तीन म्हाताऱ्या
तीन म्हाताऱ्या
लेखिका - शहराजाद
आमचे दादरचे घर एका लहानश्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. मजल्यावर तीन बिर्हाडे. आम्ही आणि राणे काका शेजारीशेजारी. समोरच्या बिर्हाडात तीन श्रॉफ म्हाताऱ्या एखाद्या काळोख्या गुहेत दडून बसावे तशा राहत असत. अख्ख्या बिल्डींगभर, त्यांचा उल्लेख झालाच, तर 'श्रॉफची म्हातारी' - नंबर एक/दोन/तीनची असाच होत असे. वास्तविक मी एकेरीने उल्लेख करावा असे त्यातल्या सर्वात धाकटीचेही वय नव्हते. चाराठ वर्षांमागे एकेक करून सर्व वारल्या तेव्हाही सगळ्या ऐंशीच्या पुढे होत्या. पण एकतर कोकणी परंपरेला अनुसरून आमच्या बिल्डींगीत कोणाचाच उल्लेख, तोही पाठीवर, बहुवचनी होत नसे. त्यातून ह्या मंडळींचे वागणे असे काही विक्षिप्त की कोणाला म्हणून त्यांच्याबद्दल जळल्या काडीइतकाही आपलेपणा नव्हता.
नितांत खडूसपणा हा ह्यांच्या संपूर्ण घराण्याचा गुणविशेष होता. वडील नथुराम. सध्याची इमारत उभारण्यापूर्वी त्या जागी लहानशी बैठी चाळ होती. तिथे हे नथुराम आपल्या तीन मुली आणि पत्नीसह राहत. आमच्या काकांचे बिर्हाड त्यांच्या एक घर टाकून पलीकडे. चाळीतले वातावरण तसे मोकळेढाकळे. हेवेदावे, भांडणतंटे भरपूर होते, पण लोक वरवर तरी मिळूनमिसळून राहणारे. अपवाद फक्त ह्या एका श्रॉफ कुटुंबाचा. कधी कोणाशी बोलणे नाही, हसणे नाही, चौकशी-चपाटी नाही, शक्य असेल तर बघणेदेखील नाही. ह्या मुलींच्या आईचा स्वभाव पराकोटीचा संशयी होता. जगातलं कुणी म्हणजे कुणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही, अशी या मायलेकींची धारणा होती. त्यातून पुरुषांवर तर विशेष संशय. सगळे आपला फायदा घ्यायला टपले आहेत असाच कायम आविर्भाव. वास्तविक ह्या मुली तश्या बाहेरचं जग पाहिलेल्या. त्या काळातही अगदी नऊवारी लुगड्यात कॉलेजात जाऊन त्यांनी पदव्याही घेतलेल्या होत्या. पण कॉलेजातून घरी आल्यावर घरात बंद.
काही माणसे आपली कोणाच्या अध्यात ना मध्यात, आपण बरे की आपले काम बरे, अशी असतात. पण ह्यांची तर्हा त्यापलीकडची होती. इतकी, की एवढ्या वर्षांच्या शेजारात ह्या मायलेकी शेजारीपाजारी जाणे तर सोडाच, चाळीच्या सामायिक संडासात जायलाही कधी बाहेर पडल्या नाहीत! एखाद्या धीट लहान पोराने त्याबद्दल विचारले, तर 'आम्ही आमच्या मावशीकडे जात असतो', असे उत्तर मिळे. पण रोज सकाळी मावशीकडे जातानाही कधी दिसल्या नाहीत एवढे खरे.
त्यामानाने नथुराम जरासे माणसातले. जरासे म्हणजे, टमरेल घेऊन रांगेत उभे असताना शेजारच्यांचे तोंड बघायची वेळ आली तर हसत तरी. पण तितकेच. त्यापलीकडे सांस्कृतिक देवाणघेवाण नाही. नथुराम एका श्रीमंत पारश्याकडे नोकरीला होते. त्याने मरताना यांच्या नावे बरेच पैसे ठेवले होते. ही माया मालकाच्या व्यवहारात अफरातफर करून जमवली होती, अशीही वदंता होती. खरे-खोटे कोण जाणे! पुढे ते वारले. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी चाळ पाडली. त्यावेळी पाया खणताना ह्यांच्या घराच्या जमिनीत हजारो रूपयांच्या नोटा मिळाल्या. घरातच खड्डा खणून सिमेंटची तिजोरी केली होती, ती फोडावी लागली. बाहेर काढल्या तेव्हा बहुतेक नोटा एवढ्या खराब झाल्या होत्या, की बँकेतही बदलून मिळाल्या नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यावर झाल्यावर आम्ही ह्यांच्या शेजारी आलो. त्यांची म्हातारी आई रात्री नेहेमी दाराला खेटून झोपत असे. "आम्ही चारही बायका माणसं; रात्री कोणी चोरबीर आला तर शेजारीपाजारी हाक मारता यावी", असं ती म्हणे. बाकीचे लोक म्हणत - आपल्या मुलींवर पहारा करायला ही तिथे झोपते. पुढे तीही वारली. तिच्या मुलींनी तिचेच वळण जसेच्या तसे पुढे चालवले.
थोरली तारा आमच्या काकांपेक्षा जराशी मोठी. आज असती तर नव्वदीला टेकली असती. त्या काळात एम्.ए. होऊन ती छबिलदास शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती. मधली कस्तुर. ती देखील ताराच्या पावलावर पाऊल टाकून त्याच शाळेत शिकवत होती. आईच्या विचित्र वागण्याने दोघींचीही लग्नं वेळेत होऊ शकली नव्हती. पुढे वयही निघून गेले.
धाकटी गुलाब त्यातल्यात्यात दिसायला जरा उजवी. नाकीडोळी बरी आणि अतिशय दाट काळेभोर केस. तिने घराची चाकोरी मोडण्याचा थोडा प्रयत्न केला. डी. एड्. करत असताना एका सहाध्यायाशी तिचं सूत जुळलं. त्याने रीतसर लग्नाची मागणीही घातली. पण इथे तारा आणि कस्तुरी आडव्या आल्या. त्या दोघी जश्या त्यांच्या आईच्या दबावाखाली होत्या तशी धाकटी गुलाब मोठ्या बहिणींच्या प्रभावाखाली होती. "आम्हाला संसारसुख मिळाले नाही तर ते हिला एकटीलाच काय म्हणून मिळावे ?", या मुद्द्यावर वरच्या दोघींनी गुलाबला ठरवलेले लग्न मोडायला भाग पाडले. एवढेच नव्हे तर तिने असले उद्योग पुन्हा करू नयेत म्हणून तिचे डी. एड्. शिक्षणही बंद करून टाकले. गुलाब त्यानंतर कायम घरातच राहिली. नोकरीला जाताना इतर दोघी दाराला कुलूप लावून जात. पुढे गुलाबचेही लग्नाचे वय ओसरल्यावर हे कुलूप घालणे थांबले. माझ्या आठवणी त्यापुढच्या काळातल्या आहेत. पण गुलाबला घराबाहेर पडताना मी तरी कधीच पाहिले नाही. मी लहानपणी तिला गोट्या-मावशी म्हणत असे. कारण मोठ्या दोघी घरी येताना जिन्यात आल्या, की "गोट्याऽऽऽऽ" म्हणून हाक मारत, की गुलाब दार किलंकिलं करून उघडायला तयार राही. एरवी, कडी वाजवणे, घंटा वाजवणे, इत्यादीला बहुतेक वेळा उत्तर मिळत नसे. मिळाले तरी, 'कोण आहे?', 'काय काम आहे?', 'कश्यासाठी? इत्यादी ढीगभर चौकश्या बंद दाराच्या आडूनच होत. शक्यतो दार न उघडताच घालवून देण्याकडे कल असे. म्हणजे अगदी आपल्याकडे चुकून आलेले त्यांचे पत्र द्यायचे झाले, तरी तेवढ्यापुरते हसून आभार मानायलाही दार उघडत नसत. दारातल्या पत्राच्या झडपेतूनच पत्र आत टाकायचे. वर्षानुवर्षे शेजारी रहाणाऱ्यांशी वागण्याची ही तर्हा. बरेचदा तर आतून उत्तरही मिळत नसे.
त्यांचा एक मावस का चुलत भाऊ अधूनमधून रविवारी भेटायला येई. पण त्यालासुद्धा कित्येकदा कडी वाजवत ताटकळत थांबावे लागे. भावाचा अपवाद सोडता बाकी पाहुणेरावळे शून्य. श्रॉफ नावाचेच त्यांचे एक लांबचे नातेवाईक मागच्या बाजूला राहत. ह्यांच्या खिडकीतून आंब्याची कोय फेकली तर त्या दुसऱ्या श्रॉफांच्या गच्चीत पडेल, इतक्या जवळ. पण येणे-जाणे अगदी शेवटपर्यंत नाही. मात्र या तिघींना लोकांच्या घरी काय चालले आहे, कोण आले आहे, अश्या गोष्टींत प्रचंड रस होता. त्यांच्या आणि काकांच्या घरांमध्ये एक भिंत सामायिक आहे. ह्या बहिणी भिंतीला कान लावून काकांच्या घरातली बोलणी ऐकायच्या. काकांची घरमालकाबरोबर या जागेवरून वर्षानुवर्ष कोर्टकेस चालू आहे. केससंबंधीची बोलणी त्या खाली पहिल्या मजल्यावर रहाणाऱ्या घरमालकाला जाऊन सांगत. अगदी हलकी चाहूल लागली, तरी इंचभर दार उघडून या म्हाताऱ्या त्या फटीतून बाहेर डोकावत असत. दहा-बारा वर्षांची असताना मी एक ग्रीक पुराणकथा वाचली होती. त्यातल्या तीन आंधळ्या म्हाताऱ्या एकच डोळा तिघींमध्ये आलटून पालटून वापरून पर्सियसला बघत. दारातली ती इंचभराची फट पाहून मला त्या गोष्टीतला सामायिक डोळा आठवत असे.
त्या दाराच्या पलीकडची बाजू फारच थोड्या लोकांनी पाहिलेली होती. दुरुस्तीला बोलवलेल्या प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरेंनी. माझ्या पत्रिकेत काही अनिष्ट योग असल्यामुळे हे भाग्य मला पाचव्या-सहाव्या वर्षी मिळाले होते. त्यांनी मला एकदा कौतुकाने घरात घेतले, तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले होते. या घटनेतल्या मला आठवणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे - घरात दाटलेला कोंदट अंधार, जुने दणदणीत लाकडी कपाट आणि या सर्वांशी विसंगत वाटणारा भिंतीवरच्या कॅलेंडरमधला पंतप्रधान इंदिरा गांधींचा गुलाबी गोमटा फोटो. काळ्या केसात पांढऱ्या बटेसकट. पण हे नवल दोनचारदाच घडले. बहुतेक आपण फारच लोकांच्यात मिसळत चाललोय की काय, अश्या धास्तीने त्यांनी माझे येणे बंद केले. जिना चढताउतरताना दिसल्या, तरी सरळ नाकासमोर बघत निघून जात.
इतक्या वर्षांत शेजारपाजारी कित्येक लग्ने लागली, जन्म-मृत्यू झाले पण यापैकी कश्शाकश्शात ह्यांचा सहभाग नसे. मग सणासुदीला चार लोकांत मिसळण्याचे तर नावच नको. लहान मुलांनी हौशीने बिल्डींगचा सार्वजनिक गणपती बसवला. ह्यांनी अर्थातच वर्गणी दिली नाही, पण कोणीच त्यांना तीर्थप्रसादाला अडवले नसते. तिघी एकही जिना चढून कधी तिथे फिरकल्या नाहीत. एकंदरीत भोवतालच्या आनंदात, उत्सवात सहभागी न होणे आणि जमेल तेव्हा त्यावर विरजण घालणे, हे धोरण. म्हणजे तीन बिर्हाडांमधल्या पॅसेजमध्ये, लहान मुलीला दिवाळीत फुलबाजीने सापाच्या गोळ्या लावून दाखवल्या, तर "लहानच काय, मोठ्यांनाही कळत नाही फटाके कुठे फोडू नयेत", असले फुत्कार दाराच्या फटीतून टाकायचे. मात्र, दिवाळीत ह्यांच्या बंद दाराआडून फट्-फट्-फट्-फट्-फट्-फट् असे केपा फोडल्याचे आवाज दरसाल येत. ह्या माणूसघाणेपणाला अपवाद एकच. दसऱ्याला सोने द्यायला गेलेल्या मुलांना हसून एकेक लिमलेटची गोळी दिली जाई. सोने देऊन पाया पडण्याची मात्र सोय नसे. दाराच्या वीतभर फटीतून जेमतेम एखादं पाऊल दर्शन देई. दारालाच नमस्कार केल्यासारखं करून मुले सटकत.
वर्षानुवर्षे तिघींचे वागणे हे असेच. त्यात कधीही, काहीही फरक नाही. यथावकाश तारा आणि कस्तुर छबिलदास शाळेतून वरिष्ठ स्थानांवरून निवृत्त झाल्या. मग तिघीही घरीच असत. वेळ कसा घालवत, कोण जाणे! खूप पूर्वी त्यांच्याकडे एक काळा-पांढरा टी. व्ही. होता. तो कधीच मोडला. रेडिओ मात्र कायम ऐकत असत. त्यांच्या रविवारी येणाऱ्या भावाची, त्या आता आधीपासून दार किलकिले करून वाट पाहू लागल्या. तो जिन्यात दिसला, की "दादा आला, दादा आला!", असे उद्गार ऐकू येत. भाऊ बहुतेक वेळा त्यांच्यासाठी डब्यात मटण घेऊन येत असे. नंतर एक मासळीवालाही त्यांच्या घरी आठवड्यातून दोनतीन वेळा येऊ लागला. त्याच्याकडून उत्तमोत्तम मासळी त्या घासाघीस न करता घेत. बाजारहाट आणि बाहेरची इतर कामे कस्तुरकडे असत. पुढेपुढे जड पिशव्या उचलून वर आणायला ती खालच्या आनंदीकाकूंच्या नातीची मदत घेऊ लागली आणि चक्क तिला उंबरठ्याच्या आत घेऊन, दोनतीन मिनिटं विचारपूस करून वर लिमलेटची गोळी दिली जात असे.
पण मग धाकट्या गुलाबची तब्येत ढासळत गेली. तिला पायाचा काहीतरी आजार होता. पण ती फारशी कधी डॉक्टरांकडे गेली नाही, की तिला तपासायला कोणी आले नाही. भप्प सुजलेले पाय घेऊन ती बसून राही. घरमालक डॉक्टर होते. कस्तुर त्यांच्याकडे जाऊन बहिणीसाठी औषधे आणत असे. डॉक्टर स्वतः फक्त एकदा घरी आले होते - गुलाबला तपासून ती वारल्याचे सर्टीफिकेट द्यायला. आता, सर्वसाधारणपणे असे काही घडले तर शेजारच्यांना प्रथम बातमी कळते आणि तेच सर्वात आधी मदतीला येऊ शकतात. पण ह्यांना तेव्हाही कोणाशी संपर्क नको होता. इमारतीच्या खाली एकीकडे डॉक्टरांच्या घरी काम करणारे एक गृहस्थ राहत असत. ताराने घाबऱ्या-घाबऱ्या त्यांच्याकडे जाऊन आपल्या भावाला "बोलावलंय", एवढंच सांगायला सांगितलं. ते काम करायला त्यांची ना नव्हती, पण ते म्हणत, "अहो, काहीतरी सांगा की.. का बोलावलंय, काय झालंय, किती अर्जंट... तुमच्या भावाने विचारलं तर मी काय सांगू?" पण हिचं आपलं एकच - "बोलावलंय म्हणून सांग". नंतर तो भाऊ आला, त्याने पुढची व्यवस्था केली आणि सर्वांना बातमी समजली. उरलेल्या दोघींचा दिनक्रम पूर्वीप्रमाणेच चालू राहिला. वर्षभराने थोरली ताराही वार्धक्याने निवर्तली. तिच्या शेवटच्या आजारपणात मात्र पलीकडचे जोशी डॉक्टर एकदा तपासायला आले होते. आल्या आल्या त्यांनी आधी घरावरूनच दोघींना झाडले. "ह्या घरात ना प्रकाश, ना मोकळी हवा. दारं-खिडक्या बंद. खिडक्यांना ब्लॅकआऊटसारखे कागद चिकटवलेले. वर पडदे. आजारी माणूस कसा बरा होणार इथे?" पण बिचाऱ्या डॉक्टरांना या घराची तऱ्हा माहित नव्हती. पलीकडच्या घरांमधून कोणी आपल्यावर वाईट नजर टाकेल, ह्या भीतीने खिडक्या कायम झाकलेल्या असत. हवेसाठी उघाडल्या तरी थोड्याश्याच. आता, त्यांची भीती पूर्णपणे अस्थानी नव्हती हे मला माहित आहे, पण अगदी संडासाची खिडकीदेखील वापर नसल्यावेळीही कधी सताड उघडी राहिली नाही.
ताराच्या मागे तीन वर्ष कस्तुरने एकटीने काढली. पुढेपुढे तिची प्रकृती ढासळू लागली. माझी ताई कायम शेजारी लक्ष ठेवून असे - म्हातारी अजून आहे ना. एकदा कस्तुर अशक्तपणामुळे घरात धडपडली. उठता येईना. ओरडून हाका मारण्याइतपत त्राण अंगात नव्हतं. म्हणून शेजारच्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जोरजोरात भांडी आपटून आवाज करायला सुरूवात केली. ताईने दार उघडायचा प्रयत्न केला, पण ते आतून पक्के बंद केलेले. शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. कसाबसा गॅलरीतून त्यांनी प्रवेश मिळवला. पण गॅलरीतून घरात जाणे सोपे नव्हते. मधे रद्दी आणि इतर अडगळीचा ढीग रचून ती वाट जवळपास बंद करण्यात आलेली होती. कसाबसा तो जवान जमिनीवर पडलेल्या कस्तुरपाशी पोहोचला. दार आतून उघडून त्याने बाकीच्यांना आत प्रवेश दिला. घराची आणि तिची अवस्था पहाता तिला बाहेर काढून इस्पितळात दाखल करणेच योग्य, असे या सर्वांचे मत पडले. त्यातला सर्वात तरूण आणि दणकट होता त्याने, "आज्जी तुम्हांला हास्पिटलात नेतो", असं म्हणून म्हातारीला उचलायला मानेखाली आधार दिला. हिने मोठ्या संतापाने तो हात झिडकारून टाकला. आजन्म कुमारिका ह्या तिघी. पुरुषाचा स्पर्श, मग तो कुठल्याही वयाचा असो, वर्ज्य त्यांना. खरं तर त्या जवानाने म्हातारीला स्पर्श केला, तो केवळ मुन्शीपाल्टी देत असलेल्या पगाराला जागण्यासाठी. पण त्या नातू शोभेलशा वयाच्या जवानावर ही आज्जी डाफरली. जाण्यापूर्वी ते जवानही म्हणाले, "अहो हे दादरसारख्या ठिकाणी रहातात ना, काय ही घराची अवस्था... हे काय घर आहे ?"
कस्तुर, शेवटी कुठेही न जाता ती त्याच स्थितीत, त्याच घराला चिकटून राहिली. तिचा भाऊ येऊन गेला, पण त्यालाही तिचा निर्णय बदलता आला नाही. येताना तो सुतारालाही बरोबर घेऊन आला होता. "दाराच्या कड्या लावू नकोस, त्या काढूनच टाकू. तुला काही झालं तर लोकांनी तुझ्यापर्यंत कसं पोहोचायचं?", त्याने कळवळून सांगितले. पण काहीही परिणाम नाही. आणखी काही दिवस गेले. पुन्हा एकदा भांड्यांचा खडखडाट ऐकू आला. माझ्या दादाने पत्र टाकायच्या फटीतून ओरडून सांगितले, "काळजी करू नका, आम्ही तुम्हांला बाहेर काढतो." पुन्हा एकदा अग्निशामक दलाला बोलावलं गेलं. पण ह्या वेळी मदत पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. कस्तुर डोक्यावरच पडली होती. तिचा रक्ताळलेला मृतदेहच बाहेर काढावा लागला. पोलिस आले, पंचनामा झाला. मालका-मालकांच्यात जागेवरून भांडणे असल्यामुळे जागेचा ताबा कोर्टाकडे गेला. त्याच वेळी पोलिसांकडून कळले, या कुटुंबाची मुंबईत जवळपास सात कोटींची मालमत्ता आहे. घराला कोर्टाचे सील लागण्याआधी पोलिसांनी ते साफ केले. कुठे कुठे साठवलेली आठदहा हजारांची चिल्लर निघाली. तशीच जुनी तांब्यापितळ्याची आणि चांदीची भांडी. लोखंडी तिजोरी. कोऱ्याकरकरीत साड्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे. भावजयीने सांगितले, "दर दिवाळीला मी ह्यांना साड्या घेत असे. त्याच ह्या साड्या. पण गेल्या कितीतरी वर्षांत त्यांची घडीही मोडली गेलेली नाही." सर्व माल पोलिसांनी आपापसात वाटून घेतला. त्या ईन-मीन पाचएकशे चौरसफुटाच्या घरातून तीन लहान टेंपो भरून कचरा निघाला. सगळ्यात मोठा कचरा म्हणजे जुन्या वर्तमानपत्रांच्या घरभर भरून ठेवलेल्या थप्प्या..
आमची बिल्डींग बांधली गेली १९६८ साली. ह्या रद्दीतली सर्वात जुनी वर्तमानपत्रं होती १९३७ सालातली! जुन्या चाळीतून, ती पाडल्यानंतर तात्पुरत्या घरातून ते ह्या सध्याच्या बिऱ्हाडामध्ये हलवून नंतरही चाळीसेक वर्षं ही रद्दी कुठल्या हेतूने जपून ठेवली होती, हे रहस्य जाणणारे आजमितीस या भूतलावर कोणीही नाही.
चित्रश्रेय - राजेश घासकडवी
प्रतिक्रिया
लेखन आवडले.
लेखन आवडले. कळत्या न कळत्या वयाच्या सीमेवर असणाऱ्या निरीक्षकाच्या नजरेतून जगापासून सगळंकाही लपवू पहाणाऱ्या, पण मनुष्य असणाऱ्यांची गोष्ट मजेशीर आहे.
चित्रही विशेष उल्लेखनीय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चित्र
चित्राबद्दल धन्यवाद.
च्यामारी भलतेच शिंबालिक आहे.
शिंबालिक
हो ना! खास करून तो कुलूप लावलेल्या कडी-कोयंड्याचा भाग तर हुबेहूब थेट एखाद्या उलट्या टांगून ठेवलेल्या फ्यालिक शिंबलसारखा दिसतो.१ त्याचा आकार (साइझ) आणि प्लेसमेंटही प्रश्नार्ह (सूचक?) आहे.
बहुधा त्या 'पूजा', 'सैपाक' प्रकारांनंतर गुर्जींनी थेट चित्रकलेत उडी घेतली असावी.
=======================================================================================
१ आणि ते कुलूप म्हणजे ते नाकाला टोचून त्यात ते नाकातले-काय-ते घालतात ना, तस्से दिसते अगदी!२ तसेही हल्ली (खास करून अमेरिकेत) कुठे टोचून घेतील नि कुठे रिंगा घालतील, याचा नेम नसतोच म्हणा.
२ Now, don't tell me that it's all intentional.३
३ Although, I won't be surprised at all if it indeed is...
होर्डर्स
होर्डर्सचा एपिसोड बघीतल्यासारखा वाटला..
बाप्पाय आजी
कथा आवडली.
माझे आजोळ नाना चौकातील. समोरच्या बिल्डिंगमध्ये सगळे पारशी. तळमजल्यावरच्या घरात राहात असे एक म्हातारी - बाप्पाय आजी. एकटीच. बर्याच वेळा रस्त्याकडे उघडणार्या खिडकीत बसलेली दिसे. बोळक्या तोंडाने हसे तेव्हा एक अनामिक भिती वाटे. तिची आठवण आली.
असो.
कथा आवडली. चित्रही
कथा आवडली. चित्रही अप्रतिम.
यावरुन एक सिरीअस चर्चाविषय होउ शकतो.
विचित्र वागणूक आणि लेखात दुरुस्ती
गुलाबबद्दल वाईट वाटलच पण दोघी ज्येष्ठ म्हातार्या स्वतःच्याच कैदेत असल्यासारख्या होत्या मनाने.
http://www.aisiakshare.com/node/1131 ह्या गोष्टीतल्या पोपटासारख्या; किंवा
http://www.aisiakshare.com/node/1129 ह्या गोष्टीतल्या बैलासारख्या ;
स्वतःलाच कैद करुन घेणार्या त्या वाटल्या.
त्यातही http://www.aisiakshare.com/node/1129 ह्या धाग्यात राजेश घासकडवी आणि रमतारामांचे प्रतिसाद सदर प्रकरणास बरेच लागू होत असावेत.
ऋषिकेश ह्यांच्या प्रतिसादातील अशाच प्रसंगातील तर पात्राचे नावही "गुलाब"च आहे.
.
हा लेख म्हणजे विचित्र वागणूकीचं थेट वर्णन .
लेखातील चित्राचं जे कौतुक होतय, ते का होतय हे अजून समजलं नाही.
वरती अस्मि म्हणतात तसं ह्या विषयावर सिरिअस चर्चा होउ शकते.
अमुक व्यक्ती सातत्याने इतक्या वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने का वागत असावी ह्याचा त्यातून अंदाज येउ शकेल.
तुम्ही त्या "कशा" वागत ते लिहिलय. "का" वागत ह्याबद्दल त्यामुळेच कुतूहल आहे.
.
अवांतर
मी एक ग्रीक पुराणकथा वाचली होती. त्यातल्या तीन आंधळ्या म्हाताऱ्या एकच डोळा तिघींमधे आलटून पालटून वापरून पर्सियसला बघत
पर्सियसची गोष्ट ग्रीक नाही रोमन आहे. "मोराय " ह्या ग्रीक पुराणकथेचा पर्सियस ची कथा हा रोमन अवतार आहे.
.
(ग्रीक्-रोमनांमध्ये बरेच समांतर देवी-देवता, पुराणकथा सापडतात. अगदि शेक्सपिअरच्या मॅकबेथ मध्येही भविष्य सांगणार्या तीन चेटकिणी आहेत. पण त्यांचा
संबंध कॅडिक्/इंग्लिश/आयरिश लोककथांशी आहे की ग्रीको-रोमन पुराणकथांशी आहे हे नक्की ठाउक नाही.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लेखन
आवडलं. गुलाबबद्दल वाचून वाईट वाटलं. इतक्या टोकाचे नसले तरी साधारण असाच स्वभाव असणार्या व्यक्ती पूर्वीच्या राहत्या जागीही होत्या. जिवंत असताना शेजार्यांच्या फावल्या वेळच्या चर्चेचा आणि मृत्यूनंतर किंचित सहानुभूतीचा विषय बनलेल्या. हा लेख वाचून 'हे सारे कोठून येते?' हा जुनाच प्रश्न नव्याने आठवला.
हा लेख वाचून 'हे सारे कोठून
असेच म्हणतो. काही थोडे नमुने असे पाहिले होते खरे. त्यावेळेसही हाच प्रश्न पडे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
परमेश्वरा. अंगावर काटा
परमेश्वरा. अंगावर काटा आला.
लेख फारच आवडला. त्यात 'बघा, डोळ्यांत बोट घालून भावविवश करतो का नाही'छापाचा अभिनिवेश अजिबात नाही, ही विशेषच अभिनंदनीय बाब.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बापरे! ... काय एक एक तर्हा!
बापरे! ... काय एक एक तर्हा!
चित्र छान आहे.
बिपिन कार्यकर्ते
लै भारी!
लै भारी लेखन! फारशा न पाहिलेल्या व्यक्तींचे व्यक्तिचित्रण करणे तसे कठिणच. अशा व्यक्ती मनात घर करून जात असल्या तरी त्यांच्याबद्दल इतके प्रवाही आणि अनासक्तपणे लिहिताही येऊ शकते हे बघुन साश्चर्य आनंद वाटला.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आवडली
कथा आवडली.
("ला कासा दे बेर्नार्दा आल्बा" कुटुंबाकडे शेजारच्या मुलीने बघितल्यासारखे वाटले.)
चित्रदर्शी
निरीक्षकाच्या भुमिकेतून पण निरपेक्ष नसलेले चित्रण आवडले. लगेच 'आम्ही तिघी बहिणी' वाचायला मिळायला पाहीजे असेपण वाटले.
लेख आवडला! लेखिकेने
लेख आवडला! लेखिकेने अभिनिवेशरहित तटस्थ चित्रण केले असले तरी विचार सुरू झालेच.
तिघींनी लग्न करून एकेक पुरुष धरून मग इतर पुरुषांचे स्पर्श टाळले असते,
चारशे चौफुटाऐवजी प्रत्येकी बाराशे चौफुटात आयुष्य घालवले असते,
घरातल्या तिजोरीऐवजी बँकेत पैसे साठवले असते,
जुन्या पेपर्सऐवजी जमेल तितक्यावेळा बदलूनही मरताना जुने माॅडेल ठरणारे टीव्ही घेतले असते,
तर त्या नाॅर्मल ठरल्या असत्या आणि त्यांच्यावर लेख लिहिण्याचे कोणी कष्ट घेतले नसते.
भिंगातून जग फार विचित्र दिसतं..
मुंगीचं मोठ्ठं डोकं..
बोटांची फुगलेली टोकं..
आपल्याच प्रवृत्तींना भिंगातून पाहायला त्यामुळे फार भीती वाटते.
खुलासा
लेखन आवडल्याबद्दल धन्यवाद.
लवकरच खुलासा टकत आहे.
मनापासून आवडलं. अतिशय
मनापासून आवडलं. अतिशय चित्रदर्शी.
मनापासून आवडलं. अतिशय
मनापासून आवडलं. अतिशय चित्रदर्शी.
लेख आवडला.
लेख आणि चित्र दोन्ही आवडले. एवढ्या टोकाचे नसले तरी एकंदरीत विक्षिप्त (आपल्या विक्षिप्त बाई नव्हेत बरं का!) स्वभाव असलेले अनेक स्त्री-पुरुष माहिती आहेत आणि योगायोगाने त्यातले बहुसंख्य, संसारसुख (हवे असताना) न मिळालेले तरी आहेत किंवा संसारात सुख न मिळालेले तरी आहेत. सर्वसामान्यपणे शारीरीक मानसिक छळ न करणारा जोडीदार असणे किंवा संतती असणे या गोष्टींमुळे, आपण व्यवस्थेचा भाग झाल्याने इतरांवर विश्वास ठेऊ शकण्याची मानसिकता बनत असावी का? हा आणि असे अनेक विचार मनात डोकावून गेले.
वरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसादही विचार करण्यासारखा वाटला.
"शलॉट"
जीए कुलकर्णी यांची "शलॉट" नावाची कथा आहे.
या कथेच्या "शलॉट" या शीर्षकाला इंग्लीश कवी लॉर्ड टेनिसनच्या "द लेडी ऑफ शलॉट" या कवितेचा संदर्भ आहे. टेनिसनच्या मूळ कवितेमधली उमराव स्त्री एका उंच मनोर्यात बंदिस्त आहे. बाह्य जगाशी कसलाही संपर्क न राखण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. "द लेडी ऑफ शलॉट"ला कसलासा शाप आहे. ती बाहेरच्या जगाकडे थेट दृष्टीक्षेप टाकत नाही. तिने कसल्याकसल्या चित्रांच्या आकृतींचं विणकाम करत राहाणं ही तिची शिक्षा.
"शलॉट" कथेमधे टेनिसन, इंग्रजी कविता, उमराव स्त्री, व्हिक्टोरियन वाङ्मय या कशाकशाचाही उल्लेख नाही. त्यामधे एका आडगावी रहाणार्या "काशी" नावाच्या एका अनाथ, कुरूप मुलीची कथा आहे. काशीचा बाप - जो तिला मारहाण करायचा आणि डांबून ठेवायचा - तो नुकताच मेलेला आहे. या सर्व अंधार्या वातावरणातून सुटका मिळालेली काशी बाह्य जगात येण्याचा प्रयत्न करते. हा प्रयत्न अपेशी ठरतो. जीएंना उमगलेली "लेडी ऑफ शलॉट" व्हिक्टोरियन रोमांटीक नाही, तिला मिळालेला शाप जणू माणसाच्या जगापासून तुटलेलं असण्याचा आहे.
या कथेची आठवण प्रस्तुत कथा वाचताना आली. प्रस्तुत कथाही रोचक वाटली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
छान
कथा आणि रेखाचित्र दोन्ही आवडले. लिखाण ओघवते आणि खिळवून ठेवणारे वाटले.
त्यांच्या अशा वागण्याचं स्पष्टीकरण कथेत जरा वाचायला मिळालं असतं तर बरं वाटलं असतं.
सुंदर ओघवते लिखाण..
कथा आवडलीच, झपाझप वाचून काढावीच लागली इतका मस्त ओघ आहे लिखाणात!
जुने रद्दी पेपर, वर्षानुवर्षे कमावलेले पैसे ट्रंका., बरण्यांमध्ये ठेवून आपली तसेच कुटुंबाची अतिअतिसामान्य ठेवलेली स्थिती, इतकेच काय तर घरात ट्युबलाईट ऐवजी ०,६०,१०० चे बल्ब, कधीही रंगच काय पण चुनाही न फासलेल्या भिंती अशी कित्येक घरे गिरगावतल्या अनेक चाळींमध्ये आजमितिस आहेत. चाळीत राहूनही अलिप्त राहाणारेही प्रचंड संखेने (खर तर प्रत्येक चाळीत हमखासच) मिळ्तात. आत्ममग्न म्हणायचं की फटकून वागणारे हे कळण्यापलिकडे होतं अशा माणसांबद्दल विचार करताना.. आणि हो, हे घराण्यात पिढ्यांन पिढ्या चालू असतं हे ही अगदी बरोब्बर पकडलय, अशा अलिप्ततावादी संस्कारांमुळे जगापासून फटकून राहायचे संस्कार लहान वयापासूनच होतात त्यामुळे तसच वागलं जातं पुढच्या पिढ्यांकडून, कधी त्यांच्याच घरातल्या कुणी ह्या 'व्यवस्थेविरुद्ध' बंड करायचा प्रयत्न केला की त्याला सरळ बाहेरची वाट अगदी संबंध तुटण्यापर्यंत. माणसं इतकी कठोर असू शक्तात ह्याचा अचंबा वाटाव इतकं!
हे सगळं सांगायचं कारण असं, की कथेतल्या पात्रांचं वागणं हे अतिशयोत्क नक्कीच नाहि, असे नमुने असतातच, तंतोतंत!
- प्रशांत उपासनी
अल्ट्राव्हायोलेट
अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड दोन्ही मानवी दृष्टीस अदृश्य आहेत.
कुणी खरोखरच तुसडा, माणूसघाणा म्हणून दूर राहतोय की
एखादा माणूस म्हणून चांगला आहे, संवेदनशीलही आहे.पण धत्तड तत्तड करत नाचणार्या, गुलाल उडवत* जगणार्या "नॉर्मल" माणसात मुसुं-राघांनी लिहिलेल्या बाळूगुप्ते सारखा "आउटसायडर" ठरतोय हे कळणं कठीण.
शिवाय काही जिनियस तुसडे वाटता. पण सगळे तुसडे जिनियस नसतात हे ही खरच.
.
*आम्हाला नेमकं सांगण्यासाठी चपखल वाक्प्रचार लिहिल्याबद्दल संजोपरावांचे आभार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भेदक
भेदक चित्रण! लहानपणापासून अनेक जागी राहिल्यामुळे, असे नमुने बघितले आहेत, माणसाचे मन हे खरोखरच अथांग आहे. आयुष्य एकदाच मिळते, ते असे वाया घालवून असले(आता घुबडाचेही म्हणता येणार नाही, गविंनी डोळे उघडल्यामुळे) जिणे जगणारी माणसे ही शापितच म्हणायला हवीत.
कथा अनेकदा वाचलेली आहे. पण
कथा अनेकदा वाचलेली आहे. पण पुन्हा पुन्हा वाचताना ती प्रभावी वाटते. याचं कारण मला अनेक ठिकाणी प्रतिसादांतून दिसून आलं.
आपल्या स्पष्टीकरणाचं, विश्लेषणाचं तसूभरही ओझं सत्यावर न टाकता 'हे आहे हे असं आहे' या शैलीत वर्णन केलेलं आहे. समोरचं चित्र दाखवण्यासाठी मतांची भिंगं, रूपकांच्या रंगीत काचा, गार्र गार्र ट्रालीवर फिरवलेला कॅमेरा असं काहीही न वापरता नागडं सत्य डोळ्यासमोर ठेवण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे. या तीन विक्षिप्त बायका "कशा" जगल्या एवढंच. त्या तशा "का" जगल्या हे पूर्णपणे वाचकावर सोडलं आहे. अभिनिवेशरहित तटस्थ चित्रण केलं असलं म्हणूनच विचार सुरू झाले.
आयझॅक असिमॉव्हवर त्याची भाषा सरळ साधी, शैलीविरहित असल्याचा आरोप काहींनी केला होता. त्याचं म्हणणं होतं की 'लेखकाची शैली ही खिडकीच्या काचेसारखी असते. जुन्या काचा पाहिल्या तर रंगीत आणि ओबडधोबड दिसतात. त्यांचं एक वेगळं सौंदर्य असतं खरं. पण पूर्ण पारदर्शक, दोषविरहित काच तयार करणं त्याकाळी जमत नसे म्हणून त्या तशा असत. स्वतःची जाणीव न करून देता नुसतं समोरचं स्पष्ट दाखवणारी काच तयार करण्यासाठी अनेक शतकं जावी लागली. मी लेखन करताना अशा काचेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो' (हे उद्धृत नसून त्याच्या विचारांचा गोषवारा आहे)
कथेत जी रूपकं वापरलेली आहेत तीही इतक्या नकळत येतात की एखाद्या गायिकेच्या स्वराला कॉर्ड्स मिळाव्यात त्याप्रमाणे उठाव देतात. 'तिजोरीत सापडलेल्या पण वाळवीने नासलेल्या नोटा', '१९३७ सालपासून जपून ठेवलेली वर्तमानपत्रं' यांतून त्या म्हाताऱ्यांविषयी, आणि जगापासून तुटलेपणाविषयी जे लेखिकेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याला उठाव येतो.
दुर्दैवाने अनेकांनी या व्यक्तिचित्रणाकडे निव्वळ रिपोर्ताज म्हणून पाहिल्याचं जाणवलं. याबाबत ती स्वच्छ-काच शैली यशस्वी झाल्याचं गमक मानण्यातच समाधान.
लेख आवडलाच आवडला
लेख आवडलाच आवडला, पण अनेकांनी म्हटलेलं पुन्हा म्हणत नाही.
यावरून आठवलेली एक सांगोवांगीची कथा प्रसृत करतो. हैदराबादच्या शेवटच्या निझामामध्ये (मीर उस्मान अली) काही प्रमाणात असं कंजुषी आणि अडगळ जमवण्याची वृत्ती यांचं मिश्रण होतं असं म्हणतात. त्याने कित्येक लाख पाउंड रकमेच्या बॅँक ऑफ इंग्लंडच्या नोटा तळघरात लाकडी पेटाऱ्यांत ठेवल्या होत्या आणि मग विसरून गेला. अनेक वर्षांनी असं आढळलं की त्या सगळ्या उंदरांनी कुरतडून खाऊन टाकल्या होत्या.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
गुलझार यांच्या 'नमकीन'
गुलझार यांच्या 'नमकीन' चित्रपटातल्या स्त्री पात्रांची आठवण झाली. लेखन आवडलं.
माहितीत एक असं 'कुटुंब' (म्हातारी विधवा आई आणि तीन अविवाहित मध्यमवयीन मुली) होतं. पण या 'मुली' (बायका) अतिशय सुंदर, मनमिळावू आणि कर्तबगार होत्या. पण पत्रिका कुणाशीच न जुळल्यानने लग्न जमली नाहीत असे ऐकले होते. त्यांच्या वागण्यात कधीही कडवटपणा पाहिला नाही. लेखातल्या म्हातार्यांच्या अगदी विसंगत.
आयुष्यात अशा काही घटना होतात
आयुष्यात अशा काही घटना होतात की प्रचंड मनमिळावू माणसालाही इंट्रोव्हर्जन येतं. त्याचा प्रभाव टाळून पुन्हा सामान्यतः सर्वांत मिसळायला लागणारं सामर्थ्य प्रत्येकाकडे नसतं. काही काही घरांमधे तेच कल्चर बनतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ह्या महिला आणि बेणारे
ह्या महिला अशा बनण्यामागे एक कारण त्या स्वतःला बेणारे बनण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात तशा बनल्या असाव्यात हे ही असू शकतं.
बेणारेंचं काय होतं; ह्यांची त्यांना पुरेशी कल्पना असणार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाचताना शहारा आला. माणसं
वाचताना शहारा आला.
माणसं आपल्याला मिळालेले आयुष्य असं वाया का घालवतात समजत नाही.
प्रत्येकाने कर्तुत्वाची शिखरं सर करायला पाहिजे असे नाही. पण एक सर्वसामान्य आयुष्य तरी जगु शकतातच की नाही?
काहीना तेही जमत नाही. हा त्यांचा दोष कि आणखी दूसर्या कुणामुळे हे असे होत असावे?
जसे या कथेत गुलाबला तिच्या थोरल्या बहीणींमुळे असे आयुष्य स्विकारणे भाग पडले असे दिसते. त्या बहीणी अशा का झाल्या असाव्यात त्याचा उल्लेख कथेत नाही.
अशी वाया गेलेली आयुष्यं बघताना वाईट वाटते.
अवांतर : प्रिया तेंडुलकर यांनी लिहीलेली, कॉटखाली रहाणार्या आणि जेवण म्हणून फक्तं फरसाण खाणार्या एका बाईची कथा आठवली.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
चांगला.
लेख चांगला आहे.
लेखिकेच्या नावातल्या
लेखिकेच्या नावातल्या 'शहराजाद'च्या गोष्टींप्रमाणेच शेवटपर्यंत वाचावासा वाटणारा लेख.
अवांतर शंका
अरेबियन नाइट्स मध्ये मी पहिल्यांदा हे नाव ऐकलं, १००१ गोष्टी सांगणारी प्रमुख नॅरेटर म्हणून.
पण शहराजाद चा अर्थ काय आहे नक्की?
हे अस्सल पारशी/पर्शियन नाव वाटतं. शापूर, यझ्दगार्द वगैरेसारखं.
शहर + आझाद असं काही आहे का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अतिअवांतर
यावरून आठवले. 'अॅस्टेरिक्स अँड द म्याजिक कार्पेट'मधील भारतीय राजकन्या आणि तिची दाई यांची नावे अनुक्रमे 'ऑरिंजाद' (Orinjade) आणि 'लेमुनाद' (Lemuhnade) अशी ठेवण्यात आलेली आहेत.
शहर+आज़ाद अशीच फोड देतोय विकी.
शहर+आज़ाद अशीच फोड देतोय विकी. अन समासविग्रह एकाच्या मते 'जिचे राज्य आज़ाद आहे अशी ती' असा आहे, तर परमपूज्य बर्टन साहेबांच्या मते 'शहराला आज़ाद करणारी' अशी फोड आहे. दुनियाज़ादची फोडही बर्टन साहेबांनी 'जगाला आज़ाद करणारी' अशी दिलेली आहे.
संदर्भ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरंच त्या म्हातार्या
खरंच त्या म्हातार्या एवढ्याऽऽऽ विचित्र, विक्षीप्त, आयुष्य वाया वगैरे वाटतायत का? इतरांपेक्षा थोडा जास्त फोबीया (खास करुन पुरुषांबद्दल, जो कदाचीत संशयी आई मुळे आला असेल) आहे. पण भिँतीला कान लाउन ऐकणे किँवा दुसर्याँच्या घरात कोण येतय जातय यावर लक्ष ठेवणे वगैरे फार कॉमन आहे. रद्दी तर त्यांच्या बालपणीपासुनची जमा होती. परत पैसे जमीनीत लपवणे प्रकार पण त्याकाळात एवढे रेअर नसावेत. घरात उजेड, मोकळी हवा नाही पण तरीही तिघी ८०+ जगल्याच की. परत त्या काळी शिकुन नोकरी करुन ७कोटीची मालमत्ता केली. 'ये जिना भी कोइ जिना है' म्हणु शकतोच पण ते तर इतरांच्या बाबतीतही म्हणता येइलच.
अचाट आणि अतर्क्य
डोक्याला शॉट
नोकरी करून एवढी मालमत्ता जमविणे शक्य नसावे त्याकाळी.
साठवलेल्या वर्तमानपत्रांत कदाचित आपल्या मालमत्तेबाबत काही छापून आले तर… म्हणून ठेवले असतील. किंवा जुना एखादा संदर्भ मिळवण्यासाठी…. काहीही
अवांतर
वर्तमान पत्रात रोज येणारा आकडा बघण्यासाठी
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो