उमगत असणारे वसंत पळशीकर
उमगत असणारे वसंत पळशीकर
लेखिका - Dr. Medini Dingre
ज्येष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ता असा अपवादात्मक संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वात झाला आहे अशा वसंत पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपट बनवण्याचं काम सध्या चालू आहे. या कामात सिंहाचा वाटा उचलणार्या डॉ. मेदिनी डिंगरे यांच्या, या कामादरम्यानच्या दिवसांमधे लिहिलेल्या अनुदिनीची ही काही पानं.
पार्श्वभूमी
एक प्रश्न: सध्या काय चाललंय?
माझं उत्तर: 'अवकाश निर्मिती' या संस्थेतर्फे वसंत पळशीकर यांच्यावर माहितीपट बनवायचाय. त्याच्या तयारीत आहे.
विविध प्रतिक्रिया:
हो का?...
अरे वा! राज्यशास्त्रवाले ना? मोठं काम आहे त्यांचं!
कोण पळशीकर?
सिनेमातल्या पळशीकरांचे कोण?
आयडियाच भन्नाट आहे. आपण करू.
हे काम आधीच व्हायला पाहिजे होतं.
पण त्यांचं काम नुसतं वैचारिकच आहे. कृतिशील नाही.
हे कसं काय सुचलं?
तुम्ही एखादा कमर्शियल प्रोजेक्ट कधी करणार?
"ज्यांच्याबरोबर एक तास गेला की जगण्याची एक वेगळीच दिशा प्रतीत होते", असं नेमाडे ज्यांच्याविषयी म्हणाले ते हे वसंत पळशीकर आहेत. महाराष्ट्र त्यांना विचारवंत म्हणून ओळखतो. पण हे संबोधन फार अघळपघळ आणि संदिग्धता राखणारं आहे. एकाच लेबलात पूर्ण माणूस कोंबण्याच्या या काळात पळशीकरांविषयी एकशब्दी वर्णन करणं कठीण आहे. ते नुसते विचारवंत नाहीत, रूढार्थानं गांधीवादी नाहीत, समाजवादी नाहीत, रॉयिस्ट नाहीत, कम्युनिस्ट तर नाहीतच. मग हे कोण आहेत?
वसंत पळशीकर हे विद्यापीठीय पठडीच्या बाहेरचे विचारवंत आणि लेखक-कार्यकर्ते आहेत. अनेक ज्ञानशाखांचा त्यांचा व्यासंग आहे. मराठीतल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा 'नवभारत' या विचारप्रवर्तक मासिकाचे ते संपादक होते. मानवी जीवनाच्या विविध अंगांवर त्यांनी विस्तीर्ण लिखाण केलं आहे. सामाजिक-राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म आणि विज्ञान, पर्यावरण, साहित्यसमीक्षा, विविध विचारप्रणालींची चिकित्सा, व्यक्तिचित्रण, स्त्री-पुरुष नातेसंबंध, परंपरा व आधुनिकता अशा अनेक विषयांवर त्यांनी दीर्घ लेख, टिपणं, पुस्तिका, संपादकीयं इ. लिहिली आहेत. हे लिहितानाची त्यांची भूमिका लोकांना जिंकून घेण्याची नाही. वाचकाला आपल्या शेजारी बसवून विषयामधे आपल्याबरोबर घेऊन जाण्याची आहे.
पळशीकर माणसांना लेबलं लावत नाहीत. त्यांच्या वैयक्तिक विश्वात वैचारिकतेला मोठं स्थान असलं, तरी आपलं साधेपण आणि माणूसपण ते टिकवून आहेत. समाजाची युद्धसदृष मांडणी त्यांना मान्य नाही. आकांडतांडव करण्यात किंवा गदारोळ माजवण्यात त्यांना रस नाही. प्रतिपक्षाच्याही दृष्टिकोनाला स्थान देणारी दीर्घ संवादाची त्यांची भूमिका आहे. सामान्य माणसाशीसुद्धा ते गंभीर संवाद करतात. पण हे करताना 'स्नेह आड येऊ न देता, पण स्नेहात अंतर पडणार नाही' अशा संवादाची त्यांची तयारी असते. पुरोगामी विचारांना सहानुभूती असूनही त्यांची कठोर चिकित्सा करत आपल्या धारणा तपासायला लावण्याचं काम ते करत राहतात. आजचा काळ महा-गडबडीचा आहे. कोणतीही गोष्ट विकून दाखवता येते अशा काळात पळशीकर काहीच 'विकू' इच्छित नाहीत. सन्मान आणि प्रतिष्ठेच्या प्रचलित कल्पनांशी त्यांना काही देणंघेणं नाही. असा हा माणूस. संताप, तिरस्कार, असूया, अभिनिवेश वगैरेंच्या पलीकडच्या जगात वावरणारा. अंगभूत शांतपणानं ते आपल्याकडचं संचित दुसऱ्याला देत राहतात. जबाबदारीनं. चिडचिड न करता.
स्वतंत्र विचार करणारी व करायला लावणारी माणसं कमी होत चाललीयत. म्हणूनच पळशीकरांना जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना आपण भेटतो आणि ते प्रश्नांचं रोपण आपल्या मनात करतात. ते पुढं निघून जातात, पण आपल्या मनात मोठी साखळी सुरू होते. म्हणूनच या फिल्मचं नाव, 'पळशीकरांच्या निमित्ताने...'
पळशीकरांची विचारवैशिष्ट्यं मांडण्याबरोबरच त्यांनी मांडलेल्या एखाद्या विषयावर सविस्तर चर्चा या माहितीपटात व्हावी असा आमचा प्रयत्न असेल.
धन्यवाद.
आपला,
समीर शिपूरकर, 'अवकाश निर्मिती'
माहितीपट : पळशीकरांच्या निमित्ताने...
संदर्भ: 'चौकटीबाहेरचे चिंतन'
संपादक: किशोर बेडकीहाळ
प्रकाशक: लोकवाड्मयगृह
वसंत पळशीकर यांचा फोटो: डॉ. मेदिनी डिंगरे
मला उमगत चाललेले व्हिपी कसे आहेत? अविचल पर्वताप्रमाणे? उत्तुंग, तटस्थ तरी दूरस्थ?
सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी यांचे नाव प्रथम ऐकले, मग एकदा डिपार्टमेंटला यांचे ओझरते दर्शनही झाले. बहुधा एखादे व्याख्यानही ऐकले असावे. मात्र तपशिलाच्या त्या सगळ्या नोंदी कशा कोण जाणे, पण स्मरणातून गायब आहेत! आठवतात ते फक्त पांढर्या वेषातले, खांद्याला शबनम लावलेले, गंभीर भासणारे पळशीकर. डिपार्टमेंटमधल्या, दोन-तीन प्राध्यापक व इतर प्रभावळीच्या घोळक्यातले. त्या वेळची माझी विद्यार्थिदशा आणि डिपार्टमेंटमधले गुंतागुंतीचे गट-तटाचे वातावरण, यांच्या परिपाकामुळे त्यांच्याविषयी एकप्रकारचा नकारात्मक भाव (कुणीतरी उपरोधाने म्हटलेले कानावर पडले होते, "हां, हे तर समाजवादी"!) मनात उमटून गेल्याचे अगदी स्मरणात राहिले आहे!
या (उगाचच घेतल्या गेलेल्या) नकारात्मक बेअरींगमुळे त्या वेळी घडलेले काहीच स्मरणात उरले नसावे. मग व्हिपी म्हणजे साक्षात एक विचारपर्व, ही जाणीव कुठून व्हायला बसली आहे? आता मारे खंत वाटते आहे! पण त्याचे आता काय होय?
आत्ता या क्षणी जे हातात आले आहे, ते मात्र नीट डोळे उघडून, मन वर्तमानात ठेवून, लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे असे स्वतःला बजावून सांगितले आहे.
तर आहे हे असे आहे. म्हणजे पार्श्वभूमी इत्यादीचा विचार करायचाच म्हटले, तर!
- सध्या काय करतेस?
- एका डॉक्युमेंटरीसाठी संशोधनात्मक अभ्यास.
- हो का? कसली डॉक्युमेंटरी?
- एक तत्वचिंतक व लेखक आहेत व्हिपी नावाचे, त्यांच्यावर.
कोण आहेत हे व्हिपी?
- त्यांनी बरंच लिहिलंय.
काय लिहितात ते?
- अं...अनेक विषयांवर...
म्हणजे सामाजिक वगैरे?
- हां, म्हणजे हो, पण तेवढंच नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय अशा सर्व विषयांवर आणि शिवाय त्या प्रत्येक विषयामधले अनेक उपविषय आणि त्यांचे तौलनिक आणि चिकित्सक विवेचनदेखील.
पण मग तू हे काम करण्याचा काय संदर्भ?
- अं… तसा खूपच संबंध आहे की. म्हणजे मी तर करायलाच हवं, असंच हे काम नव्हे का?
माझ्या शिक्षणविषयाशी आणि संशोधनविषयक पार्श्वभूमीशी तर याचा संबंध आहेच. शिवाय तसं बघितलं, तर घरातून पूर्वापार चालत आलेली आणि नंतर विद्यार्थिदशेपासून अभ्यासविषय म्हणून आलेली सामाजिक विज्ञानाची पार्श्वभूमी असल्यामुळे व्हिपींचे विचार समजायला अधिक जवळचे वाटले हे खरं आहे (पुरेसं मात्र नक्कीच नाही). व्हिपींची भाषा, विषयांची क्लिष्टता, एकंदरच व्यापक पैस यांचं काय? मी स्वतःलाच विचारत असते. त्यावर मी मलाच दिलेलं एक उत्तर असे की, अनेकांचा आक्षेप असलेली त्यांची बोजड भाषा वाचनापुरती तरी अडथळा नाही ठरली. किंबहुना भाषेच्या साधेपणामुळे तिथेच न रमता निखळ विचारांचे मर्म उकलत चालले आहे.
अशा वाक्यांची आणि विचारांची देवाणघेवाण गेले कित्येक महिने इतरांशी व स्वतःशीदेखील सुरू आहे.
व्हिपींच्या लेखनविचारसंदर्भातल्या ऑलमोस्ट कोऱ्या पाटीवर, किंबहुना कॅनव्हासवर, उडालेल्या गतस्मृतींच्या किंचित नकारात्मक, नि म्हणून काळसर वाटणार्या, शिंतोड्यांच्या विरळ गर्दीत व्हिपींचे लेखन गेल्या दोन-तीन वर्षांमागे माझ्या वाचनात आले; ते थेट, 'पळशीकरांच्या निमित्ताने' ही डॉक्युमेंटरी करायचे ठरण्याच्या सुमारासच!
सुरुवातीला एक रीसर्च प्रोजेक्ट इतकेच या अभ्यासाचे स्वरूप होते.
वाचनाला सुरुवात केली त्यादरम्यान डॉक्युमेंटरीच्या कन्सेप्ट नोटसाठी फोटो काढायला म्हणून, नऊ सालातल्या जुलै-ऑगस्टातल्या एका गच्च पावसाळी दुपारी, व्हिपींशी भेटही झाली. बरसणाऱ्या पावसाने अंधारून आल्यामुळे उजेड अर्थातच कमी असेलल्या त्या ढगाळ दुपारीदेखील, विषयव्यक्तीचे मी सुमारे दोनएकशे फोटोही काढले. प्रयत्न अगदीच काही निष्फळ ठरला नाही. दोन-पाच फोटो बरे आले! त्या वेळी व्हिपींबरोबर अधूनमधून थोड्या गप्पाही झाल्या. म्हणजे आपण विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला त्यांचे समग्र उत्तर. पण गप्पांना उद्युक्त करेल असे प्रवाही बोलणे मात्र नाही. त्या दिवशी थोडेफार रेकॉर्डिंगही केले, असे आठवते आहे. मात्र त्यांच्या घोगऱ्या झालेल्या अस्पष्ट आवाजामुळे ते फिरून पुन्हा ऐकावेसे वाटले नसणार.
या दिवसानंतर त्यांची पुन्हा भेट होईपर्यंत पुन्हा एक मोठा पॉज आला.
दरम्यान अधूनमधून त्यांच्या लेखांचे वाचन, चौकटीबाहेरच्या चिंतनशील प्रस्तावनेचे वाचन-मनन आदी वैयक्तिक कार्यक्रम सुरू होता.
वाद्ये अजून जुळत होती. नेमका सूर लागायला अवकाश होता!
मग केव्हातरी एक सलग वाचनपर्व आले, ते किबेंनी संपादित केलेल्या पुस्तकाला अनुसरून सुरु केलेल्या प्रक्रियेचे. एक आखणी मनात धरून रीसर्च प्रोसेस सुरू केली. ते पुस्तक आणि आणि त्यावर जुळवलेले प्रश्न निवडक लोकांना वाचायला दिली आणि त्यांची उत्तरे मिळवून त्याचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
आता वाद्ये जुळली होती...
तरीही अजून आवर्तने सुरू होतीम ती मंद्र सप्तकातल्या ठाय लयीतच.
अन् मग अचानक ठेच लागावी तसे झाले! खडबडून भानावर आणले, ते 'पर्यावरणीय दृष्टी: आशय व आकार' (संदर्भ: व्हिपी ०७८) या लेखाच्या वाचनाने.
अरे! या लेखात लिहिलंय ते सगळं आपल्या मनातलंच नव्हे का? कधी कोणी ते असं शब्दबद्ध करून ठेवलंय हे गावीही नव्हतं! हे स्टेशन आपल्याला आधी कसं लागलं नाही? कोणीच कसा आजवर याचा पत्ता सांगितला नाही? कुठेच काही संदर्भ कसा दिला नाही?
आजवरच्या सगळ्या मास्तरांवर उचकायलाच झालं! सगळ्या समाजावर चिडून चिडून दीड-दोन तास (पार्किंगमधे एक पाय गाडीच्या फूटरेस्टवर आणि एक खाली टेकवून) जयंतपुढे बोलबोल-बडबड केली. तेव्हा कुठं मनातला सल जरा बोथटला.
ही होती वर्ष-सव्वावर्षापूर्वीची गोष्ट. तो दिवस लक्षात राहिलाय. त्या दिवशी सकाळी समजलं, बापट सर गेले. 'राम बापट सरांना अखेरचा निरोप द्यायला वैकुंठात जायचेय, तूही चल,' म्हणून जयंतला फोन केला.
तिथे जमलेले सगळे ज्येष्ठ-श्रेष्ठ. बहुतेक व्हिपींना समकालीन असणार. एक अजब पोकळी वाटत होती. मागे व्होरा सर गेले, तेव्हाही वाटलेली चुटपुट उगाचच आठवली. तिथून निघताना वाटलं, बापट सरपण गेले. एकेक सावली नाहीशी होतेय. अगदी रोज उठून काही संपर्क नव्हता तसा कुणाशी. पण सभोवारच्या रखरखीत उन्हातल्या रस्त्यांवरून जाताना प्रवासात मागे कधीतरी लागलेली गर्द सावली थंडावा देत राहते. अशी सावली सदाच मनामधे काठ धरून असते, एक दिलासा देत.
कधीही त्या बाजूने गेलोच, तर तिथे त्याच ठिकाणी असणार ती सावली. फक्त जायचाच काय तो अवकाश!
मनातल्या त्या सावलीतून एकदम वास्तवातल्या रखरखाटात आल्यासारखं झालं त्या दिवशी वैकुंठात. बापट सर गेले, त्या दिवशी.
घरी येऊन पुन्हा 'पर्यावरणीय दृष्टी: आशय व आकार' (संदर्भ: व्हिपी ०७८) हा लेख वाचून काढला.
अरे! हे काय अवचित लागलंय हाती? मग इतरही काही लेख सलग वाचले (संदर्भ व्हिपी: ८७,८८, ०१२२ इ.). अनेक संदर्भ लागत गेले. बरेच दिवस सुटत नसलेलं कोडं एकदम झपाझप उकलावं तसे.
मध्य लय केव्हाच आत आकाराला आली होती तर! स्पीकर्स ऑफ असणार, म्हणून किंवा मग भोवतीच्या गोंगाटामुळे, ही सरस्वती नदी गुप्त राहिली होती! आता एकदम कसं समेवर आल्यासारखं वाटलं. थेट द्रुत लयीतला तराणाच!
विचारविश्वाचा, वर्ल्ड व्ह्यूचा चिमुकला कॅनव्हास एकदम विस्तीर्ण झाला. व्हिपींवर उडवले गेलेले लेबलांचे शिंतोडे कशामुळे तेही उमगलं. नव्हे, चांगलंच ध्यानात आलं. त्या ओघातच लिहिलेलं काही इथे पुन्हा उद्धृत करतेय. (संदर्भ: व्हिपी, ०१२२).
"जीवनाच्या बदललेल्या संदर्भांतून निर्माण झालेली व्यवस्था बदलण्याचा हा प्रश्न आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी लोक व शासन या दोन्ही पातळ्यांवर संस्कारधारणेमधे व उद्दिष्टांमधे (श्रेयकल्पनांमधे) बदल होण्याची गरज आहे. जंगलांशी असलेल्या आपल्या नात्याची डोळस व सम्यक जाण निर्माण झाली पाहिजे."
"माणसाने आपल्या गरजा सतत वाढवत न्याव्यात ही आजची दृष्टी व आर्थिक जीवनाचे सूत्र आहे."
"समाजातील जनसामान्य आणि प्रतिष्ठित, दोघांचीही संस्कारधारणा एकच आहे. गरजेप्रमाणे कोठारातून माल काढत राहावा; कोठारे सदैव भरलेली राहण्यासाठी आपणांस काही जबाबदारी उचलली पाहिजे याची जाणीव अभावानेच आढळते. जंगले साफ करून शेतजमिनी तयार केल्यावर तेवढी सजीव वनसंपत्ती कायमची नष्ट होते हा अनुभव प्राचीन काळापासून माणसाला आहे. किंवा जिथले जंगल तुटले आणि माणसे व गुरे यांचा सतत वावर राहिला, तेथे जंगलजमिनीचे रूपांतर कुरणांमधे, गवताळ डोंगरांमधे, कायमचे झाले हेही माणूस अनुभवत आलाय. पण त्याची संस्कारधारणा मात्र अशीच राहिली की, आपण कसाही वापर करीत राहिलो, तरी हे कोठार कधी रिते होणारे नाही."
"मानवनिर्मित निसर्ग साकार करत असताना निसर्गसृष्टीतील अन्योन्याश्रय व परस्परतोल यांचे त्याचे ज्ञान अतिशय तोकडे होते. संस्कृतीच्या निर्मितीच्या ओघात प्रकृतीची जी फेररचना त्याने केली, ती पुष्कळदा त्याच्या चांगलीच अंगलट आली. बाकी प्रकृतीची वळणेही बदलली. संस्कृतींचा विनाश, मानवी समूहांचे स्थलांतर या प्रक्रिया मानवी इतिहासाचा एक मोठा भाग आहे. मानवनिर्मित निसर्ग साकार करण्याची शक्ती प्राप्त झाल्यावरही दीर्घकाळपर्यंत, म्हणजे गेल्या तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत, प्राकृतिक निसर्गाचे वर्चस्व एकंदरीने टिकून राहिले."
"निसर्गनियमांची उकल जशी माणसाला होत गेली, त्या नियमांचा वापर करून आपणांस हवी तशी फेररचना आपणांस करता येते हा प्रत्यय जसा त्याला आला, तसे त्याचे मानसपरिवर्तन घडून आले. निसर्गाचे बंधन मानण्याचे काही कारण नाही, कोणतीही गोष्ट आपणांस अशक्य नाही, कोणतीही मर्यादा मानण्याचे कारण नाही, अशी आत्मकेंद्री, घमेंडखोरीच्या अंगाने झुकणारी आत्यंतिक आत्मविश्वाससंपन्न वृत्ती उत्पन्न झाली."
"प्राकृतिक निसर्गाला नव्या व्यवस्थेत तत्त्वतः काही स्थान नाही. उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध कच्च्या मालाचा पुरवठा करणारा स्रोत, असा सरळ सरळ हिशेबी संबंध निसर्गाबरोबर प्रस्थापित केला जात आहे. निसर्गाचा धाक आज उरला नाही, निसर्ग हा मानवी जीवनाचे उपांग बनला आहे. प्राकृतिक निसर्ग हे अक्षय कोठार आहे, या संस्कारधारणेला जी मुरड आधुनिक काळात पडली आहे ती अशी की, प्राकृतिक निसर्गातील सर्व संपत्ती संपली तरी हरकत नाही, विज्ञान व तंत्रविज्ञेच्या जोरावर आपण त्याची भरपाई करू. म्हणजे बेपर्वा वृत्ती तशीच राहिली."
"शेतीप्रधान नागरसंस्कृतीच्या उदयानंतरच्या काळात बदलत गेलेला आणखी एक महत्त्वाचा तपशील वाढत्या लोकसंख्येचा आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली असता अन्नधान्यांचे व इतर पिकांचे उत्पादन इतके निघते की, तो एक चमत्कारच मानावा. तुलनेने कितीतरी अधिक पटीतल्या व निश्चित अशा अन्नपुरवठ्याचा परिणाम लोकसंख्यावाढीत झाला. त्यातून एक दुष्टचक्र गतिमान झाले; लोकसंखेचा रेटा जाणवू लागला की जंगले तोडावीत आणि नव्या शेतजमिनी तयार कराव्यात हा तोडगा माणसाने काढला. निसर्गाच्या संदर्भात माणूस सर्वभक्षक बनण्याची ती सुरुवात म्हणता येईल. सतत वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या प्राथमिक गरजा भागवण्याचे दडपण निसर्गावर येत राहिले."
"त्याच्या जोडीला नागर समाजाच्या निर्मितीबरोबर अस्तित्वात येणाऱ्या उच्चवर्गीय/-वर्णीयांच्या विलासी जीवनाच्या गरजांचेही दडपण हळूहळू वाढत गेलेले आढळते. दुसऱ्यांच्या उत्पादक श्रमावर जगणाऱ्या उच्च वर्गाच्या ठिकाणी असंतुलित भोगलालसा अटळपणे निर्माण होताना दिसते. भोगलालसा स्वभावतःच अमर्याद असते आणि ती भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वाढत्या वापराच्या देशेने रेटा निर्माण होतो. म्हणून नागर समाज जेथे अस्तित्वात येतो, तेथे केवळ जंगलेच नाही, तर एकंदर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर उचित मर्यादेची लक्ष्मणरेषा ओलांडेल आणि समाज व संस्कृतीच्या अस्तित्वालाच धोक्यात आणेल ही शक्यता निर्माण होते."
"उपभोगाचे मान सतत व अमर्याद वाढवण्यासाठी विज्ञानाचे उपयोजन हे आधुनिक औद्योगिक संस्कृतीचे एक मूलगामी वैशिष्ट्य आहे. शेतीप्रधान नागर संस्कृतीत आढळून येणाऱ्या प्रवृत्तींनी आज प्रचंड वेग घेतलेला आहे. लोकसंख्येची स्फोटक वाढ, भोगलालसेची अमर्यादा, उत्पादनवाढीचा, नवनवीन उत्पादनांच्या निर्मितीचा सोस आणि त्यासाठी निसर्गातील साधनसंपत्तीचा बेसुमार वापर ही आजच्या जीवनाची वैशिष्ट्ये बनली आहेत. या दृष्टीने पाहता जीवनाचे सारे संदर्भ बदलेले आहेत."
व्हिपींनी १९८२ साली दीपावली विशेषांकात लिहिलेला हा लेख आहे. तीस वर्षे उलटली आहेत आता. तरी यातल्या शब्दांनी, त्याच्या वास्तविकतेने मला लेखकाच्या द्रष्ट्या विचारशक्तीचा प्रत्यय आला. त्यांचे लेखन जसजशी पुढे वाचत गेले, तसे आपण 'Biodiversity and Natural Resources' या कोर्समधे शिकलेला अभ्यासच पुन्हा करतो आहोत असे वाटत राहिले.
व्हिपी रूढार्थाने निसर्ग अभ्यासक वा पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखले जात नसतानाही त्यांच्यातला विचारवंत सम्यकतेने निसर्ग-पर्यावरण या अविषयाला स्पर्श करतो आहे आणि 'होलिस्टिक' जीवनदृष्टी बाळगतो आहे, जी अतिशय दुर्मीळ गोष्ट झाली आहे. या लेखकाचे भान आपल्यालाही मिळाल्याचा मला विलक्षण आनंद झाला. पुढे मग उत्सुकतेने त्यांचे निसर्ग-पर्यावरणविषयक इतरही लेख वाचले आणि त्यांच्या संतुलित विचारसरणीविषयी खात्रीच पटली.
एकाच व्यक्तीने किती विषयांवर लिहावे?
मार्क्स, गांधी, टिळक, फुले, आंबेडकर, अच्युतराव पटवर्धन, हमीद दलवाईं, यांपासून भिवंडीच्या धामणगावकरांपर्यंत... नर्मदा बचाओ आंदोलनापासून मुळशी सत्याग्रहापर्यंत... निकोप जलसिंचन व महाराष्ट्रातील सिंचनाच्या दिशेपर्यंत... विकास आणि तारतम्यापासून ते 'आजचे वास्तव व पर्यायांची मांडणी' इथपर्यंत... भारतीय एकात्मतेपासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत... आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कामगारविषयक, पर्यावरणीय, परिवर्तनसंबंधी, दलित-आदिवासी यांच्याविषयी, स्त्री-पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धांविषयी, जातिप्रथेविषयी, जमातवादाविषयी, सामाजिक ऐक्यासंबंधी, गांधी-फुले-आंबेडकर यांच्याविषयी, ग्रामस्वराज्यापासून ते आंतरराष्ट्रीय सौहार्दापर्यंत अनेक विषयांबद्दल... त्याचबरोबर अनेक व्यक्तिचित्रे, पुस्तक परीक्षणे, साहित्य-संस्कृतीविषयक लेख, असा सगळा पट. विषयांची वर्गवारी करून आम्ही थकलो, तरी अजून शंभर-एक लेख शिल्लक राहिले आहेत. या विषयांच्याही पलीकडचे लेख 'नंतर' अशी एक कॅटेगरी करून तूर्तास त्यात ठेवलेले!
ज्ञान व माहितीचा हा एक प्रचंड खजिनाच आहे. त्याच्या केवळ दर्शनाने, एक व्यक्ती म्हणून आणि सामाजिक विषयांची संशोधक-अभ्यासक या नात्यानेही, मी पुरती अवाक झाले. (१९३६ साली जन्मलेल्या, मूलगामी, समयोचित आणि सर्वंकष लेखन करणाऱ्या या व्यक्तीच्या लेखणीला साठ-एक दशके थांबणे कसे ते माहीतच नव्हते. आज केवळ शारीरिक व्याधीमुळेच त्यांचा लेखनप्रवास खंडित झाला आहे.) वसंत पळशीकर ही केवळ एक व्यक्ती नसून ते एक विद्यापीठच आहे, याचा प्रत्यय हरघडी येत राहतो. या व्यक्तीचे विचार पक्के, वृत्ती तटस्थ, पिंड अभ्यासू संशोधकाचा, वाचन अफाट, सततचा संपर्क समकालीन चळवळींशी आणि कार्यकर्त्यांशी, लेखनाचा पिंड अस्सल देशी. भारतीय मातीशी, समाजाशी पक्की जुळलेली नाळ. आयुष्यभर लेखन-संपादन हा एकच ध्यास. प्रसिद्धीची जराही असोशी नाही, की कोणत्याही एका विचारसरणीची पताका खांद्यावर वागवण्याचा सोस नाही. कोणत्याच साच्यात स्वतःच्या विचारशक्तीला कोंडून न घातल्यामुळे मुक्त विहरणारी, विहंगमावलोकन करू शकणारी स्वतंत्र अभिनिवेशरहित प्रतिभा. ओघवत्या लिखित्वाचं कोंदण नसलेले, केवळ शब्दसामर्थ्याने विस्मयचकित वगैरे न करणारे, तरीही झळझळीत, आणि एक उपजत शहाणपण घेऊन आलेले हे सारे लेखन. पळशीकरांचे लिखाण वाचणे म्हणजे निव्वळ विचारांच्या स्पष्टतेचे सौंदर्य अनुभवणे...
कोणता ना कोणता पक्ष घेत राहण्याच्या, विभूतिमत्वाला शरण जाण्याच्या वा कोणावरच विश्वास न उरण्याच्या काळात, विविध गंड/प्रभाव यांनी विलेपित विचारांची सद्दी आढळत असल्यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे दर्शनच दुर्लभ होण्याच्या, या भयकारी काळात अशा उच्च कोटीचे मर्मग्राही संचित वाचायला, अभ्यासायला मिळणे हा अतिदुर्मीळ योग नव्हे का?
जानेवारी २०१२
दर आठवड्यातला काही ठरावीक काळ आपण या प्रकल्पासाठी म्हणून द्यायचा हे माझे या वर्षाच्या सुरुवातीचे नियोजन. पण जानेवारीमधे मनाशी आखलेली योजना पार मोडीत निघाली. कडेकडेने, सोयीसवडीने करायचे हे काम नोहे हे ढळढळीतपणे जाणवले. पीएच. डी. करत असताना जशी संशोधन पद्धती अंगीकारली होती, तशाच वाटेने जावे लागणार असे सारखे वाटायला लागले. या कामात पूर्णतः झोकून दिल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही हे उमजले. परिणामी गेल्या पाच-एक महिन्यांपासून मी हे काम पूर्णवेळ करायला घेतले. नव्हे, पळशीकरांच्या निमित्ताने मला ते घ्यावेच लागले.
आत्ता जर वर्क सॅटिस्फॅक्शनचा इंडेक्स ग्राफ काढला, तर माझा काउंट सर्वोच्च येईल! कामाचा विलक्षण आनंद, जोडीला रोज नवनव्या विचारदालनांत मनमुराद भटकायची संधी अशी डबल फीस्ट सुरू आहे! या ज्ञानसागराच्या दर्शनाने मी स्तिमित होते आहे. स्वतःच्या उपजत मर्यादा, आणि नवनवीन विचार नि संकल्पना सामावून घेण्याचा व त्यावर पुन्हा विचार करण्याचा बौद्धिक थकवा हाच काय तो या कामातला स्पीडब्रेकर आहे! बाकी कामाचा इतर काही त्रास नाही, फक्त आपला वेग फारच कमी आहे याचे टेन्शन तेवढे हल्ली अधूनमधून येत असते! अजूनही किती दालने समोर उघडणार आहेत, किती ज्ञानमौक्तिके हाती लागणार आहेत याची पुरती कल्पना नाही. पण त्यांची चाहूल मात्र नक्कीच लागलेली आहे. वाट मात्र सोपी नाही. बिकट आहे. आणि विलक्षण खडतरही...
आजच्या घडीला समाजात उभ्या ठाकलेल्या विचारांच्या निरुंद भिंती... रोज नव्याने आपल्याला चिणू बघणाऱ्या!
तेढ जातीयवादाची, धार्मिक चढाओढीची, तंत्रविद्येच्या कुरघोडीची, माणसा-माणसातल्या हेव्यादाव्यांची, क्षुद्र स्वार्थी राजकारणाची...
या साऱ्यांची आपल्याला ग्रासून टाकणारी भिन्नभिन्न वर्तुळं भोवताली - भेदाभेदांचे टवके उडवणारी, एकसंधतेच्या चिरफाळ्या करणारी...
सर्वांचा मिळून परिपूर्ण समाज कुठे आहे?
श्वास घुसमटणारच.
तटस्थ वृत्ती; सर्वसमावेशक विचारधारा; आपल्या भूमीचा, देशाचा, अवघ्या मानवजातीचा सम्यक दृष्टीने केलला विचार; हे सगळे कोणी समजून तरी घेणार आहे का? हे सगळे कशासाठी करतो आहोत आपण, अशी विचार वारंवार त्रास देत राहतो.
अशाच एका हताश टप्प्यावर भेटला टिळकांच्या 'गीतारहस्या'तला कर्मयोगसिद्धान्त. हातात घेतलेले काम आणि पार्श्वभूमीवरचा समाज यांची योग्य सांगड बसत नसल्यामुळे अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत असताना, त्या अवस्थेचे नेमके निदान करून एका वरिष्ठ विचारी मित्राने, "ताबडतोब जाऊन गीतारहस्य हातात घे," असा नामी उपाय सांगितला. मी तो खरोखरच अमलातही आणला. गीतारहस्याची प्रस्तावना वाचतानाच जाणवले की, पूर्वग्रहबद्ध मनाने गीतारहस्याला 'धार्मिक ग्रंथ' या वर्गात समाविष्ट केल्यामुळे आपण इतके दिवस या विचारविश्वाला उगाच मुकलो. विलक्षण खंत वाटली. गीतारहस्याची प्रथम भेट जेव्हा केव्हा होईल, तेव्हा प्रत्येक संवेदनाशील व्यक्तीला या ग्रंथराजाशी आपली भेट आधीच का नाही झाली अशी रुखरुख नक्कीच वाटेल. मनाला भेडसावणाऱ्या दुःखचिंतावरचा रामबाण उपाय म्हणजे गीतारहस्य. कोणत्याही कारणाने होणारी मनाची घालमेल यातल्या तत्त्वसाराने शांत होऊ शकते अशी त्याची ताकद आहे.
"मा कर्मफलहेतुर्भू: मा ते संगोsस्त्वकर्मणी॥"
कर्मे करण्याचाच तुझा अधिकार आहे हे खरे; पण हा तुझा अधिकार फक्त कर्म (कर्तव्य) करण्यापुरताच आहे हे लक्षात ठेव. अर्थात कर्मफलाचे ठायी - मनुष्याचा अधिकार नाही असे श्रीकृष्णाने पुनः स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. कर्माच्या आड फलाच्या निष्कर्षाची भीती येऊ देणे व्यर्थ आहे. आपले अंगीकृत कर्म निष्ठेने करत राहिले पाहिजे, फलाशेच्या चिंतेने विदग्ध न होता.
"सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाSप्रियम।
प्राप्तं प्राप्त्मुपासीत हृदयेनापराजितः॥"
सुख असो वा दुःख असो, प्रिय असो वा अप्रिय असो; जे ज्या वेळी जसे प्राप्त होईल, ते त्या वेळी तसे मनाचा हिरमोड होऊ न देता (म्हणजे खट्टू होऊन आपले कर्तव्य न सोडता) सेवीत जा." (महाभारत शांतीपर्व, २५. २६).
भगवद्गीतेतही "यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम" (२. ५७) म्हणजे - शुभाशुभ प्राप्त झाले असता जो नेहमी निःसंग असून त्याचे अभिनंदन किंवा द्वेष करत नाही तोच स्थितप्रज्ञ होय, असे सांगितले आहे.
योगायोगाने पळशीकरांनीदेखील 'अत्मौपम्यबुद्धी' हा शब्द लिखाणात अनेकदा वापरलेला आहे.
त्याच्या शब्दार्थाचा मागोवा घेत असता, तो मला अचानक गवसला तो थेट गीतारहस्यात. त्यांनाही तो गीतारहस्यात भेटला असावा. सर्वांच्या ठायी 'समबुद्धी' ठेवणे हा त्याचा अर्थ. आपल्याठायी वसतो तोच आत्मा त्याच्या ठायीही वसतो याची जाणीव ठेवून केलेला विचार.
जी बुद्धवचने मनावर ठसली, त्यांतलीच ही दोन वचने -
Buddha's first seal, "All Compounded things in this universe are impermanent."
"All contaminated things bring suffering."
अरे, पण आपण माणसे तर आपल्या उपभोगासाठी प्रत्येक गोष्ट कायमच हजर राहणार असल्याच्या अविर्भावात वावरतो आहोत की! मनुष्याचा आजचा प्रवास नेमका उलट सुरू आहे का?
"आपल्या वाढविस्तारासाठी आजपर्यंत माणसाने प्राकृतिक निसर्गाला हरवले, बदलवले. प्रकृतीविरुद्ध संस्कृती, निसर्गावर विजय या प्रकारच्या भाषेत बोलण्याची पद्धत पडली. विज्ञानयुगात निसर्गावर विजय यावर सतत भर दिला गेला."
प्रमत्त बनलेल्या मानवाकडून सातत्याने विज्ञान, तंत्रज्ञानाधिष्ठित जीवन यांचाच उदो-उदो सुरू असतो. या तथाकथित 'बुद्धिवादी', 'अतिवास्तववादी', 'विवेकवादी' दृष्टिकोनाचा अतिरेक होतो आहे. मानवी बुद्धीच्या अवास्तव श्रेष्ठत्वाचे अजीर्ण झाले आहे. 'निसर्गावर मानवाची मात' या (वास्तविक अती अज्ञानी) घमेंडखोर वाक्याचा तर तिटकारा आला आहे. काहीतरी चुकते आहे. अंतर्मन हे वाक्य स्वीकारूच शकत नाही. कुठेतरी खटकते आहे. पण तोडगा दिसत नाही.
ती अस्वस्थता अचानक शब्दबद्ध झाली 'पोस्ट मॉडर्निझम'वर ऐकायला मिळालेल्या चार व्याख्यानांच्या निमित्ताने.
वस्तूंचा उपभोग घेताघेता माणसाचेच रूपांतर झाले आहे एका वस्तूमधे. कशाच्या शोधार्थ निघालो आहोत आपण, हेच विसरून गेलेला, स्वतःच हरवलेला, मनुष्यत्व विस्कटून गेलेला माणूस...
पाच-दहा लाख वर्षांच्या प्रवासात कणाकणाने साठत गेलेले अनुभवाचे गाठोडे, वेळोवेळी कामी येणारे शहाणपणाचे संचित, हीच शिदोरी पुरवत त्याने इथवर वाटचाल केली खरी; पण पांथस्था, आता इथून पुढे ते जुनाट गाठोडे तुला बरोबर वागवता येणार नाही. दे पाहू इथल्या इथे ते टाकून. तसा हुकूमस सोडला आहे 'नवयंत्रतंत्रमंत्रा'ने. यापुढे तुझा प्रवास केवळ तंत्रविद्येच्या व्हर्चुअल काठीच्या सोबतीनेच असेल. तसा फतवाच काढला आहे एकविसाव्या शतकाने. आधुनिक होण्याच्या उत्साहात मनुष्याने ही व्हर्च्युअल रिअॅलिटीची काठी हौसेहौसेने घेतली आहे. जादूची छडीच जणू. सगळे कसे सोपे वाटले त्याला सुरुवातीला. आता मात्र क्वचित कधी जाणवते आहे, Almost Perfect but not quite...
काठी कसली? ही तर कुऱ्हाड. समोर येईल त्याच्यावर सपासप चालवत निघाला आहे जथ्था मनुष्यांचा...
एप्रिल २०१३
व्हिपींच्या लेखनसान्निध्यात पुरते वर्ष काढल्यानंतर गेले दोन-तीन महिने एक पॉज घेतला आहे.
आपल्यातून उठून बाहेर येऊन, जरा अंतरावरून आत काय घडले-विखुरले-बांधले गेले आहे त्याचा अदमास घेते आहे. त्यांच्या शब्दांना कैद करून ठेवण्यात काही हशील नाही. पण त्यांच्या अर्थांचे नाद घुमत राहतात आत आत. त्यांना साद-प्रतिसाद देत राहतो आपण कळत नकळत. आपल्याही विचारप्रक्रियेत निश्चित बदल झाल्याचे जाणवते आहे. ठाम, तरीही अनाग्रही, वृत्ती बाळगण्याचा मूलमंत्र गवसला म्हणायचे का, त्यांच्या लेखनविश्वात मारलेल्या या बुडीने?
तो मूलमंत्र कृतीत आणण्याचे दिव्य पार पाडताना दमछाक होणार हे दिसतेच आहे. पण आता सावलीच्या ठिकाणांच्या अनवट वाटाही अवगत झाल्यात! जीवनाकडे समग्रतेने पाहणे किती अनोखे असते नाही, त्याचे तुकडे तुकडे पाडून त्यांचे ओझे वाहण्यापेक्षा? एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ एव्हरीथिंग. (देअर इज नथिंग अॅज फ्री लंच! - कॉमनर, अमेरिकन इकॉनॉमिस्ट).
व्हिपी प्रोजेक्टशी संबंधित काम पुढे नेताना अनेकांना भेटते आहे. ज्यांच्या ज्यांच्या परीघांना प्रत्यक्षात छेद दिला व्हिपींनी, ज्यांच्या कुणाच्या कक्षा रुंदावल्या त्यांच्या असण्या-बोलण्याने, त्यांच्या स्मृतींचा मागोवा घेण्यात समरसून जाते आहे. काळाचा तो पट अनुभवांतून जगून बघते आहे. त्या अनुभवांनी त्या त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणाऱ्या विणीची नक्षी निरखून पाहाते आहे. त्या धाग्यांचा पोत चाचपून पाहते आहे.
व्हिपींच्या छायेमायेने कित्येकांना जगण्याच्या कित्येक मिती लाभल्या-उमगल्या असणार. स्वतः व्हिपीही तसेच जगले असतील ना? संथ, पण ठाशीव. विस्तीर्ण, व्यापक, तरीही भरीव. नितळ निखळ विचारांच्या घनगर्द सावलीचे बेटच जणू.
प्रतिक्रिया
यांच्याबद्दल काही
यांच्याबद्दल काही वाचण्याऐकण्यात आलं नव्हतं कधी. आता निदान मिळवायचा प्रयत्न तरी करीन. ओळख करून दिल्याबद्दल आभार.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
निवडक पळशीकर
वैचारिक मराठी लिखाणात वसंत पळशीकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. नुकतंच (म्हणजे काही महिन्यांपूर्वीच) लोकवाङ्मय गृहानं 'चौकटीबाहेरचे चिंतन' ह्या शीर्षकाखाली त्यांचं निवडक लेखन प्रकाशित केलं आहे. (संपादक : किशोर बेडकिहाळ).
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
व्हय का? बरं सांगितलंत. आता
व्हय का? बरं सांगितलंत. आता वाचीन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आदरांजली
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन झाले आहे. ऐसी परिवारातर्फे त्यांना आदरांजली.
यानिमित्ताने या लेखाची आठवण आली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.