पाखी

पाखी

लेखिका - नंदिनी

तसं बघायला गेलं तर माझा रोजचच दिवस. आणि रोजच्या दिवसांतच घडलेली एक क्षुल्लक घटना.

स्टाफरूममधे मी बसून वाचत होते. हातातलं पुस्तक बंद करून मी वर पाहिलं. पाखी केव्हापासून स्टाफरूममधे येऊन माझ्यासमोर उभी होती कोण जाणे.

"काय गं?" मी डोळ्यावरचा चष्मा काढत विचारलं.

"मॅम, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. वेळ आहे तुमच्याकडे?" पाखीने विचारलं. अवघी एकवीस वर्षाची पाखी माझ्या वर्गातली स्टार होती. फायनल वर्षाला विद्यापीठामधे ही मुलगी नक्की रँक मिळवणार याची तिला आणि तिच्या मित्रमैत्रीणींना जितकी खात्री होती, तितकीच तिची प्रोफेसर म्हणून मलापण होती. पाखी आतापर्यंत कधीही लेक्चर्स संपल्यावर लगेचच शंका वगैरे विचारायला यायची नाही. काहीतरी शंका घेऊन आली आहे हे तिच्या हातातल्या पुस्तकांचा गठ्ठ्याकडे आणि प्रिंटआऊट्सकडे बघूनच समजायचं. तिचं शंकानिरसन करताना कधीकधी तास-दोन तास तर सहज जायचे. कित्येकदा मेंदूला मुंग्या यायच्या, मला स्वत:ला काही संदर्भ पुन्हा तपासून पहावे लागायचे, पण अशा मुलांच्या शंकानिरसन करणं हे पण एक समाधानाचं काम असतं. वर्गात नुसतं लेक्चर देऊन बोलण्यापेक्षा हे नक्कीच माझ्या आवडीचं. तिला काहीतरी शिकवताना माझ्या पण ज्ञानावरची धूळ झटकली जायची. खरंतर पाखीची हुशारी मेडिकल इंजीनीअरिंगला जाण्याचीच. घरच्या परिस्थितीमुळे आर्टसला अगदी नाईलाजाने आलेली ही मुलगी. पण हिरा कुठेही लखलखतोच तशी पाखी आमच्या कॉलेजची शान होती. अभ्यासात तर हुशारच, पण इतर स्पर्धा, गॅदरिंग सर्वामधे अगदी मनापासून सहभागी होणारी.

"बोल ना. निवांत आहे मी. नंतर माझी कसलीही लेक्चर्स नाहीत." मी म्हटलं.

तरीपण पाखी घुटमळल्यासारखी तिथेच उभी राहिली. काही बोलेना.

"अगं, काय झालं?"

"मॅम, थोडं खाजगी बोलायचं होतं. इथे स्टाफ रूममधे नको." पाखी अगदी हळू आवाजात म्हणाली.

"ठिक आहे ना! चल, आपण दोघी कँटीनमधे जाऊ"

"नको.. त्यापेक्षा आपण कॉलेजबाहेरच्या हॉटेलमधे जाऊया का? माझी ट्रीट!"

"चालेल, चल. पण ट्रीट वगैरे काही नाही. तुझं कॉलेज संपून नोकरी लागल्यावर मस्त पार्टी घेईन तुझ्याकडून. आज माझीच तुला ट्रीट, परवा तुझा एक छानसा लेख पेपरमधे छापून आला ना म्हणून." बोलत बोलत मी माझी हँडबॅग घेतली आणि आम्ही स्टाफरूमच्या बाहेर पडलो. पाखीचं लिखाण चांगलं असल्याने मीच तिला थोडंफार मार्गदर्शन वगैरे करून तिचे लेख स्थानिक वर्तमानपत्रांतून वगैरे छापायला अधून मधून देत होते. ग्रॅज्युएशननंतर एक दोन जणांनी तिला तिथे नोकरी देण्याचं पण आश्वासन दिलेले होते.

आज पाखी मलातरी थोडी भेदरलेली दिसत होती, आणि अर्थात कॉलेज कँटीनमधे बोलायला नको म्हटल्यावर थोडा अंदाज आलाच. शिक्षिकेचा हा पेशा पत्करून मला सतरा वर्षं होत आली होती. त्यामुळे ही काहीतरी प्रेमाबिमाची अथवा घरून चाललेल्या लग्नाच्या चर्चेबद्दल असणार असा माझा ठोकताळा होता. आमच्या वर्गातल्या सर्वच मुलामुलींचे एकमेकांशी चांगले मैत्रीचे संबंध असले आणि पाखीचे तसे भरपूर मित्र असले तरी ती "प्रेमात वगैरे" पडण्यातली मुलगी खचितच नव्हती.

हॉटेलमधे बसल्यावर पाखी जरा बोलायला लागली.

"मॅम, आपल्या क्लासमधे तो विजय आहे ना. तो माझ्यामागे लागलाय" पाखी जरा घाबरून सावकाश म्हणाली.

"अरे, हो का?" मी काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेले. हा विजय पण माझ्याच वर्गात होता, फारसा हुशार नव्हता शिवाय घरचे गडगंज. त्यामुळे कॉलेजात जायचे म्हणजे उनाडटप्पूपणाच करायचा हे त्याचे ब्रीदवाक्य. सतत लेक्चर्स चुकवणे आणि फावल्या वेळात गावभर उंडारत फिरणे एवढंच करायचा.

"मॅम, तो चांगला मुलगा नाही हे तुम्हालाही माहित आहे." ती एकदम घाबरून म्हणाली.

"का गं? तुला आवडत नाही का तो?" विजय चांगला मुलगा नसला तरी व्यसनी अथवा गुंड वगैरे नक्कीच नव्हता. घरातलं शेंडेफळ असल्याने थोडा लाडावलेला आणि आयुष्याची कसलीच चिंता नसलेला असा विजय.

"मॅम, त्याच्यामधे आवडण्यासारखं काहीतरी आहे का?" पाखी म्हणाली. मला तिच्या या वाक्यानं एकदम हसू आलं.

"प्लीज मॅम. हसू नका. खूप त्रास देतोय तो मला," पाखीच्या आवाजामधे एकदम भीती दाटून आली.

"मला नीट सांग, पाखी. त्रास देतोय म्हणजे नक्की काय?" मला आता जरा काळजी वाटली.

पाखीच्या डोळ्यामधे पाणी आलं. "मॅम, कॉलेजमधे येताजाता तर मला काहीतरी बोलतच असतो. शिवाय काल माझ्या घरी पण आला होता."

"बोलत असतो म्हणजे काय बोलतो? काही घाणेरड्या कमेंट्स वगैरे मारतो का? प्रिन्सिपलकडे तक्रार करता येईल तुला. तसाही कॉलेजमधे नसतोच, प्रिन्सिपल सरळ घालवून देतील त्याला."

"नाही मॅम. तसा माझ्याशी बोलतो अगदी सभ्यपणे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे वगैरे म्हणत असतो. हल्ली गेल्या तीन चार दिवसापासून तर माझं नाव पण घेत नाही, मिसेस विजय म्हणूनच हाक मारतो. ते पण अख्ख्या वर्गासमोर. त्याच्या ग्रूपमधले पण सर्वजण मला वहिनी म्हणूनच हाक मारतात. मला ते अगदी विचित्र कानकोंडं वाटतं. आता तर क्लासमधे पण सर्वजण चिडवतात. मी सर्वांना सांगितलं की असं काही नाही, तरी चिडवतातच."

"ह्म्म. वर्गात कधीतरी या चिडवण्यावरून बोलायचंच आहे मला सर्व मुलांना, अजून कुणाच्यातरी एक दोन तक्रारी होत्या अशा.. पण मग हा विजय घरी कशाला आला होता तुझ्या?"

"माझ्या आईशी ओळख करून घ्यायला. तो आणि त्याची एक मोठी बहिण आहे, ते दोघे आले होते. ती मोठी बहिण माझ्या आईकडून माझी पत्रिका वगैरे घेऊन गेली."

म्हणजे एकंदरीत विजय पाखीवर प्रेम करत होता, आणि तिच्याशी लग्नाच्या तयारीत होता.

"मग तुला काय प्रॉब्लेम आहे?" माझ्या मध्यमवर्गीय मनाला याहून दुसरं काय सुचलं असतं?

"मला त्याच्याशी लग्न नाही करायचं." पाखी ठामपणे म्हणाली. "मी याहीआधी त्याला स्पष्टपणे सांगितलंय, मला आत्ता लग्नच करायचं नाही. आणि जेव्हा करायचं असलं तरी त्याच्याबरोबर करायचं नाही. मॅम, अजून थोडंतरी जगायचंय मला, आजूबाजूचं जग स्वतःच्या नजरेने जोखायचंय. इतक्यातच कुणाचीतरी गुलाम म्हणून स्वतःलाच हरवून टाकायचं नाही. फायनल एक्झाम झाली की मी पुण्याला शिफ्ट होणारे. तोपर्यंत काहीही करून हे लग्न पुढे ढकलायचं आहे."

"मग यामधे मी तुझी काय मदत करू? विजयशी बोलू का मी?"

"नको मॅम. त्याच्याशी बोलू नका, तो काहीही ऐकून घेणार नाही. मागच्या दोन तीन वेळेला येऊन मला काय काय ऐकवून गेलाय. त्याच्याशी लग्न केलं नाही तर तो जीव देईल असलं काहीपण बोलतो. त्यामुळे मला बोलायची काय त्याच्याकडे बघायची पण भीती वाटते. तुम्ही त्याच्या घरच्यांना ओळखता ना? मग त्यांना समजवाल का? आता फायनल एक्झाम झाल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला सध्या लग्नाचं वगैरे जमणार नाही."

"हे बघ पाखी, तुला विजयशी लग्न करायचं नाही हे ठीक. पण त्यासाठी तू नोकरी अथवा शिक्षणाची कारणे का देतेस? स्पष्ट सांग की मला लग्न करायचं नाही. ते पण विजयला किंवा विजयच्या घरच्यांना कशाला? तुझ्या घरच्यांना समजाव की तुला आत्ताच लग्न करायचं नाही. म्हणजे प्रश्नच येणार नाही तेच पुढे विषय नेणार नाहीत."

"मॅम, पण माझ्या घरचे ऐकणार आहेत का? आईला तर परवापासून अस्मान ठेंगणं झालंय. मी तिला सांगितलं पण तिने मलाच गप्प बसवलं."

"काय म्हणाली आई?"

"एवढं श्रीमंताचं घर, एवढा पैसा शिवाय जातीतलाच आहे मुलगा. अजून काय हवं?"

पाखीच्या आईचा मुद्दादेखील तिच्या दृष्टिकोनातून अतिशय अचूक होता. विजयसारख्या मुलामधे नाव ठेवण्यासारखं काहीही तिला दिसलंच नसतं, त्यातून आपल्या मुलीला तो मुलगा आवडत नाही हे कारण तसं फारच क्षुल्लक!

"मॅम, एकदा का मी असल्या मोठ्यांच्या घरात सून म्हणून गेली म्हणजे आयुष्य सगळं रांधा-वाढा-उष्टी काढा यामधेच जाणार हे सांगायला काही ज्योतिष नको. त्यांच्याकडे अजूनही बायका बाजारात खरेदीला जात नाहीत म्हणे, गडीमाणसं सगळी खरेदी करतात. अशा घरामधे जाऊन मी सुखी होईन का? बरं ते जाऊ दे. मला विजय आवडत नाही. त्याला कसलंच गांभीर्य नाही, आयुष्यात काय करायचं आहे याचा पत्ता नाही आणि लग्नाची स्वप्नं बघतोय..."

मला पाखीला नक्की काय सल्ला द्यावा तेच समजत नव्हतं. एकीकडे पाखी जे म्हणत होती ते पटत होतं, पण मनात कुठेतरी एवढं चांगलं स्थळ आलंय आणि ही नको म्हणतेय हा विचार तरळून गेला. पाखीच्या घरामधे सकाळी भात खाल्ला तर रात्री चुरमुरे खाऊन झोपायची परिस्थिती. विजयसारखा श्रीमंत मुलगा स्वतःहून तिच्या दारी आला होता. विजय उनाडटप्पू वगैरे असला तरी व्यसनी वगैरे काही नव्हता. त्याच्या वडलांचा व्यवसाय चांगला जोरात असल्याने आणि मोठे दोन्ही भाऊ भरभक्कम मदत करणारे असल्याने काही न कमावता आयुष्य घालवलं असलं तरी चाललं असतं.

"हे बघ, पाखी. आता फायनल एक्झाम फक्त तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे तू सध्या अभ्यासावर लक्ष ठेव. मी उद्या तुझ्या घरी येईन. तुझ्या आईला मी सांगेन की एक्झाम होईपर्यंत पाखीच्या लग्नाचा विचार नको. विजयच्या वडलांना मी व्यक्तिश: ओळखते. त्यांनाही भेटून सांगेन तू या लग्नाला तयार नाहीस."

"पण एक्झामनंतरचं काय?"

"ते आपण नंतर बघू. आतातरी विजयला तुझ्या मनात काय आहे ते सांगून टाक. जर तुला लग्न करायचंच नसेल तर नोकरी वगैरे बघण्यासाठी मी तुला मदत करेन. पुढे शिकायचं असेल तर त्या दृष्टीने सहाय्य पण करेन. पण सध्या तू परीक्षेवरती लक्ष द्यावं असं मला वाटतं."

"ओके मॅम, तुम्ही घरी येऊन आईला सांगितलं तर ती कदाचित ऐकेल. ते कुळकर्णी मला जॉब देणार म्हणाले होते ना? त्यांना मला ऑफर लेटर देऊन ठेवायला सांगाल का? म्हणजे आईला मी जॉबच करणार आहे हे पक्के माहित होईल"

"चालेल, मी बोलते त्यांच्याशी. पण तुझं लक्ष मात्र परीक्षेवर असूदेत."

नंतर थोडावेळ मी आणि पाखी परीक्षेसंदर्भामधेच बोलत बसलो होतो.

पाखीसारख्याच कितीतरी मुली माझ्या वर्गातल्या. कुणाला आत्ता लग्न करायचं नसतं, कुणाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय लग्न नको. तर कुणी "मी आयुष्यभर लग्न करणारच नाही" अशी भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या. त्याउलट अगदीच कुणी लग्नाळलेल्या, शिवाय लग्न झाल्यावर पण शिक्षण घेणार्‍या मुली होत्याच की. "लग्न" हा या मुलींच्या आयुष्यातला परमनंट घटक. प्रत्येक वर्षी फायनल इयर जवळ आलं की अशा दोन तीन मुली तरी "मॅम, तुमच्याशी बोलायचं आहे" म्हणून मन मोकळं करायच्या. कधी मी दिलेला सल्ला त्यांना पटायचा, तर कधी नाही. कधी कुणी इवलालं तोंड करून लग्नपत्रिका देऊन जायची, तर कुणी चांगली सजलेली सवाष्ण बनून "मॅम, मी परवा रजिस्टर लग्न केलं" अशी बातमीच घेऊन यायची.

पाखीच्या मात्र आयुष्यातली ध्येयं स्पष्ट होती, त्यामुळे लग्नापेक्षा तिला परीक्षेची जास्त चिंता होती. यामधून ती नक्की मार्ग काढेल याची मला पूर्ण खात्री होती. संध्याकाळी घरी पोचले आणि रोजच्या कामांना लागले तोपर्यंत मी हा विषय विसरून पण गेले होते.

रात्री जेवणाची तयारी करत होते. माझे मिस्टर अजून त्यांच्या ऑफिसमधून आले नव्हते, सध्या कामं जास्त असल्याने रोजचा उशीर ठरलेलाच होता. माझा पंधरा वर्षाचा मुलगा अनिकेत हॉलमधे टीव्ही बघत बसला होता. वरणाला फोडणी घालतच होते तेवढ्यात अचानक अनिकेत किचनमधे ओरडत आला.

"आई गं, आई गं.... " त्याच्या घाबर्‍या आवाजाने मला एकदम धसकाच बसला.

"काय रे? काय झालं?" मी विचारलं. एका क्षणामधे माझ्या डोळ्यासमोर कारने येणारे त्याचे बाबा, गावी असणारी माझी म्हातारी आई आणि असलं कायबाय येऊन गेलं. अनिकेतचा चेहरा तर अगदीच बावरल्यासारखा होता, त्यामुळे अजूनच भीती वाटली.

"मागच्या आठवड्यात ती तुझी स्टुडंट घरी आली होती आठवतंय?" त्याने विचारलं. माझे एक दोन विद्यार्थी तरी रोज घरी येतच असतात त्यामुळे हा नक्की कोणाबद्दल बोलतो आहे ते समजेना.

"कोण स्टुडंट? काय झालं तिला?" मी सिंकमधे हात धुवत विचारलं. सुदैवाने माझ्या कुटंबातल्या कुणाचं काही नव्हतं.

"तिच्या अंगावर अ‍ॅसिड ओतलंय. आता संध्याकाळी सात वाजता. तिच्या गल्लीतला केदार आहे ना त्याचा आत्ता फोन आला घरी. हॉस्पिटलमधे नेलंय. पण काही खरं नाही म्हणे."

"कुणाच्या अंगावर? कुठे राहते?"

"केदारने काहीतरी वेगळंच नाव सांगितलं... काहीतरी हां.. आठवलं, मागच्या वेळेला आपल्या घरी आली होती तेव्हा माझ्या बायोच्या डायग्रॅम्स काढून दिल्या होत्या ती...."

"पाखी?" मी धसकून विचारलं.

"बरोब्बर. नाव लक्षात येईना माझ्या, पाखीच. तिला सरकारी हॉस्पिटलमधे नेलंय. तुला जायचंय का?" त्याने विचारलं.

"अं?" मला काहीच बोलता येईना, पाखी आत्ता माझ्यासोबत तीन चार तासापूर्वी होती. माझ्यासोबत आयुष्याच्या निरगाठी उकलत होती आणि आता हे असं? अ‍ॅसिड ओतलं म्हणजे नक्की काय झालं तिच्यासोबत?

"मी येऊ का सोबत हॉस्पिटलमधे?" अनिकेतने विचारलं.

"नको! बाबा आले की मी जाईन त्यांच्यासोबत. बाबांना ऑफिसमधे फोन करून विचार ते निघालेत का? थांब, आधी देवासमोर दिवा लावते. काही का होईना, पण पोर जगू देत. लाखात एक मुलगी आहे" बोलता बोलता माझे डोळे भरून आले.

"आई टेन्शन घेऊ नकोस. सर्व ठीक होईल." माझ्या खांद्यावर हात ठेवत माझा लेक उद्गारला.

=========================================

संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमधे गेलो तेव्हा तिथे तोबा गर्दी होती. पोलिस बंदोबस्त तर होता शिवाय गावातले राजकारणी, दादा-भाऊ-अण्णा-भाई सर्व हजर होतेच. हॉस्पिटलच्या बाहेरच वर्गातली कितीतरी मुलंमुली उभे होते.

मी कारमधून उतरल्याबरोबर पाखीच्या एक दोन मैत्रीणी माझ्याकडे धावत आल्या. "मॅम.. पाखीचं असं झालं.. बरी होईल ना ती?" त्यातली सुजाता रडत रडत म्हणाली.

"कशी आहे ती आता?" मी विचारलं.

"मॅम, पूर्ण चेहरा जळाला तिचा. त्या हरामखोरानं विद्रूप केलं तिला, हातावर आणि छातीवर पण पडलं अ‍ॅसिड."

"विजयने केलं का?" मला आता ते नावसुद्धा घ्यावंसं वाटत नव्हतं खरंतर.

"हो मॅम. गेल्या सहा महिन्यापासून तसा तिला सतावत होता, पण असं काही करेल असं कधीच वाटलं नाही." तिच्या बाजूला उभी असलेली राधा म्हणाली.

"बघायला आत जाऊ देत आहेत का?" एवढा वेळ शांत उभ्या असलेल्या माझ्या मिस्टरांनी विचारलं.

"नाही सर. हॉस्पिटलमधे आणल्यापासून कुणाला आत सोडलं नाही. अगदी तिच्या आईने सुद्धा दूरून बघितलंय. डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करत आहोत. पण वाचायची शक्यता खूप कमी" राधानेच उत्तर दिलं.

"तो मुलगा कुठे आहे आता?" मिस्टरांनीच विचारलं.

"पोलिसांनी लगेच पकडला.. अस्लमच्या गॅरेजमधे लपला होता म्हणालं कोणतरी. आता जेलमधे ठेवलाय. मघाशी कुणीतरी म्हणालं, त्याच्या बाबांनी जामिनासाठी खूप प्रयत्न करत आहेत. न करून करतील काय? आवडता लेक ना तो!! पण पोलिस म्हणतात जामीन मिळणार नाही. मुलीच्या जीवाचं काही झालं तर विजयवर गुन्हा दाखल करतील असं काहीतरी म्हणत होते. त्याची आई पण आली होती अर्ध्या तासापूर्वी. पण पोलिसांनी आत जाऊ दिलं नाही. मॅम, पाखी बरी होईल ना?"

मी अगदी सुन्न होऊन गेले होते. पाखी माझी आवडती विद्यार्थिनी. आपण ज्यांचे शिक्षक आहोत असं अभिमानाने सांगावं अशी विद्यार्थिनी. पण तिच्यावर अ‍ॅसिड फेकणारा विजय- तोही माझ्याच वर्गातला. गेली तीन वर्षे माझ्या सर्व लेक्चर्समधून मी त्याला हेच शिकवलं होतं का? मीच का? इतर शिक्षक, त्याच्या शाळेत त्याच्या घरीदारी कुणी त्याला हे असलं शिकवलं असेल? तिच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्याने नक्की काय समाधान मिळाले असेल त्याला? बारावीला सायन्सला असताना काठावर पास झाला म्हणून ग्रॅज्युएशनला आर्ट्समधे प्रवेश घेतलेला त्याने. मग आत्ता चेहर्‍यावर अ‍ॅसिड ओतल्याने काय घडेल हे विज्ञान कुठून समजलं त्याला? हे नतद्रष्ट अ‍ॅसिड मिळाले तरी कुठे त्याला? माझ्या मनाची विचार करायची शक्तीच जणू हरवून गेली होती. भांबावल्यासारखी मी उभी होते.

"काय करणार आहेस?" मिस्टरांच्या या प्रश्नाने भानावर आले. "घरी जाऊ या का? आता तिला भेटायला कुणाला सोडणार नाहीत, उद्या सकाळी येशील का?" त्यांनी विचारले.

"हो चालेल. उगाच व्हिजिटर्समुळे डॉक्टरांना त्रास नको. मुलींनो, तुम्ही पण घरी जा" मी कसंबसं म्हटलं.

"कुणाला सोडायचं आहे का घरी? चला कारमधे." मिस्टर म्हणाले.

"नको, सर, थँक यु. पण आम्ही आमच्या टू व्हीलर आणल्या आहेत. शिवाय प्रथमेश, आर्यन, प्रभात सर्व आहेत आमच्यासोबत."

"मुलीनो. तुम्ही घरी लवकर जा. दिवस चांगले नाहीत" मी म्हटलं. इतके दिवस याच मुली रात्री दहा काय अकरा वाजेपर्यंत कॉलेजमधे थांबलेल्या असायच्या. कॉलेजचं नाटक असो, कसल्या स्पर्धा असोत, मुली कॉलेजमधेच आहेत म्हटल्यावर त्यांच्या पालकांना पण कधी चिंता लागली नाही. वर्गातली मुलंसुद्धा रात्री मुलींना घरी पोचवून मग स्वत:च्या घरी जाणारी. छोटंसं गाव खूप सुरक्षित आहे असं कायम वाटत आलं होतं. इतक्या दिवसांत पालकांनाच काय पण आम्हा शिक्षकांनादेखील कधी त्यांच्या सुरक्षिततेविषयी भिती काळजी वगैरे वाटली नव्हती. आमचं आज मात्र वाटली, अगदी नसानसांतून भिती वाटली.

बाजूला वर्गातली अजून काही मुलं आली, त्यांच्यासोबत कॉलेजमधले काही प्रोफेसर्स पण होते. बहुतेक मुलींचे डोळे रडून सुजले होते.

"मॅम, विजय असलं कधी करेल असं वाटलं पण नव्हतं हो." त्या मुलांमधला आशुतोष म्हणाला. "कॉलेज संपल्यावर आम्ही तिघेचौघे जण लायब्ररीमधे बसून अभ्यास करत होतो. साडेसहाला घरी निघालो, थोडाफार अंधार झाला होता, म्हणून अर्तिकाला आणि सुजाता- त्यांचं घर सर्वात लांब म्हणून सोबत मी, पाखी आणि आर्यन वगैरे सगळे निघालो होतो. वाटेत हनुमानदेवळाजवळ आम्ही पाणीपुरी खाल्ली. अर्तिकाच्या घरून परत येताना तो ओढा लागतो ना- कुणाची घरं नाहीत बघा तिथे.... तिथेच विजय बाईकवरून आला. पाखीला म्हणाला की तिच्याशी काहीतरी खाजगी बोलायचं आहे. पाखी म्हणाली तिला काहीच बोलायचं नाही. आम्हाला वाटलं की त्यांचं काहीतरी भांडण वगैरे चालू आहे. कारण विजयने आम्हाला "पाखी लग्नाला हो म्हणाली. परीक्षा झाली की लग्न करणार" असं मागच्याच महिन्यात सांगितलं होतं. पाखीला विचारलं तर ती म्हणायची, असलं काहीही नाही. वर्गात चिडवतील म्हणून ती खोटं बोलते असं विजयनेच एकदा सांगितलेलं आम्हाला. खरंतर पाखी विजयला हो म्हणणार नाही अशी आमची खात्रीच होती. पण आज लायब्ररीमधे आम्ही बसलो होतो तेव्हापण विजय एकदोनदा येऊन पाखीशी काहीतरी बोलून गेला होता. आता उगाच त्यांच्या खाजगी गोष्टी आपण का ऐकायच्या म्हणून आम्ही सगळे बोलत बोलत पुढे आलो. सोबतच होतो, फार दूर गेलो नव्हतो. एकदम पाखीची किंचाळी ऐकू आली म्हणून मागे वळून पाहिलं. पाखी जमिनीवर पडून लोळत होती. त्या हिजड्याने तिला एक लाथ मारली "भोग आता कर्माची फळं" म्हणाला आणि निघून गेला. आम्ही धावत तिच्याकडे गेलो तेव्हा आम्हाला केस वगैरे जळाल्याचा वास आला. तो विजय असं काही करेन असं वाटलं पण नव्हतं. नाहीतर आम्ही तिला एकटं कधीच सोडलं नसतं. पाखी जेव्हा ओरडून तिच्या हातांकडे दाखवत होती तेव्हा अ‍ॅसिड फेकलं आहे हे आर्यनच्या लक्षात आलं. ती रस्त्यावर अक्षरश: तळमळत होती. राधा तिच्याजवळ गेली तेव्हा घाबरलीच. कुणाला काय करायचं सुचेना. मी पोलिसांना फोन केला. आर्यनने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरना फोन केला वगैरे. मग डॉक्टरांनी फोनवर सांगितलं तसं आम्ही थोडं पाणी तिच्या अंगावर ओतलं. आम्हाला तिला हात लावायला पण भिती वाटत होती. अ‍ॅम्ब्युलन्स आली तोपर्यंत ती खाली जमिनीवर... बघवत नव्हतं तिच्याकडे. त्या किंचाळ्या ऐकून आम्ही हडबडलोच. काहीच सुचेना. नंतर नंतर तर तिच्या आवाजच ऐकू येईना झाला, पण चेहर्‍यावर वेदना दिसत होत्या.... तिचे कपडे तर जळालेच होते पण आम्हाला तिची कातडीपण जळताना दिसत होती. मॅम, हॉस्पिटलला आणेपर्यंत तिच्या हाताची हाडं दिसत होती... तिचे काळे डोळे नंतर फक्त पांढरे दिसायला लागले." बोलता बोलता त्याचा आवाज भरून आला. "मॅम, पाखीने आयुष्यात कधी कुणाचं काही वाईट केलं नसेल. मग तिचं असं का झालं?" आशुतोषला हुंदकाच फुटला.

त्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याचकडे काय देवाकडे तरी होतं की नाही कुणास ठाऊक?

त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. गेली तीन वर्षे माझ्या वर्गातला तो पाखीचा उत्फुल्लित चेहरा, एखादी नवीन कविता समजावून घेताना तिच्या डोळ्यात नाचणारं इंद्रधनुष्य, कठीणात कठीण विषय निवडून त्यावर मुद्दाम लिखाण करून बघायचं, त्यासाठी लागणारे सगळे संदर्भ शोधून वाचायचे, कॉलेजमधल्या प्रत्येक अ‍ॅक्टीव्हीटीमधे तिचा सहभाग असं काय आणि किती आठवत होतं. "मॅम. मी पीएचडी करणार, अगदी कुठला विषय घेऊन करणार ते पण ठरवून ठेवलंय" असं ठामपणे बोलून दाखवणारी पाखी. अगदी फर्स्ट इयरला असताना वर्गामधे सगळ्यांची ओळख करून घेताना तिचे नाव ऐकून काही मुली उगाच खुसफुसल्या होत्या तेव्हा तिने उठून "पाखी म्हणजे पक्षी. उडण्याची ताकद असणारा" हे स्पष्ट ऐकवलं होतं. तीच पाखी आता पंख छाटलेल्या अवस्थेमधे आत्ताचा श्वास शेवटचा की पुढचा श्वास याचा हिशोब करतेय.

एका क्षणामधे आपलं आयुष्य किती बदलू शकतं? हे पाखीसोबत झालं तसं अजून कुणाच्या बाबतीत होईल? हे विजयने केलं तसं अजून कुणी करू शकेल? आणि का करेल? पाखीने लग्नाला नकार दिला तर काय बिघडलं होतं? विजयला दुसरी मुलगी मिळाली नसती का? पाखी जगतसुंदरी होती अशातला भाग नव्हता, चारचौघीसारखीच तर होती. मग तरी विजयने तिच्यासाठी असं का केलं असावं? अ‍ॅसिड ओतल्यावर ती विद्रूप होईल, कदाचित मरेल हे त्याला माहित नव्हतं का? तिचं आयुष्य संपवून नक्की काय मिळणार होतं त्याला? एकीकडे तिच्यासोबत आयुष्याची स्वप्नं बघायची, तिला जीवनसोबती म्हणून ठरवायचं आणि नंतर पुढच्याच क्षणी तिचं आयुष्य आपण आपल्याच हातांनी उद्ध्वस्त करायचं? कशासाठी? कुठून आलं असेल हे त्याच्या मनामधे? सिनेमानाटकांमधून? कितीही प्रयत्न केला तरी गेल्या कित्येक वर्षातला एकही असा सिनेमा आठवेना ज्यामधे नायक नायिकेची अशी दुर्दशा करतो. उलट कित्येक सिनेमा तर "प्रेमाचा त्याग" वगैरे भावनांनी ओथंबलेले. मग विजयने ही शिकवण घेतली कुठून?

त्याच्या घरचे जुन्या विचारांचे लोक असले तरी अतिशय धार्मिक लोक. घरामधे एवढा पैसा असून कधी कुणी पैशाची जोरी (पैशाचा माज?) आजवर गावात दाखवली नव्हती. त्याची आई अडीनडीला सर्वांच्या मदतीला धावून जाणारी. त्याचे वडील तर माझ्या मिस्टरांसोबत काम करणारे.. आज जेव्हा त्यांना समजलं असेल की आपल्या मुलाने हे असलं काम केलंय तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? काय अवस्था झाली असेल? ज्या गावामधे मानाचे जरीपटके घेतले त्याच गावामधे मुलाच्या जामीनासाठी विनंत्या करायची वेळ आली...

आणि या विजयला आपण एका मुलीच्या आयुष्याचं नुकसान करतोय हे लक्षातच आलं नाही का? कधीही न भरून येणारी जखम तिला देऊन त्याने काय मोठा तीर मारला होता? तिच्या शरीराची जखम तर कधीच न भरणारी आणी त्याच्या मनाचं काय? तिचा चेहरा विद्रूप करून त्याने स्वत:चे आयुष्य भेसूर करून घेतलं स्वतःच्या हातांनी. या अशा अवस्थेमधे तिला पाहताना त्याच्या मनाला काय वाटलं असेल, आपण जिच्यावर प्रेम करतो रस्त्यावर तळमळत पडलेली असताना काय विचार आले असतील त्याच्या डोक्यात? एवढं होऊन त्याच्यावर काय वेळ आली होती, कायद्याच्या दृष्टीने, माणूसकीच्या दृष्टीने तो एक गुन्हेगारच होता, या कृत्याचा त्याला कितीही पश्चाताप झाला तरी कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं होतंच. स्वत: आता लॉकपमधे आहेच. कायद्याने जी काय शिक्षा होईल ते होईलच, पण बदनामीचा टिळा तर त्याच्याही कपाळावर लागलाच होता ना? बाईकवरून येतानाच तो अ‍ॅसिड घेऊन आला होता, म्हणजे हे रागाच्या भरात क्षणभराचं कृत्य तर नक्कीच नव्हतं उलट पूर्वतयारीनिशी आला होता. मग ती अ‍ॅसिडची बाटली हातात घेत असताना एका निमिषासाठी पण या अ‍ॅसिडचा तिच्यावर काय परिणाम होईल हे त्याच्या मनात आलं नाही??

तिच्या नकाराचा त्याच्यावर इतका खोल परिणाम का झाला- की तो तिच्यावर प्रेम करतो हेच विसरून गेला. असलं कसलं प्रेम? ही एकच मुलगी त्याच्या आयुष्यामधे आली होती असं पण नाही. मग तरी तिच्यावर त्याने असा निघृण हल्ला केला होता. त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम खरं म्हणावं की तिच्या नकारामुळे त्याचा दुखावलेला अहंकार खरा म्हणावा? "मी तिच्यासोबत आयुष्य जगेन, तिला मान्य नसेल तर तिच्याशिवाय जगेन." याहीपेक्षा "ती मला नाही म्हणूच कसं शकते?" ही भावना जास्त वरचढ कशामुळे झाली? प्रेम हे एकतर्फी कसं काय असू शकतं आणि जे प्रेम एकतर्फी आहे ते असं विध्वंसक रूप कसं काय घेऊ शकतं? हे कसलं नराधम प्रेम? संस्कार, सुरक्षा, कायदा, समानता, प्रेम, साहचर्य हे सगळेच्या सगळेच शब्द आपला अर्थ गमावून बसले होते का?

रात्र संपून सकाळ झाली तरी माझ्या मनातल्या प्रश्नाचं थैमान काही थांबलं नव्हतं.

सकाळी उठून नेहमीप्रमाणे आवरत होते पण रोजचा उत्साह नव्हता. मी टेबलवर नाश्ता आणून ठेवत होते तेव्हा अनिकेतने स्वत:हून त्याच्या कुठल्याशा मित्राला फोन केला.

"आई, पाखी स्टेबल आहे म्हणालेत डॉक्टर. काल सगळे म्हणत होते की बहुतेक तिची दृष्टी गेली, पण डॉक्टर आताच काही सांगत नाही असं म्हणाले."

मिस्टर मॉर्निंग वॉकवरून परत आले तेव्हा स्टॉलवर असतील नसतील तेवढी सर्व वर्तमानपत्रं घेऊन आले. सर्वच वर्तमानपत्रांवर पहिल्या पानावर पाखीची बातमी होती. काल रात्रीपासून टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून आरडाओरडा चालू झाला होता. आसपासच्या प्रत्येक राजकारण्याची आता मदतीची चढाओढ लागली होती. प्रत्येक "मान्यवर व्यक्ती"ला आता या दु:खद प्रसंगाबद्दल बोलायचंच होतं आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीला आता ऐकून घ्यावंच लागणार होतं. त्याची मर्जी असली नसली तरीही.

"उठलीस पण? आणि नाश्ता पण बनवलास? अजून थोडावेळ आराम करायचा होतास" मिस्टर खुर्चीत बसत म्हणाले. "रात्रभर झोपली नाहीस. पहाटे कुठे थोडी झोपलीस. अगं हो, मघाशी तुमच्या प्रिन्सिपलचा फोन आला होता. कॉलेजमधे सकाळी दहा वाजता सर्व (सगळ्या?) प्रोफेसरांची मिटींग बोलावली आहे. या प्रकरणाशीच काही संबंध असणार. आज मी ऑफिसमधे जाताना तुला हॉस्पिटलमधे घेऊन जातो तिथून कॉलेजला ड्रॉप करेन. चालेल?" चहा घेत घेत त्यांनी विचारलं.

"नको" मी निग्रहाने म्हटलं. "मी हॉस्पिटलमधे नंतर कधीतरी जाईन, आज खूप गर्दी असेल शिवाय भेटायला देतील की नाही माहित नाही. त्यापेक्षा नंतर जाईन."

"ओके, मग तुला कॉलेजमधे सोडू का?" त्यांनी विचारलं.

मी काहीच बोलले नाही. मी हॉस्पिटलमधे जाणार नाही. कधीच पाखीला भेटणार नाही. माझ्यात ती हिंमत नाही. काल पाखी माझ्यासोबत बसून बोलत होती तेव्हाच का माझ्या लक्षात आलं नाही, विजय असं काही करू शकेल म्हणून. कितीवेळा पेपरमधे टीव्हीमधे अशा बातम्या वाचल्यात. तरी मी पण तिला मूर्खासारखा सल्ला दिला, जे काही मनात असेल ते स्पष्टपणे सांगून टाक. तिच्या स्पष्टपणाचाच हा परिणाम झाला. मी तिला बघू शकणार नाही. आजच नाही तर आयुष्यात पुन्हा कधीही नाही. मी तिची गुन्हेगार आहे. या घटनेमधे विजय जितका गुन्हेगार तितकीच मी पण गुन्हेगार..

पाखीला पुन्हा कधीच बघायचं नाही. भेटायंच नाही, काल पाखीच्या डोळ्यांत बघत मी "तुला काय वाटतं?" हे विचारलं होतं. आज ते डोळेच राहिले नाहीत. माझा माझ्यावरचाच विश्वास डळमळीत झाला होता. इतकी वर्षं शिक्षिका म्हणून काम केलं. गावामधली कधीतरी हाफचड्डीत फिरणारी मुलं माझ्या वर्गात बसून मराठी साहित्याच्या गहनगंभीर चर्चा करायला लागली की मला एक वेगळाच अभिमान वाटायचा. आपण हे घडवलं! आपण या व्यक्तिमत्त्वाच्या कुठल्या तरी एका पैलूचे शिल्पकार! पण आज मात्र मीच मला गुन्हेगार वाटत होते.

आमच्या गावामधे तर साध्या विनयभंगाच्या बातम्यादेखील कधी ऐकू आल्या नाहीत आजवर कॉलेजमधे एखाद्या मुलाने जरा काही छेडखानी केली की प्रिन्सिपल सरळ त्याला कॉलेजबाहेर काढणारे. अशा या वातावरणामधे हे इतकं विपरीत घडलंच कसं काय?? याआधी अशा घटना वाचल्या त्या वर्तमानपत्रांमधे, चॅनलवर, ज्या लोकांशी आपला कसलाच संबंध नव्हता अशा लोकांबद्दल.. आज माझ्याच ओळखीमधे हे अ‍ॅसिड फेकणं... कसं काय घडलं असेल हे?

नक्की कुणाचं चुकलं? पाखीचं.. तिने विजयला नाही हे स्पष्टपणे ऐकवलं आणि त्याचा अपमान केला... एका मुलीने आपलं प्रेम धुडकावलं हे सहन न करू शकणार्‍या विजयचं... पाखीच्या आईचं- मुलीच्या मर्जीचा काडीचाही विचार न करता तिने लग्नाला होकार दिला... आपल्या मुलाचे प्रत्येक लाड हे जणू पुरवलेच पाहिजेत असं कायम वागत राहणार्‍या विजयच्या आईवडलांचं की माझं... असं काही घडू शकेल याचा विचारदेखील न करता स्पष्टवक्तेपणा सल्ला देणार्‍या बाईचं... नक्की चुकलं कुणाचं?

आणि ही चूक कुणाचीदेखील असली तरी सध्या मरणप्राय शिक्षा मात्र एकाच व्यक्तीला भोगायला लागत आहे. माझ्या पाखीला... जिच्या पंखांमधे आकाश व्यापण्याची ताकद होती तिला आता जन्मभर हे दु:ख भोगावं लागणार होतं. पाखीचं नुसतं शरीर जखमी झालं नाही, तिची नुसती दृष्टी गेली नाही! गेला तो माझा शाश्वत जीवनमूल्यांवरचा विश्वास, हरवलं ते माझं स्वतःचं माणूसकीशी असलेलं नातं.

खरंतर अशा घटना रोज रोज थोडीच न घडणार्‍या. क्वचित कधीतरी घडत असणार्‍या. पण तरीही आपल्या आजूबाजूच्या भावविश्वात जेव्हा अशी एकदेखील घटना घडते तेव्हा ती मुळापासून हादरवून टाकणारी असते. एका वेगळ्याच गर्तेमधे घेऊन जाणारी, भोवर्‍यासारखी मलाच गरागरा फिरवणारी ही घटना.
ज्याला जसं जगायचं आहे तसं जगू द्यावं हा एक साधा सोपा जगण्याचा नियम आपण पाळू शकत नाही का? मग काय उपयोग आपल्या "माणूस" असण्याचा.. आपल्यापेक्षा जनावरं बरी... ती किमान असली नीच कृत्ये करत नाहीत.

टीव्हीवर चाललेल्या चर्चासत्रामधे एक विदुषी तावातावाने सध्या समाज किती बधीर झालाय आणि अशा घटनांचे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे सांगत होत्या. असा बधीर समाज म्हणे उत्तम असल्याचं लक्षण नव्हे. काही परिणाम होत नाही? इथे माझं अंतर्विश्व पूर्णपणे ढवळून निघालंय त्याचं काही नाही? कुठला समाज बधीर झालाय? कालपासून पाखीसाठी डोळ्यातून आसवं गाळणारे तिचे सहाध्यायी बधीर झालेत? त्यांच्यावर त्यांच्य्या आयुष्यावर या घटनेचा काहीही परिणाम होणार नाही हे कशावरून? समाज समाज म्हणजे असतं कोण? आपणच सारे ना... मग आपल्यातलंच कोणतरी असं आततायी कृत्य करतंच कसं? उत्तम समाज तो ज्यामधे अशा घटना घडतच नाहीत... मग तसं झालं तर कायद्याची आवश्यकताच का असली असती?

पाखीच्या बाबतीत जे घडलं ते कुणाही बाबतीत घडू शकत होतं. विजयने जे केलं ते कुणीही करू शकत होतं. उद्या कदाचित माझा अनिकेत पण असं काही करेल का? विचार मनात येताच थरकाप उडाला. त्याच वेळेला माझ्याच मनाने दिलासा दिला- एवढ्या वर्षांमधे कुठे असं काही घडलं होतं का? अचानक घटना घडली म्हणून आपल्याला एवढा धक्का बसला आहे. एवढ्या एका घटनेवरून आपल्या इतक्या दिवसांच्या सुरक्षित समाजव्यवस्थेला थोडीच काही तडा वगैरे जाणार होता? हे असलं काही आपल्यासारख्यांच्या कुणासोबत तरी घडतं का? पाखीसोबत घडलं म्हणून प्रत्येक मुलीच्या सुरक्ष्हिततेची चिंता आम्हाला आज भेडसावयला लागली. पण आमच्या एवढ्या छोट्याशा गावामधे माझ्या आठवणीतली ही पहिलीच घटना. ती पण माझ्याच नात्यातल्या किंवा कुटुंबातल्या नव्हे तर वर्गातल्या विद्यार्थिनीसोबत.

पाखी अजून हॉस्पिटलमधेच तडफडत होती. तिच्या या अवस्थेला जबाबदार विजय पोलिस कोठडीत होता, मी मात्र "काहीच करू शकले नाही" असा दोष स्वतःवर घेऊन मलाच गुन्हेगार का म्हणू पहात होते. आणि त्याच वेळेला माझं मुर्दाड आणि दुबळं मन "या घटना रोज घडत नाहीत" अशी मलमपट्टी मला लावू पाहत होतं.

पण एका अर्थाने खरंच आहे ना? अशा घटना रोज रोज थोडीच घडतात?

पाखी कदाचित आयुष्यभरासाठी अपंग होईल. आयुष्यभरासाठी कुरूप होईल. पण तरी अशा घटना पुन्हा पुन्हा थोडीच घडणार आहेत?

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

अशावेळी संभाव्य घालमेल आणि स्वतःच स्वतःची घातलेली तोकडी समजूत चांगली टिपली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सुन्न...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लिहीलय.
शेवटी तोकडी समजूत आहे? की मध्यमवर्गीयांच्या बोटचेपेपणावर खवचटपणे प्रश्न विचारलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0