असंच काहीसं होईल...

असंच काहीसं होईल,
चुकून कधी पुन्हा आपली भेट झाल्यावर…
कदाचित, असंच काहीसं होईल,
तुझ्या नजरेला नजर माझी भिडल्यावर…॥ धृ ॥

होईलंच कधी ना कधी भेट,
आयुष्याच्या वेड्या एखाद्या वळणावर…
ओठांवर असेल माझ्या जरासे हसू,
अन असंख्य ओले प्रश्न डोळ्यांच्या काठावर… ॥ १ ॥

चोरशील तू नजर जराशी,
मी काही बोलावयास गेल्यावर…
ओठ शिवले जातील माझे पुन्हा,
तू असं काही वागायला लागल्यावर…॥ २ ॥

तसं तुला काही सुचणार नाहीच,
अन मला देखील नाही काही उमगणार…
बरीच जुनी ठिगळं जातील उसवली,
अन बऱ्याच खोल जखमाही ठस-ठसणार…॥ ३ ॥

जराशी असशील तू बावरलेली,
अन जरा असेन गोंधळलेलो मीही…
थर-थरतील काहीश्या पापण्या तुझ्या,
होईन मग तेंव्हाच काहीसा हळवा मीही…॥ ४ ॥

उगीचंच करावी आपण,
औपचारिक विचारपूस एकमेकांची…
दस्तक उरातून दोघांच्याही,
अकस्मात वाढलेल्या ह्रुदय स्पंदनांची…॥ ५ ॥

दरवळेल हवेत तोच जुना सुगंध,
शिंपडले असशील तू आजही तेच अत्तर…
अन माझ्या साऱ्या अनुत्तरीत प्रश्नांना,
देशील तुझ्या मौनाचं एकंच वेडं उत्तर…॥ ६ ॥

अवचित तराळून येईल नजरेत,
चित्रपट आपल्या त्या साऱ्या लाघव क्षणांचा…
अस्वथ होशील जरा तू, जरा मी,
अन केविलवाणा प्रयत्न तुझा हे सारं टाळण्याचा…॥ ७ ॥

निरर्थक वाटावे आज शब्द हे,
"भेटूया पुन्हा कधीतरी आपण…"
फक्त हसऱ्या नजरेनेच मग,
करावं अलविदा एकमेंकास आपण…॥ ८ ॥

अवजड हे सारे क्षण सरल्याचे,
काहीसे समाधान असेल चेहेऱ्यावर तुझिया…
अवघड हे सारे क्षण सोसल्याची,
व्यथा हळुवार पाझरेल डोळ्यातुनी माझिया…॥ ९ ॥

अनोळखी पुन्हा आपण तसेच पूर्वीगत,
तुटला आज हा बांध क्षणिक काहीसा जरी…
पुन्हा वेगळ्या उद्या वाटा अपुल्या,
पुन्हा दुमडावं दोघांनी ते जुनं पान काहीसं तरी…॥ १० ॥

हो कदाचित,
कदाचित, असंच काहीसं होईल,
आयुष्यात, चुकून कधी पुन्हा आपली भेट झाल्यावर…

- सुमित

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)