‘पुस्तकमित्र’ !!

माझी लेक २-३ वर्षांची असतानाची गोष्ट. मुलांसाठी, शाळेत जाण्यापूर्वी व नंतर शिशुवर्गात शिकताना उपयुक्त अशी, ‘हसत-खेळत अभ्यास’ ह्या संकल्पनेला साजेशी काही इंग्रजी पुस्तकं होती. त्यांची साखळी पध्दतीने विक्री (एका संचाची किंमत पन्नास हजार...) व त्यानिमित्ताने असे ग्राहक-पालक हेरून (!) त्यांना ते विकत घेण्यासाठी उद्युक्त करणार्‍या एका समुपदेशक (!) व्यक्तीशी माझी अचानक गाठ पडली. त्यांनी ‘मुलांच्या जीवनात पुस्तकांचं महत्त्व’ सांगायला सुरूवात केली अन मी भारावून गेले. त्यांना घरी येण्याचं निमंत्रण दिलं, माझ्या एका मैत्रीणीलाही बोलावलं. त्या रविवारी ती-मी-नवरा, तिघंही श्रध्देनं(!) त्यांच्या पुढ्यात बसल्याचं मला आठवतं. त्यांनी तेव्हा नक्की काय सांगितलं हे आता विसरले, पण त्याच रविवारी संध्याकाळी लेकीसाठी मराठी बडबडगीतं, भरपूर चित्रं असलेल्या गोष्टींची पुस्तकं अशी जोरदार खरेदी झाली. लगेचच वाचन-पाठही सुरू झाला.
लेकीला पुस्तकांची गोडी लावण्याच्या मार्गावरील ते पहिलंच पाऊल होतं!

तो महागडा पुस्तकसंच आम्ही घेतला नाही. ते समुपदेशक-विक्रेते नाराज झाले व म्हणाले.. "अरेरे! तुमचं बौध्दिक आधी घेतलं हे जरा चुकलंच!" त्यानंतर आजतागायत त्यांची भेट झालेली नाही. परंतु, आमच्या ह्या नैराश्यदायी(!) अनुभवानंतर त्यांची त्या महागड्या पुस्तकसंचाचं विक्रीतंत्र नक्कीच बदललं असणार.

लेकीला वाचता येऊ लागल्यानंतर एक प्रयोग करण्याचं ठरवलं. आमच्याच इमारतीतील तिची एक मैत्रीण, एक मित्र व त्या मित्राची कॉलेजात जाणारी ताई यांना बरोबर घेऊन रोज रात्री इंग्रजी-मराठी गोष्टींच्या पुस्तकांचं वाचन आमच्या घरी सुरू केलं. सुरूवात अर्थातच अत्यंत उत्साहात झाली. मात्र काही दिवसांनी दूरदर्शनवरील एका लोकप्रिय मालिकेच्या वेळानुसार त्या ताईचं टाईम-टेबल बदललं आणि ह्या ताईबाई चिल्ल्यापिल्ल्यांच्यात यायच्या बंद झाल्या. तोपर्यंत मीही नोकरी सोडली होती व पुरेसा वेळ देऊ शकत होते म्हणून मी त्यात भाग घेऊ लागले. आईच्या जव्वळ बसून गोष्टी ऐकायला मिळतात म्हणून लेक खुश होती. तिन्ही मुलांकडे भरपूर पुस्तकं होती. आलटून-पालटून प्रत्येकाची पुस्तकं आम्ही वाचत असू. सोप्या गोष्टी त्यांनी व कधी कठीण म्हणून वा कंटाळा आला म्हणून मी असं वाचन सुरू होतं.

काही दिवसांनी मात्र ‘आज कोणतं पुस्तक वाचायचं?’ ह्यावरून त्या दोन मुलांमध्ये लठ्ठालठ्ठी सुरू झाली. लेक या सार्‍यातून बाजूला होती. तिला ‘आई आपल्याबरोबर आहे’ हा आनंद जास्त होता. जेव्हा ह्या भांडणांचा अतिरेक झाला तेव्हा मात्र त्या दोघांच्या आयांना सांगून हा वाचन-परिपाठ नाईलाजाने थांबवावा लागला. एक चांगला उपक्रम बंद करावा लागतोयं याचं वाईट वाटलं. परंतु तोवर लेकीला वाचनाही गोडी लागली होती. ती आपणहून पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू लागली. माझ्याही मनातला सल कमी झाला.
आजच्या ‘हमारा एक’ च्या जमान्यात ‘माझं म्हणणं इतरांनी ऐकलंच पाहिजे’ ही जी ‘लाडोबा’ मनोवृत्ती बनली आहे त्यातून हे झालं असावं.

आता घर बदलल्यानंतर त्या दोन मुलांच्यात वाचनाची आवड कितपत निर्माण झाली-रुजली-वाढली-टिकली असेल याची काही कल्पना नाही. शिवाय दूरदर्शन-संगणक-सेलफोन च्या लाटेत कितपत शिल्लक असेल याचीही शंका वाटते. ह्या अनुभवातून एवढा धडा मात्र मिळाला की आपण एकटे काही कुणाला पुरे पडू शकत नाही.

आमच्या ह्या घराजवळ एकही वाचनालय नाही. परंतु वाचनालयांच्या घरपोच पुस्तक पाठवण्याने वाचन-परिपाठ अव्याहत सुरू राहू शकला. लेक टीनएजर असताना ३ ते १५ वयोगटातील मुलांसाठी फक्त इंग्रजी पुस्तकांच्या घरपोच वाचनालयाची उत्तम सोय झाली. त्या बाईंनी सुरूवातीला त्यांच्या मुलांसाठी जी असंख्य पुस्तकं जमवली त्याचा उपयोग मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी अशारितीने केला. त्यांच्या यादीतील आपल्याला हवी असलेली तीन पुस्तकं, दोन गोष्टींची व एक माहितीपूर्ण, असा दर आठवड्याला पुस्तकांचा ‘रतीब’ होत असे.
आता ती जागा ब्रिटीश कौन्सिलच्या घरपोच सेवेने घेतली आहे. इंग्रजी पुस्तकांच्या ‘रतीबा’ने नवराही आता आमच्यात सामील झाला आहे.
आम्ही तिघंही आपापल्या आवडीनुसार वाचनानंद घेत असतो.

ह्या वाचनानुभवाने असं वाटलं --- ज्योतीने ज्योत लावावी त्याप्रमाणे आवड आणि सवड दोन्ही आहे अशा वाचनप्रेमींनी, आपल्या सोयीनुसार-उपलब्ध वेळानुसार परंतु ‘जाणीवपूर्वक’, ‘फक्त एक’ नवीन वाचक तयार होण्यासाठी मनापासून प्रयत्न केला तर? आपली मुलं-नातवंडं-शेजारी-मित्रपरिवार, नातलग ह्या असंख्य गोतावळ्यातून किमान एक वाचक तयार व्हावा यासाठी प्रत्येकाने काहीतरी केलं पाहिजे.

केवळ पुस्तकं भेट देण्यातून हे साध्य होईलच ह्याची खात्री नाही. थोडीशी चिकाटी ठेवली व मुलांबरोबर वाचनाची मेहनत(!) घेतली तर लहान वयापासून ‘पुस्तकमित्र’ घडवणं अवघड ठरू नये!

तुम्हांला काय वाटतं?

--- चित्रा...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत.

काही दिवसांनी मात्र ‘आज कोणतं पुस्तक वाचायचं?’ ह्यावरून त्या दोन मुलांमध्ये लठ्ठालठ्ठी सुरू झाली. लेक या सार्‍यातून बाजूला होती. तिला ‘आई आपल्याबरोबर आहे’ हा आनंद जास्त होता. जेव्हा ह्या भांडणांचा अतिरेक झाला तेव्हा मात्र त्या दोघांच्या आयांना सांगून हा वाचन-परिपाठ नाईलाजाने थांबवावा लागला. एक चांगला उपक्रम बंद करावा लागतोयं याचं वाईट वाटलं. परंतु तोवर लेकीला वाचनाही गोडी लागली होती. ती आपणहून पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू लागली. माझ्याही मनातला सल कमी झाला.
आजच्या ‘हमारा एक’ च्या जमान्यात ‘माझं म्हणणं इतरांनी ऐकलंच पाहिजे’ ही जी ‘लाडोबा’ मनोवृत्ती बनली आहे त्यातून हे झालं असावं

मात्र हि टीका अस्थानी होती असे वाटले, मला टीका करायची झाल्यास मी म्हणेन 'वाचनाची आवड असूनही भांडभाडी झालीच, ती थांबवता आली नाहीच पण त्याचे खापर मात्र दुसऱ्याच गोष्टीवर फुटले'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0