Skip to main content

विश्राम बेडेकरः "रणांगण"

काही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. "प्रसिद्ध", "सनसनाटी", "मैलाचा दगड" "आक्षेपार्ह" वगैरे त्यांना लावलेले लेबल्स आत्मसात करतो आणि चर्चेत अनेकदा माना डोलावतो. पण असले एखादे प्रसिद्ध आणि बहुचर्चित पुस्तक एकदाचे वाचण्यात आले, की त्याबद्दल नवीन काय आणि कसे म्हणायचे, हा प्रश्न उठतो. (काही म्हणायलाच हवे असे नाही हे मान्य आहे, तरी शांत बसवत नाही म्हणून :-)) "हे तुला आत्ता कळलं? पुस्तकाला येऊन प वर्षं झाली की, ही चर्चा आता जुनी झाली!" हे ऐकावे लागते. पण आमची परिस्थिती थोडीफार सिनेमातल्या पोलीसांसारखी असते - मोक्याच्या ठिकाणी पोहोचायला हमखास उशीर. साहित्यिक मैलाच्या दगडांपर्यंतही धापा टाकत उशीराच पोहोचतो, आणि कसेबसे आपले मत सगळ्यांना सांगू लागतो.

विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी वाचून माझे असेच काहीतरी झाले. बेडेकरांबद्दल तपशीलवार असे काहीच वाचले नव्हते, पण त्यांच्याबद्दल, आणि कादंबरीबद्दल तुटक-तुटक बरेच काही ऐकले-वाचले होते. अलिकडेच रणांगण वाचून काढली, आणि भयानक आवडली. पुस्तकाने खूप अस्वस्थ ही केले, आणि त्याच्या भोवती इतकी चर्चा झाली याचे नवल वाटत नाही.

कांदंबरीचा काळ १९३० च्या दशकाचा, दुसर्‍या महायुद्धाचे वारे लागलेल्या दिवसांचा आहे. इंग्लंडहून परत मुंबईकडे येताना, जहाजावर कथानायक चक्रधर हॅर्टा नामक जर्मन ज्यू महिलेला भेटतो, आणि तिच्या प्रेमात पडतो. कथानक बहुतांश बोटीवरच उलगडते. बोटीवर विविध देशाचे, धर्माचे, वंशाचे लोक असतात, त्यातील मोजक्याच तिघा-चौघांना आपण भेटतो. त्यांचे परस्पर संबंध जुळत, मोडत जातात. कादंबरी जागा, काळ आणि पात्रांनी अगदी सीमित असली तरी बेडेकर विश्वाचे एक लघु रूप तयार करून जीवन, अस्मिता आणि मानवी संबंधांबद्दल व्यापक प्रश्न उभे करतात.

कादंबरीचा आशय राष्ट्रीयत्व, आणि राष्ट्रीय अस्मितेची चिकीत्सा आहे. प्रत्येक पाउलावर या अस्मितेची ओढ आणि तिचे पोकळपण हे दोन्ही बेडेकर उभे करतात. कथेचा काळ राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा कळस होता, तरी त्या भाववेचा उद्रेक म्हणावा अशा महायुद्धाच्या मुळाशी देखील व्यापार आणि लोभच आहे, आणि तोही तिसर्‍याच देशाच्या (अमेरिकेच्या) लोकांचा, हे आपण वाचतो. चक्रधर भारतीय/मराठी आहे, पण त्याचा देश ब्रिटिश साम्राज्यात सामिल आहे - जागतिक पातळीवर स्वतंत्र असे अस्थित्व त्याला नाही. बोटीवर विविध जातीजमातीचे लोक आहेत - ब्राह्मण, मराठा, मुसलमान, उत्तरेकडील मंडळी. बोटीवरच्या भारतीयांच्या अगदी मोजक्या, नेमक्या संवादातून बोत मुंबईच्या दिशेने चालली असली तरी "घरी मायदेशी" परत जाणे तितके सरळसोपे नाही हेही कळते. आपल्या देशावर ब्रिटिशांचाच नाही, तर मुसलमानांचा किती हक्क आहे, यावर सर्वांचे एकमत नाही. पॅलेस्टाइनच्या अगदी जवळ जाऊनही तिला पुण्यभूमी मानणार्‍या यहूद्यांना तिथे उतरता येत नाही. ज्यू प्रवासी स्वत:ला जर्मनच मानतात, पण तेथून त्यांची क्रूर हकालपट्टी झालेली असते. (पुढे ह्याच हकालपट्टीमुळे ते गॅस चेंबरातल्या सामुहिक कत्तलेतून वाचतात, हे भीषण सत्य कादंबरी लिहीताना बेडेकरांना अर्थात माहित नव्हते) यातले काही नाइलाजाने इँग्रजी हीच जगाची भाषा म्हणून तिला केविलवाणी पद्धतीने शरण जातात. (इंग्रजीला शरणागति देखील पुढे जागतिकीकरण आणि प्रगतीच्या नावाने अनेकांच्या नशिबी येईल हे देखील त्यांना ठाउक नव्हतेच!) भारतीय आणि पाश्चात्य जगात आणि विचारांमध्ये मनमुराद वावरणारा चक्रधर ऐन वेळी त्या cosmopolitan जगात शिरून हॅर्टाला आपले करू शकत नाही. किती नाही म्हटले तरी त्याला "घरी" यावेच लागते, तो तिने त्याला दिलेल्या नावासारखे पुर्णपणे "बॉब" होऊ शकत नाही.

राष्ट्रीयत्वाच्या उदाहरणावरून एकूण माणसाच्या भावनांच्या सत्यतेचे स्वरूप कादंबरी शोधत जाते. दुसर्‍या व्यक्तीप्रती प्रेमभावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकर विसंगत आणि अतिरेकी रूपात सादर करतात; एकीकडे प्रेम आणि सहानुभूति यांना काही राष्ट्रीय सीमा नाही हे वेगवेगळ्या संबंधातून आपण पाहतो - चक्रधर आणि हॅर्टाचे प्रेम, मन्नान या पात्राशी हॅर्टाचा संबंध, डॉ शिंदे यांना लुई या लहान मुलाचा लळा, इत्यादी. तरी हे सगळं इतकं सोपं देखील नाहीये, कदाचित अशक्यच आहे, असा निराशाजनक सूरही आहे. जागतिक युद्धासारखेच हे वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? कादंबरी कमालीचा संयम पाळून आपल्याला सरळ उत्तर देत नाही. हॅर्टा आत्मजत्या करते, पण तिच्या आणि चक्रधरच्या प्रेमाला बेडेकर खोटे ठरवत नाहीत. मला शेवटी काय होणार हे आधीच माहित असूनही फार वाईट वाटले.

रणांगणातला व्यक्तींचा सामाजिक चौकटींविरुद्ध संघर्ष वाचला की समकालीन ई. एम. फॉर्स्टर चे "Howard's End" आणि "A Passage to India" कादंबर्‍या आठवल्यावाचून राहिले नाही. दोन्ही कादंबर्‍यांमध्ये वेगवेगळ्या वर्ग/जमातींमधले संबंध बनत राहतात ("always connect!") पण शेवटी निराशाच हाती लागते ("not here, not now").

राष्ट्रीय भावना ही एकतेचे गुणगान करत असली तरी मुळात ती कृत्रिम आणि विभाजनवादी, विध्वंसक आहे, हा तर्क दुसर्‍या युद्धानंतर जगात अनेकांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडला. युरोपातच नाही तर भारतीय उपखंडात फाळणीच्या भीषण हिंसेला साक्षीदार असलेल्या अनेक लेखकांनी (मण्टो, रजा, यशपाल, प्रीतम, गंगोपाध्याय, खुशवंत सिंह), हिंदी-उर्दू-बंगाली साहित्यात हा विचार व्यक्त केला. स्वत: स्थलांतरित झालेल्या, किंवा एकूण स्थलांतर, जागतिकीकरण, गढूळ अस्मिता, इत्यादीत रस असलेल्या "इंडियन इंग्लिश" लेखकांचाही हा आवडता विषय राहिला आहे. मराठी साहित्यात राष्ट्रीयत्वाची अशी मार्मिक, वैश्विक, आणि समानानुभूतिपूर्ण चर्चा मी प्रथमच वाचली, ती देखील १९३९ या काळात, अशा विलक्षण पात्रांतून. ही कादंबरी खरोखर एकाच वेळी cosmopolitan ही, आणि मराठीही आहे असे जाणवले.

एकच गोष्ट सतत खटकली, आणि ती म्हणजे शेवटी शेवटी आलेली पात्रांच्या दृष्टीकोनातली असंबद्धता. संपूर्ण कादंबरी चक्रधरच्या दृष्टीकोनातून आपण वाचतो, पण शेवटी शेवटी एकाएकी हॅर्टाच्या मनात शिरतो - पण अजून चक्रधरच्याच निवेदनात. तो कादंबरीभर स्त्री जातीचा इतका संशयी असताना, एकदम त्याच्या आवाजात तिचे विचार, तिची तळमळ आणि अस्मिता प्रस्तुत केलेल्या मला विसंगत, कादंबरीच्या शिस्तीला सोडून वाटले. हे वळण बेडेकरांनी ठरवून घेतले, की गोष्ट त्यांच्या हातातून थोडीशी निसटली, हे कळणे कठिण. एकूण हे स्त्रीचित्रण मला उमगले नाही - चक्रधरच्या संशयासहित स्त्रियांकडून असलेल्या "धोक्या" पासून जपून राहण्याची काही
अगदी साचेबंद विधाने कादंबरीभर आहेत, पण त्यासोबत सगळी स्त्रीपात्रे या विचाराला मोडही घालत जातात. शेवटी चक्रधरही मावळतो. त्यातून बेडेकरांना नक्की काय म्हणायचे होते हे कळले नाही - पण राष्ट्रीय स्वाभिमानाची, सामाजिक अब्रूची निव्वळ मूर्ती ठरण्यापेक्षा बेडेकरांची स्त्री पात्रे माणुसकी, लैंगिक क्षमता, स्वतंत्र विचारांनी कमालीच्या जीवंत होतात. अर्थात, कादंबरीत एकही भारतीय स्त्री नाही. तशी असती तर तिच्या पात्राची घडण वेगळी झाली असती का, कोण जाणे.

इतकी सुबक, विचारप्रवर्तक, आणि दृढबद्ध मराठी कादंबरी - खासकरून १९३०-४०च्या काळातली - मी तरी वाचली नव्हती. कथानकाची घडण अत्यंत प्रभावी आहे. अगदी नेमके शब्द आणि चित्रदर्शी वर्णन; कुठेही पाल्हाळ नाही. पटकथा लेखकाची शिस्त बेडेकरांनी कादंबरीतही पाळली आहे. मला प्रथम थोडी कृत्रिम वाटली - कोण हे सगळे युरोपियन लोक मराठीत बोलणारे! पण वाचता वाचता एकूण वर्णनशैलीची सहजता छान जाणवली. बोटीच्या प्रवासाचे असो किंवा प्रेमभावनांचे असो, अथवा अगदी पाश्चात्य पद्धतींचे, रीतिरिचाजांचे असो, त्यांच्या वर्णनांतून काहीतरी भलतंच वाचतोय असं वाटलं नाही. मुख्य म्हणजे कादंबरीचे विश्व किंवा पात्रे बघता
इंग्रजी शब्दांचा वापर फारच कमी जाणवला. त्या काळी ही भाषा आणि शैली फारच आधुनिक वाटली असावी का?

असो. आता या पुस्तकाबद्द्ल खूप कुतूहल वाटत आहे. इथल्या अनेक सदस्यांनी ही कादंबरी वाचली असावी; कादंबरीबद्दल, तिच्यावर झालेल्या चर्चेबद्दल, किंवा बेडेकरांबद्दल माहिती मिळावी, चर्चा व्हावी, या अपेक्षेने हे विचार मांडले आहेत. त्यांचे "एक झाड, दोन पक्षी" हे आत्मचरित्र वाचायची खूप इच्छा आहे, पण पुस्तक सहजासहजी उपलब्ध आहे असे दिसत नाही.

रामदास Sun, 13/11/2011 - 18:45

चक्रधर आणि वेटरचे भांडण या प्रसंगानंतर ही कादंबरी मनाची पकड घेते. एका जहाजावर एका अगतीकतेपोटी जमा झालेली ही पात्रे क्षणाक्षणाला बाह्य आणि अंतरीक संघर्षाला तोंड देत असतात. ज्या काळी ही कादंबरी लिहीली गेली त्या काळी हा फॉर्मॅट फारच नविन होता आणि त्यानंतरही हा फारसा यशस्वीरित्या वापरलेला आढळलेला नाही.छोट्या लुईला इंग्रजी बोलायचे नाही आणि त्याला चिडवण्यासाठी इंग्रजी बोलायला लावणे हा प्रसंग अजूनही स्मृतीत आहे. हॅर्टाची आत्महत्या हा अटळ भाग वाचता वाचता कळत जातो. (पण तो तसा झाला नसेल या ओढीने पहील्या वाचनाच्या वेळी कादंबरी एका बैठकीत वाचल्याचे आठवते.)
नागपूर विद्यापिठाने ही कादंबरी अभ्यासाला लावली होती. बर्‍याच यशस्वी कादंबर्‍यांवर काही काळानंतर जसे कॉपी केल्याचे आक्षेप घेतल्या जातात तसे या कादंबरीबाबतही वाचल्याचे आठवते पण नक्की दोषारोपण काय होते ते आता आठवत नाही.

राजन बापट Sun, 13/11/2011 - 22:33

In reply to by रामदास

बर्‍याच यशस्वी कादंबर्‍यांवर काही काळानंतर जसे कॉपी केल्याचे आक्षेप घेतल्या जातात तसे या कादंबरीबाबतही वाचल्याचे आठवते

द ग गोडसे यांनी असा आरोप केलेला आहे. गोडसे आणि बेडेकर मित्र होते आणि या कादंबरीलेखनाच्या काळात गोडशांनी बेडेकरांच्या खोलीवर मूळ इंग्रजी लिखाणाची कॉपी मिळाली असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. बहुदा गोडशांनी मूळ इंग्रजी लिखाणाचे डिटेल्स आपल्या या आरोपवजा लिखाणात केलेले नव्हते.

अशोक पाटील Sun, 13/11/2011 - 19:56

७२ वर्षे लोटून गेली तरी 'रणांगण' वर लिहायला कुणाला तरी आवडते ही बाबच या कादंबरीचे महती आणि मराठी वाङ्मयातील तिचे वादातीत स्थान अधोरेखीत करते. महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नसेल की जिथे या कादंबरीचा पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला नसेल. कित्येक प्रबंध लिहिले गेलेले आहेत रणांगणचा आधार घेऊन 'मराठी कादंबरीची वाटचाल' अंतर्गत. आकाशवाणी असो वा म.टाईम्स, लोकसत्ता, सकाळ सारखी राज्यव्यापी वर्तमानपत्रे असोत, सत्यकथा, ललित सारखी मासिके असोत, दिवाळी अंक असो, यानी आणि अन्य खाजगी संस्थानी वेळोवेळी घेतलेल्या वाचककौलांमध्ये 'रणांगण, ययाती, कोसला, बनगरवाडी, रथचक्र' या पाच कादंबर्‍यांचा सतत उल्लेख असतोच असतो.

चक्रधरपेक्षाही हॅर्टाने प्रसिद्ध झाल्याझाल्या त्यावेळेच्या वाचकांच्या मनाची घेतलेली पकड पुढे पिढ्यानपिढ्या कायम चर्चेत राहिली. कित्येकांनी तर 'हॅर्टा' ला 'सीते'चे प्रतिक मानले होते. अकरा दिवसाच्या त्या बोटीच्या प्रवासात समोर येणारी हॅर्टाची मानसिक तडफड, जर्मन भूमीलाच हद्दपारीनंतरही अजून मातृभूमी मानणारी हॅर्टा चक्रधरबरोबरची अल्पकाळाची प्रीती असफल झालेली पाहते आणि नैराश्येने आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. हा पदर सीतेच्याबाबतीतही कसा लागू होतो याचे विश्लेषण त्या काळात झाले होते. हॅर्टाला कोणतीही जमीन आपलेसे करीत नाही आणि शेवटी ती समुद्राला जवळ करते, तर सीतेला वनवासानंतरदेखील अयोध्या जवळ करीत नाही, इतकेच नव्हे तर ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो रामही आपली म्हणत नाही म्हणून तीसुद्धा जमिनीलाच नाकारून शेवटी तिच्या उदरात प्रवेश करून आपले जीवन संपविते. असो, हा विषय प्रदीर्घ आहे.

विश्राम बेडेकर (मूळ नाव विश्वनाथ, पण श्रीराम या लहानपणीच्या मित्राची आठवण सातत्याने जवळ राहावी यासाठी लेखनाकरीता विश्व+राम यांची संधी करून 'विश्राम' नाम धारण केले) यांच्यासारख्या दिग्गजाबद्दलही लिहावे तितके थोडेच आहे. "रणांगण" मुळे ते साहित्यविश्वाला माहीत झाले असले तरी गंमत म्हणजे त्यांच्या स्वत:च्या 'कर्तबगारी' वरील त्या काळात विश्वास डळमळला असल्याने हरिभाऊ मोटेना विनंती करून कादंबरीच्या १९३९ च्या पहिल्या आवृत्तीवर त्यानी आपले नाव छापले नव्हते. "एक प्रवासी" असे लेखकाचे नाव तिथे दिसत होते. शांतारामबापू यांच्याकडे पटकथाकार म्हणून त्यानी केलेली उमेदवारी, 'शेजारी', 'रामशास्त्री' चे यश, तिथे बापूंच्यासमवेत उभे राहिलेले 'संगीत मानापमाना'चे प्रसंग, स्वतः निर्माता होण्याची धडपड, आणि त्यात आलेले प्रचंड अपयश, कर्जाचा बोजा, कोर्टखटले, नैराश्येने ग्रासलेले जीवन, पत्नी मालतीबाई बेडेकर यानी त्याना तशाही परिस्थितीत सावरणे, "ब्रह्मकुमारी, वाजे पाऊल आपुले, टिळक आणि आगरकर" अशी मोजकीच पण त्या त्या काळात सर्वार्थाने गाजलेली नाट्यसंपदा.

"रणांगण" च्या निर्मितीसह या सर्वांचा लेखाजोखा 'एक झाड आणि दोन पक्षी' मध्ये विश्राम बेडेकरांनी फार वेधकपणे घेतला आहे. हातातून खाली ठेवावेसे वाटत नाही असे हे एक आगळेवेगळे आत्मचरित्र असून 'रणांगण'प्रमाणेच साहित्यरसिकांनी या झपाटलेल्या झाडाला आपलेसे केले होते.

२००६ साली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्य पॉप्युलर प्रकाशनने या आत्मचरित्राची नवीन आवृत्ती प्रकाशित केली होती. ती उपलब्ध असण्याची शक्यता आहे. 'रसिक' साईटवरदेखील तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती मिळू शकेल.

अशोक पाटील

रोचना Mon, 14/11/2011 - 12:02

In reply to by अशोक पाटील

हॅर्टाला सीतेच्या रूपात पाहिले गेले हे वाचून आश्चर्य वाटला. कारण भारतीय स्त्रीकल्पने ला जाणूनबुज्ञून लांब ठेवून तिच्या पात्राची घडण केली गेली असे मला वाटले. पण या बदलत्या,निराळ्या परंतु उत्साही वाचकांच्या प्रतिक्रियांतूनच कादंबरीला दीर्घायुश्य लाभले आहे.
मला तुमचा आणि नंदन यांचा प्रतिसाद वाचल्यावर कधी एकदा "एक झाड..." वाचीन असे झाले आहे. रसिक च्या साइटवर मी आधीच शोधले होते, पण तेथे स्टॉक मध्ये नाही. आल्यास कळवावे अशी नोंद केली आहे, बघू. पुण्यातले "इंटरनॅशनल" चे जोगळेकर एरवी अशी पुस्तके मिळवून देण्यात माझी खूप मदत करतात, पुण्याला गेले की त्यांना विचारते.

आडकित्ता Sun, 13/11/2011 - 21:27

ब्रांकूशीचा पक्षी बेडेकरांचंच नाहो?

सूर सूर सारे त्याने पंखांत भरून घेतले
अन ब्रांकुशीचा पक्षी उडून गेला....

?

राजन बापट Sun, 13/11/2011 - 22:09

In reply to by आडकित्ता

ब्रांकुशीचा पक्षी = सदानंद रेगे. अगदी नक्की.

अशोक पाटील Mon, 14/11/2011 - 12:32

In reply to by राजन बापट

"ब्रांकुशीचा पक्षी" सदानंद रेगे
~ आणि यातील अगदी स्मरणात राहिलेली एक कविता म्हणजे "केसरबाई". आता पूर्ण आठवत नाही, पण बाईंच्या गौरवार्थ लिहिलेल्या या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत :

१. तो यमन,
देवस्वी, तेजाळ,
समाधानित सिंहाची जळती आयाळ

२. ओंकार पचविलेली ही मूर्तिमंत आदिमाया
गोरजाच्या उतरत्या उन्हात सळसळती अनाम छाया
तिची नुसती चाहूल लागताच तंबोर्‍याच्या मनात उठे शहार्‍याचं काहूर

३. कानड्यानं दरबारात कसं यावं ?
तिच्या दरबारी कानड्यासारखं, रत्नखचित समशेर परजीत !

~ जबरदस्त कल्पनाशक्ती असलेला हा कवि. [मर्ढेकर आणि काफ्का या दोघांवरील रेग्यांच्या कविताही अशाच]

असो. काहीसे विषयांतर झाले, पण बेडेकरांच्यासंदर्भात लेख असल्याने, अगदीच तक्रार करण्याजोगे नसावे.

अशोक पाटील

आडकित्ता Sun, 13/11/2011 - 23:02

आभार मुक्तसुनित

नंदन Mon, 14/11/2011 - 00:04

फार आवडला.

राष्ट्रीय भावना ही एकतेचे गुणगान करत असली तरी मुळात ती कृत्रिम आणि विभाजनवादी, विध्वंसक आहे, हा तर्क दुसर्‍या युद्धानंतर जगात अनेकांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडला. युरोपातच नाही तर भारतीय उपखंडात फाळणीच्या भीषण हिंसेला साक्षीदार असलेल्या अनेक लेखकांनी (मण्टो, रजा, यशपाल, प्रीतम, गंगोपाध्याय, खुशवंत सिंह), हिंदी-उर्दू-बंगाली साहित्यात हा विचार व्यक्त केला.

ह्या मुद्द्याबद्दल - विशेषतः बंगाली साहित्यातील या प्रवाहाबद्दल अधिक विस्ताराने लिहिलेत, तर वाचायला नक्कीच आवडेल.

राष्ट्रीय भावनेचा - आणि पर्यायाने वंशवादाच्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर रामदास यांनी म्हटल्याप्रमाणे वेटर आणि चक्रधरचे भांडण (आणि तत्पूर्वी चक्रधरने एका संवादात 'यू आर वर्स दॅन अ ज्यू' असे काढलेले उद्गार) हा लक्षात राहिलेला प्रसंग. वंशद्वेषाच्या आणि पूर्वग्रहाच्या स्थूल-सूक्ष्म, उघड-सुप्त अशा अनेक पातळ्या सहज दर्शवून जाणारा. कादंबरीला जे सुघड, बांधीव स्वरूप आले आहे ते अशा फारशा टिप्पणीशिवाय येणार्‍या बोलक्या, ससंदर्भ प्रसंगांनी आणि वर्णनातल्या लहान पण नेमक्या शब्दांच्या वाक्यांनी. कुठल्याही देशाच्या सीमेपलीकडे असणारा समुद्र हा कादंबरीचा जसा रंगमंच आहे, तसाच जवळजवळ त्यातले एक पात्रही. त्याच्या वेगवेगळ्या रुपांची वर्णनंही कुठे पाल्हाळिक न होता अगदी नेमकेपणाने येतात.

'एक झाड दोन पक्षी'मध्ये बेडेकरांनी 'रणांगण'च्या निर्मितीपूर्व काळातले त्यांचे अनुभव विस्ताराने सांगितले आहेत. शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथल्या स्वातंत्र्याचा, पोलिसांच्या कार्यतत्परतेचा त्यांना आलेला अनुभव; त्याचवेळी आपल्यातल्या न्यूनगंडाची झालेली ओळख; तिथल्या उदारमतवादी परिचितांनी आपल्याला कितीही समानतेने वागवले तरी आपले स्वातंत्र्य हे आपणच किंमत देऊन मिळवायला हवे ही झालेली जाणीव (लेखातले "भारतीय आणि पाश्चात्य जगात आणि विचारांमध्ये मनमुराद वावरणारा चक्रधर ऐन वेळी त्या cosmopolitan जगात शिरून हॅर्टाला आपले करू शकत नाही. किती नाही म्हटले तरी त्याला "घरी" यावेच लागते, तो तिने त्याला दिलेल्या नावासारखे पुर्णपणे "बॉब" होऊ शकत नाही" हे निरीक्षण ह्या संदर्भात आठवले); दुसर्‍या महायुद्धाच्या सावटामुळे स्वातंत्र्याच्या मूल्यांना जपण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजातही त्यांचा होऊ लागलेला संकोच; कफल्लक अवस्थेत मिळेल त्या बोटीने भारतात परततेवेळी सोबत असणार्‍या ज्यू प्रवाशांची जवळून पाहिलेली दारूण अवस्था आणि ऐकलेले अनुभव; परतल्यानंतर आपल्या स्वतंत्र विचारांच्या, लौकिकार्थाने यशस्वी असणार्‍या पत्नीवर (१९३३ मध्ये 'कळ्यांचे नि:श्वास' लिहून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मालतीबाई बेडेकर, पूर्वाश्रमीच्या बाळूताई खरे) आर्थिकदृष्ट्या अवलंबून रहावे लागते म्हणून दुखावला गेलेला अहंकार आणि त्यातून आलेला तुसडेपणा; त्याचे वादात आणि मालतीबाईंच्या कादंबर्‍यांवरील टीकेत झालेले पर्यवसान; 'आधी स्वतः लिहून दाखवावं, मग बोलावं' हे आव्हान स्वीकारून त्यांनी अवघ्या एका महिन्यात (जुलै १९३९ मध्ये बेडेकर भारतात परतले. ऑगस्टमध्ये ही कादंबरी लिहून झाली आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटले) मालतीबाईंना अजिबात थांगपत्ताही लागू न देता लिहिलेली ही कादंबरी आणि ती लिहून संपत आल्यावर आपल्यातला कडवटपणाही ओसरला असल्याची झालेली जाणीव (लेखात म्हटल्याप्रमाणे चक्रधराच्या दृष्टिकोनात अचानक होणार्‍या बदलाचे कारण ह्या दोन गोष्टींत - बेडेकरांच्या तेव्हाच्या मनस्थितीत आणि लवकरात लवकर कादंबरी लिहून हातावेगळी करण्याच्या प्रयत्नात - कदाचित शोधता यावे.) -- ह्या सार्‍या गोष्टी मुळातून वाचाव्यात अशा.

रोचना Mon, 14/11/2011 - 12:25

In reply to by नंदन

धन्यवाद, नंदन! बंगाली फाळणी-साहित्यावर लिहायचा प्रयत्न नक्की करेन.

कालच मी अक्षर दिवाळी अंकात नंदा खरे यांचे मुलाखत वाचत होते - मालतीबाई बेडेकर त्यांच्या सख्या आत्या हे वाचले. फेलूदा च्या शोनार केल्लातली "टेलीपथी" आठवली. रणांगणामुळे त्यांचा विचार डोक्यात होताच, पण हे कनेक्शन पाहून आश्चर्य वाटला.

पण खरंच,विषय-आशय कितीही आकर्षक असेना, पाल्हाळ नसलेली, अगदी व्यवस्थित बांधलेली कादंबरी वाचण्याचा आनंदच वेगळा.

ऋषिकेश Mon, 14/11/2011 - 10:14

रणांगण एकदा वाचली की तीचं गारूड पटकन उतरत नाही!
चला या निमित्ताने फार वर्षांपूर्वी वाचलेली कादंबरी पुन्हा वाचण्याची इच्छा इफाळून आली.
हातातली पुस्तकं संपली की हेच मिळवतो

रोचना Mon, 14/11/2011 - 12:38

In reply to by ऋषिकेश

पुन्हा वाचून झाल्यावर इथे नक्की लिहा. मागे आवडलेली पुस्तकं बर्‍याच वर्षांनी पुन्हा वाचली की तेवढीच आवडणे हे फार कमी पुस्तकांबद्दल होतं असा माझा कटु अनुभव आहे :-(. पण पुनर्वाचनात जर एखादी कादंबरी तेवढीच किंवा जास्त आवडली तर मग बातच और!

ऋषिकेश Mon, 14/11/2011 - 13:23

In reply to by रोचना

:)
रणांगण अपवाद ठरो ही इच्छा आहे :)

अवांतरः या निमित्ताने या पुनर्वाचनावर नंदनचा पुस्तकविश्वच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातील पुनर्वाचनाय च! हा सुंदर लेख वाचा असे सुचवतो. पीडीफ मुळे दुवा देता येत नाहिये :(

रोचना Mon, 14/11/2011 - 15:30

In reply to by ऋषिकेश

काय त्रास आहे - मला ऑफिस चं काम करून देणारच नाही का तुम्ही! :-) पुस्तकविश्वाचा दिवाळी अंक उतरवून घेतला. फोरमही आत्ताच पाहिले - मैं इतने दिन कहाँ भटक रही थी?

ऋषिकेश Mon, 21/11/2011 - 13:58

In reply to by रोचना

विकांताला कादंबरी मिळवून लगोलग वाचली
पुनर्वाचनातही नुसती आवडलीच नाहि तर या परिक्षणामुळे ती अधिक डोळसपणे आवडली!त्या काळातील तपशील इतके नेटके आहेत की जवळजवळ त्या काळचा फर्स्ट हँड अनुभव घेतल्यासारखं वाटतं... खिन्न वाटतं.. एक कादंबरी म्हणून कमालिचं रोचक लेखन आहे!

मात्र, दरम्यान वाचलेल्या अ‍ॅन फ्रँकच्या डायरीमुळे असेल, किंवा शिंडलर्स लिस्ट चित्रपटामुळे असेल किंवा आता वाचलेल्या रणांगण मुळे ज्युंचा प्रश्न हा एकाच दृष्टीने समजतो.. काहिसा एकांगी.. मात्र नुकत्याच वाचलेल्या अधर्मयुद्ध मुळे असेल कदाचित, ज्यू जरी पॅलेस्टाईनला स्वतःची भुमी म्हणत असले तरी एक दीड शतकांच्या वर तिथे रहाणार्‍या अरबांची ती भूमी नाहि का? असा प्रश्न आता सतावतो (हा प्रश्न तेव्हा बेडेकरांना पडणे कठीण आहे.. दुसर्‍या महायुद्धादरम्यान आणि नंतर जेत्यांनी ज्यू-स्तुतीने माहितीविश्व व्यापलं होतं त्यातही ब्रिटीशांचं आपल्यावर राज्य असल्याने तीच बाजु प्रकाशात असेल). हा प्रश्न एका कॅलिडोस्कोपसारखा आहे.. जरा वेगळ्या अँगलने बघा एकदम वेगळं चित्र दिसतं.

असो. बर्‍याच दिवसांनी या सुंदर कादंबरीशी भेट घडवल्याबद्दल मनापासून आभार! :)

रोचना Mon, 21/11/2011 - 15:07

In reply to by ऋषिकेश

कादंबरी परत वाचल्यावर बोर नाही झालं हे ऐकून बरं वाटलं!

अर्थातच रणांगणातला पॅलेस्टाइन प्रश्नाबद्दलचा दृष्टीकोन एकांगी आहे. बेडेकरांना खुद्द झायनिझम बद्दल, झायनिझमोत्तर पहिल्या महायुद्धानंतर यहूद्यांचे पॅलेस्टाइन कडे वाढलेले स्थलांतर, तिचे यहूद्यांची फक्त धार्मिक रित्या पुण्यभूमि न राहून राष्ट्रभूमि, किंबहुना एकमेव राष्ट्रभूमि या कल्पनेत वाढ, इत्यादी किती माहित होते हे ठाउक नाही.

पण या घडामोडींमुळे स्थानिक अरबी समूहांवरचा परिणाम त्यांना नक्कीच माहित नसावा. पुस्तकात घडते तसे यहूदी प्रवाशांना परत फिरवणे त्यांनी स्वत: पाहिले असावे. अथवा भूमि आणि लोक यांच्यामधल्या दृढ संबंधाचे 'पुरातन' उदाहरण म्हणून यहूदी-पॅलेस्टाइनचे प्रकरण घेतले असावे? नाहीतरी यहूद्यांची युरोपातली दयनीय अवस्था, आणि पॅलेस्टाइन मध्ये स्थलांतरामुळे रचत गेलेले वेगळेच पेचप्रकरण युद्धाच्या शेवट्या वर्षांतच संपूर्ण उघडकीस आले.

मेघना भुस्कुटे Mon, 14/11/2011 - 14:27

'रणांगण' माझंही खूप आवडतं पुस्तक. त्यातल्या उत्कट नात्यांव्यतिरिक्त असलेले इतरही पैलू तुम्ही इथे फार नेमकेपणानं उलगडून दाखवले आहेत. वाचायला मजा आली. मी एरवी त्यातल्या उत्कट नात्यांनीच पुरेशी चकित होते, आता मात्र पुन्हा वाचीन आणि सामाजिक चौकटी - राष्ट्रीय अस्मिता या सगळ्याचे संदर्भ डोक्यात ठेवून समग्रपणे वाचायचा प्रयत्न करीन.
अवांतरः 'एक झाड दोन पक्षी' मला कंटाळवाणे वाटले होते. आपण आपल्याच कृत्यांबद्दल आणि विचारप्रक्रियेचे वर्णन, आपण कुणी त्रयस्थ आहोतसे मानून करायचे - हा प्रयोग मला जरा ओढूनताणून केलेला, कृत्रिम वाटला होता.

चिंतातुर जंतू Mon, 14/11/2011 - 14:35

परिचयाबद्दल धन्यवाद. 'रणांगण' शाळकरी वयात वाचली होती आणि तेव्हा अतिशय आवडली होती. आता कशी वाटेल ते सांगता येत नाही. काहीशी कृत्रिम रचनेची वाटेल की काय अशी मला भीती आहे.

असो. तुम्ही फॉर्स्टरचा उल्लेख केला आहे. त्यानंतरचं तुमचं हे विधान वाचून मलादेखील फॉर्स्टरचीच आठवण झाली:

>>राष्ट्रीय भावना ही एकतेचे गुणगान करत असली तरी मुळात ती कृत्रिम आणि विभाजनवादी, विध्वंसक आहे, हा तर्क दुसर्‍या युद्धानंतर जगात अनेकांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडला.

हे खरंच आहे. फक्त एक पुस्ती जोडेन. पहिल्या महायुद्धात प्रचंड प्रमाणात हिंसा झाली आणि युद्धविरोधी विचारांना वेगवेगळ्या क्षेत्रांत तेव्हाच चालना मिळाली. दोन महायुद्धांदरम्यान निर्माण झालेल्या ब्रिटिश साहित्यात याचं दर्शन होतं. 'ब्लूम्सबरी गट' यात आघाडीवर होता. व्हर्जिनिया वूल्फची 'मिसेस डॅलोवे' (१९२५) ही कादंबरी एक उदाहरण म्हणून घेता येईल. त्यातलं सेप्टिमस हे पात्र म्हणजे पहिल्या महायुद्धात लढलेला एक सैनिक आहे. 'शेल शॉक' असं ज्याला संबोधलं जातं त्या मानसिक अवस्थेत तो आहे. त्याच्याविषयी अनुकंपा वाटावी असं त्याचं चित्रण आहे. राष्ट्रभावना युद्धांमागची प्रेरणा होती असं सांगून लोकांचा युद्धाला पाठिंबा मिळवला गेला असल्यामुळे युद्धविरोधाची एक परिणती म्हणजे राष्ट्रभावनेच्या वैधतेविषयी शंका उत्पन्न झाली.

फॉर्स्टरही या ब्लूम्सबरी गटात होता आणि त्याच्या दुसर्‍या महायुद्धाआधीच्या कादंबर्‍यांत राष्ट्रभावनेविषयी वाचकांना साशंक करण्याचा हेतू दिसतो. त्याच्या 'हॉवर्डस एंड' (१९१०) आणि 'अ पॅसेज टु इंडिया' (१९२४) या कादंबर्‍यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. 'हॉवर्डस एंड'मधल्या श्लेगेल भगिनी अर्ध्या जर्मन असतात. जर्मनी हे शत्रूराष्ट्र आहे आणि म्हणून या भगिनी इंग्लंडमध्ये उपर्‍या आहेत असं इतरांना त्यांच्याविषयी वाटत असल्याचे संदर्भ कादंबरीत येत राहतात. भारतीय आपल्याहून वेगळे पण चांगले असतात; फक्त त्यांना समजून घेतलं पाहिजे हा 'पॅसेज टु इंडिया'चा पाया आहे. 'इतरां'विषयीचे ('अदर' या अर्थानं आणि वसाहतवादी चौकटीतून) आपापले पूर्वग्रह दोन संस्कृतींनी बाजूला ठेवले तर काय होऊ शकतं याचं गोड चित्रण डॉ. अझीझ आणि फिल्डींग यांच्या नात्यात दिसतं. या भावनेचा स्पष्ट आविष्कार फॉर्स्टरच्याच 'व्हॉट आय बिलीव्ह' (१९३८) या निबंधातल्या या गाजलेल्या वाक्यांत दिसतो:

If I had to choose between betraying my country and betraying my friend I hope I should have the guts to betray my country. Such a choice may scandalize the modern reader, and he may stretch out his patriotic hand to the telephone at once and ring up the police. It would not have shocked Dante, though. Dante places Brutus and Cassius in the lowest circle of Hell because they had chosen to betray their friend Julius Caesar rather than their country Rome.

रोचना Mon, 14/11/2011 - 15:27

हो, श्लेगेल बहिणी अर्ध्या जर्मन असतात. पण हॉवर्ड्स एंड मध्ये राष्ट्रीय फरकांपेक्षा वर्गीय रेषांपलिकडच्या संबंधाचा शोध जास्त आहे (लेनर्ड बास्ट चे पात्र, आणि बहिणींनी त्याच्याबरोबर मैत्री साधायचे प्रामाणिक-पेटर्नलिस्ट प्रयत्न, हेन्री विलकॉक्सचे शेवटी कसेबसे असमाधानी त्यात सामिल होणे). इंग्रजी मध्यमवर्गावर फॉर्स्टरचा रोष असूनही, त्याच्या वसाहतवादी संदर्भाबद्दल जाणीव आणि घृणा असूनही, शेवटी त्याच्या वर्तुळाला पार करून इतरांशी ("अदर" याच उपरोल्लिखित अर्थाने) कितपत सत्य संबंध बनू शकतील याबद्दल तो सतत अनिश्चित, आणि,शेवटी उदासीन राहतो. श्लेगेल बहिणी काहीशा उपर्‍या असल्यामुळे त्यांना ही रेष पार करायला सोपे जाते का, हे फॉर्स्टर विचारतो.

खरेतर ही उदासीनता वसाहतांतल्या नेटिव्हांबद्दल इंग्रजी सामान्य जनतेपेक्षा जास्त आहे असे मला वाटते - म्हणून मला अजी़ज आणि फील्डिंगचे नाते तेवढे गोड वाटत नाही. ते असामान्य नक्की आहे व त्या काळात होते; पण शेवटी आपापले पूर्वग्रह बाजूला ठेवणे, म्हणजेच आपली एकूण घडण आणि अस्मिताच बाजूला ठेवणे अशक्य आहे, असा सूर निघतो. कथा ब्रिटिश राजवटीत बसवली असली तरी ती देशी संस्थानात घडते; प्रत्यक्ष वसाहती शासनाहून थोडे लांब अशी नाती फुलू शकतात का, हे ही ते विचारतात, पण इथेही समाधानकारक उत्तर नाही - इंटिमसी, आणि सहानुभूतिच्या दोघांच्या व्याख्याच निराळ्या निघतात. फॉर्स्टरचे हे वसाहतवादाचेच परीक्षण आहे, पण त्यातून वैश्विक मानवतावाद उद्भवत नाही, निराशाजनक दरींचाच फक्त आभास होत राहतो. (तुमच्या ऑर्वेलच्या धाग्याची ही आठवण झाली - बर्मीज डेज चा असाच काहीसा आशय आहे पण त्यातील या स्थितीबद्दलची करुणता आणि अस्वस्थता अधिक प्रखर जाणवते) अनेकांचे "पॅसेज" च्या शेवटाबद्दल दुमत आहे - "प्रेमा" बद्दल फॉर्स्टर उत्साही होता, आणि शेवटी विषम संबंध असलेल्या दोन लोकांमधेही मैत्री-प्रेम हे शक्य होते असा निष्कर्ष काढला आहे, पण मला ते तेवढे पटत नाही.

फॉर्स्टर चा या नात्याच्या शोधाला वैयक्तिक कारण होते - त्याचे सय्यद रॉस मसूद या भारतीय माणसावर असलेले प्रेम, आणि त्यात त्याची झालेली निराशा. अजीज आणि फील्डिंगच्या नात्याचे अनेक पदर त्याने या व्यक्तिगत अनुभवावरून तयार केले होते - पण कादंबरीत या नात्याचे विश्लेषण त्याने राजकीय/वसाहतवादी संदर्भात केला.

असो. फॉर्स्टर हा माझा एक आवडता लेखक, आणि पॅसेज तेवढे आवडले नाही तरी हॉवर्ड्स एंड खूप आवडते. (अवांतर - दोन्ही पुस्तकांचे सिनेमे मात्र पुस्तकांच्या आशयाला पार बदलून टाकतात, खासकरून लीन चा पॅसेज) बेडेकर ही याच काळात हेच विषम संबंध अनुभवून बोटीवर ते लघुविश्व आणि प्रेमाच्या शक्यता उलट दृष्टीकोनातून उभ्या करतात हे वाचून आनंद झाला. त्याचे दीर्घ पोस्टकोलोनियल रीडिंग कुणी कसे केले नाही कुणास ठाउक! :-)

चिंतातुर जंतू Mon, 14/11/2011 - 16:01

>>इंग्रजी मध्यमवर्गावर फॉर्स्टरचा रोष असूनही, त्याच्या वसाहतवादी संदर्भाबद्दल जाणीव आणि घृणा असूनही, शेवटी त्याच्या वर्तुळाला पार करून इतरांशी ("अदर" याच उपरोल्लिखित अर्थाने) कितपत सत्य संबंध बनू शकतील याबद्दल तो सतत अनिश्चित, आणि,शेवटी उदासीन राहतो.

>>फॉर्स्टरचे हे वसाहतवादाचेच परीक्षण आहे, पण त्यातून वैश्विक मानवतावाद उद्भवत नाही, निराशाजनक दरींचाच फक्त आभास होत राहतो.

>>शेवटी आपापले पूर्वग्रह बाजूला ठेवणे, म्हणजेच आपली एकूण घडण आणि अस्मिताच बाजूला ठेवणे अशक्य आहे, असा सूर निघतो.

या दोन्ही कादंबर्‍यांतून जाणवणारी फॉर्स्टरची याबद्दलची मतं ही वैश्विक मानवतावादी आहेत असं मला वाटतं, पण आपल्या आजूबाजूचा समाज अजून तरी त्यासाठी पुरेसा प्रगल्भ नाही याची त्याला जाणीवसुद्धा आहे. मग अशा परिस्थितीतही आशावादी शेवट दाखवण्याचा निर्णय लेखक म्हणून त्याला घेता आलाच असता, पण मग ते फार प्रचारकी झालं असतं म्हणून त्यानं ते टाळलं असेल का, असा प्रश्न पडतो. लेनर्ड बास्टची कथा असो किंवा अझीझ-फिल्डिंगची असो, त्याच्या अपूर्णत्वामुळे वाचकाला कळवळा येऊ शकतो म्हणून त्या अंतिमतः अपूर्ण ठेवल्या आहेत की त्या कधीच पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत अशी लेखकाची निराशावादी दृष्टी आहे म्हणून त्या तशा आहेत? शाळकरी वयात या कादंबर्‍या वाचल्यावर मला तरी 'हे असं होऊ नये यासाठी वैश्विक मानवतावादाचीच कास धरली पाहिजे' असं वाटलं होतं. (कादंबर्‍या मला आवडल्या होत्या किंवा नव्हत्या हे मी हेतुपुरस्सर सांगत नाही आहे ;-) त्यामुळे ते गृहित धरू नये.) याच्या उलट त्याच्या हयातीत प्रकाशित न झालेल्या 'मॉरिस'मध्ये वर्गफरक असूनही समलिंगी नात्याची स्वप्नाळू परिपूर्ती ("shan't be parted no more" वगैरे) दाखवणारा शेवट मला फसलेला वाटला होता.

हाच मुद्दा पुढे लावतः चक्रधर-हॅर्टा यांची शोकांतिका निव्वळ निराशावादी न वाटता 'घडण आणि अस्मिता कधीकधी बाजूला ठेवाव्यात' याच बाजूनं आपला कल देते असं वाटतं.

रोचना Mon, 14/11/2011 - 20:57

In reply to by चिंतातुर जंतू

मॉरिस बद्दल सहमत.
चक्रधर-हॅर्टा ची शोकांतिका निराशावादी नक्कीच नाही वाटत. तोच मला बेडेकर आणि फॉर्स्टर च्या "रेषे"च्या हाताळणीतला फरक वाटतो. असो.

मिहिर Tue, 15/11/2011 - 10:53

पुस्तकाबद्दल बरेच ऐकले होते. पुलंच्या भाषणातसुद्धा कौतुक वाचले होते. म्हणून गेल्या मे महिन्यात मोठ्या उत्सुकतेने वाचनालयातून आणले. पण मला तितकेसे आवडले नाही. थोडेसे कंटाळवाणेही वाटले.
तसेच त्यांच्या 'टिळक आणि आगरकर'मधील धडा शाळेत होता, तो आवडला होता, तेव्हा तेदेखील वाचनालयातून आणून वाचले. मात्र ह्या आणि त्या दोन्ही पुस्तकांनी माझी निराशाच केली. :(

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:29

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)