महाभारतातील “चलाख” महापुरुष आणि तत्व कि अस्तित्वाची लढाई

महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या “भगवंत” होण्याने बाकीच्यांची “चलाखी” काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्‍हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं ही करामत या घटनांमध्ये घडते.

अतिशय प्रसिद्ध घटनेचा उल्लेख करायचा झाला तर कृष्णाच्या शिष्टाई बद्दल बोलता येईल. द्रौपटीने कॄष्णाला शिष्टाईला जाण्याआधी तिच्या मोकळ्या केसांची आठवण करुन दिली होती. कॄष्ण ही घटना विसरला असण्याची शक्यताच नव्हती. दुर्योधनाचा हट्टी स्वभाव पूर्णपणे माहीत असलेल्या कॄष्णाने चलाखपणे फक्त पाच गावांची मागणी केली. कृष्णाला जरा जरी शंका असती कि दुर्योधन पाच गावांची मागणी मान्य करेल तर त्याने हा प्रस्ताव ठेवलाच नसता. त्यामुळे झाले हे की बिचार्‍या पांडवांनी हक्काचे अर्धे राज्य सोडुन फक्त पाच गावांवर समाधान मानले तरी दुर्योधनाचा लोभ आणि युद्धपिसाटपणा इतका कि सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखिल जमीन तो द्यायला तयार झाला नाही असा संदेश जनसामान्यांत गेला. पुढे जे काही “महाभारत” झाले त्याला बहुतांशी कौरव जबाबदार धरले गेले याचं कारण कृष्णाने अत्यंत मुत्सद्दीपणे जगासमोर दुर्योधनाला हट्टाग्रही सिद्ध केलं. अर्थात दुर्योधनाला राज्याचा वाटा द्यायचा नव्हताच. पण त्याच्या स्वभावाची ही बाब कृष्णाने शिष्टाईच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणली. अशा घटना महाभारतात अनेक असल्या तरी येथे फक्त तीनच घटना विचारार्थ घेतल्या आहेत. या तीन घटना त्या काळच्या विचारसरणीवर तर प्रकाश टाकतातच शिवाय या घटना घडल्यामुळे महाभारताला वेगळं वळण देखिल लागतं.

पहिली घटना भीष्माने केलेल्या अम्बाहरणाची. अम्बाहरणाच्या वेळची हकीकत लक्षात घेतली तर त्या काळचे राजे कसे वागत याचा अंदाज येऊ शकतो. केशीराजाने आपल्या तीन मुलींचं स्वयंवर लावलं होतं. त्यात भीष्म स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेऊन देखिल भाग घेण्यासाठी आला. स्वयंवर कुणाचंही असो. मुलीची इच्छा काहीही असो. त्याच्या अटी वाट्टेल त्या असोत. बाहुबल असेल, धमक असेल, पराक्रम असेल तर मुलगी पळवुन न्यावी असा त्याकाळचा खाक्या दिसतो. पुढच्या काळात कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि आपला जिवलग मित्र अर्जुन याला देखिल बहिण सुभद्रेला पळवुन नेण्याचा सल्ला दिला. बायका स्वयंवरात ऐनवेळी कुणाला माळ घालतील याचा नेम नाही त्यामुळे पळवुन नेणेच इष्ट असा भगवंताचा चतुर, व्यावहारिक सल्ला होता. याचा अर्थ स्वयंवरातुन मुली पळवुन नेणे ही त्याकाळी दुर्मिळ घटना नव्हती. पळवणार्‍याने पराक्रम करुन हरण केले असेल, त्याचे घराणे कुलवंत असेल तर कदाचित ती इष्टापत्तीच मानली जात असेल. भीष्म स्वयंवरात आला तो सावत्र भावांसाठी मुलगी मिळवायला. कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच. आणि असाच दंडक असण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर देशीच्या रा़जांनी त्याची चेष्टा आरंभली नसती. ही चेष्टा भीष्माच्या वयाचीही आहे. राजांनी चेष्टा आरंभल्याबरोबर जणुकाही याच संधीची वाट पाहात असल्याप्रमाणे भीष्माने तिन्ही कन्यांना बळजबरीने रथात घालुन इतर राजांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्म हा महाभारतात नुसताच महापराक्रमी नाही तर महाज्ञानी म्हणुनही प्रसिद्ध आहे. शांतीपर्वात युधिष्ठीरासारख्या ज्ञानी पुरुषाला आपल्या शंका निरसन करण्यासाठी भीष्माचा आश्रय घ्यावा लागला. अशा ज्ञानवान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कुरुला स्वयंवराचे नियम माहित नसतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. भीष्माने तेथे हजर राहुन काही गोष्टी घडु दिल्या आणि आपला कार्यभाग साधला असे वाटते.

भीष्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधीही स्वतःच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती. कुरुंदकरांनी याचं विश्लेषण करताना हनुमानाचं उदाहरण दिलं आहे. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची आठवण करुन द्यावी लागली आणि मग ते उड्डाण घडले. इथे प्रकार तसा नाही. भीष्माला स्वतःच्या पराक्रमाची इतक्या यथायोग्य प्रकारे जाणीव होती की त्याने परशुरामासारख्या स्वतःच्या गुरुलाही सोडले नाही. समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे. यात चलाखि अशी कि मुळात भीष्माला क्षत्रियांच्या उद्दामपणाबद्दल खात्री असणारच. त्यांच्या दर्पोक्ती करण्याच्या स्वभावाशीही तो परिचित असेलच. आपण आल्याचे पाहुन सारे क्षत्रिय आपली थट्टा करणार याचा त्याने आधिच कयास बांधला असावा. तेव्हा आधी त्यांना कुरापत काढु द्यावी आणि नंतर उग्र रुप धारण करुन, आव्हान देऊन, कन्यांना पळवुन न्यावे असा प्रकार करावा असा विचार भीष्माने केला असेल असे मानायला जागा आहे.

दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे. मुळात बहुतेक लोकांना माहित असलेली घटना म्हणजे भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारणे आणि त्यानंतर युधिष्ठीराचे ते सुप्रसिद्ध “नरो वा कुंजरो वा ” असे उत्तर देणे. त्यानंतर दु:खाने दोणाचार्यांचे शस्त्र खाली ठेऊन बसणे. आणि धृष्ट्द्युम्नाने त्याचे शीर तलवारीने उडवणे. सर्वजण परंपरेने सांगितलेल्या या कथेशी परिचित आहेत.

जेव्हा अश्वत्थामा मेल्याची आवई उठुनसुद्धा द्रोण शस्त्र खाली ठेवित नाही तेव्हाच या हा प्रसंग वाटतो तेवढा साधा नाही याची जाणीव होते. आपला मुलगा मृत्युंजय आहे हे द्रोणाला ठावुक होते. त्यामुळे पुन्हा त्याने लढायला सुरवात केली. तेव्हा मात्र भीमाने न राहवुन त्वेषाने आपल्या गुरुला स्वधर्माची जाणीव करुन देण्यास प्रारंभ केला आणि हा वार द्रोणाच्या वर्मी बसला. खिन्न होऊन त्याने शस्त्र खाली ठेवले. आणि पुढे धृष्ट्द्युम्नाच्या हातुन तो ठार मारले गेला. या घटनेचा बारकाईने विचार केला तर अनेक बाबी लक्षात येतात.

द्रोणाचा भीमावर मुळीच विश्वास बसला नव्हता. त्याने युधिष्ठीराला विचारुन खात्री करुन घेण्याचे ठरवले. या सार्‍या लांड्यालबाड्या पांडवांना कराव्या लागल्या याचं महत्वाचं कारण हे की द्रोणाच्या अफाट आणि अचाट पराक्रमामुळे पांडवांना विजयाचा भरवसा उरला नाही. भीष्माप्रमाणे “पांडवांना मारणार नाही” वगैरे बोलुन द्रोणाने दुर्योधनाची पंचाईत केली नव्हती. खाल्ल्या मीठाला जागुन त्याने पांडव सैन्याचा भयंकर संहार केला. अभिमन्युला एकटं गाठुन ठार मारायलाही द्रोणाला गैर वाटले नाही. द्रोणाचा हा झंझावात थांबविण्यासाठी ऋषीसुद्धा युद्धभुमीवर उपस्थित झाले होते. या ऋषींमध्ये महत्त्वाची नावे आहेत. विश्वामित्र, जमदाग्नी, भरद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, अत्री यासारख्या ऋषींनी तेथे येऊन द्रोणाला शस्त्रत्याग करण्याची सुचना केली. यासर्व गोष्टींचा परिणाम इतकाच झाला की द्रोणाला ज्याच्या सत्यवचनाबद्दल खात्री होती त्या धर्मराजाला त्याने अश्वत्थाम्याच्या मृत्युच्या खरेपणाविषयी विचारले. द्रोणाच्या पराक्रमाने पांडवांचा नाश खात्रीने होणार हा धोका श्रीकृष्णाने सर्वप्रथम ओळखला आणि धर्मराजाला असत्य बोलुन पांडवांना वाचविण्याची विनंती केली.

अर्जुनाच्या पराक्रमाबाबत कुणी कितीही म्हणोत पण द्रोणाला मारण्याची ताकद अर्जुनात नव्हती हे मान्य करणं भाग आहे अन्यथा श्रीकृष्णाने ही गळ युधिष्ठीराला घातलीच नसती. युधिष्ठीराने नाईलाजाने हे मान्य केल्यावर चाचपडत “नरो वा कुंजरो वा” म्हटले. अगोदर तेथे उपस्थित झालेल्या ऋषींनी “हे युद्द तु अधर्माने केले आहेस” असा ठपका द्रोणावर ठेवला होताच. त्यातुन युधिष्ठीराने अश्वत्थाम्याच्या मृत्युला दुजोरा दिला. त्यानंतर आपल्या मृत्युसाठीच ज्याचा जन्म झालेला आहे अशा धृष्टद्युम्नाला चालुन येताना पाहुन द्रोण उदास झाला आणि त्याला पुर्वीसारखे त्वेषाने, कौशल्याने युद्ध करता येईना. मात्र कौशल्य कमी झाले तरी द्रोणाचा पराभव पांडवांना करता येईना. इथे भीमाने द्रोणाच्या मर्मस्थानी लागेल असे संभाषण केले. त्यातले प्रत्येक वाक्य महत्त्वाचे आहे.

भीम म्हणतो” आपल्या स्वतःच्या कर्माविषयी समाधानी नसलेल्या ज्ञानी ब्राह्मणांनी युद्धाचा (अव्यापारेषु) व्यापार सुरु केला नाही तर क्षत्रियांचा जगातुन नाशही होणार नाही. सर्व प्राण्याविषयी अहिंसा पाळणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे ज्ञानी लोक म्हणतात. ब्राह्मण हा त्या धर्माचे मूळ आहे. आणि तु तर ब्रह्मवेत्त्यात सर्वश्रेष्ठ आहेस. एका पुत्रासाठी अधर्माचे आचरण करुन आणि स्वतःच्या नैसर्गिक कर्माचा त्याग करुन, आपापल्या कर्मात मग्न असलेल्या अनेक क्षत्रियांचा वध करताना तुला शरम कशी वाटत नाही? ज्याच्यासाठी तु शस्त्र धारण केलेस आणि ज्या पुत्राच्या विचाराने तु जगत आहेस तो हा तुझा पुत्र पाठीमागे मरुन पडला आहे. आणि त्याच्याविषयी धर्मराजाने स्वतः तुला माहिती दिली आहे. धर्मराजाच्या त्यावचनाविषयी तु शंका घेणे उचित नाही.”

मुळात ही सर्व योजना कृष्णाची. द्रोणाला रोखलं नाही तर पांडवांचा सर्वनाश अटळ आहे हे त्याला दिसु लागले होते. त्याने अश्वत्थामा मेल्याची आवई उठवुन द्रोणाला शत्रत्याग करण्यास भाग पाडावे ही मसलत युधिष्ठीराच्या गळी मोठ्या कष्टाने उतरवली. ज्याला “सीदन्ती मम गात्राणि” च्या अवस्थेतुन अठरा अध्यायी गीता सांगुन युद्धासाठी उभा केला त्या कृष्णसखा अर्जुनाला तर ही योजना आवडलीच नाही. भगवंताची योजना ताबडतोब कुणी उचलुन धरली असेल तर ज्याला गीता सांगण्याची कधी गरजच भासली नाही त्या भीमाने. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारुन द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याची आवई भीमाने तात्काळ उठवली. त्यादरम्यानच ऋषींनी उपस्थित होऊन द्रोणाला युद्धापासुन परावृत्त होण्याची सुचना केली. तो अधर्माने लढत असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवला. पण द्रोण बधला नाही. त्याने पुत्राच्या मृत्युबद्दल सत्यवचनी युधिष्ठीराकडुन खात्री करुन घेतली. त्याच्या उत्तराने द्रोण विचलित जरी झाला तरी तो शस्त्रत्याग करेना आणि त्याचे बळ जरी कमी झाले तरी त्याचा पराभव होईना. तेव्हा ही सारी मसलतच फसण्याची वेळ आली. महाभारतात जरी उल्लेख नसला तरी माझ्या मनात एक कल्पना येते कि जर अशावेळी जिवंत असलेला अश्वत्थामा आपल्या पित्यासमोर आला असता तर पांडवांची अवस्था काय झाली असती? एका क्षणात पाण्डवांचा बनाव द्रोणाला कळुन चुकला असता आणि कदाचित त्याने भूतो न भविष्यती असे घनघोर युद्ध अतिशय त्वेषाने केले असते.

भीमाने मात्र प्रसंगावधान राखुन अत्यंत चलाखपणे, ज्यामुळे द्रोण खरोखरच अस्वस्थ होईल असा स्वधर्माचा अमोघ बाण काढला. महाभयंकर अस्त्र शस्त्रांना सहजतेने तोंड देणार्‍या महापराक्रमी द्रोणाला या बाणाचे मात्र निवारण करता आले नाही. भीमाचे वाग्बाण द्रोणाच्या मनात आरपार रुतले आणि त्याने शस्त्रत्याग केला.

स्वधर्माचे महत्त्व अपरंपार असलेल्या त्याकाळात वर्णानुसार कर्म करणे हा नियम असणार आणि तो नियम मोडणारे द्रोणासारखे महापराक्रमी पण लौकिकार्थाने भ्रष्ट समजले जाणारे असे ब्राह्मणसुद्धा असणारच. त्यातुन ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण. समाजासाठी गुरुपदी असणारा. त्याच्याकडे समाज नेहेमी मार्गदर्शनासाठी पाहाणार असा. अशा ब्राह्मणांच्या मनात आपण स्वधर्मापासुन ढळलो ही सतत कुडतरणारी, अपराधी भावना असण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या या कमकुवत जागेचा फायदा भीमाने अत्यंत हुशारीने उचलला आणि द्रोणाच्या मर्मस्थानी बोट ठेऊन आपला कार्यभाग साधला.

द्रोणवधाचा खरेतर सुत्रधार कृष्ण. त्याची योजना पार पाडली भीमाने. शेवटी या योजनेला सुरुंग लागण्याची वेळ आली असताना आपली स्वतंत्र बुद्धी वापरली तीही भीमानेच. आणि द्रोणवधाचे सारे श्रेय दिले जाते ते शत्रत्याग करुन बसलेल्या माणसाचे डोके तलवारीने उडवणार्‍या धृष्टद्युम्नाला.

तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. हे सारं काही असुनसुद्धा साध्वी गांधारीने त्याला आपल्या सामर्थ्याचं कवच घातलं. गांधारीने दुर्योधनाला युद्धापूर्वी भेटायला बोलावताना संपूर्ण नग्न होऊन बोलावले. ती क्षणभर डोळे उघडुन त्याच्याकडे पाहाणार होती ज्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचं होणार होतं. पण कृष्णाने हा प्रकार आधीच ओळखुन दुर्योधनाला मध्येच गाठुन मातेकडे जाताना नग्न कसा काय जातोस म्हणुन त्याची चेष्टा केली. तेव्हा दुर्योधन कमरेभोवती वस्त्र पांधरुन गेला आणि त्याच्या मांड्या तेवढ्या कमकुवत राहिल्या अशी कथा सांगितली जाते. एरवी गांधारीबद्दल आदराने बोलण्याची प्रथा आहे. धृतराष्ट्राच्या शारिरीक अंधत्वावर बोलताना तो पुत्रमोहाने आंधळा झाला होता याचा उल्लेख तर न चुकता होतो. पण नवर्‍यासाठी डोळ्यावर पट्टी बांधुन घेतलेल्या गांधारीची गोष्ट तरी नवर्‍यापेक्षा काय वेगळी आहे? पांडवांची बाजु न्याय्य आहे असे जरी तिला वाटत असले तरी युद्धात दुर्योधनाचाच विजय व्हावा अशी तिची इच्छा दिसते. अन्यथा तिने दुर्योधनाला आपल्या तपःसामर्थ्याचं कवच घालुन लोखंडी बनवण्याचा घाट घातला नसता. दुर्योधनाचा विजय याचा दुसरा अर्थ पांडवांचा पराजय किंचा कुठल्यातरी पांडवाचा मृत्यु हे देखिल येथे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात धृतराष्ट्राप्रमाणेच गांधारीदेखिल पुत्रामोहाने आंधळीच झाली होती हे म्हणण्यास वाव आहे. आणि हे सर्वात प्रकर्षाने जाणवते ते शेवटी. युद्ध संपल्यानंतर कृष्णाची भेट झाल्यावर गांधारी त्याला शाप देते. नवर्‍याचा पुत्रमोह, मुलांचे प्रताप, त्यांनी पांडवांशी केलेली अन्याय्य वर्तणुक, प्रत्यक्ष सुनेचे राजसभेत केलेले वस्त्रहरण सारं काही विसरुन, अगदी शंभर पुत्र ठार मारलेल्या भीमालादेखिल बाजुला ठेऊन तिची न्याय बुद्धी दोषी कुणाला ठरवते तर श्रीकृष्णाला. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे कठीण. .

पुढे दुर्योधन कसा मारला गेला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र त्यात कृष्णाची गदेने मांडीवर प्रहार करण्याची सुचना आणि त्याबरहुकुम भीमाचे वागणे या सर्व प्रकारानेच हा प्रसंग पूर्णपणे झाकोळला आहे. या सार्‍या गोष्टी झाल्या केव्हा तर दुर्योधन गदायुद्धासाठी बाहेर आल्यावर. तोपर्यंत तो पाण्याखाली लपुन बसला होता. तो बाहेर आलाच नसता तर हे गदायुद्ध घडलेच नसते. त्याला डिवचुन बाहेर काढ्ण्याचे श्रेय युधिष्ठीराचे. इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये असा उल्लेख केला आहे कि धॄतराष्ट्राकडुन जर दुर्योधनाला जीवदान देण्याचा निरोप आला असता तर पांडवांचा नाईलाज झाला असता त्यामुळे असा काही निरोप येण्याआधी दुर्योधनाला मारणे आवश्यक होते. एकाचढ एक शस्त्रास्त्रे माहित असलेल्या अर्जुनालादेखिल एखादे अस्त्र वापरुन दुर्योधनाला बाहेर काढता आलं नाही आणि तसा काही उल्लेखही महाभारतात नाही याचा अर्थ दुर्योधन पाण्याखाली संपूर्ण सुरक्षीत होता आणि तो स्वतःहुन बाहेर येइपर्यंत पांडवांकडे वाट पाह्ण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाघाच्या गुहेबाहेर उभे राहुन वाट पाहण्याचाच हा प्रकार होता. दुर्योधनाला बाहेर काढणे जरुरी होते. अवघड प्रसंगी युक्त्याप्रयुक्त्या सुचविणार्‍या श्रीकृष्णानेसुद्धा काही उपाय यावेळी सांगितलेला दिसत नाही याचा अर्थ त्यालाही मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी पुढे सरसावला तो जुगारी युधिष्ठीर. यावेळी त्याने फेकलेले फासे बरोबर त्याच्या बाजुने पडले आणि दुर्योधन अलगत जाळ्यात सापडला. याप्रसंगी धर्म-दुर्योधनामध्ये जो संवाद झाला तो अभ्यासल्यास युधिष्ठीर किती “चलाख” माणुस होता हेच सिद्ध होतं.

युधिष्ठीर हसत हसत म्हणतो,” सुयोधना हे पाण्यात तु अशासाठी अनुष्ठान आरंभलं आहेस? आपल्या कुलाचा नाश करुन स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तु पाण्यात दडला आहेस काय? येथे येऊन लपुन बसला आहेस तेव्हा तुझा तो पुर्वीचा दर्प आणि अभिमान कोठे गेला? राज्यसभेत सर्वजण तुला शूर म्हणतात पण आता जेव्हा तु पाण्यात दडला आहेस तेव्हा मला तुझे सारे शौर्य व्यर्थ वाटत आहे. कोठे गेलं तुझं पौरुष? कोठे गेला तुझा अभिमान? कोठे गेली तुझी वज्रसमान गर्जना? कोठे गेलं तुझं अस्त्रविद्येचं सारं ज्ञान? उठ आणि क्षत्रिय धर्मानुसार आमच्याशी युद्ध कर. आमचा पराभव करुन पृथ्वीचं राज्य मिळव अन्यथा आमच्या हातुन वीरगतीला प्राप्त हो.” युधिष्ठीराचा प्रत्येक शब्द खोचक आणि वर्मी लागणारा आहे. मात्र त्याचा तत्काळ परिणाम झालेला दिसत नाही. दुर्योधन म्हणतो,” मी प्राणांची रक्षा करण्यासाठी किंवा घाबरुन येथे बसलेलो नाही. मला जरा विश्रांती हवी आहे. तुम्हीही विश्रांती घ्या. मी त्यानंतर तुमच्याशी युद्ध करेन.” युधिष्ठीराला मात्र जराही वेळ दवडण्याची इच्छा नव्हती. तो लगेच म्हणाला.” आमची विश्रांती घेऊन झाली आहे आणि आम्ही बर्‍याच वेळापसुन तुला शोधत आहोत. तेव्हा चल आमच्याशी युद्ध कर.” यानंतर दुर्योधनाने वेगळाच सूर लावला आहे. पांडवांना विजयाचा आनंद धड उपभोगायला मिळु नये यादृष्टीने त्याने उत्तर दिलं असावं. तो म्हणतो,” ज्यांच्यासाठी मला राज्य हवं होतं ते माझे सारे बांधव मारले गेले आहेत. पृथ्वीवरील समस्त शूर क्षत्रियांचा नाश झाला आहे. ही भूमी आता विधवा स्त्रीसमान संपत्तीहीन झाली आहे. म्हणुन तिचा उपभोग घेण्यात मला जराही रस नाही. जेव्हा कर्ण, द्रोण, पितामह भीष्म मारले गेले आहेत तेव्हा माझ्या दृष्टीने आता या युद्धाची काही आवश्यकता उरलेली नाही. आजपासुन ही सारी पृथ्वी तुझी होवो, मला ती नको. मी मॄगचर्म धारण करुन आजपासून वनात जाऊन राहीन. माझे म्हटले जातील असे कुणीच जीवीत नाही तेव्हा मलाही आता जिवंत राहाण्याची इच्छा नाही. आता तु जा आणि जिचा राजा मारला गेला, योद्धे नष्ट झाले, जी संपत्तीहीन झाली अशा पृथ्वीचा उपभोग घे.”

दुर्योधनाने जे चित्र उभे केले ते बर्‍याच प्रमाणात सत्याच्या जवळ जाणारे होते. एखादा ऐरागैरा बावचळुन गेला असता. पण युधिष्ठीर लेचापेचा नव्हता. त्याने दुर्योधनाला लागलीच फटकारले,” मला ही पृथ्वी तुझ्याकडुन दान म्हणुन नको. मी तुला युद्धात जिंकुनच तिचा उपभोग घेइन. तु स्वतःच ज्या पृथ्वीचा राजा राहीलेला नाहीस तिचं दान कसं काय करायला निघालास?” यानंतर त्याने दुर्योधनाच्या सार्‍या पापांचा पाढा वाचुन दाखवला आणि पुन्हा त्याला डिवचले.” चल उठ आणि युद्ध कर. त्यातच तुझं भलं आहे.” हे बोलणे मात्र दुर्योधनाच्या वर्मी लागले. त्याला पांडवांचा संताप येऊ लागला. युधिष्ठीराने बिनतोड उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्याने आता युद्धाच्या दृष्टीने बोलणे सुरु केले,” मी एकटा आणि निशस्त्र आहे तेव्हा मी तुम्हा सार्‍यांशी एकाचवेळी युद्ध असे काय करणार?” युधिष्ठीर पहिली बाजी जिंकला होता. दुर्योधनाला युद्धासाठी त्याने उद्युक्त केले होते. आता त्याने बाहेर येणे आवश्यक होते. युधिष्ठीर पुढे बोलतो,” तुला हवं ते शस्त्र निवड आणि आमच्याशी एकेकट्याने युद्ध कर. आमच्यापैकी एकाला जरी मारलंस तरी सारं राज्य तुझं होईल.” दुर्योधनाने हा प्रकार आता आपल्या बाजुने होत असल्याचा कयास बांधला असावा. कुणाही एकाशी युद्ध आणि त्यातही हव्या त्या शस्त्राने. त्याने अर्थातच ज्यात तो अजिंक्य गणला गेला होता ती गदा निवडली. यानंतर मात्र त्याची जीभ सैल सुटली. मी इंद्राला देखिल घाबरत नाही तर तुम्हाला कशाला घाबरेन अशा वल्गना सुरु केल्या. इथे मात्र युधिष्ठीराने त्याच्या अहंकाराला बरोबर डिवचले. स्वतःच्या शौर्याचा गर्व वाहणार्‍या व्यक्तीला तुल्यबळ प्रतिस्पर्धी हवा असतो. दुबळ्या व्यक्तीला पराभूत करुन त्यांना स्वतःच्या शौर्याचा अपमान करायचा नसतो. युधिष्ठीराने पुन्हा फटकारले,” अरे उठ तर खरा. एकेकाशीच युद्ध करुन आपल्या पौरुषाचा परीचय दे. चल ये माझ्याशीच लढ. आज खुद्द इन्द्राने जरी तुझी साहाय्यता केली तरी तु जिवंत राहु शकणार नाहीस.”

दुर्योधनाच्या पराक्रमाची युधिष्ठीराने ही सरळ सरळ खिल्ली उडवली होती. दुर्योधनासारखा मानी पुरुष हे सहन करणे शक्यच नव्हते. तो त्वेषाने पाण्यातुन बाहेर आला. युधिष्ठीराने दुसरी बाजी जिंकली होती. यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. दुर्योधन भीमाशिवाय इतर कुणाशीही लढणे शक्यच नव्हते. तो कसाही असता तरी वीर पुरुष होता. त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धीच लढण्यासाठी लागला असता. युधिष्ठीराच्या “आमच्यापैकी कुणाशीही लढ” हे आततायीपणाने वचन देण्याबद्दल कॄष्णाने त्याला दोष दिला आहे. मात्र युधिष्ठीराने ही अत्यंत चलाखपणे दुर्योधनाने बाहेर यावे म्हणुन खेळलेली चाल होती असे म्हणण्यास वाव आहे. खुद्द भगवंताला युधिष्ठीराचा कावा यावेळी कळला नाही. तिसरी बाजी अर्थातच भीमाने जिंकली. पांडवांच्या सुदैवाने “मांडीवर गदेचा प्रहार कसा काय करु” असे म्हणुन भीम अडखळला नाही आणि श्रीकृष्णाला दुसरी गीता सांगावी लागली नाही. दुर्योधन मारला गेला. शारिरीक युद्ध भीमाने जिंकले असले तरी या विजयाचा खरा शिल्पकार युधिष्ठीरच.

महाभारतातील चर्चिलेल्या या घटनांमुळे काही प्रश्न मनात डोकावले आहेत. ते या लेखाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आहे. युद्धाचे नियम दोन्हीकडुन मोडले गेले. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडुन सातत्याने झाले. त्यासाठी त्यावेळी जो योग्य वाटेल तो उपाय योजला गेला. महाज्ञानी आणि महापराक्रमी भीष्माने मृत्युशय्येवर युधिष्ठीरासारख्या ज्ञानी माणसाला शांतीपर्वात तत्वज्ञान सांगितले पण स्वयंवरातुन बळजबरीने काशीराजाच्या कन्या हरण करताना हे तत्वज्ञान आड आलेले दिसत नाही. द्रोणासारखा योद्धा पराभूत होत नाही म्हणुन त्याजवर मुलाच्या मृत्युची खोटी बातमी सांगुन दबाव आणताना श्रीकृष्ण नि:शंक असतो. पुढे हा बनाव यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर भीम द्रोणाची स्वधर्माची दुखरी नस दाबतो आणि त्याला शस्त्रत्याग करायला भाग पाडतो. शस्त्रत्याग करुन स्वस्थ बसलेल्या माणसाला धरुन आणावे असे अर्जुनाचे मत असताना धृष्टद्युम्न त्याचे डोके उडवतो. पुढे युधिष्ठीर चलाखिने दुर्योधनाला पाण्याबाहेर काढुन अधर्माने भीमाकडुन मारवतो. या सार्‍या घटना नीट पाहिल्या तर हा प्रश्न पडतो को महाभारतात सांगितलेलं तत्वज्ञान आहे तरी नक्की कुणासाठी? कारण कुणीही ते पाळलेले दिसत नाही. शेवटी तत्वज्ञान हा दुबळ्यांचा धर्म आहे काय? श्रीकृष्णाने प्रत्येकवेळी तत्वज्ञानाचा सोयीस्कर अर्थ लावलेला दिसतो. याचा अर्थ आपदधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे काय? जीव वाचविण्यासाठी खोटे बोलावे, विजय मिळविण्यासाठी युद्धाचे नियम मोडावे, बाहुंत बळ असेल तर सारे तत्वज्ञान काखोटीला बांधुन मुली पळवाव्यात. म्हणजे शारीर बळ हेच शेवटी वरचढ ठरते काय? वरवर पाहता असे वाटते कि “बळी तो कान पिळी” हा नियम प्राचिन काळापासुन चालत आलेला दिसतो.

मात्र दुसर्‍या बाजुने पाहीले तर तत्वज्ञानाची बाजुदेखिल वरचढ दिसते. मी शाल्वाला मनाने वरले आहे म्हटल्यावर भीष्म अंबेला शाल्वाकडे परत पाठवतो. येथे त्याने शक्य असुनदेखिल बळजबरी केलेली नाही. भीमाने ब्रह्मणधर्म न पाळल्याबद्दल द्रोणाला दोष दिला त्यावेळी शस्त्र त्याग करण्याइतका त्याच्या बोलण्याचा परिणाम झाला. याचा अर्थ स्वधर्माने वागण्याला त्या काळात नक्कीच खुप किंमत होती. आपापला धर्म पाळावा, धर्माने सांगितलेली नीतीत्त्वे पाळावीत असा विचार समाजात प्रभावी होता. युधिष्ठीर खोटं बोलला असेल मात्र समाजात सत्यवचनी माणसे असतात. काहींचा त्यांच्यावर विश्वास असतो अशी परिस्थीती होती. द्रोण युधिष्ठीराकडुन अश्वत्थाम्याच्या मृत्युबद्दल खात्री करुन घेणार याची कृष्णाला कल्पना होती, इतका युधिष्ठीर सत्यवचनी होता आणि खरं बोलण्याला इतका मान होता. दुर्बलाशी लढुन निसटलेला विजय पुन्हा मिळण्याची शक्यता असताना तुल्यबळाशीच लढायचं हे नीतीतत्व समोर विनाश दिसतानाही दुर्योधनाने पाळलेलं दिसतं. हे सारं काय दर्शवतं? शारीरबळापेक्षा नीतीतत्वे आणि तत्वज्ञान महत्वाचे नाही काय? कारण या प्रत्येक माणसाने, तो भीष्म असो कि द्रोण कि दुर्योधन, नीतीतत्वाचं पालन करुन जीव गमावला आहे. मग तत्वज्ञान महत्वाचे नाही काय?

कि शारिरीक बल, तत्वज्ञान यापेक्षा बुद्धीबलाचा विजय झाला आहे? तत्वज्ञान पाळण्यापेक्षा तत्वज्ञानाचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लावण्यात श्रीकृष्णापेक्षा वरचढ महाभारतात कुणीही नाही. तत्वज्ञानाचा आपद्धर्म म्हणुन वेगळा अर्थ लावणे याला बुद्धीबलच आवश्यक आहे. द्रोणवधात आणि दुर्योधनाला भीमाकडुन मारवताना कृष्णाने नेम़कं हेच केलं. भीमाने तर तत्वज्ञानाचा वापरच द्रोणाला नेस्तनाबुत करण्यासाठी केला. युधिष्ठीरानेही दुर्योधनाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी बुद्धीचाच वापर केला. याचा अर्थ शारीर बलापेक्षा आणि नीतीत्वापेक्षा बुद्धीच वरचढ असते काय?

शेवटी कुठल्याही परिस्थीतीत विजय मिळविण्यासाठी, जीव वाचविण्यासाठी जे काही करावे लागेल ते योग्यच असा सरधोपट अर्थ यातुन काढला तर तो आततायिपणा ठरेल. मात्र माणसाने संकटात करावे तरी काय? कुठलाही उपाय योजुन जीव वाचवावा? कि तत्वपालन करुन मरावे? हा प्रश्न मला आजच्या काळाला लावावासा वाटतो. आजच्या संघर्षात टिकुन राहावे कि तत्व पालन करुन बाजुला फेकले जाणे पसंत करावे? कि महाभारतानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात जगाने काही वेगळा उपाय या समस्येवर शोधला आहे? महाभारताकडे पाहताना “तत्व कि अस्तित्व” हा मला पडलेला गहन प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

पुन्हा वाचला.
पुन्हा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त लिहिलय.....खूप आवडला लेख!
डोक्यातून जातच नाहिये.....3 वेळा वाचला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...