Skip to main content

हॅरी पॉटरबद्दल.

अनेकांसाठी हा प्रतिसाद म्हणजे 'वरातीमागून घोडे' असेल पण मागच्या एका धाग्यात मेघनाने "ह्या स्नॉबिशपणापायी अजून हॅरी पॉटर वाचलं नव्हतं" असं म्हटलं होतं आणि मुक्तसुनित यांनीही कुठेतरी मुलासाठी हॅरी पॉटर वाचायला कसं आहे अशी विचारणा केली होती त्यामुळे आमच्यासारखे अनेक इथे असावेत असा माझा समज आहे. तरं हे पुस्तक आमच्या कन्यारत्नाच्या कृपेने आमच्या घरात घुसलं आणि मला त्याबद्दल आवर्जून काही लिहावसं वाटलं.
एखादी गोष्ट अगदी प्रमाणाबाहेर लोकप्रिय झाली की त्यात काहीतरी सवंग आणि बटबटीत असलेच पाहिजे अशी माझी त्याबद्दलची धारणा सहसा चुकत नाही, त्यामुळेच मी हॅरी पॉटरकडे नेहमीच संशयाने पाहिले होते. माझी मुलगी वाचनालयातून (एकदम तिसरा भाग) घेऊन आली तेंव्हाही मी त्याकडे थोडे नाक मुरडूनच पाहिले होते. अर्थात सात वर्षाच्या मुलीसाठी हा तिसरा भाग स्वतःच वाचायला थोडा जड जात असल्याने मी तिच्याबरोबर पहिले प्रकरण वाचायला लागले. त्यातल्या दुसर्या तिसर्या परिच्छेदात हॅरीला त्याच्या 'विचक्राफ्ट अँड विझर्ड्री' शाळेतून 'Witch Burning in the Fourteenth Century Was Completely Pointless' या विषयावर निबंध लिहायला सांगितलेला असतो. या मजेशीर वाक्यानंतर माझ्या मनात थोडी उत्सुकता निर्माण झाली आणि माझ्याही नकळत मी वाचनात गुंतून गेले. या आणि यासारख्या वाक्यांतून हॅरी पॉटर हे वाटते तितके सरळ-धोपट आणि फक्त मुलांसाठीचे जादुई पुस्तक नाही हे लक्षात येते आणि लेखकाची मोठ्या वाचकांनाही गुंतवून ठेवण्याची कुवत जाणवते. यातले भावविश्व एका मुलाचे आहे; हा मुलगा एक 'स्पेशल' आणि 'प्रसिद्ध' मुलगा असला तरी हा अनाथ आहे आणि आपल्यापेक्षा 'वेगळ्या' असलेल्या लोकांच्या आधारावर रहात असल्याने मनातून दु:खी आहे. हा 'खास' मुलगा असला तरी वर्गातला सर्वात अभ्यासू मुलगा नाही, सर्वात हुषार मुलगाही नाही; हा धाडसी आहे पण निर्भीड नाही. त्याच्या मनात शंका आहेत, त्याच्या मनात अपराधीपणा आहे, त्याच्या मनात भिती आहे. त्याला स्वतःच्या 'खास'पणाबद्दल कल्पना आहे पण त्याला हमखास यशाची खात्री नाही.
मला वाटते या प्रकारच्या मिश्र, करड्या रंगाच्या, वेगळ्या असूनही अनेक पातळीवर सामान्य असलेल्या व्यक्तीरेखा हे हॅरी पॉटरचं यश आहे. ही पुस्तके वाचायला सोपी असली तरी रसहीन आणि बालबुद्धी नाहीत. भाषा सहज असली तरी तेच ते रटाळ, गुळगुळीत शब्द वापरलेली नाही आणि ओघवती आहे. कल्पनाविलास चांगला असला आणि अद्भूत कथा असली तरी ही अद्भूत पात्रे मुळातून फार माणूस आहेत आणि मानवी नितीमत्तेपासून, प्रेरणांपासून, मानवी नात्यांपासून आणि मानवी विकारांपासून फार दूर जात नाहीत. त्यामुळे हे जग सर्वसामान्य माणसांना जादुई असलं तरी अपरिचित नाही त्यामुळेच त्यातल्या नाट्याकडे सर्वसामान्य वाचक अगदी सहजपणे आकर्षित होतो. लेखिकेची वैयक्तिक लिबरल मूल्यव्यवस्थाही या पात्रांच्या रुपाने व्यक्त होते. 'मगलबॉर्न'(म्हणजे माणसांना झालेली विच किंवा विझर्ड मुले) मुलांना काही 'प्युअरब्लड' खलनायकी पात्रांकडून होणारा वंशवादाचा त्रास, सर्वात हुषार हर्माईनी ग्रेंजर ही 'मगलबॉर्न' आणि मुलगी असणं, रॉनची (हॅरीचा खास मित्र) आर्थिक परिस्थिती बेताची असणं वगैरे गोष्टींतून शाळकरी मुलांना काही चुकीचा संदेश मिळणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. विझर्ड्स आणि मगल्स यांची विश्वे पूर्णपणे वेगळी असली तरी विझर्डनी मगल्सना मुद्दामून त्रास देऊ नये आणि एकमेकांचा आदर करावा अशी शिकवणूक विझर्ड्सना शाळेत मिळालेली असते.
या पुस्तकांमधे इंग्रजी साहित्यातले, मायथलॉजीतले बरेच संदर्भ येतात (अगदी बायबल, शेक्स्पिअरपासून ते जेन ऑस्टीन पर्यंत) ते वाचतानाही प्रौढ वाचकांना मजा येते आणि पुस्तक बाळबोध वाटत नाही.
टीव्ही आणि व्हिडिओ गेमच्या जमान्यात सर्वसामान्य माणसांना ही पुस्तके वाचायला प्रवृत्त करणार्या रोलिंग बाईंचं मला कौतुक वाटलं आणि ही पुस्तके एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळालेली असूनही सवंग नाहीत आणि खरेच वाचनीय आहेत याचं आश्चर्यही वाटलं.
वय वर्षे सात ते बारा वर्षांच्या मुलांना तर आवर्जून वाचायला द्यावीत अशी ही पुस्तके आहेत आणि त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे पुस्तकांची पातळी आणि त्यातल्या व्यक्तीचित्रांची वयेही वाढत जातात हेही चांगलेच आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांनीही ही पुस्तके एकत्र वाचली तर आडलेले शब्द संकल्पना त्यांना समजाऊन सांगता येतील आणि पुस्तके बाळबोध नसल्याने त्यांचा शब्दसंग्रह वाढायलाही मदत होईल. मी या पुस्तकांची नक्कीच शिफारस करेन.
आधी तिसरा भाग, मग पहिला, त्यानंतर दुसफा आणि मग चौथा या विचित्र क्रमात ही पुस्तके वाचतो आहोत. पुस्तक वाचून झाले की मग त्याचा सिनेमादेखिल पहातोय. सिनेमेदेखिल त्यातल्या उत्तम पात्रनिवडींमुळे मनापासून आवडले.
हॅरी पॉटर वाचून कोणाचे त्याबद्दल प्रतिकूल मत झाले असेल तर त्याबद्दल वाचायला आवडेल, माझ्याकडून काही मुद्द्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे का किंवा काही समज कमी पडली आहे का ते तपासता येईल. आता हे सगळं आधीही कुठेकुठेतरी केलं गेलं आहेच वगैरे ठीक आहे पण त्याशिवाय काय बाबी खटकल्या ते जाणून घ्यायला आवडेल.

======

संपादकः या सुंदर मुक्तकाच्या निमित्ताने हॅरी पॉटर व एकूणच विविध भाषांतील उत्तमोत्तम परीकथांवर, कल्पनारम्य कथा/साहित्यावर विविधांगांने चर्चा करण्यासाठी या प्रतिसादाचे रुपांतर वेगळ्या धाग्यात करत आहोत.

ऋषिकेश Fri, 21/02/2014 - 10:11

हॅरी पॉर्टर हा प्रकर पहिल्यांदा कॉलेज संपल्यावर वाचला.
पहिलेच पुस्तक उत्कंठा, बेसिक प्लॉट वगैरे रचण्यात बेमालूम यशस्वी झाले होते. लगेच दुसरे पुस्तक व अधाशा सारखे तिसरे पुस्तक वाचले.
पहिल्या तीन पुस्तकांचे बिंज रिडिंग केलेय म्हणा ना!

यापैकी तिसरे पुस्तक तर मला बेहद्द आवडले. इतके की मी स्वतःला हॅरी पॉटरचा फॅन म्हणू लागलो. हॅरीला नावं ठेवणार्‍यांकडे सहानुभुतीच नव्हे तर रागानेही पाहु लागलो.
पण प्रत्येक क्लायमॅक्सला अँटिक्लायमॅक्स असावा तसे त्यानंतर चौथे पुस्तक हाती पडले. पुस्तकाच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत, त्याच्या बांधणीमध्ये विरळपणा/पातळपणा/हलकेपणा येत गेला. इतक्या भागांत गोटीबंद/गोळीबंद असणार्‍या कथा आता अधिक मोहक वाक्यांनी वगैरे सजल्या खर्‍या पण कथेला रंजक करायच्या भरताडात पात्रांची उभारणी खुंटली.

तरी एखादे पुस्तक निसटले असेल असे म्हणून पाचवे पुस्तक हाती घेतले. नुसते पाणीच हाताला लागले. कथा वाहत होती पण तीला ना दिशा होती ना उत्सुकता. अगदी प्रेडिक्टेबल प्रसंग, तेच ते वर्ग नी तसेच संवाद. शेवटी हॅरीचे भूत मानेवरून उतरले आणि हे पुस्तक पुर्ण न करता हॅरी पॉटरला राम राम ठोकला.

(मात्र माझ्या जुन्या 'हॅरी कल्ट' पैकी अनेकांनी नेटाने सगळे भाग वाचले आणि त्यांच्या मते पुन्हा सहाव्या/सातव्या भागात दर्जा सुधारला आहे व शेवटचा भाग उत्तम क्लायमॅक्स साधतो. बघु अजूनतरी पुन्हा त्या वाटेला जायची हिम्मत होत नाहीये. या चर्चेनंतर इच्छा होईल तर बरंच)

==========

समांतरः चित्रपट निर्मितीमात्र चौथ्या व पाचव्या भागाची पुस्तकापेक्षा उजवी वाटली. कदाचित लेखन न आवडल्याने तसे वाटले की काय कोण जाणे!

सम्पत Sat, 22/02/2014 - 10:45

In reply to by ऋषिकेश

प्रतिसादाशी शंभर टाके सहमत. तिसर्या भागानंतर चित्रपट यायला सुरवात झाली त्याचा परिणाम बहुतेक पुढच्या भागांच्या कथानकावर / शैलीवर झाला असेल. सहावा आणि सातवे भाग तुलनेने चांगले आहेत, पण तिसरा भाग सगळ्यात उत्तम. चौथा, पाचवा चित्रपट चांगला होता ह्याच्याशीही सहमत. पण सहावा, सातवा आणि आठवा चित्रपट बघताना अगदी कंटाळा आला.

कान्होजी पार्थसारथी Fri, 21/02/2014 - 10:28

रोलिंग बाईंच्या पुस्तकांत त्या जादुई दुनियेतील बरेच तपशील आहेत. त्यात अचंबा वाटण्यासारख्या, जादुगारांच्या रोजच्या-व्यवहारातल्या अनेक गोष्टी. त्यामुळे ते विश्व "उभं" करायला ती बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली आहे. तरीही मला एक बाब खटकली. त्यात "देव" ही संकल्पना/व्यवस्था कुठेच कशी नाही ती. म्हणजे त्या गोष्टीत ख्रिसमस आहे, पण "येशु" कुठे दिसला नाही. बरे जादुगारांच्या त्याविषयी काय संकल्पना आहेत ते आलेले नाही. पॉटरहेड्स यावर अधिक प्रकाश टाकतील, अशी आशा आहे.

मुक्ता_आत्ता Mon, 24/02/2014 - 10:17

In reply to by कान्होजी पार्थसारथी

कारण खऱ्या पाश्चिमात्य विचक्राफ्ट आणि विझार्ड्री - जादूगारी व तंत्र परंपरांकडे पाहिल्यास असं लक्षात येईल की ख्रिश्चन धर्म निर्माण होण्याच्या कितीतरी आधीपासून त्या अस्तित्वात होत्या व त्यांच्याकडची 'देव' ही संकल्पना अत्यंत निसर्गवादी होती. ख्रिश्चन धर्म आल्यावर त्याने अशा श्रद्धांना नास्तिक, भ्रष्ट ठरवलं व त्या परंपरांवर आपला एकेश्वरवाद लादला (- इनक्वीझिशन, विच बर्निंग वगैरे प्रकारांबद्दल आपण ऐकलं आहे काय?).

असं असूनही पॉटर मालिकेत "ख्रिसमस वगैरे आहे, पण येशू कुठे दिसला नाही" अशी करामत रोलिंगबाईंना ख्रिश्चनांचा रोष ओढवून न घेता जादूगारी व तंत्राचं विश्व उभं करायचं आहे याचा परिणाम आहे. त्यांच्या मुलाखती ऐकल्यास / वाचल्यास ते लक्षात येतं.

एलिफ़ास लेवी, जोसेफ एनेमोझर आदींची हिस्टरी ऑफ मॅजिक वरील पुस्तके वाचावीत. 'विचक्राफ्ट अँड मॅजिक इन युरोप' या नावाने लंडनच्या अॅथेलॉन प्रेसने काही खंडही प्रकाशित केलेले आहेत.

मणिकर्णिका Fri, 21/02/2014 - 10:41

हाफ ब्लड प्रिन्स हा तर माझा सर्वात आवडता भाग आहे. हा भाग वाचताना जिगसॉ पझलमधले सगळे हरवलेले तुकडे आत कुठे एकत्र येतायेत आणि पूर्ण चित्राचा अंदाज येतोय असं होतं. रोलिंग्जने फिलॉसॉफर्स स्टोन लिहीतानाच पूर्ण मालिकेचाच विचार करून ठेवला असला पाहिजे याचा प्रत्यय हा भाग वाचताना पुन्हा पुन्हा येतो. पुन्हा डंबलडोर आणि हॅरीमधला बाँड हेडमास्टर-शिष्य यापेक्षाही बराच काही असण्यावर (जे आपल्याला एव्हाना माहित झालेले असते, पण हॅरीने तो मनोमन कबूल करणे बाकी असते) शिक्कामोर्तब होते.हॅरीच्या, डंबरडोरच्या काही गोष्टी खूप अंतर्मुख करतात.हॅरी पॉटर हे लहान पोरांचं पुस्तक आहे हे विधान मला आजतागायत पटलेलं नाही.मी हॅरी पॉटर सिरीज जाणतेपणी वाचलेली आहे आणि मला त्यातून ब-याच गोष्टी मिळाल्या. हॅरीची अस्वस्थता, त्याची मुळं उचकटलेली असणे, त्याचं कुटुंबाविना असलेलं त्रिशंकूपण आणि त्यातून वीझलींशी तयार झालेला लोभस बाँड, स्वतःविषयी कोणत्याही भ्रामक कल्पना न ठेवणं, 'द चोझन वन' असूनही एकाही भागात त्याच्या डोक्यात हवा न गेलेली दाखवणं हे खरोखरच खूप ग्रेट आहे. रिसरेक्शन स्टोन हातून जाऊ देताना त्याचा इतक्या लहान वयातला नि:संगपणा मला बाय गॉड खूप भिडला होता. मला इतके मोह आहेत, लालसा आहेत, 'जास्तीत जास्त' मिळ्वण्याची वखवख आहे, मला नसता ब्वा सोडवाला एल्डर वाँड आणि रिसरेक्शन स्टोन. पण समहाऊ मला हॅरीबद्दल 'गांडा छे भई!' असं कधीच वाटलं नाही, आणि माझ्यामते हे माझ्यालेखी या सीरीजचे यश आहे.

विझर्ड्स ऑफ ओझ हे लहान मुलांचं पुस्तक आहे हे विधान करायला मी धजावणार नाही, तसंच हॅरी पॉटरचंही आहे.

तिरशिंगराव Fri, 21/02/2014 - 11:05

माझी दोन मुलं माझ्यापेक्षा कैक पटीने हुशार आहेत. तरीही ती दोघं, 'हॅरी पॉटर' चे सगळे भाग वाचून त्यावर चर्चा करायची तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. त्यानंतर एक दोन चित्रपट आले,ते,मी टी.व्ही.वर पाहिले. त्यामुळे,पुस्तक न वाचताच,माझे त्याविषयी प्रतिकूल मत झाले होते. आणि तसे बोलून दाखवल्यावर, " बाबा, उगाच पुस्तक वाचल्याशिवाय मत बनवू नकोस' असे, माझ्या मुलीने मला ठणकावले होते. पण तरीही, ती पुस्तके वाचायची मला कधी इच्छा झाली नाही. आता ती वाचायची की नाही, हे मी या चर्चेनंतर ठरवणार आहे.

ॲमी Fri, 21/02/2014 - 11:15

आह! माझी अत्यंत आवडती सिरीज!
मीपण बर्याच उशिरा वाचली. एप्रिल २०१२मधे. बिँज रिडीँगच केलल. प्रत्येकाचा वाचनाचा वेग अलग असतो, माझ्यासाठी ३५ दिवसात ७ जाडी पुस्तकं संपवण म्हणजे _/\_ होत. खरंतर पाच पुस्तक २०- दिवसातच झालेली, पण ऑब्सेस होतोय अस वाटल्याने थोडा वेग कमी केला. मला त्यातल्यात्यात हाल्फ ब्लड प्रिँस थोड कमी आवडल. फार काही घडत नाही त्यात. पण डेथली हॉलोजमधे इतक कैकै घडत की ती कमी भरुन निघते.
पण हो पॉटर कल्टमधे मात्र मी नाहीय ती आपली प्रवृत्तीच नाही.

वर्षा०७१४ Fri, 21/02/2014 - 11:39

माझेही हॅरी पॉटरबद्दल अगदी असेच विचार होते (रादर आहेत). पण तुमचा हा लेख वाचून फेरविचार करण्यात येईल. आता वाचून बघीन पहिला भाग.

>>>ही पुस्तके वाचायला सोपी असली तरी रसहीन आणि बालबुद्धी नाहीत. भाषा सहज असली तरी तेच ते रटाळ, गुळगुळीत शब्द वापरलेली नाही आणि ओघवती आहे. कल्पनाविलास चांगला असला आणि अद्भूत कथा असली तरी ही अद्भूत पात्रे मुळातून फार माणूस आहेत आणि मानवी नितीमत्तेपासून, प्रेरणांपासून, मानवी नात्यांपासून आणि मानवी विकारांपासून फार दूर जात नाहीत. त्यामुळे हे जग सर्वसामान्य माणसांना जादुई असलं तरी अपरिचित नाही त्यामुळेच त्यातल्या नाट्याकडे सर्वसामान्य वाचक अगदी सहजपणे आकर्षित होतो.

हे फार महत्त्वाचं आहे.
:)

सविता Fri, 21/02/2014 - 12:06

मी पण बिंज रिडिंग केले असे म्हणता येईल. १ ते ७ भाग लागोपाठ वाचले साधारण १५-२० दिवसात! मग भरभर वाचताना मधले संदर्भ निसटले असे वाटून परत एकदा १-७ लगेच लागोपाठ वाचले. त्यानंतर पण काही काळाने परत एकदा १ ते ७ लागोपाठ वाचले पण या वेळी अतिशय निवांतपणे! पहिला भाग तर मी कधीही, कुठल्याही पानावर सुरू करून वाचू शकते आणि अगणित वेळेला तसा तो वाचला पण आहे.

आता बरेच दिवस्\वर्षे झाली त्यामुळे आठवत नाही पण तो हॅग्रिड च्या भावाचा संदर्भ असलेला भाग मला फार बोअर झाला. पहिली वेळ सोडता इतर सर्व वेळी वाचताना मी तो भाग आला की सरळ नजर फिरवून पान उलटून टाकायचे.

पहिल्यांदा जेव्हा ६वा आणि ७वा भाग वाचत होते तेव्हा मी घरापासून लांब आणि एकटी राहात होते आणि शक्यतो रात्री वाचायचे, तर मध्यरात्रीनंतर वाचत असताना मला एका पॉइन्ट्ला इतकी भिती वाटू लागली (तशीही मी एरवी घाबरटच म्हणा) की मी वाचन थांबवून एका दुसर्‍या टाइमझोन मध्ये राहणार्‍या मित्राला "एकटीला भिती वाटतेय तर चॅट करायला ये" असा संदेश पाठवला. तो चॅटवर आल्यावर त्याने कशाची भिती वाटते असे विचारल्यावर माझ्याकडून "लॉर्ड वोल्डेमार्ट" असे पण लिहीले गेले नाही त्या वेळी मीसुद्धा "यू नो हू" च वापरले. अर्थात दुसर्‍या दिवशी सकाळी हे सगळे आठवून हसू आले पण एकटीच बसून लागोपाठ आणि वेगाने ते पुस्तक वाचताना मी इतकी त्या वातावरणात एकरूप झाले की "लॉर्ड वोल्डेमार्ट" चा वाढणारा प्रभाव मलापण कथेतल्या पात्रांप्रमाणे जाणवू लागला.

केतकी आकडे Fri, 21/02/2014 - 12:28

हॅरी पॉटरचं बिंज रिडिन्ग करणार्यातली मी ही एक! हॅरी पॉटर माझ्यासाठी गेल्या २ वर्षांपासून बेड-टाईम स्टोरी आहे.
प्रिझनर नंतर सगळ्यात जास्त आवडलेला भाग सातवा - डेथली हॉलोज. सगळी पात्रं खूप ग्रो झाली आहेत त्यात आणि आधीच्या भागांमधे जो तोच तोचपणा येत होता तोही नाहीये. लहान मुलांचं पुस्तक अज्जिबात नाहीये ते. मरण, मैत्री, परिस्थीती समोर शरणागती नाही, तर स्वीकार करण्याची वृत्ती, एकटेपणा. अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे जादुई दुनियेतली पात्रं असली तरी हिरोइझम नाहीये, नॉर्मल माणसांसारखी भावभावना असलेली माणसं आहेत.

>>पण "येशु" कुठे दिसला नाही. बरे जादुगारांच्या त्याविषयी काय संकल्पना आहेत ते आलेले नाही

हे मला उलट खूप कौतुकाचं वाटलं. येशु किंवा जनरल देवाबद्दल काही नाहीये म्हणुन काही कमी आहे असं अगदीच कधी वाटलं नाही.

मेघना भुस्कुटे Fri, 21/02/2014 - 13:05

तिसरं पुस्तक बाजारात आल्यानंतर कधीतरी मी हॅरीमालिका वाचायला घेतली. तोवर 'ह्यॅ:! काहीही काय!' असाच नजरिया होता!

हे माझं हॅरीबद्दलचं मत. इथे पुनरावृत्ती नको. :)

ऋषिकेश Fri, 21/02/2014 - 13:12

हॅरी व्यतिरिक्त याच धर्तीच्या पुस्तकांबद्दलही कट्ट्यावर जोरदार चर्चा झाली होती.
विश्वनाथ मेहंदळे, मस्त कलंदर, निदे आणि (राधिका/मणिकर्णिका) यांना हॅरी आवडत नसेल तर त्यांच्या आवडत्या फँटसी साहित्यावर चर्चेसाठी आवताण देत आहे!

राजेश घासकडवी Fri, 21/02/2014 - 13:50

हॅरी पॉटर मला बेहद्द आवडलेल्या पुस्तकांपैकी एक. पहिल्या दोन भागांत जे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे ते फार सुंदर आहे. चौथ्या भागापर्यंत प्रचंड आवडलेली मालिका. नंतरच्या पुस्तकांचा आकार वाढायला लागला... आणि कंटाळा यायला लागला. एक कर्तव्य म्हणून संपवल्याचं आठवतंय. पुढच्या पुस्तकांचीही कथा चांगली आहे, मात्र पहिल्या तीन पुस्तकांचाच आकार कायम ठेवला असता तर बरं झालं असतं.

एकंदरीत हॅरी पॉटरचं लहान मुलांमध्ये असलेलं वेड मी त्या काळात प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पुस्तक यायच्या दिवशी दुकानाबाहेर लाईन लावायला आईबापांना भाग पाडायचं. मग ते तीनशे ते सहाशे पानी पुस्तकांचे ठोकळे वीकेंडला अधाशासारखे वाचून संपवायचे. आणि सोमवारी वर्गांत जाऊन त्यातल्या बारकाव्यांवर चर्चा करायची. आठ-दहा वर्षांची मुलं हे करतात. त्यांच्या शाळेच्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम सहज संपवून टाकतात. जर सगळाच अभ्यासक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने मांडता आला तर...

घनु Fri, 21/02/2014 - 14:05

मी पण हॅरी पॉटर चे पहिले तिन भाग वाचले, चौथा भाग जरा बोर वाटू लागला .. पण पुढे मग लिंक तुटल्यासारखं झालं आणि पुन्हा काही वाचन झालं नाही, पण नक्कीच वाचेन ४-७ भाग (पण त्याआधी बरीच बाकी पुस्तकं 'वेटिंग' मधे असल्याने केव्हा योग येईल हपॉ वाचायचा काय माहिती)

अनुप ढेरे Fri, 21/02/2014 - 14:31

प्रचंड आवडते मला ही सीरिज. पहिले ४ भाग बिंज रीडिंग करून संपवले. पुढच्या तीनही भागांसाठी १-२ महिने आधी बुक करणे आणि रिलीजच्या दिवशी सकाळी ७ वाजत दुकानातून आणून सलग वाचून काढणे हे सोपस्कार केले आहेत. मजा यायची. तो दुकानदार पण चांगला होता. त्या दिवशी १०च्या ऐवजी ७ला दुकान उघडायचा :)
सगळ्यात आवडलेली पुस्तकं तिसरं आणि चौथं. पाचवं सगळ्यात कमी आवडलेलं.

मी Fri, 21/02/2014 - 14:34

मोठ्यांना हि सिरीज का आवडली असावी असा विचार केल्यावर मला असं जाणवलं कि मोठे आपल्या लहानपणीचे 'रम्य कल्पनाविश्व' ह्या कथामालिकेत शोधत असतात, म्हणजे कुटुंब आहे पण तिचा तिटकारा आहे अगदी सुट्टितपण आहे, सगळे अद्भुत जग मित्रांसोबत आहे, शाळा फक्त नावालाच आहे, ह्या कल्पनाविश्वात आपण हुशार नाही, धाडसी नाही तरी हिरो आहोत ह्या बालसुलभ पण प्रौढपणी जाणवलेल्या भावनेला हात घालणारा हॅरी पॉटर आहे.

मला स्वतःला असलेला आक्षेप म्हणजे सुरुवातीला थोडीशी गमतीदार आणि हलकी-फुलकी जादुई कथा शेवटी शेवटी बऱ्यापैकी हिंसक होत जाते, शेवटचे काही भाग धड लहान मुलांसाठीहि वाटत नाहीत किंवा धड मोठ्यांसाठीहि वाटत नाहीत. शेवटच्या काही भागात दाखवलेलं गडद जादुई विश्व ओढून-ताणून दाखवल्या सारखं वाटलं. दुसरा आक्षेप म्हणजे हा रड्या हिरो म्हणजे काहिवेळेला तर मला ड्रॅको हॅरिपेक्षा जास्त आवडला आहे.

हि कथामालिका स्त्रियांना स्टिरिओटिपिकल भूमिकेतच दाखवते पण त्यावर इथे आक्षेपाच 'अ'देखील निघू नये ह्यावर आश्चर्य वाटले, किंवा हॅरी पॉटरची मोहिनी पडल्यामुळे ह्या मुद्द्याकडे फारसे लक्ष इथल्या किंवा बऱ्याच प्रौढांचे जात नसावे.

ह्याच कथामालिकेच्या आसपास टोकीनच्या लॉर्ड ऑफ दि रिन्ग्स् चे वाचनहि केले होते, एलओटीआर एचपि मालिकेपेक्षा 'निर्भेळ आणि दमदार कल्पनाविश्व' साकारण्यात सरस असल्याचे निदान मला तरी वाटते, एचपिची कथामालिका नकळत का होइना पण तिच्या फॅन्स-कल्चरच्या अपेक्षेप्रमाणे घडत गेली जे एलओटीआरच्या बाबतीत घडले नाही ह्या मुद्द्यात मला दम वाटतो.

बॅटमॅन Fri, 21/02/2014 - 14:38

In reply to by मी

हि कथामालिका स्त्रियांना स्टिरिओटिपिकल भूमिकेतच दाखवते पण त्यावर इथे आक्षेपाच 'अ'देखील निघू नये ह्यावर आश्चर्य वाटले, किंवा हॅरी पॉटरची मोहिनी पडल्यामुळे ह्या मुद्द्याकडे फारसे लक्ष इथल्या किंवा बऱ्याच प्रौढांचे जात नसावे.

हा मुद्दा रोचक आहे. हरि कुंभारगाथा न वाचल्याने वरील प्रश्नाच्या उहापोहाच्या प्रतीक्षेत.

बाकी एलोटीआर तर नादच नै करायचा. द्वापरयुगातले (Third age of the world) कल्पनाविश्व त्यात जसे मांडले आहे ते फार म्हंजे फारच जबरी आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 21/02/2014 - 14:54

In reply to by बॅटमॅन

संपूर्ण सहमत.

हॅरी पॉटरमधली स्त्रीपात्रं मलापण नाही आवडत. साधारणतः उजव्या बाजूच्या स्त्रियांना ज्या प्रकारचं स्वातंत्र्य + सबलीकरण अभिप्रेत असतं, त्याच प्रकारे हॅरीमधल्या मुली नि स्त्रिया रंगवलेल्या आहेत असंच माझंही मत.

मिसेस वीझ्ली (प्रेमळ, घरगुती, मुलांशी येऊन नडल्यावर पराक्रमी, पटकन रडणारी), रीटा स्कीटर (पत्रकारी स्टिरिओटाईप्ड खलनायिका), हरमॉयनी (प्रेमळ, सारासार विचार करणारी, रॉनला टिपिकल मुलींप्रमाणे सांभाळून घेणारी, शेवटच्या भागात हे तिघे मोहिमेवर निघाल्यावर हीच स्वैपाकाचं पाहते आणि डिफेन्सिव स्पेल्सचंही पाहते हा बोलका तपशील), बेलॅट्रिक्स (हीपण व्हॉल्डरमॉटची वेडसर भक्त) वगैरे वगैरे.

ऋषिकेश Fri, 21/02/2014 - 14:40

In reply to by मी

एलोटीआर, हॅरीबोवांपेक्षा अधिक बांधीव, अधिक रंजक व तुमच्याच भाषेत सांगायचं तर "'निर्भेळ आणि दमदार कल्पनाविश्व' साकारण्यात सरस"" आहे या मताशीपूर्ण सहमती.
याचंही बिंज वाचन केलं होतं. शेवटापर्यंत पुस्तक खाली ठेववलं नव्हतं!

(फक्त याचे चित्रपट आधी पाहिले होते, त्यामुळे पात्रांना आगाऊ चेहरा होता, तो पुसायला बराच वेळ लागला :( )

बाकी, पॉटरकथेच स्त्रीयांबद्दलच नाही तर इतरही काही बाबतीत काहिसा प्रतिगामी (प्रसंगी कुचकट/ब्रिटीश आढ्यता इत्यादी) विचार आहेच, पण विश्वच वेगळं म्हटल्यावर आपल्या विश्वातील कोणती नैतिक तत्त्वे तिथे न्यायची व कोणती नाहीत हे स्वातंत्र्य लेखिकेचं .. ते तिला दिलं इतकंच!

बॅटमॅन Fri, 21/02/2014 - 14:44

In reply to by ऋषिकेश

त्यामुळे पात्रांना आगाऊ चेहरा होता

होय होता. पण वाचल्यावर तो चेहरा पुसला न जाता उलट अजून दृढ झाला. (काडी)सारूमान, गँडाल्फ, आरागॉर्न, लेगोलास, गिमली, सॉरॉन, गॉलम, अन सॅम-बिल्बो-फ्रोडो आदि पात्रे वर्णनाबरहुकूम इतकी हुबेहूब उभी केलीत त्याला तोड नाही. पीटर जॅकसन नमोऽस्तुते!

ऋषिकेश Fri, 21/02/2014 - 14:47

In reply to by बॅटमॅन

पण वाचल्यावर तो चेहरा पुसला न जाता उलट अजून दृढ झाला.

आधी दृकश्राव्य अनुभुती घेतल्यानंतरही वाचताना मुळातून पात्राची कल्पना करणे कठीण वाटते. त्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे.
आधी चित्रपट/नाटक वगैरे पाहिलं आहे आणि तरीही वाचन करताना ती पात्रे लगेच डोळ्यापुढे आली नाहित तर वाचक भलताच तटस्थवृत्तीचा आहे किंवा मग पात्रयोजना चांगलीच गंडली आहे असे समजायला हवे ;)

कान्होजी पार्थसारथी Fri, 21/02/2014 - 19:37

In reply to by मी

शिवाय ह्या सगळ्या ष्टोरी'त' असलेला मुद्दाम आणलेला सामाजिक चेहरा कृतक, चवीपुरता वाटतो. त्यात पुरेसे तपशील नाहीत. मगलबॉर्न, प्युअर-ब्लड इत्यादी. बरं, हे वर्गीकरण त्यातल्या संघर्षाचे मुख्य सामाजिक अंग आहे, असंच घालायचं म्हणून घातलं नाही. (असल्या सामाजिक अंगाचा लेखिकेला अनुभव/जाण नाही असे तिच्या पुढच्या कादंबरीवरुन म्हणता येत नाही! )ष्टोरीत इतर देशांचे, त्यातल्या चित्रविचित्र प्राण्यांचे, जादुगरी कल्पनांचे उल्लेख/जरुरीपुरते वापर आहेत. त्यामुळे या विश्वाची भौगोलिक परिस्थिती काय आहे ते कळायला मार्ग नाही. अशा अनेक बाबतीत तिने आपले कल्पनाश्व आणखी स्वैर सोडले असते तर मजा आली असती. पण आले लेखिकेच्या मना असेच म्हणायला हवे.
तिच्या कौशल्यांबाबत तिचे कौतुकच आहे. स्नेपचे सुरुवातीचे डळमळीत पात्र तिने शेवटी असे काही भक्कम केले आहे की, काहीजण हॅरीपेक्षा स्नेपचे कर्मठ फ्यान झालेत. अजुन एक म्हणजे अगदी सढळपणे, एका विविक्षित गंभीरपणे वापरलेला "मृत्यू". केवळ अन्तिम संघर्षातच तो आहे असं नाही, साधारणतः दुसर्‍या भागापासून तिने "मृत्यू" दाखवलेला आहे. हॅरीचा गॉडफादर सिरीयस, त्याचा घुबड, क्रीचर, मॅडआय, अगदी योग्य वेळेस डंबलडोर.
सुरुवातीचे गमतीदार आणि हलकी-फुलकी जादुई कथा असलेले पुस्तक नंतर वाचकानुययी आणि 'चित्रपटा'नुययी होत गेलेलेसुद्धा दिसते.

रोचना Sat, 22/02/2014 - 15:55

In reply to by मी

१) शेवटच्या काही भागात दाखवलेलं गडद जादुई विश्व ओढून-ताणून दाखवल्या सारखं वाटलं. दुसरा आक्षेप म्हणजे हा रड्या हिरो म्हणजे काहिवेळेला तर मला ड्रॅको हॅरिपेक्षा जास्त आवडला आहे.

२) हि कथामालिका स्त्रियांना स्टिरिओटिपिकल भूमिकेतच दाखवते पण त्यावर इथे आक्षेपाच 'अ'देखील निघू नये ह्यावर आश्चर्य वाटले, किंवा हॅरी पॉटरची मोहिनी पडल्यामुळे ह्या मुद्द्याकडे फारसे लक्ष इथल्या किंवा बऱ्याच प्रौढांचे जात नसावे.

३)एचपिची कथामालिका नकळत का होइना पण तिच्या फॅन्स-कल्चरच्या अपेक्षेप्रमाणे घडत गेली जे एलओटीआरच्या बाबतीत घडले नाही ह्या मुद्द्यात मला दम वाटतो.

तिन्ही मुद्द्यांवर १००% सहमत. मला पहिली तीन पुस्तकं फार आवडली होती; "आज्कबान" तर फारच आवडलं होतं. त्यानंतर कथा फारच विस्तृत झाली, आणि माझ्या मते तरी लेखिकेच्या आटोक्यात राहिली नाही. पण मुळातच ते कल्पनाविश्व इतके मोहक आहे की चालून जातं; बाकीच्या फँटसी कथामालिकांपेक्षा एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथे मगल्स आणि विच-विझर्ड्स यांचे जग नकळत मिश्रित आहे; टोल्कियेन च्या जगासारखे अगदी पुरातन ही नाही, किंवा सी.एस. ल्युइस किंवा एनिड ब्लायटन च्या फारअवे ट्री वगैरेंसारखे अगदीच वेगळे ही नाही. जादूच्या पडद्याआड असले तरी आपल्या भोवतीच ते जग आहे - डेंटिस्टांची मुलगी विच निघते, पॅडिंगटन स्टेशन वरूनच शाळेची गाडी निघते, इ. टोल्कियेन चे विश्व अधिक दमदार आहे हे मला ही वाटते, पण ते पूर्णपणे स्वतंत्र आणि सुसंगत - भाषा, इतिहास, पात्रांची वंशावळी, त्यांच्या दंतकथांसकट - घडवण्याचा त्याने प्रयत्न केला, कारण तो प्रथम फोक्लोरिस्ट होता, आणि पुरातन कथा आणि भाषांमधे, लिपींमधे त्याला रस होता. या कल्पनाविश्वाद्वारे इंग्लंडचा एक वेगळीच मिथॉलॉजी तयार करायची होती. पॉटरविश्वावर टोल्कियेनचा प्रचंड प्रभाव आहेच, पण त्याचे आकर्षणच उलट कारणामुळे आहे असे मला वाटते - आपल्या आसपास, आपल्या नकळत, याच क्षणी, जादूची एक मोठी दुनिया वावरतेय याचा रोमांचकारक भास होत राहतो.

पॉटर मालिकेवर फॅन्स-कल्चरचाच नाही, तर एकूण मल्टीमीडियाकरणाचा - सिनेमे, कॉपीराइट, मर्चंडाइजिंग - वगैरेंचाही प्रभाव पडला. याला ते ज्या काळात छापले गेले - इंटरनेटद्वारे इंस्टंट ग्रॅटिफिकेशन अँड फीडबॅक - ते ही जबाबदार असावे. पण रोलिंगांनी सुद्धा पुस्तकांची उत्सुकता वाढवण्यासाठी चांगला वापर करून घेतला. पुढच्या पुस्तकात हॅरीच्या अगदी जवळच्या एखाद्या पात्राला मारून टाकणार आहे हे मुलाखतीतून सुचवणे. मग फोरम्स मधे "बापरे रॉन ला मारून टाकणार??" म्हणून गदारोळ होताच "नाही नाही, रॉन ला कसं मारीन, तो तर हॅरीचा जिवलग मित्र आहे" वगैरे आश्चासन देणे. मालिका संपल्यावर डंबलडोर समलिंगी होता हा खुलासा करणे, इ. ट्रान्स्लेशन आणि फॅन फिक्शनच नाही तर बाकी काही कल्पनाविश्वावर आधारित पुस्तकांविरुद्ध टाइम वार्नर ने कॉपीराइट वरून लढवलेली मोहीम या सगळ्याने खूप निराश केले. रुची ने पहिल्याच पोस्ट मधे म्हटल्या प्रमाणे, एखादी कलाकृती कितीही चांगली असली, तरी ती इतकी बटबटीत झाली की काहीतरी गोची आहे असे वाटल्यावाचून राहत नाही - पॉटर चा मार्केटिंग प्रॉडक्ट' झालेलं पाहून असंच झालं.

मी Sat, 22/02/2014 - 23:43

In reply to by रोचना

>>बाकीच्या फँटसी कथामालिकांपेक्षा एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथे मगल्स आणि विच-विझर्ड्स यांचे जग नकळत मिश्रित आहे; टोल्कियेन च्या जगासारखे अगदी पुरातन ही नाही, किंवा सी.एस. ल्युइस किंवा एनिड ब्लायटन च्या फारअवे ट्री वगैरेंसारखे अगदीच वेगळे ही नाही. जादूच्या पडद्याआड असले तरी आपल्या भोवतीच ते जग आहे.

>>पण त्याचे आकर्षणच उलट कारणामुळे आहे असे मला वाटते - आपल्या आसपास, आपल्या नकळत, याच क्षणी, जादूची एक मोठी दुनिया वावरतेय याचा रोमांचकारक भास होत राहतो.

रोचक निरीक्षण.

पॉटर मालिकेवर फॅन्स-कल्चरचाच नाही, तर एकूण मल्टीमीडियाकरणाचा - सिनेमे, कॉपीराइट, मर्चंडाइजिंग - वगैरेंचाही प्रभाव पडला. याला ते ज्या काळात छापले गेले - इंटरनेटद्वारे इंस्टंट ग्रॅटिफिकेशन अँड फीडबॅक - ते ही जबाबदार असावे.

हे हि रोचकच, सध्याचा शेरलॉकही ह्याच कल्चरचा बळी ठरलाय असं मत सध्या तरी झालयं.

मी Fri, 21/02/2014 - 14:48

एलोटीआरचा फाटा फुटतोय असं दिसतं आहे पण त्याच्या आणि एचपिच्या पात्रातला समान धागा म्हणजे फ्रोडो हॅरिसारखाचा बुळा आहे, आणि त्याचा मित्र सॅम हा त्यापेक्षा खरतर अधिक चतुर आणि धाडसी आहे जे काम एचपि मधे हर्मोय्नी आणि रॉन करतात. पण मुळात फ्रोडो म्हणजे एलोटीआर नव्हे त्यामुळे त्याचा बुळेपणा(आवडला नाही तरी) कथेला दुबळेपणा आणत नाही तर वाढवतो असे मत आहे.

ऋषिकेश Fri, 21/02/2014 - 14:51

In reply to by मी

फाटा फुटु द्याहो. चर्चा प्रस्तावात म्हटल्या प्रमाणे

मुक्तकाच्या निमित्ताने हॅरी पॉटर व एकूणच विविध भाषांतील उत्तमोत्तम परीकथांवर, कल्पनारम्य कथा/साहित्यावर विविधांगांने चर्चा करण्यासाठी या प्रतिसादाचे रुपांतर वेगळ्या धाग्यात करत आहोत.

बॅटमॅन Fri, 21/02/2014 - 14:55

In reply to by मी

फ्रोडो बुळा असल्याचे मात्र कधी दिसले नाही. सॅमचं धाडस मौंट डूममध्येच दिसतं, त्याआधी फ्रोडोच भारी वाटतो.

रुची Fri, 21/02/2014 - 21:58

हॅरीचे इतके चाहते इथे भेटतील असे वाटले नव्हते, शिवाय बर्याच जणांना ही पुस्तके आवडली, निदान विचारार्ह्य वाटली याचाही आनंद झाला.
मणिकर्णिका तुझ्या प्रतिसादावरून आणि मेघनाने तिच्या ब्लॉगवर जे लिहिलंय त्यावरून ही पुस्तके पुढच्या काही भागांत अधिकाधिक गडद आणि विस्तृत होत जातात असं दिसतंय. ही पुस्तके मुलांसाठीच आहेत असे मलाही कधीच वाटले नव्हते पण (पहिले तीन भाग तरी) मुलांना वाचण्यासाठी उत्तम आहेत असे माझे मत झाले आहे.
पहिले पुस्तक वाचायला घेतले तेंव्हा मला रश्दींच्या हरूनची अपरिहार्यपणे आठवण झाली. 'हरून अँड द सी ऑफ स्टोरीज' मी अलिकडच्या काळात (स्वतःसाठीच विकत घेऊन) वाचले होते आणि मला ते बेहद्द आवडले होते. मागच्या वर्षी मुलीच्या वाचनाची कुवत चांगलीच तयार होते आहे याची जाणीव झाल्याने मी तिला ते पुस्तक वाचायला दिले होते. अर्थातच इतके क्लिष्ट पुस्तक तिला वाचता येणे आणि समजणे सहजसाध्य नाही हे मला ठाऊक होते पण तिला थोडे आव्हान द्यावे म्हणून माझा तो प्रयत्न होता. तिला जमेना म्हणून मी ते पुस्तक तिला वाचून दाखवले आणि तिलाही ते बेहद्द आवडले. त्यातला शाब्दीक विनोद, कथा तिला समजली पण अधिक अमूर्त संकल्पना समजल्या नाहीत जे ठीकच आहे. पुढे 'लुका अँड द फायर ऑफ लाईफ'ही वाचले पण ते हरूनइतके आवडले नाही. पण अशी ही काही पुस्तके सीमारेषेवरची असतात...लहान मुले आणि प्रौढ वाचक त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींकडे आकर्षित होतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी त्यात गुंततात. पण त्यात उभी केलेली पात्रे जितकी वास्तवाच्या जवळ जातात तितकी ही सीमारेषा अंधूक होते असा माझा अनुभव आहे.
ज्यावरून मला माझ्या दुसर्या मुद्द्याकडे जाता येईल, 'मी' यांचा प्रतिसाद रोचक आहे आणि त्यातले काही आक्षेप मला अंशतः मान्य आहेत. स्त्रीव्यक्तीरेखा पारंपारिकच आहेत हे मान्य आहे पण मला वाटते की आपल्याला हवं आहे तसं जग उभं करण्याऐवजी लेखिका आपल्या आजूबाजूला दिसणारंच जगच वेगळ्या आपल्याबरोबर घेऊन गेली आहे. असं केल्यानं, हे जग चमत्कृतीपूर्ण असलं तरी वाचकांना ओळखीचं वाटतं. आपल्याला हवं आहे तसं जग तिनं उभारलं असतं तर कदाचित आदर्शवादी वाटलं असतं. त्यामुळे 'मिसेस विझली' पारंपारिक असणं खटकलं नाही पण हर्मायनी आणि जीनी अपेक्षित असल्यानं थोडी निराशा झाली (अर्थात आतापर्यंत फक्त तीनच भाग वाचले असल्यानं तेही फार जाणवलं नाही) असं असलं तरी हे आपल्या मुलीने वाचू नये किंवा हे वाचल्याने संस्कारक्षम वयात तिच्या मनावर स्त्रीच्या पारंपारिक भूमिकाच ठसतील असं काही मलातरी वाटलं नाही. (उलट पुस्तक वाचल्यानंतर तिच्या मनावर हॅरीपेक्षा हर्मायनीच अधिक ठसली आहे असं दिसतंय. ती कित्ती हुष्षार आहे!...ती कशी सगळ्यांना शिकवत असते!...तिला कसे सगळे स्पेल्स माहित असतात!...तिला परिक्षा कशा आवडतात वगैरे पुराण चालू असते.) त्यामुळे स्त्रीप्रतिमा निराशा करणार्या आहेत या मेघनाच्या मताशी सहमत असले तरी "साधारणतः उजव्या बाजूच्या स्त्रियांना ज्या प्रकारचं स्वातंत्र्य + सबलीकरण अभिप्रेत असतं, त्याच प्रकारे हॅरीमधल्या मुली नि स्त्रिया रंगवलेल्या आहेत" या तिच्या मताशी असहमती आहे. माझ्या मते लेखिकेने पात्रे बनविताना ती वास्तवापासून फार दूर जाणार नाहीत या बेताने ती रंगवली आहेत आणि त्यासाठी तिला धारेवर धरावं असं मला वाटत नाही.
ऋशिकेशने

बाकी, पॉटरकथेच स्त्रीयांबद्दलच नाही तर इतरही काही बाबतीत काहिसा प्रतिगामी (प्रसंगी कुचकट/ब्रिटीश आढ्यता इत्यादी) विचार आहेच

हे का म्हणावं याचा मात्र मला प्रश्न पडला आहे. पात्रे ब्रिटीश आहेत, ती आपल्याबरोबर ब्रिटीश संस्कृती घेऊन येतातच पण कुचकट/ब्रिटीश आढ्यता किंवा प्रतिगामी का वाटली हे समजलं नाही. काही उदाहरणे देऊ शकाल का?

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 15:08

In reply to by रुची

ती आपल्याबरोबर ब्रिटीश संस्कृती घेऊन येतातच पण कुचकट/ब्रिटीश आढ्यता किंवा प्रतिगामी का वाटली हे समजलं नाही. काही उदाहरणे देऊ शकाल का?

ब्रिटिश फ्लेवरचा तो कुचकटपणा म्हणा किंवा किंचितशी आढ्यता म्हणा भाग आहे, तो मला आवडतोच.

प्रतिगामित्त्वाबद्दलही लिहिता येईल. तुर्तास एकच उदा देतो पटल्यास पुढे जातो: (पटले तर इथेच कोणाला तरी पटावे ;) )
आई-वडिललांचे जे 'स्तोम' या पुस्तकात माजवले आहे ते मला खटकते. त्यांचे हे तथाकथित अढळ "लै भारी"पण मुलांच्या कथेत मोडणं अपेक्षित नसलं तरी या कथेत हॅरीचेच असे नाही तर मालफॉय वगैरे सोडल्यास जवळजवळ प्रत्येकाचे पालक कसे धुतल्या तांदळासारखेच असतात. ते कध्धी कध्धी वैट्ट वागत नाहीत, त्यांना नियमीत भेटी पाठवतात, मुलांचा योग्य सांभाळ करणं हेच त्यांचं परमकर्तव्य आणि जीवनाची इतिकर्तव्यता आहे वगैरे लेखिकेच्या पिढीतील विचार या पुस्तकातही उतरले आहेत.

अशी "मुलांसाठी जगणार्‍या" पालकांचा आदर्श ठेवणे मला खटकते. आणि मग मुलांना आपल्या पालकांकडूनही तशाच 'गोग्गोड' वागण्याची अपेक्षा करताना पाहिले आहे. जे हल्लीच्या समाजात अनेकदा शक्य होताना दिसतही नाही व ते तसे वागणे(मला) योग्यही वाटत नाही.

आदूबाळ Mon, 24/02/2014 - 15:26

In reply to by ऋषिकेश

निरीक्षणाशी सहमत

- पण त्याचा संबंध लेखिकेच्या "पिढी"शी (जन्म १९६५) नसावा. त्याआधीच्या पिढीतल्या ब्रिटिश लेखकांच्या लेखनात डिस्फंक्शनल फॅमिलीज येतात. उदा. सू टाऊनसेंड (जन्म १९४६) आद्रियन मोल सीरीज, तिची इतर पुस्तकं. खुद्द रोलिंगच्या पिढीतल्या मार्क हॅडॉन (जन्म १९६२) वगैरेंच्या लेखनात पोरकी, आईवडिलांचं प्रेम न मिळालेली मुलं येतातच.

- ड्रॅकोचे आईवडील पण ड्रॅकोशी वाईट वागत नाहीत. उलट शेवटच्या प्रसंगांत हॉगवार्ट्स किल्ल्यात अडकलेला ड्रॅको सुखरूप आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी नार्सिसा (ड्रॅकोची आई) तिच्या पक्षाचा नंबर एक शत्रू हॅरीला जीवदान देते.

- सहज आठवून पाहिलं की हॅपॉ पुस्तकांत कोणाचे आईवडील त्यांच्या मुलांशी वाईट वागले असं वर्णन/हिंट आलीय का? तर डंबलडोर, स्नेप, व्होल्डेमोर्ट, डीन थॉमस - एवढेच आठवले!

ऋषिकेश Tue, 25/02/2014 - 08:48

In reply to by आदूबाळ

पण त्याचा संबंध लेखिकेच्या "पिढी"शी (जन्म १९६५) नसावा.

पॉइंट टेकन. मान्य!
माझ्या डोळ्यासमोर त्या वयाची भारतीय मंडळी आल्याने संबंध जोडला गेला. :)

मेघना भुस्कुटे Mon, 24/02/2014 - 16:11

In reply to by ऋषिकेश

भारी निरीक्षण. याच्यावर मला बोट नव्हतं ठेवता आलं. पण 'अगदी अगदी' अशी प्रतिक्रिया उमटली डोक्यात.

Nile Fri, 21/02/2014 - 22:26

तुम्हा वयस्कर लोकांनी उगाचच खप वाढवून लहान मुलांसाठी लिहलेल्या या पुस्तकांची किंमत वाढवून ठेवली आहे याकडे निर्देश करून माझा कडकडीत निषेध नोंदवतो!

Nile Fri, 21/02/2014 - 23:12

In reply to by आदूबाळ

घासुगुर्जींचा प्रतिसाद पहा. लोक तासतास रांगा लावून उभे राहत. म्हणजे शॉर्टेज आहे. ही पुस्तके लवकरच सोल्ड ऑऊट झाल्याच्या खबरी वाचल्या असतीलच?

उदा. "It sold out very quickly and now commands very high prices. "

-खब्बर सिंग

मी Sat, 22/02/2014 - 12:11

@रुची -

एकंदर विश्लेषण आवडले, काही अंशी सहमत.

बहुतांश स्त्रिया पुरुषाभिमुख कथेशी एम्पथाईज/रिलेट करु शकतात असे माझ्या स्त्रीमित्रांकडुन ऐकले आहे त्यामुळेच बहुदा पुरुष नायक असलेल्या कथा स्त्रियांमधेही आवडल्या जातात?, स्मार्ट/हुशार असली तरी हर्मायनी हॅरी/रॉनला इम्प्रेस करायचा प्रयत्न करते आहे असे वाटावे असे अनेक प्रसंग आहेत, ती हुशार असूनही त्या हुशारीचे चीज त्या दोघांमधे आपले स्थान निर्माण करण्यातच आहे ह्यापलिकडे काही नाही, तेच थोड्याफार फरकाने इतर स्त्री व्यक्तिरेखांचे आहे.

माझ्या मते लेखिकेने पात्रे बनविताना ती वास्तवापासून फार दूर जाणार नाहीत या बेताने ती रंगवली आहेत आणि त्यासाठी तिला धारेवर धरावं असं मला वाटत नाही.

आपण आपल्यासाठी हा प्रश्न जरी सोडवला तरी इतर वेळेस धार परजून असलेल्यांनी मुख्य धारेतल्या साहित्यावर सोयिस्कर धार बोथट करावी हे विशेष वाटतं.

मिहिर Sat, 22/02/2014 - 14:59

मीपण हॅरी पॉटर बर्‍याच उशिरा वाचायला घेतले. सहा भाग वाचले आहेत. इथे कोणी मराठीत वाचले नाही का? मी सुरुवातीचे काही भाग मराठीत वाचले. त्यानंतर प्रत्येक वेळी पुढचे पुस्तक इंग्रजीत वाचायचे असे ठरवायचो, पण कोणाकडून इंग्रजी पुस्तक मिळण्याच्या आतच लायब्ररीत मराठी आवृत्ती दिसायची आणि तीच वाचली जायची. मराठी पुस्तकांत काही संज्ञा फार भारी होत्या. 'squib' ह्या जादूगार घरात जन्मलेल्या, पण जादू न येणार्‍या अशा व्यक्तीसाठी 'फुसकुंडा' हा शब्द वाचून हसून हसून पुरेवाट झाली होती. =))
'मी' यांच्या पुढे पुढे पुस्तके हिंसक होत जाता ह्याच्याशी सहमत. चित्रपटपण पुढे पुढे जास्तच काळे होऊ लागले.

बॅटमॅन Mon, 24/02/2014 - 15:17

ब्रिटिश आढ्यता लोकांना इतकी अपील का होते हे समजत नाही. म्हणजे नक्की आढ्यतेचे आकर्षण असते की त्यातल्या ब्रिटिशपणाचे? आढ्यतेचे भारतीय मॉडेल कालबाह्य इ. झाले, सबब ब्रिटिश-सँक्शन्ड-अतएव-नव्या युगास साजेसे-आढ्यतेचे मॉडेल पाहिजे वाटते का? एका अर्थी पराभूत मानसिकतेचा हा अवशेष मानावा काय?

हा प्रश्न विशेषतः आढ्यतेबद्दल आहे. अमुक देशाच्या वाङ्मयातील तमुक एक गोष्ट आवडली म्हणून कोणी मानसिक गुलाम होत नाही हे अर्थातच गोज विदौट सेइंग. पण एरवी 'अस्सल क्षयझ संस्कृती' म्हटले की नाके मुरडणार्‍या क्राउडला ही आढ्यता, तुच्छता अपील कशी होते हे काही समजत नाही.

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 15:52

In reply to by बॅटमॅन

आढ्यता अपील होत नाही, तीचे प्रदर्शन करण्याची पद्धत/खुबी अपील होते.
नुसता फाजिल माज डोक्यात जातो. आणि तसा माज सर्वत्र बघायलाही मिळतो - प्रत्येक संस्कृतीत प्रत्येक गटांत, पण तो माज मिरवायची ब्रिटिश पद्धत खासच वेगळी आहे.

बॅटमॅन Mon, 24/02/2014 - 16:02

In reply to by ऋषिकेश

माज मिरवण्यातले साटल्य अपील होत असेल तर तसे काही आपल्या आसपासही दिसते- अन वाङ्मयातही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. तथाकथित पुणेरी आढ्यताही अशीच असते इ.इ. पण तिजपेक्षाही ब्रिटिश पद्धतीस ग्लॅमर जास्त आहे. अर्थात जेत्यांच्या अनुकरणाचा एक ओव्हर द ईयर्स रॅशनलाईझ झालेला भाग त्यात आहेच म्हणा. असो.

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 16:08

In reply to by बॅटमॅन

मला पुणेरी (किंबहुना विशिष्ठ वर्गाच्या) आढ्यतेत ब्रिटिश मिश्कीलपणाच्या झालरीचा अभाव जाणवतो.
अनेकदा आपल्यातील तुच्छपणा योग्यच आहे असे ते न रहाता, केवळ तेच योग्य आहे असा भाव दिसतो.
इथे आढ्यतेपेक्षा दंभ अधिक दिसतो

अर्थात जेत्यांच्या अनुकरणाचा एक ओव्हर द ईयर्स रॅशनलाईझ झालेला भाग त्यात आहेच म्हणा.

मी यापुढे जाऊन म्हणेन की ब्रिटीश आढ्यतेचे कर्कशीकरण/पॉर्नीकरण या वर्गविशेषात आहे.

असो. इथे अवांतर होईल, हवं असल्यास खरडी/व्यनीतून बोलुच

सर्व_संचारी Tue, 25/02/2014 - 02:35

आयला ! हे हरीपुत्तर प्रकरण भारी वाटतंय ! हे मराठीत/हिंदीत आहे का ? इंग्रजी फारसं न कळणाऱ्या माझ्यासारख्या वाचकाची सोय! अर्थात ही चर्चा वाचून बऱ्याच नवीन गोष्टी कळत आहेत. रोचक वाटतंय ![ एक प्रश्न- इथल्या सर्व लोकांनी हे पुस्तक इंग्लिश मध्ये वाचले आहे ?]

रोचना Tue, 25/02/2014 - 10:39

पहिले पुस्तक वाचायला घेतले तेंव्हा मला रश्दींच्या हरूनची अपरिहार्यपणे आठवण झाली. 'हरून अँड द सी ऑफ स्टोरीज' मी अलिकडच्या काळात (स्वतःसाठीच विकत घेऊन) वाचले होते आणि मला ते बेहद्द आवडले होते. मागच्या वर्षी मुलीच्या वाचनाची कुवत चांगलीच तयार होते आहे याची जाणीव झाल्याने मी तिला ते पुस्तक वाचायला दिले होते. अर्थातच इतके क्लिष्ट पुस्तक तिला वाचता येणे आणि समजणे सहजसाध्य नाही हे मला ठाऊक होते पण तिला थोडे आव्हान द्यावे म्हणून माझा तो प्रयत्न होता. तिला जमेना म्हणून मी ते पुस्तक तिला वाचून दाखवले आणि तिलाही ते बेहद्द आवडले. त्यातला शाब्दीक विनोद, कथा तिला समजली पण अधिक अमूर्त संकल्पना समजल्या नाहीत जे ठीकच आहे.

रश्दींच्या हारूनची आठवण येते खरी, पण "हारून" चा राजकीय पाया अधिक भक्कम आहे असे वाटते. रश्दींनी स्वतः अज्ञातवासात असताना, कमालीचा धोका पत्करला असताना लिहीलेले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाहिलेले आहे; कल्पनाशक्तीच त्याचे मुख्य पात्र आहे, नाही का? ते पुस्तक मी दर दोन-तीन वर्षांनी एकदा वाचते. कधी कंटाळा येत नाही; प्रत्येक वेळेस नवीन काही तरी सुचवून जातं. रश्दींच्या नंतरच्या अनेक पुस्तकांनी झालेली चिडचिड हे वाचल्याने कमी होते! :-)
तू मुलीला वाचून दाखवलंस हे वाचून मला आठवलं - मी कॉलेजात असताना माझ्या रूम मेट ची तब्बेत खूपच खालावली होती; अशक्त होऊन बरेच दिवस झोपून होती आणि मनःस्थिती ही चांगली नव्हती. तेव्हाच हे पुस्तक निघालं होतं. मी तिला ते संपूर्ण वाचून दाखवलं होतं, आणि आम्हाला दोघींना खूप आवडलं होतं. काळजी तात्पुरती का असेना, दूर झाली होती. आजही त्याच्या गोड आठवणी आहेत.