गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.

असो, सांगायचा मुद्दा हा की, एकदा का तुम्ही सायकल शिकलात की पुढच्या आयुष्यभर त्या दोन पायांना जी काही भिंगरी लागते की शेवटी या दोन पायांखेरीज तिसरा आधार म्हणून काठी आली की ती थांबते. पण पोहोण्याचे मात्र तसे नाही .

आता मी पण पोहोण्याचा क्लास जॉईन केला तो हि गरजेपोटीच. तेव्हा करियर ची एकंदरीतच बोंबाबोंब. त्यामुळे नौदलात जाऊ असा विचार करून अस्मादिकांनी कॉलेजातील 'NCC' नावाचा प्रकारात आपले नाव नोंदवले. कोणीही फालतू माणूसही भारतीय सैन्यात जाऊ शकतो असे आम्हाला कळले असल्याने आपली वर्णी सहज लागेल असा आत्मविश्वास.

या 'NCC' पेक्षा भिकार या जगात अजून दुसरी गोष्ट आहे यावर माझा विश्वासच नाहीये. आता हे निरीक्षण अर्थात तेथे काही दिवस जाऊन आल्यानंतरचे आहे. काही गोष्टी मला अजूनही नाही कळाल्या त्या अश्या की,
१. सगळ्या लोकांची डोकी भुंडी का असतात? जरा बरे केस असलेला आणि व्यवस्थित भांग बिंग पाडलेला माणूस या लोकांना का पचत नाही?
२. प्रत्येक गोष्टीला बेडूक उड्या मारणे किंवा लोळत क्रॉलिंग करणे हीच शिक्षा असू शकते का?
३. एकाही शिवी देणारा ( आणि दिलेली ऐकून न घेणारा) माणूस किती दिवस येथे टिकू शकतो?

हे हि असो, तर कहाणी होती आमच्या पोहोण्याची. NCC मध्ये गरजेचे म्हणून आम्ही पोहोण्याचा क्लास लावला. बरोबर १ महिन्याने त्यांची पोहोण्याची परीक्षा होणार होती आणि ती पण ५० फुटी तलावात. आता पाण्यात पडल्यावर ते पन्नास फुटी खोल असो व दहा फुटी काय फरक पडतोय? पण या लोकांना भारी हौस मिरवायची.

पूर्ण एक महिना क्लास ला जाऊन 'शेवटी' म्हणजे क्लास चे पैसे संपायच्या शेवटी आम्ही कसेबसे हातपाय झोडत पाण्यात तरंगायला लागलो. आता आमचा कोन्फीडन्स का काय म्हणतात ते भलताच वाढला होता. शेवटचे काही दिवस तर आम्ही 'भाड्याने' आणलेल्या (म्हणजे भाडे देऊन आणलेल्या, गैरसमज नको !") उसन्या, पोहायच्या टोप्या आणि गॉगल लावून पोहू शकत होतो.

अखेर तो दिवस उजाडला जेव्हा आमची परीक्षा होणार होती. शे दीडशे लोक जमली होती एका ठिकाणी. लगेचच म्हणजे दीड तासाने मिलेटरीचे तीन ट्रक आले. मग भाज्या कोंबतात तसे आम्हाला कोंबून ते ट्रक निघाले. मिलेटरीचे मळके पट्या-पट्या चे शर्ट घालून आलेले ती लोक जेवढा करता येईल तेवढा मग्रूरपणा करीत इतर लोकांना 'हाकत' होते.
आता पोहोण्याची परीक्षा देण्यासाठी आम्ही तलावात उतरलो. ३०० मीटर तलावात ३ फेऱ्या मारून एका ३० फुटी भागात फ्लोटिंग करायचे होते.
अस्मादिकांची हि पहिलीच परीक्षा असल्याने आम्ही पोहोण्याचा चष्मा, टोपी वैगरे घालून तयार. माझ्या बरोबरीच्या लोकांना अचानक न्यूनगंड का काय ते वाटायला लागले असावे. एकंदर माझी तयारी आणि हौस बघून हा "भारी स्विमर" असेल असे लोकांना वाटले. मी फुल टू टोपी-बिपी गॉगल घालून. पण खरी परिस्थिती नंतर लोकांच्या लक्षात आली.

हि पोहोण्याची स्पर्धा नव्हती. फक्त ३ फेऱ्या पूर्ण करून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते. पण शेवटचा माणूस फेरी पूर्ण करून जेव्हा फ्लोटिंग ला येईन तेव्हापासून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते नाहीतर फेल.
फ्लाग उडाला आणि सगळी लोक पोहायला चालू झाली. सगळी इतर मुले 'बटरफ्लाय' व 'गावठी' पोहोत होती.ती सपासप पोहत पुढे निघून गेली. मी मात्र नुकतेच शिकलो असल्याने 'ब्रेथ स्ट्रोक'मारत हळूहळू. पोहत जेव्हा मी अर्ध्या अंतरावर आलो तेव्हा काही लोक ती फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीसाठी पोहत होती.

काही वेळ पोहल्यानंतर माझे तलावाच्या बाहेर लक्ष गेले. एक गार्ड माझ्या पोहोण्याच्या स्पीडने वरती चालत होता. की कधी हा माणूस बुडेल आणि कधी उडी टाकून याला एकदाचे बाहेर काढेन या उद्देशाने.
पहिल्या फेरीतच मला दम लागलाय हे पाहून तो म्हणाला की "टेक युवर ओन टाइम".
हे वाक्य मी इतके मनावर घेतले की माझा वेग अजून कमी झाला. मी दुसऱ्या फेरीसाठी निघालो तेव्हा काही लोक फ्लोटिंग पर्यंतही पोहोचली होती.

वेळ माहीत नाही पण बऱ्याचं वेळाने मी फ्लोटिंग ला पोहोचलो. अंगातला जीव तर गेलाच होता. पण येथे जर मी हातपाय गाळले असते तर गॉगल आणि टोपी सकट माझा "टायट्यानिक" झाला असता. आणि माझे सोडा पण ज्यांची चष्मा, टोपी मी आणली होती त्यांच्या आत्म्यालाही शांती लाभली नसती.

मी पोहून गेलो आणि फ्लोटिंग ची वेळ चालू झाली. जी लोक लवकर पोहोचली होती त्यांच्यावर माझ्यामुळे २५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ तरंगत राहायची वेळ आली होती. काही मस्तपैकी पाण्यात उलटी झोपली होती. काही नाईलाजाने तरंगत होती. काही पाण्यात काहीतरी हरवलेय असे काहीतरी करीत होती. तर माझ्यासारखे नवशिके ज्यांना पोहणे शिकवले होते पण तरंगणे नाही, असे लोक जीवाच्या आकांताने हातपाय झोडीत होते.
काहींना एवढा वेळ तरंगणे न जमल्याने काहींनी तलावाच्या कडेला पकडले आणि नापास झाले.

मी तरंगायला चालू केले आणि पुढची ती दहा मिनिटे माझ्या आयुष्यातली मी कधीच विसरणार नाही. मिनिटा-मिनिटा गणिक माझे हातपाय झोडणे कमी होत होते. अंगातली शक्ती संपली होती. बाहेरचा माणूस आठ, सात, सहा, पाच गणती करत होता. तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांची गणती करतोय असे वाटू लागले.
आता आकडा चारवर आला. एका वेळेला वाटले, गेले उडत करियर-बिरीयर. आपण जगलो तर करियर होईल ना? मोठ्या कष्टांनी तलावाच्या शेजारचा पाइप धरायला हात पुढे केला. पाइप धरला की नापास हे तेथेही आठवत होते.
तो 'तीन' म्हणाला. मी पाइप धरायला गेलो आणि एकदम मागील महिन्यात या पोहोण्यासाठी केलेले क्लास, त्याचे पैसे सगळे आठवले. म्हटले बस्स, आता नापास झालो तर येथून बाहेर आणि हे सगळे एफर्टस वाया.
देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता.

लगेच "फिनिश" असा शब्द आला आणि मी सुस्थ पडलो. मला त्या तलावाच्या बाहेर कोणी काढले हेही मला आठवत नाही. मला राहून राहून आजही वाटते की माझी हि एकंदर परिस्थिती बघूनच तीन ते एक अंतर लवकर काटले गेले असावे.

मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मी पास झालो होतो पण माझ्यामुळे जास्त वेळ तरंगायला लागल्यामुळे आणि ते न जमल्याने तीन मुले नापास झाली होती. बरे झाले की मी गॉगल घातला होता की त्यामुळे मला त्यांच्याकडे काणाडोळा करता आला. कुठल्याही क्षणी ती आपल्याला पकडून परत तलावात टाकतील असे मला वाटायला लागले.

गॉगल, टोपी घालून पोहोण्याआधी मी लोकांना 'मायकेल फेल्प्स' वाटलो होतो म्हणे, पण नंतर माझी पत पार्ट-टाइम 'वाघ' होणाऱ्या 'राहुल रॉय' एवढीही शिल्लक नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो उधारीचा चष्मा आणि टोपी देऊन टाकली.

तेथे पास होऊन मी NCC जॉईन केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षात सोडली. ते जर तेव्हा सोडले नसते तर मी अजूनही 'सावधान, विश्रामच' करत बसलो असतो. आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट?

भविष्यात, मी जर माझे वर्तमानपत्र चालू केले(च) तर मी रोज(च) दोन(च) बातम्या हेडलाईन म्हणून(च) छापेन(च).
१. NCC पेक्षा भिकार जगात काहीच नसून सुज्ञांनी त्याच्या वाटेला जाऊ नये.
२. सिंहगडावर जाणारा गाडीरस्ता कालच्या मंद लहरी भूकंपांनी नामशेष. आता सिंहगड चढून जाण्यासाठी पर्याय नाही.

त्यानंतर बऱ्याचं वर्षांनी फिटनेस साठी म्हणून पोहायचा क्लास लावला. पोहता येते म्हणून पहिल्याच दिवशी 'स्विमिंग टेस्ट' द्यायला मी परत पाण्यात उतरलो. पूर्ण एक तास प्रयत्न करूनही मला पोहता आले नाही. "आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते. दुसऱ्या दिवशी मी गप्प माझे रजिस्ट्रेशन रद्द केले आणि उरलेले पैसे परत घेऊन आलो.

आता मी चुकूनही पोहोण्याच्या नादी लागत नाही.समुद्रकिनारी गेलो तरी जास्त रमत नाही. हुशारीने पावसाळ्यात मुंबईला जात नाही. "मी मासा असतो तर" अश्या आशयाचे निबंध हि वाचणे मी आता बंद केले आहे. डिस्कवरीवरची माणसे समुद्रात पोहायला लागली की, मी वाहिनी बदलतो आणि अन्नू मलिकची हिडीस गाणी लावतो.

"उची है बिल्डिंग, ट्या नाआआअ "
लिफ्ट तेरी बंद है ट्या नाआआअ "

( दुःख पचवायला हो ! कारण अस्मादिक कोणतेही व्यसन करत नाहीत.आणि म्हणतात ना "लोहे को लोह काटता है".)

असो, पण हा एवढा छोटा प्रसंग, माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.

सागर
http://sagarshivade07.blogspot.in

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

रंजक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख पुर्वी वाचला होता (बहुतेक माबोवर?), परत वाचतानाही मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

एकुणच मिलिट्री किंवा तत्सम लोकांचं चारचौघात सिविलियन्स म्हणजे क्षुद्र कीटक, ढेकूण, मुंगी अशा तर्‍हेने वागणं मला खटकत आलेलं आहे. त्यात नावचाच मिलिट्रीशी संबंध असलेल्या एनसीसीवाल्या कडेट्सचं शाळेत फुकाचा माज दाखवणं. पण हा झाला वैयक्तिक अनुभवाचा मताचा भाग. तेव्हा तुमचा मुद्दा क्र. १ (एनसीसी भिकार) बाबत सहमत होण्या न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण,<<२. सिंहगडावर जाणारा गाडीरस्ता कालच्या मंद लहरी भूकंपांनी नामशेष. आता सिंहगड चढून जाण्यासाठी पर्याय नाही.>> या मुद्द्याशी १००% सहमत. मी तर भूकंपावरही अवलंबून राहू नये या मताचा आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अगदी खरे आहे तुमचे. माझ्याकडे JCB व इतर साहित्य असते तर रात्रीत उकरून काढला असता तो रस्ता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

वाचकहो धन्यवाद. बराच आधी लिहिला होता हा लेख.
बरेच दिवस लिखाण बंद होते या निमित्ताने जाणीव झाली. आता परत चालू करतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

हायला! भारी लिहिलेय!
'मल पोहायला शिकायचं नाही, मी बुडून मेले तरी मला चालेल' असे मी आईबापांना लहानपणीच कमालीच्या बाणेदारपणे सांगितले होते, याची या निमित्ताने नोंद करून ठेवते. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन