ड्रूपल (द्रुपल) आणि (मिडिया)विकि

चर्चात्मक मराठी संकेतस्थळांमध्ये ड्रूपल (द्रुपल) मजकुर(आशय) व्यवस्थापन प्रणाली निर्विवादपणे अग्रेसर राहिली. या धाग्याच्या निमीत्ताने मराठी तंत्रज्ञ, लेखक आणि वाचकात ड्रूपल (द्रुपल) मजकुर व्यवस्थापन प्रणाली च्या लोकप्रीयतेच्या मागे असलेल्या गमकांची नोंद घेणे. ड्रूपल (द्रुपल) आणि विकिच्या (मिडियाविकि एक सॉफ्टवेअर म्हणून) तौलनीक सामर्थे आणि दुर्बलतांची नोंद घेणे आणि मराठी संस्थळांवरील सहभागावर या आशयव्यवस्थापन प्रणालींच्या ठशाची दखल घेणे असा उद्देश आहे.

मराठी संकेतस्थळ रचनाकार, विकसक यांनी द्रुपलप्रणालींना झुकत माप दिल असेलतर त्यांच्या सोबतीलाच लेखक वाचकांनीही द्रुपल आधारीत रचनांना उचलून धरलं. अगदी धागालेखाच्याच खाली लगोलग थ्रेड पद्धतीने करता येणारी चर्चा, अक्षरांतरण (लिप्यंतरणाची) माध्यमातून डिफॉल्ट स्वरुपात उपलब्ध मराठी लेखनाची सुविधा, धागालेख लिहिण्यासाठी क्लिष्ट html पद्धतींचा वापर करावा लागत असला तरीही कदाचित तांत्रिक क्षेत्रातील मंडळींच सक्रीय पाठबळ मिळाल्यामुळे आणि दुवा देणे इत्यादी महत्वाच्या बाबी सुलभ स्वरुपात उपलब्ध करुन दिल्यामुळे लेखकांनी या तांत्रीक अडचणींना आणि त्रुटींना जड करुन घेतले नसावे. या मराठी संकेतस्थळांनी (आणि अर्थात त्यांच्या वाचकानीही) संदर्भ वगैरेचे अतीआग्रह न धरता धागा लेखकांना अनेकविध विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होऊ दिले दुसरीकडे प्रतिसाद देणार्‍या मंडळींना प्रतिसाद देताना विषयांतरातही वाहवण्याचे बर्‍या पैकी स्वातंत्र्य उपलब्ध झाले. आदूबाळांच्या शब्दात आपली भूमीका रेटू इच्छिणारा मंत्रचळ झाला तरीही पडीक राहण्याची सोबतीला समुह (कंपु) जोडण्याची प्रसंगी कट्टे इत्यादी आयोजीत करण्याची एक चांगली व्यवस्था या चर्चात्मक संकेतस्थळांमुळे होऊ शकली असावी. हि झाली एक बाजू. इतर भारतीय भाषात द्रुपल आधारीत संकेतस्थळांचा मराठी प्रमाणे काही विकास झाला असेल तर या निमीत्ताने जाणून घेण्यास आवडेल.

मराठी संकेतस्थळ निर्माते रचनाकार आणि विकसकांनी मराठी मंडळींना त्यांच्या मराठी संकेतस्थळांच्या सुविधा मोफत उपलब्ध करुन मोठेच योगदान दिले हे नाकारता येत नाही. अर्थात याचीच दुसरी बाजू मनोगतावरील महाजालावरील मराठीचा इतिहास-१ या धाग्यावरील जितेन यांच्या प्रतिसादातून पुढे येते ती म्हणजे यात निर्माते रचनाकार आणि विकसकांनी जशा काही गोष्टींची माहिती जशी मोकळेपणाने शेअर केली तशी काही हातची राखूनही ठेवली. जसे आर्थीक गणितांची मांडणी, जितेन यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास "....पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्याना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय परत मुक्तस्रोत समाजाला दिलेले दिसत नाही. ....". मिपाचे आणि ऐसीचे निर्मात्यांनी मराठी विकिपीडियाकडे स्पर्धक म्हणून बघीतले नाही, विकिबद्दलच्या चर्चा धाग्यासाठी मोकळेपणाने आमंत्रणे आली हा मोकळेपणा त्या पुर्वीच्या मराठी संकेतस्थळ निर्माते रचनाकार आणि विकसक कितपत दाखवू शकले या बद्दल जराशी साशंकता वाटते. खरेतर कंटेंट (मजकुरा) च्या बाबतीत मराठी विकिपीडिया आणि चर्चात्मक मराठी संकेतस्थळे अशी स्पर्धा असण्याचे काही कारण सकृत दर्शनी नव्हते आणि नाही. चर्चात्मक आणि इतरही मराठी संकेतस्थळांवर धागा लेखकाला जशी स्वतःची व्यक्तीगत मते मांडता येतात तशी मराठी विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे व्यक्तीगत मते मांडता येणारच नव्हती.

सुरवातीस लेखन मराठी संकेतस्थळावर (अथवा इतरत्र) व्हावयास हवे आणि मग त्याची तर्कसुसंगत दखल ज्ञानकोशानी संदर्भासहीत आणि स्वभाषेत घ्यावी. त्यामुळे मराठी विकिपीडियावर ललित लेखन होण्याची शक्यता न च्या बरोबर असल्या नंतर मराठी संकेतस्थळांना मराठी विकिपीडियाकडून अथवा इतरही ज्ञानकोशांकडून कोणताही सरळ व्यावसायिक स्पर्धा येण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही हे सर्व निर्मात्यांनी लक्षात घेतले नसावे. कदाचित माझ स्वतःच करिअर मार्केटींगच असल्यामुळे कोण कुणाला कुठे स्पर्धक म्हणून वागवतो आहे हे समजण्यास फारसा वेळ लागत नाही. अशाच प्रकारची बाब काही विशीष्ट मराठी व्यावसायिक रचनाकार आणि विकसकांच्याही अ‍ॅटीट्यूड मध्ये जाणवली. खरेतर द्रुपल जसे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर आहे तसेच मिडियाविकिही मुक्त सॉफ्टवेअर आहे . एक सॉफ्टवेअर प्रणाली म्हणून जशी द्रुपलला बलस्थाने आहेत तशी मिडियाविकिचीही स्वतःची बलस्थाने आहेत, मराठी व्यावसायिक रचनाकारांनाही जसे द्रुपल मोफत उपलब्ध होणार होते तसेच मिडियाविकिही मोफ्त उपलब्ध होणार होते आणि उपलब्ध आहे. काही क्षेत्रांमध्ये तेवढ्याच व्यावसायिकतेने मिडियाविकिचाही पर्याय उपलब्ध करून व्यवसाय वाढवण्याच्या संधी उपलब्ध होत्या आणि आहेत पण हि शक्यता व्यावसायिक मराठी रचनाकार आणि विकसकांनी कितपत अभ्यासली याबाबत साशंकता वाटते. हे सर्वही असू द्या पण मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसक (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स) यांची माहिती हवी अशा प्रकारचा धागा मी जेव्हा काढतो तेव्हा त्यांच्या स्वतः बद्दलही काही माहिती आपसूकपणे पुढे म्हणून येताना दिसत नाही. त्यांना क्वेश्चनीयर पाठवून माहिती मागवण्यासारखे पर्याय आहेतच नाही असे नाही. पण मराठी संकेतस्थळांबद्दल इंग्रजी विकिपीडियावरही लेख असावा म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा हवी असलेली माहिती पुरेशा जलदगतीने पुढे येताना दिसत नाही.

वरील चित्रातील ज्ञानकोशीय माहिती चक्राची पुरेशी माहिती करुन देण्यात विकिपीडियन कुठेतरी कमी पडत असावा. एक ज्ञानकोश दुसर्‍या ज्ञानकोशाचा अंशतः स्पर्धक असू शकेल पण इतर माहिती क्षेत्रांना ज्ञानकोश पुरक स्रोत असू शकतात स्पर्धक असू शकत नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्ञानकोश प्रथम माहितीचा स्रोत नसतात येत्या सप्टेंबर महिन्यात मराठी विकिपीडियावर शिक्षण महिना उपक्रम राबवून उल्लेखनीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि शिक्षणसंस्थांबद्दल माहिती मागवण्याचा मानस आहे. मराठी विकिपीडिया जेव्हा असा मानस जाहीर करते तेव्हा एखाद्या शिक्षकाबद्दल विकिपीडियावर पहिल्यांदाच माहिती लिहिली जाते आहे असे नको असते. पहिल्यांदाच द्यावयाची माहिती तुम्ही इतरत्र कुठेतरी द्या. तुम्ही सोडून इतर कुणा व्यक्तीस ज्ञानकोशाच्या दृष्टीने ती माहिती उल्लेखनीय वाटली तर त्याची ते दखल घेतील. म्हणजे जी माहिती पहिल्यांदाच बाहेरपडते आहे त्या माहितीला विकिपीडियन स्वतःहून आधी इतर संकेतस्थळावर अथवा इतर माध्यमात जाऊन समसमीक्षणाच्या माध्यमाने पारखले जाऊन मग नंतर काळाच्या ओघात अशा माहितीस संधी मिळाली तर ती विकिपीडियात पोहोचणार यात स्पर्धा कुठे आली ? काही असेलच तर माहितीचक्राचे सहकार्य आहे.

या अर्थाने मराठी संकेतस्थळांचे कार्य (एक ज्ञानस्रोत म्हणून) मराठी विकिपीडियासाठी पुरकच आहे, एकुण अशा लेखनाची गरज असतेच. मी जेव्हा द्रुपलाधारीत संकेतस्थळांकडे विकिपीडियाच्या संपादकीय चष्म्यातून पाहतो तेव्हा सर्वस्पर्षीततेचा अथवा संदर्भांचा किंवा लेखकाच्या लेखनाच्या व्यक्तीगत मर्यादा या बहुतांशवेळा कायम स्वरुपी राहण्याची शक्यता शिल्लक राहते कारण इतर लोक तुमचे लेखन दुरुस्त करु शकत नाहीत, त्यात काही नवीन माहितीही जोडू शकत नाहीत. या ठिकाणी एक ज्ञानकोश म्हणून (त्याच्या इतर मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा) विकिपीडिया उजवा ठरतो.

मला जेव्हा मनोगतवरील जितेन यांच्या लेखनाचा संदर्भ देण्याची गरज या लेखा साठी पडली ते विकिपीडियावरील लेखामुळे मला क्षणार्धात करता आले. या अर्थाने मनोगतवरील जितेन यांचा लेखनाचा उद्देश अधिक वेगाने पुढे गेला. द्रुपलाधारीत संकेतस्थळांनी आपले कोणते लेखन कॉपीराईटेड ठेवायचे आणि कोणते नाही हे निवडण्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करुन दिले तर विकिपीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनते पर्यंत एखादा विचार एखादी माहिती अधिक सहज पोहोचण्याचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. या विषयावर मी कॉपीराईट विस्तृत उहापोह मागे केलेलाच आहे.

इथे द्रुपलाधारीत चर्चात्मक संकेतस्थळांच्या सर्वसामान्य लेखक आणि प्रतिसादकांच लक्ष एका वेगळ्या मुद्याकडे वेधू इच्छितो की तुमची माहिती ज्ञान इतरांना पटवण्यासाठी/पोहोचवण्यासाठी कितीही आटापीटा केला तरी ती एका मर्यादीत वर्तुळाच्या बाहेर व्यापक समुदायापर्यंत पोहोचण्याची संधी कमी राहते. विशीष्ट माहिती शोधू इच्छिणार्‍या व्यक्तीस इथे एक सुयोग्य धागा शोधणे जिकीरीचे असू शकते. बहुसंख्य धागा लेख (मुख्य म्हणजे त्यातील माहिती) काळाच्या ओघा सोबत मागे पडते. असंख्य विषयांतरीत प्रतिसादातून नेमकी हवी असलेली माहिती शोधणे जिकीरीचे असू शकते. ऐसी अक्षरेवरच शंभर पेक्षा अधिक प्रतिसाद असलेले (आतापर्यंत अधिकतम ३२७) शंभरच्या आसपास धागे आहेत. मायबोलीत एकेका धागा लेखावर २००० ते ३००० पर्यंतही प्रतिसाद आढळतात. एवढ्या प्रतिसादातून एखाद्या वाचकाने नेमकी माहिती कशी शोधायची. म्हणजे त्या प्रतिसादातील लेखन तो प्रतिसाद वाचणार्‍या पाच पन्नास ते फारतर दहा वीस हजार वाचकांपर्यंत मर्यादीत राहणार आणि त्यातल बहुतेक विस्मरणातही जाणार. अपवादात्मक एखादा विकिपीडियनच ती माहिती शोधत शोधत पोहोचला तर नाही तर जुन्या धाग्यांवरील बहुतांश प्रतिसादांचे एकुण दीर्घकालीन मोल किती ?

जिथे पाणी द्यायच तेथे पाणी विहिर खोदणे स्वागतार्हच आहे पण पाझरतलावासाठी सुद्धा थोडी मेहनत केली तर सर्वच विहीरींना म्हणजेच ज्ञानकोशांच्या माध्यमातून आपली माहिती सर्वच माहिती स्रोतात पोहोचणे अधिक सुलभ असणार नाही का ? या मुद्यास मराठी संकेतस्थळांच्या लेखक आणि वाचकांनी revisit करण्यास वाव आहे का हे तपासून घेण्याची गरज आहे असे वाटते. अर्थात इतर मुद्दे आणि शंकाही असणार त्यांचा उहापोह धागाशृंखलेतील आगामी लेखातून करणार आहेच.

द्रुपल आणि मिडियाविकिच्या तांत्रीक अंगाने मुख्यत्वे चर्चा करावयाची असल्यामुळे येथे मिडियाविकिच्या सॉफ्टवेअर म्हणून काही सामर्थ्य स्थळांचा मराठी लोकांकडून पुरेसा अद्याप पुरेसा उपयोग/लाभ करून घेतला जात नाही असे वाटते. जसा काळबदलेल तशी भाषा बदलते आणि विकिसंकल्पने मुळे तुम्ही दिलेली माहिती अधिक काळ बदलत्या भाषेत सतत अद्ययावत स्वरुपात उपलब्ध राहण्याची शक्यता संभवते हा एक भाग झाला. लेखांची वर्गीकरणे करण्याची मिडियाविकितील पद्धती अत्यंत सुलभ आणि लवचीक असल्यामूळे असंख्य पद्धतीने वर्गीकरणे करुन पाहता येऊ शकतात. खासकरून विक्शनरी सारख्या शब्दकोश प्रकल्पाचा लाभ शब्द विषयक संशोधनासाठी वापरता येऊ शकतो. आलटून पालटून माहिती दाखवण्याची पद्धती ऑनलाईन पुस्तक रचना ते शुद्धलेखनादी विषयावर माहिती अधिक प्रभावी पणे पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. मराठी संकेतस्थळांवर एकेका व्यक्तीला शुद्धलेखनासाठी हाकारे घालण्यात वेळ घालण्यापेक्षा मराठी विकिपीडियावरील या क्षेत्रातील अल्पसे काम दीर्घकाळ आणि एकुण पोहोच या दृष्टीने अधिक प्रभावी असू शकते. मुख्य म्हणजे विकिपीडियावर लेखन आणि वाचन वाढल्यामुळे आपले लेखन सर्वस्पर्षी आणि अधिक माहितीयूक्त संदर्भपूर्ण होण्यास साहाय्य होऊ शकते हाही मोठा लाभ लक्षात घेण्या जोगा आहे. एक उदाहरण म्हणून मनोगत संस्थळावर इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सुचवणारी खूप सुरेख चर्चा होते पण एखादा पर्यायी शब्द हवा आहे तेव्हा शोधता येण्याची सोय मात्र होत नाही. आपण जो शब्द जिथे चपखलपणे बसतो तसा वापरतो तर जो फॉर्मॅट ज्या गोष्टीसाठी अधीक उपयूक्त आणि चपखल असेल तो वापरण्यास काय हरकत असावी, आणि ह्या अशा मर्यादांची कल्पना असूनही जिथे गैरसोय दिसते तेथेही एकाच फॉर्मॅटला चिटकून राहण्यात मराठी माणूस धन्यता का मानतो हे अद्यापतरी नीट न उमगलेले कोडे आहे. या बद्दल जरासा विचार थोडीशी कृती केला तर मराठी भाषेची ज्ञानभाषा म्हणून घडवण्यासाठी शक्य आणि गरजेचा असा असलेला खूप चांगलासा प्रगतीचा वेग साधण्याच्या संधी आपण आपल्या मायबोलीस देऊ शकतो. या वस्तुस्थितीकडे आपण डोळेझाक तर करत नाही आहोत ?

लेखन चालू

आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त होत आहे असे गृहीत धरले जाईल. धन्यवाद

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अपवादात्मक एखादा विकिपीडियनच ती माहिती शोधत शोधत पोहोचला तर नाही तर जुन्या धाग्यांवरील बहुतांश प्रतिसादांचे एकुण दीर्घकालीन मोल किती ?

हे वाक्य फारच आवडलं.
गरमागरम चर्चांमध्ये प्रतिसादाची लांबी फार वाढते आहे किंवा फार जास्त वेळ प्रतिसाद टंकण्यामागे घालवते आहे असं वाटलं की हे वाक्य निश्चित आठवेल.

एकाच फॉरमॅटला लोक चिकटून राहिले आहेत यावर टीका करण्यापेक्षाही ते का असावं याचा विचार महत्त्वाचा वाटतो.
ललित लेखन, व्यक्तींशी संपर्क साधण्याची सोय आणि (फार विचार, वाचन केलेलं नसेल तरीही) मत मांडण्याची सोय यामुळे संवादस्थळांवर विकीपेक्षा जास्त ट्रॅफिक असावं. फेसबुकावर मिळणारं instant gratification जास्त असल्यामुळे तिथे ते आणखी जास्त आहे. हा आनंद विकीवर कमीच; शिवाय तिथे कोणी लिहीलं आहे या माहितीला स्थान नाहीच. (ही त्रुटी इतरत्र कुठेतरी लेखन करून, त्याचा संदर्भ विकीवर देऊन काहीशी भरून निघते. पण हा मार्ग सरळसोट नाही.)

मी विकीपीडीया बराच वाचते, पण विज्ञानविषयक लेखन करतानाही मला विकीपीडीयावर लिहीण्याचा काहीसा कंटाळा येतो. कारण माझी लेखनाची शैली ज्ञानकोशीय (कोरडेपणाची?) नाही, लेखन रंजक करण्याची आहे. तत्कालिक कारण मिळाल्याशिवाय माझा विकीलेखन करण्याचा उत्साह कमी होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपला मनमोकळा प्रतिसाद आवडला आणि बराचसा पटलाही. ललित लेखन करून वाचकांचा लगेच मिळणारा प्रतिसाद (instant gratification) हे लेखनाला प्रेरणादायी सुद्धा ठरते त्यामुळे ललित लेखनासाठी द्रुपलाधारीत संस्थळे निश्चीत उजवी ठरतात. विज्ञान आणि इतर विषय सुद्धा रंजकपणानेही सामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचवणेही तेवढेच महत्वाचे आहे.

असे लेखन करण्या पुर्वी विकिपीडिया किंवा इतर माहिती स्रोत तुम्ही वाचता तेव्हा ते माहिती स्रोत अथवा विकिपीडिया एका पाझरतलावाची भूमीका निभावत असते. पाणी इतरत्र पोहोचवण्यात विहीरी आणि पाटांची भूमीका महत्वाची असतेच. माझा म्हणण्याचा उद्देश पाझरतलाव व्यवस्थीत भरलेला असेल तर विहिरी आणि पाटांना पाण्याची पातळी चांगली आणि दीर्घकाळासाठी मिळू शकते.

आपली भाषा ज्ञानभाषा म्हणून वृद्धींगत होणे हे अधीक महत्वाचे, फॉर्मॅट हा महत्वाचा नाही. ऐसीअक्षरेवर विकिपानांसाठी या सदरातूनच इथेच वेगळा ज्ञानकोश तयार झालातरी हरकत नसते, पण ललित लेखनाच्या वातावरणात तसे होण्याची शक्यता कमी राहील असे वाटते. लेखनात रंजकता आणण्यास हरकत अशी नाही पण सर्वसाधारणपणे मराठी लेखनात आलंकारीकतेच प्रेम मूळ विषय बाजूलाच राहून जातो अथवा पुरेसा सर्वस्पर्शी होत नाही अस बर्‍याचदा दिसत.

ऐसीवरील फारएण्ड यांच्या ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका या धाग्यावर मागे अनुषंगीक चर्चा येथे उल्लेखनीय ठरावी. जे लेखन अभ्यास आणि माहितीपूर्ण असेल ते रंजकता कमी असलीतरी वाचकास अगदीच कोरडेपणाचे वाटेल असे वाटत नाही. आमेरीका आणि युरोपीय देश जिथे ज्ञानकोशांच लेखन वाचन अधिक होत त्यांच्या कडे रंजक लेखन कमी होतं, अस कदाचीत नसेल. फरक भारतीय शिक्षण पद्धतीत चार पुस्तके वाचून नोट्स काढून स्वतःच्या शब्दात संदर्भासहीत लेखन करण्याच्या अभावाचा असू शकेल, हा एक व्यापक प्रश्न आहे. ज्यांना माहिती आहे आणि आपण म्हणता तशी रंजक लेखन शैली ते ज्ञानकोशीय लेखन शैली (आणि ज्ञानकोशीय ते रंजक) सहज स्वीचओव्हर कशी करता येईल या बद्दल काही टिप्स विकसीत होण्याची गरज वाटते. अर्थात आपला मुद्दा मराठीत सामुहीक ज्ञानकोशीय लेखनाच्या विकासासाठी महत्वाचा आहे हे निश्चितच.

लेखन कुणी केलं हा मुद्दा विकिपीडियात गौण होतो हे मान्य परंतु चर्चात्मक संस्थळांवरील सर्वच लेखकांना सर्व वेळी सुपरिचीत ठरण्याचे भाग्य लाभते असे नाही (आणि कॉपीराईट माध्यमातून उत्पन्नाचेही भाग्यतर अजून कमी जणांच्या नशिबी येते) आपण मान्य केल्या प्रमाणे धागे आणि प्रतिसादांच्या भाऊ गर्दीत तेथेही बहुतांश वेळा नाव हरवल्यातच जमा असते. एकुण काय तर चर्चात्मक मराठी संस्थळांवर लेखन करावेच पण गावाच्या एकुण विकासासाठी सामुहीक पाझरतलांवाच्या विकासासाठीही जरासा वेळ देऊन समतोल साधला जावयास हवा असे वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

एकाच फॉरमॅटला लोक चिकटून राहिले आहेत यावर टीका करण्यापेक्षाही ते का असावं याचा विचार महत्त्वाचा वाटतो.

मनोगतावरील मराठी शब्द हवे आहेत - १३ अशा प्रकारच्या चर्चांच्या फॉर्मॅट मधून एखादा शब्द शोधणे ते विक्शनरी या मिडिया विकिफॉर्मॅटमधील शोधयंत्र अथवा वर्गीकरणांचे साहाय्य घेऊन शब्द शोधणे वापरकर्त्यास कोणता फॉर्मॅट अधीक सोपा ठरावा ?

त्याच मनोगत धाग्यातील एका प्रतिसादात नमुद झालेला डेओंटोलोजी हा एक शब्द उदाहरणा दाखल मनोगताच्याच शोध यंत्रात असा शोधला आणि मनोगताच्या शोधयंत्राचे उत्तर ब्लँक आहे. हवे तेव्हा सुलभ शोध शक्य नसेल तर एकुण फलीत काय ?

जुनी प्रताधिकारमुक्त पुस्तके आंतरजालावर उपलब्ध व्हावीत म्हणून मराठी पुस्तके डॉट ऑर्ग नावाचे संकेतस्थळ चालू केले गेले होते (द्रुपलात असावे चु.भू.दे.घे). त्यात त्यांनी पुस्तकांच लोकांकडून पुन्हा टायपींग करून घेतल युनिकोडाच्या महत्वाची कल्पना असूनही पिडीएफ मध्ये करून घेतलं ! आणि दुर्दैवाने या क्षणी ते उघडतही नाही (गूगल कॅश). खाप्रे डॉट ऑर्ग युनिकोडातही उपलब्ध करवतात पण माहिती प्रताधिकारमुक्त असणे अभिप्रेत असूनही कॉपी पेस्ट करू देत नाहीत म्हणजे तुम्हाला संदर्भा सहित वापरावयाची असल्यास पुन्हा पूर्ण टंकन करत बसा मग या युनिकोडाचा फायदा काय ? ते विकिस्रोत प्रकल्पातील जुन्या पुस्तकांच्या इमेज वरून टायपिंग सुविधा, शोध, वर्गीकरणे अत्यंत सुलभ पद्धतीने वापरता येतात. त्या शिवाय अनेक भाषातून साहीत्य अनुवादीत केले जाण्यास प्रोत्साहन दिले जाते.

मोडी लिपी माहितीसाठी http://marathimodi.tripod.com नावाचे ब्लॉग/संकेतस्थळ होते त्यांनी मराठी विकिपीडिया लेखासाठी माहिती वापरू देण्यात सहकार्य दिले पण आज तो धागा चालू नाही. आता तो दुवा बंद आहे. मिलींद भांडारकरांनी मिडिया विकिसॉफ्ट्वेअरच वापरून शब्दार्थांसाठी संकेतस्थळचालू केले होते ते आता बंद आहे. मराठी भाषेसाठी आधीच आंतरजालावर माहितीचा अभाव असतो त्यात असे संकेतस्थळांचे बंद पडणे, माहिती उडणे इत्यादी एकुण चिंतेची बाब असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

लेखाच्या नावात ड्रूपल आणि विकिपीडीया बघून उत्सुकतेने लेख वाचायला घेतला, पण इतकी क्लिष्ट भाषा बघून सोडून दिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण म्हणता तसे जरासे झाले खरे. लेखाचा विषय बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत होता. लिखाणाची निटशी लिंक लागलेली नसतानाही लेखन विषय एकदाचा हाता वेगळा करावा यातून तसे झाले असू शकते. लिहिण्याच्या ओघात दोन्हींच्या फिचर्सचा सविस्तर उहापोह आणि तुलना राहून गेली अशी तुलना करण्यात या धागालेखाच्या वाचकांनी सहभाग घेतल्यास धागा अधीक नेमका होण्यास हातभार लागू शकेल.

लेखन लांबल्या नंतर महत्वाचे मुद्दे ठळक केल्यास वाचकांना सुलभ जाते तसे करेन.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काही अतिरंजित गृहितकं किंवा गैरसमज वाटतात. त्यांच्या निराकरणासाठी -
१. चांगल्या ललित लेखनाला फार प्रतिसाद मिळेल असं नाही; २. रंजक तरीही चांगल्या अललित लेखनात उपमांचा नकोसा मारा असेलच असं नाही; आणि ३. रंजन म्हणजे instant gratification नाही.

मी सध्या जी पुस्तक मालिका गोष्टीची पुस्तकं म्हणून वाचते आहे, 'The Best American Science Writing' त्यात ललित भाग आहे आणि विज्ञानही आहे, ठोकळेबाज किंवा साच्याबाहेरच्या उपमा हा प्रकार तेहतीस पानांतून एखादा दिसत असेल.

तरीही विकीपीडीया भरायला हवा याबद्दल सहमती आहे.पण ज्यांना रंजक लेखन (करायला) आवडतं, "वा वा चान चान"च्या पलिकडे काही लिहीण्याची इच्छा नसते, किंवा लाईकचं बटण ठोकून फार काही केलं असं वाटतं अशा लोकांना विकीपीडीयाकडे कसं वळवायचं या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या पहिल्या तिन्ही मुद्द्यांशी सहमत

मी सध्या जी पुस्तक मालिका गोष्टीची पुस्तकं म्हणून वाचते आहे, 'The Best American Science Writing' त्यात ललित भाग आहे आणि विज्ञानही आहे, ठोकळेबाज किंवा साच्याबाहेरच्या उपमा हा प्रकार तेहतीस पानांतून एखादा दिसत असेल.

इथे इंग्रजी आणि मराठी लोकांच्या लेखकीय प्रवृत्तीत/संस्कृतीत/का शैलीत फरक पडतो असे वाटते. मराठी विकिपीडियावर इंग्रजी विकिपीडिया ते मराठी विकिपीडिया बरेच जण अनुवाद करत असतात. मूळ इंग्रजी लेखनात जिथे कोणतीही वर्णनात्मकता अलंकारीकता नाही विशेषणे नाहीत त्याचा अनुवाद करताना प्रत्येक मराठी अनुवादक वर्णनात्मकता अलंकारीकता विशेषणे या पैकी एक ठोकळेबाजपणाने जोडताना एवढ्या प्रमाणात दिसतात की आपलेच ज्ञानकोशीय शैलीचे आग्रह गुंडाळून ठेवावेसे वाटतात. हे विकिपीडियावरच्या सर्वसामान्य लेखकांच झाल.

मी पुण्यात काही वर्षांपुर्वी झालेल्या कोशकारांच्या परिषदेत विकिप्रचाराच्या दृष्टीने घुसखोरी करुन बोलण्याची संधी मिळवली होती. परिषदेच्या बॅनरवरचे पहिले वाक्य इंग्रजीत होते त्याच्या खालच्या ओळीतील अनुवादात विशेषण नेहमीच्या मराठी सवयीने होते मी माझ्या बोलण्यात त्या बद्दल बोलता बोलता उल्लेख केला तर कोशकार मंडळी नाराज झाली माझी एवढीच धडगत की माझ्यानंतरचे वक्ते कोशीय लेखन शैलीतील जाणते होते आणि त्यांनी माझी बाजू अत्यंत व्यवस्थीत उचलून धरली. तरीही आयोजीका मॅडम नंतरही खफाच राहील्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

हा माझा सर्वसाधारण तर्क आहे. यामागे फार काही विचार केलाय असंही नाही. -

एकतर इंग्लिश वाचन, लेखन करणारा मध्यमवर्ग संख्येने बराच मोठा आहे. मराठी भाषिकांची संख्या बरीच जास्त असली तरी हौसेने पुस्तकं, संगणक-इंटरनेट विकत घेऊन वापरणारा वर्ग मर्यादित आहे. ज्या पुस्तकांचा खप बराच होतो त्यात अशी चमकदार वाक्यं, शीर्षकं फार असतात. निदान या दोन चाळण्यांमधून उरणारा वर्ग आकाराने फारच कमी असणार.

पण विकीपीडीयाच्या स्वरूपामुळे फार जास्त काळजी करावी असं वाटत नाही. कारण आज कोणीतरी अलंकारिकतेचा मोह धरून भाषांतर केलं तर उद्या कोणीतरी ते सुधारून ज्ञानकोशीय शैलीत आणू शकतात. पण असा आग्रह धरणाऱ्यांना बरीच चिकाटी धरावी लागेल; आणि ही अपेक्षाही अवास्तव वाटू शकते. पण न पेक्षा काहीही बरं का बनवायचं ते उत्तमच या दोन टोकांमधून उपाय शोधावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रंजन म्हणजे instant gratification नाही.

हे वाक्य अतिशय आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा एकदा लेख वाचायचा प्रयत्न केला.

आदूबाळांच्या शब्दात आपली भूमीका रेटू इच्छिणारा मंत्रचळ झाला तरीही पडीक राहण्याची सोबतीला समुह (कंपु) जोडण्याची प्रसंगी कट्टे इत्यादी आयोजीत करण्याची एक चांगली व्यवस्था या चर्चात्मक संकेतस्थळांमुळे होऊ शकली असावी.

क्लिष्ट भाषा कशी असावी, याचे हे एक उदाहरण. तुम्ही मार्केटिंगमध्ये असल्याने तुम्ही वाचलेच असेल की आपण जसे बोलतो, तसे लिहिले तर समोरच्याला लगेच कळते. सुटसुटीत वाक्यरचना, छोटी वाक्ये आणि छोटे, सरळसोपे शब्द अधिक परिणामकारक असतात. (मी कुठे वाचले ते विचारू नये. बहुधा Al Ries, Jack Trout च्या पुस्तकात. आता आठवत नाही, त्यामुळे विदा मिळणार नाही.) त्यामुळे हे असे वरील वाक्य इतर संकेतस्थळांवर चालू शकेल, पण विकिपिडीआवर नाही.

ड्रूपल आणि विकिपिडीआत हाच फरक अपेक्षित आहे. विकिपिडीआ म्हणजे अचूक आणि नेमकी माहिती मिळाली पाहिजे, फाफटपसारा नको. त्यामुळे हा लेखसुद्धा विकिपिडीआसाठी अयोग्य आहे, असे माझे मत आहे. तसेच विकिपिडीआत संदर्भ देणे गरजेचे आहे. विकिपिडीआत लिहायचे म्हणजे त्या विषयावर अचूक ज्ञान हवे. त्यामुळे तिथे लिहिणे अधिक कठीण आणि वेळखाऊ आहे, असे मला वाटते. शिवाय, इंग्रजी लिहिण्यापेक्षा मराठी टायपिंग बरेच कठीण आहे, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मराठी संकेतस्थळावर काही लेखन एकवेळ खपू शकेल पण विकिपिडीआवर काही क्वालिटीची अपेक्षा असते. शिवाय बर्‍याचदा अचूक भाषांतर जमत नाही ही पण एक मर्यादा आहे. (इथे efficiently ला काय वापरू, हेच जमले नाही.)

विकिपिडीआ जाऊदे, DMOZ मध्ये मराठीसाठी फक्त ६० नोंदी आहेत, यावरूनच मराठीसाठी किती अनास्था आहे, ते दिसून येते.

एक सॉफ्टवेअर प्रणाली म्हणून जशी द्रुपलला बलस्थाने आहेत तशी मिडियाविकिचीही स्वतःची बलस्थाने आहेत

विकीमध्ये अशी काय बलस्थाने आहेत, जी ड्रूपलमध्ये नाहीत, ते जाणून घ्यायला आवडेल. याउलट विकिपिडीआचे सगळे फायदे + अधिक, ड्रूपलमध्ये आहेत असे मला वाटते. ड्रूपलमध्ये नीट शोध घेता येत नाही, हा भ्रम आहे हे मी मागे एका उत्तरात सोदाहरण दाखवले होते.

पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्याना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय परत मुक्तस्रोत समाजाला दिलेले दिसत नाही

याच्याशी सहमत आहे. फार पूर्वी मी महेश वेलणकर यांना ईमेल करून ड्रूपलसाठी मराठी .po फाईल मागितली होती. माहिती मिळणे तर राहू दे, साधी पोचही मिळाली नाही. याउलट श्री. शशांक जोशी यांनी ईमेलला उत्तर दिले की त्यांना उपक्रमसाठी मदत लागली तर ते संपर्क करतील.

मला स्वतःला व्यक्तिशः मराठी विकिपिडीआची कधीच गरज पडलेली नाही. त्यामुळे मराठी विकिपिडीआसाठी इच्छुक ग्राहक (target audience) कोण आहे, ते आधी बघावे लागेल. माझ्यामते, विकिपिडीआ आणि ड्रूपल आधारित संस्थळ यांचे ग्राहक वेगळे आहेत. कदाचित या प्रकारे बॉट बनवून विकिपिडीआ भरणे सोईस्कर पडू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0