सतीश तांबे, एक बातचीत : "करमण्यातून कळण्याकडे"

सतीश तांबे, एक बातचीत : "करमण्यातून कळण्याकडे"

- ऐसीअक्षरे

चोखंदळ वाचकाला सतीश तांबे हे नाव ठाऊकच आहे. ‘राज्य राणीचं होतं’सारखा राज्यशासनाकडून उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला कथासंग्रह, ‘बिन बायकांच्या जगात’ ही चतुरंग प्रतिष्ठानचा सवाई लेखक पुरस्कारप्राप्त एकांकिका, ‘माझी लाडकी पुतनामावशी’ आणि ‘रसातळाला ख प च’सारखे दर्जेदार कथासंग्रह ह्यांतून त्यांच्या लेखनाची ओळख होतेच. ह्या लेखनामागच्या लेखकाशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांचे विचार 'ऐसी'च्या वाचकांसमोर खास मांडण्यासाठी घेतलेली ही मुलाखत.

ऐसी अक्षरे: तांबे, 'मॉलमध्ये मंगोल'ह्या काहीशा चमत्कारिक नावाचा तुमचा नवा कथासंग्रह 'अक्षर' प्रकाशनातर्फे प्रकाशित होतो आहे. ह्या घटनेचं निमित्त साधून तुमच्याशी गप्पा माराव्यात, तुमच्या स्वतःच्या लिखाणाबद्दल, एकंदर साहित्य-सांस्कृतिक व्यवहाराबद्दल तुमची मतं जाणून घ्यावीत हा ह्या मुलाखतीमागचा उद्देश.

एक लेखक म्हणून तुमची ओळख बर्‍याच जणांना तुलनात्मकदृष्ट्या उशिरा झालेली आहे. त्यातून जाणवणारी गोष्ट अशी की, तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्षं आहात. मित्रांसोबत मुलांकरता चालवलेला आणि त्या काळी अभिनव असा मानला गेलेला 'अबब हत्ती'सारखा नियतकालिकाचा प्रयोग, चोखंदळ वाचकांमध्ये प्रिय असलेल्या 'आजचा चार्वाक'सारख्या दिवाळी अंकातलं योगदान आणि कथालेखन... साहित्याबद्दल आस्था असणारी एक व्यक्ती म्हणून तुम्ही आता तीनेक दशकं कार्यरत आहात. असं असूनही वाचकांना आता-आता माहिती होणं हे 'फ्लाईंग अंडर द रडार' असल्यासारखं वाटतं. तर याबद्दल सुरुवातीला थोडं सांगता का?

तांबे: वाचक-लेखक ह्यांची गाठ पडणं ही दुतर्फी प्रक्रिया अहे. आणि त्यात लेखक-संपादक-प्रकाशक-वितरक-विक्रेते-समीक्षक-माध्यमं-वाचक अशी मोठी शृंखला गुंतलेली आहे. तर मराठीत तिची स्थिती काय आहे याचा वेध घ्यायला हवा. माझ्यापुरतं सांगायचं, तर 'साप्ताहिक दिनांक'पासून माझं लेखन सातत्यानं प्रकाशित होत होतं. 'जोडपेपण' ह्या पहिल्याच कथेला १९८४ साली 'अनुष्टुभ'मध्ये रेवा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या कथा दिवाळी अंकातून छापून येत होत्या. मात्र माझा पहिला कथासंग्रह आला २००४ साली. तोपर्यंत सुमारे २०+ कथा प्रकाशित झालेल्या होत्या. मला प्रकाशकदेखील विचारत होते. पण मीच बेपर्वा होतो. त्या पुस्तककरूपानं आल्या-न आल्या याचं तेव्हा मला काही सोयरसुतक नव्हतं. आता अशी जाणीवच नसणं ह्याला निष्काळजीपणा म्हणायचं किंवा अनास्था?

उदाहरणार्थ एक आठवण सांगतो. १९९०च्या सुमाराला माझा कथासंग्रह काढायचा असं चाललं होतं. पण माझा एक अत्यंत जवळचा गुणी साहित्यिक मित्र विवेक मोहन राजापुरे १९८७ साली निवर्तला. त्याच्या पश्चात त्याच्या कथांचं पुस्तक आधी निघावं आणि नंतर माझं असं माझ्या मनानं घेतलं; कारण तो आता हयात नाही तेव्हा त्याचं कोण बघणार, असं मला वाटलं. पण त्याच्या ज्या इन्यागिन्या ९ कथा होत्या, त्या प्रयत्न करूनही सापडेनात. त्यामुळे ते पुस्तक काही निघेना. तर या आग्रहात माझं पुस्तक तेव्हा रखडलंच. विवेकच्या कथांचं पुस्तक अलीकडेच लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केलं आहे. नंतर २००४ साली जेव्हा 'राज्य राणीचं होतं' हा माझा पहिला कथासंग्रह आला नि त्याला वाचकांचा नि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तेव्हा कुठे जाणवलं की, पुस्तक काढणं ही एक 'बरी गोष्ट' आहे की. दरम्यान चाळीस-पंचेचाळीस कथा लिहिलेल्या असल्यानं, तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही पुढे दोन प्रसिद्ध व्हावेत इतका ऐवज जमा झालेला आहे. आता यात लेखकाची जशी अनास्था आहे, तसं थोडं प्रकाशकांचंही पुढे-मागे असायचंच. मात्र हे जे घडलं त्यात काही फार वाईट झालं असंही मला वाटत नाही.

माझे संग्रह उशिरा आले म्हणून माझं फारसं काही बिघडलं नाही. कारण १९८४ सालची कथा २००४ साली जरी वाचकांसमोर आली, तरी ती २०१३मध्ये शिळी वाटत नाही, अजूनही ती रिलेव्हंट वाटते, यात एक वेगळंच समाधान वाटतं. दुसरं असं की, प्रकाशन, पुरस्कार अशा लौकिक गोष्टींचा मी फारसा विचार करत नाही. तसं 'अबब हत्ती' नि 'आजचा चार्वाक'बद्दलही मी नमूद करेन की, ते फार लोकांपर्यंत पोचले नाहीत खरे. मात्र ज्यांच्यापर्यंत पोचले त्यांनी ते जपून ठेवल्याचं आवर्जून सांगतात. 'अबब हत्ती'मध्ये प्रस्थापित बालसाहित्यिकांना प्राधान्य न देता, नवनवीन लोकांना बालवाङ्मय लिहायला प्रवृत्त केलं. यातून काही प्रस्थापितांना दुखावल्यासारखं झालं खरं, पण मूळ हेतू हा लहान मुलांना नवनवीन प्रयोग पाहायला मिळावेत असा होता. तो सफल झाला. प्रस्थापितांना जवळ न केल्यामुळे बालसाहित्याचा विषय आला की 'हत्ती'चं नाव टाळलं जातं, तर ते ठीकच आहे.

ऐसी अक्षरे: आता थोडंसं तुमच्या वैयक्तिक पार्श्वभूमीबद्दल. बहुतांशी असं दिसतं की, साहित्यातले लोक हे एकतर शैक्षणिक क्षेत्रातले तरी असतात किंवा पत्रकारितेतले. किंवा मग सामाजिक/राजकीय चळवळींमधले. तुम्ही इथेही थोडे वेगळे वाटता. उदा. एका बँकेत तुम्ही अधिकारी होता. तर याबाबत तुम्हांला 'आऊटसायडर' असं म्हणायचं का? तुमच्या जडणघडणीबद्दल थोडंसं सांगाल का?

तांबे: माझ्या आजोबांपासून नि वडलांपासून घरात ग्रंथांचं वातावरण होतं. भट्ट विद्याभूषण तांबेशास्त्री या माझ्या आजोबांनी सोळा पुस्तकं लिहिली होती. वडीलही पाठशाळेत संस्कृतचं अध्ययन केलेले काव्यतीर्थ होते. शास्त्रीबुवा. माझ्या मामालाही पुस्तकांची नितांत आवड. आईच्या माहेरचा कर्जतला मोठा बंगला होता. मला लहानपणी तिकडेच ठेवलेलं होतं. पण तिकडे असताना मी उंडगेपणा करायचो म्हणून शेवटी वडलांनी मला मुंबईला जोगेश्वरीला बैठ्या चाळीत राहायला आणलं. घराच्या आजूबाजूची वस्ती ही झोपडपट्टीवजा बकाल होती. तिथे राहणारी माणसं कोकणी, मुसलमान अशी वैविध्यपूर्ण. तिथल्या लोकांशी संपर्क आला. त्यामुळे सुट्टीत राहायला बंगला नि एरवी झोपडपट्टीतल्या लोकांमध्ये उठबस, यामुळे लेखक म्हणून माझी दृष्टी चांगली विस्तारित झाली असंच मी मानतो. परिणामी मी कुठल्याही वातावरणात निवांत राहू शकतो, मला वर्ज्य असं सहसा काही वाटत नाही. असो. तर सांगायचं काय, तर भाषेची आवड वडलांकडून नि साहित्याची मामाकडून आली. मामाला जुनी गाणी नि पुस्तकांचा छंद. त्याचा जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर वगैरेंच्या बरोबर पत्रव्यवहार होता. खानोलकरांना तर मी मामाबरोबर भेटलोदेखील होतो एक-दोन वेळा. हाच भाग जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटतो.

ऐसी अक्षरे: संस्कृत भाषेचा वारसा होता असं तुम्ही म्हणालात; परंतु तुमचा पुढचा प्रवास काही त्या दिशेनं झाला नाही. भाषेचा खेळ तुम्हांला जमतो नि त्यात कधीकधी संस्कृतची झलक दिसते तेवढीच. क्वचित तुम्ही 'पुलीश-फूलीश' अशी कोटीही केली आहे.

तांबे: खरं सांगायचं, तर त्याचा उलटाच परिणाम झाला. 'सिद्धांत कौमुदी' आणि पाणिनीसारख्यांचे ग्रंथ यांचे अभ्यासक असणार्‍या शिक्षकी पेशातल्या वडलांची नेहमीची आर्थिक तंगी पाहून मनात यायचं, या प्रकारच्या विद्वत्तेचा नेमका उपयोग काय? ते कालिदास, भवभूती, 'अवदितगतयामां रात्रिरेवं व्यरंसीता' ह्या वचनात कालिदासाने निव्वळ एक अनुस्वार टाकून बदललेला अर्थ. . . या सार्‍यात शब्द्धच्छलाखेरीज काहीही मजा नाही असंच तेव्हा वाटलं नि मी तिकडे पाठ फिरवली. आता कधीतरी 'तेही थोडं वाचायला हवं होतं' असं एखाद्या वेळी मनात येतं, ते तेवढ्यापुरतंच. पुलंच्या संस्कृतप्रचुर / भाषिक विनोदाबद्दलही थोडं तसंच वाटायचं नि त्यातून 'पुलीश' असं मी म्हणून गेलो. पुलंची पुस्तकं मी वाचलीत. त्यातली टागोरांवरच्या व्याख्यानांच्या पुस्तकासारखी एखाद-दोन आवडलीसुद्धा. परंतु त्यांच्या कोट्यांमुळे आणि हुकुमी हसवत ठेवण्याच्या खुबीमुळे लोक त्यांना श्रेष्ठ लेखक म्हणून त्यांचा जो उदो उदो करायला लागले, तो काही पटेना. कशाला किती महत्त्व द्यावं याचं उत्तर मी माझं माझ्यापुरतं ठरवलं. कविता, कथा, कादंबरी या साहित्यप्रकारांना मी अव्वल साहित्यप्रकार समजतो. बाकीचं साहित्य हे स्फुट, फुटकळ वाटतं. 'व्यक्ती आणि वल्ली' लिहिणाऱ्या पुलंना त्यांची पात्रं करून कथा-कादंबऱ्या लिहायची इच्छा होऊ नये ही मला त्यांची मर्यादा वाटते.

याखेरीज प्रभावच सांगायचा, तर शिक्षकांचा निश्चितच होता. मी दादरच्या छबिलदास शाळेत ८ वी ते ११ वी होतो. तिथे कवी प्रफुल्लदत्त, संपादक-लेखक बालशंकर देशपांडे, कथा-कादंबरीकार आर. के. जोशी, 'दुर्गा झाली गौरी' लिहिणारे नाटककार माधव साखरदांडे असे तेव्हाचे प्रथितयश लिहिते हात शिकवायला होते. शिवाय वडील त्याच शाळेत शिक्षक असल्यामुळे शाळेच्या लायब्ररीमधली पुस्तकं तेव्हा मुबलक आणि सहज उपलब्ध होती.

ऐसी अक्षरे: त्या वेळी कुणा एका लेखकाचा प्रभाव आपल्यावर पडला असं वाटतं का?

तांबे: शाळेत असताना मी वाचलेली 'ययाती' ही पहिली कादंबरी. तिचा नक्कीच प्रभाव पडला. तो अर्थात माझ्या वयाचा परिणाम होता. नंतर आमच्या रुईया कॉलेजात तेव्हा सरोजिनी वैद्य, वसंत बापट, प्र. ना. परांजपे, सदानंद रेगे इत्यादी साहित्यिक होते. त्यांच्याशी संपर्क आला, परंतु जुजबीच. डायरेक्ट प्रभाव पडला असं म्हणता येत नाही.

ऐसी अक्षरे: थोडं स्थूलमानानं बोलायचं, तर महानगरी लेखक असं तुमचं एक वर्णन करता येईल. ही ओळख बरीच ढोबळ, अपुरी आहे. 'महानगरी लेखक' ही जमात म्हणजे गेल्या सुमारे पंचवीस वर्षांमधली घटना असं म्हणता येईल का? यात भाऊ पाध्यांसारखी नावंही येतात. तुम्हांला एक लेखक म्हणून ह्या संदर्भात काय वाटतं?

तांबे: भाऊची नि माझी ओळख जुनी. त्याचं 'वासूनाका'पासून सर्व वाचलेलं. भाऊच्या प्रत्येक कादंबरीमध्ये स्क्रीनप्ले आहे असं मला वाटतं. कारण मुळात तीच त्याची आवड होती. हा प्रवाहीपणा त्याच्या लिखाणात जाणवत असला, तरी माणसाच्या मनात शिरण्यासाठी चपखल शब्दांची हुडकाहुडक पुरेशा ताकदीनं करण्यात तो कुठेतरी गाफील आहे असं वाटतं. याचं कारण त्याच्या कथानकाची भिस्त ही दृश्यात्मकतेवर होती. 'महानगरी लेखक' अशी अमुक एक ओळख आहे असं मला वाटत नाही. लेखकांचा प्रभावच व्यक्त करायचा, तर श्याम मनोहर नि माझी खूप प्रदीर्घ अशी ओळख होती. आम्हांला एकमेकांचा खूप सहवास लाभला. कमल देसाईंशीही माझा संपर्क आला. त्यांची नि माझी चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे प्रत्येकाचा प्रभाव हा पडलाच. अहो, इतकंच कशाला - व. पु. काळे यांचंही कथाकथन मी ऐकलं आहे. त्यांचा काळ पाहिला आहे. त्यांच्या निवेदनशैलीचाही प्रभाव कुठेतरी माझ्यावर पडला आहे असं मला वाटतं. विलास सारंग ह्यांचं लिखाण मला नेहमीच अपील झालेलं आहे. दि. बा. मोकाशी, वसंत नरहर फेणे, नरेश कवडी, अनिल डांगे अशांसारख्या, लोकप्रिय नसलेल्या, परंतु वेगळ्या विषयांवर लिहिणार्‍या लेखकांबद्दल मला नेहमीच ओढ होती. थोडक्यात, गोखले, गाडगीळ, भावे यांच्याऐवजी साईडच्याच लेखकांचा माझ्यावर प्रभाव पडला. लहानलहान गोष्टींचेही गंड साहित्यनिर्मितीसाठी कसे महत्त्वाचे असतात ते मी श्याम मनोहरांकडून शिकलो. त्याआधी कथावस्तू रचायचं भान मला जीएंकडून मिळालं. जीएंना 'मोठ्यांचा चांदोबा' म्हटलं गेलं, तेव्हा मीदेखील त्या उपमेतल्या चटपटीतपणामुळे हसलो खरा, पण आता मला ते एक घृणास्पद विधान वाटतं. मराठी साहित्याच्या भावी वाटचालीच्या दृष्टीनं हे विधान म्हणजे 'अवदसा' वाटते. इथे तुम्ही साक्षात निर्मितिक्षमतेलाच हसत आहात असं वाटलं. एखादी कथा ते दहादहा वर्षं लिहायचे. कष्ट न करता समोर दिसेल ते 'रंगवत' सुटायचं नि कथा 'रचणाऱ्या'ला चांदोबा म्हणून हिणवायचं हे हिडीसच नव्हे, तर धोकादायकही आहे असं मला वाटतं. जीएंची नियती मलादेखील मान्य नाही. म्हणून ती नाकारून, त्यांची केवळ शैली नि रचना वापरून एक कथा मी प्रयोग म्हणून लिहिली. तिचं नाव 'मुटकुळा' असं असून ती 'मॉलमध्ये मंगोल' ह्या आगामी संग्रहात समाविष्ट आहे.

ऐसी अक्षरे: तुम्ही एका अर्थानं साठोत्तरी लेखक आहात. एका अर्थानं नवीन रचना घडवणारी पिढी तुम्ही पाहिली. पण दुसरीकडे त्या मांदियाळीत असण्याचा धोका किंवा तोटाही संभवतो. तुम्हांला याबाबत काय म्हणायचं आहे?

तांबे: 'लेखाजोखा' ह्या माझ्या साहित्यविषयक लेखांच्या पुस्तकात मी साठोत्तरी / नेमाडपंथी वाटचाल ह्या विषयावर 'आशयाचा लोंढ्यात बुडाला घाट' असा एक लेख लिहिला आहे, त्याची आठवण या संदर्भात येते आहे. 'आपलंही आयुष्य साहित्यात आणता येतं' ही गोष्ट समाजाच्या सर्व स्तरांतल्या लोकांना कळली नि मोठा वर्ग लिहिता झाला ही मराठी साहित्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं नक्कीच जमेची बाजू आहे. पण 'साहित्य म्हणजे नक्की काय?' हे त्यांना जर कुणी नीट सांगू शकलं नाही, तर त्यामुळे अंदाधुंदी माजू शकते. समाजाच्या सर्व स्तरांतले लोक लिहायला लागल्याला आता सुमारे चाळीस-पन्नास वर्षं झाली. आता तरी त्यांना 'तुम्ही लिहू लागलात हे ठीक. परंतु हे साहित्याचं परिपूर्ण रूप नव्हे' हे समजावून सांगायला हवं. अन्यथा साहित्याच्या कक्षा विस्तारत जातील, परंतु कस मात्र उतरत जाईल हे उघड आहे. मराठी साहित्यात अलीकडे 'घाट / रूप', 'शैली' या साहित्याच्या घटकांबाबत सजगताच लयाला जात असल्याचं दिसतं आहे. यासाठी येत्या काही वर्षांमध्ये मराठीत 'कलाविषयक' मूल्यांची सविस्तर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे.

ऐसी अक्षरे: जीएंच्या रचनाकौशल्याचा नि त्याबद्दल तुम्हांला आदर वाटण्याचा तुम्ही उल्लेख केलात. स्वतःच्या लिखाणात हे तुम्ही कसं वापरता, तुम्ही कथा कशी लिहिता त्याबद्दल सांगता का?

तांबे: समोर जे दिसतं - व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती - ते जसंच्या तसं कधीच वापरायचं नाही असं एक मी पाळतो. ते जसंच्या तसं मांडलं तर नुसतं वर्णनपर होईल. पण समोरच्यामध्ये 'लक्षणीय' असं जे काही दिसतं, ते आपल्यामध्येही आहे का हे मी तपासतो. मग निरनिराळ्या संदर्भांत, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये ते सापडतं का, ते पाहिलं जातं. आणि त्यातून कथेचा एक साचा तयार होतो. या सार्‍या प्रकियेमध्ये अनेक वर्षं जाऊ शकतात. मी कथा लिहायला लागलो त्या सुरुवातीच्या काळात मी अनेक मित्रमैत्रिणींच्या सहवासात होतो. मला सापडलेलं सूत्र मी त्यांच्यापैकी एखाद्याला सांगायला लागायचो. मग हे सूत्र 'त्या' व्यक्तीला कसं सयुक्तिक वाटेल, लागू होईल, त्या कयासानं ते कथानक अवयव धरू लागायचं. मग दुसर्‍या माणसाशी बोलून पुढे. असं करता करता दोन-चार वर्षांत कथा लिहिण्याइतपत आकार तयार व्हायचा. थोडक्यात काय, तर लहान मुलांना आपण गोष्ट सांगतो, तशीच ही प्रक्रिया आहे. मला 'नक्की काय आणि कसं सांगायचं' आहे याची पुरती कल्पना या अशा प्रवासातून स्पष्ट होत जाते.

गेल्या काही वर्षांत मात्र गाठीभेटी कमी होत चालल्यानं ही प्रक्रिया आता बदलली आहे.

आता आगामी संग्रहात असलेल्या 'जेंडरनगर में प्रेम की सुगंध' या कथेची प्रक्रिया सांगतो, उदाहरणार्थ. मी एकदा बँकेत अकाऊंट उघडायला गेलो नि माझं नाव-पत्ता सांगितला. त्या वेळी जॉईंट अकाऊंटचा फॉर्म भरताना nomination या सदरात मी relation म्हणून 'companion' असं लिहिलं. ते त्यांनी स्वीकारलं नाही. फॉर्म भरणं या प्रकाराचा आधीच असलेला उबग यातून उफाळून आला. अर्थात या व्यवहारात अनुस्यूत असलेला कायदेशीर वारसाहक्काचा मुद्दा मला ठाऊक होता. पण त्यातून एक डोक्यात आलं - एखाद्यानं आपलं जेन्डर तरी कशासाठी सांगायचं हा प्रश्न पडला. एक मानवी देह ही ओळख पुरेशी का नसावी? डोक्यात तृतीयपंथी आले. त्यांनी male / female या दोनच पर्यायांतून कोणता आणि का निवडायचा असे प्रश्न मनात आले. लहानपणी माझ्या आसपास हिजड्यांची वस्ती असल्यानं मला ते कुणी परके / भीतिदायक असे कधीच वाटत नाहीत. तर हा 'देह' मुद्दा मनात तरळत असताना मला संध्याकाळच्या वेळी एक मस्त गचाळ शरीराचा सहृदयी हिजडा टिळकनगर स्टेशनच्या सुनसान फलाटावर दिसला. त्याला पाहिल्यावर असं वाटलं की, असा एखादा तृतीयपंथी देह जर का शेजाऱ्यापाजाऱ्यांना कोणताही उपद्रव न देता तुमच्याआमच्या वस्तीत राहत असेल, तर हा मेल आहे की फिमेल आहे ह्याचा समाजाशी संबंध येण्याची काय गरज आहे? हे जाहीर करण्याचा समाजाचा आग्रह का असावा? मी कुठलेही कपडे घालेन नि कसाही वागेन. ते कुणाला का म्हणून सांगायचं? असं कुठेतरी डोक्यात ठसलं. त्यानंतर एका मल्टिनॅशनल कंपनीच्या औषधांच्या कामाशी संपर्क आला तेव्हा वाटलं, उद्या अशीही औषधं निघतील की ज्यामुळे एखाद्या पुरुषाला आपला आवाज बाईसारखा करून मिळेल. त्यातून 'जेंडरनगर मे प्रेम की सुगंध' अशा गमतीदार नावाच्या कथेचा जर्म डोक्यात आला. उद्या लिंगबदलाची औषधं बनवणारी अशी कंपनी आली, त्यांनी अशा 'अधल्यामधल्या' पुरुषांना एका वस्तीत ठेवलं नि सांगितलं की, तुमच्या उर्वरित आयुष्याची जबाबदारी आम्ही घेऊ; नि तुम्ही फक्त एकत्र एका वस्तीत रहायचं. त्या वस्तीचं नाव 'जेंडरनगर' अशी कथा. मग अशा कथेमध्ये एक ढोलकी वाजवणारा मनुष्य येतो. त्याच्या तालावर वस्तीतली अशी पन्नासेक पोरं नाचतात. तो माणूस स्वतःचं नाव सांगतो 'प्रेम की सुगंध'. त्या कंपनीच्या माणसांना असा संशय येतो की, हा प्रतिस्पर्धी कंपनीचा हेर आहे. अशी ती कथा. तो फॉर्म भरताना आपलं लिंग कोणतं ते सांगायला नकार देतो, आणि त्यात त्याचा अखेर खून होतो. अशी ही एकंदरीत कथा आहे. तर आता ही सुरू कुठे झाली? तर बँकेचा फॉर्म भरताना. अन् संपली, एका देहानं लिंग सांगायला नकार दिला म्हणून त्याच्या झालेल्या खुनावर. तर असं जवळजवळ प्रत्येक कथेबद्दल खरं आहे. त्यांचा उगम भलतीकडेच असतो आणि विस्तार पार वेगळाच!

'बापूंच्या खुर्चीची गोष्ट' नावाची एक कथा आहे. मी एका नवीन जागेत राहायला गेलो तेव्हा समोर एक कुटुंब होतं. त्यांनी आमच्या घराबाहेरच्या पिंपाची मागणी केली. त्या वेळी 'ही समोरची माणसं लबाड आहेत' असं घरात मानलं गेलं. मला वाटलं, यात एक गमतीशीर कथा दडली आहे. मात्र मी पिंप न वापरता खुर्ची वापरली. ती लिहायच्या आधी दोन वर्षांपूर्वी माझे वडील आजारी असताना त्यांना जुनी खोळीची आरामखुर्ची हवी झाली. ती त्या वेळी मिळाली नाही. तर ह्या दोन खुर्च्यांची सांगड घालून मी ही गोष्ट रचली. हे सर्व लिहिताना मजा आली. प्रत्यक्ष माणसं नि घटना यांचा वापर जसाच्या तसा न करता त्यातून पार नवं रचणं यात मेहनत आहे. पण त्यातच कस आहे.

'माझी लाडकी पुतनामावशी' लिहिताना मर्दानगी गाजवणार्‍या सो-कॉल्ड पुरुषार्थाचा - जी मर्दानगी मला फार धोकादायक वाटते - त्याचा विचार डोक्यात होता. त्यातल्या नायिकेसारखी ओबडधोबड, मुलुखावेगळी एक बाई पाहण्यात होती; पण ती मी खूप प्रोसेसिंग करून वापरली. गोष्टी ज्या मांडल्या, त्या वास्तवात घडलेल्या नाहीत; पण काही अपरिचित घटकांमध्ये त्या माझ्या मनात घडल्या. त्या पुढे आल्या.

'कोरसमधील बोबडा पोपट' नावाची कथा 'राज्य राणीचं होतं' या पहिल्या संग्रहात आहे बहुधा. तिची पार्श्वभूमी अशी - एका पार्टीत एका नटीनं तिथं जमलेल्या सर्व पुरुषांना उद्देशून "सर्वांनी आपले पोपट दाखवा" असं मोठ्यानं सांगितलं. ते वाक्य मला जेव्हा कळलं, तेव्हा मला वाटलं की एका स्त्रीच्या तोंडी असलेलं हे वाक्य जगातल्या अत्यंत श्लील वाक्यांपैकी आहे. आणि बीमार पुरुषी मानसिकतेला ते झेपणंच शक्य नव्हे. मग हे वाक्य पुढे पाच-सात वर्षं एका कथाबीजाच्या स्वरूपात मनात होतं. कुठेतरी अशा बोल्ड लैंगिकतेबद्दल लिहावं असं वाटत होतं. शेवटी त्या कथेत ते आलं.

'पठारावर अमर' नावाची कथा आहे. मी रुईयाला असताना सकाळीच practicalच्या वेळी मस्त थंडी असायची नि समोर एखाद्या पठारासारखं मैदान. ती हिरवळ न्याहाळत मस्त सिगरेट ओढावी वाटायची. त्याच वेळी सिगरेट पिताना आत कुठेतरी मरणाची भीतीही वाटायची. मी काही मृत्यू तोवर पाहिले होते नि मृत्यूचं भान यायला लागलं होतं. आपण सिगरेटही ओढतो - त्याची मजा घेतो - नि दुसरीकडे अमरत्वाचं आकर्षणही आहे हे जाणवलं नि त्यावर कथानक रचलं. थोडक्यात 'घडतं भलतंच, त्यातून लिहून होतं भलतंच काहीतरी' असा खरा मुद्दा.

ऐसी अक्षरे: तुमच्या कथांमधला निवेदक हा मध्यमवर्गीय - कदाचित क्रमाक्रमानं मध्यमवयाकडे वाटचाल केलेला - पुरुष आहे. जवळजवळ प्रत्येक कथेमधून स्त्री-पुरुष संबंधांवर तुम्ही प्रकाश टाकत असल्याचं जाणवतं. (काही कथांमध्ये हा कथेचा मध्यवर्ती भागच आहे, तर काही कथांमध्ये तो साईड-शो म्हणून येतो.) काही कथांमध्ये कथेतलं मुख्य पात्र स्त्रीदेहाकडे, इंटिमसीच्या गरजेकडे रोचक दृष्टीने पाहतं. 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या कथेमधला पुरुष स्त्रीबद्दलच्या आकर्षणाचं प्रमाण म्हणून points / थेंबांमध्ये मोजणी करतो. एकंदर लैंगिक संबंधांतले कोणकोणते पैलू किंवा स्त्री-पुरुष संबंधांतला कोणता दृष्टिकोन तुम्हांला आपल्या साहित्यात मांडावासा वाटतो?

तांबे: माझे वडील 'सेक्स' ह्या संदर्भात संस्कृतप्रचुर, परंतु अगदी मोकळेपणानं बोलायचे. आणि आपली मतं ते कमालीच्या प्रामाणिकपणे मांडत होते. लहानपणी एकदा बाराव्या वर्षी मी हाफ तिकीट काढलं, तेव्हा स्वतः वडील मला टीसीकडे घेऊन गेले नि म्हणाले की, हा माझाच मुलगा आहे, पण ह्यानं खोटारडेपणा केला आहे, तेव्हा त्याला पकडा. या घटनेचा माझ्यावर लहानपणीच मोठा परिणाम झाला. त्यामुळे या विषयावर पूर्वीपासून काहीसा शांतपणे विचार करता आला. त्यातनं एक गोष्ट जाणवली की, या एका विषयात लोकांचे अतिशय चोरटे असे व्यवहार आहेत. खूप अप्रामाणिकपणा यात आहे. मी ज्या व्यवहारांत स्वतः गुंतलेला आहे, त्यांबद्दल मला कमी लिहिता येतं. मात्र ज्यात मी गुंतलेलो नाही त्याबद्दल एक बाहेरचा म्हणून मला निरीक्षण करायला जमतं. त्याबद्दल मी लिहू शकतो. इतरांचे, मित्रांपैकी कुणाचे, एकंदर समाजातल्या लोकांचे लैंगिक व्यवहार मी न्याहाळतो. चाळीपासून उच्चमध्यमवर्गापर्यंत लोक याबाबत कसे वागतात हे मला जवळून पाहायला मिळतं. गर्दीच्या ठिकाणी एखादी सुस्वरूप दिसणारी बाई शिरली, तर माझं लक्ष त्या बाईकडे फारसं जात नाही; तर तिच्याकडे लोक कसे पाहतात / वागतात ते मी न्याहाळतो. त्यामुळे मी सेक्स याच विषयावर लिहितो असं मला वाटत नाही. मी एकंदर लोकांचे व्यवहार बारकाईने न्याहाळतो. जिथे लैंगिक व्यवहार आहेत, तिथे लैंगिक संदर्भांचं विवेचन येतं, इतकंच. एकंदर मी याबाबत जबाबदारीने लिहितो असंच मला वाटतं. मी काम-व्यवहारावर लिहिताना ते कामुक होऊ नये याची सजगतेनं काळजी घेतो. मात्र मी सहसा न उल्लेखल्या जाणाऱ्या मानसिक बारकाव्यांची नोंद घेतो. ती वाचकाला कदाचित खटकत असेलही! मी लिहिताना सोवळं-ओवळं पाळत नाही हे नक्की.

ऐसी अक्षरे: तुमच्या यासंदर्भातल्या इंटेग्रिटीबद्दल काही शंका नाहीच. तुमचं नाणं चोखच आहे. परंतु लैंगिक संदर्भातला हा छुपेपणा हा लैंगिकतेला वाट न देणार्‍या घुसमटीतून, फ्रस्ट्रेशन निर्माण करणार्‍या समाजव्यवस्थेतून आलेला आहे असं आहे का?

तांबे: आपण आजच्या महानगरी लेखकांकडे पाहू. मेघना पेठे दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये वाढली, तो शिवसेनेचा त्या काळातला पांढरपेशा बालेकिल्ला होता. तिला आजूबाजूच्या निम्नमध्यमवर्गीय जगाची चांगली जाणीव होती. जी. के. ऐनापुरे बीडीडी चाळीतला. मीदेखील वर म्हटल्याप्रमाणे मजासवाडी ह्या बैठ्या चाळीच्या बकाल वस्तीत वावरलेला. तर ही जी रटरट आहे ना, तिच्यातून साहित्य निर्माण होतं पाहा. जिथे रटरट-राडे होतात, तिथे सर्व लैंगिक व्यवहारही उघड्यावर येतात नि साहित्यात त्यांचीही नोंद होते. उच्चमध्यमवर्गीय बंदिस्तपणामधून हे निर्माण होत नाही, पुढे येत नाही. याउलट नेमाडे, श्याम मनोहर, जीए यांना या महानगरी रटरटीची, त्यातल्या लैंगिकतेची काहीही कल्पना नाही, असंच मला वाटत आलं आहे. नेमाडे, जीए यांच्या लिखाणात बाईवरचा राग, लैंगिक संबंधांवरचा राग दिसतो, त्याची पाळंमुळं मला यात दिसतात.

ऐसी अक्षरे: ह्या नाण्याची दुसरी बाजू अशी की, जीए-नेमाडे यांना दलदल दिसली नाही, पण त्यांच्या स्वतःच्या अतिशय स्ट्राँग धारणा आहेत. जीएंचा नियतीवाद, लोकांशी फटकून वागणं किंवा नेमाडे ह्यांचा देशीवाद म्हणा. त्यांचं स्वतःचं असं व्हिजन आहे, नाही का? त्यांना स्वतःची अशी 'स्पेस' मिळाली हा एक भाग यात आहे का?

तांबे: माझी तुलना मला या दोन मोठ्यांशी करायची नाही; पण मला असं जाणवलं की, माझ्या आतलं मी बाहेरच्या जगात तपासतो. किंवा बाहेर जे पाहतो ते आतल्या जगात तपासतो. वाचक/प्रेक्षक हा प्राणी स्वतःला सोयीची आयडेंटिफिकेशन्स शोधत असतो. सिलेक्टिव्हली तो वाचतो/पाहतो. आपण 'बॅरिस्टर' नाटकाचं उदाहरण घेऊ. प्रेक्षक म्हणतात, हा असा कसा माणूस? इतका मोठा बॅरिस्टर असून असा विकृत? माझ्यामते इथे प्रेक्षकाला पळवाट मिळते. ती अशी की, त्या काळात लोक असेच मागास / जुनाट होते. मी आधुनिक जगातला निकोप माणूस आहे. माझ्या मते अशी पळवाट आपण द्यायला नको. वाचकाला आपण मांडलेल्या खेळात सामावून घ्यायचा माझा प्रयत्न असतो. वाचकाला काठावर बसू न देता, कथेतली पात्रं नि वाचक यांचा स्वत:सकट खेळ करण्याचा प्रयत्न करणं ही माझ्या लिखाणाची दिशा आहे. वाचकालाही ओढून घेणं. मला एका दिवाळी अंकाकडून लेखनाची मागणी करणारं पत्र आलं की 'वेड्या नि व्यसनी लोकांमध्ये तुम्ही वावरता; त्यांच्या जगाची तुम्हांला चांगली ओळख आहे. तर त्याच्यावरचा लेख द्या.' यावरून माझा लौकिक काय आहे हे मला कळलं. हा लौकिक खोटा नव्ह्ताच. ही जगाच्या खेळात हरलेली माणसं मला माझी वाटायची. सर्वांशी मी जमेल तितका सहानुभूतीनं वागत आलेलो आहे. माझा मामा वेडा होता. तेव्हापासूनच मी या गोष्टीकडे सहानुभूतीनं पाहत आलो. या विषयावर मी लेख लिहिला : 'करमण्यातून कळण्याकडे'. जीवन कळायला मदत होते असा हा विषय आहे.

ऐसी अक्षरे: बायकांकडून तुमच्या लिखाणाला प्रतिक्रिया येतात का? त्या कशा असतात?

तांबे: मला असं वाटायचं की, माझ्या लिखाणाला 'स्त्रीमुक्ती'कडून विरोध होईल. पण त्यांच्याकडून विरोध होत नाही. पण माझ्या स्त्रीवाचक कमी असतील असं वाटतं. 'रसातळाला खपच' ह्या कथेबद्दल चांगल्या प्रतिक्रिया स्त्रीवाचकांकडून आल्या खर्‍या. पण हे तितकं स्पष्ट नाही.

ऐसी अक्षरे: तुमच्या अनेक कथांमधून पात्रांचा खून होतो. हे थोडं रोचक आहे.

तांबे: 'रसातळाला खपच'मध्ये आणि 'खुनाच्या हद्दपारीची कथा' ह्या दोन कथांमध्ये खून घडतो. त्या पात्रांचा मृत्यू होणं त्या कथेमध्ये अपरिहार्य होतं. इतकंच.

ऐसी अक्षरे: थोडंसं लेखनसृष्टीबद्दल, व्हिजनबद्दल. नेमाड्यांचा, चार कादंबर्‍यांमधला चांगदेव पाटील 'जागेच्या शोधात' आहे. जीएंचा काळा चष्मा तुम्हां-आम्हांला ठाऊक आहे. जयवंत दळवी यांचं वेड्यांचं जग. पु. ल. देशपांड्यांचा ब्राह्मणी घडण असलेला सहृदयी आनंदयात्री - काहीसा सोपा - माणूस, मेघना पेठेंची शहरी सोफिस्टिकेटेड स्त्री. सतीश तांबे या लेखकाच्या लिखाणाचं असं एक म्हणता येईल असं सूत्र आहे का? तुम्हांला काय वाटतं?

तांबे: विवाहसंस्था आणि स्त्रीपुरुष संबंध असं एक सूत्र म्हणता येईल. आपले गंड, मोकळेपणाचा अभाव हे दुसरं सूत्र म्हणता येईल. मात्र 'काळा सूर्य...' मधलं 'पापाचं आकर्षण' वगैरे अशासारखं स्ट्राँग व्हिजन माझ्याकडे आहेसं नाही. काही लेखकांना आवर्जून असं सांगायचं असतं. त्यामानानं मी गप्पांमध्ये रंगणारा माणूस आहे.

ऐसी अक्षरे: एक काहीसा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न: सामाजिक बांधिलकी असा काही प्रकार तुम्ही मानता काय? की असे प्रश्नच नव्या जगात नि नव्या शतकात निरर्थक बनले आहेत? तसं असलं तर नव्या जगातले प्रश्न काय आहेत? की असं काही बोलणं म्हणजेच एक प्रकारचा झापडबंद विचार आहे?

तांबे: मी माझ्यापुरतं सांगतो. कदाचित मी मित्रांबरोबर सामाजिक कार्यात जाईन, तिथे सहभाग घेईन किंवा घेणार नाही. परंतु ती एक लेखक म्हणून सामाजिक बांधिलकी असत नाही. आपल्या आजूबाजूच्या जगातल्या मला माझ्यापुरत्या समजलेल्या गोष्टी उकलून मांडणं ही माझ्यापुरती एक लेखक म्हणून सामाजिक बांधिलकीची व्याख्या आहे.

ऐसी अक्षरे: काही गोष्टी मराठी साहित्याच्या संदर्भात अपरिहार्यपणे चर्चेला येतात. उदा. साहित्य कशासाठी? सामाजिक वास्तव आणि मानवी आयुष्यातली काही कालातीत मूल्यं यांच्याबद्दलचं भाष्य करण्यासाठी? नक्की काय अधिक महत्त्वाचं? किंवा वाङ्मयाची महत्ता किंवा कालातीतता. हे मुद्दे तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत का?

तांबे: अवघड प्रश्न आहे. मी कुठल्या दिशेनं विचार करतो तेवढं सांगतो. मला असं दिसतं की, बहुतांशी लोक साहित्याकडे रंजनाच्या दृष्टीने तरी पाहतात, नाहीतर स्वतःच्या आयुष्याशी मिळतंजुळतं काही दिसलं तर त्याला दाद देताना तरी दिसतात. हा असा पुनःप्रत्ययाचा आनंद माझ्या दृष्टीनं कामाचा नाही. हा आनंद बरोबर आहे का, याबद्दल छेडावं असा माझा प्रयत्न आहे. बाकी मराठी साहित्यामध्ये वास्तववादाचा प्रभाव आहे हे निश्चित. मराठी साहित्य म्हणजे जणू वास्तववाद असं समीकरण बनतंय. ते सर्वस्वी चांगलंच आहे असं मला वाटत नाही. अरुण कोलटकरचं उदाहरण देतो. मला त्याचं लिखाण 'इनसाईट' देणारं वाटतं आणि म्हणून महत्त्वाचंही. नुसती माहिती देणारं साहित्य काय कामाचं? साहित्यातून नवी दृष्टी मिळावी असं मला वाटतं. ते अधिक महत्त्वाचं.

ऐसी अक्षरे: अनेक सामाजिक-आर्थिक गटातल्या, शहरी-ग्रामीण आणि अनेक वयोगटांतल्या लोकांशी तुम्ही फेसबुकवर अगदी सहज संवाद साधता असं दिसतं. हे सहज जमण्यामागे तुमच्या व्यक्तिमत्वातला किंवा स्वभावातला कोणता घटक असावा असं तुम्हांला वाटतं?

तांबे: कॉम्प्युटर वापरून काम अनेक वर्षं चाललेलं होतं. फेसबुकचा उदय झाला नि त्याचं सभासदत्व मी अनेक वर्षं घेतलं नव्हतं. मला त्याची खबर नव्हती हेच खरं. मग केव्हातरी इथे येऊन पाहावं वाटलं. सुरुवातीला काही गैरसमज झाले. परंतु म्हणता म्हणता लोकांशी 'लाईव्ह' संपर्क साधणार्‍या, त्यांची प्रसंगी चित्रविचित्र मतं आणि नमुने यांची माहिती करून देणार्‍या माध्यमात मनानं गुंतलो असं वाटतं. ह्या गोष्टीमुळे लिखाणाचा वेग काही काळ मंदावला हेही मान्य करतो. पण एकंदर माझ्या लिखाणाची प्रकृती संवादी आहे. इथे येऊन मी लोकांना बोलतं करतो. त्याचा लिखाणाकरता उपयोगही होतो. मात्र एकंदर फेसबुकला जाणून घेतल्यानंतर त्याबद्दलचा उत्साह ओसरतो. इथे इंटरेस्टिंग लोक आहेत यात शंका नाही, पण हे तात्पुरतं आहे असंही वाटतं. पण आता पुन्हा लेखनाकडे वळावं असं म्हणतो. मला एक कादंबरी लिहायची आहे. कादंबरी लिहिण्याकरता लागणारा वेळ काढायचा, तर फेसबुक कमी करावं लागेल.

ऐसी अक्षरे: फेसबुकच्या माध्यमातून कधी माणसांचे अजब नमुने तुम्हांला पाहायला मिळतात का? एकविसाव्या शतकातल्या माणसांबद्दल किंवा मानवी संबंधांमध्ये पूर्वीपेक्षा काहीतरी वेगळं आहे असं तिथे वावरताना कधी जाणवतं का?

तांबे: नवी पिढी अधिक 'फोकस्ड' आहे असं वाटतं. आमच्या वेळी निश्चितच इतका फोकस नव्हता. आणि नवी पिढी अधिक मोकळीही आहे. लपवाछपवी, छुपेपणा या गोष्टी पूर्वीपेक्षा यांच्यात कमी आहेत असं मला वाटतं खरं. तरुण लोक त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा गोष्टींचा अधिक विचार करतात असं मला इथे येऊन दिसलं. त्यांचंही लिखाण वेगळं आहे. आजच्या पिढीला गंड कमी आहेत. मात्र दुसर्‍या चमत्कारिक गोष्टीही जाणवतात. उदाहरणार्थ 'अमुक गोष्ट हवी म्हणजे हवीच आहे' हा अट्टाहास अधिक वाटला. किंवा अमेरिकेला जाणं, तिथलं आकर्षण वगैरे. तर असे वेगळे, नवे प्रकार आहेत.

ऐसी अक्षरे: 'निवडक अबकडई'सारखं 'निवडक चार्वाक' निघेल असं वाटतं का? हे काम व्हावं आणि कुण्या चांगल्या संस्थेकडून व्हावं हीच सदिच्छा.

तांबे: हे झालेलं मला आवडेल. त्याचं सगळं साहित्य माझ्याकडे संग्रही आहेसुद्धा. पण हे कसं करायचं ते माहीत नाही खरं. थोडा प्रकाशकांचा निरुत्साहही आहे.

ऐसी अक्षरे: तुमच्या लिखाणात बंडखोरीची भूमिका आहे असं वाटतं का?

तांबे: समाजात वावरताना अनेक विसंगती दिसतात. त्या बोलून दाखवत नाही. पण त्याबद्दल आत कुठेतरी खदखदत असतं. ते लिखाणावाटे बाहेर पडत असतं. उदाहरण द्यायचं झालं, तर पुरुष जमले की बायकांबद्दल कायकाय बोलतात ते मी अनेकदा अनुभवलेलं आहे. स्त्रियांच्या चळवळीत भाग घेणार्‍या स्त्रियांशीही माझा संपर्क आलेला आहे, येत असतो. तेव्हा मला जाणवलं की, 'अरे, यांना पुरुष कसं बोलतात, कसा विचार करतात हेच ठाऊक नाही.' माझं लिखाण ही देवाणघेवाण करण्याचं काम करतं. प्रतिष्ठा-अप्रतिष्ठा, दंभ, गंड यांच्यावर प्रकाश टाकणं, प्रस्थापित मूल्यांमधलं आक्षेपार्ह काय ते दाखवणं - नि मुख्य म्हणजे खोडणं - याबद्दल मी लिहितो. समाजात जगताना लोक अन्याय होत असताना पाहतात नि तरीही अन्याय करणार्‍यांची तळी उचलून धरतात असं मी पाहिलं आहे. सुरात सूर न मिसळता, बेसूर-भेसूर वाटलो तरी तसा मी वागतो. माझ्यापुरती बंडखोरी अशी आहे.

ऐसी अक्षरे: तुम्ही असं म्हणालात की, एक कथा तुम्ही प्रसंगी चारपाच वर्षं मनात घोळवता नि रचता. हे फारच वेगळं नि आश्चर्यकारकसुद्धा आहे.

तांबे: माझीसुद्धा आठवण अशी फार खोलवरची नाही. निरीक्षणशक्तीसुद्धा फार नाही. मात्र एखादं सूत्र सापडलं की ते मनात घर करून राहतं. दुसरं म्हणजे शीर्षक सापडल्याशिवाय मला लिहिताच येत नाही. मला शेंडी सापडावी लागते. निरनिराळ्या प्रवृत्ती, विसंगती यांबद्दलची अनेक सूत्रं मनात आहेत. त्यांच्याबद्दलची शीर्षकं म्हणजे जणू खुंट्या आहेत. त्यांना अडकवल्याशिवाय मला कथेचा धागा विणता येत नाही. काही लेखकांचं काम, त्यांनी राखलेल्या डायर्‍या, हे सर्व पाहून मी दडपतो, पण माझी हीच पद्धत आहे.

ऐसी अक्षरे: तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल, मनमोकळ्या उत्तरांबद्दल 'ऐसी अक्षरे'तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

एका नवीन लेखकाची ओळख झाली .आता यांचं साहित्य वाचून पाहिन .इतर लेखकांच्या संदर्भात मी आणि माझे लेखन हे जाणून घ्यायला आवडले .निवेदनशैलीमुळे लेखकाला प्रथम थोडे वाचक मिळतात .कोणत्या चौकटीतले लेखन आणि कुठल्या काळातील विषय लेखक निवडतो त्यावर त्याचा वाचकवर्ग तयार होतो .इथे तांबे यांनी त्यांचे वर्ग सांगितले आहेत .आता पाहू ते केवळ वर्ग बदलतात का शाळादेखिल .

मुलाखत आवडली. तांब्यांसारख्या काहीशा 'ऑफ्फ द बीटन ट्रॅक" लेखकाची मुलाखत घेतल्याबद्दल अंकसमितीचे अभिनंदन. रुळलेल्या वाटेने न जाणारे, व तरीही सतत 'चळवळ, चळवळ', 'पुरोगामी, प्रतिगामी'चा घोषा न लावता मानवी मनाचे व्यवहार व तदानुषंगिक वागणे ह्याकडे तटस्थपणे, काहीशा अलिप्तपणे पाहत दर्जेदार लेखन करणार्‍या मोजक्या लेखकांपैकी तांबे एक आहेत. एरवी, कोणत्या ना कोणत्या तरी बांधिलकीच्या दावणीला बांधलेलेच अधिक.

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

मुलाखत आवडली. एकंदरीत लेखनप्रक्रियेबद्दल आणि 'नेचर वि. नर्चर' या सनातन वादाबद्दल झालेली चर्चा उत्तमच.

समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना लोकांना कळली नि मोठा वर्ग लिहिता झाला ही मराठी साहित्याच्या भवितव्याच्या दृष्टीने नक्कीच जमेची बाजू आहे. पण 'साहित्य म्हणजे नक्की काय?' हे त्यांना जर कुणी नीट सांगू शकलं नाही तर त्यामुळे अंदाधुंदी माजू शकते. समाजाच्या सर्व स्तरातील लोक लिहायला लागल्याला आता सुमारे चाळीस-पन्नास वर्षं झाली. आता तरी त्यांना "तुम्ही लिहू लागलात हे ठीक. परंतु हे साहित्याचे परीपूर्ण रूप नव्हे" हे समजावून सांगायला हवं. अन्यथा साहित्याच्या कक्षा विस्तारत जातील परंतु कस मात्र उतरत जाइल,हे उघड आहे. मराठी साहित्यात अलीकडे 'घाट/ रूप' 'शैली ' ह्या साहित्याच्या घटकांबाबत सजगताच लयाला जात असल्याच दिसते आहे. ह्यासाठी येत्या काही वर्षांमध्ये मराठीत 'कलाविषयक' मूल्यांची सविस्तर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.

हे निरीक्षण फार महत्त्वाचं वाटतं.

पण "साहित्य म्हणजे नक्की काय?'...हे साहित्याचे परीपूर्ण रूप नव्हे" हे समजावून सांगायला हवं.

अडचण अशी आहे हे सांगायचा अधिकार कोणाला आहे? मराठी साहित्यजगतात (पक्षी डबक्यात) सारेच 'स्वयमेव मृगेन्द्र'. सारस्वतांचेच ह्या विषयी एकमेकांशी पटत नाही, तिथे ह्या 'नव्याने लिहू लागलेल्यां'ना साहित्य म्हणजे काय, कस, घाट, आशय, सौंदर्यानुभूती इत्यादी ते काय व कसे समजावून देणार. काल-परवाच वर्तमानपत्रांनी व अशोक शहाणे ह्यांनी शहाण्यांच्या पन्नास वर्षे जुन्या कुरापतीला नवसंजीवनी दिली. शहाण्यांचे तेव्हाचे व आता पुनरुच्चारित मत मानायचे झाल्यास तुकोबा, दिलीप चित्रे, नेमाडे असे एका हाताच्या बोटावर मोजता येणारे लेखक सोडल्यास मराठीत इतर कोणीही लेखक नाही, साहित्यिक नाही. गद्धेपंचविशीत शहाण्यांनी केलेल्या खोडीवर अर्धशतकानंतरही चर्वितचर्वण करणार्‍या 'साहित्यिकां'कडून व 'समीक्षकां'कडून ह्या नव्याने लिहित्या झालेल्या मंडळींनी काय शिकावे, मार्गदर्शनाची काय अपेक्षा करावी? किंबहुना, का अपेक्षा करावी?

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

तुमच्या मताशी सहमत आहे. इथे काहीसं अवांतर होईल म्ह्णून विस्ताराने मत पहिल्या प्रतिसादात मांडलं नाही - मात्र मराठी साहित्याच्या मर्यादांबद्दल अनेकदा ज्या चर्चा झडतात, त्या बर्‍याचदा लेखकांचे मर्यादित अनुभवविश्व, ठरावीक मध्यमवर्गीय चाकोरी यावर खापर फोडून मोकळं होतात. ही मर्यादा आहे यात वादच नाही, पण निव्वळ नवनवीन क्षेत्रातल्या लोकांनी मराठीत लिहिते होणे हा (इन अँड ऑफ इटसेल्फ/एकमेव) उपाय नाही - असं तांबे यांनी मांडलेल्या विचारांच्या पूर्वार्धाचं स्वरूप आहे. त्याबद्दल सहमती दर्शवायची होती.

मुलाखत अतिशय आवडली. मी लहान असताना 'अबब हत्ती'चे अंक वडिलांनी आणून दिले होते व त्यातील एक दिवाळी अंक तर हल्ली हल्लीपर्यंत जपून ठेवलेला होता. दोन वर्षांपलिकडेच एका भाच्याला वाचायला दिला. ठकठक, चंपक ते चांदोबा या स्पेक्ट्रमवर अबब ने आपला वेगळी रंगछटा आणली होती हे नक्की.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुलाखत आवडली. मी 'अबब हत्ती' वाचलेला नाही, पण 'आजचा चार्वाक'चे अर्धे अंक (एकूण निघालेल्या १० अंकांपैकी ५) मात्र माझ्याकडे आहेत. दिवाळी अंकांच्या "आगळ्यावेगळ्या-वैभवशाली" इ. परंपरेत भर घालायचा मोह जेव्हा जेव्हा झाला, तेव्हा तेव्हा 'चार्वाक'च्या वेगळेपणाची आठवण आणि धाक वाटला, अशा तोलामोलाचे ते अंक आहेत.

एखाद्या लेखनप्रकृतीची, शैलीची, लोकप्रियतेची रेवडी उडवणं एकेकदा आवश्यक असतं. पण लोक या मूर्तिभंजक मताला आणि त्याच्या लोकप्रियतेला दीर्घकाळ चिकटून राहतातसं दिसतं. त्या पार्श्वभूमीवर जीएंच्या कथांबद्दलचं बदललेलं मत रोचक आणि आश्वासक वाटलं. तसंच कुणीही काहीही लिहावं आणि छापावं अशा मोकळिकीच्या दिवसांत 'साहित्य म्हणजे काय', 'घाट / रूप / शैली' यांबद्दल लोकांना सजग करण्याची गरज आहे, हेही निरीक्षण फार महत्त्वाचं वाटलं. बादवे, हे कोण आणि कसं करणार?!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुलाखत आवडली. साहित्यसृष्टीतल्या काही एरवी क्वचितच दिसणार्‍या मधल्या पायर्‍या दिसल्यामुळे विशेष आवडली. विचारार्ह आहे खास!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खूप छान. मनमोकळी मुलाखत आवडली.
साहित्यसृष्टीतल्या काही एरवी क्वचितच दिसणार्या मधल्या पायर्या दिसल्यामुळे विशेष आवडली. >> +१

दिवाळीच्या निमित्ताने का होईना पण सतीश तांबे यांच्यासारख्या आजच्या बिनीच्या लेखकाची साहित्याची जडणघडण आणि त्यांचा झालेला वा होऊ घातलेला प्रवास अशा अनेकविध रंगानी सजलेली ही मुलाखत खूप आनंदित करून गेली. कथासंग्रह निघावा इतके साहित्य ठिकठिकाणी प्रकाशित झाल्यानंतरसुद्धा लेखकाला संग्रह पुस्तकरुपाने पाहाण्यासाठी किती आणि कशी कळ सोसावी लागते हे या प्रांतातील सार्‍याच धडपड्या लेखकांना माहीत आहे. मला तर वाटते अगदी जी.ए., माडगुळकर, मोकाशी आदींपासून ही संग्रह रखडण्याची परंपरा चालूच आहे. जी.ए. ना ज्या कथांनी १९५०-५५ मध्ये खर्‍या अर्थाने लेखन म्हणून नाव मिळवून दिले त्या 'चंद्रावळ' आणि "गुंतवळ" ह्या कथा मौजेच्या 'सत्यकथा' मध्ये प्रकाशित होऊनसुद्धा १२ कथांचा त्यांचा कथासंग्रह बाजारात यायला १९५९ साल उजाडायला लागले आणि संग्रहही प्रकाशित केला तो मौजेने नव्हे तर पॉप्युलरने. पुढे त्यांच्या नावाचा दबदबा किती झाला हे सूर्यप्रकाशाइतके प्रखर असले तरी कथालेखक म्हणून त्यांच्याही वाट्याला जे भोग आले असतील तसेच श्री.सतीश तांबे यांच्याही ललाटी आले असतील असे म्हणण्यास जागा आहे.

मुलाखतीतील "....जीएंना "मोठ्यांच्या चांदोबा" म्हटलं गेलं तेव्हा मी देखील त्यातील चटपटीत उपमेपणामुळे हसलो खरा, पण आता मला ते एक घृणास्पद विधान वाटतं. मराठी साहित्याच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने हे विधान म्हणजे 'अवदसा' वाटते......." श्री.तांबे यांचे या प्रांजल कबुलीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करावेसे वाटते. खर्‍या अर्थाने ते विधान जी.ए. यांच्या कथा-प्रवासाचा अपमान होता. करणार्‍याने केला पण म्हणून ते ब्रह्मवाक्य मानण्याचे काही कारण नव्हते....मात्र कादंबरी लेखनाचा पाठपुरावा करणार्‍यांनी लघुकथा हा टिकावू प्रकार नसतोच हे गृहितक सातत्याने मांडल्याने त्याना वरील विधानात अस्मानाचा आवाका दिसला.

मुलाखतीत फेसबुकासह अनेक मुद्दे चर्चेला आले आहेत, पण मला जी.ए. मुद्दा वाचायला आवडल्याने त्यासंदर्भातच प्रतिसाद दिला आहे.

मुलाखत अतिशय आवडली. तांबेच्या कथा (या दिवाळी अंकातली सोडली तर) वाचनात आल्या नाहीत पण ही मुलाखत वाचून त्या वाचाव्यात असे मनाला नक्कीच वाटून गेले. स्वतःच्या लेखन प्रक्रियेबद्दल लेखक सहसा बोलताना आढळत नाहीत. त्यांच्यासाठी ते सेक्रिड असू शकते. पण इथे तांबे प्रांजळपणे त्याबाबत बोलताना दिसतात. प्रश्नांनी त्यांच्या आयुष्याचा, मानसिकतेचा, लेखन प्रक्रियेचा आणि त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा चांगलाच वेध घेतला आहे. एक चांगली मुलाखत वाचायला दिल्याबद्दल ऐसी संपादकांचे अभिनंदन.
मला असं दिसतं की बहुतांशी लोक साहित्याकडे रंजनाच्या दृष्टीने तरी पाहतात नाहीतर स्वतःच्या आयुष्याशी मिळतंजुळतं काही दिसलं तर त्याला दाद देताना दिसतात. - हे अगदी पटलं :).
एक-दोन प्रश्न पडले - वास्तववादी साहित्य म्हणजे माहितीपूर्ण किंवा नॉनफिक्शन/कथेतर साहित्य त्यांना अभिप्रेत आहे का? तसं नसेल तर वास्तववादी सोडून कोणत्या प्रकारचे साहित्य मराठीत यायला पाहिजे किंवा त्याची कमी आहे असं त्यांना वाटतं? अरुण कोलटकर मी वाचले नाहीत, नाहीतर हे जरा स्पष्ट झालं असतं.

सतीश तांबे यांची ही मुलाखत आवडली. त्यांचं लेखन वाचलेलं असलं तरी या पद्धतीची एकही मुलाखत मात्र वाचलेली नव्हती. त्याबद्दल ऐसी अक्षरेच्या टीमचे आभार.
काही प्रश्न नेहमीचे असणे अपरिहार्य असते, तरीही पुष्कळ वेगळे आणि चांगले प्रश्न विचारले गेले आहेत. उत्तरंही अजिबात पसरट न होता मोजक्या शब्दांत आली आहेत. कमी पडलं किंवा अधिक झालं असं काहीही न होता नेमकं पोटभरीचं खाद्य मिळाल्यानं समाधानी वाटलं.
स्वतः लेखन करत असले आणि लेखन प्रक्रियेतून जात असले, तरीही 'हे सुचतं कसं?' अशा पद्धतीचे प्राथमिक कुतूहलाचे प्रश्न मला अनेक कलाकृतींबद्दल पडतात; वाचताना काहीवेळा चकित होऊन थबकायला होतं किंवा हे लिहिताना लेखक किती ताणातून गेला असेल या जाणिवेने थकवाही येतो. लेखकाकडून याचा उलगडा झाला की उत्तरांचा आनंद आणि प्रश्नांतून सुटका झाल्याचं समाधान मिळतं. या मुलाखतीने ते(ही) कुतूहल भागवलं आहे.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मुलाखत आवडली. लेखनप्रक्रिया आणि कथेमागची कथा यावर अजून विस्तृत विचार वाचायला आवडले असते.
'निवडक चार्वाक' येण्याची उत्सुकतेने वाट बघीतली जाईल.
वेगळ्या वाटेवरच्या लेखकाची मुलाखत वाचायला मिळाली त्याबद्दल 'ऐसी अक्षरे' ला धन्यवाद.