१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद

१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद

लेखक - अरविंद कोल्हटकर

(प्रेमचंद रायचंद ग्रुप ह्यांच्या संस्थळावरून साभार) १८६४ सालचा मुंबईचा फोर्ट जॉर्ज.
A - चर्च गेट, B - चर्च आणि बाँबे ग्रीन, C - अपोलो गेट, D - बझार गेट.


फोर्ट जॉर्ज

आसपासच्या मराठा, सिद्दी आणि अन्य सत्तांपासून सुरक्षित जागा म्हणून बांधलेल्या मुंबईच्या फोर्ट जॉर्जचे सैनिकी महत्त्व १९व्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासून संपुष्टात आले होते. मुंबईचा हा किल्ला ही आता इंग्रज, गुजराथी, पारसी, अरब अशा वेगवेगळ्या भागातून तेथे येऊन व्यापारउदीम करणाऱ्या अठरापगड व्यापाऱ्यांसाठी एक सुरक्षित जागा झाली होती, आणि व्यापाराचे केंद्र म्हणून हिंदुस्थानातील पहिले शहर असाहि तिचा लौकिक होऊ लागला होता. जगाच्या वेगवेगळ्या भागातून येजा करणारी जहाजे, त्या जहाजांमुळे आलेले अनेक भाषा बोलणारे काळेगोरे, चिनी, मलाय, अरब, मलबारी, कोकणच्या बंदरांमधून आलेले एतद्देशीय हिंदु-मुस्लिम खलाशी आणि व्यापारी ह्या सर्वांना आता किल्ल्याच्या भिंतींच्या आतमधली उत्तर-दक्षिण एक मैल आणि पूर्व-पश्चिम पाव मैल इतकाच विस्तार असलेली बंदिस्त मुंबई ही कमी पडू लागली होती. किल्ल्यामधील सांडपाण्याच्या निचऱ्याची अपुरी सोय, स्वच्छ पाण्याची टंचाई, भिंतीपलीकडील पश्चिम बाजूस असलेली रोज भरती-ओहोटीचे पाणी भरणारी दलदलीची जागा आणि त्यामुळे निर्माण होणारी रोगराई ह्या मुंबईच्या मोठ्या समस्या होत्या. ह्या सर्वांवर उत्तर म्हणून मुंबईचे तेव्हाचे गवर्नर सर बार्टल फ्रियर ह्यांनी पश्चिम बाजूची किल्ल्याची भिंत पाडून मुंबईला पश्चिमेकडे वाढता येईल आणि तिला मोकळा श्वास घेता येईल, अशी व्यवस्था करण्याचे ठरविले.


बार्टल फ्रिअर. पुण्याच्या गणेशखिंडीतील गवर्नमेंट हाउस आणि सातारा गावातील कोल्हापूरच्या जुन्या रस्त्यावरील बोगदा ह्या कामांमध्ये ह्यांचाच पुढाकार होता. मुंबईमधील ह्याच्या नावाच्या फ्रिअर रोडला आता पी.डिमेलो मार्ग असे नाव आहे.

चर्चवरून येणाऱ्या रस्त्याचे किल्ल्याच्या भिंतीमधील आतले दार - चर्चगेट.
चर्चवरून येणाऱ्या रस्त्याचे किल्ल्याच्या भिंतीमधील बाहेरचे खंदकापलीकडचे दार चर्चगेट रस्ता

चर्चगेट रस्ता - सध्याचा वीर नरिमन मार्ग. शेवटास गेट दिसत आहे. चित्रातील दोन पाट्यांपैकी दुसरीवर Bombay Times and Standard Office असे लिहिलेले आहे. १८६१ साली पुनर्रचना होईपर्यंत Times of India चे हे नाव होते.

अमेरिकेतील यादवी युद्ध आणि सुरत कॉटन

१८६१ मध्ये जगाच्या दुसऱ्या भागातील अमेरिकेमध्ये उत्तरेकडची राज्ये आणि दक्षिणेकडची राज्ये ह्यांच्यामध्ये यादवी युद्ध सुरू झाले, आणि त्याचा भाग म्हणून उत्तरेने दक्षिणेच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी आपली नाविक शक्ति वापरून दक्षिणेचा (म्हणजेच कापूस उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या मिसिसिपी, अलाबामा, जॉर्जिया इत्यादि कॉन्फेडरेट राज्यांचा) बाहेरच्या जगाशी असलेला व्यापार जवळजवळ बंद केला. इंग्लंडमधील लॅंकेशायर परगण्यातील कापड गिरण्यांना होणारा कच्च्या कापसाचा पुरवठा थांबला. कापडाच्या गिरण्यांकडून आखूड धाग्याच्या कापसाला - short staple - विशेष मागणी असे, कारण जास्ती खप होऊ शकणाऱ्या वस्त्रांच्या निर्मितीत तो वापरला जाई. लांब धाग्याचा कापूस - long staple - हा तलम कपडा निर्माण करण्यासाठी लागत असल्याने त्याचा खप त्यामानाने कमी होता. लॅंकेशायर परगण्यातील कापड गिरण्यांना आखूड धाग्याचा कापूस अमेरिकेतून आणि हिंदुस्थानातूनहि मिळू शकत असे; पण हिंदुस्थानातील कापूस, ज्याला सुरतेचा कापूस - Surat cotton - म्हणत असत, तो मुंबई बंदरामधून निघून आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून लांब समुद्रप्रवासानंतरच इंग्लंडच्या किनाऱ्यावर पोहोचत असे, आणि त्यामुळे अमेरिकन कापसाच्या तुलनेत तो महाग पडे. सुवेझ कालवा निर्माण होणे ही गोष्ट अजून पुढच्या भविष्यकाळात होती. सुरतेच्या कापसात अमेरिकन कापसाहून अधिक प्रमाणात कचरा आणि खडे असत. त्यामुळेहि त्याला मागणी कमी होती.

अमेरिकेतील यादवी युद्धामुळे ही सर्व स्थिति जादूची कळ फिरल्यासारखी बदलली, आणि सुरतेचा कापसाला एकाएकी सुगीचे दिवस आले. कापसाची निर्यात करण्याच्या सर्व सोयी आणि त्यासाठीची यंत्रणा सज्ज असलेल्या व्यापारी पेढ्या मुंबईतच असल्याने मुंबईतील व्यापारी वर्गाकडे ह्या संपत्तीचा ओघ वळला. १८६१ साली ३ ते ४ पेन्सला एक पौंड विकला जाणारा सुरतेचा कापूस १८६४ सालापर्यंत लॅंकेशायरमध्ये २४ पेन्सला एक पौंड इतका चढला होता. १८६१ साली कापसाचे ७ लाख बस्ते (bales) ५ कोटि रुपयांना निर्यात झाले. १९६४ मध्ये ९ लाख बस्ते २७ कोटि रुपयांना गेले. असे म्हणतात, की कापसाच्या ह्या सुगीचा लाभ घेण्यासाठी काही हुशार लोकांनी घरातील झोपायच्या गाद्यांमधून कापूस काढून तो विकला, आणि स्वत: काथ्या भरलेल्या गाद्यांवर ते झोपू लागले. त्याचबरोबर ह्या चढ्या दरामुळे शेतकऱ्यांनीहि कापसाकडे आपली जमीन वळवली.

आजच्या एकटया व्यक्तीने दहाच्या पाढयात मोजलेल्या कोटींची पुंजी एकत्र करण्याच्या दिवसात हे जुने ५ कोटि काय आणि २७ काय, हे आकडे इतकी छाती दडपून टाकणारे वाटत नाहीत, पण त्याबरोबर हेहि लक्षात ठेवले पाहिजे की रुपयाची तेव्हाची क्रयशक्ति आणि आजची क्रयशक्ति ह्यांमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. हे अनेक उदाहरणांनी दाखविता येईल, पण येथे दोनच देतो:

१८६४ च्या सरकारी निर्णयानुसार १ सोन्याचा ब्रिटिश सॉवरिन = रु. १० असे कोष्टक ठरविण्यात आले. एका सॉवरिनमध्ये ७.३२२ ग्रॅम इतके २२-कॅरट सोने असते. म्हणजेच १८६४ मध्ये २४-कॅरटचे १० ग्रॅम सोने रु.१४.८९ अशा किंमतीला होते असे म्हणता येईल. त्याच सोन्याची आजची किंमत तीस हजार रुपयांच्या पुढेमागे असते. दुसऱ्या टोकाला गोरगरिबांच्या जिव्हाळ्याच्या ज्वारीचा भाव पुण्याच्या गॅझेटिअरमध्ये १८६०-६१ साली ७८ पौंडांना १ रुपया असा दाखविला आहे, म्हणजेच आजच्या भाषेत १ क्विंटलला रु. २.८३. त्याच ज्वारीची आजची सरकारने २०१२-१३ साठी ठरवून दिलेली आधार किंमत आहे १ क्विंटलला रु १५००. ह्याचा अर्थ ज्वारीची किंमत १८६०-६१ पासून आजपर्यंत ५३० पट वाढली आहे. ह्या दोन्ही टोकांची सरासरी काढली तर असे म्हणता येईल की आजच्या तुलनेने १८६०-६५ च्या काळात रुपयाची क्रयशक्ति सुमारे बाराशे पट अधिक होती. हे आकडे अर्थातच केवळ अदमासासाठीच पाहावयाचे आहेत. पण आकडे कसेहि घेतले तरी अशीच स्थिति दिसून येईल. तेव्हाचे २७ कोटि रुपये म्हणजे आजचे तीसपस्तीस हजार कोटि रुपये. अशी ही अकल्पित संपत्ति मुंबईमध्ये बसलेल्या आणि संख्येने अगदी मर्यादित अशा हिंदुस्थानी आणि परदेशी व्यापारी व्यवसायांकडे तीनचार वर्षे ओघाने येत होती. हे आकडे पाहिले की तेव्हाच्या ह्या रकमा आजच्याहून काही फार निराळ्या नाहीत हे पटते.

सुरतेच्या कापसावरच आता इंग्लंडमधील कापड उत्पादन व्यवसाय पूर्णपणे अवलंबून होता. १८६३ पर्यंत अमेरिकेतील युद्धाच्या वार्ता अशा स्वरूपाच्या होत्या की त्या युद्धाचा शेवट अनिश्चित काळापर्यंत दूर आहे अशी सर्वांची खात्री होती. पण हिंदुस्थानात वाहतूक व्यवस्था अगदी प्राथमिक असल्याने सुरतेच्या आसपासच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कपाशीची मुंबई बंदरापर्यंत बारमाही वाहतूक शक्य नव्हती. अशी वाहतूक केवळ शिडांच्या गलबतांमधून आणि तीहि केवळ कोरड्या हवेच्या दिवसातच होऊ शके. बीबीसीआय रेल्वेने मुंबई आणि सुरत अशा दोन्ही बाजूंनी आपले रूळ टाकायला सुरुवात केली होती खरी, पण अजून कुलाब्यापर्यंत ते रूळ पोहोचत नव्हते कारण मुंबईच्या किल्ल्यामागे असलेल्या बॅकबेमधील दलदल बुजविणे त्या कंपनीच्या आर्थिक शक्तीबाहेरचे होते. ती दलदल बुजवून तेथे पक्की जमीन निर्माण करण्याची आवश्यकता अचानक उत्पन्न होण्याचे हेहि एक कारण होते की त्यामुळे रेल्वेचे रूळ कुलाब्यापर्यंत पोहोचवून मुंबई बंदरापर्यंत कापूस बारमाही पोहोचू शकेल. अशा कारणांमधून बॅकबे रेक्लमेशन कंपनीचा उदय झाला.


मर्यादित कंपन्या

असा हा व्यापारी वर्ग होता तरी कसा हे आता पाहू. ह्या वेळेपर्यंत हिंदुस्थानातील व्यापारांचे व्यवस्थापनहि हळूहळू आधुनिक स्वरूप घेऊ लागले होते. परंपरेने चालत आलेल्या मर्यादित व्यक्तींकडून भांडवल एकत्र उभारून निर्माण होणाऱ्या भागीदाऱ्यांच्या (partnership) जागी अनेकांच्या कडून भांडवल गोळा करू शकणाऱ्या कंपन्या निर्माण होऊ लागल्या. इंग्लंडमधील Joint Stock Company ह्या संकल्पनेवर आधारित कंपन्या हिंदुस्थानातहि उभ्या राहू लागल्या होत्या. त्यासाठी पहिला कंपनी कायदा १८५० मध्ये लिहिण्यात आला पण त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. विशेषत: भांडवल देणाऱ्या भागधारकांवरील आर्थिक जोखीम त्याच्या भांडवलाइतपतच मर्यादित असण्याची तरतूद त्यामध्ये नव्हती.

कायद्यात बदल होत होत १८५७ साली बँकिंग आणि इन्शुअरन्स ह्या व्यवसायांशिवाय अन्य सर्व व्यवसायांमध्ये भागधारकाची जोखीम त्याच्या भांडवलाइतपत मर्यादित करण्याची सुधारणा आली. बँकिंग आणि इन्शुअरन्स ह्या व्यवसायांवरील हा निर्बंधहि १८६० साली दूर करण्यात आला आणि ह्या बदलांबरोबरच भांडवल उभारणी करून नवनव्या कंपन्या सुरू करण्याची लाटच मुंबईत आली. १८५५ मधल्या १० कंपन्यांच्या जागी १८६४-६५ पर्यंत मुंबईत १०० हून अधिक कंपन्या प्रस्थापित झाल्या होत्या. त्यामध्ये २५ बँका, ३९ गुंतवणूक कंपन्या आणि मुंबईच्या आसपासचा समुद्र हटवून मुंबईच्या वाढीसाठी जमीन निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या फ्रेयर लँड रेक्लमेशन कंपनी, बॅकबे रेक्लमेशन कंपनी, माझगाव लँड रेक्लमेशन कंपनी अशांसारख्या आठ कंपन्या होत्या. कापसातून निर्माण झालेला रुपयांचा पूर रिचवून घेऊन त्याला मार्गी लावण्याच्या हेतूने ह्या कंपन्यांची निर्मिति झाली होती. भांडवलाचा ओघ मोठा पण ते गुंतवण्यायोग्य संधि कमी, ह्यामुळे कसलीहि कंपनी स्थापन झाली की तिच्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडू लागल्या आणि कंपनीच्या कारभाराचे कसलेहि फलित दिसण्याच्या आधीच दुप्पट-तिप्पट किंमतीला कंपनीचे शेअर एकाकडून दुसऱ्याकडे विकले जाऊ लागले. पुढच्या मेंढरामागे मागचे मेंढरू अशा पद्धतीने गुंतवणूकदार आर्थिक कडेलोटाकडे चालू लागले.

अशा शेअर खरेदीसाठी कुचकामी तारणावर भरपूर भांडवल उपलब्ध करून द्यायला बँका बसलेल्याच होत्या. अशा बँकांचा अधिकारीवर्ग स्वत:साठीच शेअर मिळवण्यास उत्सुक. ह्यावर सरकारची नजर जवळजवळ नव्हतीच असे म्हटले तरी चालेल. कंपनीवरचे एक-दोन सरकारी संचालक एव्हढीच काय ती सरकारी देखरेख. सरकारी संचालक हेहि मुंबईतील ब्रिटिश व्यापारी पेढ्यांचे भागीदार असत. ह्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यामध्ये त्यांना अधिक स्वारस्य. ह्या सर्व निर्नायकीचा परिणाम म्हणजे कापसातून मिळालेला पैसा अवाच्या सवा किंमतींना कंपन्यांचे शेअर घेण्यात गुंतला. किंमती कायम वाढत राहणार अशा आंधळ्या विश्वासातून काही जणांनी पुढच्या तारखेच्या खरेदीचे सट्टेहि विकत घेऊन ठेवले होते. १८६४ सप्टेंबरपासून ह्या सर्व सट्टेबाजीला विशेष जोर आला. त्याची कारणे पुढे पाहूच. तेव्हापासून ७-८ महिने ही दिवाळी टिकली आणि तिकडे अमेरिकेत ९ एप्रिल १८६५ ह्या दिवशी दक्षिण पक्षाचे जन. रॉबर्ट ली ह्यांच्या शरणागतीपासून यादवी युद्ध गुंडाळले जाऊ लागले. युरोपात आणि हिंदुस्थानात ही बातमी पोहोचताच सुरत कापसाच्या किंमती झपाट्याने खाली उतरू लागल्या आणि मुंबईत हाहाकार माजला. ह्या सर्व घटनांमधील एक प्रमुख सूत्रधार प्रेमचंद रायचंद ह्यांना दिवाळखोरीत जावे लागले आणि त्यांच्या खिशात असलेल्या बँक ऑफ बाँबे आणि एशिआटिक बँकिंग कॉर्पोरेशन ह्या संस्था जमीनदोस्त झाल्या.

१८६८ साली शेअरहोल्डर्सच्या ठरावानुसार बँक ऑफ बाँबे गुंडाळण्याचा आदेश गवर्नर जनरलकडून काढण्यात आला आणि बँक का बुडली ह्याची चौकशी करण्यासाठी कमिशन नेमले गेले. त्याचे अध्यक्ष होते मुंबईस्थित सुप्रीम कोर्टाचे भूतपूर्व न्यायाधीश सर चार्ल्स जॅकसन. जून २९ ते सप्टेंबर ९, १८६८ ह्या काळात कमिशनने टाउन हॉलच्या दरबार दालनात ७४ साक्षीदारांची तपासणी करून साक्षी नोंदवल्या. (साक्षीदारांमध्ये डॉ. भाऊ दाजी होते. सट्टेबाजीमध्ये पडल्यामुळे त्यांचेहि हात ह्या प्रकरणात पोळले होते.) नंतर २२ साक्षी लंडनमध्ये नोंदवल्या गेल्या. त्या कमिशनच्या अहवालात ह्या सर्व प्रकरणाचा इतिहास पाहावयास मिळतो आणि कोठल्याहि कादंबरीपेक्षा तो वेधकतेमध्ये कमी नाही.

बँक अॉफ बाँबेची नोट. नोटेवर मुंबईच्या टाऊन हॉलचे, तसेच माउंटस्ट्युअर्ट एल्फिन्स्टन आणि जॉन माल्कम ह्यांची चित्रे आहेत. चित्रश्रेय रिझर्व बँक संस्थळ.
बँक अॉफ बाँबे

पत्त्यांचा हा बंगला उभारण्याचा पहिला पत्ता म्हणजे बँक ऑफ बाँबेची पुनर्रचना करणारा कायदा, जो जुलै १८६३ मध्ये मंजूर करण्यात आला. ही बँक प्रथम १८४० मध्ये निर्माण झाली. त्यावेळी तिचे भांडवल ५२ लाख रुपये होते. अन्य काही बँकाप्रमाणे तिलाहि २ कोटि रुपयांपर्यंत स्वत:च्या नावाने कागदी नोटा छापण्याचाहि अधिकार होता. तेव्हाचे सरकार हे काम स्वत: करीत नव्हते. बँकेने काढलेल्या अशा नोटा म्हणजे बेअरर बँक ड्राफ्टचाच एक अवतार मानता येईल. फरक इतकाच की बेअरर बँक ड्राफ्ट मागणाऱ्याला प्रत्येक ड्राफ्टसाठी बँकेकडे जाऊन ड्राफ्टचे पैसे आणि वर कमिशन भरून असा ड्राफ्ट मिळतो. ह्याउलट पुरेसे तारण दिले अथवा रोखीचा भरणा बँकेत केला की एकगठ्ठयाने बँकेकडून नोटा उचलता येतात. बँकेच्या पतीवर विश्वास असला म्हणजे अशा नोटा बाजारात रोख नाण्यांसारख्याच चालू शकतात. अशा नोटा जारी करण्यासाठी मिळालेल्या कमिशनमुळे प्रथमपासून बँक चांगली नफ्यामधे चालत आली होती.

१८६० साली बँकेचा नोटा छापण्याचा अधिकार काढून घेण्याचा आणि तो अधिकार स्वत:कडे घेऊन आपल्या स्वत:च्या नावाने नोटा काढण्याचा निर्णय १८६१ च्या Paper Currency Act च्या अनुसार सरकारने घेतला. बँकेच्या उत्पन्नाचा हा मोठा स्रोत तिच्यापासून काढून घेतल्यामुळे ह्या दोन कोटीच्या ऐवजी बँकेला भांडवल उभारणीची मर्यादा रु. दोन कोटी दहा लाख इतकी वाढवून देण्यात आली, जेणेकरून बँकेला कर्जमंजुरीसाठी तशीच रक्कम उपलब्ध झाली. ह्या पुनर्रचित बँकेचा पायाभूत कायदा तेव्हाच्या बँक ऑफ बेंगाल आणि बँक ऑफ इंग्लंड ह्यांच्या पायाभूत कायद्यासारखा असावा अशी अपेक्षा होती. ह्या दोन्ही बँकांना सरकारी रोखे अथवा सरकारी हमी असलेल्या पब्लिक कंपन्यांच्या शेअर्सच्या तारणावर शेअर्सच्या पेड-अप भांडवलाच्या तीन-चतुर्थांशाच्या मर्यादेच्या आत राहून कर्ज मागणाऱ्यांना कर्ज देण्याची परवानगी होती. कर्जाच्या सुरक्षिततेच्या ह्या अटी नव्या बँक ऑफ बाँबेलाहि लागू असाव्या अशी अपेक्षा होती.

पुनर्रचित बँकेचा पायाभूत कायदा बँकेचे डिरेक्टर बोर्ड, मुंबई सरकार, कलकत्त्यातील सरकार आणि ह्या सर्वांचे सल्लागार-सॉलिसिटर्स ह्यांच्यामध्ये वरखाली फिरत असतांना वर उल्लेखिलेली कर्जाच्या सुरक्षिततेची अट कोठेतरी वगळली गेली आणि तिच्याशिवायच नवा कायदा तयार झाला. म्हणजेच ह्या कायद्याअन्वये नव्या बँक बाँबेला कोठल्याहि पब्लिक कंपनीच्या शेअर्सच्या तारणावर कर्ज मंजूर करणे आता शक्य झाले. चौकशी कमिशनच्या अहवालात ह्या सर्व घटकांना ह्या हलगर्जीपणाबाबत कमीअधिक प्रमाणात दोष देण्यात आला आहे. विशेषेकरून बँकेचे सॉलिसिटर मि. केली आणि मुंबई सरकारचे चीफ सेक्रेटरी ए.डी. रॉबर्टसन ह्यांच्यावर नाव घेऊन असा दोष टाकण्यात आला आहे. हे सर्व घडले अजाणतेपणे पण कायद्यातील ह्या त्रुटीमधून पुढे अनिर्बंध सट्टेबाजी करणे शक्य झाले. 'Falling through the cracks' ह्या इंग्रजी म्हणीचे हे उत्तम उदाहरण आहे.

ह्याखेरीज बँकेवरील अन्य काही निर्बंध - एका अर्जदाराला मंजूर करण्याच्या कर्जाची मर्यादा, एकाहून अधिक व्यक्तींची नावे कर्जखतावर कर्जफेडीस जबाबदार म्हणून घातली जाणे इ. - शिथिल करण्यात आले. नव्या कायद्यानुसार बँकेच्या बोर्डाकडून अशी अपेक्षा होती की कर्जाच्या अर्जाची छाननी कशी केली जावी ह्याचे नियम हे बाय-लॉजच्या मार्गाने त्यांनी घालून द्यावे. बँकेच्या बोर्डाकडून ह्या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. थोडक्यात म्हणजे कर्जमंजूरीबाबत नियम असे काही जवळजवळ उरलेच नाहीत. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सकडून अपेक्षित असलेली देखरेख जवळजवळ संपुष्टात आली.

बँकेचे सेक्रेटरी मि.ब्लेअर आणि त्यांचे दुय्यम मि.रायलंड ह्यांनी आता आपल्याच अधिकारात कर्ज मंजूर करण्याचे नवे धोरण ऑगस्ट १८६३ पासून प्रारंभ केले. पूर्वीच्या दिवसात कर्ज मिळविण्यासाठी सरकारी रोखे, सरकारी हमी असलेल्या रेल्वे कंपन्या आणि सोने इतक्याच गोष्टी तारण म्हणून मान्य होत्या. नव्या धोरणाखाली कर्जदाराच्या वैयक्तिक वचनचिठ्ठीवर कर्ज देण्याची नवी प्रथा सुरू झाली. ही कर्जे बोर्डाच्या नजरेस पडू नयेत ह्या उद्देशाने त्यांची नोंद बँकेच्या मुख्य हिशेबवहीत न करता एका वेगळ्या ’तात्पुरत्या’ वहीत केली जाऊ लागली. असे पहिले रु. १ लाखाचे कर्ज प्रेमचंद रायचंद ह्यांचे वडील रायचंद दीपचंद ह्यांना मंजूर झाले. ह्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस लिहून दिलेली ’वचनचिठ्ठी’ (promissory note) अन्य कोठलेच तारण न घेता डिस्काउंटवर खरेदी करण्याची नवी प्रथाहि आता बँकेमध्ये सुरू झाली. हा प्रकार कोणत्याच डिरेक्टरला माहीत नव्हता असे त्यांच्या जबान्यांवरून दिसते.

पुनर्रचित बँकेला आपले भांडवल रु. दोन कोटी दहा लाख पर्यंत वाढविण्याची संमति मिळाली होतीच. तिचा वापर करून २७ ऑगस्ट १८६३ ते ९ जून १८८४ ह्या काळात दोन हप्त्यांमध्ये बँकेचे भांडवल रु. दोन कोटी नऊ लाख पर्यंत वाढविण्यात आले. प्रत्येक शेअर रु. १,००० दर्शनी किंमतीचा होता. ही सर्व भरती पूर्ण झाली. बँकेच्या भांडवलातील ही वाढ मान्य नसलेले जुनेजाणते डिरेक्टर कावसजी जहांगीर रेडीमनी ह्यांनी ह्याच सुमारास प्रकृतीच्या कारणावरून आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी प्रेमचंद रायचंद ह्यांची निवड झाली. १ जून १८६४ ते ३० एप्रिल १८६५ हा अकरा महिन्यांचा काळ बँकेच्या इतिहासाचा शेवटचा अध्याय असे म्हणता येईल. अंदाधुंद पद्धतीने मंजूर केलेली कर्जे बुडू लागल्यामुळे ह्या काळाच्या अखेरीस बँकेस फार मोठा तोटा सहन करावा लागला. प्रेमचंद रायचंद आणि अन्य कर्जदार अशा ५० जणांना मिळून बँकेने एकूण रु. तीन कोटी त्रेपन्न लाख इतकी रक्कम दिली होती. पैकी रु. एक कोटी अठ्ठेचाळीस लाख इतक्या रकमेची वसुली झाली आणि रु. दोन कोटी पाच लाख इतके नुकसान झाले. ह्यामध्ये प्रेमचंद रायचंद ह्यांचा एकटयाचा वाटा छत्तीस लाख कर्ज, चौदा लाख वसुली आणि एकवीस लाख नुकसान असा होता. त्यांचे वडील रायचंद दीपचंद ह्याचा नुकसानीतील वाटा दोन लाख होता.

१८३१ साली जन्मलेले प्रेमचंद आता ३३ वर्षांचे होते. सधन गुजराथी व्यापारी कुटुंबाची पार्श्वभूमि त्यांच्यामागे होतीच. आपल्या सततोद्योगाने, व्यवसायातल्या धोरणीपणाने आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याच्या स्वभावामुळे एव्हांना सोनेचांदी, कापूस, चीनला अफू निर्यात अशा व्यापारामध्ये त्यांनी चांगलीच संपत्ति आणि नाव कमावले होते. भायखळ्यातील लव लेनमधील (आजचा सेठ मोतिशाह मार्ग) जैन देरासराजवळच्या त्यांच्या घरात सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांना भेटू इच्छिणाऱ्या लोकांची रीघ लागलेली असे, आणि त्या सर्वांना प्रेमचंदकडून काही मदतीची अपेक्षा असे. आपल्या गोड आणि मृदु स्वभावानुसार ते कोणासहि नाखूष करीत नसत, आणि त्यामुळे मुंबईतील तत्कालीन हिंदु व्यापारी समाजाचे ते अनभिषिक्त राजे होते असे म्हणले जाते.

रेक्लमेशन कंपन्या

कापूस व्यापारातून उत्पन्न झालेल्या नव्या संपत्तीचा वापर करण्याच्या हेतूने ह्या सुमारास ज्या कंपन्या स्थापन झाल्या त्यांमध्ये समुद्र हटवून जमीन निर्माण करण्यासाठी निर्माण झालेल्या कंपन्या प्रामुख्याने होत्या असे वर म्हटलेच आहे. बँका आणि त्यांच्या छत्राखालची financial associations ही अशा समुद्र हटवण्याच्या कंपन्यांच्या मागे असत. बॅकबे कंपनीशिवाय बाँबे ऍंड ट्राँबे रेक्लमेशन कंपनी, युनायटेड विक्टोरिया एँड कोलाबा रेक्लमेशन कंपनी, एल्फिन्स्टन लँड एँड प्रेस कंपनी, माझगांव लँड एँड रेक्लमेशन कंपनी अशी काही कंपन्यांची नावे दिसतात. प्रत्येकीच्या मागे मुंबईतील त्या काळातील नामांकित ब्रिटिश व्यापारी कंपन्या आणि त्या कंपन्यांसाठी दलालीचा व्यवसाय करणारे हिंदुस्थानी दलाल असत.

आजच्यासारखीच तेव्हाहि मुंबईला जमिनीची भूक होतीच. त्यांच्या प्रमोटर्सच्या नावामुळे समुद्रातून बाहेर काढलेली जमीन ही सोन्याची खाणच ठरणार आहे अशी सर्वांची खात्री असे, आणि म्हणून शेअरविक्री सुरू होताच आपल्याला त्यातील शेअर्स मिळावे ह्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू होई. शेअरवाटप सुरू होताच आणि दर्शनी किंमतीइतके भांडवल गोळा होण्याआधीच शेअर दर्शनी पटीच्या कैक पट किंमतीला एकाकडून दुसऱ्याला विकला जाणे सुरू होई. नंतरच्या काळातील मुंबईचे कमिशनर आर्थर क्रॉफर्ड, क्रॉफर्ड मार्केटचे जनक, ह्यांनी लिहिलेली ह्या खरेदीविक्रीची एक मनोरंजक आठवण आर. एफ. करकारियालिखित The Charm of Bombay ह्या पुस्तकात नोंदवली आहे. क्रॉफर्ड सांगतात: ’सकाळी घरातून निघून ऑफिसकडे जातांना वाटेत बाँबे ग्रीनवर दलाल गर्दी करून शेअर्सची खरेदीविक्री करण्यात गुंतलेले दिसत. माझे दलाल बोमनजी ह्यांना मी विचारतो, ’बोमनजी बाजार कसा चालू आहे?’ बोमनजी म्हणतात, ’साहेब, बाजार चढतो आहे. अमका फिनान्शिअल, नाहीतर तमका कोलाबा-बॅकबे वधारतो आहे कारण प्रेमचंद बाजारात आहेत असे ऐकतो.’ मी म्हणतो, ’ठीक बोमनजी, माझ्यासाठी पन्नासएक घेऊन ठेवा.' संध्याकाळी घरी परततांना बोमनजी पुन: भेटतात. मी विचारतो, ’बोमनजी बाजार कसा चालू आहे?’ बोमनजी म्हणतात, ’साहेब, बाजार चढतोच आहे.’ ’ठीक. तर मग माझे विकून टाका.’ काही तासात मी असे पन्नाससाठ हजार कमावतो.’ (अधिकृत शेअर बाजार, बाँबे स्टॉक एक्स्चेन्ज, अजून स्थापन झाले नव्हते. टाऊनहॉल समोरील मैदानात, ज्याला बाँबे ग्रीन असे ओळखले जाई, तेथे जमून सौदे पूर्ण करून शेअर दलाल पैशाची देवाणघेवाण आपसात करीत असत. प्रेमचंद रायचंद अशा दलालांमध्ये प्रमुख होते आणि नंतरच्या काळात बाँबे स्टॉक एक्स्चेन्ज स्थापन करण्यामध्येहि त्यांचा महत्त्वाचा भाग होता.)

बॅक बे देखावा

ह्या सर्व कंपन्यांच्या अग्रभागी होती ’बॅकबे कंपनी’, जिचे पूर्ण नाव होते ’बाँबे रेक्लमेशन कंपनी’. कंपनीला हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे किल्ल्याची भिंत पाडल्यामुळे चर्चगेट बाहेरील नव्याने खुल्या झालेल्या बॅकबेमध्ये भराव टाकून १५०० एकर नवीन जमीन निर्माण करण्याचे अधिकार ह्या कंपनीने सरकारकडून मिळविले होते. तेव्हाची ख्यातनाम एशियाटिक बँक, तिच्याच अधीन असलेले फिनान्शिअल असोसिएशन ऑफ इंडिया एँड चायना, कावसजी जहांगीर रेडीमनी (हे नंतरच्या काळात सर कावसजी जहांगीर झाले), फोर्ब्ज एँड कंपनीचे जेम्स फोर्ब्स, ससून कुटुंबापैकी एलिआस ससून, तसेच एँड्र्यू ग्रँट अशी एकाहून एक जबरदस्त नावे तिच्यामागे होती आणि त्यामुळे तिचा किंवा तिच्या पाठीमागे असलेल्या एशियाटिक बँक आणि फिनान्शिअल असोसिएशन ऑफ इंडिया ऍंड चायना ह्यांचा शेअर मिळणे म्हणजे घरच्या बागेत पैशाचे झाड लावण्यासारखे आहे अशी सर्वांची खात्री होती.

अशा शेअर्सच्या तारणावर अथवा वैयक्तिक पतीवर नवे कर्ज घ्यायचे - असे कर्ज द्यायला बँक ऑफ बाँबे किंवा एशिआटिक बँकेसारख्या प्रेमचंद रायचंदच्या खिशातील बँका तयारच होत्या - आणि ते वापरून नवे मिळतील ते शेअर्स घ्यायचे, शेअर्सच्या किंमती पुरेशा वधारल्या - आणि त्या वधारतच होत्या - की ते शेअर्स विकून कर्ज परत करायचे आणि विक्रीतून मिळालेली रक्कम वापरून पुन: गुंतवणूक करायची असे पिरॅमिड बांधणे सुरू झाले. बॅकबे कंपनीचे अधिकृत भांडवल रु. २ कोटि होते आणि प्रत्येकी रु. १०,००० च्या २००० शेअर्समध्ये ते विभागले होते. ह्या रु.१०,००० पैकी प्रत्यक्ष भरणा रु ५,००० चा झालेला होता. पहिल्या भरण्यानंतर लगेचच हे शेअर्स चढ्या किंमतीस विकले जाऊ लागले. हे शेअर्स विकण्यामधून किती फायदा शक्य होता हे एका उदाहरणावरून स्पष्ट होते. कंपनी स्थापन झाली तेव्हा मुंबई सरकारने प्रत्येकी रु. ५,००० भरून ४०० शेअर्स रु. वीस लाख ह्या रकमेस घेतले होते. काही महिन्यानंतर ६ जुलै १८६४ ला कलकत्त्याच्या आदेशावरून मुंबई सरकारने हे शेअर्स लिलावाने विकले तेव्हा त्यांना सव्वा कोटीहून थोडी अधिक किंमत आली.

बीबीसीआय रेल्वे कंपनीच्या सूचनेनुसार रिची स्ट्युअर्ट आणि कंपनीचे मायकेल स्कॉट, कावसजी जहांगीर रेडीमनी, प्रेमचंद रायचंद, वॉल्टर कॅसेल्स आणि गॅविन स्टील अशा चौघांनी बाँबे रेक्लमेशन कंपनी ह्या नावाने कंपनी नोंदवली. चर्चगेटच्या बाहेर १५०० एकर जमीन समुद्रात भराव घालून निर्माण करण्याचे आणि तिचे तुकडे विकण्याचे अधिकार सरकारने कंपनीला दिले. ह्याच्या मोबदल्यात कंपनीने ३०० एकर जमीन सरकारला रेल्वेचा विकास आणि अन्य सार्वजनिक उपयोगासाठी मोफत द्यायची होती. ह्याखेरीज सरकारने रु. ५,००० चा पहिला हप्ता भरून ४०० शेअर्सहि घेतले. खाजगी कंपनीत सरकारने पैसा गुंतवणे कलकत्त्याहून नामंजूर झाले तेव्हा मुंबई सरकारने तेच शेअर्स काही महिन्यातच लिलावाने सव्वा कोटीला विकले ह्याचा उल्लेख वर आलाच आहे.

बँक ऑफ बाँबेचे डिरेक्टर आणि बॅकबे कंपनीचे एक प्रमोटर ह्या दोन भूमिकांमुळे मुळे प्रेमचंद हे १८६४-६५ च्या मुंबईतील उलाढालींचे प्रमुख सूत्रधार बनले. एखाद्याला कंपनीचे शेअर बहाल करणे, त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देणे, शेअर्सच्या खरेदीविक्रीत दलाली घेणे अशा वेगवेगळ्या भूमिका ते आलटून पालटून बजावत. स्वत:च्या नावाने आणि दुसऱ्या अर्जदारांच्या बेनामी नावांनी त्यांनी स्वत:हि मोठी उचल केली होती. बँक ऑफ बाँबेमधील त्यांच्या महत्त्वाच्या स्थानाचा त्यांना चांगलाच उपयोग झाला. कोणाहि इच्छुकाला शेअर्स हवे असले तर त्याला ते घेता यावेत म्हणून भांडवलाची सोय प्रेमचंद आपल्या खिशातील बँकांकडून करवीत. बँकेचे सेक्रेटरी ब्लेअर आणि त्यांचे दुय्यम रायलंड हे पूर्णपणे त्यांच्या कह्यात आलेले होते, कारण त्यांनाहि शेअर्स देऊन प्रेमचंद ह्यांनी त्यांना उपकृत करून ठेवलेच होते. प्रेमचंदांच्या साध्या चिठ्ठीवर हे अधिकारी लाखोंची उचल अर्जदारास देत असत अशी अनेक उदाहरणे चौकशी कमिशनच्या अहवालात दिलेली आहेत.


बॅकबे कंपनीचा अस्त

बॅकबे कंपनीच्या दीडदोन वर्षांच्या काळात कंपनीच्या डिरेक्टर बोर्डाने काहीच कार्य केले नाही असे नाही. कंपनीची प्रारंभीची आर्थिक स्थिति उत्तम होती कारण भरभक्कम रोख रक्कम कंपनीच्या खात्यात बँकेत पडून होती. तिचा योग्य वापरहि सुरू झाला होता. मशिनरी, माती हलवण्यासाठी ट्रक्स, जड वजने उचलण्यासाठी याऱ्या, वाफेवर चालणारी जमीन खणण्याची यंत्रे अशा सामानाच्या ऑर्डर्स इंग्लंडला रवाना झाल्या होत्या. इतकेच काय, जेव्हा मुंबईच्या रस्त्यावर गॅसचे दिवे येणेहि अजून दूर होते अशा त्या जमान्यात बॅकबेवरचे काम रात्रंदिवस करता यावे म्ह्णून विजेच्या प्रखर उजेडाच्या दिव्यांची खरेदीहि व्हायची होती. जर फासे अनपेक्षितरीत्या उलटे पडले नसते तर कराराने ठरलेल्या वेळात आपले काम पूर्ण करून १५०० एकर नवी जमीन समुद्रातून कंपनी बाहेर काढू शकेल अशी सर्व चिह्ने दिसत होती. पण झाले उलटेच. बॅकबे कंपनीचे सुमारे ९० लाख रुपये एशिआटिक बँकेमध्ये १२ महिन्यांच्या मुदतीने ठेवले होते. सट्टेबाजीसाठी दिलेला पैसा वसूल होणे अशक्य झाल्यामुळे ती बँक दिवाळखोर झाली. ह्याचा फास बॅकबे कंपनीच्या गळ्यास लागून सरकारशी केलेल्या कराराच्या मुदतीत राहणे तिला अशक्य झाले आणि अखेरीस कंपनी गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू झाली.

दोन वर्षात निर्माण केलेली जमीन आणि कंपनीच्या मालकीची मशिनरी सुमारे ७५ लाखाची होती. सरकारशी केलेला कराराच्या भंगाची किंमत म्हणून हे सर्व सरकारच्या हवाली करावे लागले. मधल्या काळात शेअरहोल्डर्सकडून पुढील कॉलचे २०० रुपये घेण्यात आले होते. कंपनीची उरलीसुरली मालमत्ता शेअरहोल्डर्समध्ये वाटल्यावर ५२०० रुपये भरल्या गेलेल्या प्रत्येक शेअरवर शेअरहोल्डरला २३६१ रुपये परत मिळाले. काही महिन्यांपूर्वीच कित्येकांनी तेच शेअर्स ४०,००० वा ५०,००० हजाराला घेतले होते ही आठवण केली म्हणजे किती गुंतवणूकदार व्यक्ति ह्यामध्ये धुळीस मिळाल्या असतील ह्याची कल्पना करता येते. ह्यावेळेस नादारीची इतकी प्रकरणे निर्माण झाली की नेहमीच्या कोर्टांकडून ती सोडविणे अशक्यप्राय होते. त्यासाठी एक वेगळा कायदा पास निर्माण करण्यात आला - १८६५ चा कायदा XXVIII. दोन वर्षांच्या काळात ह्या कायद्याखाली अनेक नादारी खटल्यांचे निकाल लावण्यात आले. बेहरामजी होरमसजी कामा ह्यांची ३ कोटींची नादारी हा त्यांपैकी सर्वात पहिली आणि मोठी. प्रेमचन्द रायचंद ह्यांचीहि नादारी ह्याच कायद्याखाली ठरविण्यात आली.

बँक ऑफ बाँबे

बँक ऑफ बाँबे. पुनर्रचनेनंतरची एल्फिन्स्टन सर्कलमधील (सध्याचे हॉर्निमन सर्कल) नवी इमारत. तेथून दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याचे बँक स्ट्रीट हे नाव बँक ऑफ बाँबेच्या नव्या इमारतीवरून मिळालेले आहे. जुनी इमारत सध्याच्या फ्लोरा फाउंटनच्या पश्चिमोत्तर कोपऱ्यावर होती असे वाचल्याचे स्मरते.

३० नोवेंबर १८७० ला कंपनी अखेरची बंद झाली. तिची नंतर पुनर्रचना झाली आणि १९२१ नव्याने स्थापलेल्या इम्पीरिअल बँकेत तिचे विलीनीकरण झाले. इतके सगळे होऊनहि ह्या प्रकरणाचा ठपका असा कोणावरच ठेवला गेला नाही. चौकशी कमिटीने ओढलेल्या कोरड्यांपलीकडे प्रेमचंद, ब्लेअर, रायलंड, अन्य डिरेक्टर, सरकारी अधिकारी कोणाच्याच अंगास काहीच तोशीश लागली नाही. त्याची कारणे प्रमुखत: दोन दिसतात. एकतर आजच्या काळात अशावेळी लगेच पुढे येणाऱ्या Conflict of Interest, Insider Trading, Fiduciary Duty अशा संकल्पना मांडण्याइतके तेव्हाचे कायदे प्रगल्भ नव्हते. दुसरे म्हणजे ह्या प्रकरणातील सर्व जबाबदार लोक हे मुंबईतील तेव्हाचे प्रतिष्ठित नागरिक, सरकारदरबारात रोजची ऊठबस असलेले असे होते. तेव्हा मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

राजाबाई टॉवर बांधत असतांना

राजाबाई टॉवर बांधत असतांना. पलीकडे समुद्र किनारा जवळच, आजच्या चर्चगेट स्टेशनच्या आसपास आहे. तेथील समुद्र अजून हटला नव्हता.

प्रेमचंद रायचंद ह्यांचे स्वत:चेहि ह्यात प्रचंड नुकसान झाले, तरीपण पुन: उभारी धरून त्यांनी नव्याने संपत्ति उभी केली. आज त्यांचे नाव आपणास आठवते ते शेअर वेडेपणामुळे नाही तर राजाबाई टॉवरमुळे. १८७० मध्ये आपल्या आईच्या नावाने हा टॉवर बांधण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठाला दोन लाखाची देणगी दिली. हा राजाबाई टॉवर आज मुंबईचा एक दागिना मानला जातो. अन्यहि अनेक देणग्या त्यांच्या नावावर आहेत. आपल्या नावाने शिष्यवृत्ति चालू करण्यासाठी त्यांनी १८६८ साली कलकत्ता विद्यापीठास दोन लाखाची देणगी दिली. ती शिष्यवृत्ति अजूनहि चालू आहे. भायखळ्यातील ’रेजीना पाचिस’ हे बेघर मुलींसाठीचे वसतिगृह त्यांच्या घराच्या जागेवर आज उभे आहे.

लेखनाधार
१. A Financial Chapter in the History of the Bombay, लेखक: दिनशा एदलजी वाच्छा.
२. House of Commons पुढे ठेवण्यात आलेल्या Reports from Commissioners ह्या २७ खंडांच्या संचापैकी खंड क्र.१५.
(ही दोन्ही पुस्तके archive.org येथे उपलब्ध आहेत.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख.

मुंबईत रहात असताना हा इतिहास माहित असता तर? पण आता समजलं हे नसे थोडके.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक इतिहास.राहून राहून या लोकांच्या पाण्यावर लोणी काढण्याच्या कसबाचे कौतुक वाटते.
बीएसईमध्ये हर्षद मेहताने केलेला बुल रनही असाच काहीसा होता. 'बँक ऑफ कराड'चे दिवाळे निघाले ते आठवले.
जालीय लेखक रामदास यांची काही माहितीप्रद प्रतिक्रिया येईल अशा अपेक्षेत...

हर्षद मेहता काय किंवा केतन पारिख हा रिटेलर्स साठी देव होता असे ऐकले आहे.
इतरांच्या मानाने तो खरच बरा होता, व बहुतेक म्हणूनच त्याचा गेम करण्यात आला.
(बेअर ऑपरेटर्सना म्हणे त्याच्यामूळे मार्केट मॅनिप्युलेशन नीट करता आले नाही; ते रिटेलर्स ला नीट लुबाडू शकत नव्हते; तो असे पर्यंत. म्हणून आधी त्याला खोपच्यात घेत्ला.)
मार्केट ह्या प्रकारातलं झाट काही समजत नाही. पण "घपला" ह्या अल्पपरिचित माहितीपटसदृश चित्रपटात ह्याच तर्काकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे असे वाटते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोल्हटकरांचे लेखनाला माहितीपूर्ण म्हणणे म्हणजे खरंतर द्विरुक्ती आहे. एखाद्या लेखनात नुसती माहितीच नाही तर त्या माहितीची अत्यंत मुद्देसुद, गोळीबंद तरीही वाचायला/समजालया सुलभ अशा भाषेत पेशकश कशी असावी याचा हा लेख म्हणजे वस्तूपाठ आहे.

दिवाळी अंकाची मजा अशा लेखांमुळे अधिकच येत आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोल्हटकरांचे लेखनाला माहितीपूर्ण म्हणणे म्हणजे खरंतर द्विरुक्ती आहे.

या वाक्याची द्विरुक्ती करतो.

लेख नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे. या विषयावर मराठीत अधिक माहिती गंगाधर गाडगिळांच्या मुंबईवरील पुस्तकात आहे. १८६३ मधल्या दिवाळीत पैशाच्या खणखणाटाने मुंबई कशी नादावली होती याचे मोठे रोचक वर्णन त्यात आहे. न.र.फाटकांनीही 'मुंबईचा इतिहास' मध्ये लिहिले आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांच्या अ. का.प्रियोळकरांनी लिहिलेल्या चरित्रातही बरीच माहिती आहे, त्यानुसार जगन्नाथरावांनाही बरेच नुकसान सोसावे लागले होते. बॅक बे कंपनीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. हे अरिष्ट आले नसते तर जी.आय.पी. रेल वे च्या आधी बी.बी. सी. आय धावू लागली असती. असो. त्या काळच्या एका नामांकित मराठी लेखकांनीही यात आपले हात पोळून घेतले होते. (ते अ.ब. कोल्हटकर तर नव्हते? की चिपळूणकर? नक्की स्मरण नसताना नाव घेऊन लिहिल्याबद्दल, तेही अरविंद कोल्हटकरांच्या लेखात; माफी असावी. कोणीतरी खुलासा करेल या हेतूने लिहिले आहे. )

उत्कृष्ट लेख आणि छायाचित्रं..

अर्थात लेखकाचं नाव पाहून त्यात आश्चर्य काहीच नाही..!!

ते लेखक अच्युत बळवंत कोल्हटकर (१८७९-१९३१) नक्कीच नव्हेत. ते माझे चुलत आजोबा. १८६४च्या काळात त्यांचा जन्महि झाला नव्हता. त्यांचे आजोबा महादेवशास्त्री कोल्हटकर हे अव्वल इंग्रजीत मे. कँडीच्या परिवारातील आणि शाळाखात्यात वरच्या जागी असलेले होते. ह्यांनी काही पुस्तकेहि लिहिली आहेत. पण १८६५ आधीच त्यांचा मृत्यु झाला होता.

कृष्णशास्त्री चिपळूणकर हे विष्णुशास्त्र्यांचे वडील. ह्यांचा काळ जुळतो. ते लेखकहि होते पण त्यांचा मुक्काम पुण्यात कारण ते कँङीच्या संस्कृत शाळेत शिक्षक होते. त्या काळातील पुण्याच्या चित्पावनी वातावरणामधून बाहेर पडून ते मुंबईतील सटोडियांच्या बैठकीत जातील हे दुरापास्त दिसते.

भाऊ दाजींच्याबद्दल मी वर लिहिलेच आहे.

अतिशय माहितीपूर्ण लेख. हर्षद मेहता प्रकरणाच्या समांतर अनेक उल्लेख लेखात दिसतात.

अवांतर शंका : १८६०-७० च्या दरम्यान मालवाहू ट्रक्स आणि विजेचे दिवे* हे उल्लेख चुकीचे वाटतात.
*विजेचे दिवे शक्य आहेत- आर्क लॅम्प स्वरूपात.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बॅक बे रेक्लमेशन कंपनीने इंग्लंडहून मागविलेल्या जड सामानाचा उल्लेख दिनशा वाच्छांच्या पुस्तकात आहे. त्याप्रमाणे कंपनीने 'locomotives, steam tugs, barges, rails,cranes, ballast waggons, lorries,workshop tools, steel hammers, sawing machinery'अशा गोष्टी इंग्लंडातून मागविल्या होत्या. पैकी लॉरीज ह्या वाफेवर चालणार्‍या असणार कारण तशी वाहने १८५० पासून वापरात येऊ लागली होती. ह्याबाबतीत अधिक माहिती येथे पहा.

विजेच्या दिव्यांच्या बाबतीत दिनशा वाच्छा ह्यांनी डिरेक्टर रिपोर्टचा हवाला देऊन 'डंजनेस (Dungeness) दीपगृहामध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक दिव्यां'चा उल्लेख केला आहे. तसेच दिवे इंग्लंडातून मागविण्यात आले होते.
ह्या दीपगृहाचे संस्थळ मी पाहिले. केंट परगण्यातील हे दीपगृह १६१५ पासून उभे आहे आणि वेळोवेळी तेथे नवे दीपगृह आणि नवे दिवे बसविण्यात आलेल आहेत. १८६२ साली तेथे सर्वप्रथम विजेचे दिवे वापरात आले.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars