पतंग

           

पतंग

मी आणि माझा नवरा काही कामाकरता चीनला चाललो होतो. मुलं पुण्यातच रहाणार होती, माझ्या भावाकडे. 'काय आणू मी चीनहून तुमच्यासाठी? मी मुलांना विचारलं, ' आम्हाला ना, पतंग आण मम्मा एखादा छानसा', तिघाही मुलांनी एकच गिल्ला केला. नुकतंच त्यांनी चीनी लोककथांचं पुस्तक वाचून काढलं होतं आणि चीनमध्ये खूप सुंदर पतंग तयार होतात ही मौलिक माहिती मिळवली होती. मुलं असतातच अशी नादिष्ट! एखादं नवीन पुस्तक वाचलं की त्यातली एखादी कल्पना भोवऱ्यासारखी खूप वेळ भिरभिरत राहते त्यांच्या चिमुकल्या डोक्यात. 'हो नक्की आणते हं मी तुमच्यासाठी पतंग', मी एखाद्या मंत्र्याच्या थाटात भरघोस आश्वासन देऊन मोकळी झाले. पण मंत्री मी अर्थातच नव्हते त्यामुळे दिल्या आश्वासनाला जागणं मला भागच  होतं.  

खूप शोधलं बीजिंगमध्ये, पण मला हवं होतं तसं, जुन्या पद्धतीच्या, हाताने बनवलेल्या, खास चीनी धाटणीच्या, कापडी पतंगांचं दुकान काही केल्या सापडेना. प्रत्येक दुकानात दिसायचे ते भडक रंगांचे, प्लास्टिकपासून बनवलेले, आधुनिक पतंग. शेवटी एकदाचं एका जुन्या, निरुंद, काळोख्या बोळात मला हवं होतं तसं पारंपारिक पतंगांचं दुकान सापडलं. अलिबाबाची गुहा गवसल्याचा आनंद मला झाला. कितीतरी वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे पतंग ठासून भरले होते त्या इवल्याश्या दुकानात. जवळ जवळ सगळं दुकान व्यापून टाकणारा एक प्रचंड, सहा फुटी, लालभडक ड्रेगन होता आणि त्याच्या पाठीवरचे पिवळेधमक खवले. भलीमोठी मोरपंखी फुलपाखरं आणि त्यांच्या पंखावरचे हळदिवे-तांबडे ठिपके, जणू हळदी-कुंकवाची मंगल बोटंच टेकवली आहेत कुणीतरी त्या पंखांवर. रंगीबेरंगी मासे, वेगवेगळ्या आकाराचे पक्षी, सोनेरी आयाळीचा एक सिंह, जणू आख्खी प्राणीसृष्टी त्या दुकानात पतंगांच्या रूपाने अवतरली होती.  

थोडा वेळ शोधल्यानंतर अगदी जसा हवा होता तसा पतंग मला सापडला. छोटासा, सुबक, माश्याच्या आकाराचा, लालसर गुलाबी रंगाचं रेशमी शरीर आणि त्यावर पिवळ्या रंगाचे, कसबी हातानी रंगवेलेले अर्ध-चंद्राकृती खवले. दोन्ही बाजूना चमचमणारे, सोनेरी, पंखांसारखे मोठे फिन्स! गोल तपकिरी डोळे. सुरेखच होता तो पतंग. दुकानदाराशी बरीच घासाघीस करून मी तो पतंग विकत घेतला. त्याने एका सुंदर, हिरव्या रंगाच्या पुठ्ठयाच्या खोक्यात तो पतंग मला निट बांधून दिला. आत लालचुटुक सेटिनची मऊ गाडी आणि वर ऐटीत विराजमान झालेला माझा रेशमी मासा. परतीचा सगळा प्रवास मी ते अनमोल खोकं अंगावर बाळगूनच केला, उगाच एखादी वजनदार पिशवी पडून खोकं ठेचलं जाऊ नये म्हणून.  

घरी आल्या आल्या खोकं मुलांच्या ताब्यात दिलं. आतला तो सुबक पतंग पाहून मुलं हरखून गेली. 'चल ना मम्मा, मांजा आणायला. आज संध्याकाळीच उडवायचा हा पतंग आपण डोंगरावर', लडिवाळपणे मुलांनी लकडा लावला. त्यांचंही बरोबरच होतं. उडवला नाही तर तो पतंग कसला? लगेच माझ्या भावाने जाऊन नवं-कोरं मांजाचं रीळ विकत आणलं. त्याच संध्याकाळी आमचं आख्खं लटांबर पतंगासकट घरामागच्या टेकडीवर निघालं. 

टेकडीवर पोचल्यानंतर एखादी बहुमोल खजिन्याने भरलेली पेटी उघडावी त्या हळुवारपणे मुलांनी ते पतंगाचं खोकं उघडलं. पंख निट जोडले, मांजा बांधला. अर्जुनने रीळ पकडलं आणि अनन्या हातात पतंग घेऊन वाऱ्याच्या दिशेने धावत सुटली. वारा भणाणत होताच. 

थोडा वेग घेतल्यावर अनन्याने  हातातला पतंग हात उंच करून हवेवर सोडून दिला. तिघाही मुलांचे विस्फारलेले डोळे आता आकाशाकडे लागले होते. आमचा सोनेरी मासा थोडासा वरती गेला आणि वाऱ्यावर एक क्षीण भरारी घेऊन कपाळमोक्ष झाल्यासारखा धाड्कन जमिनीवर आपटला. मुलांचे चेहेरे हिरमुसले. परत एकदा अनन्याने पतंग वाऱ्यावर सोडून दिला, परत तो खाली आपटला. आता आदिने तो पतंग उडवायचा प्रयत्न केला, मग अर्जुनने, मग मी, मग माझ्या नवऱ्याने, पण पतंग काही आकाशात भरारी घ्यायचं नाव घेईना.   

एव्हाना आजूबाजूची सगळी लोकं आमच्याकडे कुतूहलाने तर काही, किंचित कुचेष्टेने बघायला लागली होती. जवळच खालच्या गावामधली काही थोडी मोठी मुलं त्यांचा घरी बनवलेला पतंग उडवत होतीं.  साधा, जुन्या वर्तमानपात्रापासून बनवलेला पतंग, पण आकाशात एखाद्या बाणासारखा सरळसोट, उंच गेला होता. आमचा चीनी मासा मात्र जमीन सोडायला काही तयार होत नव्हता. मुलांचे रडवेले चेहेरे मला बघवेनात, मी सरळ त्या मोठ्या मुलांना गळ घातली, 'तेव्हढा आमचा पण पतंग उडवता का'? त्या मुलांनी जाणकाराच्या अविर्भावात आमच्या पतंगाचा ताबा घेतला. त्यातल्या सगळ्यात मोठ्या मुलाने पतंग हातात घेऊन मागे मागे जात जोरदार स्टार्ट घेतला आणि हातातून पतंग वाऱ्यावर भिरकावून दिला. पतंग फडफडत दहा-एक फूट वर गेला, आम्ही सगळेच आता श्वास रोधून पतंगाकडे पहात होतो. पतंग आता वरती जाणार असं वाटेपर्यंत, कसचं काय, एक जोरदार गिरकी घेऊन आमचे मासोबा परत एकदा सपशेल खाली आदळले. आता तो पोरगा हट्टाला पेटला होता, ' उडत कसा नाही पतंग ते बघतोच आता', अश्या अविर्भावात त्याने परत एकदा दात-ओठ खाऊन प्रयत्न केला. पण पतंग काही उडायला तयार नव्हता.  

आता आसपासचे सगळेच लोक तो पतंग उडवायच्या खटपटीला लागले होते. सगळी पोरं, टेकडीवर फिरायला आलेले म्हातारे, हवा खायला आलेली कॉलेजमधली पोरं, सगळेच. सगळ्यांच्या डोळ्यात एकच शाळकरी उत्कंठा होती, पतंग उडेल की नाही? सगळ्यांनी आलटून-पालटून प्रयत्न केले पण तो चीनी पतंग किंचित वरती जायचा आणि पंख तुटलेल्या पाखरासारखा धडपडत जमिनीवर आपटी खायचा. 

आमचा पतंग काही शेवटपर्यंत उडालाच नाही, पण त्या दिवशी तिथे जमलेल्या सगळ्या लोकांच्या मनाचा पतंग मात्र उंच उंच आकाशात भरारी घेत होता!                    
           

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

साधासाच अनुभव.
मला वाततं जाड कापडी पतंग(ताडपत्रासारख्या जाड कापडाचे) नुसत्या मांजाने उडत नाहित. त्याला विशिष्ट पद्धतीने अधिक बांधणी करावी लागते.
आणि शिवाय दोर्‍या सुद्धा नायलॉनच्या असतात. डिस्कवरीवर पाहिलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणी 'मेड इन चायना' कडून शिकवणीही घ्यायला हवी होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणीचे दिवस आठवले.. अगदी लहान कशाला काही वर्षांपूर्वीच.. डोंगरीवरुन दहा बारा कोडी पतंग आणायचे आणि बरेलीचा मांजा (सी२८, गेंडा, पांडा तुमच्या ऐपती आणि सफाई प्रमाणे) आणि मग दिवसभर गच्च्यांवर आणि कौलांवर.. गिरगावात धमाल असायची, दिवाळीपासूनच संक्रांतिचे वेध लागायचे.. खूप शिव्या खायचो, कारण डोळे नेहमी आकाशात! आता मात्र एका बिल्डींगवरुन दुसर्‍या बिल्डींगवर सोडलेल्या अनिर्बंध केबल वायरींमुळे पतंग उडवणार्‍यांचे वांदे झालेत.
असो, तुम्ही पतंगाची कणी कशी बांधता, त्याला भोकं कुठे/ कशी पाडता ह्यावर बरंच काही अवलंबून आहे, कुठलाही पतंग हा उडणारच! लेख साधाच पण मस्त..

(पतंगांच्या आठवणीने हळवा..)
- उपास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

पोरं, टेकडीवर फिरायला आलेले म्हातारे, हवा खायला आलेली कॉलेजमधली पोरं, ह्या सगळ्यांबरोबर आम्ही पण त्या घोळक्यात होतो असं अनुभवायला लावलं तुम्ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

पतंगाचा आकार वेगळा असेल तर कन्नीची मापं पण वेगळी असणार! शिवाय शेपटी नसल्यास त्याचा तोल कसा साधणार हे ही कळलं नाही

बाकी ललित लेखन म्हणून साधासाच प्रसंग रंगवणं आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!