ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण...

हें अपार कैसेनि कवळावें। महातेज कवणें धवळावें। गगन मुठीं सुवावें। मशकें केवीं ? ॥७४॥
परी एथ असे एकु आधारु। तेणेंचि बोले मी सधरु। जे सानुकूळ श्रीगुरु। ज्ञानदेवो म्हणे ॥७५॥

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गुरुची महती सांगताना ज्ञानदेव म्हणतात की, हे गीतेचे अपार तत्वज्ञान म्हणजे सूर्याला उजाळा देण्यासारखे किंवा चिलटाने आकाशा मुठीत धरण्यासारखे आहे. तरी पण मला आधार आहे तो अनुकूल असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा, म्हणूनच मी गीतेवर प्राकृत भाषेत टीका लिहिण्याचे अतिशय कठीण असे काम करु शकेन.

हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. ज्ञानदेव आपल्या लेखनात जागोजागी सदगुरुचा महिमा वर्णन करताना दिसतात. ईतके की ज्ञानदेवांचा आत्मज्ञानावरचा अद्वितीय असा ग्रंथ, अमृतानुभव. त्याच्या लेखन सुरुवातीला तर ज्ञानदेवांनी गणेशवंदनाचा शिष्टाचारही बाजूला ठेवला आणि ग्रंथाची पहिली ओवी लिहीली,

यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् |
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ||

ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या लेखनाच्या वेळी ज्ञानदेवांच्या गुरुंनाच ज्ञानदेवांना चक्क सांगावे लागले की, आता जास्त बोलू नकोस, गीतार्थ सांगायला सुरुवात कर.

इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥

महाविष्णूचा अवतार समजला जाणारे ज्ञानदेव आपले सारे कर्तुत्व ज्या आपल्या श्रीगुरुंवरुन ओवाळून मोकळे होतात ते ज्ञानदेवांचे श्रीगुरु कोण होते बरे?

ते होते निवृत्तीनाथ अर्थात निवृत्ती. ज्ञानदेवांचा त्यांच्यापेक्षा जेमतेम दोन वर्षांनी मोठा असलेला सख्खा भाऊ.

निवृत्तीनाथांचा जन्म इ. स. १२७३ साली आळंदी येथे झाला.

विठ्ठलपंतांचा हा मोठा मुलगा अतिशय समंजस आणि नावाप्रमाणेच निवृत्ती अर्थात विरक्त होता.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चारही लेकरे जराशी जाणती झाल्यावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्या सार्‍यांना त्र्यंबकेश्वरला तिर्थाटनासाठी घेउन गेले. त्र्यंबकेश्वराजवळच ब्रम्हगिरी हा पवित्र पर्वत आहे. याच पर्वतावर गौतम ॠषींनी गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गंगा नदीला भूतलावर आणण्यासाठी तपश्चर्या केली होती. विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांसहित ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. घनदाट जंगल होते ते. अचानक एक वाघ या सार्‍यांच्या दिशेने धावत येऊ लागला. विठ्ठलपंतांनी सार्‍यांना धावायला सांगितले. विठ्ठलपंतांच्या म्हणण्यानुसार सारे त्यांच्या पाठीवर पुढे धावू लागले. पण विठ्ठलपंतांच्या लक्षात आले की निवृत्ती एकटाच खुप मागे राहीला आहे. वाघ त्याच्याही पुढे आहे. मग विठ्ठलपंतांनी निवृत्तीला मागच्या मागे पळायला सांगितले.

थोडया वेळाने वाघ दिसेनासा झाला. सारी पुन्हा एकत्र आली. परंतु निवृत्ती मात्र कुठे दिसेना. विठ्ठलपंत आपल्या तीन लेकरांना आणि रुक्मिणीला घेऊन त्र्यंबकेश्वरला आले. आणि कुटुंबाला तिथेच ठेवून गावातील ब्रम्हगिरीच्या जाणकारांना घेउन निवृत्तीच्या शोधात पुन्हा ब्रम्हगिरीला आले. खुप शोधाशोध केल्यानंतर त्यांना निवृत्ती एका गुहेत एका साधूपुरुषाच्या पुढयात पद्मासन घालून बसलेला दिसला.

ते साधूपुरुष होते नाथ संप्रदायाच्या नवनाथांपैकी एक नाथ गहिनीनाथ. निवृत्ती अगदी निर्विकार वृत्तीने गहिनीनाथांसमोर बसला होता. निवृत्तीला समोर पाहून विठ्ठलपंतांना हायसे वाटले. त्यांनी गहिनीनाथांना नमस्कार केला. गहिनीनाथांनी झालेला वृत्तांत विठ्ठलपंतांना सांगितला. निवृत्ती धावत पळत घाबरत गुहेत शिरला. गहिनीनाथांनी त्याला धीर दिला. त्याची विचारपूस केली. सकाळ झाल्यावर तुझी आणि तुझ्या कुटुंबियांची गाठ घालून देतो असे आश्वासन गहिनीनाथांनी निवृत्तीला दिले. त्यांच्या आश्वासक शब्दांनी निवृत्तीचाही धीर चेपला. निवृत्तीच्या बालवयातील समज पाहून, त्याच्या जिज्ञासू वृत्तीने गहिनीनाथ प्रभावित झाले. दोघांनाही अंतरीची खुण पटली आणि गहिनीनाथांनी निवृत्तीला आपला शिष्य म्हणून स्विकारले. निवृत्तीचा निवृत्तीनाथ झाला.

विठठलपंतांचे तीनही मुलगे मोठे झाले होते. त्यांची मुंज करणे आवश्यक होते. म्हणून विठ्ठलपंत आळंदीच्या ब्राम्हणांकडे गेले. आळंदीच्या ब्राम्हणांनी मात्र निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान ही संन्याशाची मुले असल्यामुळे त्यांची मुंज करता येणार नाही असा निर्णय दिला. काहीही करुन आपल्या मुलांची मुंज व्हायलाच हवी असा ध्यास विठठलपंतांनी घेतला. त्यासाठी त्यांनी भूदेवांना काहीतरी शास्त्रात उपाय शोधण्यास सांगितले. आळंदीच्या कर्मठ ब्राम्हणांनी विठ्ठलपंतांना तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेतलेत तर तुमच्या विनंतीचा आम्ही नक्की विचार करू असे आश्वासन दिले. मुलांच्या भवितव्याचा विचार करुन विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या मायबापांनी आपल्या मुलांच्या नकळत प्रयाग क्षेत्रात जाऊन देहत्याग केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चारही लेकरे पोरकी झाली.

आई-बापाविना पोरक्या झालेल्या ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताईचा निवृत्ती पालक झाला. आपल्या लहान भावंडांची आई आणि बाप अशी दोघांचीही भुमिका तो निभावू लागला. ज्ञानदेवांच्या अंतरंगातील वादळे समजून घेऊन त्याला सांभाळणं हे अतिशय कठीण काम शांत निवृत्तीने अगदी सहजतेने केले. लहान भावंडांचे संगोपन करता करता निवृत्ती त्यांचा अध्यात्मिक गुरुसुद्धा झाला. आणि ज्ञानदेव नावाची एक अनमोल देणगी त्याने आपल्या शिष्याच्या रुपात जगाला दिली.

निवृत्ती जरी विरक्त असला तरी ज्ञानदेव भावनाशील होता. आपल्या आई वडीलांनी ज्या गोष्टीसाठी देहत्याग केला, त्या मुंजीला निदान आतातरी परवानगी मिळवू या अस हट्ट ज्ञानदेव निवृत्तीकडे करू लागला. आपण कोण आहोत याची पुर्ण जाणिव असलेल्या निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्ञाना आपल्याला शुद्धीपत्राची काहीच गरज नाही. आणि आपल्याला शुद्धीपत्र देणारे हे ब्राम्हण कोण? परंतु आपल्या लाडक्या भावाच्या हट्टापुढे निवृत्तीनाथांना नमते घ्यावे लागले. ही भावंडे आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणच्या वाटेला लागली. आणि ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वर माऊली होण्याच्या वाटचालीस सुरुवात झाली...

पुढे ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने भावार्थदिपीका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरीपाठाचे अभंग अशी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण केली. आणि एके दिवशी आपले अवतारकार्य संपले असून जिवंत समाधी घेण्याचा आपला मनोदय ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे व्यक्त केला. निवृत्तीनाथांना भरून आले. आपल्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान असलेला आपला हा भाऊ आपल्यासमोर लहानाचा मोठा झाला. आपल्यासमोर बाबांचा हात पकडून धुळपाटीवर मुळाक्षरे गिरवलेल्या या ज्ञानाने बघता बघता भगवद्गीतेवर टीका करणारा अजरामर असा ग्रंथ लिहिला. लोकांनी प्रेमापोटी ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर माऊली केलं आणि या वेडयाने मात्र सारं कर्तुत्व आपल्यावर ओवाळून टाकले. निवृत्तीनाथांचे डोळे भरुन आले. त्यांच्यातला ज्ञानाचा नाथदादा जागा झाला. आपला हा लाडका छोटा भाऊ, आपला हा लाडका शिष्य आपल्याला कायमचा सोडून जाणार या जाणिवेने निवृत्तीनाथ गहीवरले. भावनांना आवर घातला आणि जड अंतकरणाने आपल्या लाडक्या ज्ञानाला समाधी घेण्यास परवानगी दिली.

ज्ञानदेवांच्या समाधीनंतर वर्षाच्या आतच सोपानाने, त्यांच्या धाकटया भावाने सासवड येथे पुरंदराजवळ समाधी घेतली. निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले. दोघेही तिर्थाटनास निघाले. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या तीरावर मेहून येथे ते आले असताना सोसाटयाचे वादळ आले. जोराची वीज कडाडली आणि निवृत्तीनाथांची सर्वात छोटी बहीण मुक्ताई गुप्त झाली. आदीशक्ती आपल्या मुळ स्वरुपात विलीन झाली.

निवृत्तीनाथ आता एकटेच उरले होते. एक एक करता तीनही धाकटी भावंडे पंचतत्वात विलीन झाली होती. ज्या कार्यासाठी त्यांचा जन्म झाला ते अवतार कार्य त्यांनी पुर्ण केले होते. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला आले. आणि ज्ञानदेवांच्या माध्यमातून जनसामान्यांवर ज्ञानाचा वर्षाव करणार्‍या या नाथाने आपल्या गुरुचरणांशीच देह ठेवला.

निवृत्तीनाथांनी जवळपास साडेतिनशे अभंगांची रचना केली आहे.

आपल्या गुरुपरंपरेविषयी निवृत्तीनाथ लिहितात,

आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ।।१।।
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गहीनीनाथा ।।२।।
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला । ठेवा जो लाधला शांतीसुख ।।३।।
निर्द्वंद्व नि:शंक विचरता मही । सुखानंद –हदयी स्थिरावला ।।४।।
विरक्तिचे पात्र अन्वंयाचे मुख । येवुनी सम्यक् अनन्यता ।।५।।
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामे ।।६।।

तर ज्ञानदेव आपल्या गुरुपरंपरेविषयी लिहितात,

अदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।१।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहीनीप्रती ।।२।।
गहीनी प्रसादे निवृत्‍ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।३।।

गहिनीनाथांनी कृष्णभक्ती नाथसंप्रदायात रूढ केली. तत्कालिन अवैदिक पंथांच्या एकांगी विचारसरणीला पायबंद घालण्यासाठी घडवलेला हा बदल लोकहिताची व्यापक समज घेऊन करण्यात आला होता. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा देऊन ज्ञानी, सिद्ध केले व पुढच्या लोकसंग्रह, लोकोद्धार व लोकप्रबोधनाच्या कार्याची योजनाही सुपूर्द केली. निवृत्तीनाथांनी हे कार्य ज्ञानदेवांकडून घडवून आणले. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर अर्थात ज्ञानाचा ईश्वर बनवला. गुरू-शिष्याचे आदर्श नाते निवृत्ती-ज्ञानदेवाने अजरामर करून ठेवले आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखन विषयाला साजेसंच रसाळ भाषेत झालेलं आहे. ज्ञानदेवांच्या गुरूंविषयी माहिती फार नसते. ती छान दिलेली आहे. वाचताना कीर्तनकाराने सांगितल्याप्रमाणे ओघ आलेला आहे.

असंच अजून लिखाण करत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेचक ओव्या गुंफलेले हे निरुपण खूप आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनाजीराव, लेख आवडला. ह्यातल्या बर्‍याचश्या गोष्टी (अर्धवट) माहीत असूनही शेवटपर्यंत वाचावेसे वाटले. अगदी मोजक्या आणि योग्य त्या ओव्या लेखात गुंफलेल्या आहेत, तेही आवडलं. निवृत्तीनाथांचे गुरु गहनीनाथ होते ही माहिती माझ्यासाठी नवी आहे. तसेच मुक्ताई गुप्तं झाली हेही नव्याने कळाले. एकंदरीत माहितीपुर्ण लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

अनामिक यांनी लिहीलेल्या प्रतिक्रियेशी सहमत आहे.

धनाजीराव, लेख आवडला. ह्यातल्या बर्‍याचश्या गोष्टी (अर्धवट) माहीत असूनही शेवटपर्यंत वाचावेसे वाटले. अगदी मोजक्या आणि योग्य त्या ओव्या लेखात गुंफलेल्या आहेत, तेही आवडलं. निवृत्तीनाथांची गुरु गहनीनाथ होते ही माहीती माझ्यासाठी नवी आहे. तसेच मुक्ताई गुप्तं झाली हेही नव्याने कळाले. एकंदरीत माहितीपुर्ण लेख!

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्या जीवनावरचा कृष्णधवल चित्रपट दूरदर्शनवर खूप लहानपणी पाहिला होता... त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण जुने लोक समाधी घेत असत म्हणजे नक्की काय करत असत हे खरोखरिच कुतूहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओवीबद्ध लिखाण खूपच आवडले. तुमच्या संतसाहित्याच्या गाढ्या अभ्यासाविषयी आमच्या मनी अपार आदर आहे. अशाच सुरेख लिखाणाची मेजवानी आम्हाला सतत देत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद