बाउन्सर्स आणि यॉर्कर्स!

क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा.

पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात. अजून बाउन्स किती आहे, स्विंग किती आहे, बोलर किती जोरात आहे याचा अंदाज यायचाय. खेळायला आख्खा दिवस पडलाय. पहिला तास बोलरचा. बॅट्समन स्ट्राईक घेतो, बोलर स्वेटर काढून अंपायर कडे देतो, स्टेप्स मोजत रन-अप आखतो, आणि खरी गेम सुरू होते.

खेळपट्टी 'जिवंत' असेल तर पहिला डावपेच ठरलेला. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स. त्यात बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रू मधे पुढे अर्ध्या पिचपर्यंत जाउन बॅट्समनकडे खुन्नस वाली नजर. "आपल्याशी पंगा घेऊ नको" हा पहिला संदेश. दुसरा म्हणजे फ्रंट फूट वर यायची डेअरिंग आहे का, हा. बॅट्समनला ही लगेच याला धुवायचा आहे म्हणून वाट्टेल तशी बॅट फिरवण्याची गरज नसते. गावसकर म्हणायचा तसा 'पहिला तास बोलरला दिला की उरलेला दिवस तुमचा'. मात्र या पहिल्या तासातच बोलर बरोबर जी गेम चालते त्यातून वाचलात तर. एकतर स्विंग, बाउन्स, किंवा कट होणार्‍या नवीन चेंडूला खेळणे सोपे नसते, त्यात ५-१० ओव्हर्स चा स्पेल असलेला बोलर तुमचे कच्चे दुवे हेरून तुम्हाला उडवू शकतो.

बरेचसे शांत बॅट्समन अशा वेळेस बॅक फूट वर ठाण मांडून बसतात. आणि अशात मग एक प्रचंड वेगात फुल पिच स्विंग होउन येतो किंवा यॉर्कर येतो, आणि बॅट खाली जायच्या आत स्टंप घेऊन जातो. क्लासिक फास्ट बोलर्स विकेट! टेस्ट मॅच मधल्या अनेक जिवंत, सुंदर सीन्स पैकी माझा अत्यंत आवडता. भारतीय बॅट्समन नसेल तर जास्तच. विकेट्स मधे काहीही सपोर्ट नसताना सुद्धा काही फास्ट बोलर्सनी नवीन चेंडू, स्वतःचा वेग व दबदबा यांच्या जोरावर अशा विकेट्स काढलेल्या आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. जेथे विकेट्स मधे सपोर्ट असतो तेव्हा तर हे आणखी जोरदारपणे होते.

या अशा काही क्लिप्स. यातील बहुतेक क्लिप्स मधे दोन्ही बाजू दिग्गज आहेत, आपापल्या टीममधले त्यावेळचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे द्वंद्व हे कधीकधी मॅचच्या पेक्षाही मोठे समजले गेलेले आहे.


पहिला होल्डिंग विरूद्ध बॉयकॉट
बॉयकॉट हा इतर तत्कालीन (व अनेक कालीन) इंग्लिश लोकांप्रमाणे स्विंग चांगले खेळणार पण जेन्युइन पेस पुढे बकरा, असा नव्हता. स्लो खेळणारा असला तरी तांत्रिकदृष्ट्या कायमच नावाजलेला होता व विंडीज विरूद्ध चे त्याचे रेकॉर्डही चांगले आहे. त्याविरूद्ध ऐन भरात असलेला "व्हिस्परिंग डेथ" होल्डिंग. त्याच्या तेव्हाचा रन-अप सुद्धा पाहण्यासारखा असे. गवतावरून तरंगत गेल्यासारखा तो जात असे. बहुधा तो जवळून बोलिंग करताना ज्या सहजपणे आवाज न करता पळत यायचा त्यावरून डिकी बर्ड ने ते नाव ठेवलेले होते त्याचे.

खच्चून भरलेले व मिळेल तेथून अजूनही लोक येत असलेले बार्बाडोस चे स्टेडियम. इंग्लंड विरूद्धचा सामना म्हणजे कायमच खुन्नस बाहेर काढायची संधी. होल्डिंग ने टाकलेली ही ओव्हर्स क्रिकेटमधली सर्वात भारी समजली जाते. यात इंग्लिश समीक्षकांची आतिशयोक्ती सोडली तरी ही क्लिप बघता ती सर्वात डेडली ओव्हर्स पैकी नक्कीच असेल. बॉयकॉट चा स्टंप ज्या पद्धतीने उडतो ते सध्याच्या हाय डेफिनिशन क्लिअर पिक्चर मधे, १५ कोनांतून बघायला व स्टंप मायक्रोफोन मधून ऐकायला काय मजा आली असती!



ही दुसरी क्लिप व्हिव रिचर्ड्स विरूध्द डेनिस लिली. या सिरीज चे महत्त्व इतके प्रचंड आहे की पुढच्या १०-१५ वर्षांत विंडीज ने जागतिक क्रिकेट मधे वर्चस्व गाजवले त्याची मुळे येथे होती. लिली, थॉमसन वगैरे प्रचंड वेगवान व आक्रमक बोलर्स नी वेस्ट इंडिज ला एवढे जेरीस आणले की रिचर्ड्सलाही म्हणे या सिरीजच्या मध्यावर मानसोपचार तज्ञ गाठावा लागला होता फॉर्म परत मिळवण्यासाठी (त्याबद्दल त्याचे मत येथे आहे). त्यावेळेस एकूणच लिली भयंकर जोरात होता. त्याचा रन अप बघताना नेहमी शिकार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात एखादा चित्ता जसा एकदम वेग व इंटेन्सिटी वाढवत जातो तसे वाटायचे. येथे डावपेच तोच. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स आणि मग एक एकदम आत येणारा. रिचर्ड्स येथे बॉडी लॅन्ग्वेज मधे कितीही बेदरकारी दाखवत असला तरी लिली नक्कीच जिंकला.

ते 'जागतिक वर्चस्वाची मुळे" वगैरे लिहीताना शाळेच्या इतिहासातील "दुसर्‍या महायुद्धाची मुळे व्हर्सायच्या तहात..." वगैरे आठवत होते. त्याचे कारण म्हणजे फास्ट बोलर्स चे महत्त्व क्लाइव्ह लॉईड ने येथे ओळखले व यानंतर लगेच स्वतःच्या टीम मधे त्याला प्राधान्य दिले. मग आधी क्रॉफ्ट, होल्डिंग, रॉबर्ट्स व गार्नर, नंतर क्रॉफ्ट च्या जागी माल्कम मार्शल आला. त्यापुढे वॉल्श व अँब्रोज निवृत्त होईपर्यंत विंडीज कडे कायमच किमान दोन जबरी फास्ट बोलर्स असत.



इम्रान वि ग्रेग चॅपेलः ८१ मधला इम्रान म्हणजे ऐन भरातला. तर चॅपेल थोडा उतरणीला लागलेला असला तरी अजूनही भारी. पुन्हा ठरलेला डावपेच. चॅपेल ला फ्रंट फूट वर येउ द्यायचे नाही. कारण कॉमेंटेटर ने अचूक टिप्पणी केल्याप्रमाणे "A Greg Chappell playing forward is a confident Greg Chappell".. हे पाह्ताना एक जाणवेल की २-३ बॉल्स चॅपेल जसे खेळला ते बघितल्यावर लगेच रिची बेनॉ ने इम्राने ने चॅपेलला 'वर्क आउट' केला आहे हे ओळखले होते. जाणकार कॉमेंटेटर्स जसे बराच काळ बघितलेल्या खेळाडूंचा आज किती फॉर्म आहे ते ओळखतात तसाच प्रकार. रिची बेनॉ ते म्हणतो आणि पुढच्या बॉल वर चॅपेल ची दांडी! चॅपेल म्हणजे वास्तविक प्रचंड "अ‍ॅनेलिटीकल" खेळाडू होता. त्याने स्वतःच त्याच्या प्रत्येक बॉल मधल्या "रिच्युअल" चे खूप वर्णन केलेले आहे. प्रत्येक बॉल नंतर क्रीजवरून बाजूला जाऊन आधीचा बॉल कसा होता, नंतरचा कसा असू शकतो याचे विश्लेषण डोक्यात करून, पुन्हा पुढच्या बॉल वर फोकस करून मग क्रीज मधे तो येत असे. त्यालाही या पेटंट डावपेचाने इम्रानने काढला यावरून प्रत्यक्ष पीच वर वेगळीच गेम चालू असते हे जाणवते.



'खडॅक!" त्याकाळात फक्त ऑस्ट्रेलियातील मॅचेस मधे ऐकू येणारा हा "बोल्ड" चा आवाज. भारतीय बोलर ने काढला तर अजूनच धमाल. १९९२ मधला कपिल म्हणजे खरे तर चांगलाच उतरणीला लागलेला. पण द आफ्रिकेतील व ऑस्ट्रेलियातील पिचेस मधल्या "ज्यूस" मुळे त्या एक दीड वर्षात तो जबरी फॉर्म मधे आला होता. या दोन्ही सिरीज मधे त्याने खूप विकेट्स काढल्या. त्यातही या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे त्याने सातत्याने अ‍ॅलन बॉर्डर ला उडवला होता. बॉर्डर तेव्हाचा सर्वोत्कृष्ठ फलंदाज समजला जायचा. त्यात कॅप्टन व घरी खेळताना त्याला कपिल ने टारगेट करणे म्हणजे संघाच्या मुख्य बोलर ची जबाबदारी तो बरोबर घेत होता. या मॅच मधे नवा चेंडू घेतल्यावर कपिल कडे बॉल आला आणि तेव्हाचे हे तीन सलग बॉल्स किती डेडली होते ते पाहा. आधी बोर्डर ला लेट स्विंग होणार्‍या बॉल ने उडवला - प्रतिस्पर्धी कॅप्टनचा त्रिफळा काढणे हे बोलर्ससाठी नेहमीच मोठे यश असते- आणि मग फॉर्म मधे असलेल्या डीन जोन्स ला दोन 'ब्रूटल' आउटस्विंगर्स. पहिला जेमतेम हुकला पण दुसरा बरोबर ऑफस्टंपवर!



आणि ही इशांत शर्मा विरूद्ध रिकी पाँटिंग. इशांत शर्मा अजूनतरी वरच्या लिस्ट मधल्या बोलर्स एवढा भारी नसला तरी २००८-२०११ तो व झहीर ही पेअर खूप जबरी जमली होती व भारताच्या एकूण कसोटी क्रिकेट मधल्या तेव्हाच्या वर्चस्वात त्यांचा खूप वाटा होता. इशांत शर्मा ने २००८ च्या पर्थ टेस्ट मधे दोन्ही डावात पाँटिंगला जसा काढला त्यावरून त्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे हे सिद्ध झाले.

"एक और करेगा?"
"हाँ, करूंगा"
२००८ च्या पर्थ कसोटीनंतर ही वाक्ये खूप फेमस झाली होती. त्याआधी पाच वर्षे जगातील सर्वात चांगला फलंदाज असलेल्या पाँटिंगला जवळजवळ तासभर आपल्या स्विंग व बाउन्स ने सतावल्यावर अनिल कुंबळे शर्माचा स्पेल बदलणार होता. पण असे म्हणतात की सेहवाग ने त्याला दिल्ली मधे सलग बर्‍याच ओव्हर्स बोलिंग करताना पाहिलेले होते व त्याने अनिल ला त्याला अजून एक देऊन पाहा म्हणून सुचवले. इशांतला ते अनिल ने विचारल्यावर तो लगेच तयार झाला, व त्याच ओव्हरमधे फायनली पाँटिंगने 'निक' दिली. द्रविड कडे बॉल गेल्यावर तो सुटणे शक्यच नव्हते. या कसोटीत दोन्ही डावात 'पंटर' ला इशांत अजिबात झेपला नाही. क्रिकइन्फोच्या या लेखातही त्याची आणखी माहिती मिळेल.

याही मॅच च्या आधी बरेच काही झाले होते या सिरीज मधे. मेलबर्न ला रीतसर हरल्यावर, दुसर्‍या टेस्ट मधे सिडनीला आपली बॅटिंग फॉर्मात आली, पण थोडे दुसर्‍या डावातील अपयश व बरेचसे ऑस्ट्रेलियन चीटिंग व अंपायर्सच्या चुका यामुळे सिडनीलाही भारत हरला. एकूणच आपली टीम भयंकर डिवचली गेली होती. अनिल कुंबळे सारख्या शांत खेळाडूनेही "या मॅच मधे एकच टीम खिलाडू वृत्तीने खेळली" असे म्हंटले होते. भारताचे (व पाकचेही) एक आहे - तुम्ही कितीही हरवा पण व्यक्तीशः कोणाला डिवचलेत तर काय होईल सांगता येत नाही. संदीप पाटील एरव्ही ब्याटी फिरवून आउट होईल. पण त्याला जखमी केलेत तर परत येउन त्याच बोलर्सना तुडवून १७४ मारेल. 'दादा' एरव्ही कंबरेवर बाउन्स होणार्‍या बॉल ला सुरक्षितरीत्या स्लिप मधे पाठवण्याचे काम आपल्या बॅटचे आहे अशा समजूतीत खेळेल, पण राग आला तर शोएब, अक्रम पासून फ्लिंटॉफ पर्यंत कोणालाही पुढे येउन भिरकावून देइल. जेन्युइन वेग विशेष खेळता न येणारा अझर जखमी व अपमानित झाल्यावर ओव्हरमधले पाच बॉल कोठेही पडले तरी एकाच बाजूला बाउंड्रीबाहेर काढेल, गावसकर एरव्ही ९४ बॉल्स मधे १० रन जेमतेम काढेल पण डिवचलात तर पुढच्या कसोटीत जगातील सर्वात भयंकर बोलिंग विरूध ९४ बॉल्स मधे शतक मारेल, असला प्रकार. येथे तर सगळा संघच डिवचला होता. त्यामुळे एरव्ही बघितले तर पहिल्या दोन टेस्ट हरल्यावर तिसरी 'पर्थ' ला म्हणजे शब्दशः दुष्काळात तेरावा महिना. पण येथे आपण ऑस्ट्रेलियाला धुवून काढले. जवळजवळ सर्व प्रमुख बॅट्समनचे थोडीफार कामगिरी केलीच पण मॅच काढण्यात इशांतचा ही खूप मोठा भाग होता.

आपापल्या जमान्यातील खतरनाक बोलर्स व नावाजलेले बॅट्समेन यांच्यातील हे द्वंद्व हे कसोटी क्रिकेट मधेच बघायला मिळते. बोलर्सना ५-१० ओव्हर च्या स्पेल मधे बॅट्समन कोणत्या बॉल ला कसा खेळतोय हे बघून त्याप्रमाणे त्याला आउट कसे करायचे हे ठरवता येते. नियमांनी जखडून टाकलेल्या व पाटा पिच वर दम नसलेल्या बोलिंग वर पट्टे फिरवून ३० बॉल्स मधे ६० धावा करणे हे बघण्यातही एक मजा आहे पण ती एकतर्फी आहे व बॅट्समन चे एकच कौशल्य त्यात कामी येते - कोणत्याही बॉल वर शॉट्स मारू शकण्याचे. खरा कस लागतो तो कसोटीत. हे आजकाल जरा कमी बघायला मिळत आहे. तरीही डेल स्टेन, मिचेल जॉन्सन सारखे लोक अजूनही थोडीफार कामगिरी करत आहेत. तुम्हालाही अशा काही क्लिप्स माहीत असतील तर द्या येथे.
वरती भारताला डिवचण्याबद्दल जरा अवांतर क्लिप्सही दिलेल्या आहेत. पण क्रिकेटप्रेमींना आवडतील असे वाटते.

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

समयोचित लेख.आवडला. असेच फिरकी गोलंदाजांबद्दलही लिहावे. फिरकीतले कौशल्य वेगळेच असते. त्यातली मजाही वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

क्रिकेटवर मराठीत या प्रकारचं, हीरोवर्शिप न करणारं, क्रिकेटच्या तंत्राबद्दल आणि त्यातल्या गंमतींबद्दल लिहिलेलं रसाळ, शैलीदार लिखाण दुर्मीळ आहे. कृपा करून अजून लिहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाह! तुफान लेखंदाजी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फ्लिंटॉफ विरुद्ध कॅलिस. ऑल्राउंडर्सचं युद्ध. तुंबळ मजा येते हा वीडीओ बघायला. अर्थात फ्लिंटॉफला साईट्स्क्रीनची मदत झाली थोडी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"गवतावरून तरंगत येणारा होल्डिंग!" अगदी अगदी.
करमरकर एक छान लिहायचे.
आणि ना.सी. फडक्यांच्या काही जुन्या साहित्यातून असेच सुंदर लालित्यपूर्ण वर्णन आले आहे. 'चेंडू सरसरत गेला', त्याने डावीकडे झेपावत चेंडू पकडला' '(फलंदाजाच्या किंवा क्षेत्ररक्षकाच्या) डोळ्यांसमोर काजवे चमकले', 'भारतीय संघाचे भायखळा मार्केट झाले' (फलंदाज भोपळे घेऊन परतले. त्या काळी भायखळ्याला घाऊक मंडई होती.) ही सर्व बाळ पंडित, माधव मंत्री यांची वाक्ये. या लोकांनी चित्तथरारक, नेत्रदीपक हे पुस्तकी शब्द समालोचनात वापरून बोलीभाषेत आणले. टप्पा पडायच्याआधी पिचवर पाय नुसतेच मागेपुढे करीत राहाणार्‍या फलंदाजाला 'तो कदमताल करतोय' असे म्हटल्याने तणावाचे वातावरण एकदम हलके होऊन जायचे. हिंदी समालोचन होऊ लागले तेव्हा 'मनोवैग्यानिक दबाव, तम्बूमें घबडाहट' असे शब्द ऐकू येउ लागले आणि त्यांची भरपूर खिल्लीही उडवली गेली.
असे लेख आणखी येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मझा आया.

ट्वेंटी-ट्वेंटी नि एकदिवसीय क्रिकेट 'म्हणे' अधिक रोमांचकारी करण्यासाठी गोलंदाजांचे 'खच्चीकरण' करून त्यांना फक्त चेंडू टाकणारं यंत्र करून सोडल्यावर आम्ही क्रिकेट पहाणे सोडले. जिथे 'स्लोअर वन' आणि 'यॉर्कर' हे मुख्य अस्त्र असते आणि एखाद्या स्लिपच्या वर देणे परवडत नसल्याने 'स्विंग म्हणजे रे काय भाऊ?' विचारत खांदे पाडून गोलंदाजी करणारे तथाकथित वेगवान गोलंदाज केविलवाणे दिसतात. फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारे गोलंदाज वगैरे संकल्पनाच अस्तंगत झाल्या आहेत. तेव्हा असे नॉस्ट्याल्जिक होण्यापलिकडे हातात काही उरत नाही. (जाताजाता: अति-स्पर्धात्मक किंवा फायद्याच्या दृष्टीने बदल होत गेले की गुणवत्ता घसरत जाऊन निव्वळ साठमारी उरते हे आमचे लाडके मत क्रिकेटच्या बाबत अतिशय धडधडीतपणे सिद्ध झाले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अवांतर :-
अमुक तमुक वस्तू चांगली असेल तर मार्केटात टिकेलच. ह्याचा व्यत्यास होत "ती वस्तू टिकू नाही म्हणजे चांगली नव्हती" असं अप्रत्यक्षपणे ठसत जातं. तेच लॉजिक ताणलं तर "काळाच्या ओघात चांगल्या गोष्टी आजवर नष्ट झाल्याच नाहित.(ज्या चांगल्या होत्या त्या टिकल्या; ज्या टिकल्या त्या चांगल्या होत्या!!!)" असंही डोक्यात येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी असेच म्हणतो. बॉलिंगची पार वाट लावून टाकलेले हे क्रिकेटचे मढे पाहवत नाही.

बाकी लेखाबद्दल काय बोलावे? लय मजा आली. त्यात वेंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेलचे द्वंद्वही इन्क्लूडवलेले पहायला मजा आली असती. एरवी नाकावरची माशीही न हलणारा प्रसाद, साला काय पेटला होता तेव्हा...जबर्‍याच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख अतिशय आवडला. इम्रान-चॅपेल द्वंद्वावरून गिलेस्पीने लाराला टाकलेली ही ओव्हर आठवली. स्टंपवर पडून बाहेर जाणार्‍या चेंडूंच्या मालिकेनंतर एक सरळ आत येणारा चेंडू टाकणे ही तशी जुनीच स्ट्रॅटेजी. पण ती लारासारख्या खंद्या फलंदाजाच्या बाबतीत अंमलात आणणे सोपे नव्हे.

(अवांतर - रिकी पॉन्टिंग आणि जॉर्ज डब्ल्यू बुश या दोन नरपुंगवांच्या मंदमूषकसदृश्य चेहर्‍यात तसं साम्य आहे. ईशान्त शर्माच्या किंवा फ्लिन्टॉफच्या गोलंदाजीचा अजिबातच अंदाज न येणारा पॉन्टिंग टेक्सासात अगदी खपून जावा! Lol

बाकी साहेबांनी दोन खणखणीत चौकार लगावल्यानंतर अ‍ॅलन डोनाल्डने इनडिपरवर काढलेला दांडका आणि शोएब अख्तरचे ईडन गार्डनवरचे दोन सलग यॉर्कर्स (द्रविड आणि सचिन) हेही अप्रिय असले तरी स्मरणात राहिलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मियाँदादसमोर शेवटच्या बॉलला चेतन शर्माचा तो सुप्रसिद्ध आणि अजरामर यॉर्कर-कम-फुल्टॉस कसा काय आठवला नाही कुणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो नाही आठवला पण त्यावर कणेकरांच्या 'पुलाखालच्या तज्ज्ञाचे भाष्य' ('वो चेतन शर्माको अक्कल नईये. लास्ट बॉल है ना बाउन्सर डालनेका. जावेदका बॅट उधरतक पहुँचनेकोच नई मंगताय') नक्की आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

या वाक्याची आमच्याकडे पारायणे होतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या षटकाराची दखल फारएन्ड यांनी आधीच घेतली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोनी-कोहली टाईपचे क्रिकेट बघायचे सोडून दिल्याला बरेच दिवस झाले. जुन्या आठवणी छान आहेत. डोनाल्ड-द्रविड, मॅकग्रा-सचिन ह्या छोट्या लढायाही लक्षात राहिल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोनी-कोहली टाईपचे क्रिकेट बघायचे सोडून दिल्याला बरेच दिवस झाले. जुन्या आठवणी छान आहेत. डोनाल्ड-द्रविड, मॅकग्रा-सचिन ह्या छोट्या लढायाही लक्षात राहिल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान लेख. अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला क्रिकेटमधलं काहीही समजत नाही, फारशी आवडही नाही. पण तरीही लेख वाचायला आणि अधलेमधले दुवे उघडून बघताना मजा आली. फालतू चित्रपटांशिवाय फारएण्डाचं चांगल्या क्रिकेटवरही मनापासून प्रेम असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच तुमचा लेख वाचला आणि संध्याकाळी इशांत चे मिडियम पेसी पण शरीरवेधी बाऊन्सर्स, त्या आंग्ल लोकांना पेलवले नाहीत ते बघितलं! अक्षरशः मॅच फेकून दिली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोलर्सना मान दिल्याबद्दल +१.

सध्या आठवताहेत अशा आजकालच्या काही करामती-
फिलँडर आणि त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी. जवळपास प्रत्येक मॅचमध्ये १० विकेट काढल्या होत्या त्याने.
स्टेन आणि त्याचे निवडक स्पेल - स्टेन कमाल आहे. अचूकता आणि पुन्हा consistently तुफान वेग ह्याचं मुश्कील मिश्रण! T20मध्ये सुद्धा आपली उच्च कला तो दाखवून देतो.

त्याशिवाय ९२ मधल्या अक्रमचा इंग्लंडविरुद्धचा स्पेल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अँम्ब्रोजची १/७ वाली कामगिरी हे तर क्लासिक्सच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँम्ब्रोजची भेदक रोखलेली नजर आणि स्थितप्रज्ञ वाघाचं प्रत्युत्तर!
इथले सुरुवातीचे बाउन्सर उगाच जरा..छापाचे असले तरी नंतरचे २ मात्र एकदम निशाण्यावरच.
अँम्ब्रोज बेश्ट होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0