धेनुकाकट’चे गौडबंगाल -भाग 2

(मागील भागावरून पुढे)

कार्ले गावाजवळच्या पर्वत कड्यावर खोदलेल्या गुंफांमध्ये जो बौद्ध मठ स्थापित केला गेला होता त्या मठाला तत्कालीन अनेक धनवानांनी देणग्या दिलेल्या होत्या. अशा धनवानांची नावे या मठामधील स्तंभांवर किंवा भिंतीवर शिलालेखांच्या स्वरूपात कोरलेली आजही आढळून येतात. या शिलालेखांमध्ये तो देणगीदार धनवान कोणत्या गावाचा रहिवासी आहे हे बहुधा नमूद करण्यात येत असे. या नावांमध्ये नाव अंतर्भूत असलेले धेनुकाकट गावाचे जे रहिवासी होते त्यांची जास्त माहिती शक्य असल्यास जर या शिलालेखांवरून मिळवता आली तर या रहस्यमय गावाचा शोध घेण्याच्या दृष्टीने आपले एक पाऊल पुढे पडेल. मात्र हे करण्याच्या आधी एक गोष्ट नमूद करणे जरुरी वाटते. कार्ले चैत्याच्या स्तूपाच्या समोर असलेल्या बाह्य दर्शनी भागावर सातवाहन राजा पुलुमवी याने कोरून घेतलेल्या 8 क्रमांकाच्या शिलालेखानुसार सध्या आपण ज्याला कार्ले गाव आणि कार्ले गुंफा या नावाने संबोधतो त्या दोन्हीची त्या काली वालुरक गाव आणि वालुरक मठ अशी नावे प्रचलित होती.

धेनुकाकट गावातील देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे होती.

वेनुवस पुत्र सामी- या सुताराने स्वत:च्या खर्चाने गुंफेसाठी लाकडी द्वार बनवले
धम्मा नावाचा यवन
सिंहध्वज नावाचा यवन
सोम्मिलनक हा रहिवासी
ऋषभदत्तचा पुत्र मितदेवनक ( आपण हे आधी बघितले आहे की ऋषभदत्त हा शक क्षत्रप नहापन याचा जामात होता. त्यावेळेस दख्खनचे पठार ज्याच्या ताब्यात होते त्या नहापन क्षत्रपाचा मितदेवनक नातू आहे.)
गोल या व्यापार्‍याचा पुत्र असलेला इसलक
यसवधन नावाचा यवन
महामिता नावाची सुभार्या (शिलालेख अस्पष्ट आहे कदाचित महामिता हे त्या व्यक्तीच्या आजीचे नाव असू शकते.)
असोक या श्रेष्ठीची नात धम्मदेवी
मिलिम्दास नावाचा वैद्य, पत्नी जयमिता, भयभूती आणि नबभूती हे पुत्र व वसुमिता ही कन्या
द्रुगमित याची पत्नी उतरामती
कुलयखन नावाचा यवन
रोहनमित- अजिल हे नाव असलेल्या त्याच्या धाकट्या मामाच्या तर्फे
धम्मधय नावाचा यवन (हा शिलालेख ज्या स्तंभाच्या कॅपटलवर स्फिंक्स्चे शिल्प कोरलेले आहे त्या स्तंभावर कोरलेला आहे.)
धेनुकाकट गावातील व्यापारी संघटना ( कोणत्याही व्यापारी संघटनेचा हा बहुधा सर्वात जुना उल्लेख असला पाहिजे)
सिंहदत नावाचा धेनुकाकट गावातील एक अत्तर विक्रेता.

वर दिलेल्या सूची वरून धेनुकाकट गावात राहणार्‍या रहिवाशांबद्दल थोडीफार कल्पना आपल्याला येऊ शकते असे मला वाटते. या गावात बर्‍याच मोठ्या संख्येने यवन किंवा ग्रीक मुळाचे रहिवासी रहात होते. ते कोण असावेत याबद्दल संशोधकांत दोन मतप्रवाह आहेत. Samuel Clark Laeuchli या संशोधकाच्या मताने या ग्रीक व्यक्ती ऋषभदत्ताच्या सेनेत नोकरी करणारे भाडोत्री सैनिक असावेत. एम.के.ढवळीकर किंवा दामोदर धर्मानंद कोसंबी हे मात्र या ग्रीक व्यक्ती व्यापार व्यवसायातील असाव्यात असे मानतात. या कालात ग्रीक लोक, रोमन नागरिक म्हणूनच समजले जात. या वरून धेनुकाकट हे गाव म्हणजे भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळ असलेली एखादी ग्रीक वसाहत होती कां? असाही प्रश्न विचारला जातो. ग्रीक लोकांच्या व्यतिरिक्त, वरील सूची वरून दिसून येते की या गावात सुतार, वैद्य आणि अत्तर व्यापारी या सारखे व्यावसायिक रहात होते व त्यांनी मठाला भरघोस स्वरूपात देणग्या दिल्या असल्याने त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता सुद्धा होती. या सूची मधून समजणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गावात व्यापारी लोकांची लोकांची एक संघटनाही होती व त्यावरून हे गाव म्हणजे मोठा व्यापारउदिम चालत असलेली एक बाजारपेठ होती असे म्हणणे गैर ठरणार नाही.

आता आपण इ.स. पहिल्या शतकातील दख्खनच्या इतिहासाकडे एक नजर टाकूया. या अभ्यासावरून कार्ले येथील शिलालेख महत्त्वपूर्ण का मानले जातात हे लक्षात येऊ शकते. साधारणपणे इ.स.पूर्व 220 च्या सुमारास, सम्राट अशोकाच्या निधनानंतर सातवाहन कुळातील राजांनी दख्खन मध्ये आपण सार्वभौम राजे असल्याचे घोषित केले असावे. असे समजले जाते की त्याच्या आधी ते सम्राट अशोकाचे मांडलिक राजे होते. सातवाहन राजांच्या अंमलाखालील पुढची दोन शतके, दख्खन मध्ये सुबत्तेची अगणित स्थिरतेची गेली असावीत. यानंतरची पुढची काही दशके मात्र राजकीय दृष्ट्या अस्थिरतेची गेली. या कालखंडाच्या बर्‍याच आधी, मध्य एशिया कडून आलेल्या शक टोळ्यांनी प्रथम बॅक्ट्रिया व नंतर अफगाणिस्तानमधील सत्ता काबिज केलेली होती. या शक टोळ्यांना त्यांच्या पाठोपाठ आलेल्या कुषाण टोळ्यांनी या दोन्ही प्रांतातून हुसकावून लावल्याने त्यांनी आपला मोर्चा आग्नेयेकडे असलेल्या भारतीय उपखंडाकडे वळवला होता. या शक टोळ्यांच्या राजाचा सुभेदार किंवा क्षत्रप असे स्वत:ला म्हणवून घेणार्‍या व स्वत:ला शक टोळ्यांचा वंशज मानणार्‍या नहापन याने इ.स. पहिल्या शतकामध्ये प्रथम भारताच्या वायव्येकडील भागात सत्ता काबिज केली व नंतर तेथून अग्नेयेकडे सतत आक्रमणे करून सातवाहन राज्याचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. हळूहळू कार्ले गुंफेच्या परिसरापर्यंत त्याची सत्ता दक्षिणेकडे पसरली. नहापन याने आपला जामात ऋषभदत याची आपल्या राज्यातील दक्षिणेकडील भागांचा सुभेदार म्हणून बहुधा नियुक्ती केलेली असावी. काही इतिहासकारांच्या मताने गुजरातमधील भडोच हे शहर या शक क्षत्रप नहापनची राजधानी असावी असे मानले जाते.

या सगळ्या इतिहासाचा धेनुकाकट गावाच्या शोधाशी संबंध काय? असा प्रश्न मनात साहजिकपणे येतो. वरच्या सूची कडे परत एकदा नजर टाकूया. यातील एक शिलालेख आपल्याला सांगतो आहे की ऋषभदत याचा पुत्र मितदेवनक हा धेनुकाकट्चा रहिवासी होता. या वरून असा निष्कर्ष काढणे गैर ठरणार नाही की ज्या अर्थी दख्खनचा सुभेदार असलेल्या ऋषभदत्ताने स्वत:च्या पुत्राची या गावामध्ये नेमणूक केलेली होती त्या अर्थी धेनुकाकट गाव हे राज्यामधील एक महत्त्वाचे गाव असले पाहिजे.

या सर्व चर्चेनंतर धेनुकाकट गावाचे एक चित्र मनामध्ये उभे करणे काही फारसे कठीण काम नाही. दख्खनच्या पठारावरून जाणार्‍या व सातवाहन राज्य आणि ग्रीस-रोम यांच्यामध्ये होणारा व्यापार ज्या मार्गाने चालत असे त्यापैकी एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गाजवळ हे गाव वसलेले होते. गावामध्ये व्यापारउदिम करणार्‍या व्यावसायिकांची संख्या बरीच मोठी असावी कारण त्यांची स्वत:ची अशी एक व्यावसायिक संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुतार, वैद्य आणि अत्तर व्यापार करणार्‍यांसारखे व्यावसायिक या गावात वास्तव्य करून होते व त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुबत्तेची होती. धेनुकाकट बद्दलचे हे चित्र मनात स्पष्ट होत असले तरी या गावाच्या परिसरात भाजे, शेलारवाडी, बेडसे आणि कार्ले असे चार मोठे बौद्ध मठ असताना, फक्त कार्ले मठच धेनुकाकट गावातील लोकांना सर्वात जास्त प्रिय का होता? आणि या मठाच्या देखभालीसाठी किंवा सौंदर्यवृद्धीसाठी देणग्या देण्यास या गावातील रहिवासी एका पायावर का तयार होते? हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात.

वर उल्लेख केला गेलेले ख्यातनाम व्यासंगी व संशोधक, दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या एका लेखात, बौद्ध मठ त्या कालात व्यापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे का ठरत असत याचे सुंदर विवेचन केलेले आहे. दामोदर कोसंबी म्हणतात:

” चीनमधील बौद्ध मठांनी मागे ठेवलेला लिखित पुरावा आणि कार्ले गुंफांमधील शिलालेख यांच्यावरून हे स्पष्ट होते की आर्थिक सुबत्ता लाभलेला कार्ले बौद्ध मठ आणि धेनुकाकट गावातील धनवान व्यापारी यांच्यामध्ये मोठ्या स्वरूपाच्या आर्थिक व्यवहारांवर आधारलेले असे अत्यंत जवळचे संबंध होते. मठवासी असलेल्या भिख्खूंसाठी वस्त्रे आणि इतर खाद्यपदार्थांसारख्या गरजेच्या वस्तू खरेदी करणे, धार्मिक सोपस्कार करण्यासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणे, मठाला रंगरंगोटी करणे, पताका, बॅनर, झालरी, पडदे या सारख्या सजावटीच्या वस्तूंनी मठ सजवणे, या सारख्या बाबींसाठी लागणार्‍या आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यापुरते हे आर्थिक व्यवहार मर्यादित नव्हते. या व्यवहारांत मठाकडे उपलब्ध असलेले अतिरिक्त धान्य, भाजीपाला विकत घेणे आणि मठाकडून व्याजावर कर्ज धंद्यासाठी घेणे (बॅन्किंग) यासारख्या व्यवहारांचा सुद्धा अंतर्भाव असे. सातवाहन राज्यामध्ये, ज्यात व्यापारउदिम चालू होता अशा बाजारपेठा एकमेकांपासून बर्‍याच लांबच्या अंतरावर वसलेल्या होत्या. त्यांना जोडणारे व्यापारी मार्ग फारशी वस्ती नसलेल्या, डोंगराळ आणि प्रवासास कठीण किंवा दुर्गम अशा भागातून जात होते. प्रवासातील सर्वात दुर्गम अशा भूप्रदेशाजवळ, बौद्ध मठ स्थापण्यासाठी गुंफा खोदण्यामागचे रहस्य हेच आहे. या मठांवर कोणतेही कर लावलेले नसत व त्यांचे उत्पन्न सरकारी अधिकार्‍यांद्वारे जप्त होण्याची भीती नसल्याने त्यांच्याकडे ठेवलेले द्रव्य सुखरूप रहात असे.”

” It is clear from the inscriptions and the Chinese Budddhist evidence, that the intimate connection between the rich monastery at Karle’n and the wealthy merchant settlement at Dhenukakata had a soild economic foundation. The mercantile function of the monasteries was not only the purchase of cloth and other commodities for the monks and the retainers and the buying of the costlier materials for the rituals and ostentation but also the supply (for profit) of essential provisions and the loan (at interest) of indispensable capital to the trade caravans. The great market centers of Satavahana empire were sparsely distributed; their interconnecting trade routes passing through wild, thinly settled and difficult country. The caves were located conveniently near the worst stage of the journey. The monasteries were untaxed and their possessions not in danger of arbitrary confiscation by officials. ”

सोप्या शब्दात सांगायचे तर कार्ले मठासारखे बौद्ध मठ, हे व्यापार्‍यांसाठी अन्नपदार्थ, कपडालत्ता आणि इतर सर्व दैनंदिन गरजेच्या वस्तू यांच्यासाठीचे एक मोठे ग्राहक फक्त नव्हते. हे बौद्ध मठ व्यापार्‍यांना स्वस्त व्याज दराने भांडवल पुरवत होते आणि त्यांना होणारा फायदा, शासकीय कर अधिकारी आणि लुटारू, दरोडेखोर यांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचे कार्यही करत होते. या निष्कर्षावरून आणखी एक गोष्ट सुद्धा स्पष्ट होते की धेनुकाकट गावातील धनवान व्यापारी आणि कार्ले मठ यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ असे संबंध प्रस्थापित झालेले होते.

हे असे घनिष्ठ संबंध प्रस्थापित होण्यामागे अतिशय सरळ अशी कारणे होती. एक तर कार्ले मठ हा व्यापार्‍यांसाठी अन्नपदार्थ, कपडालत्ता यांचा मोठा ग्राहक होता. त्याचप्रमाणे धेनुकाकटच्या रहिवाशांना मठ स्वस्त व्याजदराने कर्ज देत असे व व्यापारी व त्यांच्या मालवाहतुकीचे मार्ग यांच्या संरक्षणाची व्यवस्था सुद्धा करत असे. या गोष्टींची मी पुनरावृत्ती अशासाठी करतो आहे की वाचकांच्या लक्षात हे यावे की धेनुकाकट गाव हे कार्ले मठापासून खूप लांब अंतरावर वसलेले नसून मठाच्या परिसरातच कोठेतरी वसलेले असले पाहिजे. त्याचप्रमाणे शासनाच्या दृष्टिकोनामधून महसुलाच्या दृष्टीने हे गाव अतिशय महत्त्वाचे असल्याने, राज्याचा सुभेदार असलेल्या ऋषभदत्ताने या गावात आपल्या पुत्राला देखरेख करण्यासाठी नेमले होते.

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.

(क्रमश:)

22 एप्रिल 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उपरोल्लेखित देणगीदारांची नावे एकाच शिलालेखात कोरली आहेत का? या नावांमध्ये धेनुकाकट व्यापारी संघटना आणि सिंहदत्त नावाचा धेनुकाकट गावातील अत्तरविक्रेता या दोन नावांमध्ये धेनुकाकट गावाचा उल्लेख आहे त्यामुळे हे दोन देणगीदार धेनुकाकटचे रहिवासी होते असे स्पष्टपणे म्हणता येते. बाकीची नावे या दोन नावांच्या निकट आहेत म्हणून आपण ते देणगीदार धेनुकाकटचेच रहिवासी असावेत असे अंदाजाने म्हणू शकतो; असे म्हणणे बरोबर होईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातील बहुतांशी शिलालेख मुख्य चैत्य गृहाचे स्तंभ, दर्शनी भाग वगैरे सारख्या ठिकाणी कोरलेले आहेत. वर दिलेल्या सर्व आणि प्रत्येक शिलालेखात स्वतंत्रपणे धेनुकाकटचा उल्लेख आहे. मी फक्त नावांची यादी दिलेली आहे. दोन ठिकाणी धेनुकाकट हा शब्द मी पुन्हा वापरला असल्याने (सगळेच धेनुकाकटचे रहिवासी असल्याने परत ते धेनुकाकटचे आहेत असे दोन ठिकाणी म्हणणे खरे तर अनावश्यक होते. क्षमस्वः ) राही यांचा बहुधा गैरसमज झाला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विंट्रेष्टींग वाटतय सगळं. मजा येतीये वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुलयखन नावाचा यवन
<<
कुब्लाईखान आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

या काळात प्राकृत भाषा सर्वसामान्य्पणे वापरात होती. भारतीयांची नावे त्यामुळे थोडीफार ओळखीची वाटतात. परंतु ग्रीक नावे मात्र अक्षरशः अगाध आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते ती अगाध वाटण्याचे अजून एक कारण असावे ते म्ह. मूळ ग्रीक नावांचे भारतीयीकरण, उदा. अलेक्सान्द्रॉस चे अलक्षेन्द्र इ.इ. त्यामुळे कन्फूजन अजूनच वाढते. कुलयखन हे मूळ ग्रीक रूप वाटत नाही.

पण कैक नावे तशी पर्फेक्ट देशीही वाटताहेत. बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशी नावे घेतली असणे अगदी शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं