अर्थनिर्णयनाच्या विरोधात

अर्थनिर्णयनाच्या विरोधात

लेखक - मिलिंद

"आशय कशाचं तरी ओझरतं दर्शन असतं, काहीतरी क्षणभर चमकून जातं. आशय अतिशय सूक्ष्म असतो."
विलियम ड कूनिंग (एका मुलाखतीत)
"फक्त उथळ माणसंच बाह्य रूपावरून पारख करीत नाहीत. गूढ दृग्गोचरात आहे, अदृश्यात नव्हे."
ऑस्कर वाइल्ड (एका पत्रात)


अर्थनिर्णयनाच्या विरोधात

कलेचा प्राक्कालीन अनुभव जादुई, मंत्रभारला असावा. त्या काळी कला कर्मकांडाचा एक भाग होती. (लास्को, अल्टामिरा, नियो, ला पासियेगा इत्यादी ठिकाणी असलेल्या गुहांमधील चित्रे पहा.) कलेचा सर्वात जुना सिद्धांत यवनी (ग्रीक) तत्त्वज्ञांनी मांडला. त्यानुसार कला म्हणजे अनुकृती, वास्तवाचे अनुकरण किंवा नक्कल.
हा सिद्धांत मांडल्याबरोबर कलेच्या मोलाचा विचित्र प्रश्न उद्भवला, कारण आनुकृतिक सिद्धांताच्या अटीच कलेला स्वत:चे समर्थन करण्याचे आव्हान देतात.
कलेला काही मोल असण्याविषयी शंका व्यक्त करण्यासाठीच प्लॅटोने आनुकृतिक सिद्धांत मांडला असावा. तो सामान्य जड वस्तूंनाही असामान्य आकृतिबंधांची अथवा संरचनांची नक्कल मानायचा. त्यामुळे एखाद्या पलंगाचे उत्कृष्ट चित्रही फक्त "अनुकरणाचे अनुकरण" किंवा "नकलेची नक्कल"च असू शकते. प्लॅटोच्या मते, कलेचा फारसा काही उपयोग नसतो. (पलंगाच्या चित्रावर झोपता येत नाही, आणि, काटेकोरपणे पाहिले, तर ते चित्र वास्तवही नसते.) अॅरिस्टॉटलने कलेचा पक्ष मांडला असला तरी कला ही नजरभूल आहे, व त्यामुळे असत्य आहे हे प्लॅटोचे म्हणणे तो खोडून काढू शकला नाही. पण कला निरुपयोगी आहे हा प्लॅटोचा विचार मात्र त्याला मान्य नाही. किंबहुना, त्याच्या मते कला धोकादायक भावनांना चेतवून त्यांचे रेचन करत असल्यामुळे ती एक प्रकारची वैद्यकीय उपचारपद्धती आहे.
प्लॅटो व अॅरिस्टॉटलच्या लेखनात, कला ही कायम आलंकारिक असते हे गृहीतक आनुकृतिक सिद्धांताच्या हातात हात घालून चालताना दिसते. पण आनुकृतिक सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांनी सजावट कलेकडे व अमूर्त कलेकडे कानाडोळा करण्याची गरज नाही. कला ही अपरिहार्यपणे 'वास्तवता' आहे ही चुकीची कल्पना, ह्या सिद्धांताने निर्माण केलेल्या अडचणींच्या मर्यादेत राहूनही रद्द करता येते किंवा तिच्यात फेरबदल करता येतात.
वस्तुस्थिती अशी आहे की कलेविषयी साऱ्या पाश्चात्त्य जाणिवा, सारे पाश्चात्त्य चिंतन यवनी आनुकृतिक सिद्धांताच्या चाकोरीत राहिले आहे. ह्या सिद्धांतामुळेच कला - विशिष्ट कलाकृतींच्या पलीकडे जाऊन समग्र कला - अडचणीची ठरू लागते, तिचा बचाव करावा लागतो. त्या बचावातूनच 'आकृतिबंधा'पासून 'आशया'ला वेगळा काढण्याचा विचित्र दृष्टिकोन निपजला. आशयास आवश्यक आणि आकृतिबंधास गौण ठरवण्याची सद्‌हेतुक चालही त्यातूनच आली.
आधुनिक काळात बहुतेक कलाकारांनी व समीक्षकांनी जरी कलेचा आनुकृतिक सिद्धांत त्यजून तिला आत्मनिष्ठ अभिव्यक्ती मानले असले तरी त्या सिद्धांताचा मुख्य घटक टिकून आहे. आपण कलाकृतीला वास्तवाचे अनुकरण मानले काय किंवा कलाकाराची अभिव्यक्ती मानले काय, आशयाचा विचार सर्वप्रथम करतो. आशय बदलला असेल, पूर्वीपेक्षा कमी लाक्षणिक, कमी सुबोध व कमी वास्तविक असेल. पण कलाकृती म्हणजे तिचा आशय असे अजूनही गृहीत धरले जाते आहे. किंवा, आजच्या भाषेत सांगायचे झाले तर, कलाकृती काहीतरी म्हणते. ("क्ष असं म्हणतोय की...", "क्ष असं म्हणण्याचा प्रयत्न करतोय की...", "क्षने असे म्हटले आहे की..." इत्यादी.)

ह्या साऱ्या सिद्धांतांचा उदय होण्याआधी कलेला स्वत:चे समर्थन करावे लागायचे नाही. त्या काळी कलाकृती काय म्हणते असे आपण विचारत नव्हतो कारण ती काय करते ते आपल्याला ठाऊक असे (किंवा ठाऊक आहे असे वाटे). तो निरागसपणा पुन्हा कधीही येणार नाही. ह्यापुढे जाणिवेच्या अंतापर्यंत कलेचा बचाव करत राहण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. आपण फक्त बचावाच्या साधनांबाबत वाद घालू शकतो. खरे तर, कलेच्या बचावाचे, समर्थनाचे जे जे साधन समजायला विशेष कठीण आहे किंवा सद्य:कालीन गरजा व आचरणांचा विचार न करणारे आहे त्याचा पाडाव करणे आपल्याला बंधनकारक आहे.
आशयाच्या संकल्पनेबाबत आज नेमकी तीच वेळ आलेली आहे. पूर्वी तिची उपयुक्तता काही असो, आज ती मुख्यत: एक अडथळा, एक उपद्रव आहे, सूक्ष्म किंवा स्थूल क्षुद्रव्यवहारवाद आहे. कलाकृती म्हणजे प्रामुख्याने तिचा आशय ह्या विचारापासून अनेक कलांमध्ये होत असलेली प्रगती आपल्याला दूर नेत असली तरी त्या कल्पनेचा पगडा आजही जबरदस्त आहे. माझ्या मते, कलेचा गांभीर्याने विचार करणाऱ्या बहुतेक लोकांमध्ये कलाकृतीस सामोरे जाण्याच्या विशिष्ट पद्धतीच्या रूपाने ती कल्पना आजतागायत टिकून आहे. आशयाला दिल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वामुळे अर्थनिर्णयनाचा कधीही पूर्ण न होणारा उपक्रम अटळ ठरतो. उलटपक्षी, अर्थनिर्णयन करण्यासाठीच कलाकृतींना सामोरे जाण्याच्या सवयीमुळे कलाकृतीला आशय असतो हा आभास टिकून राहतो.

अर्थात, ज्या बिनचूक अर्थाने नीत्शे म्हणतो, “सत्य असं काही नसतं, असतात ती फक्त अर्थनिर्णयनं" त्या व्यापक अर्थाने मला अर्थनिर्णयन म्हणायचे नाही आहे. मी हा शब्द, विशिष्ट संकेत स्पष्ट करणारी मनाची एखादी जाणीवपूर्ण कृती, अर्थनिर्णयनाचे विशिष्ट ‘नियम’, ह्या अर्थाने वापरला आहे. कलेच्या बाबतीत अर्थनिर्णयन म्हणजे एकसंध कलाकृतीतून तिच्या घटकांचा एक गट (क, ख, ग, घ इत्यादी) बाहेर काढणे. अर्थनिर्णयनाचे कार्य म्हणजे जवळ जवळ अनुवादच. अनुवादक म्हणतो, “बघा, दिसतंय ना, क म्हणजे खरं तर अ, ख खरं म्हणजे ब, ग म्हणजे क?”
हे कोणत्या परिस्थितीमुळे घडले? ह्याचे उत्तर इतिहास देतो. अर्थनिर्णयनाचा उदय ग्रेको-रोमन अभिजात युगाच्या उत्तरार्धात झाला. तोपर्यंत, वैज्ञानिक प्रगती व उद्बोधनामुळे, जगाकडे पाहण्याच्या ‘वास्तववादी’ दृष्टिकोनाचे आगमन झाले होते, व त्या दृष्टिकोनाने पुराकथांच्या शक्ती व विश्वासार्हतेवर मात केली होती. मिथकोत्तर जाणिवेला छळणारा धार्मिक प्रतीकांच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न एकदा मांडल्यावर प्राचीन संहिता त्यांच्या मूळ विशुद्ध रूपात स्वीकारार्ह राहिल्या नाहीत. मग ‘आधुनिक’ मागण्यांशी त्यांचा मेळ घालण्यासाठी अर्थनिर्णयनाला पाचारण करण्यात आले. अशा रीतीने समचित्ततावाद्यांनी देवांना नैतिक ठरवण्यासाठी होमरच्या महाकाव्यांमधील झिउस व त्याच्या उच्छृंखल गोतावळ्याच्या ग्राम्य गोष्टींचे रूपकीकरण केले. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार, होमरने झिउस व लेटोच्या व्यभिचारातून शक्ती व बुद्धीचे मीलन दाखवले आहे. अॅलेक्झॅन्ड्रियाच्या फायलोने अशाच प्रकारे हिब्रू बायबलमधील ऐतिहासिक कथांना शब्दश: न घेता त्यांना आध्यात्मिक कित्ते ठरवले. त्याच्या म्हणण्यानुसार, ज्यूंचे ईजिप्तमधून सामूहिक प्रस्थान, चाळीस वर्षे वाळवंटात वणवण, आणि देवाने कबूल केलेल्या देशात प्रवेश, हे आत्म्याची मुक्ती, क्लेश, व अंतिम मोक्ष ह्याचे रूपक आहे. ह्यावरून असे दिसते की संहितेचा स्पष्ट अर्थ आणि (नंतरच्या काळातील) वाचकांच्या गरजांतील तफावत हे अर्थनिर्णयनाचे गृहीतक आहे. अर्थनिर्णयन ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न करते. होते काय, की काही कारणास्तव एखादी संहिता आक्षेपार्ह झालेली असते; पण ती मौल्यवान असल्यामुळे टाकून देणेही शक्य नसते. अशा प्राचीन संहितेचे अर्थनिर्णयन करून ती जतन करता येते. अर्थनिर्णयनकार खाडाखोड न करता, पुनर्लेखन न करता, तिच्यात बदल करतो. पण तसे केल्याची कबुली तो देऊ शकत नाही. त्याऐवजी, तिचा खरा अर्थ विशद करून तिला सुगम केल्याचा दावा करतो. उघड उघड शृंगारिक असलेल्या 'सॉन्ग ऑफ सॉन्ग्स'चे ज्यू व ख्रिस्तींनी काढलेले ‘आध्यात्मिक’ अर्थ हे ह्याचे आणखी एक उदाहरण. अर्थनिर्णयनकारांनी संहिता कितीही बदलली तरी त्यांना तो अर्थ आधीपासून तिच्यात असल्याचा दावा करावा लागतो.
आपल्या काळात अर्थनिर्णयन अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे, कारण अर्थनिर्णयनाविषयीचा सद्यकालीन उत्साह हा अनेकदा, अडचणीत आणणार्‍या संहितांविषयी असणार्‍या भक्तिभावनेतून आलेला नसून उघड आक्रमकतेतून, जे दिसते त्याबद्दल प्रकट तुच्छतेतून आलेला असतो. (भक्तिभावनेआड कधी कधी आक्रमकता दडलेली असते) अर्थनिर्णयनाची जुनी रीत आग्रही असली तरी आदरयुक्त होती. ती शब्दार्थावर एक नवा अर्थ उभारायची. आधुनिक रीत मात्र अर्थासाठी उत्खनन करते, आणि तसे करता करता नष्ट करते. ती छुप्या खर्‍या अर्थासाठी संहितेच्या ‘पलीकडे’ खोदते. आधुनिक सिद्धांतांपैकी सर्वात प्रख्यात व मातब्बर आहेत मार्क्स व फ्रॉइड ह्यांचे. प्रत्यक्षात, ह्या दोन्ही अर्थनिर्णयनाच्या विस्तृत, आक्रमक आणि अश्रद्ध पद्धती आहेत. फ्रॉईडच्या शब्दांत, सर्व निरीक्षणक्षम घटना दृश्य आशयात गणता येतात. खरा अर्थ - दडलेला आशय - शोधण्यासाठी दृश्य आशयास बाजूला सारावे लागते. मार्क्ससाठी क्रांती व युद्धासारख्या सामाजिक घटना; फ्रॉईडसाठी व्यक्तिगत जीवनातील घटना (उदाहरणार्थ मनोविकाराची लक्षणे, वाक्प्रमाद) तसेच संहिता (उदाहरणार्थ स्वप्न किंवा कलाकृती) - सर्व अर्थनिर्णयनाला निमित्त आहेत. मार्क्स व फ्रॉईडनुसार ह्या सार्‍या घटना आकलनीय फक्त भासतात. प्रत्यक्षात अर्थनिर्णयनावाचून त्यांना अर्थ नाही. त्या समजून घेणे म्हणजेच अर्थनिर्णयन करणे; आणि अर्थनिर्णयन करणे म्हणजे त्या घटनेची पुनर्मांडणी करणे, तिला समतुल्य काहीतरी शोधणे.
अशा प्रकारे, अर्थनिर्णयन हे (बहुतेक लोक गृहीत धरतात त्याप्रमाणे) निरपेक्ष मूल्य नाही नि मनाची कालनिरपेक्ष कृतीही नाही. त्याचे मानवी जाणिवांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून मूल्यमापन व्हायला हवे. काहीएक सांस्कृतिक संदर्भात अर्थनिर्णयन मुक्तीचा मार्ग आहे. मृत इतिहासाचे पुनरीक्षण व पुनर्मूल्यांकन करण्याचे, त्यापासून सुटका करून घेण्याचे साधन आहे. अन्य सांस्कृतिक संदर्भात अर्थनिर्णयन प्रतिगामी, उच्छृंखल, भ्याड आणि कोंडमारा करणारे आहे.

आजच्या काळात अर्थनिर्णयन बहुतकरून प्रतिगामी आणि कोंडमारा करणारे आहे. जसा मोटारींचा व कारखान्यांचा धूर शहरी वातावरण प्रदूषित करतो तसेच कलेच्या अर्थनिर्णयनाचे भरते आपल्या जाणिवांत विष कालवते आहे. आधीच आजच्या संस्कृतीत ऊर्जा व इंद्रियनिष्ठ क्षमता कमी व बुद्धी अधिक; त्यात अर्थनिर्णयन हा बुद्धीने कलेवर उगवलेला सूड आहे.
इतकेच नव्हे, तर तो बुद्धीने जगावर उगवलेला सूड आहे. अर्थनिर्णयन करणे म्हणजे जगाला दरिद्री करणे, संकुचित करणे. आणि हे कशासाठी - तर 'अर्थां'चे एक भासमान जग निर्माण करण्यासाठी. जगाचे रूपांतर ह्या भासमान जगात करण्यासाठी. ("हे जग!" जणू काही दुसरे कोणते जग असते.) आपले जग आधीच बरेच संकुचित व दरिद्री आहे. जे आहे त्याचा अनुभव आधी घेऊ. तोवर ह्या प्रतिकृतींना दूर हटवा.

बहुतेक आधुनिक उदाहरणांत, अर्थनिर्णयन म्हणजे कलाकृतीची अरसिक मोडतोड. खर्‍या कलेत आपल्याला अस्वस्थ करण्याची क्षमता आहे. कलाकृतीला तिच्या आशयात संकुचित करून आणि मग तिचे अर्थनिर्णयन करून आपण तिला दीन करतो. अर्थनिर्णयन कलेला ताब्यात ठेवते, तिला अनुसरणशील बनवते.
इतर कोणत्याही कलेपेक्षा साहित्याच्या प्रांतात अर्थनिर्णयनाची ही अरसिकता अधिक रूढ आहे. गेल्या काही दशकांत साहित्य समीक्षकांनी असा समज करून घेतला आहे की आपले काम म्हणजे कवितेच्या / नाटकाच्या / कादंबरीच्या / कथेच्या घटकांचे दुसर्‍या कशात तरी रूपांतर करणे. कधी कधी एखादा लेखक आपल्या कलेच्या अनावृत्त ताकदीने इतका अस्वस्थ होतो की तो आपल्या लिखाणातच त्याचा उघड आणि सुस्पष्ट अर्थ मांडून ठेवतो - पण जरासा संकोचत, जराशा उपरोधाने. टॉमस मॅन अशा अती मदत करणार्‍या लेखकांपैकी एक आहे. पण आडमुठ्या लेखकांच्या बाबतीत समीक्षक हे काम करायला आनंदाने पुढे सरसावतात.
उदाहरणार्थ, काफ्काच्या लेखनावर अर्थनिर्णयनकारांच्या तीन फौजांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे. जे त्याचे लेखन सामाजिक रूपक समजून वाचतात त्यांना त्यात आधुनिक नोकरशाहीचे वैफल्य व वेड, आणि त्यातून शेवटी निर्माण होणारी झोटींगशाही दिसते. जे मनोविश्लेषणात्मक रूपक म्हणून वाचतात त्यांना त्यात काफ्काला आपल्या वडिलांची वाटत असणारी भीती, त्याचा खच्चीकरण गंड, नपुंसकत्वाची जाणीव, स्वप्नांचा त्याच्यावरील पगडा दिसतात. जे धार्मिक रूपक म्हणून वाचतात त्यांच्या मते द कासलमध्ये के स्वर्गारोहणाच्या प्रयत्नात आहे, द ट्रायलमध्ये जोसेफ के देवाच्या अटळ व गूढ न्यायाला सामोरा जातो आहे.... सॅम्यूएल बेकेटच्या लेखनासही अर्थनिर्णयनकार जळवांप्रमाणे चिकटले आहेत. बेकेटची नि:शब्द जाणिवांची नाजूक, सारभूत, प्रवाहापासून वेगळी, अचल नाटके ही आधुनिक मानवाच्या अर्थापासून किंवा देवापासून दुराव्याविषयी वक्तव्य म्हणून, किंवा मनोविकृतीशास्त्राची रूपके म्हणून वाचली जातात.
प्रूस्त, जॉइस, फॉकनर, रिल्के, लॉरेन्स, जीद... ज्यांच्यावर अर्थनिर्णयनाची पुटे चढली आहेत अशा लेखकांची यादी बरीच लांबवता येईल. परंतु अर्थनिर्णयन फक्त सुमारांनी प्रतिभावंतांचा केलेला गौरव नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे. एखादी गोष्ट समजून घेण्याची ती आधुनिक रीत आहे, आणि ती कोणत्याही गुणवत्तेच्या कलाकृतीसाठी वापरण्यात येते. अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर हे नाटक एलिया काझान ह्यांनी दिग्दर्शित केले. त्यावरील आपली टिपणे त्यांनी प्रकाशित केली. त्या टिपणांवरून स्पष्ट आहे की काझानसाठी स्टॅन्ली कोवाल्स्की हा आपल्या संस्कृतीस ग्रासणार्‍या विषयासक्त व खुनशी रानटीपणाचे प्रतीक आहे, तर ब्लान्च द्यूब्वा, काव्य, तलम वसने, मंद प्रकाश, परिष्कृत भावना इत्यांदींनी संपृक्त परंतु काहीशा दु:स्थितीतील पाश्चात्त्य संस्कृतीची. टेनेस्सी विलियम्सचा जोशपूर्ण मानसशास्त्रीय मेलोड्रामा आता कळू लागला : तो पाश्चात्त्य संस्कृतीच्या र्‍हासाविषयी होता. जणू काही वरवर दिसतो तसा तो स्टॅन्ले कोवाल्स्कीनामक देखण्या नरपशू व ब्लान्च द्यूब्वानामक म्लान, अस्वच्छ रूपवतीविषयी असता तर त्यावर नियंत्रण ठेवता आले नसते.

अर्थनिर्णयनासाठी कलाकाराचा हेतू काय होता किंवा नव्हता हे महत्त्वाचे नाही. कदाचित टेनेस्सी विलिय्म्सला असे वाटतही असेल की स्ट्रीटकारचा काझानने लावलेला अर्थ बरोबर आहे. कदाचित द ब्लड ऑफ अ पोएट आणि ऑर्फियस ह्या चित्रपटांना दिलेली गुंतागुंतीची फ्रॉइडीय प्रतीकात्मता व सामाजिक समालोचना कोक्तोला हवी असावी. पण ह्या कलाकृतींची गुणवत्ता त्यांच्या 'अर्थां'त नाही, अन्यत्र आहे. किंबहुना विलियम्सची नाटके व कोक्तोचे चित्रपट जितपत असे गंभीर अर्थ सुचवतात तितपत ते सदोष, खोटे, कृत्रिम आणि स्वत:बद्दल खात्री नसलेले आहेत.
रेने व रोब-ग्रिये ह्यांनी दिलेल्या मुलाखतींतून असे दिसून येते की त्यांनी जाणूनबुजून लास्ट यर अॅट मारिएनबाद हा चित्रपट असा बनवला की त्यातून अनेक विश्वासार्ह अर्थ काढता येऊ शकतील. पण मारिएनबादचा अर्थ शोधण्याचा मोह टाळायला हवा. मारिएनबादमध्ये महत्त्वाचे आहे त्यातील काही दृश्यांची शुद्ध, अभाषांतरक्षम, ऐंद्रिय तात्कालिकता, व चित्रपटाच्या आकृतिबंधासंबंधी काही समस्यांवर त्याने दिलेली काटेकोर पण मर्यादित उत्तरे.
तसेच, द सायलेन्समधील रिकाम्या रस्त्यावरून रात्री जाणारा रणगाडा इन्गमार बर्गमनने लिंग-प्रतीक म्हणून वापरलाही असेल. परंतु त्याने तसे केले असल्यास तो मूर्खपणा होता. ("गोष्ट सांगणार्‍यावर कधीही विश्वास ठेवू नका, गोष्टीवर विश्वास ठेवा." - डी.एच. लॉरेन्स) एक शक्तिशाली वस्तू म्हणून, हॉटेलात अकस्मात घडणार्‍या रहस्यमय घटनांची तात्कालिक ऐंद्रिय समतुल्य घटना म्हणून रणगाड्याचे ते दृश्य चित्रपटातील सर्वात परिणामकारक आहे. जे रणगाड्यात काही खोल फ्रॉइडीय अर्थ शोधतात ते पडद्यावर जे दिसते आहे त्यास प्रतिसाद देण्यास आपली असमर्थता तेवढी दाखवतात.
अशा प्रकारचे अर्थनिर्णयन नेहमी कलाकृतीविषयी (सबोध किंवा अबोध) असमाधान, व तिच्या जागी दुसरे काहीतरी योजण्याची इच्छा दर्शवते.
कलाकृती ही आशयाच्या घटकांनी बनलेली असते ह्या शंकास्पद सिद्धांतावर आधारित अर्थनिर्णयन कलेचा भंग करते. तिला आपल्या मनातील संघटनेत व्यवस्थित बसवण्यासाठी, वापर करण्यासाठी एक वस्तू बनवते.

अर्थात, अर्थनिर्णयनाची दर वेळी सरशी होतेच असे नाही. किंबहुना, सध्याची बरीच कला निर्णयनापासून दूर पळाली आहे असे म्हणता येईल. निर्णयन टाळण्याकरता कला कधी विडंबन बनते, कधी अमूर्त बनते, कधी 'केवळ' सजावटी बनते, अगदी न-कलाही बनते.
अर्थनिर्णयनापासून पलायन हे खासकरून आधुनिक चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे. अमूर्त चित्रकला ही सर्वसामान्य अर्थाने चित्रास आशय नसण्याचा प्रयत्न आहे; आशयच नाही म्हटल्यावर अर्थनिर्णयन नाही. लोकप्रिय कला हेच उद्दिष्ट अगदी विरुद्ध मार्गाने गाठते; तिचा आशय इतका उघड, इतका स्पष्ट असतो की अर्थनिर्णयनाला वावच नसतो.
बरेच आधुनिक काव्यही निर्णयनाच्या खरखरीत मिठीतून निसटले आहे. ह्याची सुरुवात फ्रेंच कवितेत (ह्यात प्रतीकवाद हे दिशाभूल करणारे नाव असलेली चळवळही आली) नीरवता अंतर्भूत करण्याच्या आणि शब्दांची जादू पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांपासून झाली. अलीकडच्या काळात कवितेच्या अभिरुचीत घडलेली क्रांती म्हणजे एलियटला पदच्युत करून त्याची जागा पाउन्डला देणे. ही क्रांती म्हणजे कवितेच्या आशयाकडे पाठ फिरवणे, ज्या गोष्टीमुळे आधुनिक कविता अर्थनिर्णयनकारांना बळी पडली तिच्याविषयी चीड.
अर्थात, मी मुख्यत: अमेरिकेतील परिस्थितीबाबत बोलते आहे. इथे ज्या कलांमध्ये आव्हॉं-गार्डिझम (नवे विचार) क्षीण व अत्यल्प आहेत - कथावाङ्मय व नाटक - तिथे अर्थनिर्णयन बेलगाम उधळले आहे. बहुतेक अमेरिकी कादंबरीकार व नाटककार प्रत्यक्षात एक तर पत्रकार आहेत किंवा उच्च सामाजिक वर्गातील समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचे लिखाण म्हणजे वर्णनपर संगीताचे साहित्यिक रूप. आकृतिबंधातून कथावाङ्मयात व नाटकात काय साधले जाऊ शकते ह्याची जाणीव इतकी प्राथमिक, अनुत्स्फूर्त, आणि कुंठित आहे की त्यातील आशय (माहिती किंवा बातमी नसला तरीही) विचित्रपणे दृश्य, सोयीस्कर, व असुरक्षितपणे उघड असतो. काव्य, चित्रकला व संगीताप्रमाणे आकृतिबंधात बदल करण्यात अमेरिकी कादंबर्‍या व नाटके रुची दाखवत नसल्यामुळे त्यांच्यावर अर्थनिर्णयनाचे हल्ले जास्त होत राहिले.
योजनाबद्ध आव्हॉं-गार्डिझममध्ये बहुतकरून केवळ आकृतिबंधाचे प्रयोग केले गेले आहेत. पण कलेच्या प्रांतातील निर्णयनाच्या सुळसुळाटावर हाच एकमेव तोडगा नाही. निदान मी तशी आशा करते आहे. कारण तसे असेल तर एक तर कलेला पळता भुई थोडी होईल, आणि दुसरे म्हणजे आकृतिबंध व आशयातील खोटे द्वैत कायम राहील. आदर्श परिस्थितीत, निर्दोष, एकसंध, संवेगपूर्ण व थेट कलाकृती बनवून अर्थनिर्णयनकारांना टाळता येऊ शकते. अशी कलाकृती जशी दिसते तशीच असेल. पण हे आता शक्य आहे का? मला वाटते, चित्रपटात असे होते. त्यामुळेच सध्या चित्रपट सर्वात जिवंत, सर्वात रोमहर्षक, आणि सर्वात महत्त्वाचा कलाप्रकार आहे. एखादा कलाप्रकार किती जिवंत आहे हे, तो चुका करण्यास किती मोकळीक देतो अन्‌ तरी दर्जेदार होतो, ह्यावरून समजते. उदाहरणार्थ, बर्गमनच्या काही चित्रपटांत आधुनिक जाणिवांबद्दल कमकुवत, अविश्वसनीय संदेश ठासून भरलेले असूनही ते दिग्दर्शकाच्या दिखाऊपणावर मात करतात. विन्टर लाइटद सायलेन्समधील दृश्यांचे सौंदर्य व अत्याधुनिकता आपल्या डोळ्यादेखत कथेचा व संवादांचा खोटा बुद्धिवाद उलथून पाडतात. (अशा स्वरूपांच्या विसंगतीचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे डि. डब्ल्यू. ग्रिफिथ ह्यांचे चित्रपट.) चांगल्या चित्रपटांत एक थेटपणा असतो जो आपल्याला अर्थनिर्णयन करण्याच्या खुमखुमीपासून दूर ठेवतो. क्यूकर, वॉल्श, हॉक्स इत्यादी कैक दिग्दर्शकांच्या जुन्या हॉलिवुड चित्रपटांत हा सांकेतिकताविरोधी गुण आहे. नव्या युरोपीय दिग्दर्शकांच्या चित्रपटांतही तो दिसतो. उदारहरणार्थ, त्रूफोचे शूट द पियानो प्लेयर व जूल्स ऍन्ड जिम, गोदारचे ब्रेथलेस व विव्र सा वी, अॅन्टोनियोनीचा ल'अॅवेन्चुरा, आणि ऑल्मीचा द फियान्सेस.
चित्रपटांना अर्थनिर्णयनकारांनी पादाक्रांत केलेले नाही ह्याचे एक कारण आहे कलाप्रकार म्हणून चित्रपटांचे नावीन्य. आणखी एक कारण हेही आहे की बराच काळ चित्रपटांकडे फक्त चित्रपट म्ह्णूनच पाहिले जायचे; ते जनसामान्यांच्या संस्कृतीचा भाग होते, उच्चभ्रूंच्या नव्हे. विचारवंत त्यांच्या वाटेला जात नसत. दुसरी गोष्ट अशी की विश्लेषण करायचेच झाले, तर चित्रपटांत आशयाव्यतिरिक्त इतर गोष्टीही आहेत. चित्रपटांच्या आकृतिबंधाचीही एक भाषा आहे, जी कादंबर्‍यांना नसते - कॅमेर्‍याच्या हालचालीचे स्पष्ट, गुंतागुंतीचे व चर्चा करण्याजोगे तंत्रज्ञान, चित्रफीत कापणे, चित्रचौकटीची रचना.

आजच्या काळात कलेबाबत कोणत्या स्वरूपाची समीक्षा, समालोचन इष्ट आहे? मी असे म्हणत नाही की कलाकृती शब्दातीत असतात, त्यांचे वर्णन करणे शक्य नाही, किंवा त्यांचा अर्थानुवाद करणे शक्य नाही. शक्य आहे. प्रश्न हा आहे की कसे? कलाकृतीची जागा हिरावून न घेणारी, तिला उपयुक्त ठरणारी समीक्षा कशी असेल?
सर्वप्रथम, कलेच्या आकृतिबंधाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. आशयावर अतिरिक्त भर दिल्याने मुजोर झालेल्या अर्थनिर्णयनाला, आकृतिबंधां*च्या विस्तृत व इत्थंभूत वर्णनांनी गप्प करता येईल. गरज आहे आकृतिबंधासाठी शब्दसंग्रहाची. अन्‌ हा शब्दसंग्रह नियामक नव्हे तर वर्णनात्मक हवा. उत्तम समीक्षा आशयासंबंधीचे विचार आकृतिबंधाविषयीच्या विचारांमध्ये मिसळून टाकते. अशी समीक्षा विरळा. चित्रपट, नाटक, आणि चित्रकला ह्याविषयी मला आठवतात अनुक्रमे अर्विन पॅनॉफ्स्कीचा निबंध, ‘स्टाइल अॅन्ड मिडियम इन द मोशन पिक्चर्स’, नॉर्थ्रॉप फ्रायचा निबंध, ‘अ कन्स्पेक्टस ऑफ ड्रामॅटिक जॉन्रस्‌’, आणि पियेर फ्रॅन्कास्टेलचा निबंध, ‘द दिस्ट्रक्शन ऑफ अ प्लास्टिक स्पेस’. रोलॉं बार्थचे पुस्तक ऑन रासिन व रोब-ग्रियेवर त्याचे दोन निबंध ही एका लेखकाच्या लिखाणाच्या रूपनिष्ठ विश्लेषणाची उदाहरणे आहेत. (एरिक ऑअरबॅकच्यामायमेसिसमधील ‘द स्कार ऑफ ओडिस्सियस’सारखे उत्तम निबंधही ह्याच प्रकारात मोडतात.) वॉल्टर बेन्जॅमिनचा "द स्टोरी टेलर : रिफ्लेक्शन्स ऑन द वर्कस्‌ ऑफ निकोलाय लेस्कोव" हा निबंध जॉन्र व लेखक ह्यांच्या एकाच वेळी केलेल्या रूपनिष्ठ विश्लेषणाचे उदाहरण आहे.
एखाद्या कलाकृतीच्या स्वरूपाचे खरोखर काटेकोर, टोकदार आणि वत्सल वर्णन करणारी समीक्षा ही अतिशय मौल्यवान ठरेल. पण हे रूपनिष्ठ विश्लेषणाहूनही अवघड दिसत आहे. मॅनी फार्बरची काही चित्रपट परीक्षणे, डॉरोथी वॅन घेन्टचा ‘द डिकन्स वर्ल्ड: अ व्यू फ्रॉम टॉगर्स्’ हा निबंध, वॉल्ट व्हिटमनवरील रॅन्डल जॅरेटचा निबंध हे त्याचे काही दुर्मीळ मासले आहेत. हे निबंध कलेची इंद्रियसंवेद्यता उघड करतात पण तीत अडकून पडत नाहीत.

आज कलेत - आणि समीक्षेत - पारदर्शकता हा सर्वात मोठा गुण आहे. पारदर्शकता म्हणजे त्या वस्तूची दीप्ती मूळस्वरूपात अनुभवता येणे, वस्तू आहेत तशा असणे. हे ब्रेस्सॉं व ओझूच्या चित्रपटांचे, रन्वारच्या द रूल्स ऑफ द गेमचे माहात्म्य आहे.
कोणे एके काळी (उदाहरणार्थ डान्टेसाठी) कलाकृती अनेक पातळ्यांवर अनुभवता याव्यात अशा प्रकारे त्यांची आखणी करणे हे क्रांतिकारी व कल्पक असावे. आता तसे नाही. आता अशी आखणी अतिरिक्ततेच्या तत्त्वास बळकटी देते, आणि ही आधुनिक जीवनातील मुख्य पीडा आहे.
कोणे एके काळी (जेव्हा दर्जेदार कला दुर्मीळ होती) तेव्हा अर्थनिर्णयन क्रांतिकारी व कल्पक असावे. आता तसे नाही. कलेस विचारात किंवा संस्कृतीत आता आणखी आत्मसात करण्याची गरज नाही हे निश्चित.
अर्थनिर्णयन कलेचा ऐंद्रिय अनुभव गृहीत धरते, व तिथून पुढे जाते. आज ही गोष्ट गृहीत धरता येण्यासारखी नाही. आज आपल्यापैकी प्रत्येकाला उपलब्ध असलेल्या कलाकृतींची संख्या किती वाढली आहे ह्याचा विचार करा. त्याउपर, शहरी जीवनातील परस्परविरोधी स्वाद, गंध आणि दृश्यांचा आपल्या इंद्रियांवर भडिमार होत असतो. आपली संस्कृती अतिरेकावर आणि अत्युत्पादनावर आधारित आहे. परिणामी आपल्या ऐंद्रिय अनुभवांची तीव्रता अव्याहतपणे घटत चालली आहे. आधुनिक जीवनातील भौतिक वैपुल्य, गर्दी इत्यादी आपल्या ऐंद्रिय शक्तींना क्षीण बनवतात. आणि समीक्षकाच्या कार्याचे मूल्यमापन आपल्या इंद्रियांची अवस्था व आपल्या क्षमता विचारात घेऊन करायला हवे, गतकाळातील लोकांच्या नव्हे.
आज आपली इंद्रिये परत मिळवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला अधिक पाहायला, अधिक ऐकायला, अधिक संवेदनशील व्हायला शिकायला हवे.
आपले काम कलाकृतीतून जास्तीत जास्त आशय शोधून काढणे हे नाही, तिच्यात आहे त्याहून जास्त आशय जबरदस्तीने पिळून काढणे तर नाहीच नाही. आपले काम आहे आशय कमी करणे, जेणेकरून आपण कलाकृती पाहू तरी शकू.
कलेच्या समालोचनाचे उद्दिष्ट आता कलाकृतींना, व तदनुषंगाने आपल्या अनुभवांना, अधिक अस्सल बनवणे हे असायला हवे. समीक्षेचे कार्य जे आहे ते तसे कसे आहे, अगदी जे आहे ते आहे हे दाखवण्याचे असायला हवे, त्याचा अर्थ काय हे सांगण्याचे नाही.

१०

निर्णयनशास्त्राऐवजी आपल्याला कलेच्या शृंगारशास्त्राची गरज आहे.
[१९६४]
* ह्यातील एक अडचण अशी आहे की आपली आकृतिबंधाची कल्पना अवकाशिक आहे (आकृतिबंधाची सारी ग्रीक रूपके अवकाशाच्या कल्पनेवरून घेतलेली आहेत). म्हणून आपल्याकडे अवकाशिक कलांपेक्षा कालिक कलांच्या वर्णनासाठी जास्त शब्द आहेत. कालिक कलांमध्ये नाट्यकला मात्र ह्याला अपवाद आहे. कदाचित नाटक हा दृश्य व चित्रमय पद्धतीने रंगमंचावर पसरत जाणारा कथात्मक कलाप्रकार आहे म्हणून असे असेल... अद्याप आपल्याकडे कादंबरीचे साहित्यशास्त्र नाही, कथनाच्या आकृतिबंधांविषयी सुस्पष्ट कल्पना नाहीत. कदाचित चित्रपटसमीक्षेच्या निमित्ताने ह्यात काही महत्त्वाची प्रगती होईल, कारण चित्रपट हे प्रामुख्याने दृश्य माध्यम असले, तरी ते साहित्याचा पोटविभागही आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काही आडाखे तपासुन मिळाले.
मुख्य कलानिर्मीतीकाराची भूमीका बघणे त्या व्यक्तीचे अर्थनिर्णयन असल्यास महत्वाचे.
तसेच सध्या कलेचा आस्वाद ह्याला प्राधान्य मग अर्थाला हा सूर जाणवला. पटतोही.

'तेरे दो टकियेकी नोकरी मे मेरा लाखोंका सावन जायें रे' ओळीला असलेली झळाळी जाणवली...

पुन्हा एकदा सवडीने रवंथ केले पाहीजे...

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाग ५, ओळ ४ इथे चुकून "अनावृत्त" असा टंकलेला शब्द कृपया 'अनावृत' असा वाचावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

अप्रतिम , लाजवाब , क्या बात है !
- काफ्का च्या साहित्यावर तीन फौजा बलात्कार करताहेत - कमाल !
मागे अनेक वर्षांपूर्वी काफ्का च्या काही लघु कथांचे संकलन करून (मूळ जर्मन मधेच) नाटक केले होते (दिग्द: मंजिरी परांजपे), त्यावेळी काफ्का वाचून असे वाटत होते , कि हा खरे तर हातात येणारा लेखक नाही, आपण उगाच त्याच्यावर आपल्या परीने काही पुटे चढवतो आहोत , अर्थात नटाला हे असे काही बोलण्याचे फारसे स्वातंत्र्य असत नाही! असो, बेकेट च्या नाटकांचे प्रयोग पाहतानाही त्यातली तरल , सूक्ष्म स्पंदने , जी कुठल्याही अर्थनिर्णयनाच्या पलीकडली आहेत , तुम्हाला भिडत राहतात आणि एक गहिरा नाट्यानुभव कि काय तो देतात Smile

जियो मिलिंद, फार छान लेख आणि फार सुरेख भाषांतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

सगळे झेपले नाही पण पोचले ते आवडले Smile
आता दुवे बघतो आणि पुन्हा वाचतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

द कूनिंगच्या उद्धृतातलं encounter गाळलं आहे आणि वाइल्डच्या उद्धृतातल्या mystery of the world मधलं world गाळलं आहे. त्याचं कारण समजलं नाही.

>> कलेला काही मोल असण्याविषयी शंका व्यक्त करण्यासाठीच प्लॅटोने आनुकृतिक सिद्धांत मांडला असावा. <<

'in order to rule that the value of art is dubious' ह्यात जो rule येतो त्याचा अर्थ निव्वळ 'व्यक्त करणे' असा नाही. मी त्याचा अर्थ 'To decide or declare authoritatively or judicially; decree.' असा घेतला.

>> (पलंगाच्या चित्रावर झोपता येत नाही, आणि, काटेकोरपणे पाहिले, तर ते चित्र वास्तवही नसते.) <<

'काटेकोरपणे पाहता वास्तव नसणं' हे मूळ निबंधात कंसाबाहेरच्या वाक्याशी जोडून आहे - म्हणजे 'कलेचा फारसा काही उपयोग नसतो' ह्याच्याशी जोडून. म्हणजे ते विधान कलेबद्दल आहे. ते कंसात घेऊन पलंगाच्या चित्राबद्दल करण्याची गरज कळली नाही.

>> अॅरिस्टॉटलने कलेचा पक्ष मांडला असला तरी कला ही नजरभूल आहे, व त्यामुळे असत्य आहे हे प्लॅटोचे म्हणणे तो खोडून काढू शकला नाही <<

Aristotle's arguments do not really challenge Plato's view असं मूळ असताना 'शकला नाही' हे का वापरलं आहे ते कळलं नाही. मूळ वाक्यात अॅरिस्टॉटलनं ते केलं नाही एवढंच आहे. ते त्याला शक्य नव्हतं हे अर्थनिर्णयन भाषांतरानं केलेलं आहे. त्याची इथे गरज वाटत नाही.

>> कला ही अपरिहार्यपणे 'वास्तवता' आहे ही चुकीची कल्पना, ह्या सिद्धांताने निर्माण केलेल्या अडचणींच्या मर्यादेत राहूनही रद्द करता येते किंवा तिच्यात फेरबदल करता येतात. <<

'realism'चं भाषांतर 'वास्तववाद' न करता 'वास्तवता' का केलं ते कळलं नाही. मूळ वाक्यातल्या 'moving outside the problems delimited by mimetic theory' मधला 'प्रॉब्लेम' ही 'अडचण' नाही आहे. विज्ञान किंवा तत्त्वज्ञानात आपल्याला कोणत्या प्रश्नाची उकल करायची आहे त्याची चौकट आधी आखून घेतली जाते, आणि मग त्या आधारे पुढची मांडणी केली जाते. इथे हे आखून घेणं अभिप्रेत आहे. 'अडचण' म्हटल्यामुळे त्याला वेगळाच अर्थ येतो.

>> आपण कलाकृतीला वास्तवाचे अनुकरण मानले काय किंवा कलाकाराची अभिव्यक्ती मानले काय, आशयाचा विचार सर्वप्रथम करतो. <<

'वास्तवाचे अनुकरण'मध्ये 'on the model of a picture' आणि 'कलाकाराची अभिव्यक्ती'मध्ये 'on the model of a statement' का गाळलं आहे ते कळलं नाही. ही दोन कलेची प्रारूपं आहेत हे येणं आवश्यक आहे.

असो. तूर्त इथेच थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा भाषांतरित निबंध आवडला. भाषांतर काही जागी अनोळखी मराठी शब्द आल्याने थोडे अवघड वाटले पण आवडले- आता तरी या शब्दांची ओळख झाली ! निबंध सुरुवातीला जरा कठीण गेला वाचायला- मूळच्याच निबंधात सुरुवात काहीशी संदर्भ मनात तयार नसलेल्या वाचकासाठी अवघड आहे असे वाटले. पुढे भाषांतरही ओघवते झाले आहे आणि निबंधही रोचक होत गेला आहे.

'अर्थनिर्णयन' हा शब्द आधी ऐकल्यासारखा वाटला नाही...त्यासाठी मराठीत आणखीन एखादा प्रचलित शब्द आहे का?
का माहित नाही पण 'इंटरप्रिटेशन' या इंग्रजी शब्दासाठी 'अर्थनिर्णयन' हा शब्द चपखल वाटत नाही- केवळ तो शब्द वापरायची सवय नसल्यानेही असेल कदाचित. 'अर्थ' हा शब्द 'अर्थसंकल्प' वगैरे सारख्या शब्दात असल्याने 'अर्थनिर्णयन' हे वाचून वित्त-अर्थ अशा विषयाशी निगडित लेख असेल असे वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0