण तसाच दुसर्‍या केसमधे कमी का होईना आहे. प्रत्येकाला असं जाणवलं नाही तरी काही जणांना हे तीव्रतेने जाणवते. हा भाव नोकरी देणाराच्या आणि घेणाराच्या back of the mind मधे असतो, असू शकतो.
ब. 'अमेरिकेत आम्हाला खूप नियम पाळून गाडी चालवावी लागते' अशीच मी वाक्यरचना ऐकली आहे, 'आम्ही अमेरिकेत रहदारीचे नियम उत्तम पणे पाळतो' अशी नसते.
देशांतर्गत स्थलांतर हा मुद्दा नाहीय. देशातल्या देशात आपण आपल्याला पाहिजे तेवढे नातेवाईक पाहिजे तिथे पाहिजे तितका काळ नेऊ शकतो तिथे state interference नाही. परदेशात जाऊन आपण 'जवळजवळ' नाती तोडतो असं मला वाटतं. प्रवासी भारतीयांच्या hectic भारतभेटी हा वेगळा मुद्दा असला तरी 'भारतात राहून नाती सांभाळणे ' आणि 'परदेशात राहून नाती सांभाळणे' यांची तुलना करणे, समान म्हणून, गैर होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लाचारपणा किती असतो, तर स्वतःला जाणवतो तेवढा!

भारतात असताना नातेवाईकांशी औपचारिक बोलणं तेवढं होत असे. बोलण्यासाठी समान विषयच नाहीत. "काल काय जेवलात" असो किंवा "तुमच्याकडे किती वाजले" यावर संबंध किती अर्थपूर्ण रहाणार? पण मित्रपरिवार बर्‍याच देशांमधे आहे, त्यामुळे परिवारासाठी एक देश निवडायचा झाला तर अडचण येईल.

व्यक्तीसापेक्ष अनुभवच सांगायचे तर माझा नवरा भारतीय दुकानात खरेदी करायला जायला तयार नसतो. ते सगळं खायला तर हवं असतं. पण तक्रार काय, "तिथे भारतीय भेटतील. मग त्यांचा गळेपडूपणा सुरू होईल. भारताबाहेर राहून कसलं भारतीयांना भेटायचं!" नोकरी बदलतानाही नव्या ठिकाणी कमी लोक चालतील, पण भारतीय नकोत असा त्याचा एक मुद्दा होता. गोकार्ट रेसिंग, वटवाघूळ महोत्सव अशा स्थानिक घटना बघायला आम्ही जातो. तिथे हमखास "इथे भारतीय चेहेरे दिसतील का? दिसले तर किती?" अशी आमच्यात पैज लागते.

माणूसघाण्या लोकांना उपरोल्लेखित अडचणी फार येत नसाव्यात, देसी लोकांचा त्रास होतो तेवढाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील नोंदी पाण्यात कधीही न उतरता "पोहणे म्हणजे फार कष्टाचे अन कंटाळवाणे काम आहे" अशा प्रकारच्या आहेत. बाकी चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बलात्कार अन्यायकारक असतो हे म्हणण्यासाठी स्त्रीच असावं लागतं अशा प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काय चांगलं किंवा वाईट हे प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर फार चांगलं कळतं हे मान्य पण अन्यथा ते कळत नाही हे गैर वाटतं. माझे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे जवळजवळ ७०% सहपाठी देशाबाहेर आहेत आणि १५ वर्षापासून मी त्यांच्या टच मधे आहे. त्यातले बरेच परतही आले, स्वतः होऊन (काहींना या परतीबद्दलही पश्चाताप आहे!) इतकाच काय तो माझा अनुभव आहे. Advantages are more than disadvantages but the compromises too could be more than acceptable, असं काहिसं प्रकरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्याखेतच खेळायचं असेल तर;

बलात्कार अन्यायकारक असतो हे म्हणण्यासाठी स्त्रीच असावं लागतं अशा प्रकारचा हा युक्तिवाद आहे.

अन्यायकारक असतो हे कळणं वेगळं, पण नक्की काय यातना होत असतील हे बलात्कार झालेल्यालाच माहित, असा माझा अर्थ होता. असो. पक्का पुर्वग्रह (अनुभवाशिवाय) असलेल्यांशी (पालथ्या घागरीवर) डोकेफोड करण्यात अर्थ नाही. तेव्हा तुमचे चालु द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मुद्दा क्र. ४ कैच्याकै आहे. बाकींबद्दलही काय लिहावे, तस्मात असोच. खाली "नीळे" म्हणताहेत त्याप्रमाणे पाण्यात न पडता पोहण्याबद्दल चर्चा चालू आहेत. त्या चालू द्या. आम्हीही अमेरिकेची आर्थिक आघाडी बसविण्याचा खरा मार्ग ओबामाला सांगणे सुरू करतो आहोतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येकाच्या आनंदी आणि सुखी जीवनाच्या कल्पना वेगळ्या असतात. आईच्या हातचं जेवण, कामाला मोलकरीण, नातेवाइकांचा सहवास इत्यादी सुखाच्या कल्पना असू शकतात पण त्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारे सुखाने जगता येऊ शकतं- आणि तसं जगणारा 'काहीही म्हणा, पण थोडा दु:खी असणारच' असं ठरवणं चूक आहे.

प्रगत देशांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य भारतातल्यापेक्षा खूप जास्त आहे हा एक मुद्दा स्थलांतर करणार्यांच्या लेखी महत्त्वाचा असू शकतो असं मला वाटतं. तसंच आपल्याला आपल्या देशात मिळालं त्यापेक्षा सुंदर/सुरक्षित आयुष्य (अर्थात व्यक्तिसापेक्ष सुंदर आयुष्य)/शिक्षण/.. आपण आपल्या मुलांना देऊ शकू, असाही एक कल असू शकतो. प्रगत देशात अनुभव घेतल्याशिवाय केवळ दुय्यम नागरिक वगैरेंचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. समानता केवळ कागदावर असण्यात (जशी भारतात आहे असं खेदाने म्हणावं लागेल) काय अर्थ आहे.

बाकी लाचारी वगैरेच्या मुद्द्यांवर बाकीच्यांनी मतं व्यक्त केलीच आहेत. तुम्ही व्यक्त केलेली दुय्यम वागणूक वगैरेंचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. व्हिसा वगैरेंच्या 'कटकटी' असू शकतात पण अर्थातच आपल्याला काय हवय हे पाहूनच त्या कराव्या का नको याचा निर्णय लोक घेतात. माझ्या मर्यादित अनुभवात या कटकटींचा मुख्य वाटा तुम्हाला आमंत्रण देणार्यांना उचलावा लागतो- म्हणजे तेच त्रास घेऊन तुम्हाला बोलावत आहेत.

सौदी अरेबिया वगैरे सारख्या देशात लोक का जातात असा प्रश्न मला पडतो, पण त्याचीही कारणं असतातच. लोकसत्तेच्या एका दिवाळी अंकात (बहुतेक २०११च्या) सौदी अरेबियातल्या एका खेड्यात डॉक्टर म्हणून वास्तव्यास असलेल्या मराठी कुटुंबाचे अनुभव वाचले. का रहातात तिथे जाऊन असा प्रश्न परत डोक्यात आलाच.पण त्यांनी घेतलेले अनुभव इतके वेगळे होते की वाटलं केवळ त्याकरताही जाऊन रहात असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋता ह्यांचा प्रतिसाद अतिशय संतुलित आहे हे मुद्दाम नोंदवितो.

परदेशी जाऊ इच्छिण्यामागे - तात्पुरत्या कारणासाठी वा कायम राहण्यासाठी - प्रत्येकाची कारणे आणि प्रेरणा वेगवेगळ्या असतात. त्यावर इतरांनी मतप्रदर्शन करण्याने आणि ex-cathedra judgement देण्याने काय साधते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं का वाटतं बरं? 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदिशा' ही म्हण सर्वश्रुत आहेच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परदेश या blanket term मध्ये अमेरिका, इंग्लंड, नॉर्वे ते घाना, नायजेरिया, सोमालिया असे सगळे देश येतात. नायजेरिया सारखे देश कदाचित बरेच असुरक्षित असावेत, पण तसे बघितले तर गडचिरोलीत काम करणे त्यापेक्षा जास्त असुरक्षित असु शकते. त्यामुळे "परदेशी नोकरी करणे हा प्रकार थोडा unsafe पण वाटतो" हे फारच सरसकटीकरण वाटले. (demeaning बद्दल नंतर वेगळे लिहितो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला वाचुन व्हायच्या आत अजुन पंधरा येऊन पडलेत. जरा दमानं राव! तुम्हाला कॉपी-पेष्ट फाष्ट करता येतं हे कळ्ळं. आता स्लो डाउन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील ललित घनकचरा निवांतपणेच शेअर करीन. माझ्या कॉपी#पेस्ट च्या गुणाला झटकन पारखल्याबद्दल लाखो कट#पेस्ट धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

धन्यवादाबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एन आर आय आयुष्यातल्या विसंगतींवर बोट ठेवणारं रोचक लिखाण.
या विषयावर मी मागे लिहिलेलं एक छोटं टिपण त्याची आठवण झाली. ते येथे उधृत करतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखाचे शीर्षक : अरे एनारायेनाराय !

जून महिना संपत आला की अमेरिकेत वारे वाहू लागतात राष्ट्रीय सुटीचे - अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाचे. शहराशहरांमधून अमेरिकेचा राष्ट्रध्वज घरांवर , सरकारी कार्यालयांवर , नगरातील सार्वजनिक स्थळांवरील ध्वजाच्या खांबांवर फडकायला सुरवात होते. दुकानादुकानातून , "मॉल्स्"मधून झेंडे आणि इतर राष्ट्रप्रेमाची प्रतिके विकायला निघतात. फटाके विकणारे तात्पुरते गाळे उघडतात. आपल्या देशाचा जन्मदिन साजरा करण्याच्या या वातावरणात प्रत्येक अमेरिकन या ना त्या कारणाने - प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने - काहीनाही , तर सुटीचा उपभोग घेऊन तरी - सामील होतोच. ज्या भूमीमधे माझी नि माझ्यासारख्या , जन्माने भारतीय असणार्‍या लक्षावधींची छोटीमोठी कारकीर्द घडते आहे, घडली आहे त्या देशाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या दिवसानिमित्त , एका स्थलांतरिताच्या मनातले हे थोडेसे विचार.

ज्यांची वर्गवारी एनाराय म्हणून केली जाते त्या व्यक्तींच्या समूहाला मखरात बसवण्याचा , किंवा त्याच्यावर कठोर प्रहार करण्याचा या लिखाणाचा उद्देश नव्हे. किंवा त्या समूहाच्या प्रश्नांना कुरवाळत बसण्याकरता , त्यांचे प्रश्न इतरांच्या प्रश्नापेक्षा कसे महत्त्वाचे आहेत हे प्रच्छन्नपणे सुचविण्याकरतादेखील - म्हणजे पर्यायाने स्वतःभवती आरत्या ओवाळण्याकरता - हे लिहीलेले नाही. मला माझ्या आयुष्यातून , माझ्या आजूबाजूला असणार्‍या परिस्थितीतून जे दिसते, जे प्रश्न पडतात , आणि जी काही मोजकी उत्तरे मिळालेली आहेत त्यांचा हा थोडासा वेडावाकडासा उहापोह.

"मी कोण ?"

लहानपणी अनेक उखाणे आजी ऐकवायची. त्यातल्या एका प्रकारचा उखाणा असायचा " मी कोण" ? " गडगड जातो, गाडा नव्हे. सरसर जातो , साप नव्हे. गळ्यात जानवे, ब्राह्मण नव्हे. मग मी कोण ?" असा त्यातला एक उखाणा. स्वत:च्या ओळखीबद्दल विचार करता , परदेशस्थ स्थलांतरितांची अवस्था , अशी , न सुटलेल्या उखाण्यासारखी झाली तर नवल ते काय ? "डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !" असा तो उखाणा बनतो. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्‍या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे.भारताच्या संदर्भात प्रश्न खूप काल्पनिक परिस्थितीबद्दलचा आहे. एकूण जगाच्या राजकारणाची परिस्थिती पहाता असे होणे दुरापास्त आहे खरे. एकूण सगळ्या खंडीभर प्रश्नांपैकीचा हा प्रश्न असेलही . पण उत्तर देताना कुणाचा हात कापत नसेल ? आणि अशावेळी आपल्या स्वतःच्या ओळखीबद्दलचा - आयडेंटीटीबद्दलचा - यक्षप्रश्न अनेकाना सतावला नसेल काय ? "बलुतं" या आपल्या आत्मचरित्राच्या एका भागात दया पवार यांनी , अस्पृष्य समजल्या जाणार्‍या वर्गातून आर्थिक संक्रमण करणार्‍या त्यांच्यासारख्यांना काही प्रसंगी त्यांच्या आप्तांकडून आणि समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांकडून काही वेळा जी वागणूक मिळाली त्याचे चित्रण केले आहे. अशी वागणूक त्यांना नेहमी मिळाली नसेल , थोड्या लोकांकडूनच कधी मिळाली असेल ; परंतु त्या त्या प्रसंगीच्या डंखातून " आपण नेमके कोण" या प्रश्नाला नेहमी अधोरेखित केले गेले; अशा अर्थाचे पवार यानी लिहीलेले आहे. एनाराय माणसांची नि पवार यांच्यासारख्यांच्या कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीची मला बिलकुल तुलना करायची नाही. पण "संक्रमणशील व्यक्तींना येणारे अनुभव" या एका सदराखाली त्यात काहीतरी मिळतेजुळते आहे असे मला वाटले खरे.

" दीवार और पूल"
असे जर का असेल तर या प्रकारच्या यक्षप्रश्नांची उत्तरे नक्की काय आहेत ? दीवार चित्रपटातला तो सुप्रसिद्ध संवाद आठवतो. "ये वही पूल है जिसके नीचे हम रहा करते थे. लेकीन ये दीवार जो हम दोनोके बीचमे खडी है , वो इस पूलसे बहोत बडी है भाई !" म्हणजे शेवटी त्रिशंकू बनायचे की दुवा बनायचे याचा निर्णय घ्यायची वेळ ही येतेच. भले राष्ट्रांचे राज्यकर्ते एकमेकांवर हल्ले चढवोत, भले खुद्द अमेरिकेचे नग्न , पाशवी सत्ताकांक्षेचे रूप जगासमोर येवो , पण देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्‍या बनल्याखेरीज पर्याय नाही. कै. व. पु. काळे हे माझे प्रचंड आवडते लेखक नव्हते. पण त्यांच्या एका कथेतले वाक्य मला लक्षात आहे. : " काही लोकाना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स् असतो. काही लोकांना सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. जे.के. ला 'इक्वालिटी कॉम्प्लेक्स्' होता !" एनाराय मंडळींच्या संदर्भात हे विधान खरे आहे असे मला वाटते. तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत. आपल्या सुदैवाने , इराकी अमेरिकनांना नागरिकत्व स्वीकारताना "त्या" प्रश्नाला उत्तर देताना ज्या नैतिक शृंगापत्तीला तोंड द्यावे लागले असेल ती आपत्तीसुद्धा आपल्या नशीबी नाही. "दीवार"ची उपमा पुढे न्यायची तर गमतीने असे म्हणावेसे वाटते : "ज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलोत." "एकोहम बहुस्याम्"चा आपल्यापुरता अर्थ हा असा आहे असे मला वाटते.

"बदलती समीकरणे"
भारतातून स्थलांतरित झालेल्यांच्या संक्रमणाचा इतिहास लक्षात घेता , ६०-७० च्या दशकातल्या , प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला सामना करणार्‍या पीढीपासून ते ९० च्या दशकातली एच-१ आणि डॉटकॉम पीढी ते नव्या शतकातल्या "आउटसोर्सिंग्"च्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची लेकरे अशा ढोबळ पायर्‍या दिसतात. ६५ पासून सुरवात झालेल्या "ब्रेन ड्रेन" पासून चालू शतकात झालेल्या , "ब्रेन गेन"च्या घटनेपर्यंतचा इतिहास म्हणजे काळाच्या बदलणार्‍या पावलांची साक्ष आहे. आज जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक सावटाखाली उभी असताना दिसते. दर काही वर्षांनी होणार्‍या भूकंपांमधे ज्याप्रमाणे भूगर्भातील टेक्टॉनिक् प्लेट्स् बदलतात , त्याप्रमाणे , जेव्हा अर्थव्यवस्था कूस बदलते तेव्हा हे संक्रमणशील एनाराय् कुठे असतील, त्यांचे काय होईल हा मोठा रोचक विषय होईल. कुणी सांगावे , आज जे शेकड्याने लोक भारतात कायमचे परत जात आहेत, उद्या परिस्थितीच्या रेट्याने ही संख्या हजारोंची बनली तर ?

पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फार फार छान आहे हा लेख. खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"डाऊन टू रॅबीट होल विथ सो कॉल्ड भारतीय मध्यमवर्गीय भडकलेला शामसंस्कारजिया(नॉस्टाल्जियाच्या धर्तीवर)"

पण सलग लेखनाची शैली आवडली. मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे होय, मुद्द्याच्या चर्चेत शैलीचा मुद्दा राहिलाच.

अशा प्रकारे स्वतःच्या इनसेक्युरिटीज (मराठी?) प्रकट करणं आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद वाचतानाच फेसबुकवरून "ऐसि अक्षरे"वर आल्याने उंचावलेली पातळी जाणवली. पुन:श्च धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

भलताच मोठा परिच्छेद! Smile असो. लिखाण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परदेशात राहून नोकरी करणार्‍यांच्या बँक खात्यामधे तुलनेने थोडा अधिक पैसा दिसतो, हा फरक सोडला तर भारतात राहून नोकरी करणारे आणि परदेशात असणारे यांच्यात फार काही फरक असतो असे वाटत नाही.
भारतात रहणार्‍यांना देखिल अनेक तडजोडी कराव्या लागतात, घरापासून लांब रहावे लागते (जिथे आईच्या हातचे जेवण नसते).
भारतीय आहे म्हणून अपमान होण्याचे प्रसंग येत असतीलच, पण भारतात देखिल मराठी आहे म्हणून, ब्राम्हण आहे किंवा नाही म्हणून वगैरे अपमान होतातच ना, आणि ते सहन करून परत तिथेच लोकं कामे करतातच ना? अपमानाचे प्रकार अनंत आहेत, परंतु तो सहन करून तिथेच रहावे लागण्यातली आगतिकता तर सारखीच आहे ना?

दूरवरच्या मायभूमीत त्याच्याच रक्ताच्या चिखलात मेलेला शेतकरी हा आपल्या कॉफी पॉज मधे एका इंट्रेस्टिंग पोस्टचा रिफ्रेशिंग विषय याउप्पर काहीही असणार नाहीए

हे वाक्यं भारतातच रहाणार्‍या कोट्यावधी लोकांना तंतोतंत लागू पडते.

पिचलेल्या कामगार वर्गाचे कल्याण करण्यापेक्षा 'कल्याण'मधे एक फ्लॅट इनवेस्टमेंट म्हणून घ्यावा का हेच पाहणार आहे. मुले इकडे झाली तर त्यांच्या संस्कारांचे आणि पालनाचे काय? हा प्रश्न मुंबईत दररोज किती बलात्कार झाले? आणि बेस्टची भाडेवाढ दरमहा का होते यापेक्षा नक्कीच महत्त्वाचे.

यात चुकीचे काय आहे? सगळ्यांनाच समाजसेवा कशी परवडणार. जो पर्यंत मी कामगारांचे शोषण करत नाही, किंवा बेस्टची भाडेवाढ माझ्यामूळे होत नाही तो पर्यंत मी माझ्या वैयक्तिक गरजांना महत्व देणे चुकीचे कसे ? असं म्हणा फार तर की जो वैयक्तीक गरजांपेक्षा अशा सामाजिक प्रश्नांना जास्तं महत्वं देतो तो महान असतो. पण सर्वांनाच महान बनणे कसे जमणार?

आणि मग अशा सामाजिक परिस्थितीत, रुपया, डॉलर, युरो ची गणिते, कमिशन चे हिशोब इ. सारे न करता नक्की काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे ते तर लिहिलेच नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मुळात देशाबाहेर जाणे हे अलीकडे इतकी आम बात झालेलं आहे, तिकडेही इकडचे बरेच काही मिळते अन इकडेही तिकडचे बरेच काही मिळते असे असताना बाहेर जाण्याबद्दल डिफेन्सिव्ह अथवा ऑफेन्सिव्ह का लिहिल्या जावे ते काही कळत नाही. देशाबाहेर जाणे अन नशीब काढणे हेही भारतीयांना तसे नवीन नाहीच म्हणा. मग ते इसवी सनाच्या सुरुवातीच्या अलेक्झांड्रियातील भारतीय असोत किंवा ५ व्या शतकापासूनचे आग्नेय आशियातले असोत नैतर मध्ययुगापासूनचे अख्ख्या मध्य आशियाभर, पार रशियापर्यंत पसरलेले भारतीय असोत. स्थलांतरितांचा मायभूप्रतीचा हळवेपणा समजू शकतो. काहींची आढ्यता आणि तदनुषंगिक ब्याकलॅश हे मात्र अज्जीच आवडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक पूर्ण वाढ झालेला रानरेडा घ्यावा. त्याला एखाद्या जाणकार कसायाकडे नेऊन नीट कापून घ्यावे. त्याचे मऊ, मांसल अवयव, स्नायू वगैरे येतील त्या किंमतीला कुणालातरी विकून टाकावेत. आता कूर्चा, कातडी, जून मांस असले सगळे भीषण प्रकार शिल्लक राहातील. त्यातला जास्तीत जास्त जून, वातड प्रकार निवडावा. आपल्या घरात इंडियातून आणलेले एखादे तबला-सतारीचे, भीमसेनांचे, पुलंचे वगैरे पोर्ट्रेट असतेच. ते जरा वर उचलून बघावे. त्यामागे मातृभूमीच्या प्रेमाचे गड्या अपुला गाव बरा केवळ माझा सह्यकडा शेवटी मदांध तख्त फोडते मराठी आईची झोपडी प्यारी असे काही ओघळ सुटलेले असतात. त्या ओघळांत सदर प्रकार मॅरिनेट करायला टाकावा. गरज वाटल्यास थोडेसे इटालियन ऑलिव्ह ऑईल लंडन आय वॉल स्ट्रीट पेट्रोनॉस टॉवर बिग फाईव्ह नायग्रा किंवा एंजल फॉल्स टाकावे. चार-पाच-सहा वर्षे हे सगळे मुरु द्यावे. गिल्टगंध किंवा खंतवास सुटला की हे सगळे बाहेर काढावे. तोवर स्प्रिंग आलेला असतोच. आपले नागरिकत्त्वाचे कागदपत्रही इष्ट स्थळी पोचलेले असतात. ज्या पार्कमध्ये बार्बेक्यूला परवानगी आहे त्या पार्कमध्ये हा पदार्थ भाजायला न्यावा. चिठ्ठी आई है वतनसे चिठ्ठी आयी है पिया तोसे नैना लागे रे अगा करुणाकरा बाकरवडी दगडूशेठ संस्कार म्हणून काही हवेतच ना शेवटी मुलांना आणि वडीलधार्‍यांना बरं वाटतं हो आता तसे कितीसे दिवस राहिले आहेत त्यांचे मी डॉक्टरांना फोन करतो वाटलं तर ट्रीटमेंटमध्ये काही कमी पडू देऊ नका पैसे पाठवू का मी इकडून काही भाजलं का रे ते नीट म्हणेपर्यंत सदर पदार्थ तयार झालेला असतो.
आता तो सावकाशीने चघळायला घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अगागा काय हे! कुठुन कॉपी केल्यात ह्या उलटसुलट ओळी! आणि काय परिच्छेद वगैरे पाडायची प्रथा आहे कि नाही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजि म्या बम्ब पाहिले! शुक्रिया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

_/\_

जबरा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईबाबा, आजीआजोबा वगैरे वगळुन बाकी लेख आवडला. चांगली आहे शैली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. मला मिसळपाव वरील "दादा कोंडके" यांचा पुढील प्रतिसाद फार आवडला होता -

एक स्नेही अगदी नाईलाजाने अमेरिकेत रहायला गेले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांना तिथलच नागरिकत्व मिळालं. तिथंच मुलंही झाली. आता त्यांची कितीही इच्छा असली तरी तिथे मराठी माध्यमातली शाळा असणं शक्यच नाही. त्यामुळे मनावर दगड ठेउन त्यांना मुलांना नरक यातना भोगायला इंग्रजी शाळेत घातलं. बिचारे, सगळ्या आप्तांना मराठी विषयीची कळकळ बोलून दाखवतात, पण दैवाचं दान थोडंच मनाप्रमाणे पडतं? पण अमेरिकन.. नाही विश्वमराठी साहित्य संमेलनाला वगैरे हजेरी लाउन थोडं बरं वाटतं म्हणतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखा चाळला. 'यू हॅव टू चूज युअर बॅटल्स' असं काहीसं कुठेतरी वाचलं/ऐकलं होतं ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथल्या बव्हंश (९९%) प्रतिसादांच्या स्वरुपाकडे पाहून परदेशी नोकरी करणे यात काही 'कमीपणाचे' वाटणे/वाटवून देणे नाही असे मला मान्य करावे लागेल. मी ज्या अर्थी कमीपणा हा शब्द प्रयोजिला होता तसा काही प्रकार नसावा/नाही. किंवा एनाराय लोकांच्या ज्या इतर अनेक समस्या आहेत त्यांत ही एक समस्या आहे असं म्हणावं लागावं इतकी ती तीव्र नाही.
माझा असा समज स्वतःचा अनुभव नसल्याने, मित्रांच्या क्वचित हळव्या, क्वचित स्थानिकांवर राग काढनार्‍या फिडबॅकचा वेगळा अर्थ काढल्याने झाला असावा. उदा. बापाने श्रीमुखात देणे (देशात अपमान) आणि त्रयस्थाने श्रीमुखात देणे (परदेशात 'मागासलेल्या' देशाचा मानला जाणे) यात दुसरा प्रकार जास्त कमीपणाचा आहे असं एक चुकीचं गणित मी मांडत होतो. लोक अधिकाधिक मोकळ्या /उदार मनाचे होत आहेत आणि आपले आणि परके यांना नविन मिती प्राप्त होत आहेत. लोकांना जर परदेशात असे जास्तीत जास्त at home वाटत असेल तर ती नक्कीच आनंदाची बाब आहे. सुधारणेसाठी धन्यवाद. तरी जाता जाता - १. पहिल्या पिढीला सांस्कृतिक, इ adjustment करून घ्यावी लागणे, २. दुसरे नागरिकत्व मिळेपर्यंत अधिकारांची असुविधा असणे हे नक्कीच दोन परदेशी जाण्याचे barriers आहेत, अर्थान त्यात 'कमीपणा' नावाचा कुठला प्रकार नाही. शिवाय परदेशी गेलेले बरेच लोक इतके जास्त formal झालेले असतात कि त्यांच्या मानसिक सुखाच्या, दु:खाच्या अवस्थेचं 'भारतीय पद्धतीचं मूल्यमापन' करता येत नाही, जे आवश्यकही नसावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ब्रिटन मध्ये स्थलांतरित झालेले, भारतीय म्हणायला भारतीय नाहीत (तसं म्हणण्यात पुन्हा कमीपणा वाटून घेणारे) पण ब्रिटिश म्हणायला तसेही नाही अशांवर एक अफलातून कॉमेडी शो आहे...'गुडनेस ग्रेशिअस मी'.यूट्यूबवर चिक्कर क्लिप्स पाहता येतील. तसाच 'फ्लेवर्स' हा चित्रपटही भरपूर करमणूक करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यानंतर कसाबसा लेख वाचला.
अर्धविरामजी, प्लीज प्लीज प्लीज थोडे परिच्छेद वगैरे पाडत जा लिहिताना.
वाचणार्‍याला धाप लागत नाही त्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भारी चर्चा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars