Skip to main content

'दुनियादारी'च्या निमित्तानं

काल 'दुनियादारी' पाहायचा विचार होता. 'उंह, मराठी सिनेमा तर आहे. मिळतील आयत्या वेळी तिकिटं' असा फाजील विश्वास. नडला. मल्टिप्लेक्स तर मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थेटरातले खेळही हाउसफुल्ल!

वाचायच्या सुरुवातीच्या दिवसांत सुशिंची पुस्तकं बेहद्द आवडत. पण 'सध्या काय वाचताय?' या प्रश्नाला 'सुहास शिरवळकरांचं अमुक पुस्तक वाचतेय' असं सांगायची चोरी असे. त्यांची पुस्तकं विकत घेणं तर सोडाच, पण लायब्रीतून घेतानाही काउंटरच्या पलीकडची बाई आपल्याकडे तुच्छतेनं पाहतेय असा भास होई. (वास्तविक तसं काही वाटायची गरज नव्हती. मतकरींचं 'अॅडम' देताना आणि दांडेकरांचं 'दास डोंगरी राहतो' देतानाही तिच्या नजरेत एकच निरिच्छ भाव असे. पण - असो. असो!)

सुशिंची पुस्तकं स्वच्छपणे रंजक असत. गूढकथा, गुप्तहेरकथा, कोर्टरूम ड्रामा, डाकू आणि हसीना, कॉलेजातले राडे, प्रेमप्रकरणं... असा साधासोपा नि रोचक मामला असे. अशा रेल्वेबुकस्टॉल प्रकारच्या गोष्टी लिहिणारा, नि त्यातही लोकप्रिय, लेखक म्हटला म्हणजे तो अत्यंत रटाळपणे प्रेडिक्टेबल असायचा. (मी उत्सुकतेपोटी फडक्यांच्या काही कादंबर्‍या वाचल्या / ढकलल्या आहेत. सॉरी. नॉट इव्हन रंजक. पुन्हा, असो!) पण सुशिंची पुस्तकं त्या प्रकारे रटाळ नसत. एकतर त्यांच्या व्यक्तिरेखा जिवंत, हाडामांसाच्या वाटत. नायक म्हटला, म्हणून तो सद्गुणांचा पुतळाच असायला हवा ही अपेक्षा धाब्यावर बसवून त्यांचा फिरोज इराणी माफक बदमाशी करत असे. नायकी वागण्याचे साचे धुडकावून त्यांचे नायक हतबल होत, रडत. नायिकेच्या स्मार्ट वागण्यापुढे नॉनप्लस होऊन, बावळटासारखे तोंड उघडं टाकून इम्प्रेस होत. कधीकधी चाकोरीबद्ध यशाच्या कल्पना उडवून लावत रोखठोक तर्कशुद्धही बोलत. या सगळ्याच्या जोडीला त्यांची भाषा. ती लव्हेबली अकृत्रिम, तरुण होती. लोक मोकळेपणानं शिव्या देत. कॉलेजवयीन पोरं, नाक्यावरचे गुंड त्यांच्या जागेला नि वयाला साजेशी, जोरकस, शिवराळ स्लँग वापरत. 'अगंगं.. गचकतंय आता!', 'तो भंजाळलाच', 'हे येडं बसलंय..', 'पार बुंगाट सुटला.' वगैरे खास सुशिछाप शब्दप्रयोग. वपुंच्या सुविचारी कथांच्या पार्श्वभूमीवर हे कैच्याकैच उठून दिसे.

सुशि म्हणजे कुणी शापित उपेक्षित थोर कलावंत होते नि लोकांना त्यांची योग्यता कळलीच नाही, असा काही दावा नव्हे. त्यांच्या लिखाणाला अर्थातच मर्यादा होत्या. पण त्यांना मिळायला हवी होती, तितकी मान्यता त्यांना मिळाली नाही, हे खरंच आहे. पूर्वी कधीतरी नंदननं विंदांच्या मुलाखतीचा एक संदर्भ दिला होता, त्याची आठवण झाली. साहित्यव्यवहारात सगळ्याच प्रकारच्या लेखकांची आपली अशी एक जागा असते. मनुष्य वाचायला लागल्या लागल्या लग्गेच 'कोसला' किंवा 'मर्ढेकरी कविता' किंवा 'ग्रेस' वाचायला लागत नाही. 'दुर्बोधता' हा दुर्गुणच असतो असं नाही, हे जरी मान्य केलं, तरी त्यातलं सौंदर्य जाणवेपर्यंतचा एक टप्पा असतो. तो अपरिहार्य नि आवश्यकही असतो. त्या टप्प्यावर वपु, सुशि, संदीप खरे यांसारखे लोक असतात. साहित्य लोकाभिमुख करण्यात ते कळत नकळत आपला वाटा उचलत असतात. त्यांना इतकं तुच्छ लेखलं जायला हवं का, असं 'दुनियादारी'च्या निमित्तानं प्रकर्षानं वाटलं. 'जे अभिजात ते आणि तेच फक्त वाचनयोग्य, बाकी सगळी रद्दी' या दृष्टिकोनामागे नक्की कुणाचे हितसंबंध असतात, दुर्बोधतेला डोक्यावर घेणारा (आणि पर्यायानं तिच्यावरच्या अनाठायी रोषास कारण होणारा) वर्ग साहित्याचं नक्की कोणतं दूरगामी हित साधत असतो, असे प्रश्न पडले.

असो. 'दुनियादारी' कधी बाजारात मिळे, कधी नाही. अधूनमधून ते सातत्यानं औटॉफप्रिंट असे. आता सिनेमाच्या निमित्तानं ते पुन्हा बाजारात येईल. न लाजता घेऊन ठेवायला हवं.

ऋषिकेश Mon, 29/07/2013 - 12:02

मार्मिक लेखन!

त्यांना इतकं तुच्छ लेखलं जायला हवं का

सहमत आहे. प्रत्येकाची एक गरज असते. रंजक ऐतिहासीक कादंबरीने भाराऊन जाण्याच्या वयात / वाचनाच्या टप्प्यात त्या वाचल्या होत्या. आता अंताजीची बखर वाचताना त्या कादंबर्‍यांतील भडकपणा, हिरोला लार्जर दॅन लाईफ रंगवणे, कृत्रिम भाषा वगैरे सगळे जाणवते, पण त्या कादंबर्‍यांऐवजी थेट अंताजीची बखर वाचली असती तर मुळात वाचनाची गोडीच लागली असती का सांगता येणार नाही. ठकठक, चंपक किंवा चांदोबा यांचे वाचनाच्या प्रवासात अढळ स्थान आहे. किंवा उलट बाजुने जीए एका तासाच्यावर झोप न येता अजूनही वाचता येत नाहीत मात्र त्याचा अर्थ म्हणून ते थोर आहेत असेही नाही ;) वगैरे वगैरे ...

या निमित्ताने (बहुदा तुमचेच का दुसरे कोणाचे आठवत नाही पण) मिसळपाववरचे एक संपादकीय आठवले. कमळ उगवण्यासाठी आजुबाजुला चिखल निर्माण होणेही तितकेच आवश्यक असते आणि त्याचे महत्त्व त्या कमळाइतकेच थोर आहे अश्या काहिशा अर्थाचा! (दुवा (वेळ) मिळाला की देतोच)

==
१ मुळ लेखातील किंवा अन्य कोणालाही चिखल म्हणण्याचा हेतू नाही

बॅटमॅन Mon, 29/07/2013 - 12:24

In reply to by ऋषिकेश

मूळ लेखाशी अन या प्रतिसादाशी विशेष सहमत आहे.

आता अंताजीची बखर वाचताना त्या कादंबर्‍यांतील भडकपणा, हिरोला लार्जर दॅन लाईफ रंगवणे, कृत्रिम भाषा वगैरे सगळे जाणवते, पण त्या कादंबर्‍यांऐवजी थेट अंताजीची बखर वाचली असती तर मुळात वाचनाची गोडीच लागली असती का सांगता येणार नाही. ठकठक, चंपक किंवा चांदोबा यांचे वाचनाच्या प्रवासात अढळ स्थान आहे.

हे सगळ्यात जास्ती पटलं. हुच्चभ्रू लोक कितीही नाके मुरडोत, जे आवडते ते न लाजता सांगता यायला हवे. वाचनात रस निर्माण करण्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज असते (कैकदा इतिहासाचेही असेच असते). पुढे मग हुच्चभ्रू क्लबात शिरकाव झाला की नाक मुरडामुरडीची फ्याशन सुरू होते आणि त्या अहमहमिकेत जे खरेच आवडते त्यालाही हाडहूड केल्या जाते. तस्मात तसे होऊ नये, या आशयाशी सहमत.

अवांतरः मी सुशि फारसे वाचले नाहीत- दुनियादारी सोडून काहीच नाही आणि दुनियादारीही थोडीच वाचली. शाळेशी तुलना करता खास वाटली नाही. रादर शाळेचा प्रभाव असल्यानेच

नववी: दंगा मस्ती अन माफक प्रेमप्रकरणे आणि हुशारीची इन्फॉर्मल औटलेट्स
ज्यु. कॉलेजः ?

हे त्रैराशिक सोडवल्यागत लिहिलेय असे वाटते. म्हंजे कॉलेजात पोरे जास्तीतजास्त करून काय करणार, तर गँगबाजी-लिहा गँगबाजी इ.इ. वाटले. त्यामुळे विरस झाला. मित्रांना आवडण्याचे अजून एक कारण म्हंजे पुण्याची पार्श्वभूमी. ते फिक्सेशन नसल्यानेही विशेष फरक पडला नाही. असो.

विसुनाना Mon, 29/07/2013 - 15:27

In reply to by बॅटमॅन

'दुनियादारी' ही (बोकिलांच्याच नं?) 'शाळा'नंतर वाचल्याने तुमच्यावर असा उलटा परिणाम झाला.

शाळा २००४ साली प्रसिद्ध झाली तर दुनियादारी १९८२-८३ साली...(?) मी दुनियादारी पहिल्यांदा वाचली तीच मुळात १९८६ साली.
तेंव्हा त्रैराशिक मांडायचेच तर कॉलेजात सुशि तर शाळेत बोकील असे मांडावे लागेल...असो. :)

आदूबाळ Mon, 29/07/2013 - 15:28

In reply to by बॅटमॅन

पुढे मग हुच्चभ्रू क्लबात शिरकाव झाला की नाक मुरडामुरडीची फ्याशन सुरू होते आणि त्या अहमहमिकेत जे खरेच आवडते त्यालाही हाडहूड केल्या जाते.

अगदी करेक्ट!

विसुनाना Mon, 29/07/2013 - 13:19

"दादा कोंडक्यांचे चित्रपट मला आवडत!"
अत्यंत धीरगंभीर आणि सखोल विचारांच्या एका वयस्काकडून हे मत ऐकले आणि बारा-तेरा वर्षे वयाचा 'मी' दचकलोच होतो! "काय म्हणालात, काका? दादा कोंडके? तुम्हाला दादा कोंडक्यांचे चित्रपट आवडत?" माझ्या स्वरात उपहास ओतप्रोत भरलेला होता.
त्यानंतर त्यांच्या त्या 'आवडीचे' समर्थन करण्यात त्या काकांचा बराच वेळ गेला होता.
***

तारुण्याच्या उंबरठ्यावर सुशिंच्या अनेक कादंबर्‍या.कथासंग्रह त्यातली 'साहित्यमुल्ये' वगैरे धाब्यावर बसवून दणादण वाचून काढल्या आहेत.त्यांच्या लेखनशैलीवर फिदा झालो आहे.
त्यांचा 'फ्यॅन' म्हणून जेजे काही करता येईल तेते सर्व केलेले आहे.

८५२, रविवार या त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटलो आहे. (सुशि तसे शुक्रवार - फडके हौद ओळखीतले.)
तो वाडा पाडल्यानंतर ते डहाणूकर कॉलनीत जाऊन राहिले होते. त्या घरी तर आम्ही चार-पाच मित्रांनी (निर्लज्जपणे) मुक्काम ठोकलेला आहे.
रात्री त्यांच्याच घरी (काकूंच्या हातचे) बिन्धास्त हादडले आहे.
सुशिंना माझ्या गाढव-कविता पाठवल्या आहेत. त्यांच्या 'मृगया' कथेवर एकांकिका लिहिण्यासाठी लेखी परवानगी मिळवली आहे.(आणि ती एकांकिका आजतागायत लिहिलेली नाही.)
सुशि आमच्या गावात आले तेव्हा आमची चांडाळ चौकडी त्यांच्या हॉटेलरूमवर रात्रभर पडीक होती. म्हातार्‍या साधूच्या संगतीत त्यांच्या अनेक कथा ऐकल्या आणि आमच्याही थोर कथा त्यांना
आत्मविश्वासाने ऐकवल्या होत्या.
श्रीधर चैतन्य नामक एका मित्राने खरेदी केलेली 'दुनियादारी' मी ढापलेली आहे.(त्याने हे वाचले तर माफ करून टाकावे.)

त्यांच्याबद्दल लिहिताना ते मंतरलेले दिवस आठवतात आणि त्यांचे 'साहित्य' वगैरे कसे होते याचे लांब चेहर्‍याचे मूल्यमापन करणे शक्यच होत नाही.
सुहास शिरवळकर एक लोकप्रिय आणि सहज लेखक होते. माणूस म्हणून तर थोरच होते.- इतकेच कोरडे शब्द उरतात.
***

तरीही "सुशिंचे लेखन मला प्रचंड आवडत असे" असे चाळीशीचा मी उघडपणे कुणाला सांगत नाही.

इत्यलम!

नितिन थत्ते Mon, 29/07/2013 - 14:02

सुहास शिरवळकरांची पुस्तके मी ही वाचली आहेत. आवडलीही आहेत. गुरुनाथ नाईकसुद्धा आवडले आहेत.

सुहास शिरवळकरांना जीए किंवा फडके/खांडेकर/अत्रे/दळवी/श्रीना यांच्यासारखे थोर साहित्यिक न मानले जायला हवे होते का या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. साहित्यिक थोर कशामुळे ठरतो याची मला कल्पना नाही.
एखाद्या लेखकाची किती पुस्तके किती पिढ्यांचे वाचक वाचतात यावर ठरू शकेल.
शिरवळकर, गुरुनाथ नाईक (तसेच सुमती क्षेत्रमाडे वगैरे) यांचे साहित्यव्यवहारात काही एक स्थान असते. ते त्यांना थोर ठरवण्यास पुरेसे नसते असे वाटते.

सविता Mon, 29/07/2013 - 16:13

अगदी अगदी....

विंग्रजी वाचनाची सुरवात कॉलेजकाळात आम्ही मिल्स एन्ड बून्स ने केली, आणि तसली पुस्तके होती म्हणून शेवट्पर्यंत वाचायची उत्सुकता राहायची. मग स्कार्लेट, सिडने शिल्डन अशी पुढची-पुढची पायरी करत आता "द सेल्फिश जीन", "द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ" वगैरे वाचायची शक्ती आलीये म्हणूयात. (खरेतर नाही अजून आली. हौसेने पुस्तक घेतले पण त्यातली भाषा दुर्बोध वाटते, एक पण पान डिक्शनरी ची अजिबात मदत न घेता वाचता येत नाही, त्यामुळे बाजूला पडली आहेत ती पुस्तके!)

कविता महाजन Mon, 29/07/2013 - 17:16

ही पुस्तकं नेमकी माझ्या हाती कधी लागली नाही आणि नंतर त्यांविषयी तितकी उत्सुकता राहिली नाही.
फडके, खांडेकर, वपु, योगिनी जोगळेकर, गुलशन नंदा यांची नावाला एकेक पुस्तके मुद्दाम वाचली की काय प्रकार आहे. अजूनही काही हिंदी लेखक, पण आता नावे आठवत नाहीत.
धारप मात्र वाचण्यात मजा आली. एकुणात गुढकथा, रहस्यकथा हे प्रकार वाचायला आवडत होते त्या काळात.
मध्यंतरी एकदा दिवाळी अंकांमधल्या पाडलेल्या पाचपंचवीस कथा रतीब लावावा तशा वाचून काढल्या. यात बर्‍याचशा लेखिका.
यातल्या माधुरी शानभाग यांच्याघरी एक दिवस मुक्कामाला होते, बेळगावला व्याख्यान होतं तेव्हा. त्यावेळी त्यांच्याशी 'लोकप्रिय साहित्य' या विषयावर सविस्तर बोलणं झालं, ज्यातील काही मुद्दे मला फार आवडले.
त्यांचा एक मुद्दा असा होता की लेखक कोणत्याही स्तरातील असो, त्याला आपला असा एक वाचकवर्ग असतोच. तो दाद देत असतो. आपल्या मर्यादांसह आपल्याला तो स्वीकारतो किंबहुना त्या मर्यादांमुळेच स्वीकारतो.
दुसरा मुद्दा होता की, अनेक वाचक वेगवेगळ्या स्तरांमधील लेखन वेगवेगळ्या कारणांनी वाचत असतात. त्यामुळे श्याम मनोहर आणि सुहास शिरवळकर दोन्हीही आवडणारा एकच वाचक असू शकतो.
तिसरा मुद्दा अजून एका मित्राने मांडला तो असा... गंभीर, खोल, चिंतनात्मक लेखन करणारी माणसं कमी; ती मोजकंच लिहिणार हेही निश्चित. अशावेळी ज्याची भूक मोठी आहे त्या वाचकानं काय करायचं? तो बहुभाषिक असेल, तर इतर भाषांकडे वळेल. नसेल तर आपल्याच भाषेतल्या अनुवादित पुस्तकांकडे वळेल. तीही पुरेशी नसतील तर? अर्थातच तो लोकप्रिय साहित्याकडे वळेल. कारण ते संख्येने मुबलक उपलब्ध असते.

अवांतर : प्रा. रेखा साने - इनामदार यांचा प्रबंध 'लोकप्रिय साहित्या'वर आहे. तो अत्यंत वाचनीय आहे.

मन Mon, 29/07/2013 - 18:12

कबुली देउनच टाकायची असेल तर माझ्याकडूनही:-
(गटणे :- "होय, पूर्वी (चहा, कॉफी अशी पेये)पीत होतो" च्या चालीवर)
पूर्वी शालेय वयात दवणे आणि साने गुरुजी ह्यांची काही पाने वाचण्यात आली होती.
.
.
त्याहीपूर्वी....
पूर्ण नाव आठवत नाही पण (रमेश?)मुधोळकर नावाचे कुणी एक लेखक होते. थोरांच्या गोष्टींची मालिकाच त्याम्नी काढली होती. पंचवीस तीए पानी पुस्तके असत. फॉन्ट मोठ्ठा असे. एका पानवर फार तर पंधरावीस ओळी बसत."बोधप्रद" कथा सत. देशभक्तीचा आणि समाजसेवेचा उपदेश केलेला असे. थोडकयत "संस्कारवर्ग"क्याटेगरीतली पुस्तके. जयंत्या, पुण्यतिथ्यांना आणि १५ ऑगष्ट -२६ जानेवारीला सहपाठी त्या पुस्तकातील उतारे पाठ म्हणून दाखवत. फडाफडा बोलल्याने त्यांना बक्षिसे मिळत.
.
अधेमधे:-
चाचा चौधरी, पिंकी अशी कॉमिक्स वाचण्यात येइ.(दोन तीन इयत्त पुढे असणारी मंडळी तेच वाचत, त्यामुळे त्याला आम्च्या शालेय जीवनात ग्लॅमर होते. कार्टून नेटवर्क भारतात अवतरायचे होते. नेते मंडळी डीडीवर करत, तेवढेच काय ते हाती येइ. असो. ) चुकून एकदोनदा जादुगार मैन्ड्रेक्- फायटर लूथर वाचले. पण भावले नाही. त्यानंतर "विनोदी/चतुर" क्याटेगरी बदलून आम्ही "राज कॉमिक्स" च्या धाडसी, थरारक प्रकाराकडे वळलो. त्यात जादुई तलवारीनं लढणारा (बिन्डोक) भोकाल होता, त्याचा जादुगार मित्र शूतान्, पत्नी तुरिन होते. नंतर "नागराज" वाचण्यात आले, पण त्याही वयात ते भलतेच ओंगळवाणे वाटले.विशेषतः त्यातील चित्रे. ते सोडून मग "सुपर कमांडो ध्रुव"चा फ्यान झालो. आजही, सर्व सुपरहिरोंपैकी हा माझा सर्वाधिक आवडता प्राणी. कुठलीही विशेष शक्ती नाही. विशेष, जगावेगळे औजार्/हत्यार्/साधन किम्वा औषधी त्याच्याकडे नाही. म्हणजे बरेचसे "चाचा चौधरी"सारखेच. फक्त तल्लख बुद्धीसोबत तरुण, धडाकेबाज्,साहसी. पण सर्व मानवी मर्यादा ह्याला लागू होतात. तरीही सर्व प्रसंगात हा इतर सुपरहिरोंना तोडिस तोड किंबहुना काकणभर सरसच ठरतो. हा म्हणजे अलिफ -लैला मधल्या कोणत्याही "खुदा का नेक बंदा" क्याटेगरीत येणारा. निव्वळ जिगर्,धाडस ह्यावर लढणारा.(अलिफ लैला मध्ये बहुतांश वेळा जादुइ ताकती व्हिलन कडेच असतात.मग तो हातिमताई असू देत, सिंदबाद असू देत किम्वा अलिबाबा-चाळिस चोर किंवा इतर अजून काही. ) महाभारतीय युद्धात अर्जुन कसा दिव्यास्त्राशिवाय(दिव्यास्त्र न चालवता) लडह्त होता, तद्वतच. अर्जुन्-हातिमताई ह्यांचा आजचा अवतार म्हणजे सुपर कमांडो ध्रुव.

विसुनाना Mon, 29/07/2013 - 19:36

In reply to by मन

रमेश मुधोळकर हे स्वतःचित्रकारही होते. अनमोल प्रकाशनाची 'ती' बहुतेक सर्व पुस्तके (गोवंडे यांच्या पुस्तकांसह ))आजही माझ्याकडे आहेत.

मैत्र Tue, 30/07/2013 - 21:49

In reply to by विसुनाना

रमेश मुधोळकरांची पुस्तकं सुमारे पंचवीस एक वर्षापूर्वी दहाच्या आतल्या वयात वाचली आहेत.
आजही ती काहीशा गडद भडक रंगामधली मुखपृष्ठे आणि तो पूर्वी शाळेत मिळणार्‍या 'घोटीव कागद' वाटावा अशा जरा विचित्र गुळगुळीत कागदावर छापलेली.
चांगला ठसठशीत मोठ्ठा टाइप..
थोडी चांदोबाच्या वळणाने जाणारी पण जरा त्यापेक्षा कमअस्सल अशी चित्रे (चांदोबातली आणि त्यातही विशेषतः विक्रम वेताळाच्या गोष्टीतली चित्रे अप्रतिम असत. गेल्या कित्येक वर्षात चांदोबा पाहिला नाही) आणि त्यावर कोपर्‍यात 'रमु' अशी त्यांची सही.
अब चौकात तेव्हा सहजपणे मिळायची ही पुस्तकं कुठल्याही दुकानात.

इतक्या वर्षांनी ही आठवण छान वाटली.. धन्यवाद!

संदर्भ असलेले अवांतर : त्यानंतरच्या शाळेतल्या वयात साधारण चौथी पाचवीत ८९-९० च्या सुमारास गोपीनाथ तळवलकरांचे 'आनंद' मासिक येत होते. ते जरा त्यांच्याच पद्धतीचे थोडेसे साने गुरुजी टाइप गोड गोड गोष्टी असे स्वरुप होते. नंतर ते बंद पडल्यावर 'किशोर' आणी 'कुमार' मासिके यायची ग्रंथालयात.
आता मराठी माध्यमात फार कमी मुलं जातात. त्यात किती मुलं मुलांची पुस्तकं वाचतात आणि कुठली मासिकं असतात देव जाणे..

मी Mon, 29/07/2013 - 18:24

ओरिएन्टेशन नामक प्रकार वाचनाची शैली घडवतो, वाचनाची आवड असणार्‍या घरात वाचनाचे संस्कार बर्‍याच लवकर होतात, वातावरण लिबरल असेल तर..आता हे वातावरण प्रकरण जरा क्लिष्टच आहे..म्हणजे..वातावरण लिबरल/गंभीर/बहुभाषी/पारंपारीक/वैचारीक/काल-सापेक्ष वगैरे असल्यास तदनुषंगाने वाचनाचे संस्कार होतात (विलास सारंग लिहितात "१० वी पर्यंत सगळी(म्हणजे लोकप्रिय नक्कीच असावे) मराठी पुस्तके वाचून झाली होती...", तर बरेचसे दहावीपर्यंत शाळेचं सोडून इतर पुस्तकाला हातही लावत नाहीत..पण ते असो).

त्याचबरोबर मोठ्या वर्तुळातलं लोकप्रिय ते वाचून झाल्यावर इतर लहान-मोठ्या वर्तुळातलं लोकप्रिय काय आहे असं म्हणत ते वाचण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातून आधिच्या वर्तुळात वाचलेल्याला छेद जाणारं पण पटणारं असं काही वाचनात आलं की मग ह्या सोवळ्या-ओवळ्याच्या जागा तयार होण्यास पोषक असं वातावरण तयार होतं. वाचनाबरोबर विचार बदलले किंवा अधिक सहिष्णू झाले तर सोवळं कमी कडक असतं पण काहीही झालं तरी टेस्ट मॅच खेळणारा ट्वेन्टी-ट्वेन्टी खेळणार्‍याकडे तुच्छतेनेच पहातो.

पण लोकप्रिय साहित्य सगळ्याच विचारांना/भावनांना व्यापणारं असेलच असं नाही, मग त्या विचारांबद्दल विचार करणारं साहित्य जरा कमी लोकप्रिय असलं तरी ते बर्‍यापैकी वैचारीक मंथनातुन आलेलं असु शकतं त्यामुळे त्याचं मुल्य सहज-भावनेने प्रसवणार्‍या साहित्याच्या तुलनेत जरा जास्त वाटणं नैसर्गिक असु शकतं.

बरं, लोकप्रिय साहित्य वाचुन, त्याचा आनंद घेउन मग हे थोडं वैचारीक साहित्य वाचणारी मंडळी मुळात चार बुकं जास्त वाचलेली असतात त्यामुळे तुच्छ-उच्च चे नियम ठरवणारेही तेच असतात, पण बॅटमनने म्हंटल्याप्रमाणे तुच्छ-उच्च वगैरे ज्याच्यात्याच्यापाशी असा विचार ठेवला की धाग्यातली भावना किंवा द्विधा मनस्थिती उद्भवत नाही.

आता मला दुनियादारी पुस्तक आवडलं, जरा शाळकरी वयातचं वाचलं मग सुशीची ती दारा, मंदार वगैरे पात्रं असलेली काही पुस्तकं वाचली, जोशीले हा सिनेमा तर सुशीच्या कुठल्याशा कथेवर आधारीत आहे असा माझा अजुनही डाउट आहे, शरदाचं चांदण(का तसलचं काहीसं) वगैरे प्रेमकथा पण वाचली, बरी होती.

चित्रपटाबद्दल बोलायचं तर पाह्यलेला नाय, पण अंकुश चौधरीने गेल्या अनेक चित्रपटातुन जी अपेक्षा निर्माण केली आहे ती पहाता त्याने साकारलेला दिग्या पहाण्याची इच्छा होत नाही, बाकी पात्ररचना बरी वाटते आहे, गेलाबाजार प्रभात मधे ४० रुपयात शो बघता येऊ शकेल असं वाटतं आहे.

राजेश घासकडवी Mon, 29/07/2013 - 20:03

माझ्या एका मित्राचा उत्कृष्ट कलाकृतीबद्दल एक निकष आहे, तो नेहमीच मला उपयोगी पडलेला आहे. तो म्हणतो की कुठचीही कलाकृती किमान मनोरंजक असावी. गंभीर संदेश वगैरे असावाच. जीवनाविषयी काहीतरी भाष्य वगैरे उत्तमच. पण ज्याला इतक्या सगळ्या भांजगडीत पडायचं नसेल त्याच्यासाठी किमान मनोरंजन पदरी पडावं. वेळ छान जावा. ज्यांमध्ये या दोन्ही गोष्टी साधलेल्या असतात त्या मला अतिशय आवडतात. विशेषतः ज्या कथांमधून संदेश दिला आहे हे कळतही नाही इतक्या त्या मनोरंजक असतात त्या सगळ्यात बेष्ट.

एक उदाहरणच द्यायचं झालं तर 'आमेली' पिक्चर - अंतर्मुखतेविषयी बोलतो. पण ते करताना नर्मविनोदाच्या माध्यमातून करतो. 'पाडस' सारखी कादंबरी तर बाल्य संपून रुक्ष जगात प्रवेश करण्याविषयी बोलते - पण वाचक गुंगून रहातो एकोणिसाव्या शतकातल्या अमेरिकन फ्रंटियरवरच्या आयुष्यात, त्या झाडाफुलांत आणि तो मुलगा आणि त्याचं पाडस यांच्या नात्यात.

असो. मी सुशींची पुस्तकं वाचलेली नाहीत. पण 'निव्वळ मनोरंजनात्मक' म्हणून जे काहीसं हिणवलं जातं ते अनेक वेळा मला अन्याय्य वाटत आलेलं आहे. उत्कृष्ट प्रतीचं मनोरंजन करणं ही सोपी गोष्ट नव्हे.

चिंतातुर जंतू Mon, 29/07/2013 - 20:18

>>नायक म्हटला, म्हणून तो सद्गुणांचा पुतळाच असायला हवा ही अपेक्षा धाब्यावर बसवून त्यांचा फिरोज इराणी माफक बदमाशी करत असे. नायकी वागण्याचे साचे धुडकावून त्यांचे नायक हतबल होत, रडत. नायिकेच्या स्मार्ट वागण्यापुढे नॉनप्लस होऊन, बावळटासारखे तोंड उघडं टाकून इम्प्रेस होत. कधीकधी चाकोरीबद्ध यशाच्या कल्पना उडवून लावत रोखठोक तर्कशुद्धही बोलत.

चांगली निरीक्षणं. ही लक्षणं साधारण ज्याला 'हार्ड बॉइल्ड' अमेरिकन डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणतात त्यांतल्या नायकांची आहेत. ठळक उदाहरणं - रेमंड चँडलर, डॅशिएल हॅमेट, जेम्स हॅडली चेस. अर्ल स्टॅनले गार्डनर आणि त्याचा पेरी मेसन हा चँडलरचा पूर्वसुरी म्हणता येईल. ज्या सत्तर-ऐंशीच्या दशकात शिरवळकरांची ही पुस्तकं येत होती त्या काळात ही पुस्तकं आपल्याकडे भडक रंगांतल्या उत्तान मुखपृष्ठांसह पुष्कळ ठिकाणी स्वस्तात उपलब्ध असत. उदा : हे पाहा :

अनेक वाचनालयांमध्ये ही पुस्तकं चांगलीच लोकप्रिय दिसत. कव्हरचा भडकपणा, उत्तानपणा आणि पुस्तकांची लोकप्रियता ह्यांमुळे मी शाळेत असताना त्यांच्याकडे वळलो. तेव्हा मी त्यांचे काही मराठी अनुवादसुद्धा वाचले होते असं आठवतं. (कुणी केलेले वगैरे काही अजिबात लक्षात नाही.) शिरवळकर थोडेफार वाचले, पण हे असलं बरंच काही वाचलेलं असल्यामुळे त्यात तेव्हा फारसं नावीन्य वाटलं नाही. नंतर हातात धरले नाहीत.

>>या सगळ्याच्या जोडीला त्यांची भाषा. ती लव्हेबली अकृत्रिम, तरुण होती. लोक मोकळेपणानं शिव्या देत. कॉलेजवयीन पोरं, नाक्यावरचे गुंड त्यांच्या जागेला नि वयाला साजेशी, जोरकस, शिवराळ स्लँग वापरत. 'अगंगं.. गचकतंय आता!', 'तो भंजाळलाच', 'हे येडं बसलंय..', 'पार बुंगाट सुटला.' वगैरे खास सुशिछाप शब्दप्रयोग. वपुंच्या सुविचारी कथांच्या पार्श्वभूमीवर हे कैच्याकैच उठून दिसे.

शेवटचं वाक्य रोचक आहे. मला वाटतं कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणत्या वयात शिरवळकर वाचले गेले त्यावर त्यांचं आकर्षण अवलंबून असावं. इथे माझं पुन्हा असं झालं की आळेकरांची नाटकं सत्तरच्या दशकात ताजी ताजी असताना पाहिली गेली. त्यांच्या प्रभावाखाली म्हणा, किंवा स्वतंत्रपणे, पण अनेक एकांकिका स्पर्धा किंवा नाट्यस्पर्धांमधून तरुण मुलांनी त्यांची अशी भाषा वापरलेली ऐकली. असंच कधी तरी भाऊ पाध्यांचं 'वासूनाका' वाचलं होतं (त्याचंही कव्हर भडक किंवा उत्तान होतं असं आठवतं). त्यामुळे थोडीफार विनोदनिर्मिती आवडली ते सोडता शिरवळकरांचा भाषेचा वापर फार काही विशेष वाटला नाही.

मेघना भुस्कुटे Mon, 29/07/2013 - 21:08

या निमित्ते एक कुतुहल शमवते: आपल्याला अमुक एक लेखक / कवी / गायक / संगीतकार / नट / दिग्दर्शक आवडतो, पण चारचौघात म्हणायची थोडी काचकूच वाटते. असं कोण आहे का, नि असल्यास कोण, सांगा बरं.

रुची Mon, 29/07/2013 - 23:14

In reply to by मेघना भुस्कुटे

हे गिल्टी प्लेजर प्रकरण आवडलं! कबूली देऊन टाकते, अनंत सामंतांची पुस्तके पूर्वी आवडायची पण मग ते कळत्या वयात मान्य करायला लाज वाटायची. अर्थात अलिकडच्या काळात त्यांचं काही परत वाचलं नाही त्यामुळे आता त्याबद्द्ल काय मत होतंय ते पडताळून पाहिलं नाही. त्या वयात, त्यांच्या कथांतल्यासारखा 'माचो नायक' फार्फार आवडायचा आणि तो इतर मराठी पुस्तकांत फार सापडायचा नाही. एकूणच त्यांचे मर्चंट नेव्ही, पोलिसी वगैरे मर्दानी विश्व आकर्षित करायचे खरे :-)

अमुक Mon, 29/07/2013 - 23:47

In reply to by रुची

त्यांनी मराठीत आणलेले 'लांडगा' वाचले आहे का तुम्ही ? तुम्हाला 'पाडस' आवडले असेल तर हे अवश्य वाचावे ही विनंती.
जॅक लंडनच्या 'व्हाईट् फॅङ्ग' या पुस्तकाचे भाषांतर आहे. या पुस्तकावर त्याच नावाने चित्रपट (१९९१) व त्याचा दुसरा भागही (१९९४) येऊन गेला आहे.

रमताराम Tue, 30/07/2013 - 18:15

In reply to by अमुक

व्यक्तिचित्रणाचा अभ्यास करायचा असेल तर लांडगा' आवर्जून अभ्यासावे असे पुस्तक, आमचे आल टैम फेवरिट्ट. दुसरे कॉल ऑफ द वाईल्ड काहीसे व्हाईट फँग च्या उलट प्रवासाचे. दोनही उत्कृष्ट म्हणावीत अशी पुस्तके, अर्थात व्हाईट फँग बरेच उजवे.

चित्रपटही सुंदर आहेत, फक्त नावावरून वाटतात तसे ते पूर्णपणे कादंबर्‍यांवर आधारित नाहीत. त्यात खुद्द जॅक लंडनच्या आत्मचरित्राचा काहि भागही बेमालून मिसळून दिला आहे. दोन्ही मधे जॅक हे एक पात्र म्हणूनच येते, जे कादंबरीत अर्थातच नाही. खरंतर कादंबरीमधे भरपूर फेरफार करूनही चित्रपट आवडला असे हे दुर्मिळ उदाहरण.

बॅटमॅन Mon, 29/07/2013 - 23:25

In reply to by मेघना भुस्कुटे

आम्ही तसे लै निर्लज्ज. तस्मात सांगूनच टाकतो काही अन-हुच्चभ्रू आवडी.

नट

रजनीकांत
मिथुनदा
गोविंदा
दादा कोंडके
जॅकी चॅन, जेट ली अन समस्त कुंग फू भुतावळ
काउबॉय पिच्चरमधले टिपिकल नट

लेखक

शिवाजी सावंत
रणजित देसाई
विश्वास पाटील
व पु
५० शेड्स ऑफ ग्रे
इ.इ.

बाकीचे अजून आठवेल तसे अपलोडवतो.

आणि समस्त प्रकारची कार्टून्स-९० च्या दशकातली, विशेषतः कार्टून नेटवर्कमधली. शिवाय १९६६ साली प्रथम आलेली बॅटमॅन सेरीज.

उपास Mon, 29/07/2013 - 23:54

In reply to by मेघना भुस्कुटे

उत्तम संधी :)
यादी बरीच लांब होईल पण चांदोबा अजूनही लोळत वाचावासा वाटतो! मंगला गोडबोलेंचे बरेचसे लिखाण आवडतेच त्यांची पुढच्या पिढीशी असलेली नाळ कौतुकास्पद वाटते (लोकसत्तेत चतुरंग मध्ये जुनी वीट नव राज्यातील सगळेच नाही पण बरेच लेख सुंदर!)
षटकार, चौकार लहानपणी अगदी हरखून जाऊन वाचायचो, तसंच ठकठक, चंपक आणि डायमंड कॉमिक्स..

मूळ लेख आवडला पण 'दुनियादारी' च्या विषयापासून (नुसताच) सुरू होऊन लोकप्रिय लेखकाची मोजमाप किंवा वाढत्या वयाबरोबर आणि बदलत्या सामाजिक स्थितीबरोबर बदलणारी वाचनाची आवड असा सर्वसमावेशक मत्रप्रदर्शनीय वाटला आणि तरीही आवडला!:)

उसंत सखू Tue, 30/07/2013 - 10:05

In reply to by मेघना भुस्कुटे

लहानपणी ब. मो . पुरंदरे याचे लेखन आवडत होते . आता या माणसाला आयुष्यभर
फक्त शिवकल्याण राग आळवत बसायचा कंटाळा कसा येत नाही याचे नवल वाटते .
दादा कोंडकेचे काही विनोद अजूनही आवडतात . व. पु . च्या सुरुवातीच्या काही कथा
आवडल्या होत्या . मग कंटाळा आला . आपल्याच पात्रांच्या तोंडून ते आपल्या सो कॉल्ड
चमकदार , हुशार विधानांची यथेच्छ तारीफ करून घ्यायचे . त्यामुळे चाणाक्ष नसलेल्या
वाचकांना त्यांच्या प्रेमात पडायला सोपे जायचे . चांदोबा सहज मिळाला तर अजूनही आवडतो .

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 30/07/2013 - 19:25

In reply to by उसंत सखू

ब. मो. पुरंदरे होतेच. शिवाय लहानपणी संघ परिवारापैकी कोणीतरी प्रकाशित केलेल्या चिकार पुस्तिका वाचल्या होत्या. ही सगळी राष्ट्रपुरुषांची चरित्रं होती आणि या पुस्तिकांवर लेखकाचं नाव नसे. शाळकरी वयात धर्मभास्कर वगैरे संघिष्ट वाङ्मय चाळल्या/वाचल्याचंही आठवतं.

सुशि, वपु, बाबुराव अर्नाळकर, इ. लेखक ज्या वयात लोकं वाचतात तेव्हा वाचले नाहीत. आता तेवढा उत्साह नाही. दादा कोंडक्यांच्या शिणुमांबद्दलही तेच. 'महागुरुं'ची पिच्चरं सायन्स जर्नलं भरताना पाहिली होती; आता पाचेक मिनीटांच्या वर ते सहन होत नाही.

रुपाली जगदाळे Tue, 30/07/2013 - 01:11

शाळेत सुशींची 'जाई' चोरून वाचलेली अजूनही आठवतेय. जाम आवडली होती तेव्हा. बाबा कदम वाचायला सहजी उपलब्ध असायचे. विसं, वंपु ठीकठाक आवडायचे. फडक्याचं मात्र काहीच वाचू शकले नाही. युनिव्हर्सिटीत जाईपर्यंत खरंतर चांगली पुस्तकं हाताशी आली नाहीत त्याची आता खंत वाटते.

साबु Tue, 30/07/2013 - 10:37

गुरुनाथ नाइकान्ची कॅ. दीप सिरीज, गरुड कथा..
चिंतामणी लागुंच्या समुद्र कथा...

मेघना भुस्कुटे Tue, 30/07/2013 - 11:26

वा! मज्जा येतेय!
आता सुशि वाचायला घेतले तर बोअर होतं. वपु मला कधीच आवडले नाहीत. सावंत नि देसाईपण आता बोअर मारतात. पण सामंत अजूनही कधीकधी आवडतात. संदीप खरे मात्र अधूनमधून चमकवून टाकणारं काही लिहितो. मला आवडतो संदीप खरे अजूनही. 'देवा मला रोज एक अपघात कर' किंवा 'माझी सही नसलेली एक कविता तिच्याकडे, मी हट्टी, तिच्या बोटांचे ठसे असलेली माझ्याकडे एक काचेची पट्टी' असलं काही घनघोर लिहीत असला तरीही...

सहज Tue, 30/07/2013 - 11:37

In reply to by मेघना भुस्कुटे

तीन प्रतिथयश नावे एकत्र घेतल्याने भावना दुखावल्या गेल्या असतील तर एडव्हान्स मधे क्षमा मागतो.

संदीप खरे हे प्रविण दवणे यांचे पुढचे [पिढीचे] व्हर्जन आहे का? जितक्या मोजक्या वेळा तू नळीवर दिसलाय, वसंत बापट ते दवणे या मधे कुठेतरी दवणे यांच्या जवळपास वाटलाय.

नितिन थत्ते Tue, 30/07/2013 - 11:42

In reply to by सहज

वसंत बापट आणि दवणे?

मेलो.....
दवणे ही साने गुरुजींची पुढची आवृत्ती होती बहुधा (होती म्हणजे दवणे आहेत अजून).

मेघना भुस्कुटे Tue, 30/07/2013 - 12:49

In reply to by सहज

मला संदीपच्या कवितेत बोरकरांचा भास होतो. कधीकधी, पण होतो.

दवणे सागुंची पुढची पिढी असण्याबद्दलः
सागुंच्या गोड गोष्टी मला लहानपणी तरी आवडत असत. दवण्यांचं का-ही-च क-धी-च आवडलेलं नाही. त्यामुळे या साम्याला माझा ठाम विरोध आहे.

चिंतातुर जंतू Tue, 30/07/2013 - 12:56

In reply to by मेघना भुस्कुटे

>> सागुंच्या गोड गोष्टी मला लहानपणी तरी आवडत असत. दवण्यांचं का-ही-च क-धी-च आवडलेलं नाही. त्यामुळे या साम्याला माझा ठाम विरोध आहे.

हे साहजिक आहे. त्यांच्या काळाचा विचार करता साने गुरुजी सच्चे, स्वप्नाळू आणि निरागस वाटतात. दवणे जेव्हा त्यांचं पाहून तसलंच काही तरी आज करू पाहतात तेव्हा ते कृतक आणि बनेल वाटतं.

सहज Tue, 30/07/2013 - 13:04

In reply to by चिंतातुर जंतू

@ नि. थत्ते - अहो माफी आधीच मागीतली आहे.
@ मे. भुस्कुटे - मान्य आहे, तसेही कवितेतले मला फारसे कळत नाही त्यामुळे माझे चुकीचे मत असेलही.
@ चि. जंतू - तेव्हा देखील सच्चे, स्वप्नाळू, निरागस, जिद्द, ध्येय यांचा ग्राहक वर्ग होता व आजही आहे. उगाच नाही प्रो. दवणे यांच्या चित्रफिती चक्क नंदन सारख्यां गुणग्राहकांच्या खव मधे देखील विराज'मान' होतात. ;-)

उपास Tue, 30/07/2013 - 19:05

In reply to by मेघना भुस्कुटे

संदिपच्या 'मौनाची भाषांतरे' ने मनावर केलेलं गारुड अजून उतरत नाहीये.. 'नसतेस घरी तू जेव्हा', 'दिवस असे की','कसे सरतील सये..','बॅचलर..','हे भलते अवघड असते', 'मी मोर्चा नेला नाही' ,नामंजूर' 'नास्तिक' अशा कविता केवळ अप्रतिम! त्याच्या कवितांमधलं विशेषतः बालगीतांमधलं वैविध्य पाहून हरखून जायला होतं! सोप्पे शब्द इतके की पांडगावकरांनी डोक्यावर हात ठेवलाय का असं वाटावं!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 30/07/2013 - 20:49

In reply to by उपास

संदिप खरेला लहान मुलांसाठी गाणी लिहीता येतात असं वाटलं. एक-दोन घरांमधल्या लहान मुलांना या गाण्यांवर नाचताना, बागडताना पाहिलं. शब्द ऐकले तेव्हा मलाही ते आवडले.

मग त्या कंटाळा, नास्तिक वगैरे विषयांवरच्या कविता वाचल्या... आणि मग, असो.

lakhu risbud Tue, 30/07/2013 - 17:58

सुशि च्या कादंबऱ्या कॉलेजात फार आवडीने वाचल्या नंतर मग इंग्लिश चित्रपटांचे आणि मालिकांचे दालन खुले झाल्यावर मात्र आता त्या वाचण्यातील मजा गेली. बाकी रमेश मंत्रींच्या,आणि वि आ . बुआ यांच्या कादंबऱ्या निखळ विनोदी असत. मंत्रींचा तो जनु बांडे नायक आणि त्याचे कारनामे असणाऱ्या कादंबऱ्यांची मालिकाच होती बहुतेक. सुशि प्रमाणेच हे लेखक पण अभिजन (??) वर्गाच्या दुर्लक्षाचेच धनी ठरले.

बॅटमॅन Tue, 30/07/2013 - 18:32

In reply to by lakhu risbud

रमेश मंत्रींचा जनू बांडे हे एक खत्रा प्रकरण होतं. लैच आवडलेला प्रकार. बढती म्हणून ००५ ऐवजी नंबर ०००५ होणे, शिग्रेटीच्या लायटरमधून व्ह्यू-फैंडर असणे आणि बुटाच्या तळाशी मिसाईल असणे, क्ष आणि इतर लोक, इ.इ.इ. प्लस त्यातली ती रेखाचित्रे-बहुतेक सरवटेंची असावीत- हे सगळे लहानपणी गारूड/इंद्रजाल करून गेले.

अवांतर:

*** विसुनानांनी वर उल्लेखिलेले ते रमेश मुधोळकरांनी लिहिलेले टार्झनचे पुस्तकही माझ्याकडे आहे. लहानपणी हरवल्यावर बारावीनंतर पुन्हा एकदा विकत घेतले :)

चांदोबा, चंपक यांबरोबरच फँटम कॉमिक्स यांचा उल्लेख न करणे म्हंजे त्यांच्यावर अन्याय केल्यागत होईल. त्या प्रभावाखाली मी आणि माझ्या मित्राने एकदा बॅटमॅनचे कॉमिक बनवले होते. कार्टून्स पाहून मी कथा लिही, तर मित्र चित्रे काढी. जोकरचे नाव "पीतदंत" असे ठेवलेले आणि मित्राला त्यावरून अथर्वशीर्षातला "एकदंतं चतुर्हस्तं" हा श्लोक आठवलेले अजून आठवते. सर्व कथांचा शेवट "आणि बॅटमॅन दारू पीत आपल्या कंप्यूटरवर चोरीचे अहवाल पाहत बसला" असाच होत असे आणि चित्रही तेच. गेल्या वर्षी मित्राच्या घरी जुन्या अडगळीत ते कॉमिक सापडले. त्याने सांगितल्याक्षणी त्याच्या घरी गेलो आणि पुन्हा कॉमिक बघून डोळे पाणावले. ***

रमताराम Tue, 30/07/2013 - 18:20

तरीही दुनियादारी हे केवळ पौगंडावस्थेतच आवडावे असे पुस्तक आहे असे आमचे मत आहे, कुणी हुच्चभ्रू म्हणून नाके मुरडली तर आम्ही अशा नाकमुरड्यांना फाट्यावर मारतो.

शिवाय वपुंना वाचनाच्या पहिल्या टप्प्यावरच वाचण्याचे लेखक म्हणणारे किंवा त्यांना आणि जीएंना केवळ शब्दाचे खेळ करणारे समजणार्‍यांना देवाने लवकर मोठे करावे अशी प्रार्थनाही करतो. असो.

Nile Tue, 30/07/2013 - 20:34

वरील लोकांच्या फुटलेल्या गुपितांवरून "मराठी समाज अजूनही मागे का?" या प्रश्नाचे उत्तर आम्हास आज कळले. ;-)

Nile Tue, 30/07/2013 - 22:19

In reply to by बॅटमॅन

मुळात आमच्या खरडी इतरांना "तुम्ही मागे का" हे दाखवण्याकरताच लिहलेल्या असतात. बाकी हे तुम्हाला आज कळले, यावरून तुम्ही किती मागे आहात हे स्पष्टच आहे!

छिद्रान्वेषी Mon, 18/11/2019 - 14:46

तंतोतंत. सुहास शिरवळकरांच्या थोरपणाबद्दल काही बोलायचे नाही मला, पण का कुणास ठाऊक त्यांची पुस्तक कधी वाचावी अस वाटलच नाहीत मला - इथे सोयीनुसार पुलं, कुसुमाग्रज वगैरे नावे घालावीत. आपोआप,जाणकार चोखंदळ वाचकांच्या रांगेत जाऊन बसता.

कुलस्य Mon, 18/11/2019 - 15:28

सु.शि. थोर लेखक होते की नाही, मला माहीत नाही. तसंही ते सापेक्षच आहे. पण ते लेखक म्हणून शापित नक्कीच होते. लोकप्रिय आणि कथित रंजनवादी लेखक असण्याचा त्यांना फटका बसला. केवळ रहस्यकथालेखक म्हणून त्यांना मोडीत काढून ( बाय द वे, परदेशात चांगल्या रहस्यप्रधान लेखानलाही अभिजात दर्जा दिला जातो. इथे मात्र रहस्यकथा म्हणल्यावर न वाचताच नाक मुरडण्याची पद्धत का आहे? आरिजिनल आहे की नाही हा पुढचा भाग) त्यांच्या सामाजिक लेखनाकडे पूर्ण दुर्लक्ष आणि एखाद्या विषयावर त्यांनी काही लिहिलं की हळूच त्या विषयांवर चर्चा, लेखमाला, सदर अशा अनेक गोष्टी अभिजात म्हणवणार्‍यांनी केल्या आहेत. सुशि लेखक म्हणून प्रचंड लोकप्रिय होतेच पण हे लोकप्रिय असणंच कुठेतरी शाप ठरलं हे खरं. अगदी याच संपूर्ण धाग्यात रंजनवादी म्हणून सुशिंना ज्या लेखकांच्या मालेत बसवले आहे, त्यावरून हा अन्याय जास्तच दिसतो.
मी वयाच्या 16 व्या वर्षापासून सुशि वाचतो आहे आणि आज माझे वय ३०. अजूनही सुशि माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. मला किंवा आमच्या फेसबूक ग्रुप आणि पेजच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या हजारो चाहत्यांपैकी कुणालाही ते सांगताना कधीही लाज वाटलेली नाही. असो !

दाह Wed, 20/11/2019 - 10:39

आठवी नववीत असताना बाबा कदमांची पुस्तकं खूप आवडायची. बाबा कदम म्हटलं की अजूनही अनेक जण नाकं मुरडतात. पण त्या वयात ती वाचताना भारी वाटायचं.