Skip to main content

आंतरजाल आणि वाङमय चौर्य

आंतरजालामुळे व्यक्त होणं खूप सोपं झालेलं आहे. दोन ओळींचे गमतीदार विचार असोत, एखादी कविता असो, वैचारिक लेखन असो की कथा असो - सादर करण्यातल्या सगळ्याच अडचणी नष्ट झालेल्या आहेत. एका टोकाला, ज्यांना नुसतंच काहीतरी थोडक्यात मांडायचं आहे अशांसाठी हक्काची फेसबुक वॉल असते, फेसबुक ग्रूप्स असतात. तर दुसऱ्या टोकाला - ज्यांना आपलं स्वतःचंच अनियतकालिक काढायचं, सजवायचं आहे त्यांच्यासाठी ब्लॉग किंवा स्वतंत्र वेबसाइट काढण्याचा पर्याय असतो. या दोनच्या मधल्यांना, ज्यांना शंभर दोनशे शब्दांपलिकडे काहीतरी सकस लेखन करायचं आहे त्यांच्यासाठी तयार वाचकवर्ग असलेली संस्थळं असतात. बऱ्यावाईट प्रतिसादांसकट आपलं छापलेलं लिखाण आता सगळ्यांनाच बघता येतं. या सगळ्याचा परिणाम गेल्या दहाएक वर्षांत दिसून येतो आहे. मराठी (आणि इतर भाषांतही) लेखन प्रचंड वाढलेलं आहे. सगळंच काही कालीदासाचं वाङमय नसणार हे उघड आहे. पण फुटकळ दोनोळी स्टेटसं वगळता, प्रत्येकालाच आपल्या लिखाणाबद्दल आत्मीयता असते. त्यावर काही ना काही कष्ट घेतलेले असतात. त्या लेखनात आपला काही भाग गुंतलेला असतो. अशा लेखनाची कोणीतरी खुशाल चोरी करतो आणि आपल्या नावावर खपवतो हे कोणाच लेखकाला आवडणं शक्य नाही.

दुर्दैवाने लिखाण जसं सोपं झालं आहे त्याहीपेक्षा लेखनाची चोरी करणं सोपं झालेलं आहे. कॉपी पेस्ट. पंधरा सेकंदात दोन हजार शब्दांचा लेख आपल्या नावावर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवता येतो. इतकंच नाही, स्वतःची वेबसाइट काढून त्या लेखनावर वाचक जमवता येतात. त्या वाचकसंख्येच्या आधारावर ऍडव्हर्टाइजिंग रेव्हेन्यू मिळू शकतो. स्वतःचं खोटं नाव कमवणे हा निदान क्षुद्रतेचा भाग मानता येतो. तेही आक्षेपार्हच. पण निदान समजून घेता येतं. पण दुसऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना श्रेय न देता स्वतः चक्क पैसे कमवायचे याला हरामखोरीशिवाय दुसरा शब्द सुचत नाही. आणि यासाठी कल्पकता शून्य. चोरी करण्याची निगरगट्ट मनोवृत्ती हवी फक्त.

या प्रश्नावर सध्या तरी काही व्यवस्थात्मक उपाय नाही. म्हणजे तत्त्वतः आहे. तुमचं पाकीट मारलं गेलं किंवा कोणी गळ्यातली चेन खेचली तरी जसं तत्त्वतः पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवता येते, तसाच. त्यामुळे या बाबतीत तरी आपणच चोराला शोधून काढणं आणि पब्लिकबरोबर तिथल्या तिथे हाणणं हाच उपाय शिल्लक रहातो.

सुदैवाने मोठ्या प्रमाणावरची चोरी शोधून काढणंही तसं सोपं झालेलं आहे. जर कोणी तुमचं लेखन चोरून ते आम जनतेला खुल्या वेबसाइटवर टाकत असेल तर तुम्हाला ते शोधता येतं. कारण आम जनतेला खुलं म्हणजे गूगलला खुलं. त्यामुळे प्रत्येक लेखकाने आपल्या लेखनाच्या बाबतीत खालील उपाय करावा.

1. तुमच्या लेखातलं एखादं वाक्य, शब्दप्रयोग किंवा नुसतंच लेखाचं शीर्षक गूगलच्या सर्च बारमध्ये कॉपी पेस्ट करा. सर्च म्हणा. काही सेकंदातच तुम्हाला उत्तर मिळेल. उदाहरणार्थ, मी 'कवितेची पाककृती' हे माझ्या लेखमालेचं शीर्षक शोधल्यावर मला पुढील लिंक दिसते. 'कवितेची पाककृती गूगल सर्च' लेखमालेचं नाव पुरेसं वेगळं असल्यामुळे मला फक्त ते जिथे मी प्रसिद्ध केलं तीच पानं दिसतात. खाली स्क्रोल केल्यावर त्याच नावाचा दुसरा लेख दिसतो. पण लेखाच्या नावापलिकडे त्यांत काही साधर्म्य नाही.

2. चोराने लेखाचं शीर्षक बदलून तो प्रसिद्ध केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी पहिल्या लेखातलं एक वाक्य 'आयुष्य म्हणजे एक विडा असतो' हे सर्च करून पाहिलं. सुदैवाने माझ्या लेखांपलिकडे दुसरं काही सापडलं नाही.

3. आणखीन एक करता येण्यासारखं म्हणजे आपली सही कुठेतरी लेखातच लपवून ठेवणं. "हा लेख राजेश घासकडवी यांनी लिहिलेला आहे" असं लेखाच्या मध्येच कुठेतरी लिहायचं. पण हे लपवणार कसं? बहुतेक मराठी संस्थळांवर किंवा ब्लॉगवर लिखाण करताना अक्षररंग निवडण्याची सोय असते. कुठच्यातरी परिच्छेदाच्या शेवटी जर हे वाक्य लिहून त्या अक्षरांचा रंग पांढरा करायचा. कॉपी पेस्ट करताना लक्षात येणार नाही. (नीट निरखून पाहिलं तर येईल कदाचित, पण चोर तितके कष्ट घेत नसावेत अशी आशा आहे). "हा लेख राजेश घासकडवी यांनी लिहिलेला आहे"

4. काही ब्लॉगर याबाबतीत जागरुक राहून शोधाशोध करतात, आणि कोणी चोरी केली हे जाहीर करतात. त्या व्यक्तीला, किंवा आयडीला बदनाम करणं, यापलिकडे तरी आपल्या हातात फारसं नसतं. तेवढं जमेल तसं आपण करायचं. (याचं एक उदाहरण सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचलेलं होतं. लेखिकेने आपली सर्व कॉंप्युटर स्किल्स वापरून त्या माणसाला उघडं पाडलेलं होतं. कोणाला जर तिने हे कसं केलं याचा दुवा आठवत असेल तर द्यावा)

5. दुर्दैवाने आपण फेसबुकावर जे टाकतो ते शोधण्याची सोय गूगलमध्ये नाही. तसंही फेसबुकवरचं लिखाण हे कुठल्यातरी जाहीर जागी मोठ्याने गप्पा मारण्यासारखं होतं. मी जर कोणाला ट्रेनमध्ये जोक सांगितला, तो शेजारच्याने ऐकून आपल्याच नावावर इतर मित्रांमध्ये खपवला तर त्यावर विशेष काही करता येत नाही तसं. फेसबुकावरचं लिखाण सुदैवाने आपल्या 'मित्रां'मध्येच पोचतं. त्यांच्यापैकी जर कोणी चोरून ते फेसबुकावरच टाकलं तर मित्रांच्या मित्रांकडून ते कळू शकतं इतकंच.

आणखीन तुम्हाला जर काही सुचत असेल तर जरूर कळवा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/06/2013 - 22:54

In reply to by पाषाणभेद

वाङमय चोरले जाणे म्हणजे मुळ लिखाण सकस असा निश्कर्ष काढावा काय?

चोराची लेखनास्वाद-पत तितपतच असण्याची शक्यता जास्त. तसं असेल तर वाङ्मयचौर्य झालं म्हणजे लेखन सकस असा होत नाही. (तसंच विडंबन केलं, ढीगाने प्रतिसाद आले म्हणून लेखन सकस आहे असाही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. एखाद्या दिवशी दंगामस्ती करण्याची लहर आली आणि ती संसर्गजन्य झाली तरीही विडंबनं, प्रतिसाद येऊ शकतात.)

अर्धविराम Sun, 23/06/2013 - 22:42

यात आणखी एक मुद्दा असा की लिखाण कोणतेही असो, जर तुमचे नसेल आणि तुम्ही जसेच्या तसे ते वापरले असेल तर मूळ लेखनाचा संदर्भ तेथे देणे कायद्याने अत्यावश्यक आहे आणि पूर्ण संदर्भ दिला तरीही कॉपीराइट केलेला असल्यास लेखकाची परवानगीसुद्धा आवश्यक आहे. भारतात वैज्ञानिक लेखनात भयानक चौर्य होते हे जाहीर आहे. जालीय लेखनामुळे साहित्यातही आता तेच सुरू झाले आहे. यापासून संरक्षण देणारा कायदा जवळपास प्रत्येक देशात अस्तीत्वात असला तरीही फेसबुक किंवा ब्लॉग लिहिताना आपण आपले हक्क त्या त्या वेब साईटला तर देत नाही ना हे पडताळणे महत्त्वाचे. फेसबुकवर ते हक्क तुमच्याचकडे राहतात असे त्या संस्थळावर लिहिलेले आहे. बाकी ठिकाणी ही काळजी सर्वांनी मुद्दाम घेतलीच पाहिजे.

अमुक Sun, 23/06/2013 - 23:28

मध्यंतरी एका व्यक्तीच्या जालनिशीवर अनेक मराठी जुन्या कवितांचे छान संकलन होते. मला त्यातल्या काही कविता माझ्या संग्रही हव्या होत्या पण त्यांच्या पानांवरील मजकूर माऊस वापरून निवडता येत नसे. त्यामुळे त्या सगळ्या कविता मला वाचून टंकित कराव्या लागल्या. तेंव्हा जालपृष्ठांना अश्या प्रकारचे टाळे लावणे (मजकूर केवळ वाचता येण्याची मुभा असणे) काही संगणकीय प्रणाली वापरून शक्य आहे, हे उघड आहे.

तर प्रश्न असा उरतो, की या प्रणाली सहज/सर्वांना उपलब्ध नाहीत का ? त्यात काय अडचणी आहेत की ज्यामुळे सगळ्यांना ते शक्य नाही ?

दुर्दैवाने माझ्याकडे त्या जालनिशीचा दुवा / पानखुण नाही. आत्ता या प्रतिसादाच्या निमित्ताने थोडे शोधले, पण व्यक्तीचे नांव विसरल्याने ती पाने मिळणे दुरापास्त झाले आहे.

उपाशी बोका Mon, 24/06/2013 - 00:20

In reply to by अमुक

ब्राउजरमध्ये वेबपेज Save as करून source code बघितले की मजकूर दिसेल. आंतरजालावर copy protection साठी वेळ घालवणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा व्यवस्थित लायसेन्स वापरावे. उदा. क्रिएटिव कॉमन्स, जी.एफ.डी.एल.(GFDL) विकिपीडिया स्वतः GFDL वापरते.

अमुक Mon, 24/06/2013 - 17:58

In reply to by उपाशी बोका

माहितीबद्दल धन्यवाद. परंतु मेघना भुस्कुटे यांनी दिलेल्या पानावर दिलेल्या मजकुराचा सोर्स कोड् पाहून त्यात जे देवनागरी लिपीत दिसले ते साठविण्यायोग्य नाही. परंतु ब्राउज़रची 'एडिट्', 'सिलेक्ट् ऑल्' बटने वापरून मला तो मजकूर मिळवता आला.

अनेक पानांवर 'राईट् क्लिक्' करणे दुर्लभ केले जाऊ शकते जाते, हे त्यानिमित्ताने आठवले.

मेघना भुस्कुटे Mon, 24/06/2013 - 09:59

In reply to by अमुक

हा तो ब्लॉग (अवांतरः जालनिशी हा शब्द ठीक. पण ब्लॉग हा रुळलेला शब्द मला जास्त आवडतो.) आहे काय?

अमुक Mon, 24/06/2013 - 18:04

In reply to by मेघना भुस्कुटे

नव्हे.
मला अंधुक आठवते त्याप्रमाणे तो 'पाटील' नामक (आणि स्पष्ट आठवते की तो) पुरुषाचा होता. बाकी 'उपाशी बोका' यांना दिलेल्या प्रतिसादात मी नमुद केलेच आहे, की या ब्लॉगवरून मी मजकूर मिळवू शकलो. ब्लॉगकरीण तुमच्या ओळखीची असेल तर त्यांना मजकूर मिळविण्याचा किमान एक मार्ग उपलब्ध असणारी किमान एक व्यक्ती आहे असे अवश्य कळवावे. हवे असल्यास तो मी कसा मिळविला ते कळवेन.
(मला कुठल्याही प्रकारचे आंतरजालीय प्रणालींचे ज्ञान नाही.)

उपाशी बोका Mon, 24/06/2013 - 00:10

जर आपल्या कलाकृतीची चोरी होऊ नये असे वाटत असेल तर आंतरजालावर लेखन न करणे हा उपाय सर्वोत्तम आहे.
जर लेखक/लेखिका पैसे कमवण्यासाठी लेखन करत असेल, तर कॉपीराईटचा आग्रह मी एकवेळ समजू शकतो. तसेच इतर कोणी माझे लिखाण वापरले, तर मूळ लेखक/लेखिकेचा संदर्भ द्या, हा विचार पण मी समजू शकतो. पण हौसेसाठी केलेले लेखन इतरांनी पसरवू नये (ईमेलने किंवा इतर वेबसाइटवर), हे म्हणणे म्हणजे माझ्या मते भंपकपणा आहे. Fair Use साठी कलाकृतीचा वापर होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी फेअर यूज बघावे. विषेशतः Common misunderstandings हा विभाग.

अविनाशकुलकर्णी Mon, 24/06/2013 - 10:44

बोक्या सातबांडे नावाच्या चोराची चोरी जालावर पकडली होति..
व तो केस चांगलीच गाजली..पण चो~या थांबवणे अशक्य आहे..

माझि १५ ऑगस्ट नावाची एक जुनी कथा आहे ति अनेक नावानी लोकानी प्रसिद्ध केली होति..

मी मी.पा वर ति टाकली तेंव्हा अश्या चोरिच्या कथा टाकु नये अशी तंबी मिळाली अन मला चक्कर आली शेवटी मला ति कथा माझीच आहे असे सिद्ध करावे लागले..

असो..मनस्ताप आहे..

गवि Wed, 26/06/2013 - 14:10

In reply to by अविनाशकुलकर्णी

सहमत..

म्हणजे असं आहे की कोणीतरी आपला मजकूर चोरुन स्वतःच्या नावावर खपवला त्यामुळे आपल्याला श्रेय मिळालं नाही याचा त्रास अजिबात होत नसून फक्त उद्या कोणीतरी चोराला मूळ लेखक आणि आपल्याला चोर समजेल या कल्पनेने ताप होतो. अर्थात खालील मुद्देही लक्षात घेतलेच पाहिजेतः

-जरा स्थिरस्थावर लेखक असला की बर्‍याचदा वाचक मूळ लेखक कोण आणि भुरटा कोण हे समजून जातात.
-जनरली चोरांचे ब्लॉग्ज इकडून तिकडून लिखाण उचलल्याने हमखास मिश्र प्रकारचे झालेले असतात. लेखकाची खास "सिग्नेचर" अशी कुठे दिसत नाही. यामुळे हे सर्व विविध रंगढंगाचं लिखाण एकाच लेखणीतून आलेलं नाही हे स्पष्ट कळून येतंच.

आदूबाळ Tue, 25/06/2013 - 17:04

श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ | कृत्रिम करी तो कनिष्ठ |
कर्मानुसार प्राणी नष्ट | अथवा भले ||११||

राजे जाती राजपंथें | चोर जाती चोरपंथें |
वेडें ठके अल्पस्वार्थें | मूर्खपणें ||१२||

मूर्खास वाटे मी शहाणा | परी तो वेडा दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||

(दासबोध, समास पाचवा)

-----------------------------
मला वाटतं - दुर्लक्ष करणे हा सर्वात उत्तम उपाय. वाङमयचोर मुळात "अटेन्शन सीकिंग"ची खाज असलेले लोक असतात. थोड्याफार चोर्‍यामार्‍या करून थोडा काळ धकेल. नंतर कोणीतरी पाप पदरात घालेल (नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे) आणि छीथू होईल.

धनंजय Tue, 25/06/2013 - 21:50

"गुप्त सही"ची कल्पना चांगली आहे.

आणखी एक युक्ती. सामान्यच शब्द किंवा शब्दयोगी अव्यये, म्हणजे "आणि, -च, -ही" वगैरे, वापरायचे पण अमुक इतक्या ठराविक शब्दांच्या अंतराने पेरावेत. एखाद्या वाक्यात हे खपून जाईल :
(एखाद्या निबंधातील मूळ वाक्य : "वृत्तपत्रांकडून आपली अशी अपेक्षा असते, की वार्ताहार आणि स्तंभलेखकांनी लिखाण स्वतःहून केले आहे, की निव्वळ नकल उतरवली आहे, त्याची शहानिशा करावी."
"आणि, ...-च .... -च .... ... होय." सही वापरलेले वाक्य : "आणि वृत्तपत्रांकडून आपली अशी अपेक्षा असते, की वार्ताहार आणि स्तंभलेखकांनी लिखाण स्वतःहून केले आहे, की निव्वळ नकल उतरवली आहे, त्याची शहानिशा करावी होय."
"आणि" हा खुणेचा शब्द सोडला, तर ३, १, ४, १, ५ शब्दांच्या नंतर "-च" आहे, आणि वाक्याच्या शेवटी "होय" या खुणेच्या शब्दाने सही बंद होते.

असे असल्यामुळे सफेद टंक वगैरेंची गरज नाही. वाटल्यास सहीची खास अक्षरे सफेद टंकात देता येतील :
"आणि वृत्तपत्रांकडून आपली अशी अपेक्षा असते, की वार्ताहार आणि स्तंभलेखकांनी लिखाण स्वतःहून केले आहे, की निव्वळ नकल उतरवली आहे, त्याची शहानिशा करावी होय."

असे काहीतरी केल्यामुळे सही तर राहील, पण वाक्ये निबंधातील/कृतीतील विषयाशी सुसंगत राहातील. वेगळ्याच कुठल्या रचनेत हे असे असू शकेल :
"आणिपडक्या वाड्याच्या बाजूची शेवाळलेली भिंत म्हणजे आम्हा पोरांची दुपारी शाळेनंतर जमायची खास "गुप्त" जागाच होय!

विषय आणि वाक्यार्थ वेगळाच आहे, पण सही तीच आहे : "आणि" हा खुणेचा शब्द सोडला, तर ३, १, ४, १, ५ शब्दांच्या नंतर "-च" आहे, आणि वाक्याच्या शेवटी "होय" या खुणेच्या शब्दाने सही बंद होते.
---
गंमत आपली.

प्रसाद Wed, 26/06/2013 - 14:06

किंचित अवांतर -

आपण केलेले लेखन आणखी कुठे कुठे आहे किंवा ते कुणी ढापले आहे का हे तपासून पाहण्यासाठी http://www.copyscape.com/ ही वेबसाईट उत्तम आहे. समजा ऐसी अक्षरे वर तुमचे काही लेखन आहे आणि ते आणखी कुठे आहे ते बघायचे आहे तर फक्त adress bar वरून वेबसाईट adress कॉपी करायचा जसं आत्ताच्या "आंतरजाल आणि वाङमय चौर्य" ह्या लेखाचा http://aisiakshare.com/node/1910 असा आहे आणि इथे जाऊन http://www.copyscape.com/ पेस्ट करायचा. That easy to find out.

मिहिर Wed, 26/06/2013 - 14:21

In reply to by प्रसाद

आत्ताच ऋषिकेश आणि तिरशिंगराव यांच्या लेखांचे दुवे टाकून पाहिले. दोन्ही लेख मिपावरही आहेत, दोन्हीही वेळा सापडले नाहीत.

प्रसाद Wed, 26/06/2013 - 15:00

In reply to by मिहिर

बरोबर आहे तुमचे. लिंक देण्यापूर्वी मी टेस्ट चेक केलं होतं तेंव्हा व्यवस्थित चेक झालं. आत्ता होत नाहीये. ह्याआधी मी बऱ्याच वेळा चेक करून पाहिलं होतं, व्यवस्थित दाखवत होतं. आत्ताच का दाखवत नाहीये कुणास ठाऊक.

प्रसाद Wed, 26/06/2013 - 15:02

In reply to by प्रसाद

इंटरनेट एक्सप्लोररवर काहीच सर्च होत नाही. पण मोझील्ला वर The maximum number of scans per month has been reached for this site असा एरर मेसेज दाखवला.