महत्वाकांक्षेच्या टकमक टोकावर….. !

महत्वाकांक्षा ही गतिशील आयुष्यासाठीची आवश्यक गोष्ट आहे. उर्ध्वगामी दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्वाकांक्षेची गरज असते हे अगदी निस्संशयपणे खरे आहे पण अतिमहत्वाकांक्षेचा वारु जेव्हा उधळू लागतो तेव्हा तो तुमच्या मूळ स्वभावालाच उधळून लावतो. तुमची अस्सलता त्यात लोप पावते. नितळ, आरस्पानी व्यक्तिमत्वाचे सारेच धागे त्यात विरून जातात. तुमचे स्फटिकी गुणधर्म ना त्यात विरघळतात ना चकाकतात अशी काहीशी विचित्र अवस्था त्यातून निर्माण होते. अर्थातच महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वकांक्षा यातली सीमारेषा धूसर असते. या सीमारेषेचे निश्चितीकरण व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरीही काही किमान मूलभूत मुद्द्यासंदर्भात सहमती होऊ शकते. माझ्या मते, महत्वकांक्षा तुम्हाला धावायला सांगते, ध्येय साध्य करण्यासाठीचे उपलब्ध इंधन पुरविते त्यातून तुम्ही अस्वस्थ होता, असमाधानी राहता आणि यातून पुन्हा धावणे सुरुच राहते अव्याहत….! पण महत्वाकांक्षा तुम्हाला असुरक्षित बनवत नाही; ती कॉम्पीटीटीव्ह स्पीरीट निर्माण करते जे की गरजेचे असते अनेक वेळा अनेक पातळ्यांवर. जगण्यासाठीचे आसुसलेपण निर्माण करण्यात महत्वाकांक्षा मोठी भूमिका बजावते.हे आसुसलेले असणं किती महत्वाचं, किती गरजेचं असतं ! पण हीच महत्वकांक्षा जेव्हा तुमच्यावर अधिकार गाजवू लागते तेव्हा तुमच्यातलं सत्व आणि स्वत्व यांचा क्षय होऊ लागतो. जी महत्वकांक्षा जगण्याचं आसुसलेपण देते तीच निराशेच्या गर्तेतही ढकलते, तीच वैफल्याच्या हिंदोळ्यावर झुलवतेही. एवेढेच काय आत्महत्या देखील करायला भाग पाडते.
या चक्रात इतकी वळणे आहेत की समोरचा प्रदेश धुक्याचा, अस्पष्ट, संदिग्ध असणार , तेथे पाय फसणार पण म्हणून नकारात्मक किंवा निराशावादी असण्याचे काहीही कारण नाही. मानसिक आंदोलने समजून घेणे अजिबात सोपे नाही. स्वतःला स्वतःपासून वाचवणे कठीण आहे. “मी” ला एकट्याने एकांतात भेटणे धोकादायक, प्रचंड जीवेघेणे! पण “मी”ला टाळणेही अशक्य ! उत्तर आहेत, शोधली पाहिजेत.” मी”चा शोध पूलावरती घेतला पाहिजे जो पूल तूला आणि मला जोडतो. ही मीटींग आरोग्यदायी ठरु शकते. त्यातून काही सर्जनात्मक निष्कर्ष निघू शकतो. तोच तुम्हाला, मला, सा-यांना तारु शकतो. हे सातत्याने ध्यानात ठेवले पाहिजे. मी हा अपरिहार्यपणे इतरांशी जोडला गेला आहे. त्याला चिकटलेली नाळ तोडता येणार नाही.ही नाळ तोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कु-हाड मारुन घेतल्यासारखे आहे कारण त्यातून आपणच आपल्यापासून डिसकनेक्ट होत जातो. जगण्याचा एक एक तंतू तुटून पडताना होणा-या वेदना रक्तबंबाळ करणा-या असणार यात शंका ती काय ! त्यामुळे या पुलावर भेटणे अनिवार्य आणि यातही स्वार्थ आहेच पण हा स्वार्थ व्यापक आहे तो तुमच्यासकट इतरांच्या हितसंबंधांची,गरजांची परिपूर्ती करतो आणि म्हणून अशा आरोग्यदायी स्वार्थाचे संवर्धन करणे आवश्यक ठरते.
प्रश्न असा निर्माण होतो काय दोन भिन्न व्यक्तींच्या ढोबळमानाने समान लौकिक / अलौकिक महत्वकांक्षा परस्परांच्या स्वार्थाचे संवर्धन निस्पृहतेने करु शकतात का ? हा प्रश्न स्थळ काळ आणि बव्हंशी परिस्थितीजन्य असला तरीही विभिन्न पारिस्थितीकीय घटकांचे अचूक व्यवस्थापन ही त्या व्यष्टीची प्राथमिक आणि मूलभूत जबाबदारी बनते. नव्या घटकांच्या तीव्रतेनुसार ट्युन इन होणे क्रमप्राप्त ठरते अर्थातच येथे पुन्हा स्वत्वाच्या व्यवच्छेदकतेचा बळी देण्याची आवश्यकता नसते पण हे स्वत्व हरवण्याचा धोका यात संभवतो त्यामुळे हे स्वत्व टिकवून टुयुन इन होणे किंवा समष्टीशी एकरुप होणे मनोवेधक आव्हान ठरते. यात त्या व्यक्तीची कुत्तरओढ अटळ आहे, अपरिहार्य आहे पण हे सारे दोर कापून पुढे जाणे हेच तर ध्येय असते आणि त्यासाठीच महत्वकांक्षेची गरज असते पण अतिमहत्वकांक्षा मात्र तुम्हाला स्पर्धेत उतरण्यापासूनच रोखते. सबब तिची विल्हेवाट यथायोग्य सम्यक आत्मपरीक्षणातून लावायला हवी .लौकिक संदर्भनांचे ओझे किती मर्यादेपर्यंत पेलायचे हे आपणच ठरवायला हवे. जे एम बॅरे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे
“Ambition- it is the last infirmity of noble minds” तर हेन्री बीचर म्हणतात
“A man without ambition is just like beautiful worm- It can creep but it can not fly “ त्यामुळे आसमानों को छुने की आशा असलीच पाहिजे पण त्याचवेळी मातीमध्ये घट्ट पाय रोवण्याची आवश्यकता आहे कारण अतिमहत्वकांक्षेच्या भयाण मोहक आवर्तनात शिरले की परतीचा मार्ग सापडण्याची शक्यता कमी असते.
सिकंदरासारखी जग जिंकण्याची महत्वाकांक्षा असण्यात गैर काहीच नाही पण जग जिंकण्याच्याविषयीच्या आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे आसुसलेले असणं किती महत्वाचं, किती गरजेचं असतं !

छान. लेख आवडला विशेषतः वरील वाक्य व त्यातील "आसुसलेपण" हा शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0