इ.स. पहिल्या शतकामध्ये, सातवाहन साम्राज्य आणि शक क्षत्रप नहापन यांच्या सैन्यांमध्ये सतत चालू असलेल्या युद्धांमुळे भारताच्या रोम बरोबरच्या व्यापारावर कसा परिणाम झाला होता आणि रोमवरून भारतीय बंदरांकडे येणार्या गलबतांना दक्षिणेकडे असलेल्या चौल सारख्या बंदरांकडे नांगर का टाकावा लागत होता हे आपण आधीच्या भागात बघितले. या कारणामुळे सध्याच्या मुळशी धरणाजवळच्या पिंपरी गावाजवळच्या घाटातून (सध्याचा ताम्हिणी घाट) वर चढणारा आणि त्यावेळचे दख्खनमधील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या जुन्नरला जाणारा एक नवीन व्यापारी मार्ग स्थापित करण्याची गरज का भासली व या मार्गाच्या परिसरात धेनुकाकट सारखे भरभराटीस आलेले व्यापारी गाव का उदयास आले हेही आपण बघितले.
धेनुकाकट हे गाव कोठे असेल? व आजमितीला अस्तित्वात असलेली गावे किंवा शहरे यापैकीच एखाद्या गावाचे नाव त्या काळात धेनुकाकट होते का? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न, अनेक इतिहासकार व पुरातत्त्व विभागात कार्य करणारे संशोधक गेली 180 वर्षे तरी करत आहेत. यापैकी एक प्रयत्न, पुरातत्त्व विभागाचे दोन अधिकारी ((Archaeological surveyor and reporter to Government)) जेस बर्जेस आणि भगवानलाल इंद्राजी पंडित यांनी आपल्या 1881 मध्ये प्रसिद्ध केलेल्या Inscriptions from the cave -temples of western India या पुस्तकात केला होता. या पुस्तकामध्ये या दोन लेखकांनी, आंध्र प्रदेश राज्यात, कृष्णा नदीच्या काठी असलेल्या अमरावती या गावाच्या परिसरात असलेले, धरणीकोट हे खेडेगाव म्हणजेच पूर्वीचे धेनुकाकट असावे असा अंदाज मांडला होता.
परंतु ही कल्पना तत्कालीन इतर इतिहासकारांना बर्याच वैध कारणांमुळे फारशी पटली व रुचली नाही. एकतर अमरावती गावातच एक विशाल बौद्ध स्तूप उभारलेला असल्याने ते बौद्ध यात्रेकरूंचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान होते. या शिवाय या परिसरातच एक मोठा बौद्ध मठ कार्यरत होता. इ.स. सातव्या शतकात चीन पासून भारतापर्यंत खुष्कीच्या मार्गाने प्रवास करत आलेला व परत त्याच मार्गाने गेलेला सुप्रसिद्ध बौद्ध भिख्खू आणि प्रवासी शुएन झांग याने दक्षिणेकडे केलेल्या आपल्या कांचीपुरमच्या प्रवासात या बौद्ध मठाला भेट देऊन त्याबद्दलचे वर्णन आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी धरणीकोट बद्दलचे आपले मत व्यक्त करताना म्हणतात:
” धरणीकोट येथे रहात असलेल्या, ग्रीक किंवा इतर कोणत्याही वंशाच्या लोकांनी संपूर्ण भारतीय द्वीपकल्प आणि सातवाहन साम्राज्य पायी ओलांडून येऊन कार्ले मठाला भेट देण्याचे व त्याला देणग्या देण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाही.”
“ There is no apparent reason why people from Dharnikota, Greeks or not, should march right across the peninsula and cross the whole Satavahana kingdom to concentrate their donations at Karle’n.”
कोसंबी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सध्याचे धरणीकोट खेडे म्हणजेच मूळ धेनुकाकट असावे ही कल्पना आपण सहजपणे सोडून देऊ शकतो.
बर्जेस आणि पंडित यांच्या या प्रयत्नाच्या तब्बल 40 वर्षे आधी धेनुकाकटची ओळख देण्याचा अगदी पहिला प्रयत्न, इ.एच.जॉन्सन यांनी 1941 या वर्षी Journal of the Royal Asiatic Society या वार्षिकामध्ये लिहिलेल्या Two Notes on Ptolemy’s Geography of India, या लेखात केला होता. जॉन्सन यांनी टॉलेमीच्या भारताच्या किनार्यावरील बंदरांच्या यादीत असलेले साष्टी बेटावरच्या डौंगा किंवा डोंगरी गावाजवळचे बंदर, हे धेनुकाकट गाव असले पाहिले असे आपले मत व्यक्त केले होते.
धेनुकाकटची ही ओळख मला सर्वात जास्त रोचक वाटली होती कारण साष्टी बेट म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून सध्या ज्याला भारताची व्यापारी राजधानी समजली जाते ती बृहनमुंबई ज्या बेटांवर उभी आहे त्यापैकी एक बेट आहे. 2000 वर्षांपूर्वी सुद्धा मुंबई ही एक मोठी बाजारपेठ होती व तेथे अनेक ग्रीक वंशाचे लोक रहात होते ही कल्पना मला खूपच आकर्षक वाटली होती. परंतु धेनुकाकट्ची ही ओळख सुद्धा कोणत्याही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अभावाने आपल्याला सोडूनच द्यावी लागणार आहे.
मी वर निर्देश केलेल्या Periplus of the Erythraean Sea या ग्रीक ग्रंथात असा स्पष्ट उल्लेख आहे की सातवाहन शासनाच्या कालखंडात भरभराटीस आलेल्या कल्याण बंदरामधून होणारी मालवाहतुक, क्षत्रप नहापन याचा अंमल सुरू झाल्यानंतर जवळ जवळ बंदच पडली आहे. कल्याण बंदरात नांगर टाकणार्या ग्रीक गलबतांना अटक करून सैनिकांच्या संरक्षणात भडोचला नेले जाते. वाचकांनी जर मी सोबत दिलेली गूगल अर्थवरील उपग्रह छायाचित्रे बघितली तर त्यांच्या हे सहज लक्षात येऊ शकेल की कल्याण आणि साष्टी ही दोन्ही बंदरे एकमेकाच्या साधारण जवळपासच होती आणि कल्याण बंदर जर त्या काळात नहापन याच्या सैन्याच्या ताब्यात असले तर साष्टी बंदरावर माल उतरवून तो सातवाहनांच्या ताब्यातील प्रदेशाकडे नेणे दुरापास्तच होते. या बंदराच्या आजूबाजूचा भाग, (सध्याचे ठाणे चेंबूर हा भाग) शत्रू सैन्याच्या (क्षत्रप नहापन) ताब्यात असल्याने सातवाहनांशी व्यापारी संबंध ठेवणारी कोणतीच बाजारपेठ साष्टी येथे अस्तित्वात असणे शक्य वाटत नाही.
या शिवाय आणखी एक मुद्दा धेनुकाकट हे साष्टी असण्याच्या शक्यतेच्या विरुद्ध जातो. सातवाहनांचे प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या जुन्नरकडे, साष्टीहून जाणारा तत्कालीन रस्ता म्हणजे नाणेघाटातील रस्ता हा कल्याणहूनही जुन्नरला जाण्याचा मार्ग होता. या रस्त्याच्या परिसरात दोन मोठे बौद्ध मठ होते. ते म्हणजे कान्हेरी येथे असलेला एक मठ आणि जुन्नर जवळ असलेला दुसरा मठ (आता येथे लेण्याद्री मंदीर आहे.) यापैकी जुन्नर गुंफात धेनुकाकटचा उल्लेख कोठेच सापडत नाही आणि कान्हेरी येथे फक्त एका शिलालेखात धेनुकाकटचा उल्लेख आहे. या मुद्द्यांमुळे साष्टी बेट धेनुकाकट असण्याची शक्यता मुळापासून नाकारावी लागते.
सोपारा (नालासोपारा) बंदराच्या उत्तरेला असलेल्या डहाणू या गावाच्या नावाचा सुद्धा, ते धेनुकाकट असेल का? म्हणून विचार करणे वरील मुद्द्यांमुळे शक्य दिसत नाही, कारण डहाणू कडून जुन्नरला जाणारा कोणताही मार्ग हा परत कल्याणजवळच्या शत्रूच्या ताब्यात असलेल्या भागातूनच नाणेघाटकडे जात असल्याने वर दिलेल्या कारणास्तव डहाणूचे नाव सुद्धा नाकारावेच लागते.
यानंतर, “सॅम्युअल क्लार्क लाउचलि” या संशोधकाने 1984 मध्ये मांडलेले विचार Samoel Clark Laeuchli ( Journal of the Asiatic Soceity of Bombay, Vol 56-59, 1981-84, pp.214) माझ्या दृष्टीने अतिशय गंभीरपणे विचार करण्याजोगे वाटतात. लाउचलि आपल्या संशोधन प्रबंधात म्हणतो:
सातवाहन साम्राज्याचे पश्चिम किनार्यालगत असलेले प्रमुख व्यापारी केंद्र जुन्नर हेच धेनुकाकट असले पाहिजे. जुन्नर हेच धेनुकाकट असल्याने साहजिकच जुन्नर मठात धेनुकाकटचा उल्लेख कोठे केला गेलेला नाही. टॉलेमीने आपल्या ग्रंथात नानागुणा नदीच्या परिसरात असलेल्या ओमेनोगर या गावाचा उल्लेख केलेला सापडतो. जुन्नरच्या पश्चिमेला 25 किमी अंतरावर नाणे घाट व गुणा घाट या नावाचे दोन घाट अस्तित्वात होते यावरून ओमेनोगरा म्हणजेच सध्याचे जुन्नर गाव असले पाहिजे. जुन्नरजवळून मिना नावाची एक नदी वाहते त्यामुळे टॉलेमी ज्याला ओमेनोगारा म्हणतो आहे ते प्रत्यक्षात मिनानगर असले पाहिजे व जुन्नरचे ते जुने नाव असावे असा एक विचार प्रवाह आहे.
कार्ले गुंफांमधील 6 क्रमांकाच्या शिलालेखामध्ये उमेहनकट येथील एक यवन किंवा ग्रीक रहिवासी कितसागत याने मठाला दिलेल्या देणगीचा उल्लेख सापडतो. लाउचलि यांच्या मताने उमेहनकट हे जुन्नरचेच पण मुळात फारसी किंवा इराणी भाषेतील नाव आहे. त्यामुळे धेनुकाकट = उमेहनकट = ओमेनोगर = जुन्नर अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती असली पाहिजे. मिनानगर म्हणजे जुन्नर ही व्युत्पत्ती लाउचलि यांच्या मताने योग्य नाही.
धेनुकाकट म्हणजेच जुन्नर, हे लाउचलि यांचे मत प्रथमदर्शी तरी विचारात घेण्यासारखे आहे. जुन्नर हे पश्चिम किनार्याजवळ असलेले सातवाहन राम्राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने ऋषभदत्ताने आपल्या पुत्राला येथे चाललेल्या व्यापारावर इतर ग्रीक भाडोत्री सैनिकांच्या मदतीने देखरेख करण्यासाठी नियुक्त केले असण्याची कल्पनाही तर्कसंगत वाटते. त्याचप्रमाणे येथे ग्रीक लोक केवळ भाडोत्री सैनिक या नावाने रहात असल्याने त्यांनी देणग्या देताना आपण कोठले रहिवासी? एवढ्याचीच नोंद शिलालेखात करून घेणे हेही सयुक्तिक वाटते.
मात्र जरा जास्त विचार केल्यानंतर धेनुकाकट् अथवा उमेहनकट म्हणजे सध्याचे जुन्नर ही लाउचलि यांनी दिलेली ओळख मान्य करणे तितकेसे सोपे नाही हे लक्षात येऊ लागते. पहिली समोर येणारी अडचण म्हणजे जर धेनुकाकट हे जुन्नर असते तर तेथील रहिवाशांनी फक्त कार्ले मठावर मेहेरनजर करण्याचे काहीच विशेष कारण नजरेसमोर येत नाही. भाजे, कोंडाणे, बेडसे, शेलारवाडी हे सर्वच बौद्ध मठ जुन्नरपासून साधारण समान अंतरावरच आणि व्यापारी मार्गांच्या परिसरांत स्थापले गेलेले होते. त्यामुळे शेलारवाडी मधील एक शिलालेख सोडला तर इतर कोठेच धेनुकाकट किंवा उमेहनकट या गावाचा उल्लेख सापडत नाही आणि फक्त कार्ले येथे तो सापडतो या बाबीचा खुलासा करणे मोठे कठीण काम आहे हे लक्षात येते.
टॉलेमी आणि पेरिप्लस ( Periplus (McCrindle’s Edition, 126)), या दोन्ही मध्ये उल्लेख असलेले “तगर” गाव म्हणजेच सध्याचे जुन्नर असले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन या उलट दामोदर धर्मानंद कोसंबी करतात. तगर हे गाव सातवाहन कालातील अतिशय महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते व येथून उत्तरेला भडोच, दक्षिणेला मछलीपट्टण आणि सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (आजचे पैठण) या सर्व ठिकाणांबरोबर तगर येथून व्यापार चालत असे.
धेनुकाकट्ची ओळख पटवण्यासाठी निरनिराळ्या संशोधकांनी ज्या ज्या गावांच्या नावांची शक्यता वर्तवली होती ती सर्व अभ्यासल्यावर हे स्पष्ट होते की कार्ले गुंफांच्या जवळच्या प्रदेशात जी काय प्रमुख शहरे किंवा गावे सध्या अस्तित्वात आहेत त्यापैकी कोणतेच गाव, ज्या ठिकाणी एक भरभराटीस आलेली बाजारपेठ काही काळ तरी होती ते पूर्वीचे धेनुकाकट गाव असण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. मग यावरून आपण असे अनुमान काढणे कितपत योग्य ठरेल की धेनुकाकट गाव पुढील काळात अक्षरश: धुळीस मिळाले किंवा अंतराळात विलीन झाले?
एके काळी एक विशाल बौद्ध मठ कार्यान्वित असलेल्या कार्ले गुंफा ज्या भौगोलिक स्थानावर आहेत त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती आणि जुन्नरहून ताम्हिणी घाटामार्गे चौल बंदराकडे जाणारा व्यापारी मार्ग या मठाच्या परिसरातून जात होता ही ऐतिहासिक बाब या दोन्ही लक्षात घेऊन मला असा अंदाज बांधावयाचा मोह होतो आहे की उत्तरेकडे असलेल्या कार्ले गुंफा व दक्षिणेकडे असलेल्या भाजे गुंफा यांच्या मधल्या सपाट प्रदेशातच कोठेतरी हे रहस्यमय धेनुकाकट गाव बहुधा वसलेले असावे. या सपाट प्रदेशात अनेक खेडी व गावे आहेत. यापैकी जरा मोठी असलेली गावे म्हणजे कार्ले, शिलाटणे, देवघर, वाकसई आणि डोंगरगाव ही आहेत. मग असा अंदाज बांधणे कितपत योग्य ठरेल की यापैकीच कोणते तरी एक गाव ऐतिहासिक कालातील धेनुकाकट हे असले पाहिजे?
मात्र धेनुकाकटच्या स्थानाचे रह्स्य किंवा गौडबंगाल उलगडण्याचे श्रेय जाते ते विसाव्या शतकातील एक विद्वान व्यासंगी दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्याकडे! दामोदर कोसंबी हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, संख्याशास्त्री, मार्क्सवादी विचारांची बैठक असलेले इतिहासकार आणि जनुकशास्त्रातील कोसंबी मॅप फंक्शन चे शोधक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेतच. 1955 मधे प्रसिद्ध झालेल्या जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रॅन्च ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी या वार्षिकातील एका संशोधन लेखात, कोसंबी यांनी हे रहस्य उलगडल्याचा आपला दावा सादर केला. अर्थातच या साठी त्यांनी त्यांच्या व्यासंगाला अनुसरुन या मागची तर्कसंगत कारणे विशद केली होतीच. कोसंबी यांच्या या रहस्यभेद करणार्या लेखाला सॅम्युअल क्लार्क लाउचलि या सारख्या काही संशोधकांनी नंतरच्या कालात असहमती दर्शवलेली असली तरी कोसंबी यांनी बांधलेला तर्क धेनुकाकटचे गौडबंगाल सोडवण्यात बर्यापैकी सफल होतो असे मला तरी वाटते.
मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास बघता येतील.
(क्रमश:)
2 मे 2014
मस्त...
वाचतोय.
लेख आवडला.कार्ला लेण्यात
लेख आवडला.
कार्ला लेण्यात धेनुकाकटच्या यवनांबरोबरच नहपानाचा जावई ऋषभदत्ताचा पण इ.स. १ ल्या शतकातला शिलालेख आहे. धेनुकाकटच्या यवनांचे बहुतेक सर्वच शिलालेख हे सुद्धा इ.स. पहिल्या शतकातीलच आहे. कार्ला लेण्यातीलच वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा लेख हा तदनंतरचा आहे. धेनुकाकटचे यवन जर व्यापार करीत असतील तर कदाचित दस्तक देऊन जात असावेत. माझ्यामते केवळ सातवाहनांच्या राज्यात व्यापार करायला जातात म्हणून क्षत्रपांंकडून लुटालूट होत नसावी (अर्थात ह्याला कसलाही आधार नाही). वास्तविक क्षत्रप हे परकीय ह्या नात्याने यवनांना फार जवळचे.
दामोदर कोसंबी ह्यांचा तर्क वाचण्यास उत्सुक.
ह्याच कोसंबींनी देहूजवळच्या भंडारा डोंगरातील चैत्य आणि विहार शोधीले होते. तिथे एकदा गेलो असता घेतलेली ही छायाचित्रे.
रोचक छायाचित्रे.
का कुणास ठाऊक, वरून पहिला फटू हा "आदि शंकराचार्य" नामक संस्कृत पिच्चरमध्ये कुमारिलभट्टांना डोंगरावरून खाली फेकल्याचा शीन आहे तो डोंगर वाटतोय.
निरिक्षणे
श्री वल्ली यांची छायाचित्रे आवडली. कार्ला लेण्यातीलच वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा लेख त्याने ऋषभदत्ताचा संपूर्ण पराभव केल्यानंतर त्याच रणांगणातून त्याने दिलेल्या हुकुमाबरहुकुम कोरला गेलेला आहे. इतिहासकार आळतेकरांच्या मताने ही तारीख इ.स.१००-१०५ च्या आसपासची आहे. त्यामुळे धेनुकाकट मधे रहात असलेल्या नहपानाचा जावई ऋषभदत्ताच्या मुलाच्या देणगीचा उल्लेख असलेला शिलालेख किंवा नहपानाचा जावई ऋषभदत्ताचा लेख हे सगळे त्याच्या आधीचे असणार.
माझा असा अंदाज आहे (पुरावा नाही.) की नहपानाचा जावई ऋषभदत्ताचा बीमोड झाल्यानंतर नाणेघाट पुन्हा खुला होऊन पिंपरी घाटातील मार्ग व त्यावर अवलंबून असलेले धेनुकाकट आणि कार्ले मठ या दोन्हीचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले असावे. या बाबतची जास्त माहिती पुढील भागात ये ईल.
इतिहासकार आळतेकरांच्या मताने
वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा लेखाची तारीख कमीतकमी इ.स. १३० च्या नंतरची असली पाहिजे. कारण नहपानाचा संपूर्ण पराभव हा गौतमीपुत्राने इ.स. १२५ च्या आसपास केला आणि तेव्हाच क्षहरात क्षत्रपांचा निर्वंश केला. गौतमीपुत्रानंतर वाशिष्ठिपुत्र पुळुमावी सत्तेवर आला. त्याचे कारकिर्दीचे सातवे वर्षी हा लेख कोरला गेला आहे. त्यामुळे आळतेकरांची इ.स. १००-१०५ ही तारिख ग्राह्य धरता येत नाही.
गौतमीपुत्र सातकर्णी
गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कालखंडाच्या तारखा मी Maharashtra Gazetteer History 1 Chapter 2 pp 90 या संदर्भातून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी असलेली नोँद अशी आहे.
Gautamiputra Satakarni 3 ascended the throne in c. 86 A.D. and ruled for about 24 years. His
relationship with his predecessor is not given in the Puranas. The fortunes of his family had reached
the lowest ebb at the time of his accession. Nahapana had conquered a number of Satavahana
provinces and was firmly entrenched there. Kaniska was perhaps trying to penetrate from the cast.
Before the end of his reign, Gautamiputra not only reoccupied all the lost provinces, but also carried
the war into Nahapana’s dominions and conquered some of his provinces like Kathiavad and
Kukura (south-
यावरून मी गौतमीपुत्राची ऋषभदत्ताबरोबर झालेली अंतिम लढाई इ.स. 100-105 मधे असावी असे म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेला महाराष्ट्राचा अधिकृत इतिहास जर वल्ली म्हणतात तसा चुकीचा असला तर अर्थातच मी दिलेल्या तारखा चुकीच्या ठरू शकतात.
गॅझेटियर मधला कालोल्लेख हा
गॅझेटियर मधला कालोल्लेख हा चुकीचा असायला हवा.
कनिष्काने इ.स. ७८ मध्ये नवा शक सुरु केला. व क्षत्रपांनी तो पुढे प्रचलित केला. क्षत्रपांच्या लेखांतील वर्षे ही कायमच शक संवताची असतात. तर गौतमीपुत्राने नवा शक सुरु केला ही माहिती कोठल्याच शिलालेखांत नाही.
नाशिकच्या क्र. १० च्या (नहपान विहार) लेण्यातील ऋषभदत्ताचा लेख खालीलप्रमाणे आहे.
सिधं | वसे ४० + २ वेसाख मासे राञो क्षहरातस खतपस नहपानस जामातरा दीनीकपुत्रेन उषवदातेन संघस चातुदिसस इमं लेणं नियातितं |
सिद्धी असो. वर्ष ४२ च्या वैशाख महिन्यात क्षहरात क्षत्रप राजा नहपान याचा जावई दिनिकपुत्र ऋषभदत्त याने चारी दिशांच्या संघाला हे लेणे अर्पण केले.
जुन्नरजवळील मानमोडी डोंगरातल्या एका नहपानाच्या अमात्याचा शिलालेख आहे तो याप्रमाणे
रञो महाखतपस सामि नहपानस
आमतस वछसगोतस अयमस
देयधम च पोढि मटपो च पुञथय वसे ४० + ६ कतो |
राजा महाक्षत्रप स्वामी नहपानाच्या वत्सगोत्री अर्यम नामक अमात्याने हे टाके आणि विहार पुण्यप्राप्तीसाठी धर्मादाय केले.
हे दोन शिलालेख बघता शक संवत ४६ अर्थात इ.स. १२४ पर्यंत नहपानाची राजवट ह्या दोन्ही प्रदेशांवर होती हे स्पष्टच आहे. यातील नाशिकच्या लेखात नहपानाचा उल्लेख हा क्षत्रप आलाय तर जुन्नरच्या लेखात महाक्षत्रप. साहजिकच ह्या ४ वर्षांत नहपान हा क्षत्रप पदावरून महाक्षत्रप (सातवाहनांचा मोठा प्रदेश काबीज केल्यामुळे) ह्या पदाला चढला हे उघडच आहे.
ह्यानंतर मात्र क्षहरात वंशीयांचे कुठलेच लेख सापडत नाहीत.
संदर्भः The history and inscriptions of the Satavahanas and the Western Kshatrapas- Vasudev Vishnu Mirashi
मिराशी आणि आळतेकर
मिराशी आणि आळतेकर या दोन्ही इतिहासकारांच्या मतांमध्ये बरीच विषमता नेहमीच अनेक ठिकाणी आढळते. अनेक शिलालेखांचा अर्थ सुद्धा ते भिन्न प्रकाराने लावताना दिसतात. गौतमीपुत्राच्या कालखंडाबाबतीतील मतविभिन्नता सुद्धा याचाच एक भाग मानला पाहिजे. त्याने नहापनच्या सैन्याचा पराभव इ.स.१०० मधे केला की १२४ मधे हे सांगणे मोठे कठिण आहे. अर्थात त्यामुळे या लढाईचे महत्त्व कोणत्याच प्रकारे कमी होत नाही. मी तर याला महाराष्ट्राचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असेच मानतो. माझ्या प्रतिसादात मी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली तारीख फक्त ती अधिकृत आहे म्हणून वापरली होती. माझा कोणताच आग्रह या तारखेबद्दल नाही.
स्तूपावरील डिझाइन
स्तूपावरील डिझाइन थोडे अवांतर- वल्ली यांच्या फोटोमधील स्तूपावर मध्यभागी डिझाइनचा एक पट्टा आहे. या पट्त्यातील्न डिझाइन रेलिंगचे आहे व हिनायन शिल्पात सगळीकडे आढळते. सांची स्तूपाभोवती असेच रेलिंग आहे त्यामुळे या डिझाइनचा उल्लेख सांची रेलिंग नावाने केला जातो. पितळखोरे, अजिंठा, कार्ले, भाजे या सर्व ठिकाणी हे डिझाइन आढळते.
हे डिझाईन म्हणजे वेदिका
हे डिझाईन म्हणजे वेदिका पट्टी.
बांधीव स्तूपात ह्या पट्टीवरून स्तूपाला प्रदक्षिणा घालता येत असे. लाकडावरील कोरीव कामाप्रमाणे ह्याची नक्षी आहे. सह्याद्रीच्या खडकांत कोरलेल्या स्तूपात मात्र प्रदक्षिणा घालता येण्याजोगी वेदिकापट्टी कोरणे हे शक्य नाही त्यामुळे मूळ नक्षी तशीच कायम ठेऊन स्तूप उभारण्यात आले. अर्थात ह्या वेदिकापट्टीमुळेच स्तूपाचे जोते आणि अंडं अशा भागात विभाजन होते.
डिझाइन
सांची रेलिंग डिझाइन फक्त वेदिकापट्टीवरच आढळते असे काही नाही. सांचीला तर स्तूपाभोवती असे प्रत्यक्ष रेलिंगच आहे. पितळखोर्याला हे डिझाइन गुंफाच्या मुखाच्या वरच्या बाजूस असलेल्या कमानींमध्ये आहे. अजिंठ्याला भिख्खू विहारामधील कोठड्यांच्या द्वाराजवळ आहे. मला असे वाटते की या डिझाइनला काहीतरी धार्मिक महत्त्व असावे. (हिंदू धर्मात जसे स्वस्तिकला महत्त्व आहे.)
बेडसे लेणीतील दर्शनीभागातील
बेडसे लेणीतील दर्शनीभागातील चैत्यगवाक्षांच्या खाली पण असे डिझाईन आहे.
पण तरिही ह्या नक्षीला काही धार्मिक महत्व असेल असे मला वाटत नाही. बौद्धांची धर्मप्रतिके आणि इतरही धार्मिक चिन्हे वेगळी आहेत. मला तरी हे लाकडावरील नक्षीकामाची साध्यर्म्य असलेले काम वाटते.
लेख आवडला
नेहमीप्रमाणेच छान लेख. पुढील भागांची प्रतीक्षा.
संपादकांना विनंती.
आतापर्यंतची संपूर्ण लेखमाला वाचली.
मागील भागातील प्रतिसादांतून चर्चाही माहितीपूर्ण व विंटरेष्टींग. आय मीन रोचक.
तर संपादकांना विनंती, की या लेखांची लेखमाला बनविणे. अर्थात, मागील भागाची लिंक श्री चंद्रशेखर यांनी दिलेली आहे, पण पहिल्या भागातून दुसरा शोधणे जरा मुष्किल जाते आहे. त्या लिंका देऊन सर्व लेखांक नीटसे नॅव्हिगेट करता येतील अशी सोय केलीत तर बहार येईल.
धन्यवाद.
दुवे
लेखमालेचा पुढचा भाग शेवटचा असणार आहे. आपल्या सूचनेप्रमाणे त्यात आधीच्या सर्व भागांचे दुवे देता येतील. बाकी लेख्मला बनवायची म्हणजे काय करायचे ते कळले नाही.ही लेखमाला आहेच.
माफ करा, मी मायबोलीची
माफ करा, मी मायबोलीची टर्मिनॉलॉजी वापरत होतो.
तिथे संपादकीय सुविधा वापरून लेखमालांच्या ग्रूपमधे अशा प्रकारचे लेख सामिल केले जातात, तसेच सुलभ प्रकारे एका लेखावरून दुसर्यावर नॅव्हिगेट करता येईल अशा प्रकारे धाग्याखाली लिंका दिल्या जातात. याला लेखमाला 'बनविणे' असे म्हणतात. ( अर्थात, क्रमशः लिहिलेल्या लेखनपुष्पांना संपादकांनी लिंकांच्या दोरीत गुंफुन माला बनविणे :) )
मस्त मालिका. पुढच्या भागाची
मस्त मालिका. पुढच्या भागाची वाट पहातोय. वल्लींचा प्रतिसाद आवडला.
दुरुस्ती
बर्जेस आणि पंडित यांच्या या प्रयत्नाच्या तब्बल 40 वर्षे आधी धेनुकाकटची ओळख देण्याचा अगदी पहिला प्रयत्न, इ.एच.जॉन्सन यांनी 1941 या वर्षी Journal of the Royal Asiatic Society या वार्षिकामध्ये लिहिलेल्या Two Notes on Ptolemy’s Geography of India, या लेखात केला होता. जॉन्सन यांनी टॉलेमीच्या भारताच्या किनार्यावरील बंदरांच्या यादीत असलेले साष्टी बेटावरच्या डौंगा किंवा डोंगरी गावाजवळचे बंदर, हे धेनुकाकट गाव असले पाहिले असे आपले मत व्यक्त केले होते.
लेखातील या परिच्छेदातील साल चुकून १९४१ असे पडले आहे ते १८४१ असे वाचावे. क्षमस्वः
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250114___225900