प्रिय

प्रिय

लेखक - श्रीरंजन आवटे

प्रिय,

हल्ली पत्रे पोहोचत नाहीत तू पाठवलेली... योग्य त्या पत्त्यावर पाठवतेस का? की माझाच पत्ता बदललाय? कदाचित मी इतक्या दूर आलो आहे की, इथे संवाद साधण्याची सारी माध्यमे बंद पडलीत! तरीही व्यक्तण्याची धडपड सुरूच आहे माझी. तू पत्र पाठवतेस अशी अटकळ बांधून मी चाललोय. पत्र पाठवण्याची तुझी औपचारिक तळमळ कळते मला तुझ्या डोळ्यांत पाहून; पण सारा आशय आकळत नाही. पोस्टमनलादेखील सापडत नसावा माझा पत्ता. तुझी कुठे चूक आहे सारी? मी लिहिल्यावर तू उत्तर द्यावेस असे बंधन नाहीच मुळी. प्रतिक्रिया देण्याचे निर्बंध तुला नाहीत, पण तरीही तू लिहिलेस. अलिखित शिष्टाचारांचे संकेत 'इन बिल्ट' असतात ना गं. त्यातून लिहिले असशील कदाचित, पण मला पोहोचलेच नाही ते. तू पाठवलेस, एवढेच कळले फक्त. प्रेषकावरून आशयाचा अंदाज वर्तवावा इतका निष्णात नाही झालो मी अजून, त्यामुळे उत्सुकता राहतेच - काय असेल पत्रात... दोन आवंढ्यांमधील विस्तीर्ण अवकाश सफोकेट करते गं. त्यामुळे भीती वाटते की, चुकून नेमकी तीच फाइल ओपन केलेली असायचीस तू... अवघडलेली अवस्था होईल माझी. डोळ्यांशी डोळे भिडवून नाही बोलता येणार मला. सकारण तार्किक उत्तरे देता येणार नाहीत मला माझ्या या भयाण नाजूक अवस्थेची. तुला ती हवी आहेत हे जाणतो मी; पण नेमके हेच नाही ना सांगता येत मला. तेव्हा बाकी बडबडीला खरेच अर्थ नाही. फुका आहे ती; पण परीघावरून फिरतानाच केंद्राची एवढी प्रखर तप्त नजर फिरते माझ्यावरून, की मी गर्भगळित होतो. त्रिज्येवरून चालत जात आत-आत जाण्याचे धाडस नाही ना माझ्यात. फेकला गेलो म्हणजे पोळून निघेन ना मी. खाक होईन मी माझ्या इवल्याशा लिंगासकट. त्या कल्पनेनेच मी थांबतो इथे. जात नाही आत. सेंट्रीफ्युगल फोर्सने ड्राइव्ह झालो मी, तर सारी संदर्भचौकट बदलेल आणि मला इथेच थांबायचे आहे. पण ते अशक्य आहे. पुढे जाणे अटळ आहे. म्हणजे ही चौकटदेखील बदलणे अपरिहार्य, पण पचतच नाही मनाला. म्हणून माझा हट्ट असतो तुझ्या पदराला धरून. तू किती धीरोदात्तपणे चालतेस याचे कौतुक आणि असूया वाटल्याशिवाय राहत नाही. शेवटी मीही माणूसच ना गं? अनावर होतात सारे प्रवाह, पण मिसळत नाहीत तुझ्यात. तेलाच्या तवंगासारखे राहतात वरच्यावर. तरंगताना आपण कुणाचेच नसतो ना? ना जमिनीचे ना आकाशाचे! पाणी तर केवळ डेस्कटॉपवरील बॅक्ग्राउण्ड्सारखे भासते. असतेपण आणि नसतेपण! आभासी कोण हे कळत नाही गं. वाटते, कळावे हा अट्टाहास तरी कशाला? व्याख्यांकित करण्याची धडपड कशाला? डोमेन निर्धारित केला की कुंपण तयार होते, नाही का? निकष ठरवले की तुलना करणे क्रमप्राप्त. मापदंड आले की मोजणे आले आणि मोजणे आले की तोलणे. त्यातून मग डिसकार्ड होण्याची शक्यता. पुन्हा मी घाबरतो इथे. सामोरे जात नाही ना... रिस्क इन नॉट टेकिंग रिस्क...! तर असे मला भयगंडाने पछाडले आहे, तिथे तुझ्या या पत्राने कुतूहलपूर्ण भीती दाटून आली. वाटले की, ही असेल फॉर्मल नोटीस - रुम सोडण्याची किंवा असेल इंटिमेशन भाडेवाढीचे. थोड्या अवधीत ध्यानात आले की, तू मालक नाहीस तर कशाला करशील असे? अर्थात मालक असणे ही पूर्वअट नसते!

पुन्हा विचार करू लागलो.
वाटले, कदाचित तूच चालली असशील हे घर सोडून; कदाचित हे गावही…
किंवा तू संपली असशील…
किंवा तू माझ्या एक्सपायरी डेटबद्दल कळवली असशील गोपनीय माहिती.
अशी तर्क-वितर्कांची घुसळण अंतर्बाह्य ढवळून काढते मला. हेदेखील थांबवता येत नाही.

... पण तरीही तू पत्र पाठवलेस, म्हणजे तुला माझ्याशी संवाद साधावासा वाटला, हे मला महत्त्वाचे वाटते. कदाचित तू सुचवले असशील काही बदल किंवा सुधारणा माझ्यात तुला हव्याहव्याश्या वाटणार्‍या. ह्यातही, माझ्यात बदल होईल ह्या तुझ्या आशेमुळे मी आनंदित होतो. मला हे सुरेख भ्रमजाल तोडावेसे वाटत नाही. आपल्या स्वतःच्या कल्पना-भरारीने निर्मिलेले विश्व किती मनोहर असते ना? अश्या विश्वात इतरांनाही आमंत्रित करावे. कशाला वास्तवाच्या विस्तवापाशी जायचे? हा पलायनवाद नाही. खरेतर फक्त माझी इच्छा नाही आता. स्वनिर्मित विश्वात रममाण व्हावेसे वाटणे हे अन्कम्फर्ट झोनमध्ये कम्पॅटिबल होता येत नसल्याचे लक्षण आहे. अर्थात, मला ते मान्यच आहे. कबुली द्यायलाच हवी. स्वीकारायला तर हवेच. तर आणि तरच जाता येईल पुढे. पण म्हणजे काय करावे मी? पुढे म्हणजे कुठे? धारणांची एकच एक अशी नियमावली रूढ असते, म्हणून आपण इतके ढोबळ शब्द वापरूनही सर्वसाधारणपणे कॉमन आशय-प्रतलावर असतो, पण माझे असे नाही. म्हणूनच तुझे पत्र मला नवे काही सांगेल, मला नवा अवकाश देईल किंवा आगळे-वेगळे क्षितिज दाखवेल, असे वाटत असल्याने हुरहूर लागून राहिली आहे. त्यात पुन्हा तुझ्या अनाकलनीय लिपीने मी पूर्णतः गोंधळून जातो. लिप्यंतर करण्याचा प्रयत्न करतो, पण लिप्यंतर होइस्तो आशयाचे अपहरण होईल की काय, ही शंका कुरतडून टाकते. पार भुगा करते माझा. पण खरे सांगायचे तर मला वाटत राहते, तुला जे सांगायचे आहे, ते तू लिहिलेले नसशीलच पत्रात. मग उर्वरित आशय कुठे वाचायचा? क्रमशः वाचत राहावे अशी तुझी मालिका नाही. त्यासाठी एक कालसुसंगत सूत्रबद्ध धागा लागतो, तो तर केव्हाच हरवलाय. त्यामुळे न लिहिलेले कसे वाचावे? अलगदपणे लपवलेले कसे पाहावे? त्यात तू डोळे मिटलेले... मिटलेल्या डोळ्यांत लपवलेली ओली अक्षरओळ मला कशी कळेल?

तू सांगशील का?

तुझाच,
………………!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

तरल.. अवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!