डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा

डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा

लेखिका - मस्त कलंदर

१८८४ साली एक अघटित घटना घडली. एका विवाहित मुलीनं तिचा नवरा अशिक्षित आहे, व्यसनी आहे, रोगट आहे आणि कफल्लक आहे ह्या कारणासाठी सासरी जाण्यास नकार दिला. हे एक पुरे की काय म्हणून तिच्या नवर्‍यानं - बायको माझ्यासोबत नांदायला येत नाही - म्हणून कोर्टात सरळ दावाच ठोकला! आणि अपेक्षेप्रमाणे, "आजकालच्या मुलींनी अगदीच ताल सोडला आहे" छापाच्या धर्ममार्तंड आणि तथाकथित संस्कृतीरक्षक-पत्रकार यांच्या वक्तव्यांना अगदी पूर आला. पण हे जर असं घडलं नसतं तर कदाचित भारताला वैद्यकीय सेवा देऊ शकणार्‍या पहिल्या स्त्रीडॉक्टरसाठी आणखी काही वर्षं वाट पाहावी लागली असती. ह्याचं श्रेय त्या मुलीच्या खंबीरपणाला जातं, तसंच ते तिला असलेल्या घरच्या पाठिंब्याला आणि अर्थातच कौटुंबिक पार्श्वभूमीलाही जातं.

रखमाबाई जनार्दन सावे, जन्म २२ नोव्हेंबर १८६४. हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वत: उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बालविधवाविवाह की प्रौढ विधवाविवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेलं सापत्यविधवेसोबतचं लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचंही धाडसाचं पाऊल होतं.

रखमाबाईंचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आईनं हरिश्चंद्रजींकडून 'जयंतीबाईंच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करून दे', असं वचन घेतलं होतं. त्याप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षीच रखमाबाईंचा विवाह झाला. सासरी पाठवायची वेळ येईतो मात्र ह्या दोन घरांमधल्या आधीच असणार्‍या सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक सगळ्याच दर्‍या अधिकच रूंदावल्या. दरम्यान, दादाजींना व्यसनं जडली. स्वतःचं घर नव्हतं; ते त्यांच्या मामांच्या घरी राहत. इतकंच नव्हे, तर ते मामांवर आर्थिकरीत्या पूर्णपणे अवलंबून होते. दम्याचा विकार जडला होता. मामांच्या घरचंही वातावरण म्हणजे - घरच्या लक्ष्मीवर अत्याचार, तर घरात आणून ठेवलेल्या बाईच्या हाती सारी सत्ता. हे सगळं लक्षात घेऊन रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला. खरंतर दादाजी अगदी सहज 'गेलीस उडत' म्हणून दुसर्‍या स्त्रीशी विवाह करू शकले असते. परंतु एका स्त्रीकडून आलेला नकार, तसेच जयंतीबाईंनी पुनर्विवाह केल्याने पूर्वपतीची रखमाबाईंच्या नांवे असलेली (दादाजींच्या मते २५,०० रूपये मूल्य असलेली) इस्टेट, ह्या कारणांकरता त्यांनी - बायकोला सासरी पाठवावे - असा कोर्टात दावाच ठोकला.

अशा परिस्थितीत त्यांना दोष न देता उलट पाठीशी उभ्या राहणार्‍या आजोबांचं आणि आईबाबांचं विशेष कौतुक करायला हवं. ह्या लोकांना समाजात किती त्रास झाला असेल ह्याची गणतीच नाही. घरच्या मुलींना सासरहून माहेरी पाठवणं बंद होणं, समाजात टिंगलटवाळी, वर्तमानपत्रातून बदनामी, एक ना दोन. अगदी आजच्या काळात दिल्ली बलात्कार आणि तत्सम घटनांनतर लोकांची ताळतंत्रं सुटलेली वक्तव्यं वाचल्यावर तेव्हाच्या काळी काय झालं असेल, ह्याची तर कल्पनाच नको. सनातन्यांच्या मुक्ताफळांना रखमाबाईंनी 'द हिंदू लेडी' ह्या नावानं 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये पत्रं लिहून आपली बाजू मांडली. भावनाविवश न होता, सौम्य परंतु मर्मग्राही शब्दांत त्यांनी मनातले विचार उतरवले. 'बालविवाह', 'सक्तीचे वैधव्य' 'पडदापद्धत' अश्या काही विषयांवरही त्यांनी लिहिलं. कदाचित असं लेखन करून लोकशाहीच्या मार्गानं स्वतःवरच्या आणि इतर स्त्रियांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा हा त्यांच्यापुरता मार्ग असावा. अर्थातच 'हिंदू लेडी'च्या ह्या पत्रांनी खळबळ माजली. खटला तर आणखी गाजलाच परंतु वाईटातून चांगलं निष्पन्न होतं, ह्या न्यायानं, लेडी डफरिन, लेडी रे आणि मिसेस ग्रँट डफ, ह्यांनी हिंदू लेडीला साहाय्य केलं.

रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावं लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर असा - सासरी जाणं हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (१८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना चहापार्टींसाठी आमंत्रणं धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरूण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ऍलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.

अंजली कीर्तने लिखित ’आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’मधल्या संदर्भानुसार परदेशातसुद्धा स्त्रियांचं वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेनं उत्तीर्ण झाल्या. 'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालयं उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)

एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं खरंच, पण त्यांनी केलेली इतर कामंपण तितकीच महत्त्वाची आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.

जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्‍या होत्या, तसंच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवर्‍याच्या पोटात' हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्‍या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणार्‍या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.

रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचं मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्यानं देण्याची व्यवस्था केली. स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.

नव्या जाणिवा, नवी क्षितिजं, नवी कार्यक्षेत्रं जी त्याकाळच्या अगदी थोडक्या लोकांनी आपलीशी केली, त्यांची यादी डॉ. रखमाबाई ह्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. फक्त स्वत:साठी न जगता आणि सुधारणेच्या प्रश्नांचा नुसताच खल न करता त्या सुधारणा प्रत्यक्ष जीवनात उतरवून त्या खरोखरी एक ध्येयनिष्ठ जीवन जगल्या.

संदर्भ:

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

कित्येक महिला या आपल्या कृतीतून इतक्या श्रेष्ठ ठरल्या आहेत की त्यामुळे समाजसुधारणा वैगरे तर होतेच पण त्याच बरोबर सनातनी/धार्मिक मुर्खांचा पाया ढिला होऊ लागतो.

धार्मिक बंधने तोडायची असतील तर दुसर्‍याच्या धर्मात तृटी शोधण्यापेक्षा स्वतःच्याच धर्मात, स्वतःत बदल घडवायला पुढे आले पाहिजे. (दुसर्‍यावर टिका करून धर्माच्या भिंती अधिक दृढ होतात) अशा प्रकारचे कुरूंदकरांचे विचार आठवले. इथे 'धर्म' हे रुपक मानले तर जीवनातील अनेक बाबतीत हेच विचार चपखल लागू पडावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही बाबतीत अधिक स्पष्टीकरण लेखातून मिळाले असते तर लेखाला अधिक उठाव आला असता असे वाटते.

दादाजीने रखमाबाईविरुद्ध दावा दाखल केला हे वर नोंदविले आहे पण ह्या दाव्याचे स्वरूप काय होते, दाव्याने पुढे कोणकोणती वळणे घेतली?

हा दावा सर्वप्रथम ऐकणारे न्यायाधीश पिन्ही ह्यांच्या निर्णयाप्रमाणे दादाजीचा restitution चा दावा टिकण्यालायक नव्हता कारण restitution चे इंग्लंडमधील निर्णय इंग्लिश पार्श्वभूमीवरच वाचले पाहिजेत. हिंदुस्तानातील विवाह ह्यांची पार्श्वभूमि मुळातच निराळी असल्याने ते निर्णय हिंदुस्तानात लागू करता येणार नाहीत. ह्या निर्णयाविरुद्ध दादाजीने अपील केले आणि त्यात निर्णय त्याच्या बाजूने होऊन रखमाबाईंनी दादाजीकडे राहावयास जायला हवे, न गेल्यास सजा भोगावी असा निर्णय दिला. त्यालाहि रखमाबाईंची तयारी होती. पण मधील काळात सुधारणापक्ष आणि सनातनी ह्या दोघांनी वातावरण तापवले होते. हायकोर्टात निर्णय रखमाबाईंविरुद्ध गेल्याने आणि रखमबाई कारावासालाहि तयार आहेत असे दिसल्यानंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली आणि रखमाबाईंनी दादाजीचा खर्च चुकता केल्यावर त्याने आपली मागणी ओढून धरली नाही.

ह्या वळणांवर टिप्पणी लिहितांना सनातनी पक्ष (टिळक, झळकीकर शास्त्री), सुधारणावादी (रानडे, वामनराव मोडक, मलबारी), मध्यममार्गवाले (तेलंग) ह्यांच्या भूमिका काय होत्या, 'हिंदू लेडी'च्या पत्रामागचे बोलवते धनी कोण होते असे विवेचन वाचायला आवडले असते. (ही पत्रे रखमाबाईंची मानली जातात पण ती दुसरेच कोणी लिहित असावेत कारण त्या काळात रखमाबाईंचे शिक्षण पूर्णपणे स्थगित होते आणि त्या पत्रातले इंग्रजी लिहिण्याइतपत त्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान प्रगल्भ नव्हते. सखाराम अर्जुन त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत उदासीन होते असे दिसते. येथे उपलब्ध असलेल्या एका विस्तृत निबंधामध्ये ह्या उदासीनतेबाबत अधिक वाचावयास मिळेल. तेथेच निबंधामध्ये आणि त्याच्या खालच्या विस्तृत टीपांमध्ये बरीच माहिती आहे जी अन्यत्र सहज दिसत नाही. सखाराम अर्जुन हे जरी नंतर रखमाबाईंच्या मागे उभे राहिले तरी आपलाच नातेवाईक दादाजी ह्यांच्याशी रखमाबाईंचा विवाह लावून देण्यामागे रखमाबाईंना त्यांच्या वाडिलांची जी मालमत्ता मिळाली होती ती घरातच राहावी असा त्यांचा हेतु असल्याचे सूचित केले आहे. दादाजीच नंतर नालायक निघाल्यामुळे सखारामांचे मत बदलले असावे.)

मला स्वतःला पडलेले facts विषयक तीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा:

१) तुम्ही दर्शविलेल्या लिंक्समधील क्र. १ च्या अनुसार 'Queen Victoria intervened and issued a proclamation dissolving her marriage and commuting the sentence.' आणि 'She never married again as although her husband had finally accepted financial compensation not to continue with his claims, her legal situation in Hindu law as neither married nor unmarried, was never clear.' (राणीच्या proclamation नंतर neither married nor unmarried अशी स्थिति राहणारच नाही.)

क्र.२ ची लिंक म्हणते 'She did not marry; although Dadaji had finally accepted financial compensation not to continue with his claims, her legal situation in Hindu law as neither married nor unmarried, was never clear.'

क्र.३ ची लिंक म्हणते 'She never married again as although her husband, Dadaji Bhikaji had finally accepted financial compensation not to continue with his claims, her legal situation in Hindu law as neither married nor unmarried, was never clear.'

क्र. ४ ची लिंक म्हणते 'Rukhmabai remained defiant, and the issue was not finally resolved until Queen Victoria intervened and Rukhmabai’s marriage was dissolved by royal decree. In July 1888, Rukhnìabai agreed to buy Dadaji off with a payment of 2,000 rupees “in satisfaction of all costs” so that he could then remarry, which he did immediately. Rukhmabai also paid her own legal costs, as well as another personal price — that of being forbidden under Hindu law to remarry.' पुढे जाऊन 'In 1904 Dadaji died. It is interesting to note that despite her fierce resistance to Hindu tradition and the fact that she had never even lived with him as his wife, Rukhmabai felt compelled to adopt the traditional widow’s sari on her former husband’s demise in order to avoid adding further fuel to local prejudice against her work as a doctor in Surat.'

क्र. ५ मध्ये ह्याबाबत काहीच नाही. तसेच "डॉ. रखमाबाई : एक आर्त", मोहिनी वर्दे हे पुस्त्क मजजवळ नाही.

ह्या एकमेकांपासून थोडया थोडया वेगळ्या असणार्‍या विधानांमागील खरी वस्तुस्थिति काय आहे? मला असे दिसते की कायद्याच्या नजरेत रखमाबाईंचा विवाह चालू राहिला, यद्यपि दादाजी आणि रखमाबाईंनी विभक्त राहण्याचे परस्परसंमतीने ठरविले होते. म्हणून दादाजीच्या मृत्यूनंतर रखमाबाईंनी विधवेचा वेष धारण केला.

२) विक्टोरिया राणीच्या हस्तक्षेपाचे आणि क्र. ४ मधील royal decree चे काय गूढ आहे? असा हस्तक्षेप झाला असेल तर त्या महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी का मिळत नाही? मला स्वतःला अशी royal decree काढली जाणे अशक्य वाटते. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन राणी अशी royal decree काढू शकत होती काय? एका प्रजाजनाच्या खाजगी आयुष्यावर परिणाम करणारी अशी royal decree काढली गेली असती काय? दोन्ही उत्तरे मी तरी 'नाही' अशी देईन.

३) तिसरा प्रश्न दाव्याच्या काळात आणि नंतर खंड पडलेल्या शिक्षणाचा. इंग्लंडला जाण्यापूर्वी रखमाबाई कोठल्याच शाळेत जात नव्हत्या आणि स्वतःच स्वतःला शिकवायचा प्रयत्न करीत होत्या असे दिसते. ह्याचा तसेच सखाराम अर्जुन ह्यांच्या अनुत्साहाचा उल्लेख मी वर दर्शविलेल्या ह्या जागी पाहता येईल. तरीपण काही वर्षात इंग्लंडला वैद्यकीय शिक्षणासाठी जाण्याइतपत त्यांची तयारी झाली असावी. हे सर्व कसे घडले हे जाणून घेण्याची इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपघातानेच 'डॉ. रखमाबाई: एक आर्त' हे पुस्तक हाती लागले आणि खरंतर मला पहिल्यांदाच डॉ. रखमाबाईंबद्दल काही माहिती मिळाली. पुस्तकातील संदर्भांना अनुसरून आंतरजालावर अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हाती ठोस म्हणावी अशी अधिक माहिती मिळाली नाही. (एकदा त्यांच्या समकालीन माणक तर्खडकरांबद्दल शोधताना मायबोलीवरचा 'दिवाळी अंकांची शंभरी' हा सुंदर लेख सापडून गेला.) सुरतेतल्या गोपीपुरा भागातील आधी माळवी हॉस्पिटल आणि आता रखमाबाईंच्या नावाने ओळखले जाणारे हॉस्पिटल यांचा ओळखीतून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिकडूनही काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही.

तेव्हा पुस्तकातील माहिती आणि आंतरजालावरची तुटपुंजी माहिती संकलित करून डॉ. रखमाबाईंची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणावयास हरकत नाही.

मुळात 'डॉ. रखमाबाई: एक आर्त'च्या लेखिका मोहिनी वर्दे यांच्या रखमाबाई या सावत्र आत्या होत्या. त्यांची आणखीही चार-पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, म्हणजे या एकाच पुस्तकापुरते त्यांचे लेखनकार्य नसले तरी घरच्या-जवळच्या व्यक्तिबद्दल लिहिताना व्यक्तिपूजा किंवा खूपच तिटकारा अशी टोके गाठण्याचा संभव असतो तो इथे तितकासा दिसला नाही, पुस्तक बर्‍यापैकी तटस्थ वाटले. तरीदेखील त्यात काहीतरी निसटून जात आहे आणि नाण्याची दुसरी बाजू दाखवणारी तसेच त्यांच्या विधानांना पुष्टी देणारी माहिती उपलब्ध असावयास हवी होती असे पुस्तक वाचताना वाटत राहिले. (अर्थात हे सगळे मुद्दे लेखाचा विषय पुस्तकपरिचय नसल्याने दिले गेले नव्हते). मी तुम्ही दिलेल्या लिंकमधली पीडीएफ अजून पूर्ण वाचली नाहीय, 'डॉ. रखमाबाई: एक आर्त' मधून मला सध्या तुमच्या प्रश्नांची जी उत्तरे सध्या दिसताहेत ती अशी आहेतः

रखमाबाईंचे लग्न: अकराव्या वर्षी झाले. उशीरात उशीरा म्हटले तरी साधारण पंधराव्या बर्षी नहाण येते. (सध्या नव्वदीत असलेली माझी आजी सातव्या वर्षी सासरी होती) तरी मुलगी वीस वर्षांची होईपर्यंत तिला सासरी पाठवले का गेले नाही याचे उत्तर तुमच्या लिंकमधे पहिल्या पानावर मिळाले. त्यांचे सासरी न जाणे शेवटी कोर्टाने मान्य केले तरी घटस्फोट झाल्याची माहिती पुस्तकात नाही. कदाचित तेव्हा काडीमोड न घेतला बायको/नवरा सोडले तरी चालत असावे. दादाजींनी त्यानंतर दुसरे लग्न केले. त्यांच्या मृत्यूपश्चात रखमाबाईंनी भाळी कुंकू लावणे सोडले.(असे करण्याची एखाद्या मानीनीला काय गरज पडली असेल हेही मला कळाले नाही)

खटला: मुख्यत्वे लग्न करूनही स्त्री सासरी येत नाही, वरती नवर्‍याला रोगट, व्यसनी अशिक्षित म्हणते हा मुद्दा दिसतो. एके ठिकाणी पुस्तका रखमाबाईंचे हस्ताक्षर दिले आहे तसेच ते एका प्रकरणात विस्ताराने येते, त्यात दिल्याप्रमाणे रखमाबाईंचे लग्न नवव्या वर्षी झाले, त्यांच्या प्रथम पित्याची इस्टेट २५,०००रूं ची आहे, लग्न लावण्यास रखमाबाईंच्या घरच्यांचा पुढाकार होता(तर मग आता मुलीला पाठवण्यास कांकू का?) असे दादाजींकडून आक्षेप होते त्यास रखमाबाईंनी जाहिर पत्र लिहून उत्तर दिले होते. याच अनुषंगाने रखमाबाईंचे 'लादलेले वैधव्य्/लादलेले विवाह' अशीही हिंदू लेडीच्या नावाने लेख लिहिलेले दिसतात.

शिक्षण आणि हिंदू लेडी: 'डॉ. रखमाबाई: एक आर्त'च्या परिशिष्टात त्याकाळच्या इतर पत्र/लेखांसोबत हिंदू लेडीची पत्रेही दिली आहेत. भाषा वाचता अगदीच नवशिकी खचितच वाटत नाही, परंतु सध्याच्या पूर्ण इंग्रजीत शिक्षण घेतलेल्या भावी सर्वसाधारण अभियंत्यापेक्षा त्याकाळचे लोकांचे इंग्रजीचे ज्ञान अधिक चांगले होते असे माझे मत आहे. तेव्हा बरी-वाईट भाषा हे सापेक्ष आहे. तसेच ही पत्रे रखमाबाईंनी लिहिली नाहीत, त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच असल्याचे दादाजींनी प्रथम आरोप केले असे पुस्तकात म्हटले आहे. अर्थात दादाजींनी इस्त्रायलमधल्या 'फारो' राजाप्रमाणे आपल्यावर अन्याय झाल्याचे न्यायासनासमोर लिखित स्वरूपात सादर केले पण प्रत्यक्षात त्यांना विचारल्यावर फारोची गोष्ट माहिती नव्हती, त्यांना न्यायालयातले इंग्रजी समजत नव्हते आणि त्यातून काहीतरी मुद्दा निघाल्याने आपले रखमाबाईंइतकेच शिक्षण झाले आहे आणि त्यामुळे हिंदू लेडीची पत्रे रखमाबाईंनी नाही तर इतर कुणी लिहिली असा मुद्दा उपस्थित झाला. (लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे दादाजींना दुभाषा दिला गेला होता व रखमाबाईंना त्याची गरज नव्हती)
रखमाबाई पूर्वी पं. रमाबाईंच्या शाळेत जात असत पण त्यांच्या इंग्रज धर्मप्रसारामुळे त्या शाळेतोन बाईंचे नांव काढण्यात आले. त्यानंतर त्या सखाराम अर्जुनांच्या विविध भाषणांना जात, इंग्रजी उच्चभ्रू वर्तुळात चहापार्ट्यांना जात, तिथे त्यांचे इंग्रजी आणखी चांगले झाले. एके ठिकाणी रखमाबाईंनी आपले इंग्रजी वाईट होते त्याची आठवण लिहिली आहे. कुणा लेडीला त्या 'I didn't know you are Lady XXX, now I know you are same thing' असे म्हणाल्या आणि त्यावर त्या लेडीने पण 'थिंग'वरून काही वस्तुनिष्ठ विनोद केला. आनंदीबाईंचाही इतिहास पाहता (आनंदी गोपाळ, डॉ. आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व) मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश परिक्षा किंवा काही pre-requisites असावेत असे दिसत नाही.

अर्थात ही वरची सारी माहिती एकाच पुस्तकावरून आलीय त्यामुळे आणि आता वेगवेगळे मुद्दे समोर आल्याने तिला मर्यादा आहेत असे दिसतेय. तुमच्या लिंकमधल्या पीडीएफवरून तीत आणखी काही नवीन गोष्टींची भर नक्कीच पडेल.

कोल्हटकर, तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि लिंकबद्दल मनापासून आभार. तुम्ही मुंबईतल्या जुन्या रस्त्यांबद्दल लिहित आहात. हा फ्रेंच ब्रीज परिसर जिथे जयंतीबाईंचे घर होते तीबद्दल काही वाचावयास मिळाले तर आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

Dear Shri. Kolhatkar

Thanks for reading and writing about Dr. Rakhmabai. It is true that since you have not read Dr. Mohin Varde's book, you are unable to understand some details.

Since there was no court order about divorce, her status, whether married or unmarried remain unanswered. The Annasaheb Vartak Hall in Dadar(W) displays her painting without any surname. Since it was out of court settlement obviously it was agreed between parties but legal status is unclear.

It is not correct that she had no knowledge to write letters in English. In fact it is customary for Indian girl married at that young age to go her husband's house much earlier. The fact that she remained with parents till 19, is Dadaji never bothered and she had developed interest in education. Her Father being Doctor and grandfather being so well known, they were close to elites and british people. You should read background of both her father and grand father. Of course Dr. Sakaharam Arjun was not her direct father but he was very much interested in her education. He was founder member of Bombay Natural History society. The treasurer of BNHS was Mr Phipson, husband of Dr.Mrs. Edith Pechey Phipson, who was Dr. in Cama Hospital and was instrumental in sending her to London. Obviously Dr. Sakharam was their close friend. No wonder Rakhmabai had great command over english.

She was never against hindu tradition. It was condition of Dadaji and Court case which he forced on her under wrong advise made her fight.She was justified doing so. As regards Mr Tilak, his stand was political. Since he found that as a tool to nail British Government.
Of course in the process he never bothered about the poor lady. Mr Tilak was against Child Marriage is very wrongly promoted by the new movie which was recently shown. Tilak had to support the Hindu traditional thinkers in order to oppose British Government, to portray that they are intervening Hindu Law. Justice Ranade, Ramabai Ranade were great supporters of Dr. Rakhmabai.

The Book "Enslaved Daughters" by Sudhir Chandra Gives detail account court case with arguments and cross-examinations.

It is very tragic that Dr. Rakhmabai could not practice in Maharashtra due to these people, who also claimed Anadibai as not fit for Medical Practice since she touched white skin during her studies. Anadibai was under tremendous mental pressure and had no courage to fight,she succumbed to TB. Today Maharashtra Govt. distributes awards in her name. But Rakhmabai whose medical contribution to society is so important, still it is conveniently forgotten. She definitely deserves much more. At least do not raise such questions before reading complete details about Dr. Rakhmabai, since it unnecessarily spreads wrong impressions.

She never resisted Hindu Traditions as such accepted death of Dadaji as her Husband. She might have a soft corner for him. As he was illiterate and he did what others suggested.
He attended all her public appearances, when he must have understood how important person she was in society. He never tried to do anything but must be simply admiring her for her achievements. It is possible that she also may have sympathy for him.In all practical terms she was officially married to him. Her age may be very young age, but one can't forget the memories of marriage. Had he been a straight forward person, we would not have seen the whole story the way it happened.

Anyway, thanks for your genuine interest.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आणि कोल्हटकरांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासकडवी यांच्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रखमाबाईंसारखीच गोष्ट सांगणारी शेवंतीबाई निकंबे ह्यांची 'रतनबाई' नावाची छोटेखानी कादंबरी archive.org मिळाली.

ही कादंबरी १८९५ मध्ये लंडनमध्ये छापून प्रसिद्ध करण्यात आली. लेखिका शेवंतीबाई स्वतः पं. रमाबाईंसारख्याच आणि त्यांच्या बरोबरीने १९व्या शतकाच्या अखेरीस स्त्रीशिक्षणाच्या चळवळीत होत्या.

रतनबाई एका समृद्ध पाठारे प्रभु घारातली मुलगी आहे. तिचे वडील वासुदेवराव काशिनाथ दळवी ह्यांची हायकोर्टात उत्तम वकिली आहे. कपडा, खाणेपिणे अशा बाबतीत रतनबाईला काही कमी नाही. वडील कोर्टात जातात ते स्वतंच्या घोडागाडीतून आणि त्यावेळेस त्यांच्यामागे दोन साईस उभे असतात. रतनबाईचा विवाह वयाच्या ११व्या वर्षी प्रतापराव नावाच्या कॉलेज शिक्षण अजून चालू असलेल्या एका मुलाशी झाला. लग्नानंतरहि रतनबाई वडिलांकडेच आहे आणि त्यांच्याच इच्छेनुसार तिचे तिच्यासारख्याच कुटुंबातून आलेल्या समवयस्क मुलींच्या शिक्षणहि चालू आहे.

घरातील स्त्रियांचा, विशेषतः वासुदेवरावांच्या गतधवा काकूचा रतनबाईच्या शिक्षणास विरोध आहे. तिच्या सासुरवाडीकडूनहि विरोध आहे. बारशी, डोहाळजेवणे अशा घरगुती कार्यासाठी सासू रतनबाईला बोलावून घेते आणि हे निमित्त साधून तिच्या शिक्षणात महिना-दोन महिने खंड पाडत असते.

प्रताप बी.ए. परीक्षेत नापास झाल्यावर ह्या विरोधाला अधिकच धार येते. नवरा पास व्हावा म्हणून नवसायास, पूजापाठ करण्याऐवजी रतनबाईने आपले शिक्षण चालू ठेवणे बायकांना मान्य नसते आणि तिचे शिक्षण थांबते.

येथेपर्यंत रखमाबाई आणि रतनबाई ह्यांच्या गोष्टी समान्तर चाललेल्या दिसतात. सुदैवाने रतनबाईची गोष्ट सुखान्त ठरते कारण प्रताप अखेर बी.ए.ची परीक्षा उतरून बॅरिस्टरी शिकण्यासाठी लंडनला जातो. एका हितचिंतकाच्या सल्ल्यानुसार रतनबाईने शाळा चालू ठेवावी असे जाण्यापूर्वी तो ठरवून जातो. तदनुसार शिक्षण चालू राहते आणि तीनसाडेतीन वर्षांनंतर तो बॅरिस्टर होऊन परतल्यावर त्याचे आणि रतनबाईचे प्रेममीलन होते.

कादंबरीचे लेखन अगदी सरळसोट, जवळजवळ बाळबोध वाटावे इतके साधे आहे पण तेव्हाची कुटुंबव्यवस्था, राहण्याजेवण्याच्या आणि कपडयांच्या पद्धति, मलबार हिलवरच्या इंग्रज घरात शाळेच्या मुलींचे चहापान (चहापान नाहीच, त्यांनी केवळ फळेच खाल्ली!) अशी माहिती लंडनमधल्या वाचकास व्हावी म्हणून अशा सर्व गोष्टींची वर्णने कादंबरीत आहेत.

रखमाबाईंना शिक्षणासाठी कोणत्या परिस्थितीमधून जावे लागले असेल ह्याची चांगली कल्पना कादंबरीवरून येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण प्रतिसाद.

बाकी, वरील प्रतिसादातील

वडील कोर्टात जातात ते स्वतंच्या घोडागाडीतून आणि त्यावेळेस त्यांच्यामागे दोन साईस उभे असतात.

या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या नवीन ओळखीसाठी धन्यवाद.

त्याकाळी शिक्षण घेणे आणि प्रवाहाविरूद्ध जाणे किती अवघड होते हे पाहिलं की आपण सुखी आहोत असं वाटायला लागतं.

मध्यंतरी एका 'कमल' नावाच्या मराठी बाईंनी अठराव्या शतकात प्रथम इंग्रजीमध्ये लिहिलेली पण आता मराठीत अनुवादित झालेली कादंबरी वाचली. (या बाईंबद्दलही काही वाचले होते,पण नेमके काय ते आता आठवत नाहीय) कादंबरीचा विषय सरळधोपट, लग्न झालेली-सासरी पिचून गेलेली नायिका, थोडेसे रहस्य असा खूपच प्रेडिक्टेबल असला तरी ज्या काळी विरंगुळा किंवा छंद म्हणून ते लिहिले गेले हे मला जास्त महत्वाचे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

OFFICER OF A SEPOY REGIMENT WITH HIS SYCE AND A DRUMMER, 1786 by George Carter

(www.ntprints.com येथून)

मेरिअम-वेब्स्टर कोश - साइस
an attendant (as a groom) especially in India
Hindi & Urdu sāīs, from Arabic sā'is
First Known Use: 1653

ब्रिटिश-राज प्रकारच्या लिखाणात हा शब्द नेहमी भेटतो. कोणी प्रतिष्ठित व्यक्ति घोडागाडीतून जाताना एक वा दोन 'साइस' बरोबर असत. गाडी चालत असतांना ते गाडीच्या मागे चढून उभे असत. सातार्‍यात लहानपणी सुमित्राराजे भोसले ह्यांना साइसांसकट घोडागाडीतून जातांना अनेकदा पाहिले होते. आमच्या घरीहि त्या कधी अशाच आल्या होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आणि प्रतिसाद अतिशय आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"डॉ. रखमाबाई : एक आर्त", मोहिनी वर्दे, "पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

गेली अनेक वर्षे हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट होते. प्रा. हरी नरके सरांनी या पुस्तकाबद्दलची एक पोस्ट फेबुवर टाकली होती. त्यात इतके महत्वाचे पुस्तक परत छापत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्या पोस्टवरील प्रतिसादांमध्ये अनेक लोकांनी पुस्तक परत छापत असतील तर घेण्याचा मानस व्यक्त केला. पॉप्युलर प्रकाशनाच्या प्रकाशकांनी ती पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद देत जर निदान ३५० लोक नोंदणी करत असतील तर निश्चितच पुस्तक छापायला घेऊ असे सांगितले. सुदैवाने लोकांनी देखिल नुसतेच बोलून न दाखवता खरोखर पुस्तकासाठी नोंदणी केली आणि काही दिवसांतच हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना पुस्तक खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांनी नरके सरांच्या फेबू पोस्ट पहाव्यात.
रखमाबाईंच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी मला अपार आदर वाटतो. या लेखामुळे बरीच माहिती मिळाली होती व पुस्तक वाचायची इच्छा झाली होती. प्रकाशिका आणि प्रा. नरके यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे एक चांगले पुस्तक पुन:श्च छापले जाऊन वाचावयास मिळणार आहे याचा आनंद वाटतो.
अपडेट: ॲडव्हान्ड नोंदणी केलेल्या प्रत्येकाला मागच्या आठवड्यात किंवा या, हे पुस्तक हातात मिळाले. एखाद्या मराठी माणसाने(ते पण प्रोफेश्वर) पुस्तकाविषयी(दुसऱ्याच्या किंवा त्याच्या कंपूबाहेरच्या कुणाच्या तरी) कौतूक केल्याची पोस्ट टाकल्याने त्या पुस्तकाविषयी चर्चा सुरू होणं, ते खरेदी करण्याची उत्सुकता अनेक लोकांनी दाखवणं, प्रकाशकांनी पुढाकार घेऊन पुस्तक छापण्याची तयारी दाखवणं, आणि खरोखरंच लोकांनी ॲडव्हान्स्ड बूकींग करून ते पुस्तक विकत घेणं हे सगळंच 'अहो आश्चर्यम' कॅटॅगरीतलं आहे.
असंच बाकीच्या पुस्तकांबाबतीत होण्याची शक्यता आहे का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

समाजमाध्यमावर होणाऱ्या चर्चांची दखल प्रस्थापित प्रकाशकांनी घेणं ही गोष्ट आशादायक वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेटेष्ट पोस्ट वाचा नरकेंची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा लेख लिहिला तेव्हा पुस्तकात दिलेले बरेचसे संदर्भ पडताळून पाहायचा मी स्वत: बराच प्रयत्न केला होता. पण अगदीच काही जुजबी दुवे उपलब्ध होते. पुस्तक चांगले आहे परंतु जवळच्या नातेवाईकाने लिहिलेलं असल्यानं काही गोष्टी सोयीस्कर असण्याचा धोका मला वाटत होता.
आज मात्र पुन्हा शोध घेता रखमाबाईंच्या नावाचं विकी पेज दिसलं. आगामी सिनेमाच्या निमित्तानंही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. आणि पुस्तक पुन्हा छापलं जात आहे ही सुद्धा एक चांगलीच गोष्ट आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कालच्या गुगल डूड्लच्या निमित्ताने लेख परत वाचला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0