‘धेनुकाकट्’चे गौड्बंगाल- भाग 1

भारताच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित असलेल्या सह्याद्री पर्वतराजींमध्ये नाणेघाट या नावाने सुप्रसिद्ध असलेला एक प्राचीन घाट आहे. पायवाट म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरेल असा हा घाट रस्ता घाटमाथ्यावरील एका नाळीपासून सुरू होतो व खाली उतरत उतरत रायगड जिल्ह्यामध्ये तळकोकणात उतरतो. या घाटमाथ्यावरील नाळीजवळ एक प्राचीन गुंफा आहे. काही वर्षांपूर्वी मी या गुंफेला भेट देऊन तेथे असलेले सातवाहन कालीन शिलालेख व पाषाणात कोरलेल्या मूर्तीच्या पावलांचे जे काय थोडेसे अवशेष उरलेले आहेत ते बघितले होते. नाणेघाटाला दिलेल्या या भेटीनंतर, इ.स.पूर्व 200 ते इ.स.200 या सुमारे 400 वर्षांच्या कालावधीत दख्खनच्या पठारावर अधिपत्य गाजवणारे सातवाहन राजे व त्यांचे साम्राज्य यांच्या पाऊलखुणा अजून जिथे कोठे अस्तित्वात असतील त्या ठिकाणांना भेट देण्याचा एक संकल्प मी केला होता.

माझ्या या शोध मोहिमेमध्ये एक नाणेघाट वगळला तर मी भेट दिलेल्या बाकी सर्व जागा सह्याद्री, सातमाला या सारख्या पर्वतांच्या किंवा कन्नड घाटामधील उभ्या कड्यावर खोदलेल्या बौद्ध गुंफा होत्या. या स्थानांना दिलेल्या भेटीचे मी केलेले प्रवासवर्णन, आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माझ्या ‘एका साम्राज्याच्या शोधात’ या पुस्तकात मी केलेले आहे व ज्या वाचकांना ते वाचण्याची इच्छा असेल ते वरील दुव्यावर हे पुस्तक वाचू शकतात. मी भेट दिलेल्या या सर्व बौद्ध गुंफा, कोणे एके काळी अतिशय सुप्रसिद्ध असे बौद्ध मठ होते. या मठांमध्ये शेकडो किंवा हजारांनी बौद्ध भिख्खू वास्तव्य करून असत. भिख्खूंच्या या निवास स्थानांचा एकूण आवाका लक्षात घेतला घेतला तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल की अगदी धार्मिक स्वरूपाच्या जरी या वसाहती असल्या तरी भरघोस आर्थिक बळ पाठीशी असल्याशिवाय सतत दोन-चारशे वर्षे त्या व्यवस्थित रितीने चालू रहाणे अशक्यप्राय होते.

त्या काळातील बौद्ध भिख्खूंचे शिस्तप्रिय आचरण कसे असावे? कोणत्या नियमांचे त्यांनी पालन करावे? हे सांगणारी आचारसंहिता, लिखित स्वरूपात त्या वेळेस अस्तित्वात असलेल्या एका प्राचीन ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेली होती. ‘विनया’ नावाच्या या ग्रंथातील आदेशांचे बौद्ध भिख्खूंनी पालन करणे तेंव्हा अनिवार्य होते आणि खरे पाहिले तर सध्याही तात्त्विक दृष्ट्या अनिवार्यच आहे. परंतु कालानुसार यातील बरेच नियम आता शिथिल करण्यात आलेले आहेत. बौद्ध भिख्खू, भिख्खिणी आणि धर्मोपदेशक यांना या आचारसंहितेप्रमाणे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता स्वत:च्या मालकीची करण्यास संपूर्ण प्रतिबंध होता. सुवर्ण, रूपे, रत्ने या सारख्या मौल्यवान वस्तूंना स्पर्श करण्याचीही त्यांना मुभा नव्हती. भिक्षा मागून मिळालेले अन्न फक्त त्यांनी ग्रहण केले पाहिजे, फेकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे शिवून भिख्खूंनी स्वत:साठी वस्त्रे शिवली पाहिजेत व अशी शिवलेली वस्त्रेच फक्त धारण केली पाहिजेत या सारखे कडक नियम विनया हा ग्रंथ भिख्खूंना सांगत होता.

बौद्ध भिख्खूंना अनिवार्य असलेले हे आचरणाचे नियम लक्षात घेता असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो की दुर्गम आणि निर्जन स्थानी प्रस्थापित केलेल्या आणि शेकडो किंवा हजारो बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असलेल्या या बौद्ध मठांचा उदरनिर्वाह कसा चालत असावा? विशेषकरून जेंव्हा बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित करणेही अशक्यप्राय होते अशा पर्जन्य कालात हे मठ कसे तग धरून रहात असावेत? मागच्या शतकातील एक विद्वान व्यासंगी दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी या प्रश्नाचे उत्तर खालील शब्दात दिलेले आहे व ते मी येथे उद्धृत करत आहे.

” अतिशय दुर्गम आणि निर्जन अशा या ठिकाणांवर गुंफा खोदून प्रस्थापित केले गेलेले हे बौद्ध मठ त्या ठिकाणांजवळून त्या काळातील व्यापारी मार्ग जात असल्याने तेथे प्रस्थापित केले गेलेले होते. ज्या ठिकाणी असे अनेक व्यापारी मार्ग एकत्र येत असत अशा स्थानांजवळ सर्वात विशाल व मोठ्या प्रमाणात बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असणारे मठ प्रस्थापित केले गेले होते….. बौद्ध गुंफा खोदण्याचे कार्य ज्या कालामध्ये प्रथम सुरू केले गेले त्या वेळेस, दख्खनच्या पठारावर असलेल्या पर्वतराजींमधून जाणारे व्यापारी मार्ग शोधून काढणे हीच प्रमुख अडचण समोर असे.”

“ The caves were· located where they are, because the trade-routes passed by, and the larger complexes were invariably near the junctions of such routes….. The main problem at the time the caves were first carved out of the rock was to find the routes up the Western Ghat mountain range to the Deccan plateau. ”

या वरून हे लक्षात यावे की पश्चिम महाराष्ट्रामधील कार्ले, भाजे, शेलारवाडी, बेडसे, जुन्नर या सारख्या सर्व प्रमुख बौद्ध गुंफा किंवा लेणी ही महत्त्वाचे व प्रथम दर्जाचे व्यापारी मार्ग जेथे एकत्र येत असत अशा ठिकाणांजवळ प्रस्थापित केली गेलेली होती तर इतर दुय्यम व्यापारी मार्गांजवळ एक छोटा गट या स्वरूपातील बौद्ध गुंफा खोदल्या गेल्या होत्या. यावरून असे म्हणणे वावगे ठरू नये की पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या ठिकाणी दर्‍याखोर्‍यात अशा बौद्ध गुंफा सापडतात त्याच्या जवळून त्या काळातील व्यापारी मार्ग जात असले पाहिजेत. हे मान्य केले की एक नवीनच प्रश्न समोर उभा राहतो. तो असा की या अनेक व्यापारी मार्गांवरून जो व्यापार चालत असे तो कसला असेल? आणि तो कोणाबरोबर चालत असावा? या प्रश्नाचे उत्तर सापडणे तसे कठिणच होते परंतु सुदैवाने टॉलेमी आणि पेरिप्लस यांच्यासारख्या ग्रीक-रोमन इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या टिपणांमधून या व्यापारासंबंधी माहिती मिळू शकते. या टिपणांच्या अनुसार ग्रीस आणि रोम या दोन्ही बरोबर् चालू असलेला हा व्यापार भारताच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या छोट्या बंदरांच्या द्वारे होत असे. भारताची पश्चिम किनारपट्टी अतिशय दंतूर आहे व अनेक छोट्या मोठ्या नद्या येथे समुद्राला मिळतात. या नद्यांच्या मुखांजवळ आणि खाड्यांमधे असलेल्या बंदरांवर ग्रीस आणि रोम येथील गलबते येऊन लागत असत व भारतामधून निर्यात होणारा माल जमिनीवरील व्यापारी मार्गांनी या बंदरांपर्यंत पोहोचत असे. सह्याद्री मधील प्रमुख बौद्ध गुंफाजवळ असणार्‍या बंदरांचा विचार केला तर या यादीत भडोच, सोपारा (नाला सोपारा) कल्याण आणि चौल या बंदरांचा समावेश करणे आवश्यक वाटते.

सह्याद्री मधील गुंफांमध्ये प्रस्थापित केले गेलेले बौद्ध मठ, उदरनिर्वाह आणि पर्जन्यकालात कसे तग धरून रहात असावेत या प्रश्नाकडे परत वळूया. याचा खुलासा करताना दामोदर धर्मानंद कोसंबी, भारतीय बौद्ध मठांच्या धर्तीवर आणि त्यांचे अनुकरण करूनच प्रस्थापित केल्या गेलेल्या, चीन मधील बौद्ध मठांचे उदाहरण यासाठी देतात. ते मी खाली उद्धृत केले आहे.

” बौद्ध धर्मीय विश्वाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या टुन हुआंग किंवा युएन कांग येथील प्राचीन चिनी बौद्ध मठांमधील लिखित स्वरूपातील कागदपत्रांची जी भाषांतरे उपलब्ध आहेत त्यांच्यावरून या मठांनी विनया आचारसंहितेचे शब्दश: पालन करताना प्रत्यक्ष आचरणात मात्र कशा पळवाटा शोधून काढल्या होत्या याचा पुरावा मिळू शकतो.
चीन मधील बौद्ध मठांप्रमाणेच सह्याद्रीमधील गुंफात प्रस्थापित झालेले बौद्ध मठ ‘उपासक’ असे गोंडस नाव दिलेल्या एका कर्मचार्‍याच्या मार्फत सुवर्ण, रुपे, रत्ने आणि इतर मौल्यवान वस्तूंची देवघेव करत असत. काही वेळा या मौल्यवान वस्तू एका वस्त्रात गुंडाळून ठेवल्या जात व त्यांचा प्रत्यक्ष स्पर्श टाळून त्यांची देवघेव बौद्ध भिख्खू करत. बौद्ध मठांत एक खजिनदार असे. त्याच्याकडे मठाला मिळालेल्या देणग्या किंवा मठाच्या रचनेमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याच्या कामासाठी आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी तर असेच परंतु या शिवाय विनया आचारसंहितेतील नियमांचा, ज्या पार पाडण्यामुळे, थेट भंग होत असे अशा नियमभंग करणार्‍या जबाबदार्‍याही सोपवलेल्या असत. या नियमभंग करणार्‍या जबाबदार्‍यांमध्ये, भिक्षा मागून मिळालेले अन्न भिख्खूंनी ग्रहण केले पाहिजे, फेकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे शिवून भिख्खूंनी स्वत:साठी वस्त्रे शिवली पाहिजेत व अशी शिवलेली वस्त्रेच फक्त धारण केली पाहिजेत या सारख्या कडक नियमांचे सरळ उल्लंघन करून मठाला प्राप्त झालेल्या धनातून मठासाठी अन्नधान्य खरेदी करणे किंवा भिख्खूंसाठी परिधान करण्याची किंवा इतर वस्त्रे खरेदी करणे याही जबाबदार्‍यांचा समावेश असे.”

“ The documentary evidence exists at the other end of the Buddhist world, in Chinese records and translations particularly from cave-monasteries such as Tun Huan and Yuen Kang (Ta-tung) of the ways in which Vinaya rules were modified by the cave monasteries without deviating from the letters.

Thus cave monasteries in India avoided Contact with gold, silver. Jewels and such precious commodities by using an intermediary servant called as “Upasaka” for the manipulation, or in extreme cases by insulation with a piece of cloth! These two Orders further deposited the bulk of’ the donated wealth with the monastery treasurer, who not only handled the gifts, permissibly used the money for repairs to the dwellings, but directly contravened the original rules by using the funds also for the purchase of necessities (such as food) that should have been obtained by begging, and for the robes that should have been pieced together from discarded rags. ”

यावरून हे स्पष्ट होते की सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये प्रस्थापित केले गेलेले हे बौद्ध मठ तत्कालीन राजे किंवा शासन यांवर तर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतच पण याशिवाय समाजातील धनवान मंडळींकडून मिळणार्‍या देणग्यांवरही हे मठ मोठ्या प्रमाणावर अवलंबून असत. या मठांच्या गुंफामध्ये देणग्या देणार्‍या धनवान मंडळींची नावे कोरलेले शिलालेख मोठ्या प्रमाणात विखुरलेले आढळतात या मागे हे कारण आहे.

तत्कालीन शासक किंवा राजे यांच्याकडून बौद्ध मठांना मिळणारे सहाय्य बहुधा मठाच्या नावाने एक खेडेगाव लिहून देणे या स्वरूपाचे होते असे दिसते. राजा किंवा शासन या खेडेगावामधून कररूपी द्रव्य जमा करत नसे आणि ही सर्व रक्कम मठाला प्राप्त होत असे. याची दोन उत्तम उदाहरणे कार्ले गुंफामधील शिलालेखामध्ये सापडतात. क्षत्रप नहापन याचा जामात ऋषभदत्त याने कार्ले मठाला करंजका हे गाव लिहून दिल्याचा शिलालेख येथे अस्तित्वात आहे. त्याच प्रमाणे ऋषभदत्त याचा गौतमीपुत्र सातकर्णी याने संपूर्ण पराभव केल्यानंतर हीच व्यवस्था पुढे चालू राहील असा आदेश त्याने रणभूमी वरूनच काढला असल्याचा आदेश देणारा शिलालेखही अस्तित्वात आहे. हे दोन शिलालेख अनुक्रमे 13 आणि 19 क्रमांकाच्या कार्ले येथील गुंफामध्ये अस्तित्वात आहेत.

राजा किंवा शासन यांनी मठाला दिलेल्या देणग्यांव्यतिरिक्त तत्कालीन धनवान मंडळींकडून वैयक्तिक स्वरूपातील देणग्या सुद्धा मठाला प्राप्त होत असत असे दिसते. हे वैयक्तिक देणगीदार व त्यांनी दिलेल्या देणग्या यांना जास्त महत्त्व प्रस्तुत लेखाच्या विषयाच्या दृष्टीने देणे आवश्यक आहे. एक उदाहरण घ्यावयाचे झाले तर कार्ले येथील गुंफ़ांमध्ये अशा दिलेल्या देणग्यांचा उल्लेख असलेले 37 तरी शिलालेख अस्तित्वात आहेत. परंतु सर्वात आश्चर्यजनक बाब कोणती असेल तर या 37 पैकी तब्बल 17 शिलालेखांमध्ये, देणगीदार हा ‘धेनुकाकट’ या गावचा रहिवासी असल्याचे नमूद केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात खोदलेल्या दुसर्‍या कोणत्याही बौद्ध गुंफेत (शेलारवाडी मधील एक आणि मुंबईजवळच्या कान्हेरी गुंफांमधील एक असे दोन अपवाद शिलालेख वगळून) या गावाच्या नावाचा उल्लेख सापडत नाही. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की ‘धेनुकाकट’ गावातील धनवान मंडळींसाठी कार्ले गुंफा इतर ठिकाणच्या गुंफांपेक्षा जास्त लोकप्रिय असाव्यात. परंतु इतर ठिकाणच्या गुंफांबद्दल त्यांना का नावड होती? आणि कार्ले मठ त्यांना का सर्वात प्रिय होता? हे एक कोडे आहे असे म्हणता येते.

परंतु यापेक्षाही सर्वात मोठे कोडे किंवा गौड्बंगाल तर हे आहे की इ.स. नंतरच्या पहिल्या दोन किंवा तीन शतकांमध्ये अनेक धनवान मंडळींचे वास्तव्य असणारे हे रहस्यमय ‘धेनुकाकट’ गाव होते तरी कोठे? त्याचा ठावठिकाणा लावायचा तरी कसा?

(क्रमश:)
मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास बघता येतील.

16 एप्रिल 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

छान माहिती.
पूर्वी "एका साम्राज्याच्या शोधात" मालिका उपक्रमावरही आलेली आहे.
तीसुद्धा आवडली होती.
तुमचं सगळं लिखाण इथं नव्यानं आलेलं आवडेल.
येउ द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान, सगळे लेख आल्यावर मग एकत्रच वाचेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नुकतेच कदाचित आठ-पंधरा दिवसांपूर्वी 'ऐसी'वरील एका (मला वाटते अरविंद कोल्हटकरांच्या) लेखात ओडिसातील 'धेनुकानन' या जुन्या नगराचा उल्लेख आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो मी नव्हेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तय!
अवांतर - 'धेनुकाकट' हे 'झुमरीतलल्लैया'सारखे असू शकेल काय ? Dirol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चंद्रशेखर ह्यांचा मनोरंजक लेख पुढे वाचण्याची आतुरता आहे. 'धेनुकाकट' काय असावे ह्याबद्दल माझाहि तर्क आहे पण चंद्रशेखरांनी त्यावर काही लिहिण्याआधीच मी ते लिहिणे अनौचित्याचे आहे म्हणून अंमळ थांबतो.

लेख वाचून सुमारे १५ वर्षांपूर्वी मी शेलारवाडी लेण्यांना भेट दिली होती त्याची आठवण झाली. तेथे एक चौरस आकाराचे खोलीवजा लेणे ताब्यात घेऊन शंकराचे मंदिर केव्हातरी तयार झाले आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यामध्ये 'धेनुकाकट/ड' ह्या गावाचे नाव आहे. त्याची मी काढलेली छायाचित्रे येथे दाखवीत आहे:

प्रवेशद्वार आणि लेख
लेणे/शंकराचे देऊळ
लेखाचा बर्जेस/इंद्राजी ह्यांच्या पुस्तकातील ठसा
लेखाचे बर्जेस/इंद्राजी ह्यांचे वाचन

आता थोडे अवान्तर.

माझ्या शेलारवाडीच्या भेटीत मी लेण्यामधून दिसणार्‍या खालच्या देखाव्याची काही चित्रे घेतली होती ती अशी

जुना पुणे-मुंबई रस्ता, पलीकडे तळेगाव
वळणावरची आगगाडी

वरील लेखामध्ये पितळखोर्‍याजवळील कन्नड घाटाचा उल्लेख आहे. घाटाजवळील 'कन्नड' ह्या नावाच्या गाववरून हे नाव त्याला मिळालेले असून त्यालाच ऊट्रम घाट असेहि म्हणतात कारण भिल्लांच्या बंदोबस्तासाठी तेथे नेमल्या गेलेल्या ऊट्रम नावाच्या अधिकार्‍याने त्याची डागडुजी केली होती. ह्या घाटाच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या व्यापारी महत्त्वाबद्दल 'भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण' ह्या माझ्या धाग्यामध्ये काही माहिती आहे.

द.ग.गोडसे ह्यांचा सह्याद्रीमधील घाटांबद्दलचा एक लेख बर्‍याच वर्षांपूर्वी वाचला होता. प्रागैतिहासिक काळापासून हे रहदारीचे मार्ग स्थानिक लोक वापरत आले आहेत आणि प्रत्येक घाटाच्या पायथ्याशी असलेल्या स्थानिक देवदेवतांची स्थाने ही अशा आदिम काळापासून त्या त्या वेळच्या देवेदेवतांची स्थाने असली पाहिजेत असा त्या लेखाचा इत्यर्थ होता.

भा.इ.सं.मं.ने प्रकाशित केलेले 'सह्याद्रीतील घाट आणि चौक्या' असे पुस्तक एकेकाळी माझ्याजवळ होते. त्यामध्ये ह्या घाटांविषयी बरीच मनोरंजक माहिती मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान फोटो नि माहिती.

दिल्लीत त्या* उट्रम साहेबांच्या नावे 'Outram Lines" आहे. तिथे राहिलो आहे म्हणून आठवले.

*हे गुगलल्यावर कळले. मी तिथे राहिलो आहे म्हणून चाळून पाहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Outram Lines वाला ऊट्रम आणि कन्नड घाटवाला ऊट्रम हे एक नसावेत. कन्नड घाटवाला ऊट्रम हा फार वरच्या पातळीवरील अधिकारी नव्हता की त्याचे नाव दिल्लीतील काही भागास दिले जावे. दिल्लीवाला Sir James Outram, 1st Baronet ह्याची माहिती येथे पहा. इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा करण्याच्या वेळी हा तेथे रेसिडेंट होता. त्याचे सुंदर चित्रीकरण अ‍ॅटेनबराने शतरंज के खिलाडी ह्या चित्रपटात केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://archive.org/stream/KhandeshBhilCorps/Khandesh%20Bhil%20Corps_djv... वर

.....FOUNDING OJT THE BHIL COEPS. 41

went, and furnished Government with a detailed plan of the Satmala
Mountains in that neighbourhood, pointing out and defining the
Bhil strongholds, and thereby greatly facilitating all future fcpera-
tions in that quarter.

A metalled road which was constructed up the mountain side
between Chalisgaon and Kannad, and was opened by Mr. Ashburner
in 1872, has been well named ' Outram's Ghat. '

" 1 kept no copies of my correspondence," writes Outram, "during
the period from my appointment to raise the Bheel Corps, in
the middle of April 1825, until the date of my first official
report (1st July 1825). ......

असे लिहिले आहे. माझे एकूण संदर्भ पडताळणे वैगेरे चूक असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंग्रजी अनुदिनीतील शीर्षकापेक्षा मराठी शीर्षक अधिक आवडले. इंग्रजी शीषकातील प्रश्नात (व्हेअर द हेल इझ धेनुकाकट?) एका प्रकारचा आक्रसताळेपणा जाणवतो, मराठी शीर्षकात कोड्याबाबत कुतूहल अधिक जाणवते.

पुढील भागांच्या अपेक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.